Thursday, 17 January 2019

अंतर्बाह्य अनुभूती

|| श्री स्वामी समर्थ ||

   




                मंडळी ,आजचा आपला विषय “ध्यान ,योगाभ्यास " हा सर्वपरिचित आणि बहुचर्चित असला तरीही त्याचा गाभा खूपच खोल आहे. ह्या लेखाद्वारे त्यातील काही भाग जाणून घ्यायचा हा लहानसा प्रयत्न.

                आज आपले आयुष्य घड्याळ्याशी बांधले गेले आहे .रोजची कामे करतानाच जीव मेटाकुटीला येतो मग व्यायाम ,योगासने करायला वेळ आणायचं तरी कुठून असा प्रश्न आपल्याला नवीन नाही.आज मनःशांती, अनेक व्याधींवर योगाचा उपयोग होताना दिसून येतो आहे. त्यामुळे योगाचा प्रसारही तितक्याच जोमाने भारतातच नाही तर अखंड विश्वात होतो आहे. भारताबाहेरील अनेक देशातून विद्यार्थी “योग” ह्या विषयाचा भारतात येवून अभ्यास करत आहेत मग आपणही ह्यास वंचित का राहायचे?

             मंडळी ,योगमहर्षी पातंजली ह्यांनी २२०० वर्षापूर्वी ह्या विषयावरील सर्वात पहिला ग्रंथ लिहिला. ह्या विषयावरील सखोल माहिती जाणून घेण्यासाठी आज योग विद्या निकेतन चे सर्वांचे लाडके सर श्री मुकुंद वासुदेव बेडेकर यांच्याशी सुसंवाद साधला. 1995 सालापासून ते ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत. योगाचार्य श्री. निंबाळकर ह्यांच्याकडे त्यांनी ह्याचे प्राथमिक धडे गिरवले.

श्री. मुकुंद वासुदेव बेडेकर सर
              योगासनाचे जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे आणि ते विषद करताना सर म्हणाले कि व्यायामाचा संबंध हा केवळ शरीराशी आहे पण योगाचा संबंध हा शरीर आणि मन ह्या दोघांशीही आहे. योगामुळे मनाचे शुद्धीकरण होते ,मनाची एक बैठक तयार होवून वारंवार विचलित होणारे मन एकाग्र होण्यास मदत होते.
योगाभ्यासाने मन स्थिर होते आणि व्यसनांवर हि मात करता येते.योगासनाचे बीज जनमानसात रोवण्यासाठी सरांनी २००५ मध्ये प्राणायामाची ओळख करून देणारे खास वर्ग सुरु केले ज्याला उदंड प्रतिसादही मिळाला. ह्या वर्गास ६५ वयाच्या वरील लोकांनी सर्वात जास्ती प्रतिसाद दिला. Meditation आणि योगातील फरक काय ह्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले कि ह्या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे सांगताना दिवसाची सुरवात सर्वांगसुंदर व्यायामाने म्हणजेच सूर्य नमस्काराने करावी हेही नमूद केले.

                  योगाभ्यास करताना शरीरातील Anatomy चे ज्ञान असणे तितकेच गरजेचे आहे. आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचे काय तर पाठीचा कणा आणि तो सुधृढ ठेवण्यासाठी हस्तपादासन , धनुरासन,परिवर्तीत चक्रासन ,वक्रासन ,ताडासन आणि सर्वांगासन हि आसने नित्य करावीत..कपालभाती ह्या आसनाने पचनक्रिया सुधारते त्यामुळे तेही रोज केले पाहिजे. आपल्या शरीरात ७२००० नाड्या आहेत आणि त्यातील मुख्य ३ म्हणजे इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्या होत. नाडी म्हणजे काय ते आधी समजून घेवूया .नाडी म्हणजेच नलिका जी आपल्या शरीरातील प्राणशक्ती एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेते .ह्या नाड्या जेव्हा आतून ब्लॉक होतात तेव्हा आपण आजारी पडतो ,त्या आतून मोकळ्या राहण्यासाठी प्राणवायू योग्य प्रकारे फिरता राहण्यासाठी अनुलोम विलोम हे प्राणायाम अतिशय प्रभावशाली आहे मानले गेले आहे . नियमित योगाभ्यासाने आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. 


                              “शरीरातील चक्रे” हा विषयही अभ्यासक्रमात असल्याने त्याविषयी आपण काही सांगावे अशी विनंती मी त्यांना केली. ह्या चक्रांना Power Centers म्हणूनही संबोधले जाते. मेंदूमध्ये ज्या पेशी असतात त्याच ह्या चक्रांमधेही असतात.ह्यातील ५ चक्रे हि पाठीच्या कण्यात ६ वे दोन्ही भुवयांमध्ये आणि ७ वे टाळूच्या ठिकाणी असते.कमळाचे फुल हे ह्या चक्रांचे बोधचिन्ह  असून प्रत्येक चक्राला विशिष्ठ पाकळ्या दिल्या आहेत .
"मूलाधार चक्र" पाठीच्या कण्याच्या टोकाशी असते . हे शक्तिस्थान समजले जाते आणि  तांबडा रंगाच्या कमळाच्या ४ पाकळ्या डोळ्यासमोर आणल्या तर ते जागृत होते. त्याच्यावर २ इंचावर sex organs च्या मागे पाठीच्या कण्यात असते ते "स्वाधिष्ठान चक्र" ज्याकडे मलमूत्र विसर्जनाचा कंट्रोल असतो .नारिंगी रंगाच्या ६ पाकळ्या डोळ्यासमोर आणल्या कि हे चक्र जागृत होते.बेंबीच्या मागील बाजूस कण्यात "मणिपूर चक्र" आहे .ह्या चक्राचा पोटातील स्वादुपिंड ,लिव्हर,लहान आणि मोठे आतडे ह्यावर कंट्रोल असतो .पिवळ्या रंगाच्या १० पाकळ्या डोळ्यासमोर आणल्या तर हे चक्र जागृत होते.

