Thursday, 30 January 2025

कोष

 || श्री स्वामी समर्थ ||


प्रत्येक जण आपापल्या कोषात जगत असतो. रोज असंख्य माणसे भेटतात आपल्याला काही  प्रत्यक्ष तर काही  विविध सोशल माध्यमातून . त्यातील प्रत्येक जण आपल्या बद्दल वेगवेगळा विचार करत असतो आणि आपणही . प्रत्येकाचे नाते आपल्याशी वेगवेगळे त्यामुळे भावनाही वेगवेगळ्या . एखादी व्यक्ती क्षणात आपलीशी होते तर अनेकदा समांतर रेषांसारखे आपण दोघे असतो .

नव्याने ओळख झालेली व्यक्ती सुद्धा आपल्या हृदयाचा आपल्याही नकळत ठाव घेते , आपल्या विचारांवर मनावर हाबी होते. अनेक युगांची ओळख असल्यासारखे वागणे आपल्याही नकळत होते . आवडणार्या लोकांना आपण क्षणात आपलेसे करतो पण ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी आपण कसेही वागलो तरी आपण आवडत नाहीच , प्रत्येकाला आपण आवडलो पाहिजे हा अट्टाहास करणेच मुळात चूक .

आपण आयुष्यात सगळ्यांना एकाच वेळी सुखी नाही करू शकत . कुणाच्या तरी मनासारखे वागलो कि दुसरा दुखावतो आणि ह्याला अंत नाही . कुणी आपल्याला वाईट म्हंटले म्हणून आपण वाईट झालो नाही आणि चांगले म्हंटले म्हणून चांगलेही झालो नाही . आपण आहोत तिथेच आणि तसेच आहोत . कुणासाठी का बदलायचे आपण ? आपण आहोत तसेच छान आहोत कि . जेव्हा दुसर्यांना आवडण्यासाठी आपण जगतो तेव्हा आपण स्वतःपासून सुद्धा दूर जातो . आपण जसे आहोत तसे स्वीकारून मैत्रीचा खरा हात पुढे करणारे आपल्या समीप येतात तेही कायमचे . त्यांनासाठीच कदाचित “ जिवलगा “ हि सज्ञा वापरत असू .

आपल्या स्वतःच्या कोषात बेधुंद पणे आपल्या पद्धतीने आयुष्य जगण्याची नजाकत वेगळीच असते आणि एक दिवस अपेक्षा विरहित निर्लेप प्रेम करणारी आणि आपल्याला तसेच्या तसे स्वीकारणारी व्यक्ती जेव्हा मैत्रीचा हात पुढे करते तेव्हा आपण अक्षरशः निशब्द होतो. तुम्हाला काय वाटते ? नक्की कळवा.

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230  


Wednesday, 29 January 2025

मोह मोह के धागे - शुक्र राहू युती

 || श्री स्वामी समर्थ ||


28 जानेवारीला शुक्राचा प्रवेश मीन ह्या जल तत्वाच्या राशीत झाला आहे. तिथे आधीच राहू ठाण मांडून आहे. राहू हावरट आहे त्याला जे जे दिसेल ते सर्व हवे आहे . शुक्र स्वतः नैसर्गिक शुभ ग्रह असून भौतिक सुखांचा भोक्ता , जीवनातील आनंदाचा स्त्रोत आहे. मीन राशीत उच्च होताना तो जणू परमेश्वराच्या चरणाशी लीन व्हावे हेच सुचवत आहे. मीन राशीत पाऊले येतात आणि आपल्या घरातील वडील मंडळी , गुरुतुल्य व्यक्ती , समस्त गुरुजन आणि आपले सद्गुरू ह्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले तर प्रत्येक कार्याला चार चांद लागतील हे वेगळे सांगायला नको. 


शुक्र हा धन , ऐश्वर्य , आचार विचार , दिसणे हसणे असणे  , शृंगार ,अलंकार , रसिकता ,फळांचे रस ,आकर्षण ,वैवाहिक सुख , भिन्न लिंगी आकर्षण , उंची कपडे पेहराव , अत्तरे , वास्तू , पर्यटन ह्यावर आपले वर्चस्व असणारा शुभ ग्रह . शुक्र म्हणजे रस , जल तत्व . एखादा अभ्यासू मुलगा  वाईट संगतीत आला कि ९०% चे ५०% होतात , अनेक वाईट सवयी सुद्धा लागतात अगदी त्याच प्रमाणे शुक्र सुद्धा अशुभ ग्रहांच्या संगतीत आपली रसिकता , सौंदर्य नको त्या ठिकाणी प्रवाहित करतो . 

राहू हा छलकपट करणारा , भलत्याच मार्गावर नेवून भ्रमित , संभ्रमित करणारा , गैरसमजाचा कोश विणणारा , भास आभासा चा खेळ खेळणारा , मोहात फसवणारा ,मायावी असुर आहे . आर्थिक बाबतीत फसवणूक , खोट्या सह्या ,कागदपत्रे हा राहूचा हातखंडा आहे.  आपण कधी एखाद्याच्या शब्दात , प्रेमाच्या पाशात ओढले जातो हे आपल्यालाही समजत नाही इतक्या  प्रचंड ताकदीचा ग्रह जेव्हा शुक्रासारख्या कोमल , रसिक आणि प्रणयाचा प्रतिक मानलेल्या शुक्रा, सोबत येयील तेव्हा काय होईल हे सुज्ञास न सांगणे बरे. विचार गोठून जातात , चांगल्या वाईट परिणामांचा विचार करण्याची क्षमता राहू काढून आपले मन संमोहित करतो .

आजकाल सोशल मिडिया मुळे प्रत्येक जण ज्योतिषी झाला आहे ( त्यांच्या ज्ञानाबद्दल न बोललेले बरे इतके अगाध आहे ते ) .असो त्यामुळे आता शुक्र म्हणजे काय आणि राहू म्हणजे काय हे सगळ्यांना माहित आहे. पण ह्यांची जेव्हा युती होते तेव्हा त्याचे फल हे प्रत्येकाच्या पत्रिकेत वेगळे असणार आहे. जो उठेल तो अनैतिकतेच्या मागे धावणार नाही काही अध्यात्मात प्रगती सुद्धा करतील तर काही पर्यटन . प्रत्येकाची पत्रिका वेगळी आणि प्राक्तन सुद्धा .

त्यासाठी सर्वात प्रथम स्वतःच्या मूळ पत्रिकेत हे दोन्ही ग्रह  कसे काम करतात , कुठल्या भावात , नक्षत्रात आहेत आणि सध्याची दशा कुठली आहे ह्याचा विचार केला पाहिजे. नुसते शुक्र राहू म्हणजे अनैकता असे लेबल लावून चालणार नाही. अभ्यास योग्य दिशेला पाहिजे . शुक्र अध्यात्म सुद्धा दाखवतो , अष्टम भावात असेल तर संशोधन , राहू हा गूढ विद्येचा कारक असल्यामुळे गूढ क्षेत्रात जिज्ञासा वाढेल आणि अभ्यास सुद्धा होईल. चांगले आणि वाईट परिणाम हे सगळ्यांसाठी वेगवेगळे असणार आहेत . त्यामुळे अविचाराने कुठलाही चुकीचा निष्कर्ष काढणे त्रासदायक ठरेल. 

लग्न कुठले आहे आणि लग्नेशाचा शुक्र मित्र आहे का? राहू असुर आहे त्याच्यासाठी सगळे सारखेच . असो .आपल्याला मिळालेल्या बातम्या ह्या खोट्या , अर्धसत्य असणार्या असू शकतात त्यामुळे लगेच भावनेच्या आहारी जायचे नाही .अनेकांचे विवाह योग सुद्धा ह्या दरम्यान शक्य आहेत, अनेकदा दुसर्या जातीत विवाह होयील . पण राहू असल्यामुळे फसवणूक होत नाही ना हेही तपासून पहिले पाहिजे. गैरसमजामुळे हि युती अनेकदा वैवाहिक जीवनात  गोंधळ निर्माण करते . प्रत्येक कुंडलीतील सप्तमेश आणि सप्तम भाव त्यासाठी तपासला पाहिजे . अचानक प्रेमात पडणे आणि अचानक ते नाते संपुष्टात येणे म्हणजेच हे प्रेम नाही तर निव्वळ आकर्षण हे लक्ष्यात घेतले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती प्रेमाची भुकेली असतेच पण वासना आणि प्रेम ह्यात फरक आहे. राहू वासनेचा कारक आहे ,भोगांचा कारक आहे , निर्व्याज्ज प्रेमाचा नाही त्यामुळे आपण कश्यात अडकतो आहोत ह्याचा विचार त्रिवार केला पाहिजे . राहू माया आहे. शुक्र राहू युती फसवणूक होणारी , भावनेच्या आहारी जाणे म्हणजे आयुष्य भरकटत जाणे . 

मोहात अडकवणारे अनेक क्षण येतील पण त्यापासून परावृत्त करेल ती आपली उपासना . कुठल्या मार्गाने जायचे ते आपले आपण ठरवायचे . मन विचलित होण्यास वेळ लागत नाही पण तरीही आपणच आपल्या मनाला ब्रेक लावायचा आहे.

श्री सुक्त पठण , कुंजीका स्तोत्र , देवी सप्तशती आणि आपल्या कुलस्वामिनीचे स्मरण , कुंकुमार्चन , जमल्यास आपल्या ग्रामदेवतेचे शुक्रवारी दर्शन आणि नित्य सद्गुरू उपासना केल्यास हा काळ निघून जाण्यास मदतच होईल. 

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230  


Monday, 27 January 2025

सुखी सहजीवनाची ग्रहस्थिती

 || श्री स्वामी समर्थ ||


विवाह कधी होईल ,जोडीदार कसा असेल ह्या सर्व प्रश्नांपेक्षा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे माझे वैवाहिक सौख्य कसे असेल हा आहे . विवाहाच्या वेळेची स्थिती सर्वार्थाने तीच कशी राहील ? ती बदलत राहणार . आयुष्यात अनेक वळणे येणार आणि त्यातूनच एकमेकांना सावरत पुढे जात राहणार . बर्याच लोकांना उत्तम वैवाहिक सौख्य लाभते तर काहीना ह्यातून दुक्ख आणि निराशा पदरी येते. तडजोड करत विवाह टिकवणार्या लोकांची संख्या हि अधिक आहे. वैवाहिक सौख्य बघताना खालील गोष्टींचा विचार करुया.

विवाह हा अनेक कारणांनी केला जातो . अनेकदा सगळे करतात म्हणून , घरच्यांनी आग्रह केला म्हणून , मला स्वतःलाही जोडीदार हवा , सहजीवन हवे संसाराची आवड आहे म्हणून , अनेकदा घरात आईवडील वयस्कर आहेत त्यानाही बघायला कुणी नाही . पत्नी निवर्तली मग मुलांना कोण पाहणार म्हणूनही विवाह केला जातो . वरील सर्व कारणे ह्या ना त्या प्रकारे पटणारी आहेत . 

ज्योतिषीय ग्रहस्थितीचा विचार केला तर शुभ ग्रहांचा धन भाव आणि सप्तम भाव तसेच पंचम लाभ ह्या भावांवर असलेला प्रभाव सुखी जीवनाकडे वाटचाल करण्यास मदत करेल हे नक्की. सप्तम भाव हा प्रामुख्याने आपल्या जोडीदाराचा आणि दोघात असलेल्या मानसिक अनुबंधाचा आहे तिथे शनी मंगल राहू केतू उपयोगाचे नाहीत . तिथे चंद्र शुक्रासारखे सौम्य आणि ज्ल्तात्वाचे रसिक ग्रहच हवेत तरच संसाराची वेल बहरेल. 

अभ्यासकांनी खालील ग्रहस्थितीचा पत्रिका मिलनासाठी अवश्य अभ्यास करावा .


सप्तमस्थान – पापकर्तरी योगात आहे का ,कुठल्या ग्रहांच्या दृष्ट्या आहेत .

सप्तम स्थानातील ग्रह –ते कुठल्या ग्रहांच्या युतीत आहेत आणि कुणाच्या नक्षत्रात आहेत .सप्तमेश कुठे आहे आणि कुणाच्या दृष्टीत युतीत आहे. 

विवाहाचा कारक ग्रह शुक्र सगळ्यात महत्वाचा आहे . त्याची स्थिती लग्न कुंडली आणि नवमांश कुंडलीत अत्यंत महत्वाची आहे.

लग्न भाव आणि लग्नेशाची स्थिती अभ्यासा. लग्नेश आणि सप्तमेशाचे काय योग आहेत ते तपासा. 

सप्तम स्थानातील ग्रहांचे सप्तमेशाशी ,शुक्राशी आणि इतर ग्रहांशी होणारे योग.

पत्रिकेतील रवी चंद्र मंगल आणि शुक्र त्यांचे परस्परांशी योग आणि सप्तमेशाशी योग महत्वाचे आहेत .

सप्तम स्थानासोबर लग्नस्थान कारण ते सप्तमाचे सप्तम आहे, धनस्थान जे कुटुंब स्थान आहे. षष्ठ स्थान हे सप्तमाचे व्ययस्थान आहे आणि व्यय स्थान जे सप्तम स्थानाचे षष्ठ स्थान आहे.

थोडक्यात १ २ ६ ७ ८ आणि १२ ह्या स्थानांचा विचार आवश्यक आहे. २ ६ ८ १२ ह्या स्थानांमध्ये जर पापग्रह असतील तर वैवाहिक सौख्य चांगले मिळत नाही . 

स्त्रियांच्या पत्रिकेत रवी मंगळ तसेच पुरुषाच्या पत्रिकेत चंद्र शुक्र ह्यांचा अभ्यास केला पाहिजे . नवमांश पत्रिकेत ग्रहांचे बळ बघा त्याशिवाय निष्कर्ष काढू नका .

पत्रिकेतील इतर ग्रहस्थिती जसे पितृदोष ,कालसर्पदोष , वैधृती योग, विष्टीकरण.

सप्तमस्थान हे शुभ कर्तरी योगात असेल तर उत्तम . सप्तम स्थान जितके शुभ तितके संसार सुख आणि सहजीवन उत्तम .

सप्तम स्थानात चंद्र ,शुक्र हे  स्त्रीग्रह बलवान राशीत किंवा शुभ नक्षत्रात असतील.

सप्तमेश शुभ स्थितीत असेल ,लग्नात ,चतुर्थात ,पंचमात , सप्तमात , नवमात ,दशमात किंवा लाभात , स्व किंवा उच्च नवमांशात ,शुभ नक्षत्रात , मित्र ग्रहांच्या युतीत , दृष्टीत असेल तसेच सप्तमेश मार्गी असेल  तर वैवाहिक सौख्य चांगले मिळते . अश्या स्थितीत सप्तमेश हा बलवान होतो . 


सप्तमेशावर ,सप्तम स्थानावर ,शुक्रावर गुरूची दृष्टी असेल तर वैवाहिक सौख्य चांगले मिळते. 

लग्नेश आणि सप्तमेशाचा जर नवपंचम योग , लाभ योग ,राशि परीवर्तन योग असेल आणि लग्नेश बलवान असेल तर वैवाहिक सौख्य चांगले मिळते.

सप्तमेश , लग्नेश ,शुक्र ह्यांच्यासोबत शनी राहू मंगळ ह्यांचे शुभ योग होत असतील तर वैवाहिक सौख्यात अडचणी येत नाहीत.

२ ४ ६ ८ १२ ह्या स्थानात जर शुभ ग्रह असतील किंवा पाप ग्रह फारसे नसतील तर वैवाहिक सौख्य चांगले मिळते .

विवाह वेदीवर चढताना आपला हा विवाह हे आयुष्यातील सर्वोत्तम सुख आहे आणि काहीही झाले तरी मी ते टिकवणार हा दृढ निश्चय मनाशी करून विवाह केला तर समस्या येतील आणि जातील,  मार्ग मिळेल आणि संसाराची घडी सुद्धा निट बसेल. आयुष्यात सहजीवन महत्वाचे आहे . दोघेजण नुसते भाजी कोथिंबीर घ्यायला एकत्र गेले तर त्यात आनंद आहे कारण एकच “ ती दोघे एकत्र आहेत “ . सहवास सगळ्यात महत्वाचा आहे. बोलायला भांडायला सुद्धा आपलेच माणूस लागते . फार ताणून धरू नका. चिकित्सक वृत्ती शेवटी आपल्यालाच एकटे ठेवते . सर्व गुण संपन्न इथे कुणीही  नाही. प्रत्येक आईवडिलांनी एकदा आपल्या पाल्याला त्याचा चेहरा आरशात बघायला सांगावा त्यांची उत्तरे त्यांनाच आपसूक मिळतील.

