|| श्री स्वामी समर्थ ||
काही दिवसापूर्वी एका व्यक्तीची पत्रिका पाहिली. अत्यंत त्रासातून ते जात होते ते समजत होते , व्यवसायात तोटा , कर्ज त्यामुळे तसाही तब्येतीवर परिणाम झालेलाच होता , जीवनात कसलाच उत्साह राहिला नव्हता आणि पुढे काय करावे हा मोठा प्रश्न होता . थोडक्यात गलितमात्र अशी स्थिती झाली होती . पण त्याही पेक्षा मोठा मानसिक धक्का त्यांना बसला होता तो त्यांच्या कुटुंबातून , घरातील मंडळीत एकमेकात वाढत चालणारा तिढा , त्यामुळे निर्माण झालेला अबोला आणि सगळ्यात मुख्य म्हणजे टुकार गैरसमजामुळे संपुष्टात येवू पाहणारे नातेसंबंध.
ज्या काका आत्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो , भावंडांच्या सोबत लहानाचे मोठे झालो त्यांच्यात शुल्लक कारणाहून झालेले गैरसमज ह्यांनी रौद्र रूप धारण केले होते . हा गैरसमज आहे आणि तो दूर होवू शकतो पण तो करणार कोण ? आणि कसा ? कारण समोरच्या व्यक्ती विचारांच्या पलीकडे गेलेल्या आणि समजून घेण्याच्या मनस्थितीत नसलेल्या . आयुष्यभर एकत्र असणार्या व्यक्तींची साधारण पणे आपल्याला थोडीतरी ओळख असतेच किबहुना तेच अपेक्षित आहे पण नाही , कुणीतरी काहीतरी बिनबुडाचे सांगायला आणि डोक्यात तेच खूळ धरून बसायला एकाच गाठ पडली , आता ती कुणी मारली ??????आपल्या लक्ष्यात आलेच असेल एव्हाना .
त्या व्यक्तीच्या वडिलांच्या काका आणि भावंडांच्या त्यांना माहित असलेल्या जन्म तपशिलावरून अभ्यासाला सुरवात केली . ह्या सर्व घटना ज्यातून निव्वळ गैरसमज निर्माण होवून नाते संबंध बिघडवणारा राहू खलनायक म्हणून उभा होता . कुणाच्या पत्रिकेत राह्ची दशा तर कुणाच्या अंतर दशा , कुणाचा दशा स्वामी राहूच्या नक्षत्रात तर कुणाला त्यात भर म्हणून साडेसाती , कुणाचे सोबत अष्टम भाव लागलेले तर कुणाच्या लग्नात कुटुंब भावात राहू . थोडक्यात संपूर्ण कुटुंब राहूच्या विळख्यात सापडलेले होते . आयुष्यभर अगदी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून वावरणारे आणि एकत्र सणवार साजरे करणारे कुटुंब विखुरले होते , मन सैरभैर झाली होती. राहूचा तांडव सुरु झाला कि तो आपल्याला विचार करायला सुद्धा वेळ देत नाही अगदी क्षणभर सुद्धा . आपली खेळी राहुने ह्या कुटुंबात बरोबर खेळली होती . भास आभासाच्या खेळात आपण होतो ते फक्त राहूच्या हातातील मोहरे , काय चूक काय बरोबर हे समजून घेण्याची विचारशक्ती जणू खुंटलेली असते . हृदयाच्या समीप असलेली आपली माणसे क्षणात परकी होवून जातात . अगदी एकमेकांची तोंडे पहावीशी वाटत नाही इतकी असुया , मत्सर , द्वेष कसा काय निर्माण होतो माहित नाही पण होतो हे खरे आहे. नाही माझा भाऊ माझे बाबा असे करणारच नाहीत हा विचार क्षणभर सुद्धा मनाला स्पर्शून जावू नये म्हणजे राहू मनावर किती हाबी होत असेल त्याची कल्पना येते.
प्रचंड बलवान ताकदवान आणि षड्यंत्र रचणाऱ्या राहुने आपले काम फत्ते केले आहे हे मला सगळ्या पत्रिकांचा अभ्यास केल्यावर जाणवले. काही गोष्टीना काळ आणि वेळ हेच औषध असते , पण राहुने दिलेल्या जखमा पूर्ण बर्या होण्याची शक्यता कमी असते , एकदा तुटले कि पुन्हा सांधणे कठीण जाते आणि पाहिल्यासारखे तर नाहीच नाही , ह्या काळात एकमेकांशी अबोला असतो कारण बोलण्याने गैरसमज दूर होईल म्हणून राहू तशी स्थिती तयारच होवू देत नाही . असो वडिलोपार्जित संपत्ती हासुद्धा अनेकदा ह्या सर्व घटनामागील प्रमुख विषय असू शकतो . राहू आपल्या पूर्वजांचा कारक आहे आणि कुणाचे काही शाप किंवा तळतळाट आपल्याला भोगायचे असतील तर त्यापासून आपली सुटका नाही . ते आपले संचित म्हणावे लागेल. आपले सद्गुरू दिशा दाखवतील , नामस्मरणामुळे हे सर्व सहन करण्याची ताकद सुद्धा देतील पण ह्या गोष्टीत दखल मात्र देणार नाहीत कारण काही गोष्टी भोगूनच संपवायच्या असतात .
