Monday, 21 February 2022

गुरु विठ्ठल गुरु देवता विठ्ठल

 || श्री स्वामी समर्थ ||



भक्तांच्या तनमनावर अधिराज्य गाजवणारे ,भक्तांचा जणू श्वास  असणारे शेगावनिवासी संत शिरोमणी श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा हा खरच दृष्ट लागण्यासारखा असतो. महाराजांचे गज , अश्व त्यांना मानवंदना देतात .लाखो भक्त डोळ्यात प्राण आणून ह्या भक्तीरसाचा अविष्कार अनुभवतात. सकाळी 11 वाजताच्या आरतीचा सर्वत्र होणारा घंटानाद महाराजांच्या अणुरेणूतील वर्चस्वाची ग्वाही देत असतो. हा घंटानाद चंद्रभागेच्या तीरावर टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण आसमंत दुमदुमवून टाकणाऱ्या आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी धाव घेणाऱ्या वारकर्यांच्या असीम श्रद्धेची आठवण करून देणारा असतो . म्हणूनच कि काय शेगाव सुद्धा पंढरपूर झाल्याचा भास होत राहतो.  

महाराजांची पालखी आणि दुतर्फा देहभान विसरून महाराजांच्या नावाचा जल्लोष करणारा वारकरी समुदाय , लेझीम , टाळ मृदुंग आणि त्यावर थिरकणारी त्यांची पावले ,ह्या भक्तिरसाची गोडी चाखण्यासाठी जमलेला प्रचंड जनसमुदाय ,सर्वच शब्दांच्या पलीकडे आहे. हे  नेत्रसुखद दृश्य डोळे भरून पाहायचे आणि जन्मभरासाठी मनाच्या खास कप्प्यात साठवून ठेवायचे. शेगावला चराचरात महाराजांचे अस्तित्व जाणवते ते ह्याचमुळे.  महाराजांच्या समोर समाधीत उभे राहिले कि शब्द फुटत नाही, हृदयातून हुंकार फुटतो आणि डोळ्यातून त्या आनंद भेटीचे आनंदाश्रू वाहू लागतात . आयुष्याचे सार्थक करणारा हा क्षण शब्दांकित करणारी लेखणी होणे नाही .हे  नेत्र सुख  केवळ अनुभवायचे आणि त्यात समरसून जायचे .

महाराजांच्या असंख्य लीलांचे वर्णन परमभक्त दासगणू महाराजांनी  श्री गजानन विजय ह्या रसाळ ग्रंथात केले आहे. हा ग्रंथ म्हणजे आपल्याला आयुष्यभर पुरणारी शिदोरी आहे. ह्या पवित्र ग्रंथातील प्रत्येक ओवीत शब्दात महाराज स्वतः अधिष्टीत आहेत . संतानी समाजसुधारण्या साठी मनुष्य धर्म स्वीकारला आणि अनेक लीला केल्या . धर्माचे आचरण कसे करावे आणि ते करताकरताच मोक्षाच्या मार्गावर कसे मार्गस्थ व्हावे ह्याचे धडे गिरवण्यासाठीच तर अध्यात्म आहे.  आपल्या आत्म्याचा प्रवास हा मोक्ष मिळवण्यासाठीच असतो . ज्याने धर्म अर्थ काम उपभोगले आहेत त्यांचा प्रवास मोक्षाच्या मार्गावर अविरत होतोच .

उपासना  हा ह्या प्रवासातील सर्वात महत्वाचा टप्पा असतो जिथे आपल्याला अध्यात्माची ओळख होण्यास सुरवात होते. अध्यात्मातील प्रवास प्रचंड खडतर आहे . उपासना आपल्याला षडरीपुं पासून परावृत्त होण्यास मदत करते . जेव्हा आपण मोह वासना ह्यापासून दूर राहून मनोनिग्रह करून आपल्या चित्तवृत्ती एकवटून समर्पण करतो तेव्हा कुठे आपल्याला मार्ग दिसू लागतो. उपासना आपल्याला आपलीच नव्याने ओळख करून देते . आपली कर्म हळूहळू शुद्ध होण्यास प्रारंभ होतो आणि तोच क्षण आपल्यासाठी अत्युच्च आनंदाचा असतो . जेव्हा मला समोर असलेले गुलाबजाम खायचे आहेत पण मी ते खाणार नाही हा  ताबा मनावर मिळवता येतो तेव्हा समजावे आपण काहीतरी मिळवण्यास ,प्राप्त करण्यास पात्र ठरत आहोत. पावलापावलावर उपासक असतात आणि पावलापावलावर ते मोहात फसत असतात . प्रारब्ध शुद्ध होण्यास आधी चित्त शुद्धीही होणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच उपासना नक्की कश्यासाठी आपण करत आहोत हेच मुळात समजणे आवश्यक आहे. मी चुकत आहे हे मान्य करणे आणि परमेश्वरा ह्यातून मला बाहेर यायचे आहे तू मला मदत कर हि भावना जपणे हे त्याहून महत्वाचे आहे. उपासना करणे आणि उपासक होणे हे शिव धनुष्य पेलण्याइतकेच कठीण आहे .