                 आपल्या हृदयाच्या मागे असते ते अनाहत चक्र. दोन वस्तू एकमेकांवर आपटल्यावर जो ध्वनी निर्माण होतो त्यास संस्कृत मध्ये “आहत” म्हणतात .पण इथे दोन वस्तू एकमेकांवर आपटत नसूनही “ ठक ठक ” असा आवाज ऐकू येतो म्हणून त्यात “अनाहत चक्र " म्हणून संबोधले जाते.हिरव्या रंगाच्या १२ पाकळ्या डोळ्यासमोर आणल्या कि हे चक्र जागृत होते. आणि म्हणूनच Operation करताना सर्वत्र हिरव्या रंगाचा उपयोग करतात जसे डॉक्टरांचा मास्क ,तेथील पडदे ई. त्यानंतर येते ते “विशुद्धी चक्र” जे आपल्या घश्याच्या मागील बाजूस असते आणि त्याचा कंट्रोल “Endocrine , Thyroid , Parathyroid glands ” वरती असतो ज्याच्यामुळे शरीरातील चयापचय क्रिया ज्याला आपण Metabolism  म्हणतो व्यवस्थित पार पडतात .आकाशी निळ्या रंगाच्या १६ पाकळ्या डोळ्यासमोर आणल्या कि हे चक्र जागृत होते. वरील उल्लेखलेली ५ चक्रे पाठीच्या कण्यात असतात. ६ वे चक्र “ आज्ञा चक्र " हे दोन भुवयांच्या मध्ये म्हणजेच शंकराचा तिसरा डोळा म्हणतो त्या जागेवर असते. पारवा म्हणजे Ash रंगाच्या २ पाकळ्या डोळ्यासमोर आणल्या कि हे चक्र जागृत होते, ह्याचा थेट संबंध आपल्या मनाशी आहे.

मंडळी ,वर उल्लेखलेल्या इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्या नाड्या मूलाधार चक्रापासून सुरु होवून प्रत्येक चक्राशी एकत्र येतात..इडा हि नाडी शरीराच्या डाव्या भागातून, पिंगला हि उजव्या आणि सुषुम्ना हि पाठीच्या कण्यातून वरती येते. ह्या सर्व नाड्या आज्ञा चक्राशी येवून थांबतात आणि फक्त सुषुम्ना हि नाडी पुढे टाळूपर्यंत जाते जिथे असते “सहस्रार चक्र”. जांभळ्या रंगाच्या हजार पाकळ्या डोळ्यासमोर आणल्या कि हे चक्र जागृत होते. हे चक्र हा मेंदूचाच एक भाग असून ते आपले संपूर्ण शरीर कंट्रोल करते. आपल्याला जे अतिंद्रिय ज्ञान मिळते ते ह्याच चक्रातून. मंडळी हि चक्रे रोजच्या नित्य सरावाने ध्यानाने जागृत होतात. योगासनामध्ये गरज असते ती संयमाची आणि एकाग्रतेची.
              
                बरेचदा गल्लत होते ती प्राणधारणा आणि ध्यानधारणा ह्यात. आपल्या शरीरात ५ प्राण आहेत. प्राण, अपान ,व्यान, समान, उदान. हे ५ प्राण ज्याला आपण पंचप्राण म्हणतो .ते आहेत तोवर आपण जिवंत आहोत.हे शरीरात वायुरूप अवस्थेत असतात. हे शरीरात राहण्यासाठी ३ गोष्टींची प्रामुख्याने गरज असते ती म्हणजे पाणी ,अन्न आणि Oxygen. काही क्षण जरी आपल्या शरीरास श्वास बंद झाला तर Oxygen मिळत नाही. ह्या Oxygen मधेच प्राण आहे म्हणून त्यावर मन एकाग्र करणे म्हणजेच “प्राणधारण


कुठल्यातरी Object किंवा आपल्या आराध्याच्या चित्रावर संपूर्ण लक्ष्य केंद्रित करणे म्हणजे ध्यान करणे. ध्यानाने आपल्या शरीरातील ७ चक्रे जागृत होत जातात  आणि आपल्याला अंतर्बाह्य अनुभूती प्राप्त होते. मूलाधार चक्राशी निर्दिस्त अवस्थेत असलेली कुंडलिनी शक्ती हि प्रयत्नांतीच जागृत होते आणि त्याला नित्य साधनेची गरज असते .ध्यानधारणा करताना काही दिवस पहिल्या चक्रावर संपूर्ण लक्ष्य केंद्रित करावे .कालांतराने ते जागृत होते आहे हे जाणवले कि मग पुढील चक्राकडे वळावे . ध्यानधारणा ,योगासने हि आपल्या मनाने किंवा पुस्तके वाचून न करता योग्य शिक्षकाकडून शिकून घेणे चांगले. योगासने ,ध्यान करताना शरीरावर आणि मनावर कुठलाही ताण असू नये ,मन शांत असले पाहिजे. योगासने हि उरकून टाकण्याची गोष्ट नाही. ती शांतपणे ,संथ ,लयबद्ध असली पाहिजेत ,हालचालीत सुसूत्रता आणि मोहकता असली पाहिजे तरच त्याचा योग्य परिणाम अपेक्षित आहे.

