Thursday, 1 August 2024

खेळ दशांचा

 || श्री स्वामी समर्थ ||


आयुष्यात प्रत्येक गोष्ट अमुक एक वेळेतच घडत असते , ती कुठल्या वेळेला होईल हे सांगण्यासाठी दशा , अंतर्दशा आणि विदशा ह्यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उत्तम ज्योतिषी तोच असतो ज्याला सद्य स्थितीची म्हणजेच दशेची जाण असते . दशा म्हणजे शेवटी काय तर परिस्थिती . कुठल्या स्थितीत काय घटना घडतील हे दशा च सांगू शकते . 

एखादा जातक जेव्हा पैशाचे नुकसान होते किंवा नोकरीतून अचानक निलंबन होते तेव्हा सर्वप्रथम ह्या मध्ये जातक अडकलाच का ? हे समजणे महत्वाचे असते . पुढे त्यातून तो कधी बाहेर येणार हेही दशाच सांगते .म्हणून जीवन म्हणजे दशांचा खेळ आहे. हा खेळ ज्याला उत्तम समजून घेता येयील तो ह्या शास्त्रात निश्चित प्रगतीपथावर जायील .

विवाह झाला पण मुल होत नाही ते कधी होईल ? बघा विवाह झाला म्हणजे त्यासंबंधित असणारी दशा लागली म्हणून विवाह झाला पण पुढे अपत्य प्राप्तीसाठी सध्याची दशा अनुकूल नाही म्हणून अपत्य होण्यासाठी विलंब होतो. पटतय ना? म्हणूनच विवाहमिलन करताना नुसते गुण जमवून काय उपयोग , पुढच्या दश्या बघा कि . 


प्रत्येक दशा आयुष्यात सर्व काही देणार नाही . ज्या भावांशी दशा स्वामी निगडीत आहे त्याच संबंधातील फळ आपल्याला मिळेल . उदा 4 9 ची दशा परदेशात जावून उच्च शिक्षण घेण्यासाठी उत्तम पण ह्याच दशेत नोकरी मिळणार नाही कारण ह्या नोकरीच्या दशा नाहीत . अगदी असेच नाही जर ती व्यक्ती अध्ययन क्षेत्रात असेल तर त्या क्षेत्रात नोकरी मिळू शकेल. पण तेच क्षेत्र असेल तर आणि तरच . नवं भावाची दशा दशमाचे फळ देणार नाही .  जन्मल्यापासून व्यक्ती व्यसनाधीन नसते , ठराविक घटनांचा परिणाम होवून त्या दुक्खातून बाहेर येवू शकत नाही , ते दुक्ख पचवता येत नाही , अनेकदा अपयश सुद्धा पचवता येत नाही म्हणून व्यक्ती व्यसनात स्वतःला गुरफटवून टाकते कारण हेच त्या दशेचे फळ असते . 

अनेकदा अत्यंत चांगल्या माणसाला पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागते किंवा अगदी तुरुंगाची हवासुद्धा खायला लागते . अचानक ध्यानीमनी नसताना परदेशात नोकरी मिळते आणि परदेशगमन होते . एखादी दशा आजवरचे सगळे नाते संबंध तोडून मोडून टाकते ,एकटेपणा देते तर एखादी दशा गंभीर आजारपण देवून अंथरुणाला खिळवून ठेवते .

अनेकदा मुले हुशार असतात , आज्ञाधारक असतात पण अचानक काय होते माहित नाही पण आपल्याच धुंदीत राहायला लागतात , उलट बोलायला लागतात , घरी दिलेल्या पैशाचा हिशोब देताना धास्तावतात , अभ्यासातून लक्ष उडते आणि रात्ररात्र मोबाईल आणि घराच्या बाहेर राहायला लागतात . अहो संपूर्ण जीवन ज्या आईवडिलांनी मुलांसाठी राबराब राबून खर्च केले ते अश्याने हतबल होणार नाही तर काय होयील ?

नुसती पाच पंचवीस पुस्तके आणि नियम वाचून ज्योतिषी होता येत नाही . त्यासाठी परिस्थितीची उत्तम जाण असावी लागते . एखादा धनिक आपल्या मुलासाठी खूप डोनेशन देवून त्याला डॉक्टर बनवेल सुद्धा पण समोर रुग्ण आला तर त्याला कावीळ झाली आहे कि अजून काही हे त्याला सांगता आले नाही तर सर्व फोल आहे. 