मुळातच उपासना कश्यासाठी आवश्यक आहे आणि मला उपासनेची का गरज आहे हे समजले पाहिजे . काहीच जमत नाही किंवा बराच मोकळा वेळ आहे त्याचे काय करायचे ते समजत नाही म्हणून उपासना असे असू नये.

उपासना हि मनाच्या खोल गाभ्यातून आली तरच ती आपल्याला आपल्या अराध्यापर्यंत नेऊ शकते. उपासनेचे फळ सुद्धा अनन्यसाधारण आहे .हि एक तपश्चर्याच आहे आणि त्यात सातत्य लागते ,भक्तीचा परमोच्च बिंदू लागतो ,ध्यास लागतो, तळमळ लागते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे समर्पणाची भावना लागते . उपासना हि सकाम नसावी तर ती निष्काम असावी. काहीतरी उद्देशाने केलेली उपासना फोल ठरते . भौतिक गोष्टींच्या लालचेने भक्ताने कधीच उपासना करू नये किबहुना त्याची गरजच नाही. महाराजांना आपल्याला कधी काय द्यायचे आहे ते माहित आहे आणि वेळ आली कि ते देतातच त्यासाठी त्यांच्यासमोर सतत हे द्या ते द्या करून याचना करायची गरजच नाही. न मागता मिळालेलं फळ हे सर्वांग सुंदर असते. आपल्यात आणि महाराजांमध्ये व्यवहार कश्याला. आपले तर जन्मांतराचे नाते आहे आणि प्रत्येक जन्मात आपण त्यांच्या अधिक समीप जात आहोत मग मागायचे तरी कश्याला आणि का? ह्यावर विचार होणे आवश्यक आहेच .

हे सर्व कितीही खरे असले तरी आपण सामन्य  आहोत आणि बरेचदा आपण आपल्या आयुष्यातील दुक्ख , संकटांनी गर्भगळीत होतो आणि  महाराजांकडे याचना करतो. काहीही मागायचे नाही हे समजायला सुद्धा अध्यात्म मार्गातील थोडा प्रवास होणे आवश्यक आहे. जसजसा हा प्रवास पुढे जातो तसे त्यांच्यावरची श्रद्धा दृढ होत जाते आणि मग ते नेतील तिथे आणि करतील ते. 

काय मागायचे आणि किती मागायचे हे म्हणजे अग्नीत तुपाची धार . डोळे मिटले तरी महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर आली कि समर्पित झाल्याचा भाव जागृत होतो. थोडक्यात  देहभान विसरून सर्वस्व अर्पण करावे लागते तरच तो उत्तम उपासक होऊ शकतो.  एखादी गोष्ट करताना महाराजांचा धाक असेल तर आपल्या हातून चुकीचे काहीच घडणार नाही नाहीतर असंख्य शेगाव पंढरपूर अक्कलकोट शिर्डी च्या वार्या करूनही आपण कोरडे पाषाणच राहतो . 12 वर्षे कोरडी विहीर महाराजांनी क्षणात  जलमय केली आणि त्याच क्षणी भास्कराला भक्तीचा पाझर फुटला . अगदी असाच क्षण आपल्या आयुष्यात येतो आणि आपले आयुष्य भक्तीरसाने ओथंबून जाते ..एका वेगळ्या वाटेवर आपली आनंद यात्रा खर्या अर्थाने सुरु होते . सिद्धीविनायका चे दर्शन घ्यायला हजारो भक्त रोज येत आहेत पण त्यातील आपले खरे भक्त कोण हे तो सिद्धी विनायकच जाणो.