शरीरातील ७ चक्रे

      मंडळी, प्रातः समयी उठून योगासानासाठी काही वेळ दिला तर आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य संतुलित राहील ह्यात वादच नाही .आजकाल आपल्या बिघडलेल्या जीवनपद्धतीमुळे सर्व वयाच्या लोकांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारा आजार म्हणजे “ मधुमेह”. आपल्या शरीरातील स्वादुपिंडातील बीटासेल इन्शुलीन ची निर्मिती करतात आणि ते पुरेसे तयार झाले नाही तर “मधुमेह” होतो. कपालभाती च्या नियमित सरावाने बीटासेल ची निर्मिती होवून मधुमेह टाळता येवू शकतो ,तसेच आपल्या शरीरातील Joints मधेही काही प्रमाणत इन्शुलीन तयार होते त्यामुळे नियमित व्यायाम , चालणे ह्यामुळे हे सर्व आजार आटोक्यात आणता येतात.

                  शास्त्रात आरोग्याची पंचसूत्री सांगितलेली आहे ती म्हणजे आनुवंशिकता , आहार, विहार ,विश्रांती , वातावरण. अनुवांशिकता आणि वातावरण हे आपल्या सर्वार्थाने हातात नाहीत पण आहार ,विहार आणि विश्रांती आपल्या नक्कीच हातात आहे. अत्यंत सात्विक ,परिपूर्ण पोषक असा आहार घेणे, दिवसभरातील सर्व क्रिया करताना निदान काही वेळ व्यायामास आणि स्वतःसाठी देणे म्हणजेच विहार आणि निदान ६ ते ८ तास पुरेशी झोप घेणे हे केले तर आपले आरोग्य उत्तम राहायला नक्कीच मदत होते. योगसाधनेच्या रोजच्या सरावामुळे बुद्धी एकाग्र होते ,प्रत्येक काम कुशलतेने होते हे सांगताना सर म्हणले कि प्रत्येकाने अगदी लहानपणापासून योगाला आपल्या जीवनात महत्व दिले पाहिजे.ह्यामुळे आपले आयुष्य संतुलित राहते.

                     सरांची इतक्या वर्षाची साधना म्हणजे एक तपस्याच आहे. प्रचंड ज्ञानाचा जणू सागरच आहेत. आज त्यांच्याशी भेटून अमुल्य अश्या ज्ञानाचा लाभ झाला जो ह्या लेखाद्वारे आपल्यासर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.


                तर सारांश असा कि आपल्याला विधात्याने दिलेले हे सुंदर आयुष्य जर अखेरपर्यंत आनंदात जगायचे असेल तर आपली तब्येत उत्तम असणेही तितकेच गरजेचे आहे, आयुष्याची सुरवात जितकी आनंदात तितकीच आयुष्याची संध्याकाळ सुद्धा त्याहीपेक्षा आनंदात, शांततेत जावी ह्यासाठी आपल्याला योगाभ्यास नक्कीच उपयुक्त ठरतो. चालातर मग आजपासूनच साधनेस सुरवात करुया ..शुभस्य शीघ्रम.

लेख आवडला तर अभिप्राय जरूर कळवा
antarnad18@gmail.com


Monday, 7 January 2019

" मधुरम "


|| श्री स्वामी समर्थ ||





                      आज आवर्जून लिहावेसे वाटले ते आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव “ जिव्हा ”. ह्याबद्दल.सृष्टीतील अनेक प्राण्यांपैकी मनुष्यप्राण्यास देवाने बहाल केलेली एक असामान्य देणगी म्हणजे “ बोलण्याचे सामर्थ्य ”. बोलण्यामुळे एकमेकांशी साधता येतो तो संवाद . बोलणे हे एकमेकांना जोडणारे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. पण निसर्गाने दिलेल्या ह्या खास वरदानाचा आपण किती कौशल्याने वापर करतो ह्यावर आपले समाजातील ,कुटुंबातील स्थान ठरत असते. अनेक लोकांचे बोलणे इतके कमालीचे मधुर परंतु मुद्देसूद विषयाला धरून असते कि ऐकत रहावेसे वाटते. बोलण्यात प्रेम ,संयम, आत्मीयता असली कि ती व्यक्ती सहजच लोकप्रिय होवून जाते. काहिंचे बोलणे इतके हळू ,तोंडातल्या तोंडातच असते कि ते ऐकणे म्हणजे आपली परीक्षाच असते त्तर काहींचा आवाज इतका भसाडा आणि शब्द म्हणजे विखार असतो कि आता “ पुरे ” म्हणण्याची वेळ येते.  
      