प्रेमाची धुंदी काही काळाने उतरते आणि वास्तव समोर येते तेव्हा माहित नसलेल्या किंवा अपेक्षित नसलेल्या गोष्टी सुद्धा अचानक समोर येतत आणि त्या स्वीकारून पुढे जाणे म्हणजेच संसार . सहजीवनाचा आनंद सर्वात मोठा आहे आणि त्यासाठी थोडी तडजोड करण्याची वृत्तीही असावी , नाहीतर हे सर्व इथेच राहील वास्तवात कधीच उतरणार नाही. सर्वाना आपापल्या पसंतीचा जोडीदार मिळूदे आणि सर्वांचे सहजीवन स्वामींच्या कृपेने बहरत , फुलत राहूदे हीच सदिछ्या .

सौ. अस्मिता दिक्षित

संपर्क : 8104639230






Wednesday, 22 January 2025

कथा आणि व्यथा

 || श्री स्वामी समर्थ ||


काही दिवसांपूर्वी एका स्त्रीने द्वितीय विवाह बद्दल प्रश्न विचारला होता . द्वितीय विवाहाने सुद्धा कोर्टाच्या पायर्या चढल्या होत्या,  त्यामुळे तिच्या मनस्थितीचा अंदाज मी बांधला . त्या स्त्री जातकाने दोन पत्रिका आणल्या होत्या ज्या तिला विवाह संस्थेतून मिळालेल्या होत्या . त्या दोन्ही पत्रिकांमध्ये तशीच स्थिती होती म्हणजे दोघांचेही घटस्फोट तेही दोन वेळा . थोडक्यात त्या सर्वच पत्रिकां तृतीय विवाहाच्या होत्या. 

स्त्री ची पत्रिका बघितल्यावर मी तिला स्पष्ट सांगितले कि तुमचीच पत्रिका वैवाहिक सुख दाखवत नाही त्यामुळे अजून एखादा विवाह करून तुम्हाला आनंद मिळेल ह्याची खात्री नाही उलट संकटे वाढतील तेव्हा कश्याला सुखाचा जीव धोक्यात घालता . अर्थात त्यांचेही वय ५० कडे झुकणारे होते ,  अपत्य नव्हते . मी त्यांना म्हंटले विवाह करायचा आहे सर्व ठीक पण त्याही दोघांच्या पत्रिका वैवाहिक सुखाच्या नाहीत . त्यांचेही दोन विवाह मोडले आहेत त्याची खरी कारणे तुम्हाला  माहित आहेत का? नाही. 

कसे आहे एखादी मोठी महादशा असेल आणि ती वैवाहिक सुख देत नसेल तर त्यात पहिलाच नाही तर दुसरा तिसरा विवाह सुद्धा मोडण्याची शक्यता असते  . बुध एक घटना पुन्हा दर्शवतो त्यामुळे दुसरा विवाह होतो आणि पहिला मोडला तसा दुसरा सुद्धा मोडतो .हि शक्यता खूप असते.  कारण दशा स्वामीचीच संमती नसेल विवाह हि घटना घडवण्यासाठी  तर काय करणार . अनेकदा प्रथम विवाह मोडतो आणि दशा बदलते ती विवाहाला पूरक असते म्हणून द्वितीय विवाह होतो अर्थात त्यात वैवाहिक सुख मिळेलच ह्याची शाश्वती नसते पण विवाह होतो . विवाह हा नुसता वंशवेल वाढवण्यासाठीच होतो असे नाही तर घरगुती अनेक समस्या , आर्थिक मानसिक विवंचना असतात त्यासाठी  केला जातो. आपल्या जोडीदाराची साथ आवश्यक वाटते आणि ५० च्या आसपास तर नक्कीच असे वाटले तर त्यात चूक काहीही नाही. पण जीवाचा आटापिटा केला म्हणजे विवाह होत नाही तो नशिबात असायला लागतो . 

स्त्री जातकाला ह्या दोन्ही पत्रिका कश्या अनुकूल नाहीत हे सांगितल्यावर त्यांचा स्वर जरा उदास झाल्याचे मला जाणवले पण आहे ते स्वीकारायला पाहिजे .असो काही वेळाने त्यांनीच मला पुन्हा फोन करून मग आहे तोच दुसरा विवाह टिकवावा का? तो प्रयत्न केला तर टिकेल का? हा प्रश्न विचारल्यावर माझे मन खरच  हेलावले.  काहीही करून एकटे राहायचे नव्हते तशी मनाची तयारी नाही हे जाणवले आणि कशी असेल ? एकटेपणा तिला सहन होत नव्हता आणि तो दूर करण्यासाठीच पुन्हा विवाह हा पर्याय तिच्या मनाने स्वीकारला होता . पत्रिकेतील मनाचा कारक चंद्र सैरभैर झाला होता एकटा पडला होता आणि म्हणून कुणाची तरी साथ सोबत शोधत होता पण महादशा स्वामी सुखाची कुठलीच नांदी करताना दिसत नव्हता . दशा स्वामी विवाहाच्या साठी असणार्या नकारात्मक स्थानाचा अधिपती , शुक्र बिघडलेला हि स्थिती पुढे खूप वर्ष राहणारच जोवर दशा संपत नाही. दुर्दैवाने त्यांची पुढील दशा सुद्धा जवळपास अशीच म्हणजे विवाहाला अनुकूल नसणारी होती . कितीही वाईट असले तरी हे सत्य आहे आणि ते स्वीकारून पुढे जाण्यातच शहाणपण आहे. एकटेपणा कुणी स्वतःहून स्वीकारत नाही ती परिस्थिती अनेक कारणांमुळे आयुष्यात निर्माण होते . 

आज समाजात अनेकविध  प्रश्न आहेत पण त्यातील सगळ्यात मोठा प्रश्न जो भेडसावत आहे , अनेक आजार जन्माला  घालतो तो म्हणजे “ एकटेपणा “. कुणाची तरी साथ हवी , एकटे राहणे सोपे नाहीच आहे म्हणून विवाह करायची इच्छा मनात येते , आर्थिक नियोजन नसते किंवा ती बाजू सुद्धा डळमळीत असते अश्या अनेक गोष्टी आहेत . घराचे दार उघडून आपला एकट्याचाच चहा करा , जेवण करा तेही एकट्यानेच जेवा , घरात कुणी बोलायला नाही सगळे निर्णय स्वतःच घ्या , दुखले खुपले तर कुणी बघायला सुद्धा नाही, संवाद नाही , सहवास नाही  ह्या अनेक गोष्टी नुसत्या विचार करून सुद्धा त्रास देतात . ज्याचे जळते त्याला कळते म्हणतात ते खरे आहेच . वैवाहिक आयुष्याला पूर्णविराम म्हणजे अनेक वैचारिक आर्थिक मानसिक शारीरिक सर्व सुखाना जणू खिळ बसते. सगळ्या कटू आठवणी पाठ सोडत नाहीत आणि पुढे वाट दिसत नाही . 

तिचा विवाह करण्या मागील हेतू हा “ एकटेपणा दूर व्हावा “ हाच प्रामुख्याने होता कारण सुदैवाने आर्थिक सुबत्ता होती . . पण म्हणून कुणाच्या हि गळ्यात माळ घालून नवीन प्रश्न  आणि संकटांची मालिका सुरु करावी असाही त्याचा अर्थ नाही. थोडा वेगळा विचार करायला हवा. एकतर्फी विचार करून चालणार नाही. झालेल्या गोष्टींची पुनरावृत्ती झाली तर ? मुळात विवाह हीच आज समाजातील ज्वलंत समस्या आहे त्यात दुसरा विवाह करणे हे डोळस पणे करायला हवे हेच सुचवायचे आहे . 

अनेकदा आपल्या नशिबात वैवाहिक सौख्य नसते तेव्हा आपल्याला सांगून येणाऱ्या पत्रिका सुद्धा तश्याच असतात कारण त्यांच्याही पत्रिकेत वैवाहिक सुखाचा योग नसतो . शेवटी सगळ्यांना सगळे देवाने दिलेले नाही जे आहे त्यात आनंद मानायला शिकले पाहिजे . आहे हे सर्व असे आहे , महा कठीण आहे मान्य आहे पण जे आहे ते स्वीकारण्या शिवाय पर्याय सुद्धा नाही. जितके लवकर ते स्वीकारू तितक्या लवकर आपण  “ एकटे “ जगायला शिकू . आपण मुळात कुटुंब संस्था मानतो , एखाद्या कुटुंबात अनेक विध माणसांच्या गोतावळ्यात जन्म घेतो आणि आयुष्यभर ती नाती गोती जपत राहतो , त्यामुळे अचानक मनाच्या समीप असलेली व्यक्ती सोडून गेली कि येणारा त्या नात्यातील एकटेपणा सहज सहजी स्वीकारता येणे कठीण जाते , एखाद्या व्यक्तीची सवय होवून जाते त्यामुळे खूप काहीतरी गमावल्याची भीती सुद्धा मनाच्या कोपर्यात दडून असते. एकटे कशी किंवा कसा जगणार हा पहिला प्रश्न आपण नकारात्मक म्हणूनच स्वीकारतो आणि त्याच्या अन्य पेह्लूंच्या कडे बघायला आपले मन तयार नसते. 

एकटेपणा घालवण्यासाठी लग्न हा एकमेव पर्याय आहे हे आधी मनातून काढून टाकले पाहिजे . आपले आवडते छंद , अनेक सामाजिक संस्था ह्यात सहभाग घेतला तर आपला वेळ जायील मन कश्यात तरी गुंतून राहील. एकट्या राहणाऱ्या लोकांचे प्रश्न खरोखर गंभीर आहेत आणि त्यासाठी त्यांचे नातेवाईक , शेजारी आणि आप्तेष्ट ह्यांनी सुद्धा त्यांना सामावून घेतले पाहिजे.  तसेच आपल्याला इतर लोक सामावून घेतील असे वागणे आणि वृत्ती ह्या लोकांनी ठेवली पाहिजे . आपण तुसडेपणाने वागलो तर अजूनच एकटे पडण्याची भीती आहे. 

अनेकांचे अनेक प्रश्न असतात आणि प्रत्येकाने त्यातून मार्ग काढून आयुष्य जगायचे असते , पर्याय अनेक असतात पण ते शोधावे लागतात .शेवटी आपणही एकटेच आलो आहोत आणि एकटेच जाणार आहोत . सारख मी एकटा आहे मी एकटी आहे हे हे डोक्यातून काढून टाकले पाहिजे कारण कारण आपणच ते सतत मनावर बिंबवत असतो .  तसे पाहिले तर आपण सगळे एकटेच आहोत . सगळ्यांची तिकिटे काढलेली आहेत वेळ आली कि जो तो जाणार , त्यामुळे कुणाच्याही आयुष्याशी तुलना न करता जे आहे ते स्वीकारणे आरोग्य दायी सुद्धा ठरेल . सारखे एकटे आहे एकटे आहे हे गोंजारत बसण्यापेक्षा हि वस्तुस्थिती स्वीकारली तर आयुष्य सुकर होयील . 

आयुष्य अर्ध्यावर म्हणजे साधारण ५० च्या आसपास असताना जोडीदार नसणे हे कठीण आहे. संसार अर्ध्यावर आलेला असतो आपल्या एकटेपणाची जाणीव आपण सोडून कुणालाही नसते . मुल त्यांच्या विश्वात असतात आणि ते स्वाभाविक आहे. आपली मुले हा जोडीदारासाठी पर्याय असूच शकत नाही कारण ते नाते फक्त त्या दोघांचे असते . आर्थिक बाजू सांभाळावी लागते आणि हि सर्व कसरत करताना जीव मेटाकुटीला येतो म्हणून द्वितीय विवाह कदाचित ह्या सर्व बाबी सांभाळेल हा विचार करणे चुकीचे नाही पण तरीही तो झाला नाही किंवा आपल्या नशिबात तो नसेल तर ती ईश्वरी इच्छा समजून त्याच विचारात राहणे योग्य नाही. 

तिच्या प्रश्ना सोबत तिचे उत्तर होते . अजून एक विवाह हे तिच्या सर्व प्रश्नांचे उत्तर होते जे तिच्या दृष्टीने योग्य होते .  त्यापुढे तिचे विचार प्राप्त स्थितीत जाताच नव्हते , तरीही ते नवीन विवंचना देणारे होते हे नक्की. अनेक प्रश्नांना “ काळ आणि वेळ “ हेच उत्तर असते . अशी कुठलीही परिस्थिती नाही त्यातून देव आपल्याला मार्गस्थ करत नाही . 

आज अनेक पत्रिका येतात ज्यांचे विवाहच झालेले नाहीत . आई वडिलांना चिंता असते आपल्यामागे आपल्या अपत्याचे कसे होणार ?? आणि हा विचार चुकीचा नाही त्यांना काळजी असणे स्वाभाविक आहे . पण जे आहे ते आहे. शेवटी जगी सर्व सुखी असा कोण आहे ? हे सत्य आहे. 

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230



 



Sunday, 19 January 2025

प्रेमा काय देऊ तुला ??

 || श्री स्वामी समर्थ ||





माझ्या पत्रिकेत प्रेम विवाहाचे योग आहेत का ? असा प्रश्न अनेक जातकांच्या मनात येतो. प्रेम फुलते ते पंचमात आणि त्याची परिणीती होते ती सप्तमात . पंचम भाव प्रेम आणि सप्तम विवाह. पंचमेश आणि सप्तमेश युतीत असतात किंवा एकमेकांच्या दृष्टीत असतात , अनोन्य योगात असतात तेव्हा प्रेमविवाहाची शक्यता अधिक असते. शुक्र मंगळ युती सुद्धा प्रेम विवाह सूचित करते . पण ह्यावर सूर्य राहू शनी ह्यांचा प्रभाव असेल आणि ह्या ग्रहांचा षष्ठ भावाशी संबंध आला तर पुढे जावून विवाह सुखाचा होत नाही. 


आजकालची मुले मुलीला पसंत करतात त्यांना विचारले कि मुलगी का आवडली तर चेहरा मक्ख करतील कारण उत्तर त्यांनाच माहित नसते . आवडली हा शब्दच मुळी ह्या वयातील असणार्या नैसर्गिक भिन्न लिंगी आकर्षणं ह्याच्याशी बहुतांश निगडीत असतो . अर्थात ते स्वाभाविक आहे. मनाने त्या दोघांचा मधुचंद्र सुद्धा झालेला असतो ,चित्रपट सृष्टीचा प्रचंड पगडा जनमानसावर आहेच कि .पण दिसणे , बाह्य रूप आणि संसार ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत .शारीरिक आकर्षण आणि क्षणाचे प्रेम ( भासमान असते )हवेत विरून जाते ते समजत सुद्धा नाही .म्हणूनच वास्तव स्वीकारून विवाह केलेला उत्तम .

मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे आणि तो माणसांशिवाय जगु शकत नाही . एकांत वगैरे फक्त बोलायच्याच गोष्टी आहेत. प्रत्यक्ष आयुष्य जगताना प्रेम नसेल तर आयुष्य भकास , निरस होते . माणूस प्रेमाचाच भुकेला आहे .  दोन गोड शब्द त्याच्या आयुष्यात प्रेमाचा रंग अधिक गडद करतात . कुणीतरी आपले आहे आणि आपल्यासाठी जगत आहे हि भावना सुद्धा जगायला कारणीभूत ठरते . 


पत्रिकेतील पंचम भाव प्रेम निर्देशित करणारा आहे. आपल्याला आयुष्यात मिळणारे प्रेम पंचमाशी निगडीत आहे. प्रेम हे फक्त प्रेयसीचे असते असे नाही आई बहिण  सुद्धा प्रेम करते , आपले मित्र मंडळी , आप्तेष्ट सर्वांचा ह्यात वाटा असतो. ह्या सर्वांकडून आपल्याला किती प्रेम मिळणार ते सांगणारा हा भाव खास आहेच . 

आपल्याला एखाद्याबद्दल प्रेम वाटते म्हणजे नेमके काय वाटते ह्याचा एकदा स्वतःशीच विचार केला पाहिजे . प्रेमाला वय नाही ते कधीही कुणाही बद्दल वाटू लागते . प्रेम हि मनाच्या कोपर्यातील अत्यंत नाजूक साजूक कोमल अशी संवेदना भावना आहे जी अनेकदा अव्यक्त राहते . एखादी व्यक्ती आपल्याला आवडते आणि त्या व्यक्तीबद्दल आपल्याला प्रेम आहे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. आजकाल सगळे १० -१२ तर कार्यालयाच्या ठिकाणी एकत्र असतात म्हणून काय लगेच एकमेकांबद्दल प्रेम वाटत नाही . सहवासाने एकमेकांबद्दल वाटणारी सहानुभूती काळजी म्हणतात येयील पण प्रेम नाही आणि  जर अनेकांच्या बद्दल तेच प्रेम वाटू लागले तर त्याला कदाचित विकृती म्हणावी लागेल. असो

सहवासाने सुद्धा प्रेम निर्माण होते पण ते निर्व्याज्ज असते . कुठल्याही अपेक्षे शिवाय वाटणारे केलेले प्रेम हे परमेश्वराची देण आहे. किती जणांच्या नशिबात असते ते .  प्रेम आणि आकर्षण ह्यातील गल्लत अनेकदा आपली आपल्यालाच समजत नाही. आकर्षण क्षणिक असते . एखादी व्यक्ती आवडते म्हणजे जर ते शारीरक आकर्षण असेल तर ते टिकणार नाही कारण आपण सतत बदलत असतो कायम आपण तसेच राहणार नाही.म्हणून फक्त त्यासाठी वाटणारे प्रेम कालांतराने विरून जायील. प्रेमाचे पदर उलगडत जातात , भेट नाही झाली तर वाटणारी हुरुहूर काळजी हे प्रेम नक्कीच असते आणि त्याचा कौल आपले मन आपल्याला योग्य वेळी देतेच. आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल नक्की काय वाटते ते समजायला आपल्याला सुद्धा वेळ लागतो . अनेकदा एखाद्या व्यक्ती सोबत आपल्याला आपले मन मोकळे करावेसे वाटते , एखाद्या प्रश्नाबद्दल मत जाणून घ्यावेसे वाटते , आपल्या मनातील जे जे आहे ते तिला सांगितल्याशिवाय चैन पडत नाही . खूप आधार वाटत असतो त्या व्यक्तीचा आपल्याला मग ती कुणीही असो सखा किंवा सखी ,पण ते प्रेम नसते , हे एक विश्वासाचे नाते असते , कुणीतरी आपले जवळचे ज्या मुळे आपल्याला मानसिक आधार मिळतो आणि एकटे वाटत नाही पण ते प्रेम नसते आकर्षण सुद्धा नसते. ते अनुबंध सगळ्याच्या पलीकडे असतात , जगण्याचे बळ मात्र नक्कीच देतात . खरतर प्रेमाच्या छटा इतक्या आहेत कि आपणच त्या ओळखू शकत नाही . 

परवा माझ्याकडे दोन पत्रिका गुण मिलनासाठी आल्या. मुलाने घरी सांगितले विवाह करीन तर हिच्याशीच करीन . पत्रिका जुळत नव्हत्या . मुलीची षष्ठ भावाची दशा. एक दोन भेटीचा परिणाम “ लग्न करीन तर हिच्याशीच “ इथवर गेलेला . पालकांनी तरी काय करायचे सांगा . बघण्याचा कार्यक्रम झाला आणि बोलताना मुलामुलींचे एकमेकांशी जमणे कठीण आहे हे त्याच दोघांना समजले आणि तो प्रेमाने ओथंबलेला अध्याय तिथेच थांबला . मग हे नक्की काय होते ???? प्रेम करा पण ते निभावता  सुद्धा आले पाहिजे .  प्रेम विवाह करणाऱ्या त्या दोघांनीही पत्रिकेचे वाचन जाणकार ज्योतिषाकडून करून घ्यावे हे आवर्जून आज सांगावेसे वाटते. विवाह करायचा ठरवलंच आहे तर नक्की करा पण पुढील वाटचाली मध्ये येणार्या चढ उतारांची तोंड ओळख सुद्धा करून घ्या. 

प्रेम हि एक मनाची अवस्था किंवा भावना आहे आणि त्यासाठी प्रेम विवाहच केला पाहिजे असे नाही . दोन भिन्न व्यक्तींचे सुद्धा विवाह पश्च्यात एकमेकांशी इतके  बंध जुळतात कि त्यांचा जणू प्रेम विवाहच वाटावा . आंतरिक प्रेम दीर्घकाळ टिकते , एकदा माणूस आपला म्हंटला कि सर्व चांगल्या वाईट गुणांसकट जो स्वीकारतो तोच खरे प्रेम करू शकतो . आयुष्यातील सगळ्या लढाया एकत्रित लढायची ताकद देणारे हे प्रेम संघर्षाला सामोरे जाते तेही न घाबरता , पण आपल्या जोडीदाराचा हात कधीच सोडत नाही . प्रेमाची व्याख्या हि आपणच करायची असते . पैसा आहे म्हणून प्रेम आहे कि त्या व्यक्तीच्या गुणांवर प्रेम आहे. जमीन जुमला आहे म्हणून प्रेम आहे कि बाह्य रूपावर मी फिदा आहे हा अभ्यास आपला आपणच करायचा आहे. आपण त्याच्या घरच्या मंडळींवर सुद्धा  तितकेच प्रेम करणार का कि फक्त त्याच्याच भोवती प्रेम आहे प्रेम आहे म्हणून पिंगा घालणार . 


विवाह हा त्या दोघांचा असला तरी दोन कुटुंबांचा सहभाग असतो त्यामुळे विवाहानंतर त्या प्रेमात अनेक वाटेकरी येतात. आपण काल परवा प्रेम केलेला आपला जोडीदार त्याच्या आईने २८ वर्षापूर्वी जन्माला घातला आहे त्यामुळे तिचे आई म्हणून किती प्रेम असेल ह्याचा अंदाज यायला हवा . उद्या आपणही आई होणार तेव्हा  आपणही आपल्या मुलावर असेच अमर्याद प्रेम करणार हे समजून घेता आले पाहिजे. इथे प्रेमाचे स्वरूप बदलले तरी भावना त्याच आहेत . हे समजले नाही तर प्रेमाच्या रंग बेरंग होण्यास वेळ लागणार नाही. प्रेमाच्या अनेक छटा आयुष्याच्या विविध टप्प्यांवर बघायला अनुभवायला मिळतात आणि त्या त्या वेळी त्यातील आनंद  घेता आला पाहिजे जसे एक मुलगा म्हणून पुढे जोडीदार मग बाप आणि आयुष्याच्या संध्याकाळी आजोबा म्हणून प्रेमाचे रंग अनुभवणे हेच तर आयुष्य आहे. ह्यातील प्रेत्यक नात्याचे प्रेम वेगळे आणि त्याचा रंग सुद्धा . त्याची भेसळ केली तर आयुष्य रंगहीन होवून जायील. प्रत्येक रंग आपापल्या ठिकाणी योग्य आहे म्हणून त्याची तुलना नको. 

म्हणूनच पुन्हा सांगावेसे वाटते कि प्रेम विवाह करताना सुद्धा विचार पूर्वक करावा. शेवटी दोन्हीकडील पालकांना तुमचा बहरणारा संसार बघायचा आहे दुसरे त्यांना काहीच नको आहे. त्यात त्यांना जमतील तसे रंग तेही भरू पाहत आहेत ते स्वीकारा आणि आयुष्याचा संसाराचा आनंद लुटा . हे सारे वेळीच समजून घेतले नाही तर प्रेमाचे हे सुरवातीचे गडद रंग मग फिक्कट होत जातात आणि कालांतराने दिसेनासे सुद्धा . आपले एकटे पण घालवण्यासाठी लोक आधार शोधत राहतात आणि त्यालाच प्रेम समजण्याची गल्लत करू लागतात , अशी गल्लत झाली तर मानसिक व्यथा निर्माण होईल हे नक्की. आपल्या प्रेमाच्या भावना निदान आपल्या पुरत्या तरी सुस्पष्ट असाव्यात म्हणजे सगळेच सोपे होईल. एखाद्याबद्दल मनापासून प्रेम असणे आणि आयुष्यभर त्या समोरच्या व्यक्तीला कळूही न देता अपेक्षा विरहित प्रेम करत राहणे हि उच्च कोटीची भावना आहे आणि त्याला माझा प्रणाम .

विवाह सगळ्यांचेच होतात पण ते किती टिकतात , यशस्वी होतात हे महत्वाचे आहे  आणि म्हणूनच प्रेमाची गोडवे म्हणणे वेगळे आणि संसार करणे वेगळे .तसे नसते तर कित्येक वर्ष एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले प्रेमी लग्नानंतर चहा कोण करणार , कपडे कोण वाळत घालणार ह्यावरून तू तू मै मै करणार नाहीत . सासू सासरे सुद्धा वर्षभर इतके कोडकौतुक करतील सुनेचे आणि नंतर काही काळ गेला कि तिला नावे ठेवतील . असे कसे होवू शकते ह्याचे उत्तर कुणाला सापडले तर द्या नक्की . प्रेयसी पत्नी झाली कि सगळेच बदलते आणि ते जितके लवकर स्वीकारता येयील तितकी संसाराची गोडी वाढेल, अन्यथा... 

प्रेमाच संबंध वरती उल्लेख केल्याप्रमाणे पंचम भावाशी येतो जे आपले पूर्व कर्म आहे. आपल्या गत आयुष्यातील कर्माप्रमाणे पंचम भाव फुलणार आहे . प्रेम हि भावना जगायला आणि उध्वस्त होण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरू शकते  . आयुष्यातील प्रत्येकाच्या प्रेमाचा आदर करायला शिकले पाहिजे . तुम्हा आम्हा सर्वांच्या आयुष्यात खरी प्रेम करणारी माणसे मिळोत .  आज चंद्राचेच नक्षत्र आहे ज्याच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या आयुष्यातील प्रेमाचा वसंत असाच बहरत राहूदे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना 

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230


शनी आणि कर्म

 || श्री स्वामी समर्थ ||

शनी हा कर्माचा कारक आहे , शनीच्या सोबत असलेले ग्रह किंवा शनीपासून 5 किंवा 9 व्या भावात असलेले ग्रह आपल्या नोकरी व्यवसायाचे स्वरूप दर्शवतात . ह्या सर्व भावात एकही ग्रह नसेल तर शनीपासून 10 व्या भावातील ग्रह आपले करीयर निश्चित करेल . 

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230

Tuesday, 14 January 2025

साम्राज्य फक्त त्याचेच

 || श्री स्वामी समर्थ ||



आकाशातील तारकांकडे बघताना सुखद अनुभव येतो , शीतल चांदणे कुणाला आवडत नाही , त्यात लुकलुकणारे आणि आपले अस्तित्व युगांनु युगे अबाधित ठेवणारे लहान मोठे तारे सुद्धा आपल्याला खुणावतात . आपल्या प्रेमाचा आपल्यावर वर्षाव करत आपले आयुष्य सुखकर , जगणेबल करतात . 

ह्या तार्यांचे किंवा ग्रहांचे आपल्याशी गूढ नाते आहे तेही अनेक जन्मांचे . आपली सगळी गुपिते त्यांना ठाऊक असतात बरे का . आपण कुट कुट काय काय केल हाय ते सार काही ठाव आहे त्यास्नी. वरून बघत असतात ना टकामका . असो.

रोज दिवस आणि रात्र आपण आपले कर्म करत असतो ज्याचा लेखाजोखा कुणीतरी ठेवत असतेच जे आपल्याला माहित नाही किंवा आपण कोण काय करणार आपले ? ह्या अविर्भावात वावरतो . बघू काय होईल ते असा आपला थाट असतो. 

गेले काही दिवस “ शनी आता मीन राशीत जाणार मग मेष राशीला साडेसाती ...” असा बागुलबुवा करणारे अनेक video येत आहेत ...सध्या तो कुंभेत आहे मग मीन राशीत आणि मग मेषेत असे तो आपले भ्रमण करताच राहणार . त्यात काय ? मेष राशीच्या लोकांनी अजिबात घाबरू नका खरतर ज्या ज्या गोष्टीना आपण घाबरतो त्या गोष्टी कधीही घडतच नाहीत हे येतंय का लक्ष्यात ? बिचारे शनिदेव काहीच करणार नाहीत उलट ह्या भीतीमुळे आजारी पडल आणि खापर आहेच मग शनिवार . 

त्या शनीला इतके बदनाम करून ठेवल आहे कि विचारू नका. असे काय घोडे मारले आहे त्याने तुमचे . अभ्यास केलात तर पेपर चांगला जाणार पण नाही केलात तर नापास किंवा मार्क कमी मिळणार आणि हाच तर शनी आहे. अगदी जन्मल्यापासून तुमच्या सोबत आहे. गुरु आंजारून गोंजारून सांगतो बाबानो नीट वागा पण त्याचे कोण ऐकतोय ...म्हणून मग शनीला यावे लागते तो काय चीज आहे हे दाखवण्यासाठी. प्रत्येकात काहीतरी चांगले वाईट हे असतेच पण अहंकार काबूत ठेवणे किती लोकांना जमते ? कुणालाही नाही हि खरी गोम आहे. १००० रुपये पगार वाढला तरी ताठ चालायला लागतो आपण. 

शनी मेष राशीत निचीचा होणार मग अधे मध्ये तो वक्री पण होणार . होऊदे त्यात काय , अहो व्हायलाच लागते त्याला कारण त्याला आपल्याला सरळ करायचे असते तेही अगदी सुतासारखे . आपण लई शाने समजतो स्वतःला . कायदा , अनुशासन आहे हेच दाखवण्यासाठी साडेसाती आहे. 

तुम्ही कसेही वागायचे आणि कुणी काही बोलायचे नाही असे चालणार नाही . मेष राशी हि प्रत्येकाच्या पत्रिकेत कुठल्या तरी भावात येणार , तुमच्या पत्रिकेत कुठेतरी शनी सुद्धा विराजमान असणार , हा शनी कसा आहे त्यावर सुद्धा अनेक निकष अवलंबून असतात . शनी मंगळ षष्ठ भावाचे कारक जरी असले तरी शनी षष्ठ भावात आजरपण देणारच , नाही कसे ? 

ज्योतिष हे अनुभव देणारे थोडक्यात प्रचीती देणारे शास्त्र आहे. राहूची दशा ज्यांची चालू आहे किंवा भोगून झाली आहे त्यांना विचार आयुष्यातील १८ वर्ष कशी गेली ते. स्वतः अनुभवल्याशिवाय ग्रह आपल्या पत्रिकेत काय फलीत देतात ते सांगता येणार नाही . तूळ लग्नाला शनी योगकारक , म्हणजे तो तुमच्या चुका पदरात घालेल असे नाही हे समजून घ्या. कुठल्याही राशीचा , जातीचा , धर्माचा माणूस असुदेत . चूक झाली कि केस शनीकडे जाणारच जाणार .

गुरु व्यय भावात आहे म्हणजे लगेच विमानात बसणार का तुम्ही अमेरिकेला जायला . असे नाही कदाचित दवाखान्याच्या फेर्या सुद्धा होतील .असे आहे सर्व. हा अभ्यास खूप सखोल आहे .

आपल्याला शनीचा धाक आहे हे जरा बरेच आहे . माझे कोण वाईट करणार मी बेताल वागणार . ह्याला कुठेतरी लगाम आहे शनीमुळे . शनी राहू युती सुद्धा होते आहे आता एप्रिल मे दोन महिने . बघा आपापल्या पत्रिका  तपासा आणि बघा मीन राशी कुठे आहे? आणि तिथे होणारी हि युती काय फळ देयील ? 

आपली कर्म आपल्यालाच सांभाळायची आहेत ती सांभाळली आणि उपासनेची जोड दिली तर खरच कुणीच आपले काहीच वाईट करणार नाही. ताप आला कि आपण औषध घेतो ना अगदी तसेच साडेसाती पनवती जे काही असो अथवा नसो . रोज चार वेळा जेवतो न आपण मग निदान एकदा तरी देवाचे नाव घ्या कि. 

मी साधना काय करू???? असा प्रश्न सगळे विचारतात पण सांगितले कि करतात किती आणि तेही श्रद्धेने हे महत्वाचे आहे . आपल्या रुचा , वेद , स्तोत्र ह्यात प्रचंड ताकद आहे श्रद्धेने , मनापासून म्हंटली तर ती अनुभव देण्यास समर्थ आहेत हे नक्की . पण आपण सगळे उरकून टाकतो आणि म्हणूनच आपल्याला हवे ते फळ मिळत नाही. मनाची शांतता हरवून बसलेल्या ह्या आजच्या कलियुगात साधनेची किती आवश्यकता आहे हे मी वेगळे सांगायला नको . 

आपल्या देशात येवून पाश्चिमात्य लोक योग , साधना , मेडीटेशन शिकत आहेत त्यावर Ph.D. करत आहेत पण आम्हाला  साधे सूर्याला अर्घ्य घालायला सांगा तेही जमत नाही. 

शनी मेषेत जावूदे नाही तर सिंहेत ह्या सर्वाला कोण घाबरेल ? ज्या व्यक्तीला आपण काय काय केले आहे ते माहित आहे तो घाबरेल. कर नाही त्याला डर कश्याला ??? चुका होतात माणसाकडून पण त्याचे परिमार्जन करता आले पाहिजे मुळात त्या मोठ्या मानाने स्वीकारता आल्या पाहिजेत . 

आजूबाजूला इतके विद्वान इतक्या अहंकाराने माज करताना बघताना असे वाटते , जेव्हा शनी कडे ह्यांची केस जायील तेव्हा काय होईल. शनी विकलांग करून ठेवतो शरीराने आणि मनाने सुद्धा . शनीकडे पत्रिकेतील १० ११ भाव आहेत म्हणजे गुडघे आणि त्याखालील भाग . शनी वाताचा कारक हाडे सुद्धा .  त्याच्यासमोर कुणाचे चालणार म्हणा . तिथे ओळख चालत नाही आणि पैसा तर अजिबात काम करणार नाही उलट शिक्षा वाढेल .

शनी कुठल्याही राशीत असो , त्याचे साम्राज्य आणि अस्तित्व दोन्ही अबाधित आहे .  आयुष्याच्या संध्याकाळी काही नको वाटते . नुसते शांत बसावे आणि नेमकी हीच शांतता आज आपण घालवून बसलो आहोत .

आपण जेव्हा प्रचंड चिंता करतो ना जसे  नोकरी मिळेल का? मुलाचा विवाह कधी होईल ? विसा अडकला आहे , जागा विकली जात नाही अश्या अनेक प्रापंचिक चिंता आपल्या जीवाला लागतात म्हणजेच आपल्या सद्गुरुंवर आपला विश्वास नाही असाच त्याचा अर्थ घ्यायचा का . आपण सतत चिंता करणे हा त्यांचाही अपमान आहे. ते म्हणतील रोज इतकी फुले वाहते.  हि आरती ती आरती आणि पुन्हा चिंता करते मग मी कश्याला आहे?  एकदा त्यांच्या शाळेत नाव घातले कि ते सांगतील ते , जे करती ते आपल्या भल्यासाठी असेल ह्यावर आपली श्रद्धा हवीच हवी . 

शनी ह्या राशीत कि त्या राशीत करत निष्फळ वेळ घालवण्यापेक्षा बसण्यापेक्षा हनुमान चालीसा म्हणा , जसा वेळ मिळेल तसा २४ तासात कधीही म्हणा पण म्हणा . मुर्खासारखे प्रश्न विचारणे कायमचे बंद करा आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण सत्कारणी लावा . पोळ्या करताना सुद्धा श्रीराम जयराम आपण म्हणून शकतो .इंस्ता , सोशल मिडिया आपल्याला गुरूंच्या पासून दूर नेणारा राहू आहे .त्याला ओळख आणि वेळीच दूर ठेवा . पूर्वी कुठे होते हे सर्व जीवन किती वेगळे होते सगळे कुटुंब एकत्र जेवायचे , मनात आणले तर सर्व पूर्वीसारखे करू शकतो आपण . असो आजचा विषय शनी आहे.

सिंह राशीला शनी आठवा येत आहे तेव्हा त्यांनी आवाज आता बंद ठेवा. मी असा आणि मी तसा खूप झाले , नाहीतर भोगा मग शिक्षा . अनेकदा उत्तम कर्म करतो आपण पण त्याचाही आपल्याला अहं येतो . काही चांगले काम केले तर करा आणि सद्गुरुचरणी ठेवा . मी सुद्धा लेखन करते आणि महाराजांच्या चरणाशी ठेवते आणि पुढील लेखाकडे वळते . महाराजांची इच्छा असेल ते वाचतील . आपण मागे वळून बघायचे नाही म्हणजे अहं येणार नाही . अगदी तसेच रात्री झोपताना सगळे दिवसभर मिळवले ते त्यांच्याच चरणी ठेवा म्हणजे आपल्याकडे अहंकार करायला काही उरणारच नाही .

ग्रहांना त्यांचे काम करुदे आपण आपले करुया . साधना , उपासना , योग , प्राणायम , दानधर्म आणि उत्तम कर्म हीच आजच्या सुखी आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. दुसर्याला आनंद देता नाही आला तर निदान दुक्ख तेरी देवू नका . चांगले बोलता आले नाही तर वाईट बोलू पसरवू नका . इर्षा , असूया , मत्सर , द्वेष आपल्या मनाला पर्यायाने शरीराला लागलेली कीड आहे ती वेळीच झटकून टाका . द्वेष करून काय मिळणार जो तो आपापल्या कर्माचा धनी आहे . आपण आपल्या स्वतःच्या जीवनाकडे रोज त्रयस्त दृष्टीने बघावे खूप काही शिकायला मिळेल .... 

शनी आहे आणि वेळोवेळी आपल्याला त्याचे अस्तित्व तो दाखवून देत असतोच . एका क्षणात आयुष्य बदलते , होत्याचे नव्हते होते , सकाळी भेटलेला माणूस दुपारी ह्या जगातच नसतो , विस्मयचकित , अचानक आणि अभद्र घटना घडतात आणि आपली मती गुंग होते . शनी जागेवर बसवून ठेवतो . अपंगत्व हे मन आणि शरीर पोखरते . आपल्या हातात काहीच नाही , ना  कधी होते ना भविष्यात कधी असणार आहे. आपल्या हातात आहे ते उत्तम कर्म करणे  हे समजले तरी शनी समजला असे म्हणायला हरकत नाही . 

ओम शं शनैश्चराय नमः

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


Sunday, 12 January 2025

व्यर्थ करीशी चिंता

 || श्री स्वामी समर्थ ||


अनेकदा ज्योतिषाला काय विचारावे ह्याचा सारासार विचार सुद्धा प्रश्नकर्ता करत नाही. एकदा ज्योतिषी आपल्या तावडीत सापडला कि प्रश्नांची जणू सरबत्ती चालू होते. शास्त्र सांगते कि समस्या निर्माण झाल्याशिवाय प्रश्न विचारू नये . असो . 

एका स्त्रीने तिच्या बाळाचे नामकरण करण्यासाठी आद्याक्षर काय ठेवावे हे विचारले . तेव्हड्यावर समाधान नाही पुढे अनेक प्रश्न . त्या चिमुकल्या बाळाने नीट डोळे उघडून जग सुद्धा पहिले नाही त्याबद्दल प्रश्न येतातच कसे? एखादी शांत लागली असेल तर ती करायची कि नाही हा प्रश्न अगदी योग्य . असो अनेकदा इतर कुणीतरी सांगितलेले आपल्याला विचारात राहतील. ज्याने सांगितले त्याला विचारा . काय बोलावे समजत नाही . आजकाल ज्योतिष हा खेळ झालाय . स्वस्त आणि मस्त असे दुर्दैवाने म्हणायची वेळ आलेली आहे. कमीतकमी डझन भर ज्योतिषांकडे जाण्याची सवय ( सगळेच नाही काही अपवाद निश्चित आहेत ) आणि दिलेल्या मानधनात जणू काही ज्योतिषाला विकत घेतल्याच्या अविर्भावात प्रश्नांची सरबत्ती .

शास्त्र आपल्या जागी आपण आपल्या जागी .त्याचा योग्य वेळीच उपयोग करा त्याचा खेळ किंवा बाजार प्रश्नकर्त्या ने किंवा शास्त्र जाणणाऱ्या व्यक्तीने सुद्धा कधीच करू नये . 

ज्योतिष ज्योतिष सारखे केले तर जगण्यातील आनंद निघून जातो . मला अनेकदा फोन येत असतात “ ताई आता मंगळ मिथुनेत वक्री होणार माझ्या सप्तमात मग कसे होईल माझे ? , आता शनी षष्ठात मग मी आजारी पडेन का? अरे काय चाललाय . डोक्यातून मंगळ राहू काढून टाका ते शत्रू नाहीत आणि मित्रही नाहीत . काही झाले कि साडेसाती आणि काहीही वाईट झाले कि पकडा त्या शनीला हे आता पुरे झाले. ग्रह तुमच्याच कर्माची फळे देत आहेत . आपल्या कर्माची फळे मिळण्यास ग्रह हे नुसते मध्यम आहे तेव्हा काही चांगले किंवा वाईट झाले तर ग्रहांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही ती तुमचीच कर्मे आहेत मग ती खूप चांगली किंवा वाईट असोत . आपली कर्म सांभाळा ती सांभाळली तर शनी सुद्धा दाता आहे. पण आपल्याला काहीच करायचे नाही नुसते उपाय सांगा करायचे आणि मुंडी हलवायची पण जागचे उठायचे नाही . हवे तर तो मारूतीच येयील आपल्या दर्शनाला आपल्या घरी अश्याच अविर्भावात वावरलो तर पदरी काय पडणार आपल्या ? सुख तर नक्कीच नाही . बघा विचार करा .

आपण फार साधी माणसे आहोत त्यामुळे मस्त जगा. आपले स्वामी आहेत आपल्याला अखंड सांभाळत आहेत . ज्योतिष हा चाळा झालाय अनेकांसाठी . उद्या भाजी कुठली करू ? आज पिठले करू का? नाही आज गुरुवार आहे पिवळा पदार्थ करू का ? हे विचारायला सुद्धा फोन नाही आले म्हणजे मिळवले. 

परमेश्वराने इतके सुंदर जीवन आपल्या पदरात टाकले आहे आणि रोजचे २४ तास . भरपूर वाचन , लेख, व्यायाम , रोजची घरातील नित्याची कामे आणि साधना आणि प्रामाणिक कष्ट करत जीवन व्यतीत केले तर काहीही कमी पडत नाही आणि शेवटी आपले भोग आहेत  ते कुणालाही चुकले नाहीत . पण उगीचच सतत च्या व्यर्थ चिंता करून आजचा अनमोल क्षण जगायचा राहून जातोय त्याचे काय . 

कश्याला चाचपडत बसायचे सारखे त्या भविष्यातील अंधारात , उलट आपल्या कर्तुत्वाने , चांगल्या कर्माने तो अंधार दूर कसा होईल हे पाहण्यासाठी  उत्तम काम करा आणि वर्तमानात जगा. अनेकदा आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्या स्वप्नवत ठरतात म्हणजे त्या प्रत्यक्षात घडतच नाहीत त्या आपल्या कल्पनेतच घडतात फक्त . समजतंय का ? उगीच मुलगा १० वीत आहे आणि त्याचे लग्न होईल ना नीट , त्याची बायको कशी असेल असे प्रश्न सुद्धा मनात येतात कसे ह्याच आश्चर्य वाटते मला. येणारे बालक त्याचे भाग्य घेवून जन्माला आलेले आहे . अनेकांना आज मुल होत नाही पण तुम्हाला झाले आहे. आज तुम्ही आई झालेल्या आहात आणि ते परम सुख आहे त्याचा आनंद घ्या , त्या चिमुकल्याच्या बाळाच्या बाळलीला त्यात रममाण व्हा कारण हे सुखाचे दिवस परत मिळणार नाहीत अनुभवायला . मुल पटकन मोठी होतात म्हणून त्याचे लहानपण त्याच्या सोबतीने अनुभवा आणि हे क्षण जपून ठेवा .

आयुष्यातील प्रत्येक क्षण खरच अनमोल आहे आणि तो तुमचा आहे, त्याचा आनंद घ्या , इतर चिंता व्यर्थ आहेत ...इतकेच सुचवावेसे वाटते.

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 


Tuesday, 7 January 2025

आधुनिक विवाहाला पगाराचे मोजमाप ( पैशाच्या तराजून विवाह तोलण्याची गल्लत आपण करत आहोत .)

 || श्री स्वामी समर्थ ||


आजकाल अक्षरशः डोकेदुखी झालेल्या “ विवाहा “ बद्दल दोन शब्द . मुलाचा फोटो नंतर त्याचे संस्कार गेले चुलीत ,त्याचा पगार किती तो आधी बोला अशी परिस्थिती सध्या आहे. मुलाचे आईवडील आपल्या मुलासाठी स्थळ शोधणार तरी कसे कारण मुलींचे पोतेभर पगार आणि अवाजवी अपेक्षा ह्यामुळे हताश झाले आहेत . आजकाल मुलींचे पगार भरमसाट अर्थात कर्तुत्वाने मिळवलेले ( पण तेच आज लग्नाचा मोठा अडथला होवू पाहत आहेत ) आणि आणि मला १० लाख पगार मग मला २० लाख पगार असलेला मुलगा हवा किंवा त्या पेक्षा अधिक हवा . संसार ह्या शब्दाचा अर्थच कुठेतरी हरवत चालला आहे . आधीचे ते कांदेपोहे बरे म्हणायची वेळ आली आहे. अरे काय चाललाय काय ?????

भानावर या लवकर नाहीतर त्या २० लाखांच्या नोटांशी विवाह करावा लागेल. पैशावर प्रेम केलेत तर तेच मिळेल , आयुष्यभर पैसा मिळत राहील सुख सुविधा मिळतील पण नवर्याचे प्रेम मिळणार नाही . कारण हाच पैसा मिळवायला स्वतःचे so called status जपायला तो घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा कॉम्पुटर घेवून काम करत राहील आणि जगणेच पर्यायाने सहजीवनाचा आनंद गमावून बसेल. 

लवकर भानावर या नाहीतर मुलांचे /मुलींचे विवाह आपल्या उभ्या हयातीत पाहायला मिळणार नाहीत . हे ऐकायला आणि वाचायला त्रासदायक आहे पण त्रिवार सत्य आहे आणि हे चित्र आपणच बदलू शकतो . 

परवा एक मुलगी पगार ३ लाख तिला हवा नवरा १० लाखाचा . तिला मी म्हंटले अग तुला आणला तुझ्या मनासारखा १० लाखाचा बहुला पण तो स्वीकारेल का तुला ? तो म्हणेल मला हवी १० लाखाची बाहुली त्याचे काय करणार आपण ? आपण काय आहोत आणि काय अपेक्षा करत आहोत ह्याचा कुठेही ताळमेळ नाही . एकतर मुलगा पुण्यातील हवा नाहीतर थेट अमेरिका .अग्गोबाई ???? मध्ये काही नाही कि काय . मध्ये काय सगळी वाळवंट आहेत कि काय ? आपण स्वतः सदाशिव पेठेतून बाहेर आलो नाही आणि जायचे ते थेट अमेरिका . असो .

माणूस पैसा मिळवायच्या मागे लागला कारण ऐहिक स्खासाठी तो आवश्यक आहे अगदी मान्य पण जेव्हा पैसा हाच विवाह ठरण्याचा निकष लागतो तेव्हा गणिते बदलत जातात . माझ्या वर प्रेम करणारा , मला माणूस म्हणून समजून घेणारा , माझ्या आवडी निवडी माझे छंद ह्यांना प्रोत्चाहन देणारा असा नवरा हवा असे एखाद्या तरी मुलीने म्हणावे . सतत पैशाचा चष्मा लावून बसलात तर असंख्य आनंदाच्या क्षणांना मुकाल आणि भानावर याल तेव्हा वेळ नुघून गेलेली असेल. 

मुलीला १० लाख पगार म्हणून अनेक त्याही पेक्षा कमी पगार असणारी स्थळे नाकारायची मग उरणार काय ओंजळीत सगळच वाहून जायील. मुळात पैसा हा विवाहाचा निकष हे समीकरण न पटणारे आहे . स्त्रियांना शिकवले त्यांच्या पायावर उभे राहण्यास त्यांना आचार विचारांनी स्वावलंबी केले हे कुठे चुकले कि काय पालकांचे ? नाही काहीच चुकले नाही पण चुकत आहेत ते ह्या गोष्टीना अवास्तव महत्व दिल्यामुळे . मुलींची वय सुद्धा ३५ शी ओलांडत आहेत . मला ८ लाख पगार आहे आणि मुलालाही तितकाच किंवा अगदी एखादा लाखभर कमी असला तरी चालेल . दोघांचे  होतात कि १५-१६ लाख त्यात संसार सुखाचा नक्कीच होईल . आपल्या आईवडिलांनी नाही का केला त्यांना कुठे होते लाखांनी पगार . पण त्यांचा विवाह संस्था , सहजीवन ह्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता .

आज त्यांचाच तो सहजीवनाचा आनंद देणारा चष्मा पुन्हा एकदा डोळ्यांना लावायची नितांत गरज आहे.  पुढे जावून आता पालकांनी सुद्धा आपली धोरणे थोडी बाजूला ठेवून मुलामुलींशी बोलले पाहिजे , आजकालची मुले हुशार आहेत त्यांना फक्त एक वेगळा संसाराचा आरसा दाखवण्याची गरज आहे. भौतिक सुखे हवी त्यासाठी लागणारा पैसाही हवा पण मिळवलेला  पैसा उपभोगायला आपणही घरात हवे .

काय होतंय पैसा हाच निकष प्राथमिक किबहुना तो एकमेव निकष झाल्यामुळे मुलींची स्थळे शोधताना गुण ,पत्रिका गोत्र सर्व व्यवस्थित असेल तरी पगारावर सर्व गाड्या येवून थांबतात . पुढे कसे जायचे कारण मुलाचा पगार कमी आहे असे होतेय . माझ्या मते अनेक स्थळे पुढे बघण्याचे कार्यक्रम भेटी गाठी सुद्धा होत नाहीत कारण मुळात मुलीचा पगार अधिक त्यामुळे पुढचे सर्व थांबते . अनेकांना हे अनुभव येत असतील. 

आपली विचारसरणी बदलायची वेळ आता आली आहे , आपले अहंकार ( जे आपल्याला आयुष्यभर एकटे ठेवू शकतात ) ते वेळीच आटोक्यात आणण्याची गरज आहे. दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे. एकदा वेळ निघून गेली कि गेली मग कितीही अक्कल आली तरी उपयोग नाही . मुळात विवाह हा एक आनंद सोहळा आहे. आईवडिलांसाठी आपल्या मुलांच्या डोक्यावर अक्षता पडणे ह्यासारखे सुख दुसरे असूच शकत नाही . ज्याच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले , वेळप्रसंगी पोटाला चिंता काढून मुलांच्या गरजा त्यांची शिक्षण केली त्यांचा सुखाचा संसार पाहायला मिळावा हि एकमेव इच्छा उराशी असलेले पालक आज हतबल झाले आहेत . विवाह म्हणजे सुखाची देवाण घेवाण , दोन जीवांचे मिलन तेही आयुष्यभरासाठी , दोन कुटुंबांचे एकत्र येणे ह्यात पैशाची गणिते आलीच कुठून ? 

सगळेच राजकुमार परीकथेतील नाहीत सगळेच BMW मधून येणार नाहीत , जो तुमचे मन जिंकून संसार सुखाचा करेल तोच तुमचा खरा खुरा राजकुमार असेल आणि तोच तुमचा सुयोग्य सहचर सुद्धा. 

आज हा लेख वाचून निदान एका मुलीने किंवा मुलाने आपल्याला आलेल्या स्थळांचा पुनर्विचार केला आणि आपला जोडीदार शोधला तर त्यासारखा आनंद माझ्यासाठी दुसरा नसेल .तो आनंद खरच आमच्या सगळ्यांच्या ओंजळीत येण्याची कास धरून आहोत. विचार बदला , आपल्या आवडी निवडी , आवश्यकता , मला विवाह का करायचा आहे ? ह्याचे सर्व आराखडे पुन्हा एकदा कागदावर मांडा , चुकलेली गणिते पुन्हा सुधारा , पुन्हा मांडा . ह्यातून हाती लागेल तो फक्त आनंद हे नक्की . पैसा हीच विवाहाची इतिपुर्तता नाही तो आयुष्यभर मिळवायचाच आहे , पण आज जाणारे वय पुन्हा मिळणार नाही ते मात्र मागे फिरवता येणार नाही .

संसार सहजीवन ह्याची खरी व्याख्या म्हणजे एकमेकांची सोबत , सहवास असणे हि आहे , पैशाच्या तराजून विवाह तोलण्याची गल्लत आपण करत आहोत . पैसा पैसा करत अनेक उत्तमातील उत्तम स्थळे हातातून निसटून जात आहेत आपल्या ह्याचे भान हरपत आहे.  वास्तवात कधी जगणार आहोत आपण ? सगळे सगळे दूर ठेवून वास्तव स्वीकारण्याची गरज आहे आणि तसे झाले तर येत्या लग्न सराईत अनेक आई बाबा सासू सासरे झालेले पाहायला मिळतील. परमेश्वरा अगदी तसेच होवूदेत .स्वामी आता तुम्हीच काहीतरी करा असे म्हणायची वेळ आली आहे .

एका संतावाचून विचारांचे परिवर्तन कुणी न करून शके आण , सत्य एक त्यांनाच कळे. 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

Monday, 6 January 2025

बच्चन बोल

 || श्री स्वामी समर्थ ||


आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव माझ्या मते “ जिव्हा “ म्हणजेच आपली जीभ. तिचा वापर अविचाराने केला तर सगळेच शून्य होईल. सध्याचे जग भावना शुन्य झाले आहे , माणसाला माणूस नको आहे . आधीच आपली माणसे कमी त्यात तोंडाने फटाफट बोलून आहे ती जोडायची कि तीही घालवायची ते ज्याचे त्याने ठरवायचे . 


पत्रिकेतील कुटुंब भाव हा आपल्या वाणीचा आहे. आपली भाषा ,स्वर , शब्दांचे स्वरूप सर्व काही येथील ग्रह आणि राशी सांगतात. शुक्र चंद्र हे ग्रह नैसर्गिक शुभ ग्रह आहेत ते गोडवा जपणारे , माणसे जोडणारे आहेत . दुसरा भाव हा धनभाव तसेच कुटुंबाचाही भाव आहे. नैसर्गिक कुंडलीत इथे शुक्राचीच वृषभ राशी आलेली आहे. शुक्र आपल्या गोड वागण्या बोलण्याने माणसे जोडतो , नेमका हाच स्वभाव कुटुंबातील सर्वांचा असेल तर कुटुंब आणि त्यातील माणसे जोडून ठेवता येतील. शेवटी माणसातच देव आहे आणि माणसांशिवाय जगणे फोल आहे. 


कुटुंब भावातील मंगळ हा अरेरावी , अहंकार हुकुमत वर्चस्व गाजवण्याची वृत्ती दर्शवेल , भाषा कडक शब्द दुखावणारे असतील. स्पष्ट बोलणे आणि फटकळ बोलणे ह्यातील फरक ह्यांना माहित नसतो. सर्व काही एकाच स्वरात असते म्हणूनच हे कुटुंब जपू शकत नाहीत . रवी कुटुंब भावात फारसा शोभत नाही कारण त्याच्या मान अपमानाच्या कल्पना प्रखर असतात . मन आपल्या वागण्याने मिळवायचा असतो तो असाच मिळत नाही . मिठ्ठास वाणी असलेले चंद्र शुक्र इथे लाखात एक शोभून दिसतात . अर्थात त्यांच्यावर कुठल्याही पापग्रहांची दृष्टी नसेल तरच . गुरु आकाश तत्वाचा सर्वाना सांभाळून घेणार. 

राहू सारखा ग्रह इथे शिवराळ भाषा वापरेल. भावना वगैरे शून्य . केतू विरक्त आहे त्यामुळे केतू बडबड करणार नाही मोजकेच बोलणार पण बोलले तर कधी तोडूनही टाकतील . शनी असेल तर कुटुंबात वयाने वडील माणसे असतील आणि कुटुंब लहान असेल. शनी असेल तर व्यक्ती मितभाषी असेल. बुध असेल तर सतत बोलणे आणि सगळ्यांच्या संपर्कात राहणे . बुधासोबत राहू असेल तर खोटे बोलण्याकडे कल असू शकतो. 


कुटुंब भावातील हर्शल हा आकस्मित बोलून केलेले सर्व घालवेल आणि नेप असेल तर ह्या लोकांचे बोलणे गूढ आणि बोलण्याचा नेमका अर्थ न समजणारे असते. 


कमीतकमी शब्दात अधिक अपमान करणारी माणसे कुणालाही आवडत नाहीत . मुळात कश्याला कुणाला दुखवा आणि प्रत्येक गोष्टी आपण आपले मन मांडलेच पाहिजे असे कुठे लिहिलंय का? नाही पण आम्ही बोलणार जिथे तिथे आम्ही आमचे शब्द भांडार उघडून बसणार आणि प्रत्येकाला रक्त बंबाळ करताच राहणार . असो. 

हिंदी चित्रपट सृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन ह्यांची वाणी , भाषेवरील प्रभुत्व , उत्कृष्ठ शब्दफेक , स्वरातील माधुर्य एक ठेहराव आणि भावनीक ओलावा मनाला स्पर्शून जातो . ह्याचा जिवंत अनुभव आपण त्यांच्या KBC ह्या कार्यक्रमातून वेळोवेळी घेत असतो. त्यांच्या आवाजातील लय आणि बोलण्याची पद्धत व्यक्तीला त्यांच्याकडे आकर्षित करते . व्यक्तीची देहबोली महत्वाची आहे पण त्याहीपेक्षा वाणी अति महत्वाची आहे. रोजच्या जीवनात पदोपदी ह्याचा आपल्याला उपयोग करावा लागतो. चार गोड शब्द बोलून जे काम होते ते पैशाने सुद्धा किंवा अजून कश्यानेही होत नाही. जिभेवरची साखर नेहमीच आपल्याला माणसे जोडण्यात मदत करते . श्री बच्चन ह्यांनी विविध भूमिका साकारताना भाषा आणि त्यातील चढ उतार स्वर ह्यांनी प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे. 

बुध हा बोलण्यातील माधुर्य तसेच चलाखी पण दर्शवतो , मंगळ हर्शल , बुध मंगळ , हर्शल नेप , शनी केतू ह्या युती अभ्यास करण्या सारख्याच आहेत . बुध राहू किंवा धनेश राहूच्या नक्षत्रात फसवणारा किंवा अर्धसत्य , गोड बोलून फसवणे दर्शवतो . 

माणसाना दुखावून , टाकून बोलून आपल्याला काय मिळणार आहे ? माणसातील परमेश्वराला आपण दुखावतो आणि आपली स्वतःची कर्म वाढवून ठेवतो . परमेश्वर शेवटी माणसातच आहे. दिवसभराच्या आपल्या वागण्यात आपली सकाळची पूजा प्रतिबिंबित होणे अपेक्षित आहे , अगदी त्या देवालाही. त्यामुळे कितीही सत्कर्म आणि दानधर्म केला तरी सर्वश्रेष्ठ पूजा हि कुणाचेही मन न दुखावणे हीच आहे. आपण सहमत असालच.

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

 

 


   

 


Saturday, 4 January 2025

शकट योग

 || श्री स्वामी समर्थ ||


ज्योतिष शास्त्रात असंख्य योग आहेत . ग्रहांची फळे तेव्हाच मिळतात जेव्हा त्या ग्रहांचे दुसर्या ग्रहांशी योग होतात . मग ते पाप ग्रह असोत अथवा शुभ ग्रह .  आज आपण ह्या योगांच्या शृंखलेतील “ शकट “ योग कसा निर्माण होतो ते पाहू. हा योग चंद्र आणि गुरूमुळे होतो.  काल पुरुषाच्या कुंडलीत चतुर्थ भावाचा कारक चंद्र असून भाग्य भाव गुरु कडे आहे . ह्या दोन भावांचे स्वामी एकमेकांपासून जर ६ ८ १२ ह्या भावात स्थित असतील तर ह्या योगाची निर्मिती होते . फलदीपिका , सर्वार्थ चिंतामणी , जातक पारिजात ह्या ग्रंथातून आपल्याला ह्या योगाबद्दल अधिक माहिती मिळेल . ह्या योगामुळे आयुष्यात अनेक चढ उतार बघायला मिळतात , स्थिरता येत नाही .

चंद्रापासून गुरु ६ ला ८ वा किंवा १२ वा असेल तेव्हा ह्या योगाची निर्मिती होते. चंद्र गुरूच्या केंद्रात आला तर शकट योग भंग होतो . चंद्र किंवा गुरु स्वराशीत , उच्च राशीत असतील तरीही शकट योगाची अनुचित फळे मिळत नाहीत .चंद्र  किंवा गुरु केंद्रात असेल स्वराशीचा , उच्चीचा असेल तरी हा योग निष्फळ ठरतो. त्याचप्रमाणे मंगळाची दृष्टी चंद्रावर असेल तरी शकट योग निष्फळ ठरतो. हा योग दोन्ही ग्रहांच्या अंशावर अवलंबून असून लग्नावर अवलंबून नाही . 15 अंशापेक्षा अधिक अंशाचा फरक दोघात असेल तर हा निष्फळ ठरणार . शकट योगात व्यक्तीला भाग्य साथ देत नाही असे अनेक पत्रिकांचा अभ्यास केल्यावर निदर्शनास येते .  ह्या योगाबद्दल अजूनही बराच लिहिता येयील तूर्तास इथेच थांबते .


सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230

Thursday, 2 January 2025

विवाह सुखाचा संबंध १२ भावांशी निगडीत .

 || श्री स्वामी समर्थ ||


विवाह हा त्या दोघांचा असला तरी त्यात दोन्ही कुटुंबाचाही मोठा किबहुना अति महत्वाचा सहभाग असतो . सगळ्यांसाठी हा आयुष्यातील आनंदाचा प्रसंग असतो . त्या दोघांच्याही सहजीवनाचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आशीर्वाद देण्यासाठी दोन्ही कुटुंब  एकत्र आलेली असतात . विवाहाच्या पश्च्यात संसाराला सुरवात होते तेव्हा संसारिक जबाबदार्या दोघानाही निभवाव्या लागतात . आपण ज्या कुटुंबात विवाह करून आलेले आहोत त्या कुटुंबाच्या चालीरीती रूढी परंपरा , घरातील व्यक्तींचे स्वभाव आवडी निवडी हे सर्व समजायला आणि त्यात लोणच्या सारखे मुरायला काही काळ जावा लागतोच .

विवाहाचा संबंध पत्रिकेतील फक्त सप्तम भावाशी नसून पत्रिकेतील प्रत्येक भावाशी निगडीत आहे . कसा ते आपण आज पाहूया . लाग्न भाव आपली बुद्धी देहबोली , विचार सोच , जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन देत असल्यामुळे दोघांचेही लग्न जुळते कि नाही ते षडाष्टकात नाही ना ते पहिले पाहिजे नाहीतर विचारात भिन्नता आली तर कसा होईल संसार सुखाचा ?

धन भाव हा कुटुंब आणि कौटुंबिक सौख्याचा आहे . त्यामुळे त्या दोघांचे विशेष करून मुलीचा दुसरा भाव निर्दोष असावा . त्याच सोबत चतुर्थ भाव  कारण चतुर्थात आपले मन आहे . आपल्या मनाची सरलता ह्या भावावरून समजते. चतुर्थ भावावर शुभ ग्रहांची दृष्टी असेल तर व्यक्तीची सोच सकारात्मक असणार . चतुर्थेश दुषित असेल तर त्रासदायक घरात कलह होतील होयील. पंचम भाव प्रेम संबंधाबद्दल सूचित करेल . एकमेकातील प्रेम आणि संतती पंचम भाव दर्शवेल. षष्ठ भाव जबाबदारीचा आहे. मुलीचा हा भाव शुद्ध नसेल तर जराश्या कारणावरून ती माहेरी पलायन करेल . सप्तमातील ग्रह संसार सुखापेक्षा त्या दोघांमधील भावनिक संबंध दर्शवेल . सप्तमेश ६ ८ १२ मध्ये असेल तर व्यक्ती संसार सुख घेवूनच आलेली नाही किंवा त्यात कमतरता असणारच .  अश्या प्रकारे सर्व भावांचा संबंध विवाहाशी आहे. जशी पत्रिका आपण आपल्या मुलाची पाहणार अगदी तशीच मुलीची सुद्धा पहावी लागणार . दोघांच्याही दशा अनुकूल असाव्या लागतात . महादशा स्वामी निर्णायक घटक आहे त्यामुळे त्याचा संबंध त्रिक भावांशी नसावा . सप्तम भावात दोघातील गोडवा जपणारे ग्रह हवेत . आपण श्रीखंड पुरी खायला बसलो आणि समोर बंदूक सुरा घेवून गुंड बसला तर लागेल का ते जेवण गोड आपल्याला अगदी तसेच आहे ते रंगाचा बेरंग करणारे पाप ग्रह नकोत सप्तमात . 

कालच एक पत्रिका पहिली . लग्नात वक्री हर्शल नेप आणि भाग्यात कन्या राशीचा शुक्र कन्या नवमांशात. शुक्र पंचमेश . कसा गोडवा टिकणार . चतुर्थ भावात मंगळ असेल तर सासूशी पटणे कठीण कारण व्यक्ती आक्रमक म्हणजे dominate करणारी असणार . अश्या मुलीनी एकत्र कुटुंबात विवाह करू नये. मेष लग्नाला शुक्र दशा , शुक्र चतुर्थात आणि अंशात्मक युतीत बुधाच्या बुध सुद्धा चतुर्थात तिथे मंगल सुद्धा . विवाह दिला नाही शुक्र दशेने . षष्ठात एकही ग्रह नाही. शुक्रासोबत बुधानेही फळ दिले. शुक्र गंडातात . विवाह दशा स्वामीने दिला नाही . 

नुसते गुण गुण करू नका , इतरही आवश्यक गोष्टी बघा , विवाह एकदाच होतो आयुष्यभर सर्वार्थाने साथ देयील असा जोडीदार शोधताना डोळस पणे शोधा . घाई नको . जितक्या घाईने विवाह तितक्याच घाईने मग घटस्फोट होतात हे चित्र आहे . 

पत्रिका मिलनापासून ते मुहूर्ता पर्यंत सर्व शास्त्राचा आधार घेवून करा. तुमचे आधुनिक विचार बाजूला ठेवा ,ग्रहांच्या समोर ते टिकाव धरणार नाहीत . कुठलीही पत्रिका परिपूर्ण नाही पण आपण त्यातल्या त्यात अधिकाधिक गोष्टी जुळतात का ते बघायचे . लग्नेश हर्शल नेप सोबत असेल तर फसवणूक होवू शकते . दोघांना एकमेकांच्या बर्या वाईट बाजू समजल्या पाहिजेत , आपल्याला तिच्यासोबत काय तडजोड करावी लागणार ते आधीच समजले तर मनाची तयारी होईल. विवाह व्हावा म्हणून आधी सगळ्याला हो हो म्हणायचे आणि मग बायकोची ट्रान्स्फर झाली तर तिला नोकरी सोडायला भाग पाडायचे हे चालणार नाही. प्रत्येकाने एक एक पाऊल पुढे टाकायचे आहे तरच संसाराचा गाडा सुखाने पुढे जायील आणि ह्यासाठी ग्रहस्थिती पाहणे उचित आहेच . 

नुसते गुणमिलन आणि ग्रहमिलन नाही तर दोघांचेही पुढील आयुष्य पाहताना संतती , वैचारिक बैठक , आर्थिक नियोजन , आयुष्य मर्यादा , संतती , स्थावर , कुटुंबातील वावर , एकोपा जपणे अश्या सर्व गोष्टी पहिल्या तर त्या दोघांचा संसार सुखाचा का नाही होणार ? आणि अश्या योग्य जोड्या जुळतात तेव्हा त्याच ताकदीचे ग्रहयोग येतात ज्याला आपण “ योग “ म्हणतो.

प्रत्येकाच्या आयुष्यात हे योग ठरलेले असतात आणि ते योग्य वेळीच येतात , कार्य संपन्न होते . 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230  


लग्नभाव

 || श्री स्वामी समर्थ ||

लग्नभाव म्हणजे व्यक्ती स्वतः आणि त्याचा देह . पत्रिकेतील इतर अकरा भाव त्याला देणारे आहेत तर लग्न भाव हा घेणारा आहे . आई तुमची , कुटुंब तुमचेच , शिक्षण , मुले विवाह , पैसा धन , आजार , शत्रुत्व , अचानक उद्भवणारी संकटे , व्यवसाय नोकरीमधील यश , लाभ आणि व्यय हे सर्व तुमचेच तर आहे आणि म्हणूनच लग्न भाव आणि लग्नेश पत्रिकेत बलवान असणे आवश्यक आहे. 

लग्न कुणाचे आहे त्याचा स्वामी कोण आहे आणि पत्रिकेत तो कुठल्या भावात आहे. लग्नाचे नक्षत्र कुठले आहे , उप नक्षत्र स्वामी नक्षत्र स्वामी कोण आहे , कुठल्या नक्षत्रात जन्म झाला आहे त्याचे कुठले चरण आहे , चरणाचा स्वामी कोण आहे ह्या सर्व गोष्टी आपलाच परिचय करून देत असतात . पूर्व जन्मात आपण काय कर्म केली आहेत त्यानुसार आपल्याला हा जन्म आणि हा देह प्राप्त झालेला आहे . ह्यावरून आपल्या ह्या जन्मातील अनेक गोष्टींचा बोध होत असतो . म्हणूनच सर्वार्थाने लग्न हे सर्वश्रेष्ठ आहे .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230



प्रेम विवाहाचे योग

 || श्री स्वामी समर्थ ||

माझ्या पत्रिकेत प्रेम विवाहाचे योग आहेत का? असा प्रश्न अनेक जातकांच्या मनात येतो. प्रेम फुलते ते पंचमात आणि त्याची परिणीती होते ती सप्तमात . पंचम भाव प्रेम आणि सप्तम विवाह. पंचमेश आणि सप्तमेश युतीत असतात किंवा एकमेकांच्या दृष्टीत असतात तेव्हा प्रेमविवाहाची शक्यता अधिक असते. शुक्र मंगळ युती सुद्धा प्रेम विवाह सूचित करते . पण ह्यावर सूर्य राहू शनी ह्यांचा प्रभाव असेल आणि ह्या ग्रहांचा षष्ठ भावाशी संबंध आला तर पुढे जावून विवाह सुखाचा होत नाही. विवाह सगळ्यांचेच होतात पण ते किती टिकतात , यशस्वी होतात हे महत्वाचे आहे  आणि म्हणूनच प्रेमाची गोडवे म्हणणे वेगळे आणि संसार करणे वेगळे .तसे नसते तर कित्येक वर्ष एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले प्रेमी लग्नानंतर चहा कोण करणार , कपडे कोण वाळत घालणार ह्यावरून तू तू मै मै करणार नाहीत . प्रेयसी पत्नी झाली कि सगळेच बदलते आणि ते जितके लवकर स्वीकारता येयील तितकी संसाराची गोडी वाढेल, अन्यथा... 


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


प्रेमाचे असेही बंध

 || श्री स्वामी समर्थ ||


गेल्या आठवड्यात माझ्याकडे साठीची एक स्त्री पत्रिका घेवून आली होती. यजमानांना डायलिसीस वर ठेवले होते आणि त्यांच्या सर्व रिपोर्ट शी ह्यांचे सर्व रिपोर्ट जुळत होते . त्या म्हणाल्या मला त्यांना एक किडनी डोनेट करायची आहे. उर्वरित आयुष्य आमच्या दोघांच्याही तब्येती चांगल्या राहतील ना ह्याबद्दल त्यांना काळजी होती जी त्यांच्या स्वरातही जाणवत होती. त्यांची आयुष्य रेखा बळकट असल्यामुळे मी त्यांना म्हंटले पुढे जायला हरकत नाही . 

त्या स्वामींच्या सेवेत गेले कित्येक वर्ष रुजू असल्यामुळे महाराजांवर त्यांची अमाप श्रद्धा आणि विश्वास होता  . आता स्वामीभक्त म्हंटल्यावर पुढे सगळ बोलणेच खुंटले. आज त्यांचा मेसेज आला. मी त्यांच्याशी बोलताना त्यांना बुधाच्या दशेचे महत्व समजावून सांगितले होते आणि म्हंटले बुधवारी हिरवा पदार्थ करा जेवणात जसे पालक मेथीची  भाजी कोथिंबीर चटणी असे काहीही , बघा हिरव्या रंगाचा थेट हृदयाशी संबंध असतो . त्या म्हणाल्या मला हिरव्याच बेडशीट वर झोपवले होते . मला हसू आले एव्हड्यात ज्योतिष शिकल्या पण. असो .

आज हे उदाहरण कुठलेही ज्योतिषीय विश्लेषण करण्याच्या हेतूने नाही तर माणुसकीच्या हेतूने तुमच्यासमोर मांडत आहे. त्या दोघात असलेल्या निखळ , अपेक्षा विरहित उदात्त प्रेमाचा ह्यापेक्षा मोठा दाखला काय असू शकतो. 

आजकाल लग्न हा व्यवहार झालाय तुला किती पगार आणि मला किती पगार ह्याच्या पुढे गाडीच जात नाही . एकमेकांबद्दल आदर प्रेम माया नसेल तरी चालेल मोठा पगार फक्त घरी यायला हव्या ह्या ह्या असल्या आधारावर उभी राहू पाहणारी आजकालची विवाह संकल्पना ह्या निखळ प्रेमापुढे किती कवडीमोलाची आणि तकलादू आहे ह्याचा दाखलाच आहे जणू हा. 

एकमेकांची सोबत इतके वर्षांची त्यातून निर्माण झालेली ओढ , आपल्या जोडीदाराच्या जीवनाची चाललेली रस्सीखेच बघवली नाही आणि म्हणून आपल्या शरीराचा एक भाग त्यांच्यासाठी समर्पित करणारी हि माऊली आज तिच्यासमोर मी अक्षरशः नतमस्तक आहे.  असे प्रेम करणारी मुठभर माणसे अजूनही ह्या जगात आहेत म्हणून हे जग अजूनही आहे .

नवरा बायकोचे नाते प्रेमावरच उभे असते , त्या नात्याला बहरायला फुलायला मायेचे खत लागते , कुठल्याही हिरव्या नोटा त्या नात्याला बांधून ठेवू शकत नाहीत हे त्रिवार सत्य आहे .

मला म्हणाल्या माझ्यासाठी प्रार्थना करा , मी त्यांना म्हंटले अहो मी कोण प्रार्थना करणारी , महाराजांनी प्रत्यक्ष येवून तुमचे ऑपरेशन केले आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज तुम्हाला पुनर्जन्म सुद्धा मिळालेला आहे. 

आज गुरुपुष्य आणि आजच मला हि बातमी मिळाली तेव्हा योगायोगाने मी महाराजांच्या समोरच बसले होते . हात जोडले आणि त्यांना म्हंटले तुमच्या अस्तित्वाची प्रचीती मिळाली आणि जगायला उभारी आली .

भक्तांनी कुठलीही शंका न घेता फक्त गुरु सेवेत राहावे पुढचे सर्व ते बघायला समर्थ आहेत . आज गुरुपुष्य खर्या अर्थाने अनुभवले. श्री स्वामी समर्थ 

गजानना सांभाळ आपल्या भक्तजना 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

जलराशीत अग्नीतत्व

 || श्री स्वामी समर्थ ||

लराशीत अग्नीतत्व सध्या मंगळाचे भ्रमण जल तत्वाच्या कर्क राशीतून होत आहे . गेल्या आठवड्यात एका जातकाची पत्रिका बघताना पाण्यापासून काळजी घ्या असे सांगितले होते . नळाचे पाणी चालू आणि गिझर सुद्धा चालू असताना पाण्यात  हात घातल्यावर काय होणार , व्हायचे तेच झाले , पाण्यात विजेचा करंट होता . बेशुद्धावस्थेत दवाखान्यात न्यायची वेळ आली . मूळ पत्रिकेत सुद्धा मंगळा समोर हर्शल आहे . असो सगळ्यांनी काळजी घ्या , ऑफिसच्या सकाळच्या घाईत आपण आणि आपल्या मुलांवर सुद्धा अश्या प्रसंगांना सामोरे जाण्याची वेळ येवू शकते . सतर्कतेचा इशारा म्हणून हा लेखन प्रपंच . तसेही आयुष्यात  प्रत्येक वेळी जो सावध राहील तोच तरेल. आता कुणी म्हणेल अपघात घडायचे योग असतील तर ते होणारच हे काही शहाणपण नाही. परीक्षेत पेपर कठीण तेव्हाच जातो जेव्हा आपण अभ्यास करत नाही ...एखादी गोष्ट घडणार असेल तरी आपण सावधानता बाळगली तर त्याचा दाह निश्चित कमी होवू शकतो . 

परवा एका स्त्रीचे वीस लाख सोशल मिडीयाच्या भुलभुलय्यात गेले. ते कधी मिळतील हा प्रश्न म्हंटले मिळणार नाहीत . इतक्या शिकलेल्या आणि प्रगत युगातील लोक असे कसे फसू शकतात हा प्रश्न आहे . पैसा सगळेच मिळवतात पण तो टिकवता येणे हे खरे कौशल्य आहे . मी म्हंटले गेल्या कित्येक जन्मातील तुमचे हे देणे होते असे समजा . अनेकदा मानसिक त्रास हेच आपले भोग असतात आणि ते भोगूनच संपवायचे असतात , कमी वेळात अधिक पैसे मिळवण्याचे डोहाळे अनेकांना लागतात पण दुर्दैवाने त्याची परिणीती अशी होते , अजूनही पुढे फसवणुकीचे योग आहेत तेव्हा सतर्क राहा . ह्याला काहीही उपाय नाही . 

मुळात आपण काही काम करत असताना मोबायील हातात घ्यायचाच कश्याला . राहू आपण बेसावध आहोत तीच वेळ साधतो हे नव्याने सांगायला नको . इतके पैसे कमवायला एखाद्या व्यक्तीला संपूर्ण आयुष्य खर्ची घालायला लागेल . आज आपण अत्याधुनिक युगात आपल्याच गरजा अनेक माध्यमांचा उपयोग करून जसे gpay नेट वाढवून  ठेवल्या आहेत पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजूही आहेत . असो .

स्वयपाक घर , गिझर , इस्त्री , ग्यास ह्या अनेक गोष्टी हाताळताना सावध राहा घाई नडते . स्वयपाक घरातील सुरी कात्री विळी जपून वापरा नेहमीच . भाजणे , कापणे हे मंगळा कडे आहे. 

आपण स्वतः काळजी घ्या आणि इतरानाही घ्यायला सांगा .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

कपाट

 || श्री स्वामी समर्थ ||

परवा माझे कपाट आवरायला काढले. दिवाळीत अनेक गोष्टीं आवरल्या गेल्या होत्या पण तरीही म्हंटले पुन्हा एकदा पाहावे म्हणून उघडले आणि मी भूतकाळात गेले. पूर्वी आमचे घर लहान होते आणि एका कपाटात प्रत्येकाला एकएक खण असायचा . तेव्हा गरजा खूप कमी होत्या आणि वडील आधुनिक विचारांचे नसल्यामुळे मेकअप चे समान घरात दिसण्याचा प्रश्नच नव्हता . चारचौघींसारखे आयुष्य , त्यात शाळेत घातलेल्या वेण्यांना लावायच्या लाल रिबीन इतकाच थाटमाट असायचा. तेव्हा पावडर डब्यात मिळायची आणि त्यात एक रुपयाचे नाणे असायचे ते सर्व काही डोळ्यासमोर उभे राहिले. तेव्हा कपाटातील एक खण म्हणजे १० गुंठे जमीन मिळाल्याचा आनंद होता , त्या घरातील तो माझा खण हि अगदी माझी हक्काची जागा होती . त्या खणात कपडे कोंबून भरायची वेळ येत नसे कारण तेव्हा इतके कपडे नसायचे , शाळेचा युनिफोर्म आणि बाहेर जायचे चार फ्रॉक कि संपले. तेव्हा आम्हला वाढदिवस आणि दिवाळीला ठरलेल्या किमतीत फ्रॉक मिळायचा. आता सारखी ढीगभर प्रदर्शने आणि जाता येत खरेदी तेव्हा होत नसे . असो.
एकेक कपडा आणि वस्तू काढत असताना कित्येक आठवणी मनात रुंजी घालू लागल्या . सासर असो वा माहेर प्रत्येकाने दिलेल्या त्यातील प्रत्येक गोष्टीवर त्यांच्या प्रेमाचा सुगंध अजूनही दरवळत होता . हि साडी वाढदिवसाची दिवाळीची , हे पैंजण बारशाचे , हि साडी बाबांनी खास मला दिलेली भेट , काकुनी फक्त मला आवडली म्हणून घेतलेली बहिणीच्या लग्नातील साडी अश्या एक ना दोन आठवणीनी डोळे पाणावू लागले. घर हे स्त्रीचे विश्व असते. कपडा कितीही जुना झाला अगदी फाटायला आला तरी त्यातील मायेची ऊब कधीच कमी होत नाही आणि म्हणूनच त्यातील प्रत्येक गोष्ट हृदयाच्या समीप असते. कपाट आवरता आवरता मी माझे आयुष्यच जणू गोळा करत होते , अनेक प्रसंग आठवायला लागले. मुलगा झाला तेव्हा जुन्या साड्या , बाळाचे जुने कपडे ह्यांच्या आठवणीना अजूनही जॉन्सन बेबी पावडर चा मंद सुवास येत होता .
कपाटात वस्तू कपडे नव्हते तर आठवणींची गाठोडी होती . एकेक कपडा काढत , पुन्हा घडी घालताना कधी खुदकन हसू येत होते तर कधी डोळे पाणावत होते , कधी वय विसरून शाळेत गेले तर कधी बोहल्यावर उभी राहिले, कधी घरातील पूजेचा थाटमाट आठवला तर कधी दिवाळीचे प्रसंग . किती जगलो आपण काय काय मागे टाकून पुढे गेलो आणि काय काय हृदयाशी धरून ठेवण्याचा प्रयत्न केला. किती माणसे आली किती गेली , किती खस्ता खाल्या आणि किती अश्रू ढाळले , कधी कोडकौतुक झाले तर कधी एकटेपण आले, कधी जवळच्याच लोकांनी परके केले तर कधी अनोळखी लोकांनी मैत्रीचा हात पुढे केला . एक ना दोन प्रसंगामागून प्रसंग समोर उभे राहत होते आणि मीच माझ्या आयुष्यात फेरफटका मारत होते .
आज मागे वळून पाहताना जाणवले ते असे कि लहानपणी मोठ्या कपाटातील एक खण हेच माझे विश्व होते , त्या खणाने मला माझ्या गरजा सीमित ठेवायला शिकवले. नाती जपायला शिकवली माणसाना सुद्धा घट्ट धरून ठेवायला शिकवले. आज एक मोठाच्या मोठा अक्खा wardrobe असूनही तो कमी पडत आहे. त्यावेळच्या एका खणात जे सुख होते ते आज नाही हे खर्या अर्थाने जाणवले. माझे बाबा नेहमी म्हणत अग एका देहाला किती कपडे लागतात , किती पादत्राणे लागतात . आपणच आपल्या गरजा वाढवून ठेवल्या आहेत . आज दिवस बदलले आहेत , पैसा खिशात असतो मग आवडले कि हे आणा ते आणा चालूच राहते . चार कपडे असले कि त्यातील एक घालायचा फार चिंता नाही पण आता गणित बदलले आहे , आता खूप कपडे असल्यामुळे नेमका घालायचा कुठला हा विचार करत तासंतास कपाटासमोर उभी राहते . हा कि तो घालू हा जणू जीवन मरणाचा प्रश्न बनून जातो .
कपाट लावून झाले पुन्हा वर्तमानात आले. कपाटाचे दार लावले पण अनेक नात्यांचे द्वार ह्यामुळे खुले झाले. अनेक वेळा ज्यांना फोन करायचे राहून जाते , साधी खुशाली विचारण्यासाठी सुद्धा फोन केला जात नाही अश्या अनेकांच्या नात्यांची सैल झालेली वीण पुन्हा विणण्याचा मनापासून प्रयत्न केला , त्यातील गोडवा प्रेम जपणे आणि ते टिकवून ठेवणे किती महत्वाचे आहे हे आज शिकले.
आपल्या घरातील प्रत्येक वस्तुत नात्यांचे बंध असतात , अगदी घराच्या भितीना लावलेल्या रंगापासून ते स्वयपाक घरातील भांडी सगळ्या सगळ्यात एकच संदेश असतो , घराला घरपण आणणाऱ्या ह्या वस्तूंसोबत नातीही जपा , वृद्धिंगत करा .
नुसतीच हि साडी मला माझ्या अमुक अमुक नातेवाईकाने दिली हि नुसतीच आठवण काढण्यापेक्षा त्या व्यक्तीला फोन करा तिला ते सांगा आणि प्रेम ते प्रसंग तसेच मनात ताजे तवाने ठेवण्याचा प्रयत्न करा . मी ते करण्याचा प्रयत्न करतेय ..तुमचे काय ..जमवा करा आणि तुमचाही अनुभव कळवा..
आज ह्या कपाट लावण्याच्या मोहिमेने माझी नात्यांची वीण तर घट्ट केलीच , आठवणीना उजाळा दिला आणि नव्याने जगायलाही शिकवले. कपाटाचे द्वार बंद करताना मनाचे अनेक रिते आणि भरलेले सुद्धा कप्पे माझ्याही नकळत उघडले गेले.
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230

सीमारेषा

 || श्री स्वामी समर्थ ||


इतर अनेक शस्त्रासारखे आहार शास्त्र आहे आणि ते आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे . आहार शास्त्राची आज ज्योतिष शास्त्राशी सांगड घालायची म्हंटले तर असे सांगता येयील कि आपल्या पानात प्रत्येक जिन्नस किती घ्यावा तर तो आपल्या शरीर प्रकृतीला मानवेल इतका म्हणजेच पचेल इतकाच . चटणी , लोणचे चवीपुरते चमचाभर तर भाज्या अधिक प्रमाणात कारण त्यातून मिळणारे घटक अधिक उपयुक्त असतात जसे प्रोटीन वगैरे. 

भाजी इतकी चटणी आणि चटणी इतकी भाजी शरीरातील पचनसंस्थेचे संतुलन बिघडवू शकते . अगदी तसेच आपला अहंकार सुद्धा चटणी इतका असेल तर ठीक पण तो जेव्हा भाजी च्या प्रमाणात वाढतो तेव्हा आयुष्य उतरणीला लागते आणि पदोपदी अपमान , निराशा , पराभव अनुभवायला मिळतो. मी इतरांपेक्षा वेगळा हि भावना म्हणजेच “ अहंकार “ अशी सोपी परिभाषा मी करीन . पण मग अश्या व्यक्ती एकट्या पडतात , स्वतःच्याच कोशात राहून स्वतःचाच अहंकार अधिक जोपासू लागतात . माणूस समाजप्रिय आहे. आज माणूसच माणसाला नकोसा झाला आहे त्यात , आपण आपल्या वर्तनाने , बोलण्याने कश्याला त्यात भर घाला .  व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत , सगळ्यांच्या गुणांचे स्वागत करा त्यांना प्रोत्चाहित करा आणि आयुष्याचा प्रवास सुरेल करुया .

त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला असलेला अहंकार सीमित ठेवावा . तसेही प्रत्येक गोष्टीत आवश्यक आहे ती “ सीमारेषा “. अनेकदा ती ओलांडून आपण दुसर्याचा अवमान करतो , दुखावतो पण त्यातून हाती काहीच लागत नाही . 

लेखनालाही “ सीमारेषा “ असल्यामुळे तूर्तास इथेच थांबते .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

शिकवीन चांगला धडा

 || श्री स्वामी समर्थ ||


एका इमारतीत अनेक लोक आपापल्या घरात राहत होते , खूप श्रीमंत नसले तरी खाऊन पिऊन सुखी होते , एकमेकांच्या दुखल्या खुपलयाला मदत करत , एकंदरीत सर्व चांगले चालले होते . त्यांच्यात एक मात्र दीड शहाणा होता . हवे तसे वागायचे , हवे तसे बोलायचे , कश्यालाच ताळतंत्र नव्हता . सगळ्यांना त्यांच्या वागणुकीचा अत्यंत त्रास होत असे. मग भांडणे , शिवीगाळ हा तर नित्याचाच कार्यक्रम झाला होता आणि सगळ्यांना रोजची डोकेदुखी झाली होती . इमारत स्वतःची खाजगी मालमत्ता असल्यासारखे वागणे होते , असो . 

काही दिवसांनी ह्या व्यक्तीला शनीची दशा सुरु झाली आणि शनीचे साम्राज्य सुरु झाले. बघता बघता दिवस पालटले आणि व्यक्तीला अनेक लहान मोठ्या आजारांनी घेरले . पण  म्हणतात ना जित्याची खोड . हम करेसो कायद्याने वागणे चालूच होते , अहंकार पोहोचलेला जराही कमी होईना आणि तो दिवस आला. खूप जोरात अर्धांगवायूचा झटका आला आणि माणूस जागेला लागला . कुणाच्या तरी आधाराशिवाय दोन पावले चालू शकत नव्हता . 

शनी वायु तत्वाचा आणि दंडाधिकारी . ह्या जगात कुणीही कसेही वागेल आणि कुणाला असे वाटत असेल कि आपण कुणालाही उत्तर द्यायला बांधील नाही तर हा भ्रम आहे. नवग्रहातील ग्रह शनी आणि त्याची दशा किंवा साडेसाती जेव्हा येते तेव्हा चढवलेले सगळे खोटे मुखवटे गळून पडतात .  रात्रीची झोप उडते ती कायमचीच . आपण केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब त्याच्याजवळ असतो आणि त्याचीच शिक्षा म्हणून कि काय अनेक  मानसिक समस्या आणि शारीरिक व्याधी मागून एका मागून समोर उभ्या राहतात . 

दुसर्याला त्रास देताना , एखाद्याची त्याच्यामागे निदा करताना , कुणाच्याही चारित्र्यावर शिंतोडे उडवताना , सतत दुसर्याला पाण्यात बघताना , दुसर्याचा तिरस्कार , अपमान , टोमणे मारताना आपल्याला खूप मजा येते . पण वेळ आली कि सगळी धुंदी एका क्षणात उतरते  . आपल्याला कुणाच्याही आयुष्याचे मोजमाप करण्याचा अधिकार देवाने अजिबात दिलेला नाही . आपण आपल्या पायाखाली काय आहे ते आधी बघावे आणि मग इतर गोष्टी . दुसर्याच्या आयुष्यात डोकावण्याचा स्वयं सिद्ध अधिकार जन्मालाच घेवून आल्यासारखे जे वागतात त्यांचे हाल काय शनी करेल ह्याबद्दल बोलणेच नको . समाजात वावरताना  लोकांना अपमानास्पद बोलणे , तसे वागवणे , चारचौघात समोरच्याचा अपमान निर्भत्सना करणे ह्या गोष्टींची शनी दखल घेत नसेल असे वाटत असेल तर डोक्यातून हा विचार जितक्या लवकर काढता येयील तितका बरा. 

अश्या व्यक्तींची साडेसाती आणि शनी दशा ह्यात शनी इतका मोठा धडा शिकवतो कि त्यापासून इतरांनीही वाईट न वागण्याचा धडा घ्यावा .  अपराधाला माफी नाही आणि  शिक्षा होईल असे वागूच नये कारण शिक्षा झाल्यावर मात्र  पश्चातापाशिवाय हाती काहीच लागत नाही . 

आपले आयुष्य जगताना कर्म शुद्ध ठेवावीत , इतरानाही मदत करत राहावी . आपल्या घरातील नोकर चाकर , आपल्या इमारतीचे सुरक्षा कर्मचारी , दुधवाले , पेपरवाले , प्लंबर , सुतार ह्या सर्वांशी आदराने वागा , त्यांना गुड मोर्निंग म्हणून त्यांचाही दिवस चांगला जावूदे . गरजवंताला मदत करणे हे पुण्याचेच काम आहे पण कारण नसताना कुणाला त्रास दिला तर मग त्याचा सगळ्याचा हिशोब शनी दशेत चुकता होईल आणि तोही अश्या प्रकारे होईल कि क्षणाक्षणाला माणूस मरणाची भिक मागेल ....दुसर्याला त्रास देणे , कुणाचे पैसे लुबाडणे , एखाद्याच्या असहाय परिस्थितीचा फायदा घेवून चुकीच्या मार्गाने धाक दाखवून जमीन हडपणे , अत्यंत हृणास्पद नीच वृत्तीचे राजकारण , पैशाचे गैरव्यवहार , माणसे वापरून फेकून देणे आणि माणुसकीला काळिमा फासणारी अनेक कृत्ये करताना शनीची आठवण येवूदेत, त्याचा विचार मनात सतत असुदे . 

आज सगळे जण आपली नित्याची कामे करत आहेत पण ती व्यक्ती मात्र एका जागी खिळून आहे ....उरलाय फक्त पश्चात्ताप आणि हीच मोठी शिक्षा पण आहे. 

आत्ता शनी चे पुष्य नक्षत्र चालू आहे.....नोकरी धंदा व्यवसाय ह्याचा कारक सुद्धा शनीच आहे तो सुरळीत हवा असेल तर वर उल्लेख केल्याप्रमाणे कधीही वर्तन करू नका. 

ओं शं शनैश्चराय नमः

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

महादशा

 || श्री स्वामी समर्थ ||


आपल्या आयुष्यात प्रत्येक ग्रहाला त्याचा संपूर्ण प्रभाव आपल्यावर टाकण्यासाठी जो वेळ दिला आहे त्याला आपण “ महादशा “ म्हणतो. त्यात येतात त्या अंतर दशा आणि विदशा . आपल्या पत्रिकेत ग्रह जसा आहे , ज्या स्थितीत आहे त्याप्रमणे त्या ग्रहाची दशा फळ देताना दिसते. ह्याचाच अर्थ कुठलीही दशा हि संपूर्ण चांगली किंवा वाईट नसते . प्रत्येक दशा हि नेहमीच मिश्र परिणाम देणार .

शुक्राची दशा हि सर्वात अधिक कालावधीची म्हणजे २० वर्षाची असते. शुक्र हा नैसर्गिक शुभ ग्रह असून जीवनातील आनंदाचा , सकारात्मकता , निर्मितीचा कारक आहे. भटकंती , वैवाहिक सौख्य , आनंद उपभोगणे ह्या गोष्टी शुक्राकडे आहेत . मग ह्या दशेत काय होईल ? ह्या कालावधीत प्रामुख्याने  खरेदी , पर्यटन , भेटीगाठी , उत्तम खाद्यपदार्थांची वेळोवेळी मिळणारी मेजवानी , त्यावर ताव मारणे , उंची अत्तरे , समारंभ अश्या अनेक गोष्टी आणि भौतिक किंवा स्वतःवर खर्च करण्यात , सुखासिनतेत जातील. मग ह्या सगळ्याचा  परिणाम काय होईल , जीवन शैली जरा COMFORM ZONE मध्ये राहील  , व्यायाम असेलच असे नाही , मज्जानु जिंदगी होईल , एशोआराम , व्यसने , आनंद ह्यामुळे आपण आपल्या स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू आणि त्यातून मग मधुमेह सारखे आजार निर्माण होतील. सुखासीनता एका प्रमाणाबाहेर कधीही चांगली नसते. म्हणूनच अनेकदा शुक्राच्या दशा , अंतर दशा ह्यात व्यक्तीला मधुमेह झालेला बघायला मिळतो. शुक्र संपत्ती , धन , भौतिक सुखाच्या साधनांची बरसात करेल पण जीवन शैली बदलल्यामुळे होणारे आजार पण देयील. नेमके तिथेच आपल्याला जपायचे आहे . 

प्रत्येक ग्रह हा वरती उल्लेख केल्यामुळे त्याची छाप आपल्या जीवनावर टाकतो , त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा ते आपल्या हातात आहे , शुक्राच्या दशेत आयुष्यात काहीतरी CREATIVE करता आले तर बघावे , त्यामुळे मेंदूही कार्यरत राहील...दशा कुठलीही असो स्वतःसाठी तासभर वेळ देणे आणि व्यायम करणे आवश्यक आहे हे वेगळे सांगायला नको. 