उपासनेमुळे अध्यात्मिकतेचे  बीज रोवले जाते आणि आपला नवीन प्रवास सुरु होतो.  आपल्या महाराजांची सेवा करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे ,असे किती लोकांना प्राप्त झाले असेल ? आपण खरच भाग्यवान आहोत .  मेवा खाण्यासाठी मात्र सेवा करू नये.  भक्तीचा अलौकिक अविष्कार भक्ताला साधक करू शकतो आणि साधनेतून घडते ती साधना . नित्य उपासनेने साधक एका क्षणी महाराजांचा परमभक्त कधी होतो ते त्याचे त्यालाही समजत नाही कारण त्यावेळी भक्त त्या शक्तीत विलीन झालेला असतो.

परमभक्त होण्याची धडपडत करत राहणे हेच भक्ताकडून अपेक्षित आहे. महाराजांनी आखून दिलेल्या मार्गावर चालत राहणे आणि उपासनेने दृढ चालत राहणे हे आपले कर्तव्य आहे. हे पारमार्थिक अलौकिक सुखाचे क्षण दुर्मिळ असतात त्यातही भक्त मनापासून अतीव श्रद्धेने भजन गात असतो ..

संत एकनाथ म्हणतात 

हरतील पापे भजन ते सोपे ..हरतील पापे जन्मांतरीची .. 

भजन भावे ध्याऊ , भजन ते गाऊ.

मी गेलो ऐसे मानू नका , भक्तीत अंतर ठेऊ नका ..हे वचन आपल्या लाडक्या भक्तांना देणाऱ्या महाराजांच्या स्वागताची जय्यत तयारी लेकी सुनांनी  घरोघरी केली आहे. साधुसंत येती घर तोची दिवाळी दसरा ...महाराजांची कृपादृष्टी तुम्हा आम्हा सर्वांवर सदैव असुदे आणि त्यांच्या कृपाछत्राखाली आपले आयुष्य सुकर होवूदे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क ; 8104639230

फेसबुक पेज : @yashaswee jyotish


Thursday, 10 February 2022

सखा

 || श्री स्वामी समर्थ ||

आयुष्याच्या प्रवासातील खरा सोबती 


आयुष्यात मित्रांना अनन्य साधारण असे  महत्वाचे स्थान आहे. एकही मित्र नाही असा माणूसच विरळा. अगदी लहानपणापासून ते आयुष्याच्या अखेर पर्यंत प्रत्येक वळणावर आपल्याला कुणीना कुणी भेटतच असते. काही लोक नुसतेच ओळखीचे राहतात तर काहींशी आपले बंध चटकन जुळतात ते कायमचेच . मनाच्या खोल एका खास कप्प्यात त्यांची जागा असते . पण हि मैत्री वृद्धिंगत होण्यासाठी दोन्हीकडून अथक पर्यंत करावे लागतात तरच ती टिकते ,लोणच्यासारखी मुरते नाहीतर हे प्रेमाचे उमाळे एखाद्या लाटेसारखे विरून जातात . आजकाल आपण फार स्ट्रेसफुल जीवन जगतो . कुणीतरी आपले जवळचे जिथे आपण काहीही बिनधास्त बोलू शकतो असे नाते लागतेच . एखाद्याशी आपली वेवलेंथ जुळली तर अनेक विषयांवर चर्चा आणि संवाद घडू लागतो. सगळ्यांशी आपले नाते जुळणे कठीण कारण व्यक्ती तितक्या प्रकृती. 

मैत्री आणि मित्र हि ईश्वरी देणगी आहे. जीवाभावाचे मित्र असणे ह्यालाही भाग्य लागते . बरेचदा आपण मैत्रीचा हात पुढे करूनही समोरून तितका प्रतिसाद येत नाही आणि एखादी चांगली मैत्री होताहोता राहते. बरेचदा मित्र मैत्रिणींचा मधूनच एखादा फोन मेसेज आला कि जीवाला अगदी गार गार वाटते. 

मैत्रीला बंधन नसते ...ती मुद्दामून करावी लागत नाही तर ती अपोआप होत जाते...एकमेकांना भेटावेसे वाटू लागते आपण काहीतरी कुणालातरी मिस करतोय ह्या भावनेतून पुन्हा पुन्हा भेटी होत जातात आणि ती फुलत बहरत जाते. कधीकधी ह्याचे रुपांतर प्रेमात होऊन नातेही बदलते . आपला जोडीदार जेव्हा आपला सखा असतो तेव्हा संसार खर्या अर्थाने फुलतो. 

आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या वयोगटाचेहि  मित्र असतात  कारण मैत्रीला वयाची अट कधीच नसते . मी तुझ्यासाठी आहे हि भावना व्यक्त करायला कधीतरी हलकासा कटाक्ष ,शब्द किंवा स्पर्श सुद्धा पुरेसा असतो. चांगले मित्र मिळायलाही पूर्वसंचीत लागते ,कधी ते मिळून आपल्याला टिकवता येत नाहीत . अशी लोक नेहमी समांतर जाताना दिसतात .त्यांच्यात मैत्री कधीच फुलत नाही ...

मैत्री हि एक भावना आहे ,कधीतरी आपण कुणाशीच व्यक्त होऊ शकत नाही  त्या भावना आपल्या मित्राजवळ व्यक्त करू शकतो ...जिथे सगळा अहंकार लोप पावतो , अडसर ठेवून बोलण्यासारखे काहीही नसते, कुठल्याही विषयावर मुक्त चर्चा होऊ शकते ,वयाच्या ,श्रीमंतीच्या कसल्याही भिंती नसतात  तिथे हेवा वाटावी अशी मैत्री होते ...मैत्रीला सुद्धा समर्पण लागते . एखाद्याने मैत्रीचा हात पुढे केला तर तो स्वीकारायला सुद्धा नशीब लागते हेही तितकेच खरे . 

मैत्री हि अत्यंत कोमल भावना आहे. मैत्री निरागस असते .आपल्या मित्राला आपल्या मनातील भावना न बोलताच समजतात इतके उच्च स्थान मैत्रीला आपल्या जीवनात आहे किबहुना असायला हवे. नुसतेच खा प्या मजा करा आणि आपापल्या घरी जा ह्यात मैत्री कुठेच नसते. असे क्षणाचे सोबती होण्यात खरी गम्मत नाहीच . एकमेकांच्या सुख दुख्खात समर्पित होऊन एकमेकांच्या आयुष्याला पूरक ठरणारी मैत्री करायला आपल्यालाही त्यात तसेच योगदान द्यायला लागते . नाहीतर अग म्हणू कि अहो ह्यात जीवनाचा प्रवास संपेल आणि मैत्री होता होता राहूनच जायील.  कामात प्रचंड व्यस्त असताना त्यातूनही वेळ काढून  आपल्या मित्राला जेव्हा फोन करतो तिथे खर्या मैत्रीचा सुगंध असतो. मैत्रीच काय कुठलेही नाते  कुणावर लादता येत नाही ते मनापासून बहरावे लागते . मैत्री हि एक निरपेक्ष निर्मळ भावना आणि मनाचे पवित्र बंधन आहे. न सांगताच समोरच्याच्या मनातले समजते तेव्हा तिथे मैत्रीचा सुगंध दरवळतो.

माझ्या आयुष्यात असंख्य मित्र मैत्रिणींचा गोड किलबिलाट आहे आणि त्यांच्या सोबत माझा जीवनप्रवास आनंदाने सरत आहे. सगळ्यात बेस्ट फ्रेंड म्हणजे महाराज आणि त्यांच्या माझ्या जीवनातील अस्तित्वामुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त झाला आहे. आज अश्याच एका जिवलग मैत्रिणीचा वाढदिवस आहे म्हणून तिला हा ब्लॉग समर्पित ...

मैत्रीचा ठेवा हा अनमोल असतो तो आपले जीवन खर्या अर्थाने समृद्ध करत असतो....त्याचा योग्य मान ठेवता आला पाहिजे. जिथे खर्या अर्थाने अहंकार गळून पडतो तिचे खर्या शाश्वत मैत्रीचा उगम होताना दिसतो. 

सौ अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

फेसबुक पेज : @yashasweejyotish










Sunday, 30 January 2022

आनंद यात्रा

 || श्री स्वामी समर्थ ||



आज कित्येक दिवसांनी शेगाव ला जाण्याचा योग आला . शेगाव चे तिकीट महिनाभरापूर्वीच  काढले होते . खरतर तेव्हापासूनच मन शेगाव ला विहार करत होते . महाराज कसे असतील आपली प्रथम दर्शनी भेट झाल्यावर ते मला आणि मी त्यांना कायकाय विचारेन ,सांगेन ह्याचा आराखडा मनोमन बांधण्यात महिना गेला. मध्यंतरीच्या काळात करोना च्या पार्श्वभूमीवर अनेक उलट सुलट बातम्या येत होत्या . अनेकांनी न जाण्याचा सल्लाही दिला. पण जायचा बेत रद्द करावा असे क्षणभर सुद्धा मनात आले नाही .उलट जाण्याच्या निर्णयावर मी ठाम होते. कुठलीही शंका किंवा संदेह मनात नव्हता . 

महाराजांच्या दर्शनासाठी मी व्याकूळ होते . शेगावचा प्रवास अत्यंत सुखरूप झाला आणि मंदिरात प्रवेश झाला. करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात कडेकोट बंदोबस्त होता . epass घेऊनच दर्शन होणार होते जो मला आधीच मिळाला होता . तसेही शेगाव म्हणजे कडक शिस्त हे समीकरण सर्वाना माहीतच आहे .भाऊंनी घालुन दिलेला शिस्तीचा वारसा , स्वछ्यतेचे पालन , संयम , इथला सेवेकरी वर्ग कसोशीने पाळतो . त्यांचे अनुकरण भक्तही करत असतात  कारण इथल्या प्रत्येक अणुरेणूत , स्पंदनात महाराजांचे अस्तीत्व अबाधित आहे.

प्रचंड शिस्तबद्ध असे आजचे दर्शन होते . करोनाचे सर्व निर्बंध पाळत एकाच रांगेतून समाधी आणि गादीचे दर्शन ,पुढे महाप्रसाद , देणगी आणि ग्रंथ खरेदी हे सर्व सुसूत्र पणे करणारे नियोजन वाखाणण्याजोगे आहे. 

महाराजांच्या मंदिराचा कळस पाहूनच डोळे भरून आले होते . गेले कित्येक वर्षाचा माझा अध्यात्मिक प्रवास मी क्षणभरसुद्धा विसरले नव्हते जो  एखाद्या चलत चित्रपटा सारखा डोळ्यासमोरून तरळून जात होता. माझा पहिला शेगावचा प्रवास जसाच्या तसा समोर उभा राहिला. कित्येक प्रसंगातून महाराजांनी मला दिलेला मदतीचा ,विश्वासाचा हात , त्यांच्याशी केलेले  हितगुज कानात रुंजी घालत होते. महाराज आज दुध उतू गेले , आता मी भाजी आणायला जातेय , आज बँकेचे काम झाले नाही अश्या  माझ्या मनातील प्रत्येक लहान सहान गोष्टी  नित्यनेमाने महाराजांना सांगणारी मी कित्येकदा त्यांच्याशी भांडते सुद्धा तर कधी प्रेमाने केलेली झुणकाभाकर त्यांना खाऊ घालताना  महाराजांचा प्रेमळ स्पर्श अनुभवते सुद्धा . 

मंदिरातील वातावरण नेहमीप्रमाणेच भारावून टाकणारे होते. प्रत्येक भक्त महाराजांच्या एका कटाक्षासाठी आतुर झाला होता. जसजसे समाधी मंदिर जवळ येऊ लागले तसतसे मनाचा सगळा बांध फुटला आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले . समोरचे दिसे ना आणि स्वतःचे देहभान विसरून समोर पहिले तेव्हा मी महाराजांच्या समोरच उभी होते. सात जन्माचे पुण्य फळास आले आणि मी त्या दिव्य शक्तीत एकरूप झाले. कुठल्याही शब्दात ,भाषेत वर्णन करता येणार नाही अशी अद्भुत प्रचीती मिळाली . माझ्या गुरुंसमोर मी नतमस्तक झाले. त्यांच्या एका कृपेची अभिलाषी असणार्या मला “ मुली मी आहे ग तुझ्यासाठी “ हा विश्वास देणारे शब्द जणू कानावर पडत होते . आपण कुठे आहोत ह्याचे भान हरपत होते ,फक्त महाराजांची मूर्ती , त्यांचा चेहरा डोळे मनात साठवून ठेवत होते . हे काही क्षणच होते पण ते मला आजन्म पुरणारे होते . पुढे गादिच्या इथेही निस्सीम शांतता आणि महाराजांची आश्वासक दृष्टी अनुभवली . त्यांची नजर खूप काही सांगून जात होती पण ते सर्व समजण्याची पात्रता आपली नाही हेही मला उमगत होते . आपल्या सद्गुरूंचे दर्शन म्हणजे आनंदाचा ठेवा , सगळ्या सगळ्याच्या पलीकडे नेणारा त्यांचा आशीर्वाद त्यांचे चरण स्पर्श करताना जाणवल्याखेरीज रहात नाही . महाराजांची प्रेमळ नजर मी अनुभवत महाप्रसाद ग्रहण केला आणि कृतकृत्य झाले. 

मी गेलो ऐसे मानू नका ..भक्तीत अंतर ठेवू नका हे वचन भक्तांना देणारे महाराजांचे अस्तित्व आजही तेथील चराचरात आहे. ते अनुभवणे , त्यांच्यात विलीन होणे ह्यासारखे सुख आणि समाधान नाही . संसाराचे पाश तोडणे इतके सहज नाही कारण आपण प्रापंचिक माणसे आहोत किबहुना तसे करणे महाराजानाही अपेक्षित नाही , दिलेले कर्म करत असताना मनात क्षणभर महाराजांच्या विचारांची , त्यांनी घालून दिलेल्या  जीवनशैलीची ज्योत तेवत ठेवणे म्हणजेच त्यांची सेवा . महाराजांचे कितीही वेळा दर्शन घेतले तरी समाधान होत नाही . आज फक्त एका तासात महाराजांचे दर्शन पुनश्च्य नाही हे सहन न होण्यापलीकडे आहे.  पण हे सर्व सुद्धा आपल्याला काहीतरी सुचवत आहे , त्यातून आपण बोध घेतला तरच अशी वेळ पुन्हा आपल्यावर येणार नाही हेही खरेच आहे. 

आज शेगाव वेगळेच वाटले. माझ्या महाराजांना कडेकोट बंदोबस्तात ठेवलेले मला रुचलेही नाही आणि सहन सुद्धा झाले नाही. शेगाव ची यात्रा म्हणजे आनंदाची पर्वणी , काकड आरती , प्रदक्षिणा , श्री गजानन विजय  ग्रंथाचे पारायण , दर्शन ,आरती , महाप्रसाद , शेजारती आणि त्यानंतरचा विडा असा दिनक्रम शेगावी असतो . आजचे हे सर्व बदल म्हणूनच का होयीना पचनी पडणे अवघड होते. 

आयुष्य कसे जगायचे , समर्पण म्हणजे काय , निस्सीम भक्ती म्हणजे काय आणि उपासनेचे महत्व काय हे सर्वच मी अनेक वर्षापासून महाराजांच्या सेवेत राहून शिकत आले आहे . मला मिळालेल्या प्रचितीचा उल्लेख करून मी पामर माझ्यापरीने लेखन रुपी सेवा सद्भावनेने करत असते. 

शेगाव ची यात्रा आणि महाराजांचे दर्शन हा दुर्मिळ योग आहे आणि त्यातून मिळालेली प्रचीती भक्तांना माणूस म्हणून घडवत असतेच .जीवन जगताना ते कसे जगावे आणि जगवावे हा मोलाचा संदेश देणारी अशी हि  अद्भुत  “ आनंद यात्रा “ असते .ह्या यात्रेतून प्रवास करणारे सगळे आनंदयात्रीच असतात कारण  दर्शनाचा अनुभव सकारात्मकतेची सर्व दालने उघडी करून देणाराच ठरतो हा भक्तांचा विश्वास आहे. अध्यात्म हि रोजचे जीवन जगण्याची कला आहे. काहीतरी दिल्याशिवाय काहीच मिळणार नाही हेच तर अध्यात्म शिकवत असते .

अपराध माझे गुरुवार आज सारे क्षमा करा , वरदहस्त ठेवा शिरी मी अनंत अपराधी ....साश्रू नयनाने मी आज मंदिरातून निघाले  ती आजवर त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून आजन्म चालत राहायचे आहे हा मनाशी निर्धार करूनच . माझा फोटो मांडून बाजार मांडू नका हा संदेश सर्व भक्तांना त्यांनी दिला आहे . महाराज आजही प्रत्येक क्षणाला भक्तांना प्रचीती देत आहेत . त्याच्या कृपेचे अभिलाषी असणार्या प्रत्येक भक्ताने आपल्या कर्तव्यांचे कठोर पालन करणे अभिप्रेत आहेच . आपण सेवेत राहायचे आहे आणि आपण सेवेकरी आहोत ह्याचे भान तसूभर सुद्धा सुटता कामा नये .स्वतःला महाराज समजून आपला विठोबा घाटोळ होऊ द्यायचा नाही  हि खुणगाठ मनाशी बांधली पाहिजे.  महाराजांनी आणि त्यांचे गुरु श्रीस्वामीसमर्थ ह्यांनी मला आयुष्यात उभे केले आहे. सहज सोपे काहीच दिले नाही . प्रत्येक गोष्टीत तावून सुलाखून दिले पण जे दिले ते असामान्य दिले . आयुष्यातील परमोच्च आनंद , समाधान , रात्रीची शांत झोप  आणि त्यांचा वरदहस्त मी क्षणोक्षणी अनुभवत आहे त्यामुळे अजून काही मागण्यासारखे उरलेच नाही.  समर्पणाची भावना असल्याशिवाय सद्गुरू प्राप्ती होत नाही हे सोळा आणे सत्य आहे. 

आज शेगावची हि आनंदयात्रा मी अनुभवली आणि ह्या यात्रेतील प्रत्येक क्षण मी महाराजांसोबत  जगले ...हा सर्व ठेवा मला पुढील यात्रेपर्यंत निश्चितच पुरणारा आहे. 

अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणा कळे | असो खलहि केव्हडा तव कृपे सुमार्गी वळे |

उणे पुढती ये तुझ्या खचित रत्नचिंतामणी | शिरी सतत माझिया वरदहस्त ठेवा झणी ||

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

फेसबुक पेज : @yashasweejyotish




 



















Sunday, 2 January 2022

विस्मृती ( वरदान ????)

 || श्री स्वामी समर्थ ||





देवाने आपल्याला विचार करण्यासाठी आणि विचार केलेल्या गोष्टी साठवून ठेवण्यासाठी मेंदू दिला आहे. पण आयुष्य प्रत्येक वेळी साधे सोप्पे नसतेच . प्रत्येक वळणावर आनंद ,दुक्ख कायकाय भेटीला येयील सांगता येत नाही. आपल्याला भूतकाळ आणि वर्तमान माहित आहे पण भविष्याच्या उदरात काय दडलंय ते कुणालाच माहित नसते आणि म्हणूनच ते जाणून घ्यायची उत्सुकता अधिक असते.  हा मनुष्य स्वभाव आणि ह्या उत्सुकतेतूनच ज्योतिषा सारख्या दैवी शास्त्राचा जन्म झाला आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये. 

आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे कि चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे. मन चंगा तर सब कुछ चंगा नाही का? मनाची अदालत , मनाचा कौल सर्वात महत्वाचा असतो. परमेश्वराची करामत अवर्णनीय  आहे , त्याने आपल्याला  घडवले आहे , मनही दिले आणि आत्माही . तरीही आपल्याला  आपण कुठून आलो आणि कुठे जाणार आहोत हे काहीच माहित नसते . आपल्या आयुष्यात सर्वात महत्वाचा आहे तो श्वास म्हणजेच वायुतत्व महत्वाचे आहे. वायूचा कारक शनी कधी आपल्या श्वासाचे बटन दाबेल सांगता येत नाही म्हणून ना भूतो ना भविष्यति..आत्ताचा क्षण जगा ,आनंद घ्या आणि द्या ..आपण सगळेच ह्या पृथ्वीवरचे सहप्रवासी आहोत , We are travellers here and one day our Journey will End. 

सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य असा एकमेव प्राणी आहे ज्याला परमेश्वराने अफाट बुद्धिमत्ता प्रदान केली आहे आणि म्हणूनच देवाच्या आपल्याकडून अपेक्षाही खूप आहेत . पण आपण त्याने दिलेल्या बुद्धिमत्तेचा उपयोग कसा करतो ? विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. आयुष्यभरात मिळवलेल्या आणि घालवलेल्या गोष्टींची गोळाबेरीज केली तर शून्यच येईल बरेचदा . दुख निराशा अपेक्षाभंग ह्या सगळ्याचे मणामणाचे ओझे मनावर घेवून जगत असतो आपण आणि ह्या सर्वाचा मनावर प्रचंड ताण येतो जो एका मर्यादेच्या बाहेर आपण सहन सुद्धा करू शकत नाही . 

हव्या त्या कॉलेज ला प्रवेश मिळाला नाही ,  प्रोमोशन नाही , हवी तशी सहचारिणी नाही , मुले आपले ऐकत नाहीत , परदेशी टूर ला जाता आले नाही , हवे तसे घर मिळाले नाही , हे झाले नाही आणि ते झाले नाही . भरमसाट अपेक्षा आणि त्या अपूर्ण राहिल्यामुळे पदरात पडलेली निराशा ह्यामुळे मनावर आणि मेंदूवर ताण येतो.  बरेचदा तो ताण विकोपाला जातो आणि मग मनाचे आजार जसे विस्मृती ,विसरभोळेपणा , एकांतवास ,कुणाशीच न बोलणे , शून्यात बघत राहणे इत्यादी . 