         उत्तम लोकसंग्रह करण्यासाठी आपला आपल्या वाचेवर उत्तम ताबा असणे हे फार महत्वाचे असते. पण काहीजणांना ह्या वरदानाची काडीचीही किंमत नसते आणि म्हणूनच “ उचलली जीभ लावली टाळ्याला” ह्या म्हणी प्रचलित झाल्या असाव्यात. काही जणांचे बोलणे इतके अघळपघळ असते कि कुठून सुरु झाले आणि कुठे संपले ते त्यांचे त्यानाही उमजत नाही .आपल्या मनातील भावना ,विचारांचे आदानप्रदान आपल्या बोलण्यानेच होवू शकते .उत्तम बोलण्यासाही साधनेची पक्की बैठक असणे तितकेच गरजेचे .साधनेने संयम तर येतोच पण बोलण्यात सहजता ,कोमलता येते . अश्या वाणीची व्यक्ती समोरच्याच्या हृदयाचा ठाव न घेयील तरच नवल.

आपल्या घरातील संस्कार,शिक्षणाची उंची ,समोरच्याबद्दल वाटणारा आदर, आपल्या आवाजातील मार्दव ,लय सर्व काही आपल्या बोलण्यातून यथाशक्ती प्रगट होत असते. उत्तम वक्ता होणे हे एक कसब तर आहेच , त्यासाठी आत्मनिर्धार ,भक्कम साधना आणि गुरूंच्या आशीर्वादाची शिदोरी बरोबर लागतेच.

                     कुठे काय बोलू नये हे ज्याला समजले तो आयुष्याची अर्धी लढाई जिंकला  तसेच आपण कुणासमोर कुठल्या आवाजात बोलत आहोत ह्याचे भान अगदी सार्वजनिक जीवनातही अनेकांना नसते, मग विषय कुठलाही असो.

                     आपल्याला कधीच कुणाची गरजच भासणार नाही अश्या खोट्या आणि निरर्थक भावनेची मनात जपणूक करून जातायेता आपल्या जिभेची धार इतरांवर आजमावणारी, समोरच्याचा पाणउतारा करणारी माणसे आपल्याला पावलोपावली भेटतात .मंडळी आजकालच्या जीवनात “frustration” इतके वाढले आहे कि त्याचा परिणाम म्हणून असभ्य भाषेत बोलणे, टोमणे मारणे , दुसर्याचा जाहीर पाणउतारा करणे ,कमी लेखणे, दुसर्याचे मन दुखावेल असे बोलणे ,बढाया मारणे ह्या सर्व गोष्टी वाढीस लागलेल्या आपण प्रत्येक क्षणी पाहतोच. काही जणांचे बोलणे अक्षरश हृदयाचा ठाव घेते तर काहींचे ऐकूच नये असे वाटते . बर हे इतके करून बोलणार्याचे प्रश्न सुटत नाहीतच किबहुना ते अधिकच गंभीर होत जातात . आपल्या परखड, उद्धट आणि अत्यंत कटू बोलण्याने दुसरा किती दुखावला जातो ह्याची यत्किंचितही कल्पना त्यांना नसते .कालांतराने माणसे दुरावतात ,नाती तुटतात आणि शेवटी अशी माणसे जीवनात एकटी राहतात..आपल्या चुका लक्ष्यात येयीपर्यंत वेळ निघून गेलेली असते ..तीही कायमची .


आपल्या जीवनात कधी कोण उपयोगाला येयील आणि कधी कुणाची गरज लागेल हे सांगता येत नाही. तसेही मनुष्यप्राणी जन्मतःच “ गरज” घेऊन आला आहे. कितीही मोठा डॉक्टर असुदे त्याचे ऑपरेशन करायला त्याला दुसराच डॉक्टर लागतो . माणसाची वेळ कधी बदलेल सांगता येत नाही त्यामुळे आपले आत्ता आहे तीच परिस्थिती मरेपर्यंत राहील असा चुकूनही विचार करू नये . जिथे निसर्गही सतत बदलत असतो इथे आपल्या जीवनाचे काय ? आपल्या “वाचेवर ” संयम आणण्यासाठी आपल्याला स्वतःलाच मनापासून प्रयत्न करायला हवेत .कारण नसताना सतत पाल्हाळ लावल्यासारखे निरर्थक बोलणार्यांची समाजात किंमत तर होतेच पण त्याचे पडसाद त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही उमटतात . बोलण्यात उत्तम संस्कार व्हावेत म्हणून तर लहानपणी घरातील मोठी मंडळी आपल्याला मनाचे श्लोक ,शुभंकरोती ,रामरक्षा म्हणायला शिकवत असत .लहानपणी आपल्या जिभेला चांगले बोलण्याचे वळण लागावे हाच त्यामागील हेतू होता हे वेगळे सांगायलाच नको.