ज्योतिषाने  जातकाला प्रश्न विचारून मागील ग्रहदशानी काय काय दिले ह्याची खात्री करून घ्यावी जेणेकरून पत्रिका बरोबर आहे ना ह्याचाही अंदाज येतो. जसे अनेकदा मागील दशा षष्ठ भावाशी निगडीत होती म्हणून आजारपण दिले पण आता पंचामाची दशा असल्यामुळे डॉक्टरांच्या औषधाचा गुण येवून आजार बरा झालाय .

एखादी दशा भरभरून देईल , आयुष्याचे सोने करेल तर एखादी उध्वस्त करेल, एखादी अंतर्मुख करायला लावेल तर एखादी मान सन्मान आदर यश मिळवून उच्च शिखरावर नेणारी असेल. पंचम भावाची दशा म्हणजे आपल्या पूर्व कर्माची ओळख करून देणारी  मग ती चांगली असोत अथवा वाईट . दशा समजण्यासाठी वर्ग कुंडलीचा सखोल अभ्यास पाहिजे त्याशिवाय गत्यंतर नाही . अनेकदा कृष्णमुर्ती पद्धत ह्यावर अधिक सूक्ष्म प्रकाश टाकू शकते . 

दशा कुठली आहे हे न पाहता , नुसताच गुरु लग्नात आला आणि रवी सप्तमात आला म्हणून विवाह होईल हे सांगणाऱ्या ज्योतिषांचे भाकीत हमखास चुकते .

सरतेशेवटी एखाद्याचे मन समजायला , त्याच्या आयुष्यावर भाष्य करायला आणि त्याला मार्ग दाखवायला सुद्धा आपल्यावर गुरुकृपा असणे आवश्यक आहे. गुरुकृपा नसेल तर आपण नुसतेच शब्दांचे खेळ करणारे पुस्तकी पांडित्य करू पण गुरुकृपा असेल तर त्याचा प्रश्न सोडवण्यासाठीचा उपाय त्याला सांगून त्याचे जीवन प्रकाशमय करू . प्रत्येक ग्रह नक्षत्र राशी आणि त्यांचे योग ह्यातून हे शास्त्र साकारले आहे , उपायांचेही तेच आहे. प्रत्येक वेळी विवाह जमत नाही म्हणून कुंभ विवाह केला तर विवाहयोग जुळून येयील का? समजून घ्या असे होत नसते , हाती काही लागत नाही पण पैसे मात्र खर्च होतात. पुस्तके ग्रंथ वाचून ज्ञान मिळेल पण त्याचा संदर्भ समोरच्या पत्रिकेत कसा लावायचा ह्याला गुरुकृपा लागते . गुरुकृपेशिवाय तुम्ही ह्या क्षेत्रात उभे राहूच शकणार नाही. गुरु म्हणजे ज्ञान जे आहे म्हणून पत्रिकेचे मर्म समजणार आहे. पंचम अष्टम भावाच्या दशेत व्यक्ती  ज्योतिष शास्त्राचा अभ्यास उत्तम करेल. 

लोक उपाय विचारतात पण हाच उपाय का? ते नाही विचारात . तसेच नेमका कश्यासाठी हाच उपाय करावा हेही समजून घेत नाहीत . सूर्याला अर्घ्य घाला म्हंटले तर लगेच हो म्हणतील पण का? ते काय करायचे आहे . असे आहे सर्व . आपल्याकडे पत्रिका आली कि तिला नमस्कार करावा कारण ती पत्रिका एका आत्म्याचा प्रवास आहे त्याचे वाचन करताना गुरूंचे स्मरण करावे. त्यांच्याच कृपेने सर्व उत्तम व्हावे अशी प्रार्थना करावी . कारण शेवटी तेच करते करवते आहेत . 


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230





Friday, 26 July 2024

विचारांच्या सामर्थ्याने करूया जीवनात परिवर्तन ...( अनुभव नक्की कळवा )

 || श्री स्वामी समर्थ ||

टीप : लेख कॉपी करून आपल्या कोत्या मनोवृत्तीचे प्रदर्शन करू नका. वाचकांनी सुद्धा सहकार्य करावे. वाचकच सर्वसर्वा आहेत .

आज आपण सगळेच खूप धावपळीचे आयुष्य जगताना “ मी काय काय लक्ष्यात ठेवू ? “ हा प्रश्न अनेकांच्या कडून ऐकतो . आपलीही परिस्थिती वेगळी नाही . अनेक गोष्टी दिवसभरात करून अनेकदा आपला मेंदू आणि शरीर दोन्ही थकतेच. खूपवेळा मनाविरुद्ध घटना घडल्या कि जसे नोकरी अचानक जाणे किंवा दूर बदली होणे , पगार वाढ अपेक्षेपेक्षा कमी झाल्यामुळे पैशाची गणिते बिघडणे , घराचे , तब्येतीचे अनेक प्रश्न निर्माण होतात , ह्या सर्वातून मार्ग काढताना दमछाक होते. 

आज मन शांत राहणे हे अति महत्वाचे आहे कारण त्यातून अनेक आजार जन्माला येत आहेत . अनेकदा आपल्या मनातील नकारात्मक विचार आपल्या मनावर नाही तर मेंदूत स्थिरावतात , ते विचारच आपला Aura बनतात आणि आपले व्यक्तिमत्व “ नकारात्मक “ बनवण्यासाठी कारणीभूत ठरतात . म्हणूनच आपण मनात काय विचार करतो ते महत्वाचे आहे. सगळ्या प्रश्नांचे मूळ आपल्या विचारात आहे. हे विचार आपल्याला घडवतात आणि बिघडवतात सुद्धा . 

आपल्या आजूबाजूच्या लोकांचे स्वभाव , परिस्थिती आपल्या हातात नाही पण नकारात्मक किंवा कुठल्याही स्थितीत आपले विचार सकारात्मक असणे आणि ते सातत्याने ठेवणे हा प्रयत्न करत राहणे आपल्या हाती आहे .


सकाळपासून आपण म्हंटले कि माझे डोके दुखत आहे तर सकाळी ११ वाजेपर्यंत ते खरच दुखायला लागते. करून पहा .मी 18 वर्ष IT मध्ये Recruitment मध्ये काम केले . एखादा उत्तम प्रोफाईल कुठल्याहि कंपनीत पाठवताना कधी माझ्या मनात “ हा आधीच कुणीतरी पाठवला असेल तर ? “ असा विचार आला तर खरेच तसे व्हायचे हे मी अनुभवले आहे . 

आपणही अनेकदा मनात असे नकारात्मक विचार आधीच करतो पण विचारांचे सामर्थ्य इतके प्रबळ असते कि ते विचार प्रत्यक्षात कधी उतरतात हे आपल्याला सुद्धा समजत नाही . 

मला रिक्षा मिळेल का? 

मला तिकीट मिळेल का?

मला कर्ज मिळेल का ?

मी आजारातून बरा होईन का ?

अपेक्षित महाविद्यालयात प्रवेश मिळेल का?

माझा विवाह होईल का?

माझे घर होईल का? 

ह्या सर्व प्रश्नानाची आपल्या मनात जरा नकारात्मक सुरवात असते ती जर आणि तर ने. हे होईल का? हा विचार करण्यापेक्षा 

मला रिक्षा मिळणारच 

तिकीट मला हमखास मिळेल 

माझे सर्व पेपर तयार आहेत मला नक्कीच कर्ज मिळणार 

आजारातून मी बरा होणार कसा हा बघा मी बर झालोच आहे

प्रवेश नक्की मिळणार आणि मी ह्याच महाविद्यालयात जाणार 

माझा विवाह लवकरच ठरणार आहे 

मी लवकरच नवीन घरात राहायला जाणार आहे 


वरील विचार केले तर त्या गोष्टी नुसत्या स्वप्नवत न राहता प्रत्यक्षात अनुभवता येतील ह्यात वादच नाही . आपण आपल्या मनाला चुकीच्या नकारात्मक विचारात अडकवून ठेवतो आणि तो गुंता सोडवणे शेवटी मनालाही अशक्य होते आणि म्हणून गोष्टी घडत नाहीत . 

साधे सोप्पे जागा कि . आपण श्वास सुद्धा ह्या ब्रम्हांडातून घेतो आणि सोडतो सुद्धा . जे जे द्याल ते परत मिळेल. जसे भिंतीवर बॉल मारला तर परत तुमच्याकडे येणार . सकारात्मक विचार मनात रुजवा ते मनावर बिंबवत राहा आणि मग बघा आयुष्य किती बदलून जायील . मला नोकरी मिळेल का? अरे का नाही मिळणार नक्कीच मिळणार पण जर मिळेल का ? होईल का? अश्या नकरात्मक घंटा वाजवत राहाल तर इतर अनेकांना नोकरी मिळेल पण तुम्हाला नाही .पटतंय का?

चला आज विचारांचे परिवर्तन करुया , आपल्या आयुष्याचा कायापालट करणाऱ्या ह्या विचारांचे सामर्थ्य आजपासून आपण स्वतःच अनुभवूया .सगळी उत्तरे आपल्याकडेच असतात आपल्याला फक्त ती शोधायची असतात . आज जोश होश सर्व परत आणूया त्यासाठी खाली दिलेली वाक्ये रोज एकदा म्हणायची आहेत ...काही दिवसात आपला सर्वांगीण विकास होताना तुम्हाला दिसेल. हा आनंद तुम्ही अनुभवला कि इतरानाही हे ज्ञान द्या ...ज्ञान वृद्धिंगत होते . आज अनेक  मानसोपचार तज्ञ , विचार प्रवर्तक हेच काम करत आहेत , कुठले काम ? तर आपल्या विचाराना योग्य दिशा देण्याचे . 

आपण दिशाहीन झालो आहोत आणि आपल्याला नेमके काय हवे ते आपल्याला सुद्धा समजत नाहीय , सतत काश्याच्यातरी मागे पळत आहोत. आपल्या गरजा आपणच वाढवून ठेवल्या आहेत . अनेकदा आजूबाजूच्या स्थितीचा नकळत पगडा आपल्या मनावर होत राहतो उदा. परवा एक मुलगा म्हणाला मला लग्नच नाही करायचे . कारण काय तर गेल्या दोन तीन वर्षात त्याचं ओळखीत मित्रात अनेक घटस्फोट झाले म्हणून त्याला वाटायला लागलेय कि आपण लग्न केले तर आपलाही होईल. 

आज आपणच आपल्याला जगवायचे आहे. सततचा ताण , संघर्ष ह्यात आपले हसू , आरोग्य सर्व काही लोप पावत चालले आहे . आपण फक्त पैसे मिळवायची मशीन झालो आहोत . लहान लहान गोष्टी मनाला लावून घेतो आणि निराश होतो . आज मोकळा श्वास घेण्याची आणि हे सगळी खोटी वेष्टणे भिरकावून देवून गगनाला गवसणी घालायची वेळ आहे. 


आयुष्य एकदाच मिळते , आपली स्वप्न पूर्ण करायची आणि आपण आपल्यासाठी आनंदाने जगायचे इतके साधे सोप्पे आहे हे . समाजासाठीही जे करता येयील ते करा पण हे कधी शक्य होईल ?  जेव्हा आपला Aura सकारात्मक असेल. आपले मन नितळ स्वच्छ असेल आणि मनात सदैव सकारात्मक विचार असतील. 

काही वाक्यांचा तुमच्या प्राप्त परिस्थितीनुसार संच बनवा आणि हि वाक्य रोज म्हणा , प्रश्न विचारणे थांबवा आणि म्हणायला सुरवात करा कारण सुरवात होणे अति अति अति आवश्यक आहे. 


खालील वाक्ये रोज म्हणायची आहेत .....

मला आयुष्य आनंदाने जगात आहे . माझे मन स्थिर शांत आहे

माझ्या मनात ईश्वर आहे   

मी अत्यंत निरोगी आणि अखेरच्या श्वासापर्यंत निरोगी राहणार आहे .

मी सुखवस्तू आणि सुखी आहे.

माझे कुटुंब आणि घर मला प्रिय आहे.

मला कश्याचीही कमतरता नाही आणि माझ्याकडे पुष्कळ धन आहे .

माझ्या प्रत्येक कामात मला यश मिळत आहे 

माझे नातेवाईक , स्नेही , आप्त सगळे माझ्यासोबत छान आनंदी आहेत 

प्रत्यक्ष सद्गुरू माझ्या मनात आहेत .

वरील सर्व वाक्ये रोज एकदा म्हणा आणि विचारांच्या सामर्थ्याचा अनुभव घ्या , अनुभव कळवा सुद्धा. 

एखाद्या मुलाचा विवाह व्हायचा असेल तर त्याने लिहावे ...मला माझ्या मनासारखी सुंदर पत्नी लाभली आहे. 

मुलाच्या आईने लिहावे ... माझ्या मुलाचे सुसंकृत रूपवान मुलीशी विवाह झाला आहे आणि त्यांचा सुखाचा संसार मी पाहत आहे .

एखाद्याचा विजा मिळत नसेल.... माझा विजा माझ्या हाती आला आहे. 

हि सर्व वाक्ये व्यक्ती सापेक्ष आहेत आपापल्या आवश्यकतेनुसार त्यात बदल होतील .

आपण किती मनापासून जीव तोडून एखादी गोष्ट करतो त्यावर त्याचे यश अवलंबून असते हे मी वेगळे सांगायला नको .

आपल्या सर्वांच्या जीवनात नित्य आनंदाचे प्रसंग यावेत आणि सर्वांचे आयुष्य सकारात्मक व्हावे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.

विचार सर्वप्रथम आपल्या मनात येतात , तेच जर शुद्ध , सकारात्मक असतील तर आयुष्य निश्चित बदलेल हा विश्वास वाटतो .

श्री स्वामी समर्थ 

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230







ओं शनैश्चराय नमः

 || श्री स्वामी समर्थ ||


टीप : लेखांची कॉपी चुकूनही करू नका केलीत तर शनीच्या शिक्षेस पात्र ठराल. वाचकांनी सुद्धा कॉपी केलेले लेख दिसले तर मूळ लेखकाला कळवावे तसेच ज्यांनी केले त्याचे पितळ उघडे पडण्याचे धैर्य दाखवावे. 

आयुष्याच्या संध्याकाळी भेटणारा हा ग्रह असे म्हंटले तर चुकीचे ठरणार नाही . आयुष्याची संध्याकाळ म्हणजेच वार्धक्य आणि शनी वार्धक्याचाच ग्रह आहे. ग्रहमालिकेतील सर्वात बाहेरचा ग्रह म्हणून त्याचे वर्तुळ सुद्धा मोठ्या आकाराचे आणि म्हणून अडीच वर्ष एका राशीत भ्रमण करणारा शनी जनमानसावर प्रचंड पकड ठेवून आहे. आयुष्याच्या संध्याकाळी भेटतो तो आयुष्यभराच्या आपल्या चांगल्या वाईट कर्माचा हिशोब करण्यासाठी . 


शनी आला कि पळापळ होते पण तसे बघायला गेले तर लहान सहान गोष्टीनी सुद्धा प्रसन्न होणारे हे शनिदेव शासन करताना मात्र कुठलीच तडजोड करणार नाहीत . दंड देणे , शिक्षा सुनावणे हे त्यांचे काम आणि त्याची अंबलबजावणी वेळेतच होते. 

शनीची साडेसाती , पनवती , दशा , अंतर्दशा , विदशा आली कि पत्रिकेतील शनी आपली कामगिरी चोख बजावतो . तिथे कुणाची ओळख ,  चिठ्ठी चपाटी काम करत नाही . समज असण्यापेक्षा ह्या ग्रहाबद्दल गैरसमज खूप आहेत . शनी सामान्य जनतेचा कारक म्हणजे सेवक आहे . जो चुकणार तो दंड भोगणार शिक्षेस पात्र ठरणार हा साधा सरळ हिशोब आहे. चुका पापे करताना काही वाटत नाही मग शिक्षेला सुद्धा सामोरे जा कि त्यात काय ? तेव्हा कश्याला घाबरायचे ?

इतर ग्रहांपासून वेगळे असे त्याचे अस्तित्व शनीने अबाधित ठेवले पाहिजे . शनी सामन्यांचा कारक आहे म्हणूनच करोना मध्ये सामान्य माणसाची किंमत जगाला समजली . असो . न्यायाने , नीतीने जो जीवन व्यतीत करतो , इतरांना सन्मानपूर्वक वागणूक देतो आणि अहंकार विरहित जीवन जगतो त्याचे जीवन शनी उजळून सुद्धा टाकतो . कष्ट करणाऱ्या व्यक्ती शनीला प्रिय आहेत . मी असा आणि मी तसा त्यांचे शनी आयुष्याच्या शेवटी अक्षरश हाल करतो . म्हणूनच आयुष्यभर माणसाने विचारपूर्वक कृती केली पाहिजे . आपण कुणाला बोलतोय आणि काय बोलतोय ह्याचा विचार बोलण्यापूर्वी केला पाहिजे .

नुसते बसून खाणार्या व्यक्ती शनीच्या शिक्षेस पात्र ठरतात . आपल्या आयुष्यातील आणि गत आयुष्यातील चांगल्या वाईट कर्माचा हिशोब त्याच्याजवळ आहे . आपण काय काय चुका आणि पापे केली आहेत ते फक्त आपल्याला आणि देवालाच माहित असतात आणि अशीच लोक साडेसाती यायच्या आधीच घाबरतात . हे कटू सत्य आहे. 