राहूची महादशा ज्यांनी भोगली आहे त्यांना विचार त्यांचे अनुभव जवळपास असेच असतील. कुणी विश्वास सुद्धा ठेवत नाहीत , भयाण शांतता , न संपणारा भयाण काळोख आणि एकटेपणा चा अनुभव प्रखरतेने देणारी राहूची दशा हा आयुष्यातील सर्वात मोठा उतारावर नेणारा काळ असतो .
कुटुंबाला विभक्त करणारा राहू , कुटुंबियांना एकत्र येवूच देत नाही , एकमेकांची भेट सुद्धा होत नाही , ह्या आधी वाटणारे प्रेम आपुलकी जणूकाही नष्ट झाल्यासारखेच वातावरण निर्माण होते . उरतो तो फक्त द्वेष आणि मत्सर , एकमेकांच्या शिवाय न करमणारी मंडळी एकमेकांना पाण्यात पाहू लागतात , नाते संबंध बिघडतात , मेसेज फोन येणेजाणे , संवाद लयाला जातो. पूर्वीसारखे कुटुंब हस्ते खेळते होणार नाही ह्याची कल्पना मी त्यांना दिली तेव्हा त्यांना अक्षरशः गहिवरून आले पण मागे वळून बघू नका आता पुढे जात राहा हाच सल्ला मी त्यांना दिला. कारण जितके त्या आठवणीत रुळला तितका मानसिक त्रास अधिक होयील . संपूर्ण राहूच्या दशेत माणसाच्या मनावर आणि अंतर्मनावर राहुचाच पगडा असतो , भयभीत होणे , फोबिया , मानसिकता उध्वस्त होणे , माणुसकीवरचा विश्वास उडणे ह्या गोष्टी घडवणे हि राहूची शस्त्रात्रे आहेत . राहू विचार करायला वेळ देत नाही , गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडतात मती गुंग होते पण आपण हतबल होतो . निराशेच्या गर्तेत ठेवणारा हा राहू आपल्याबद्दल इतरांच्या मनात गैरसमज करून देण्यात माहीर आहे . म्हणूनच राहूच्या दशेत व्यक्तीने अधिक बोलूच नये , कारण त्यातूनच शब्दांचे खेळ आणि गैरसमज होतात . भयानक स्वप्ने , आभासी जगतात वावरल्याचा भास , वाईट गोष्टींची छाया , मनावरचे लाख मणाचे ओझे घेवून राहूची दशा पार करावी लागते . राहूची जशी वाईट बाजू आहे तशी चांगली सुद्धा आहे, तीर्थयात्रा , अध्यात्मिक प्रगती , गूढ शास्त्र शिकण्यात प्रगती , रिसर्च , Phd तत्सम उच्च शिक्षण होते .
दिशाहीन होणे , एक प्रकारचे मनावर असणारे दडपण , अनामिक भीती आणि त्यातून आलेले वैफल्य , प्रत्येक गोष्टीत असणारी साशंकता , आयुष्यातील एकूणच अस्थिरता, देवावरचा उडत चाललेला विश्वास , पैशाच्या अडचणी , व्यवसायाचे वाजलेले बारा , दिवाळखोरी , फसवणूक , आपले म्हणणारे सोडून गेल्यामुळे आलेली निराशा वैफल्य , नात्यात पडलेल्या भेगा , मित्रांमध्ये होणारे गैरसमज आणि तुटलेली नाती हे सर्व डोळ्याने नुसते पाहत राहणे ह्यापलीकडे काहीही करू न शकणारे आपण . आपल्या बद्दल इतरांचे गैरसमज नेमके कश्यामुळे झाले आहेत ? आपली चूक तरी काय हे सुद्धा आपल्याला समजत नाही .
हे भोग नाहीतर अजून काय . म्हणून सांगावेसे वाटते . आपली आधुनिकता आणि आधुनिक विचार सारणी ह्याचा उपयोग नको तिथे नको. पितृपक्षात आपल्या पितरांचे यथायोग्य सर्व दान धर्म करावे पान भोजन ठेवावे. नको त्या फ्याशन चे किडे डोक्यात वळवळू देवू नका. आपल्या शास्त्र रूढी परंपरा योग्यच आहेत आणि त्यांचा सन्मान करणे आपले परमकर्तव्य आहे . खोट्या आधुनिक विचारांचा बुरखा घालून ह्या परंपरांना बगल देवू नका . शिक्षण आपल्याला विचारी संयमित करते , अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारे ज्ञान आपल्या हृदयाच्या आणि मेंदुच्याही कक्षा विशाल करत नसेल तर कुठेतरी काहीतरी चुकत आहे असेच म्हंटले पाहिजे. ज्याने आपल्याला जन्माला घातलाय त्यालाच अक्कल शिकवायला निघालो आहोत आपण म्हणून नको ती बुद्धी होते आहे आपल्याला. असो.
असो ह्या कुटुंबातील असलेल्या ह्या पितृदोषाने अनेकांना कह्यात घेतले होते तेही एकाच वेळी , राहूची मनावरील पकड मजबूत होती . आता त्यातून मार्ग काय तर भोग भोगा आणि मुक्त व्हा .काहीही झाले तर आपल्या गुरूंच्या चरणाशी वाहिलेल्या निष्ठा त्याबद्दल शंका न घेता अविरत सेवेत राहणे हाच सर्वोत्तम उपाय .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment