Tuesday, 3 September 2024

सुखी सहजीवनाची ग्रहस्थिती

 || श्री स्वामी समर्थ ||


विवाह कधी होईल ,जोडीदार कसा असेल ह्या सर्व प्रश्नांपेक्षा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे माझे वैवाहिक सौख्य कसे असेल हा आहे . विवाहाच्या वेळेची स्थिती सर्वार्थाने तीच कशी राहील ? ती बदलत राहणार . आयुष्यात अनेक वळणे येणार आणि त्यातूनच एकमेकांना सावरत पुढे जात राहणार . बर्याच लोकांना उत्तम वैवाहिक सौख्य लाभते तर काहीना ह्यातून दुक्ख आणि निराशा पदरी येते. तडजोड करत विवाह टिकवणार्या लोकांची संख्या हि अधिक आहे. वैवाहिक सौख्य बघताना खालील गोष्टींचा विचार करुया.

विवाह हा अनेक कारणांनी केला जातो . अनेकदा सगळे करतात म्हणून , घरच्यांनी आग्रह केला म्हणून , मला स्वतःलाही जोडीदार हवा , सहजीवन हवे संसाराची आवड आहे म्हणून , अनेकदा घरात आईवडील वयस्कर आहेत त्यानाही बघायला कुणी नाही . पत्नी निवर्तली मग मुलांना कोण पाहणार म्हणूनही विवाह केला जातो . वरील सर्व कारणे ह्या ना त्या प्रकारे पटणारी आहेत . 

ज्योतिषीय ग्रहस्थितीचा विचार केला तर शुभ ग्रहांचा धन भाव आणि सप्तम भाव तसेच पंचम लाभ ह्या भावांवर असलेला प्रभाव सुखी जीवनाकडे वाटचाल करण्यास मदत करेल हे नक्की. सप्तम भाव हा प्रामुख्याने आपल्या जोडीदाराचा आणि दोघात असलेल्या मानसिक अनुबंधाचा आहे तिथे शनी मंगल राहू केतू उपयोगाचे नाहीत . तिथे चंद्र शुक्रासारखे सौम्य आणि ज्ल्तात्वाचे रसिक ग्रहच हवेत तरच संसाराची वेल बहरेल. 

अभ्यासकांनी खालील ग्रहस्थितीचा पत्रिका मिलनासाठी अवश्य अभ्यास करावा .


सप्तमस्थान – पापकर्तरी योगात आहे का ,कुठल्या ग्रहांच्या दृष्ट्या आहेत .

सप्तम स्थानातील ग्रह –ते कुठल्या ग्रहांच्या युतीत आहेत आणि कुणाच्या नक्षत्रात आहेत .सप्तमेश कुठे आहे आणि कुणाच्या दृष्टीत युतीत आहे. 

विवाहाचा कारक ग्रह शुक्र सगळ्यात महत्वाचा आहे . त्याची स्थिती लग्न कुंडली आणि नवमांश कुंडलीत अत्यंत महत्वाची आहे.

लग्न भाव आणि लग्नेशाची स्थिती अभ्यासा. लग्नेश आणि सप्तमेशाचे काय योग आहेत ते तपासा. 

सप्तम स्थानातील ग्रहांचे सप्तमेशाशी ,शुक्राशी आणि इतर ग्रहांशी होणारे योग.

पत्रिकेतील रवी चंद्र मंगल आणि शुक्र त्यांचे परस्परांशी योग आणि सप्तमेशाशी योग महत्वाचे आहेत .

सप्तम स्थानासोबर लग्नस्थान कारण ते सप्तमाचे सप्तम आहे, धनस्थान जे कुटुंब स्थान आहे. षष्ठ स्थान हे सप्तमाचे व्ययस्थान आहे आणि व्यय स्थान जे सप्तम स्थानाचे षष्ठ स्थान आहे.

थोडक्यात १ २ ६ ७ ८ आणि १२ ह्या स्थानांचा विचार आवश्यक आहे. २ ६ ८ १२ ह्या स्थानांमध्ये जर पापग्रह असतील तर वैवाहिक सौख्य चांगले मिळत नाही . 

स्त्रियांच्या पत्रिकेत रवी मंगळ तसेच पुरुषाच्या पत्रिकेत चंद्र शुक्र ह्यांचा अभ्यास केला पाहिजे . नवमांश पत्रिकेत ग्रहांचे बळ बघा त्याशिवाय निष्कर्ष काढू नका .

पत्रिकेतील इतर ग्रहस्थिती जसे पितृदोष ,कालसर्पदोष , वैधृती योग, विष्टीकरण.

सप्तमस्थान हे शुभ कर्तरी योगात असेल तर उत्तम . सप्तम स्थान जितके शुभ तितके संसार सुख आणि सहजीवन उत्तम .

सप्तम स्थानात चंद्र ,शुक्र हे  स्त्रीग्रह बलवान राशीत किंवा शुभ नक्षत्रात असतील.

सप्तमेश शुभ स्थितीत असेल ,लग्नात ,चतुर्थात ,पंचमात , सप्तमात , नवमात ,दशमात किंवा लाभात , स्व किंवा उच्च नवमांशात ,शुभ नक्षत्रात , मित्र ग्रहांच्या युतीत , दृष्टीत असेल तसेच सप्तमेश मार्गी असेल  तर वैवाहिक सौख्य चांगले मिळते . अश्या स्थितीत सप्तमेश हा बलवान होतो . 


सप्तमेशावर ,सप्तम स्थानावर ,शुक्रावर गुरूची दृष्टी असेल तर वैवाहिक सौख्य चांगले मिळते. 

लग्नेश आणि सप्तमेशाचा जर नवपंचम योग , लाभ योग ,राशि परीवर्तन योग असेल आणि लग्नेश बलवान असेल तर वैवाहिक सौख्य चांगले मिळते.

सप्तमेश , लग्नेश ,शुक्र ह्यांच्यासोबत शनी राहू मंगळ ह्यांचे शुभ योग होत असतील तर वैवाहिक सौख्यात अडचणी येत नाहीत.

२ ४ ६ ८ १२ ह्या स्थानात जर शुभ ग्रह असतील किंवा पाप ग्रह फारसे नसतील तर वैवाहिक सौख्य चांगले मिळते .

विवाह वेदीवर चढताना आपला हा विवाह हे आयुष्यातील सर्वोत्तम सुख आहे आणि काहीही झाले तरी मी ते टिकवणार हा दृढ निश्चय मनाशी करून विवाह केला तर समस्या येतील आणि जातील,  मार्ग मिळेल आणि संसाराची घडी सुद्धा निट बसेल. आयुष्यात सहजीवन महत्वाचे आहे . दोघेजण नुसते भाजी कोथिंबीर घ्यायला एकत्र गेले तर त्यात आनंद आहे कारण एकच “ ती दोघे एकत्र आहेत “ . सहवास सगळ्यात महत्वाचा आहे. बोलायला भांडायला सुद्धा आपलेच माणूस लागते . फार ताणून धरू नका. चिकित्सक वृत्ती शेवटी आपल्यालाच एकटे ठेवते . सर्व गुण संपन्न इथे कुणीही  नाही. प्रत्येक आईवडिलांनी एकदा आपल्या पाल्याला त्याचा चेहरा आरशात बघायला सांगावा त्यांची उत्तरे त्यांनाच आपसूक मिळतील.

सहजीवनाचा आनंद सर्वात मोठा आहे आणि त्यासाठी थोडी तडजोड करण्याची वृत्तीही असावी , नाहीतर हे सर्व इथेच राहील वास्तवात कधीच उतरणार नाही. सर्वाना आपापल्या पसंतीचा जोडीदार मिळूदे आणि सर्वांचे सहजीवन स्वामींच्या कृपेने बहरत , फुलत राहूदे हीच सदिछ्या .

सौ. अस्मिता दिक्षित

संपर्क : 8104639230






Monday, 2 September 2024

“ Click “ झालेल्या जोडीदाराकडून नेमक्या अपेक्षा काय ?

 || श्री स्वामी समर्थ ||

आज लग्न हा यक्षप्रश्न झालेला आहे. आपल्या मुलांच्या डोक्यावर अक्षता कधी पडतील ह्याची अक्षरशः चातकासारखी वाट पालक बघताना दिसत आहेत . सुस्वरूप आहे , निर्व्यसनी आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत मग घोडे अडतंय तरी कुठे ह्यामुळे पालक सुद्धा त्रस्त झालेले आहेत . “ काय ठरले का मुलाचे / मुलीचे लग्न ? “ हा प्रश्न मनापासून असो अथवा खवचट पणे विचारला गेलेला असो , तो विचारणे आता बंद झाले पाहिजे . काय आहे तुमच्या भावना कितीही चांगल्या असतील पण घेणारा आता ह्या प्रश्नांनी सुद्धा त्रासला आहे. विवाह ठरला कि तुम्हाला नक्की बोलावणार मग कश्याला विचारायचे? ह्यावर विचार नक्की करा .

अनेकदा मुलगा / मुलगी मला click म्हणजे पसंत पडत नाही म्हणून स्थळ नाकारले जाते. आजकाल तर फोन उचलत नाहीत , नकाराची साधी कारण सांगत नाहीत अशी अनेकविध कारणे सुद्धा ऐकायला मिळतात . त्याला मुलगी आवडायला हवी असे जेव्हा पालक म्हणतात त्याच वेळी लक्ष्यात येते कि स्थळाच्या पसंतीत पालकांचा सहभाग किंवा त्यांचे मत हे किती अंशी असणार आहे. आज विवाहाची वये पाहता हि पिढी संपूर्णतः अविवाहित राहणार कि काय अशी भीती वाटू लागलेली आहे. असो. 

आपल्याला “ click” झालेली मुलगी म्हणजे नेमके काय ? तिचे दिसणे , हसणे अर्थात बाह्य रूप . ती जरा सर्वसाधरण आहे कि modern लूक ची आहे ? थोडक्यात तिची देहबोली आणि रंगरूप . जो चेहरा रोज आयुष्यभर पाहायचा तो आपल्या पसंतीचा हवा हे नक्की पण फक्त दिसणे , हसणे , कपडे आणि so called modern look हाच पसंतीचा जर निकष असेल तर मात्र आपला निर्णय चुकू शकतो कारण आपण व्यक्तीचे गुण पहिलेच नाहीत फक्त बाह्यरुपावर निर्णय घेवू पाहत आहोत . रंग रूप शाश्वत नाही. पसंत पडलेले स्थळ अगदीच प्रथम दर्शनी नाहीच आवडले कि मुलगी खूप जाडी आहे आपल्या व्यक्तिमत्वाला शोभणार नाही तर तिथेच थांबा . पण इतर वेळी मुलीला / मुलाला भेटा. एकमेकांचे विचार जाणून घ्या . समोरच्या व्यक्तीचे अनेक चांगले पेहलू जे संसार करण्यासाठी उपयुक्त ठरतील ते त्या भेटीत उलगडतील आणि एक चांगले स्थळ आपण नाकारले नाही याची खंत वाटणार नाही . 


प्रत्येक्ष भेट महत्वाची आहे. लहान सहान गोष्टीत सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी समजतात . आजकालची मुले मुली तितकी समंजस नक्कीच आहेत . पण त्यात आता थोडे पालकांनी त्यांचे मत सुद्धा मांडले पाहिजे , आपल्या मुलांचे हित त्यानाही समजते . दर दोन दिवसांनी मुले स्थळे नाकारत आहेत तर ती का? हाही अभ्यासाचा विषय बनला आहे आज पालकांसाठी .

आर्थिक म्हणजे मिळकत हा विषय सुद्धा तितकाच महत्वाचा आहे कारण तो नेहमी तसाच राहणार नाही वाढतच जाणार आहे. पण त्याच सोबत आपले वय सुद्धा वाढणार आहे हेही विसरता उपयोगी नाही . आपल्याला आयुष्यात हौसमौज करण्याची , फिरण्याची , मजा करण्याची सगळे उमेदीची वर्ष निघून जात आहेत त्याचाही विचार केला पाहिजे . आपापले so called attitude बाजूला ठेवले तर अनेक विवाह असेच जुळून येतील .विचार करा पालक आणि पाल्यांनी सुद्धा. 


ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातून गुणमिलन , ग्रहमिलन केले तर संसारिक आयुष्याची दिशा नेमकी काय ती ठरवता येयील. हे शास्त्र तुमच्या सदैव मदतीला आहे. पुढील चांगल्या वाईट गोष्टींचे सुतवाक्य करणारे हे शास्त्र तुम्हाला मार्गदर्शक ठरेल ह्यात वादच नाही .

आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी जसे बाळाचे नामकरण , मुंज , विवाह अश्या मंगल कार्यासाठी तसेच  घराचे वास्तु शांतीचे मुहूर्त ह्यासाठी आपण ज्योतिषाची मदत घेतो . पूर्वापार चालत आलेले गुणमिलन हे करतो पण आज काळाची गरज ओळखून ग्रहमिलन हे सुद्धा करायला पाहिजे . पूर्वी मुलगी नोकरी करते का ? हा प्रश्नच नव्हता कारण तेव्हा स्त्रिया चूल आणि मुल ह्यातच गुंतलेल्या होत्या , किबहुना त्यांच्याकडून तेच अपेक्षित होते . आजचे प्रगत युग आहे , वैचारिक स्वातंत्र  आहे .तरीही आजही आपल्या समाजाची पाळेमुळे हि रूढी आणि परंपरा मान्य करणारी असल्यामुळे बहुतेक विवाह हे पत्रिका बघूनच जुळवले जातात . शेवटी सर्व गोष्टी जुळून येणे म्हणजेच मनोमिलन होय .

गुण मिलनाचे निकष लावताना डोळसपणे लावले पाहिजेत कारण हे गुणमिलन आणि त्याचे नियम हे प्राचीन काळापासून आहेत जेव्हाची समाज व्यवस्था आणि काळ हा वेगळा होता . एक नाड दोष ह्यावरून स्थळे नाकारली जातात पण एक नाड असेल आणि नक्षत्राचे चरण वेगळे असेल तर तो दोष मानला जात नाही तसेच एक नाड असेल तर शास्त्रात त्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत त्या तपासून न बघता स्थळ नाकारू नये .

सर्वात मुख्य म्हणजे दोघांच्या सद्य स्थितीतील महादशा काय सांगत आहेत आणि पुढे येणाऱ्या सुद्धा बघितल्या पाहिजेत कारण शेवटी दशा महत्वाच्या आहेत त्याच प्रमाणे विवाह योग निर्माण करणारे गोचरीचे योग , त्यांना डावलून कसे चालेल. अनेक योग येतात आणि जातात पण जेव्हा अति प्रखर योग येतो तेव्हा विवाह ठरतो आणि होतो सुद्धा.

वैवाहिक सुख , एकंदरीत आयुष्यातील अर्थार्जन , संतती होणार का? आणि स्वतःचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य ह्या बाबी तपासण्यासाठी पत्रिकेचा अभ्यास उपयोगी पडतो . थोडक्यात सहजीवन कसे असेल ह्याचा वैयक्तिक अभ्यास करून मग ग्रह मिलन करावे . त्यात आपल्याला दोघाचेही विचार करण्याची वृत्ती आणि क्षमता समजते . मानसिक दुर्बलता किंवा सक्षमता हेही समजते तसेच एखाद्या समस्येशी दोन हात करण्याची वृत्ती , संसाराकडे असलेली ओढ दिसून येते म्हणून गुण मिलन अति अति महत्वाचे आहे . उद्या मुले झाली कि त्यांची आजारपणे आहेत त्यांचे संस्कार आहेत , शिक्षण आहे हे दोघांनीही पहिले पाहिजेत . स्त्रीने जन्म दिला म्हणून ती तिची एकटीची जबाबदारी नाही तर दोघानाही समान वाटा सगळ्या प्रश्नात असायला हवा तो असणार आहे का ? प्रत्येक वेळेस मला काम आहे हे उत्तर चालणार नाही कारण काम तिलाही असते किबहुना काकणभर जास्तीच असते . ह्या सर्वाची मानसिकता दोघांच्या भेटीत समजेल पण पत्रीकेतील ग्रह  बोलतील तेव्हा अनेक गोष्टी अधिक सुस्पष्ट होतील.

एखादा मुलगा जर खूप करिअर करणारा असेल व्यवसायात बुडून गेलेला असेल तर तो बायकोच्या मागे पिंगा घालणार नाही  आणि तिची नेमकी तीच अपेक्षा असेल म्हणजे नवर्याने गजरा आणावा वगैरे मानसिक दृष्टीने तिला तसे वाटते पण ते तर त्याच्याकडून पूर्ण होत नसेल तर मग दोघांच्यात एक मानसिक दरी निर्माण होते आणि काही काळाने ती मोठी होत जाते. अर्थात गजरा आणणे हेच प्रेमाचे द्योतक नाही पण मानसिक दृष्टीने पहिले तर अनेकदा स्त्रिया तेच तेच धरूनही ठेवतात . त्यामुळे दोघांच्यात प्रत्येक गोष्टीत असणारा समंजस पणा कित्येकदा संसारात पदोपदी असायला लागतो कारण संसार शेवटी त्या दोघांचाच असतो . स्वतःच्याकडून पत्नीकडून असलेल्या अपेक्षा तसेच आपल्या आयुष्यातील प्राधन्य असणार्या गोष्टी करिअर पैसा सर्व गोष्टी मोकळेपणाने उघड बोलल्या गेल्या पाहिजेत .

म्हणूनच आजकाल “ click  “ झालेले स्थळ हे सर्वार्थाने “  click “ होण्यासाठी वरती नमूद केलेले सर्व परामर्श तपासले पाहिजेत आणि त्यात बहुतांशी अपेक्षा ( सगळ्या पूर्ण होणार नाहीत कारण आपणही परिपूर्ण नाही ) पूर्ण झाल्या तर स्थळ खर्या अर्थाने “ click “ होईल. 

मुळात विवाह करण्याची मानसिकता तयार व्हावी लागते कारण हि एक मोठी जबाबदारी सुद्धा आहे . विवाह उत्सुक सर्वाना खूप शुभेछ्या आणि त्यांचे विवाह लवकर जुळून यावेत ह्यासाठी महाराजांकडे अंतर्मनापासून प्रार्थना .

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230









Sunday, 1 September 2024

माझे उत्तर नेमके दडलय तरी कश्यात ?

 || श्री स्वामी समर्थ ||


ज्योतिष हे कालविधान शास्त्र आहे . काळ हा अनंत काळापासून आहेच तो काल होता आजही आहे आणि उद्याही असणार आहे . म्हणूनच आपणही काळासोबत चालले पाहिजे . घटना नेमकी कधी घडणार हे नेमके आणि अचूक सांगणारे हे शास्त्र मात्र आज कित्येकांची अवहेलना झेलत आहे. अपुरे ज्ञान आणि शास्त्राचा मांडलेला अक्षरशः बाजार हीच त्याची कारणे आहेत . नुसते क्लास केले आणि सर्टिफिकेट मिळाले कि झाले का सर्व ? क्लास , कार्यशाळा हा शास्त्राची ओळख करून देतील पण पुढे काय ? पाया भक्कम तुमचा स्वतःचा अभ्यास करणार आहे आणि वरची इमारत तुमची तुम्हालाच बांधायला लागेल त्यासाठी प्रचंड मेहनत , हजारो पत्रिकांचे विवेचन , रोजची साधना आणि गोचरीच्या ग्रहांचा अभ्यास महत्वाचा ठरेल . आपल्या वयक्तिक साधनेशिवाय सर्व फोल आहे हे आवर्जून सांगावेसे वाटते .

मानवी मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास हे शास्त्र समर्थ आहे. आपल्या पुढील पिढ्यांचे नामकरण काय असू शकेल ह्याबद्दल गुरुवर्य श्री. श्री. भट सरांनी खूप संशोधन केले होते  . ग्रहांच्या गती ज्या कडे सहसा आपले लक्ष्य जात नाही अश्या कित्येक गोष्टींचा विचार पत्रिकेच्या फलादेशात करावा लागतो . त्यातील एक जरी केला नाही तर आपले उत्तर चुकण्याची शक्यता असते . ज्यांना हे शास्त्र अवगत करायचे असेल त्यांनी आपला उभा जन्म ह्या अभ्यासासाठी वेचण्याची आणि ज्ञानरूपी खोल समुद्रात उडी मारण्याची तयारी ठेवावी . वरवरचा अभ्यास उपयोगाचा नाही . असे करून आपण फक्त दुसर्याची नाही तर स्वतःचीही फसवणूक करत असतो . असो.

ज्योतिष शिकण्यासाठी सर्वात प्रथम शास्त्रावरचा , शास्त्र कर्त्यांवरचा विश्वास अभेद्य हवा , शिकण्याची प्रवृत्ती , जिज्ञासू वृत्ती हवी  , अध्ययन करण्याचा ध्यास , कष्ट करण्याची तयारी हवी . मनन चिंतनाची मनाला सवय हवी तसेच प्रत्येक गोष्टीची सांगड ज्योतिष विद्येशी घालण्याची संशोधक वृत्ती जोपासायला हवी . नुसते पुस्तकातील नियम वाचून काही होणार नाही तर ते प्रत्यक्ष आयुष्यात कसे फळतात तेही पाहायला हवे. उदा. द्यायचे झाले तर ३ दिवसापूर्वी राहूचे नक्षत्र होते . मी काही
video रेकोर्ड केले होते त्यानंतर मी दोन वेळा ते पाहिले सुद्धा होते पण त्या दिवशी मी पाहिले तेव्हा आवाज चित्र काहीही दिसले नाही , राहुने त्याचे अस्तित्व मला दाखवले त्या दिवशी .

ज्योतिष आपल्या मदतीला तत्पर आहे. जसे चंद्र हा सर्वात जलद गती ग्रह आहे त्यामुळे प्रश्न कुंडली मध्ये जर चंद्राचे कर्क लग्न आले तर उत्तर “ हो “ आहे हे बिनधास्त सांगावे. पण शनी असेल तर सगळ्याला विलंब . ग्रहांचे कारकत्व समजले तर प्रश्नाची उकल नक्कीच होईल.

आजकाल इंस्तंट चा जमाना असल्यामुळे आणि संयम संपुष्टात आल्यामुळे सगळ्यांना सगळ्या गोष्टी शोर्टकट ने हव्या असतात .  दुर्दैवाने ह्या शास्त्रात ते नाहीत आणि ते असावे हे वाटणे हि दुर्दैवाची बाब आहे. ज्योतिष हे तर्कशास्त्र आहे. असे तर्क हे रोजच्या जीवनाशी निगडीत आहेत पण आपले त्याकडे लक्ष्यच नसते . निसर्ग सुद्धा आपल्या जीवनावर खूप परिणाम करत असतो , अनेक गोष्टी शिकवत असतो  पण आपले काश्याकडेच लक्ष्य नसते .

आपल्या आयुष्यातील काळ हा सतत पुढे जात असतो आणि हातातून वेळ निघून जाते म्हणूनच प्रत्येक अभ्यासकाने स्वतःला ह्या शास्त्राच्या अभ्यासासाठी झोकून काम केले पाहिजे . इतर अभ्यासकांचा आदर आणि त्यांच्याकडील विचारांचा योग्य मान सुद्धा ठेवला पाहिजे . मानवी जीवन आणि मन हे खूप गुंतागुंतीचे आहे आणि तो गुंता सोडवायचा असेल तर अभ्यासाचा पाया भक्कम हवा . ग्रह तार्यांशी संवाद साधता आला पाहिजे , त्यांची तत्वे , कारकत्व सर्व काही समजले पाहिजे .

कित्येक वेळा एखादी पत्रिका बघून सुद्धा एखादी ग्रहस्थिती किंवा योग आपल्या लक्ष्यात येत नाही . ह्यावरून अभ्यासाची खोली समजेल. सूर्यमालिकेत रवी हा तारा , चंद्र हा उपग्रह आणि बुध शुक्र मंगल गुरु शनी हे सर्व ग्रह आहेत , त्यांचा सखोल अभ्यास आवश्यक आहे . ह्या शिवाय पातबिंदू राहू केतू हेही आहेत . ग्रह जे ग्रहण करतात ते आपल्यापर्यंत आणून देतात .

ज्योतिष हि एक साधना आहे, तपश्चर्या आहे आणि त्यातून तावून सुलाखून निघण्यासाठी संयमाची गरज आहेच आहे . पी हळद हो गोरी इथे लागू पडत नाही . ज्योतिष अभ्यासकांनी प्रत्येक क्षणी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करताना गोचर ग्रहस्थितीची सुद्धा सांगड घातली तर अनेक प्रश्नांची कोडी सहज सुटतील .

ज्योतिष तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास नक्कीच समर्थ आहे , फक्त अभ्यास सखोल हवा . अभ्यासकाला विषयाचे गांभीर्य असावे आणि हि विद्या शिकण्यासाठी समर्पणाची भावना हवी . ग्रह तार्यांची कृपा झाली तर काहीच अशक्य नाही . जितके ग्रंथांचे वाचन तितकी प्रगल्भता अधिक .हा आत्म्याचा अभ्यास आहे जो सर्वार्थाने परिपूर्ण असाच आहे . अंतिम सुख ह्यातच आहे . आपल्याला नोकरी कधी मिळणार हे समजले कि आपली मिटते ती चिंता कारण आपले उत्तर आता मिळालेले असते . एकदा ते मिळाले कि आपण शांत होतो . एखाद्याचा विवाह अटळ असेल आणि ते एकदा समजले तर दुक्ख होईल पण किती दिवस ??? एक दिवस व्यक्ती आहे ती स्थिती स्वीकारेल आणि आयुष्य जगायला प्रवृत्त होयील . देव सगळ्यांना जगवत असतो . कुणाचे काहीही व्हायचे बाकी राहत नाही . माझी आजी ९९ वर्षाची होती ती गेली तेव्हा मला वाटले मी उद्याचा सूर्योदय पाहणार कि नाही कारण तिची आणि माझी अगदी एक नाळ होती . सहवास तितके प्रेम . पण महिन्याभरातच माझ्या मुलाचा जन्म झाला आणि संपूर्ण घर हसते खेळते झाले. आयुष्य पुढे गेले आणि जात राहील.

अत्यंत सन्मानीय असे हे शास्त्र आहे. ह्याचा अभ्यास करायला सुद्धा तितकेच पूर्व सुकृत असायला लागते .  उत्तम ज्योतिषी तयार होणे हि आज काळाची गरज आहे. कारण हे शास्त्र तुम्हाला तुमच्या उत्तरापर्यंत न्यायला आणि जीवन सुखकर होण्यास मदतच करते . आज जीवनात अनिश्चितता आहे आणि एक प्रकारच्या अनामिक भीतीत, दडपण घेवून  प्रत्येक जण जगताना दिसतो . ज्योतिष हा जीवनाचा कणा आहे. उत्तम उपासना हेही जीवनात तितकेच महत्वाचे आहे .

सद्गुरुकृपा , त्यांचा वरदहस्त असल्याशिवाय काहीही शक्य नाही , हे अगाध ज्ञान मिळवणे आणि त्याचा समाज , जन हितासाठी उपयोग करून देण्यासाठी त्यांची कृपा लागते . दोन पुस्तके वाचून ज्योतिषाचे  दुकान उघडलेत तर ते तितक्याच वेगाने  बंद सुद्धा होईल हे लक्ष्यात घ्या . कुणालाही कारण नसताना हि शांत करा , ती शांत करा हा अभिषेक करा हे सांगताना अंतर्मुख व्हा आणि स्वतःला विचार मी सांगतोय ते योग्य आहे ना? कारण सरतेशेवटी आपल्याला त्यालाच उत्तर द्यायचे आहे . आपण जगाला फसवू पण स्वतःला आणि त्याला तर फसवू  शकणार नाही. सगळ्यांचा बाप वरती बसलाय ह्याचा विसर नको.
आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. अनेक उत्तरे आपली आपल्यालाच मिळतात कोण देणार???  तर आपली स्वतःची साधना . आज अमावास्या आहे . चंद्र रवी एकत्रित ताकद अंतर्मुख करते . मनुष्य हा बाह्य जगातील भौतिक सुखात सदैव रमतो आणि अंतर्मुख होण्यास विसरतो . आज अंतर्मुख व्हा , स्वतःशीच संवाद साधायची हि संधी सोडू नका . आज सुषुम्ना नाडी म्हणजेच निसर्गाची नाडी चालू आहे ती तुमची नाळ पुन्हा एकदा निसर्गाशी आणि मातीशी जोडायला समर्थ आहे. आपण ह्या मातीतूनच जन्मलो आहोत आणि ह्या मातीतच विलीन होणार आहोत हेच अंतिम सत्य आहे.

सौ. अस्मिता दिक्षित

संपर्क : 8104639230





शरीरातील पित्त आणि रवी मंगळ

 || श्री स्वामी समर्थ ||

पित्त हे शरीरात असतेच पण ते अति होते तेव्हा त्याचे परिणाम दिसतात , जसे डोके दुखते तेव्हा आपण म्हणतो मला पित्त झाले. पित्त हे रवी मंगळा कडे आहे. रवी जेव्हा मध्यान्ही तळपायला लागतो तेव्हा पोटभर जेवलो नाही तर पित्त होते . पित्त हे रवीमुळे वरती येते म्हणूनच खरेतर सकाळी ९ च्या दरम्यान खाल्ले पाहिजे तर बुद्धी चालेल आणि पित्ताचा त्रास कमी होईल. पित्तामुळे डोके दुखते आणि बुद्धी म्हणजेच आपला मेंदू डोक्यातच असतो . व्यवस्थित खाल्ले तर पित्त होणार नाही. रवी मंगळ चुकीच्या राशीत आले किंवा आपल्या डोक्यावर म्हणजेच लग्न भावात आले तर तुम्ही सकाळी ९ वाजता भरपूर खाल्लेच पाहिजे . अश्या प्रकारे आपली तब्येत आपण जपू शकतो . आपल्या पत्रिकेतील लग्नातील आणि अग्नी तत्वाच्या राशीतील ग्रह बघा ते किती बोलके असतात .   

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230