रावाचा रंक करण्याची ताकद ह्या ग्रहाजवळ आहे .  रस्त्यावर पण आणेल आणि एखाद्या कंपनीच्या उच्च पदावर पण नेयील .एखादा बरा न होणारा आजार देयील आणि खंगत ठेवील.  अभक्ष भक्षण आणि व्यसनाधीनता शनीला अजिबात आवडत नाही . ह्यात जो गुरफटला त्याचे शनी दशेत खरे नाही .  

उपासना असेल तर शिक्षा कमी होते पण माफ होत नाही . काहीही झाले कि शनीवर खापर फोडणे बंद केले पाहिजे . आज आपण इतके वाचतो , अनुभवतो , सोशल मिडीया वरच्या ज्ञानगंगेत डुबकी मारतो पण अजूनही आपल्याला शनी समजला नाही . शनी आपल्या आत आहे आणि म्हणूनच प्रत्येक कर्म करताना त्याच्या अस्तित्वाची आठवण ठेवली तर कर्म सुधारतील आपली . नाहीतर सकाळी कर्म केले कि लगेच संध्याकाळी शिक्षा होणारच . 

शनी हा मित्र आहे , आयुष्यातील खरा प्रकाशझोत आहे. शनी कर्मवादी आहे. सर्वात प्राधान्य कर्माला देणारा एकमेव ग्रह . सगळ्यात राहून तटस्थ कसे राहायचे ते शनी शिकवतो पण आपण शिकत नाही . शनी सामान्य जनतेचा कारक आहे त्यामुळे सामान्य माणसाला त्रास दिला त्याच्या असहायतेचा फायदा घेवून त्याच्याकडून काम करून घेणार्यांचे शनी हाल करतो हे नक्की . 

शनी कमरेखालील भाग दर्शवतो . शनी दशेत किंवा महादशेत रोज छडी घेवून बसणार नाही पण एकच फटका मारेल कि ज्याचा दाह त्रास आयुष्यभर भोगावा लागेल, आपले भावविश्वच उध्वस्त करेल .  मनाला त्रास देणाऱ्या घटना म्हणजे मातृ पितृ छत्र हरवणे अर्थात ह्यासारखी दुसरी मोठी दुखाची गोष्ट असूच शकत नाही. दुसरे म्हणजे आजारपण . शनीचे आजार म्हणजे अपंगत्व , शनी वायुतत्वाचा आहे त्यामुळे हातपाय वाकडे होणे , अपंगत्व , शरीराची एखादी बाजू किंवा अवयव निकामी होणे , हाडांची दातांची दुखणी , अर्धांगवात , वाताची दुखणी , पायात गोळे येणे , वातविकार , दीर्घ काल अंथरुणाला खिळून राहणे , शनी  दुर्गंधी युक्त आजार देतो . अहंकारं बलं दर्पं ...अहंकारी व्यक्तीच्या अहंकाराचा दर्प आधी येतो आणि मग व्यक्ती येते . अहंकार माणसाच्या आयुष्याची माती करतो आणि हा अहंकारच शनीच्या शिक्षेस कारणीभूत ठरतो . 

शनी वृद्धत्वाचा कारक आहे. वार्धक्य कुणालाही चुकले नाही . अंधार्या कोठड्या म्हणजे शनी आणि एकटेपणा म्हणजे पण शनीच . शनी म्हणजे वैराग्य , एकांतवास . शनीला मोहमाया नको आहे. साधेपणा , सरळ जीवन शनीला प्रिय आहे. होत्याचे नव्हते करणारा शनी. मृत्यू सगळ्यांनाच येणार आहे पण तो कसा येयील हे शनीच्या हातात आणि अर्थात आपल्या कर्माशी सुद्धा निगडीत आहे.  आपल्या कर्माचे फळ देण्यास शनी बांधील आहे त्यामुळे उगीच त्याला व्हिलन करू नका .

साधना हा जीवनाचा मोठा आधार आहे. राहू आणि शनी साठी एकमेव उपाय म्हणजे हनुमान चालीसा . उपाय सांगा म्हणून अनेक जण विचारतात पण सांगितले तर करतात किती???  हा महत्वाचा प्रश्न आहे. 

शेवटी जसे घडायचे तशी बुद्धी होते माणसाला. शनी हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे.

श्री स्वामी समर्थ 

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230

 







Wednesday, 24 July 2024

सहवास तुझाची घडावा देवा

 || श्री स्वामी समर्थ 

सुग्रास भोजन कुणाला आवडणार नाही ? नुसत्या फोडणीच्या वासाने सुद्धा भूक चाळवते आपली . पण आपल्या विष्ठेचा वास आपल्या सुद्धा सहन होत नाही . परमेश्वराने शरीराची रचना तशीच केली आहे . आपण जे अन्न ग्रहण करतो त्यातील शरीराला जे हवे ते ठेवून नको असलेले शरीर विष्ठेच्या मार्फत बाहेर फेकून देते . अगदी त्याचप्रमाणे आपल्या मनातील नको असलेल्या विचारांची गर्दी बाहेर टाकून दिली पाहिजे. वर्षानुवर्षे अनेक नको त्या आठवणी घडलेले प्रसंग आणि कुणाचे शब्द आपण लक्ष्यात ठेवतो , त्याचे थरावर थर मनात साठवून ठेवतो आणि त्यातूनच अनेक मोठे आजार सुद्धा आपणच जन्माला घालत असतो . धबधब्यासारखे बोलणार्या , हसत्या खेळत्या व्यक्तींना सहसा आजारपण येत नाही ते ह्याच कारणामुळे. मन निर्मल आणि मनात आले ते बोलून मोकळे व्हायचे , मन आपले साफसूफ . 


सुख दुक्ख सापेक्ष आहे. निसर्ग  आणि मानवी जीवन ह्याचा घनिष्ठ संबंध आहे . जिथे ऋतू सुद्धा सतत बदलत राहतात तिथे मानवी जीवन ते काय . म्हणूनच सुख दुक्ख सुद्धा कायम नाही. नवग्रहांच्या दशा सुद्धा कायम नाही . एखाद्या ग्रहाची दशा परदेशगमन देयील तर एखाद्या ग्रहाची विवाह तर एखादी असाध्य आजार , काहीच शाश्वत नाही . माणसाने सोडून द्यायला शिकले पाहिजे . कुणी कितीही चांगले केले तरी आपण ते लक्ष्यात न ठेवता त्याने वाईट काय केले ते आपण बरोबर लक्ष्यात ठेवतो . विसरण्याची क्षमता आपल्याला देवाने दिली आहे म्हणून आपले जीवन सुसह्य आहे  . अनेकदा आपल्या जवळची व्यक्ती हे जग सोडून जाते आणि आपल्याला दुक्खाच्या खाईत लोटून जाते . जो जातो तो सुटतो पण मागे राहणाऱ्यांची खरी परीक्षा असते . इतके सहज नाही हे सर्व विसरणे . ह्याच सर्व क्षणात महाराज आपल्याला मदत करतात . त्यांचा मायेने पाठीवरून फिरणारा हात आपल्याला जगण्याची उमेद देवून जातो . 

कुठल्याही कठीण प्रसंगातून आपण पार होतो ती त्यांचीच कृपा आहे. अचंबित करणारे प्रसंग आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची जणू ग्वाही देतात . अनुभूती मिळवण्यासाठी अपार श्रद्धा , निस्सीम भक्ती आणि प्रचंड विश्वास हवा . वरवरची सेवा उपयोगी नाही . महाराज म्हणजे न समजणाऱ्या अनाकलनीय शक्ती आहेत . समाज सुधारण्यासाठी आणि मनुष्याच्या जीवनाला अध्यात्माची गोडी आणि योग्य वळण लावण्यासाठी ईश्वराने संतरुपामध्ये वावर केला. संतांच्या पत्रिका अभ्यासल्या तर त्यानाही किती त्रासातून जावे लागले आहे ह्याचा प्रत्यय येईल.

संत शिरोमणी श्री गजानन महाराजांनी  शेगाव मध्ये वास्तव्य केले ते अखेरपर्यंत .भास्कर पाटील , गणू जवर्या , बंकटलाल , भाऊ कवर ह्यांच्यावर महाराजांची कृपा होती , त्यांच्यासारखे भक्त आणि त्यांच्या लीला ह्यांचे रसभरीत वर्णन श्री गजानन विजय ग्रंथात आपल्याला दिसतेच . बारा वर्ष एक थेंब सुद्धा पाणी नाही आले त्या विहिरीला महाराजांनी एका क्षणात जलमय केले आणि हि लीला बघून भास्कर पाटील ह्या निस्सीम भक्ताने आपला अवघा प्रपंच त्यांच्या चरणाशी वाहिला हि सोपी गोष्ट खचितच नाही. 