                 बोलण्यास अनेक कंगोरे आहेत .सकारात्मक बोलणे हेही तितकेच महत्वाचे असते .नकारात्मक बोलणार्या माणसांची आजारपणे पाठ सोडत नाहीत .काहींचे बोलणे अंतर्मुख करते ,विचार करण्यास भाग पाडते .आपण रागावलो आहोत हे दर्शवतानासुद्धा मोठ्या आवाजात बोलण्याची गरजच नसते. आपल्या शब्दसंपदा इतकी उत्तम असेल तर अगदी साध्या टोन मध्ये बोलून सुद्धा आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचू शकतात. शब्द हे “शस्त्र” आहे . शब्दांचा बाण एकदा सुटला कि सुटला ..तो समोरच्याच्या हृदयाला कायमची न भरून येणारी जखम करत असतो .आपल्या आवाजातील लय आणि उत्तम पण कमीतकमी शब्दात समोरच्याला खिळवून ठेवण्याची कला आहे , ह्यातूनच उत्तम वक्ते जन्माला येतात. विधात्याने जसे अनेक रंगाची निर्मिती केली आहे तशीच अनेक प्रकारची माणसेही जन्मास घातली आहेत. आयुष्याच्या प्रवासात त्यातील अनेक रंग आपल्या वाट्यास येणार हे निश्चित पण आपले मधाळ, संयमी, समजून घेणारे बोलणे असेल तर आपण अनेक माणसे जोडू शकतो आणि मग ह्या माणसांच्या गराड्यात जीवनाचा प्रवास सुखकर ,सुसह्य , आनंदी होतो .मंडळी उत्तम बोलण्याची शैली सर्वाना उपजतच असते असे नाही आपण प्रयत्नपूर्वक ती सुधारू शकतो .


उत्तम वक्त्यांची भाषणे ऐकणे , बोलताना हळू आवाजात बोलण्याची स्वतःला प्रयत्नपूर्वक सवय लावून घेणे ,कमीतकमी शब्दात पाल्हाळ न लावता जास्तीतजास्त मतितार्थ पोहचवणे ,बोलण्यात उत्तम मार्मिक शब्दांची रेलचेल असणे ह्या सर्व गोष्टी आपण प्रयत्नाची कास धरली तर अशक्य नाहीतच. उत्तम वक्ता होण्यासाठी आधी उत्तम श्रोता होण्याची गरज असते.

                   शब्दात प्रचंड सामर्थ्य आहे ..शब्द समोरच्याला आयुष्यातून उठवू शकतात,एखाद्याच्या मनावर कायमचा ओरखडा काढू शकतात आणि एखाद्याचे जीवन घडवूही शकतात. बोलण्याचे कौशल्य हि परमात्म्याची देणगी आहे आणि त्याचा आपल्या जीवनात योग्य तो मान ठेवला पाहिजे.

तासंतास समोरच्याला एकाजागी खिळवून ठेवण्याचे कौशल्य आणि अभिजात शब्दसंपदा असणार्या ,आपल्या सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवणार्या काही वक्त्यांचा उल्लेख न करता हा लेख पूर्ण होणार नाही .त्यातील काही म्हणजे माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कलासृष्टीचा महामेरू अमिताभ बच्चन . प्रचंड सामर्थ्य असलेली शब्दसंपदा त्याचबरोबर बोलण्याची विशिष्ठ लय , मिस्कीलपणा, बोलण्यातील विनोदी शैली ह्यामुळे आपला असा खास श्रोतृगण त्यांनी तयार केला. वक्त्याचे बोलणे आतून आलेले ,तळमळीचे असले तर ते समोरच्याच्या हृदयाचा ठाव घेते. खरेपणा त्यांच्या शब्दातून पाझरतो कारण ते त्या शब्दांइतकेच खरे आयुष्य जगलेले असतात. तिथे खोटेपणा, अहंकारास थाराच नसतो.

                    मंत्र मुग्ध होवून ऐकतच राहावे अशी देवाने निर्माण केलेली रत्ने आपल्या आजूबाजूला असतात, ती शोधता आली पाहिजे आणि त्यांच्यासारखा व्यासंग आपण आपल्या जीवनातही आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला पाहिजे .माणसे जोडण्यात जी मजा आहे ती तोडण्यात नाही ह्यात कुणाचेही दुमत नसावे . सर्वाना एकत्रित घेऊन केलेला जीवनरूपी प्रवास आनंददायी होईल ह्यात वादच नाही .


                    चला तर मंडळी “ केल्याने होत आहे रे ,आधी केलेची पाहिजे ” ह्या उक्तीला धरून येत्या नवीन म्हणजेच २०१९ मध्ये साधना करुया ती “ शब्दांची ”. मधुर वाणीने, मोजक्या शब्दात विनयाने आणि संयमाने केलेले भाष्य विधात्याने निर्माण केलेल्या मनुष्यरूपी विविध रंगाना आपलेसे करेल ह्यात शंकाच नाही. 
ह्या रंगात रंगून आपणही करूया आयुष्याचा खर्या अर्थाने “सोहळा ”.