विस्मृती हा आजार आजकाल आपला पदर धरूनच चालत आहे . आजकालच्या so called fast life मुळे घड्याळ्याच्या काट्यावर जगणारे आपण मनात विचारांचे काहूर घेवून जगतोय . आज भाजी कुठली करायची , इस्त्रीचे कपडे आले का , दळण संपले का, उद्या प्रवासाला जायचं bag बरोबर आहे ना , सगळी बिले भरली का , औषधे संपली का , आज ऑफिस मध्ये मिटिंग आहे , रजेसाठी अर्ज स्वीकारला जायील का ? आज मोलकरीण नाही येणार देवा ..एक ना दोन ह्या विचारांच्या गर्दीत अगदी फ्रीज उघडला तरी कश्यासाठी उघडला तेच आठवत नाही अनेकदा , फोन हातात घेतला तर कुणाला करायचा होता ते विसरायला होते ...क्षणाक्षणाला गोष्टी विसरतो आपण. मग म्हणतो चंद्र बिघडला पण त्याला आपल्या रुटीन नेच बिघडवले आहे ,चंद्र पूर्वीही होता ,आजही आहे आणि उद्याही असणार आहे पण किती त्याच्यावर ताण ? तोही किती सहान करणार नाही का. 

आजकाल विस्मृती हि समस्या वाढत चालेलेली आहे ती मेंदूवर मनावर आलेल्या ताणामुळे . हा ताण आपण कमी करू शकतो , प्रत्येक आजाराचे मूळ हे आपल्यातच आणि आपल्या lifestyle मधेच दडलेले आहे . आपली मागील पिढी अतोनात कष्ट करूनही सुखी समाधानी होती . तेव्हा कुठे होता मधुमेह ? Think Think. आज आपण पैसे मिळवण्याची मशीन झालो आहोत ,ना  मुलांसाठी वेळ ना स्वतःसाठी .

आपण नियमित केलेली साधना , ध्यानधारणा , व्यायाम , योगा आपल्या शरीरावरची चरबी आणि मनावरचा ताण निश्चित हलका करेल पण आपण वेळ नाही ह्या गोंडस आवरणाखाली त्या झाकून टाकतो. आणि ज्या वेळी हे सर्व करण्याची उपरती होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. 

विस्मृती हा मनाचा आजार आहे . अश्या लोकांना सकाळी काय खाल्ले ते आठवते पण मागचे काहीच आठवत नाही . आयुष्यात एखाद्या घटनेचा झालेला आघात सहन न होणे , अपयश ,अपेक्षाभंगाचे दुक्ख पचवता न येणे असे काहीही असू शकते  .मधेच आठवते मधेच नाही ,काहीतरी बोलतात संदर्भ सुद्धा देतात ,स्वतःच्याच कोशात हि माणसे असतात . आयुष्यातील चढ उतारातून आपली सुटका नाही हे खरे आहे. ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासाने ग्रहतार्यांशी मैत्री करायची संधी प्राप्त झाली आणि प्रत्येक गोष्टीला अनेक कंगोरे असतात हे समजू लागले. कुठलीही गोष्ट तसेच माणूस ह्या जगात perfect नाहीच आणि नाही .  चंद्र हा मनाचे प्रतिनिधित्व करणारा जल तत्वाचा कारक . जल म्हणजेच संवेदना , मन निराश होते म्हणजेच संवेदना ,भावभावना दुखावल्या जातात . 

ह्या सर्व गोष्टींवर खूप विचार केल्यावर एक जाणवले. विस्मृती म्हणजे ज्या घटनांचा आपल्या आयुष्यावर खूप वाईट परिणाम होतो त्या सर्व हो हो अगदी सर्वच गोष्टींचा विसर पडण्यासाठी त्या गोष्टी , आयुष्यातील काही काळच आपल्या आयुष्यातून देवाने पुसून टाकला आहे, असा जर अर्थ घेतला तर तुमच्या लक्ष्यात येयील अश्या व्यक्तींच्या कुटुंबाला त्रास असू शकतो .आपले बाबा आपल्याला ओळखतच नाहीत हि मनाला असणारी टोचणी आहे , पण त्या व्यक्तीला आयुष्यात किती सुख आहे , काहीच आठवत नाही ,अशी माणसे त्यांच्याच कोशात आनंदात जगत असतात , नीट जवळून पहिले तर हेच दिसून येयील.

अश्या वेळी वाटते विस्मृती हा आजार कि त्या माणसाला परमेश्वराचे  मिळालेले वरदान ? असा वेगळा विचार मला करावासा वाटला . माझ्या ह्या विचारांशी कुणी सहमत असावे असा माझा आग्रह अजिबात नाही कारण प्रत्येकाचा विचार , दृष्टीकोण नक्कीच वेगळा आणि स्वागतार्ह आहे.

अस्मिता

फेसबुक पेज : @yashasweejyotish