आज आपण इतके वर्ष पोथी वाचत आहोत , नित्य सेवा आणि नामस्मरण करत आहोत आणि हे अभिमानाने मी केले मी केले असेही सांगत आहोत . खरच इतक्या वर्षात आपल्या वृत्तीत , देहबोलीत , मानसिकतेमध्ये , विचारात असे कितीसे बदल झाले ??? ह्याचा विचार सुद्धा आवश्यक आहे. -पशु पक्षी सुद्धा त्यांच्या आज्ञेत वागतात आणि आम्ही ? प्रश्न गंभीर आहे पण विचारमंथन करण्यास योग्य आहे. आजकाल घरोघरी महाराजांचे फोटो असतात पण तरीही त्यांच्यातील गुरुतत्व आपल्यात उतरू नये किबहुना आपण भक्तीत किती कमी पडत आहोत ह्याची जाणीव खुद्द आपल्याला सुद्धा असू नये  ह्याचा खेद आहे. 

आज म्हणूनच महाराजांकडे काहीतरी खास मागुया ...हे जीवन हा त्यांचा प्रसाद मानला तर ते जीवन मी कसे व्यतीत केले पाहिजे ? एकेक पाऊल मृत्यूकडे जात असताना माझ्या वेळेचा सदुपयोग मी कसा केला पाहिजे ? 

त्यांचा सहवास अधिकाधिक मिळावा हाच प्रसाद आज मागुया. त्यांचे नाम इतके सतत घेता आले पाहिजे कि क्षणभर सुद्धा त्यांचा विसर पडू नये .हरीचे नाम मुखात आणि वृत्तीत असावे जेणेकरून जन्ममृत्युचा हा फेरा चुकवता आला पाहिजे हाच आशीर्वाद मागुया . त्यांचा वियोग हि कल्पना सुद्धा सहन होणारी नाही त्यामुळे तुमचा वियोग होवू नये हेच मागणे आहे. 

आजच्या कलियुगात आपणच आपले प्रश्न वाढवून ठेवले आहेत आणि म्हणूनच अध्यात्माची खरी गरज लहान मुले , युवा पिढीपासून सर्वांनाच आहे. आज आपण सगळे मिळवले आहे पण समाधान हरवून बसलो आहोत . कसलेतरी सततचे दडपण आणि अनामिक भीतीने आपले मन पोखरत चालले आहे . काळजी चिंता आपल्या मागच्या पिढ्यांना सुद्धा होतीच कि पण त्यांनी त्याचा बाऊ केला नाही ,त्यांची श्रद्धा अधिक बळकट होती , जीवनाला आकार उकार होता आणि सर्वात महत्वाचा म्हणजे संयम होता . आज हे सर्व लोप पावत आहे त्यामुळे मग झोपेची गोळी लागते , मन निराश होते आणि व्यसनात कधी गुरफटते आपल्याला सुद्धा समजत नाही . महाराजांच्या लीलांनी ओथंबून वाहणारा श्री गजानन विजय ग्रंथ हा अक्षरश रिसर्च करायला लावणारा विषय आहे. तो समजणे तितके सोपे नाही त्याचा प्रसार अधिकाधिक होण्याची आवश्यकता आहे . आपल्या घरातील लहान मुलांना सुद्धा त्यातील असंख्य गोष्टी सांगून त्याची गोडी लावली पाहिजे . आपली भक्ती विश्वास वाढतो तेव्हाच आपण संकटांशी दोन हात करू शकतो , त्यातून मार्ग काढू शकतो . प्रत्येक लीला थक्क करणारी आहे. महाराजांनी समाधी घेतली हे भक्तांच्या स्वप्नात जावून सांगितले म्हणून हजारोंचा लोंढा शेगाव कडे आला . तेव्हा फोन नव्हते पण महाराजांनी स्वप्नात जावून भक्तांना आपण समाधी घेतल्याचे सुतवाक्य  केले .

महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले किती भाग्यवान असतील नाही का. आपल्याला आपल्या पारायणाच्या नामस्मरणाच्या मानस पूजेच्या माध्यमातून जो सहवास मिळतो आहे तो अखंड राहावा हीच त्यांच्या चरणी प्रार्थना .

जय जय राम कृष्ण हरी 

सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230