लेख आवडला तर अभिप्राय जरूर कळवा.

antarnad18.blogspot.com











Monday, 31 December 2018

प्रवास एका अन्नपूर्णेचा......

||श्री स्वामी समर्थ ||




     
                 मराठी स्त्रीने जगाच्या कानाकोपर्यात आपली वेगळी ओळख, अस्तित्व निर्माण केलय..आपल्या कार्तुत्वाबरोबरच जपणूक केली आहे ती मराठी अस्मितेची....आज ओळख करून घेऊया अश्याच एका गृहकृत्यदक्ष त्याचबरोबर प्रचंड मेहनत आणि जिद्दीने आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणार्या, आपल्या मैत्रिणीची म्हणजेच दुबईच्या पेशवाह्या भारतीय उपहार गृहाच्या सर्वेसर्वा सौ. श्रिया जोशी हिची. श्रीयाची ओळख करून देताना मी अगदी सहजपणे मैत्रीणअसा उल्लेख केला ह्याचे कारण ती अगदी पहिल्या काही क्षणातच आपल्या मधुर वाणीने समोरच्याला आपलेसे करते आणि मैत्रीचे बंध अलगद निर्माण होतात.


तर मंडळी, मुळची पुण्याची असलेली श्रिया पूर्वाश्रमीची सुवर्णा गोडबोले. सचिन जोशीं यांच्याशी लग्नानंतर नोकरीनिम्मिताने दुबई पर्यंतचा प्रवास केला आणि मग तिथेच स्थायीक झाली. श्रीयाच्या माहेरी फार सणवार असे काही नव्हतेच त्यातच आईचे छत्र लहानपणीच हरवल्यामुळे तिच्यावर स्वयपाकघर सांभाळायची वेळ आलीच नाही .लग्नानंतर स्वयपाकातले फारसे काही येतही नव्हते आणि तितकी गोडीही नव्हती. परंतु सासरी मात्र बर्यापैकी सणवार होत असत. स्वयंपाकाचे प्राथमिक धडे तिने सासूबाईंच्या हाताखालीच गिरवले. तिने केलेले पदार्थ सर्व आवडीने खाऊ लागले आणि पाठीवर शाबासकीची थाप मिळत गेली त्यामुळे कालांतराने स्वयपाकात अधिकच रुची निर्माण झाली. श्रीया दुबईला गेल्यावर तिला खूप काही करावेसे वाटले पण  मुलगा ५ महिन्यांचा असल्याने सुरवातीच्या दिवसात पाककलेचे कौशल्य फक्त सचिनच्या डब्यापुरतेच मर्यादित राहिले. सचिनच्या डब्यातील रुचकर पदार्थ चाखल्यामुळे त्याच्या ऑफिस मधील काही लोकांनी श्रीयाला त्यानाही डबा देण्यासाठी आग्रह केला आणि मग अश्याप्रकारे डबे देण्याची कल्पना तग धरू लागली. पहाटे लवकर उठून ह्या डब्यांसाठी केलेली मेहनत पुढे इतकी फळाला येयील असे खुद्द श्रीयालाही माहित नव्हते .विविध पदार्थांना मिळालेल्या अभिप्रायांमुळे श्रीयाही उत्चाहाने काही नवीन पदार्थ आवडीने बनवू लागली.


सासुबाईनी दिलेली पाककलेची शिदोरी आणि त्यांचा आशीर्वाद फळास आला आणि ह्या डबे बनवण्याच्या मोहिमेतूनच पुढे " पेशवा " ची संकल्पना उदयास आली. साडेचार हजार स्क्वेअरफीट वरील पेशवाहे अगदी अस्सल पुणेरी नाव असलेले दुबईतील मराठी माणसाचे उपहारगृह आज मराठी तसेच अमराठी लोकांकडून अतिशय नावाजले गेले आहे . हे सुरु करताना आलेल्या विविध अडचणींना कसे तोंड दिले हे सांगताना श्रीया सद्गदित झाली. जागा मोठी ,चांगली मिळाली पण त्यामुळे खर्चाचा ताळमेळ घालणे आणि आतील सजावट तितकीच आकर्षक करणे ह्या बाबींकडेही लक्ष देणे गरजेचे होते .ह्यामध्ये मोलाची साथ तिचा मुलगा आणि पती सचिन जोशी ह्यांनी दिली हे सांगताना तिला भरून आले तसेच आज पेशवा चे संपूर्ण व्यवस्थापन आता सचिन जोशीच पाहतात हेही तिने नमूद केले. नुसतेच व्यवस्थापन कौशल्य नाही तर आपल्या पाहुण्यांचे उत्तम आदरातिथ्य तसेच वेळोवेळी त्यांनी दिलेल्या सूचना श्री सचीन जोशी त्यांनी आवर्जून लक्ष्यात घेतल्या आहेत हे " पेशवा " मधील वाढलेल्या ग्राहकांच्या संखेवरून सहज ध्यानी येते. येथून नुसतेच सुग्रास भोजन नाही तर आनंदाचा ठेवा प्रत्येकाने घेऊन जावा ह्याकडे त्यांचे जातीने लक्ष असते ." पेशवा " हे श्रीयाचे बाळ आज ६ वर्ष पूर्ण होवून ७ व्या वर्षात पदार्पण करत आहे हे सांगताना तिला आणि लिहिताना मला आत्यंतिक आनंद होत आहे.     
  
गणेश चतुर्थी.
 " पेशवा ” मधील रुचकर पदार्थांची चव चाखण्यासाठी आज जगभरातून लोक कौतुकाने येतात. मराठी माणूस दुबईत गेला आणि पेशवा मध्ये गेला नाही असे सहसा होत नाही, हे श्रीयाने अभिमानाने सांगितले. 
    मराठी माणसांबरोबरच दुबई आणि बाहेरच्या देशातील म्हणजे फ्रांस,जर्मनी ,युरोप,अमेरिका येथील खवैय्यानी इथे आवर्जून हजेरी लावली आहे .  
" पेशवा "घड्तानाचे अनुभव सांगताना श्रीयाने आवर्जून उल्लेख केला तो येथील स्थानिक मराठी लोकांचा . सहसा मराठी माणूस आपल्याच लोकांचा पाय खेचतो त्यांना पुढे जावू देत नाही असे म्हंटले ऐकले जाते पण श्रीयाचा ह्याबाबत अनुभव अगदीच भिन्न आहे .तिला येथील सर्वच मराठी भाषिक मंडळीनी मोलाची साथ दिली आणि देत आहेत.
        “ पेशवा हे नाव आज प्रामुख्याने पर्यटकांमध्ये चांगलेच नावाजले गेलेय. इथे येणाऱ्या अनेक टूर कंपन्या आपल्या प्रवाश्यांना पेशवाइथे खवैयेगीरीसाठी आवर्जून आणतातच. इथे जैन पदार्थही तितक्याच आवडीने खायला येणारा गुजराथी पर्यटकही पाहायला मिळतो . पेशवाची संपूर्ण व्यवस्था आता 4० हून अधिक सक्षम कर्मचारी सांभाळत आहेत. सर्व कर्मचारी वर्ग हा मुंबई , पुणे, कोल्हापूर , मालवण ह्या विविध प्रांतातील असून ह्यास एक मोठे कुटुंबच म्हंटले तर वावगे ठरायला नको. ह्या सर्वांची राहायची अगदी विझा(visa) ची सोयही इथे केली जाते.ह्या सर्व घरगुती वातावरणामुळे येथे सर्वच आपल्या घराप्रमाणे जीव ओतून काम करताना दिसतात आणि म्हणूनच पेशवा मध्ये प्रत्येकाला घरच्यासारखा फील येतो. 


दिवाळीचे मुख्य आकर्षण "किल्ला"
श्रेयाशी मनमोकळ्या गप्पा करताना तिच्यात असणार्या विविध पैलूंचीही ओळख होत गेली. कुटुंबाबद्दल अपार प्रेम आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि गोडवा असलेल्या श्रीयाने  हृषिकेश इथे जाऊन योगाचा महिन्याभराचा कोर्स केलाय आणि आता “ certified yoga teacher” झाली आहे. दुबईत आता तिने योगाचे क्लास सुद्धा सुरु केले आहेत. प्रवासाचीही आणि वाचनाची गोडी असल्यामुळे तिने पर्यटन आणि वाचन ह्याचा सुयोग्य मेळही आपल्या आयुष्यात घातला आहे . तिने लावलेल्या पेशवानामक रोपट्याचा आता डेरेदार कल्पवृक्ष झालाय. दुबई सोबतच अजून ५ देशात पेशवा च्या शाखा काढण्याचा मानस असून त्या दृष्टीने पावलेही उचलली जात आहेत.“ पेशवा मध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रीयन पदार्थांची रेलचेल असते पण त्याचबरोबर गोव्यातील ,नागपुर कडील काही पदार्थही चाखायला मिळतात.
गोविंदा आला रे आला
पेशवामध्ये आवर्जून हळदीकुंकू, दहीहंडी ,गणेशउत्सव, दिवाळी अगदी दणक्यात साजरी केली जाते आणि दिवाळीचा फराळ सुद्धा इथे विक्रीसाठी ठेवला जातो .हे सर्व सणवार साजरे करताना सामाजिक बांधिलकी आणि पुढील पिढीस काही देता यावे म्हणून दिवाळीत किल्लाही केला जातो. हल्ली दिवाळीत किल्ला करणे हि गोष्ट जणू इतिहास जमाच झाली आहे. येथील स्थानिक लोक आपल्या मुलांना इथे मुद्दामून दिवाळीत किल्ला दाखवण्यासाठी घेऊन येतात .पेशवामध्ये एक मस्तानी हॉलआहे तिथे हे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात आणि येथील सर्व स्थानिक लोक हौशीने सर्व कार्यक्रमात सहभागीही होतात .ह्या हॉल मध्ये स्थानिक लोकांचे बारसे ,हळदीकुंकू, लग्नाचा २५ वा वाढदिवस असे अनेक कार्यक्रम सुद्धा झाले आहेत. गणेश चतुर्थीला यथासांग पूजा ,गणेशास नेवैद्य ,आरती करून अगदी चांदीच्या ताटात मोदकांचा मेनू असलेला बेत असतो तोही अंगतपंगत म्हणजे भारतीय बैठक घालून. पेशवा च्या स्वयपाकघरात केल्या जाणार्या पदार्थात आजहि तुझा काही सहभाग असतो का ह्या प्रश्नावर उत्तर देताना श्रीया म्हणाली, आमचे सगळेच शेफ इतके उत्तम पदार्थ बनवतात कि पदार्थांची चव पाहण्यापलीकडे  मी अजिबात कश्यातही लुडबुड करायला जात नाही .अगदी एखादा वेगळा पदार्थ असेल किंवा गरज भासल्यास मात्र जरूर मार्गदर्शन करते.आमच्या गप्पा खूपच रंगल्या ,श्रीयाकडे अनुभवांची नुसती पोतडीच होती. तुझ्याच सारख्या किंवा कुठलाही लघु उद्योजकांना तू तुझ्या अनुभवातून काय सांगशील ह्या माझ्या प्रश्नाला उत्तर देताना तिने सांगितले कि कुठलीही गोष्ट ठरवली तर ती करायचीच असा जणू ध्यास घेतला पाहिजे आणि बाकी सर्व सोडून त्याचा अक्षरशः पाठपुरावा केला तरच त्यात यश मिळते. अनेक गोष्टी एका वेळेस न करता फक्त एकाच गोष्टीत स्वतःला संपूर्णपणे झोकून दिले पाहिजे .देवकृपेने तिचे सहयोगी सचिन देवधर आणि हृषिकेश देवधर यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभल्यामुळेच जोशी दाम्पत्य " पेशवा " नामक शिवधनुष्य समर्थपणे पेलवू शकले .त्याचबरोबर दुबई मधील सरकारी यंत्रणा ,स्थानिक लोक ह्यांनी पूर्ण सहकार्य केले .प्रत्येक व्यक्तीमध्ये एक खवैया दडलेला असतोच असतो. आज पेशवामध्ये आपल्या खवैये गिरीची हौस पुरवायला देशेविदेशातून लोक आवर्जून येतात . भारतातून राजकारणाबरोबरच ,कलाक्षेत्र, चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांनी येथील अनेक पदार्थांची चव चाखून भरभरून दाद दिली आहे. अगदी अलीकडील काळात लोकसभा अध्यक्ष श्रीमती सुमित्रा महाजन ह्यांनीही पेशवा मध्ये हजेरी लावली होती.

मंडळी, कुठलाही व्यवसाय असा सहजासहजी नावारूपास येत नाही. त्यात आपला जीव ओतावा लागतो,अपार कष्ट घ्यावे लागतात. देहभान विसरून स्वतःला त्यात झोकून दिले तर आणि तरच यशाची गोडी चाखता येते हे नक्की. एका सर्वसामान्य कुटुंबातील एक गृहिणी पण घरातील थोरामोठ्यांचा आशीर्वाद ,पतीची मुलाची साथ आणि आत्मविश्वास ह्या जोरावर तिने एक स्वप्न पहिले आणि नुसतेच पहिले नाही तर ते सत्यातही उतरवले ह्याचे आज प्रत्येक मराठी माणसास कौतुक आहे. मंडळी सातासमुद्रापलीकडे जाऊन जिद्दीने आपले स्वप्न पूर्ण करणारी श्रीया आज काहीतरी वेगळे करू पाहणार्या आपल्या सर्व भगिनींसमोर एक उत्तम उदाहरण आहे. आपल्यामधेही अश्या कित्येक श्रिया आहेत त्यांचीही स्वप्ने अशीच पूर्ण व्हावी ,त्यांच्या महत्वाकांक्षेला दिशा मिळावी ह्यासाठीच केला हा लेखन प्रपंच. आपल्या मराठी माणसांचे अस्सल पेशवा” अगदी नावाप्रमाणेच दुबईमध्ये आज दिमाखात उभे राहून पाहुण्यांचे स्वागतास सज्ज आहे. “ पेशवा मधील वातावरणात आहे आपल्या मातीचा, आपलेपणाचा सुगंध , इथे जपली आहेत माणसामाणसातील अतूट नाती आणि संवाद .इथे जातीपाती ,धर्मास थारा नाही .पेशवाचा एकच धर्म माणुसकीचा ,आपलेपणाचा .इथल्या आपलेपणाच्या झालरीमुळेच प्रत्येक पदार्थ खूपच चविष्ट ,रुचकर वाटतो . इथे रिवाज आहे तो आलेल्या प्रत्येकास त्याच्या आवडीचे पदार्थ प्रेमाने ,आग्रहाने पोटभर खाऊ घालण्याचा. येथे भोजन करणारा जाताना भरभरून आशीर्वाद  आणि तृप्ततेची ढेकर देवून जातो ...ते पुन्हा पुन्हा इथे येण्यासाठीच. 

                आज पेशवाभक्कम पाय रोवून उभा असल्यामुळे श्रीयाने पुढचे पाऊल पर्यटन क्षेत्रात ठेवले आहे. आता सध्या लहान लहान ग्रुप करून पर्यटनाची सुरवात केली आहे तसेच उत्तम दर्ज्याचे केशरही पेशवायेथे विक्रीस ठेवले आहे . मंडळी, आपल्या सर्व वाचकांच्या वतीने ह्या लेखाच्या माध्यमातून अतिथी देवो भव ह्याची पुरेपूर अनुभूती देणार्या  सौ. श्रीया ,श्री सचिन जोशी आणि पेशवाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि कौतुक तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेछ्या. 

             नवीन वर्षात म्हणजेच २०१९ मध्ये पेशवाआम्हा सर्व खवैयांसाठी नवनवीन उत्तमोत्तम ,चविष्ठ ,लज्जतदार पाककृती घेऊन येयील अशी आशा करुया.



लेख आवडला तर अभिप्राय जरुर कळवा.
antarnad18@gmail.com