शुक्राचा गोडवा थोडक्यात जपावा इतकेच सांगण्यासाठी हे दोन शब्द . आज शुक्राचेच पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे . 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

गिअर ...

 || श्री स्वामी समर्थ ||

गाडीचा पहिला गिअर टाकला तर धीम्या गतीने  गाडी पुढे जाते म्हणजेच हळूहळू जाते . आपल्या ग्रहमालिकेतील सर्वात धीम्या गतीने चालणारा ग्रह कुठला असेल तर “ शनी “ हाच आपला पहिला गिअर आहे. आपली कर्म चांगली नसतील तर आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला खीळ लावणारा थोडक्यात आपल्या कामांची गती धीमी करणारा हा शनी आहे .  गाडी जर वेगात हवी असेल तर मग चौथा पाचवा गिअर टाकावा लागतो , सगळ्यात जलद गतीने जाणारा ग्रह कुठला आहे तर “ चंद्र “ हाच आपल्या मनाच्या आणि आयुष्याच्या  गाडीला वेग देणारा ग्रह आहे . गाडी मागे वळवायची असेल तर राहू केतू  आहेतच . गाडी खूप उतावळे पणा करून खड्ड्यात घालणारा मंगळ आयुष्यात वेग हवा पण सीमित हवा हेच सुचवत असतो . तसेच निसर्ग सौंदर्य बघत प्रवासाचा आनंद घेणारा शुक्र जीवनाचे समीकरणच बदलून टाकतो . ज्योतिष हे आपल्या रोजच्या जीवनाशी अत्यंत निगडीत आहे , प्रत्येक क्षणी आपण ज्योतिष जगतच असतो. आपल्यापासून ते वेगळे नाही . रोजच्या जीवनातील साधी सोपी उदा पाहून हा अभ्यास सहज करता येयील , समजेल पटेल आणि आयुष्यभर लक्ष्यात सुद्धा राहील . सहमत ?

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

शरणागती -स्वामी माझा मी स्वामींचा

 || श्री स्वामी समर्थ ||

मी पारायण करते , जप करते , प्रदाक्षणी घालते आणि बरच काही करते ह्यामुळे आपल्याही नकळत आपला अहंकार वाढीस लागतो त्यामुळे स्वतःच तयार केलेल्या ह्या कोशातून बाहेर येवून “ स्वामी माझ्याकडून हि सेवा करवून घेत आहेत “ असा भाव ठेवून अनन्यभावे त्यांना शरण जावून आयुष्यातील प्रत्येक क्षण त्यांचे स्मरण ठेवून जे जे काही शक्य आहे ती सेवा  त्यांच्यासाठी करत राहिलो तर त्यांच्या आणि आपल्यातील अंतर कमी होत जायील हे निश्चित . “ मी पणा “ ची भिंत प्रत्येक भक्त आणि महाराजांमध्ये असते . जसजसे नामस्मरण साधना वाढत जाते तसतसे हि भिंत धूसर होत जाते , आपले अस्तित्व ( थोडक्यात आपली लायकी ) किती क्षणभंगुर आहे ह्याची जाणीव व्हायला लागते आणि जेव्हा आपण हे मान्य करतो अगदी मनाच्या गाभ्यातून त्याच क्षणी महाराजांचा वरदहस्त आपल्याला लाभतो ह्यात तिळमात्र शंका नाही . 

महाराज आपलेच आहेत म्हणून त्यांचा व्यवहारात वापर करून घेण्याचा अधिकार आपल्याला कुणीही दिलेला नाही अगदी त्यांनी सुद्धा. हवे तेव्हा स्वामी आणि नाहीतर कुठले स्वामी ? हे प्रत्यक्ष त्यानाही माहित आहे म्हणूनच त्यांनी तारक मंत्रात लिहिले आहे , निशंक हो निर्भय हो मना रे ... तारक मंत्रावर तासंतास बोलता येयील , आयुष्यभर चिंतन करता येयील इतकी प्रचंड शक्ती आणि गूढ अर्थ त्यात आहे. पण आपण कसातरी तो उरकल्यासारखा म्हणतो आणि जणूकाही आता अगदी महाराजांनीच “ thank you “ म्हणण्यासाठी आपले पाय धरावेत अश्याच अविर्भावात वावरत असतो. अहो त्यांनीच जन्माला घातलाय ना आपल्याला म्हणूनच त्यांच्यासमोर कसला हि नाद चालणार नाही. 

साधकांनी साधका सारखे वागणे अपेक्षित आहे त्यांनी आपला विठोबा घाटोळ होवू द्यायच्या स्वतःला सावरले तर हे जीवन अतिसुंदर आहे हे समजेल .  दुसर्यांचे प्रश्न समस्या ऐका मग समजेल आपल्या ओंजळीत त्यांनी किती सुख घातलाय त्याची जाणीव होईल पण आपण रोज रडगाणी गात असतो महाराज मला हे हवे ते हवे न संपणारे आहे हे सर्व . त्यांचे अस्तित्व सर्वत्र आहे अगदी मी लिहित असलेल्या प्रत्येक शब्दात माझ्या श्वासात विचारात सगळीकडे आहे आणि त्याचे भान सुटले कि झाले. आपण निम्मित आहोत सर्व तेच करून घेत आहेत ह्या भावनेने अत्यंत निष्काम भाव ठेवून मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार स्वामीमय होवून जावूया ....ह्या सेवेची संधी दिल्याबद्दल कृतकृत्य होवुया.

प्रत्येक गुरुवारची साधना 

१. मानसपूजा ( वेळ अर्थात कुठलीही पण ती करत असताना सुनबाईना कुकरच्या शिट्ट्या बंद करायला सांगू मंत्र नका , त्या करतील )

२. नामस्मरण ( किती करावे प्रत्येकाने ठरवावे आपल्याला प्रपंच सुद्धा आहे )

३. पोथी वाचन 

४ महाराजांना अभिषेक प्रत्येक गुरुवारी वेगवेगळा .

 पहिला गुरुवार ( सकाळ संध्याकाळ कधीही करावा )  दुधाचा 

 दुसरा गुरुवार पंचामृताचा 

 तिसरा चंदन + अष्टगंध + केवडा + अत्तर +हीना + कस्तुरी ह्याचे लेपन

 चौथा गुरुवार सुवासिक फुलांचा अभिषेक जसे चमेली , मोगरा , चाफा , जाई जुई

 प्रत्येक पूजेच्या सुरवातीला आपल्या कुलस्वामिनी आणि कुल देव ह्यांचे स्मरण करण्यास कधीही विसरू नये .

स्वामी हे नाव मुखातून जात आहे हेच आपले भाग्य आहे. त्यांचे आपले नाते प्रेमाचे जसे माय लेकराचे...मला पुढे लिहवत नाही डोळ्यातून अश्रुधारा येत आहेत ...आज इथेच थांबते ...स्वामी आम्हा सर्व भक्तांना तुमचाच आधार आहे , सांभाळा .

शरणागत दिनार्थ परित्राण परायणे |

सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते |

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


शुभे ग्रहा अति शुभा , क्रूर ग्रहा अति क्रूरा

 || श्री स्वामी समर्थ ||

उद्या पासून मंगळ वक्र गतीने जाणार आहे. मंगळ हा नैसर्गिक पापग्रह आहे आणि वरती उल्लेख केल्याप्रमाणे पाप ग्रह जेव्हा वक्री होतात तेव्हा अति बलवान होतात आणि अति अशुभ फळ प्रदान करतात . अतिशय तापट , भावना अनावर होणार्या लोकांनी सावध राहावे , आपल्या भावनांवर , रागावर जोशावर ताबा ठेवावा . 

हनुमान चालीसा जितक्या अधिक वेळा म्हणता येयील तितकी म्हणावी इतकच सांगावेसे वाटते . काही दिवसापूर्वी पोस्ट केलेला ह्यासंदर्भातील लेख पुन्हा पोस्ट करत आहे.  

धूम मचाये धूम ( मंगळ वक्री 7 डिसेंबर ते 23 फेब्रुवारी )

ह्या वर्षा अखेरीच्या अत्यंत महत्वाच्या ग्रहस्थिती बद्दल थोडा विचार करुया .ऑगस्ट २६ ला मंगळ ग्रहाने मिथुन ह्या आपल्या शत्रूराशीत प्रवेश केलाय . विचारवंतांच्या राशीतील अक्शन प्लानेट काय  काय करणार आहे ह्याकडे संपूर्ण ज्योतिष जगताचे लक्ष आहे .  मंगळाला आपण सेनापती म्हंटले आहे , समोरच्या शत्रूचा निप्पात करून यशाची शिखरे पादाक्रांत करणे ह्यात तरबेज पणा,  धडाडी , जिद्द ,मुत्सद्देपणा , साहस , पराक्रम  ह्यासोबत अनेकदा अविचार, उतावीळपणा ह्यामुळे मंगळ अमंगळ करतो . कुठल्याही गोष्टीचा अतिरेक शेवटी वाईट . मंगळ सुस्थितीत असेल तर अश्या व्यक्तीची कार्यक्षमता उत्तम असते बुध हा जितका विचारी तितकाच मंगल अविचारी आणि म्हणून बुधाच्या ह्या राशीत त्याला कसेनुसे होते . बुधाची मिथुन राशी हि राजकुमाराची म्हणजेच एका बालकाची राशी आहे ,कन्या राशीसारखी परीपक्वता ह्यात नाही . बालक हट्टी असतेच त्यात मंगलाची भर म्हणजे बोलणेच खुंटले. पत्रिकेत मिथुन राशीत मंगळ दिसला तर  ती व्यक्ती प्रमाणाबाहेर हट्टी असणारच . मिथुन राशीतील आणि मिथुन नवमांशा तील मंगल अजिबात चांगली फळे देत नाही .  

मंगळ हा पुरुष ग्रह असून तामसी आहे . पापग्रह आहे . मंगळाला भौम म्हणजेच भूमिपुत्र म्हंटलेले आहे . त्यामुळे जमीन जुमला , भावंडे , शेजारी सावत्र आई चे आयुष्यातील अस्तित्वावर बोलतो . मंगळ अत्यंत उतावीळ आहे त्याच्याकडे धीर नाही तर प्रत्येक गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी अत्यंत अधीर आहे. डोके बाजूला ठेवायचे आणि निर्णय घ्यायचे किंवा बोलायचे ह्यात मंगळ अग्रगण्य असल्यामुळे अनेकदा भांडणे वादविवादाची स्थिती निर्माण होते . सध्या तेच आहे कारण मंगळ बुधाच्या राशीत नाखूष आहे . 

मेदनिय ज्योतिषाचा विचार करता वादळे , मोठे भूकंप आणि त्यात झालेली जीवितहानी , मंगळाच्या हाती शस्त्र असल्यामुळे युद्ध जन्य स्थिती , अतिरेकी कारवाया , मंगळ रक्ताचा कारक त्यामुळे हिंसाचाराचे वाढते प्रमाण आणि त्यातून होणारा रक्तपात . ग्रह वक्री झाला कि बलवान होतो आणि त्याची फळे सुद्धा तितकीच त्रासदायक असतात . मंगळ अंदाजे दोन महिन्याच्या काळापर्यंत वक्री अवस्थेत असतो . ह्या काळातील वैयक्तिक स्थरावरील तसेच जागतिक , सामाजिक स्थरावरील स्थिती अभ्यासण्या जोगी असते आणि अभ्यासकांनी ह्या सर्व नोंदी करून ठेवाव्यात .

पृथ्वीपासून कोटी मैल दूर असणारा मंगळ हा पृथ्वीच्या कक्षेजवळ असणारा पण बहिर्वर्ती ग्रह आहे . मिथुन राशीतून मंगळ कर्क राशीत २१ ऑक्टोबर ला प्रवेश करणार आहे . तिथे त्याला नीचत्व प्राप्त होईल . कर्क राशीतच मंगळ ११ अंशावर डिसेंबर 7 रोजी पुष्य नक्षत्रात आणि तुळ नवमांशात वक्री होणार आहे . पुढे वक्री अवस्थेतच २२ जानेवारीला मंगळ मिथुन राशीत प्रवेश करेल आणि 23 फेब्रुवारी रोजी मार्गस्थ होईल. थोडक्यात ७ डिसेंबर ते २३ फेब्रुवारी ह्या काळात मंगळ वक्री असणार आहे . २१ ऑक्टोबर ला मंगळ कर्क राशीत नीच होत आहे आणि लगेच २५ ऑक्टोबर पासून मंगळाची गती २२ कला होते आहे . कर्क राशीतून मंगळ कुंभ राशीतील शनीवर दृष्टी टाकेल तसेच रवी बुध वृश्चिक राशीत आले कि शनीच्या दृष्टीत असतील . वातावरण असे असल्यावर नामस्मरण वाढवा इतकेच म्हणावे लागेल. शनी मंगळ षडाष्टकात आणि मंगल स्तंभी , वक्री अपघातांचे प्रमाण वाढेल , शस्त्रापासून  भय , आगी लागतील आणि शस्त्रक्रीयांचेही प्रमाण वाढेल . 

मंगळ म्हणजे थोडक्यात Aggression  , उतावीळ पणे घेतलेले निर्णय , जोश होश.  मंगल म्हणजे घातपात  , डोक्यात राग घालून घेणे आणि त्या रागाच्या भारत अविचारी कृत्ये करणे . मंगळ हा अग्नी तत्वाचा तामसी  ग्रह आहे. पेटून उठणारा , अन्याय विरुद्ध दोन हात करताना प्रचंड राग डोक्यात घालून घेणारा . लहान मुल कसे मनाविरुद्ध काही झाले कि जमिनीवर डोके आपटून घेते तसेच . रागाचा उद्रेक हा मंगळ करणार . सामाजिक व्यवस्थेत पोलीस यंत्रणेला सुसज्ज राहावे लागेल. आगी लागणे , भांडणे , प्रचंड मानसिक त्रास , रक्ताच्या संबंधित विकार , बिपी वाढणे , रक्तदोष , शरीरातील ज्वर वाढणे .वेरीकोज वेन्स , डोळ्यांचे आजार , मानसिक ताण त्यामुळे होणारी डोकेदुखी वाढेल . प्रचंड वादविवाद होतील आणि त्यामुळे रागाचा ईर्षेचा उद्रेक होईल . आगी लागतील , स्वयपाकघरात सुद्धा काम करताना सांभाळावे लागेल. जनसामान्यांत प्रक्षोभ , संताप होयील. 

मंगळ वक्री स्तंभी असताना जे परिणाम होतात ते दूरगामी होतात त्यामुळे ह्या काळात वाद टाळा . आपल्या शब्द संपदेचे नको तिथे प्रदर्शन करून नको ती संकटे ओढवून घेवू नका . आपल्याला शेंबूड पुसता येत नव्हता तेव्हा उच्च शिक्षण घेतलेले आपले सगेसोयरे , आप्तेष्ट मित्र किंवा इतर कुणीही असोत ह्यांची अक्कल काढू नका म्हणजे मानहानी तरी टळेल . ह्याचे कारण चर्चा करून सामंजस्याने एखादा प्रश्न सोडवावा हा मुळात मंगळाचा स्वभाव नाही . मोठा आवाज करून शिवराळ भाषेत बोलणारा हा सेनापती आहे . काय आहे ते सर्व मलाच समजते आहे इतर सर्व बिनडोक असल्या भ्रमात राहिलात तर आयुष्याच्या सारीपाटावरून कायमचे दूर फेकले जाल . 

मग करायचे काय ? पुढील ६ महिने गप्प बसायचे हीच मोठी साधना आहे , बघा जमतंय का? ह्याचा शब्दशः अर्थ नाही हे मी वेगळे सांगायला नको. भरपूर पाणी प्या . ज्यांना बिपी चा त्रास आहे त्यांनी आगाऊ पणा करून नको तिथे वक्तव्य करायला मुळात जावूच नये आणि मग बिपी वाढले तर बोंबलू नका. स्वतःला आणि कुटुंबाला जपा . सत्तापालट होताना होणारा हिंसाचार , एक घाव दोन तुकडे कुणाच्याच फायद्याचे नसतात .  अत्यंत चक्रम डोक्याची मुले जी घरात कुणाचेही ऐकत नाहीत विशेष करून मिथुन राशीतील मंगळ असेल त्यांच्याकडे जातीने लक्ष ठेवा . 

नैसर्गिक कुंडलीत मिथुन राशी हि तृतीय स्थानात येते आणि ती संवादाची राशी आहे तसेच तिथून डावा कान , कागदपत्रे बघितली जातात . बोलताना , लिहिताना आणि कुठे सही करताना विचारपूर्वक कृती केली पाहिजे . सतत कानात हेड फोन घालून बसू नका . तृतीय भाव हा प्रवास दर्शवतो आणि मंगळ वेग. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढेल . उगीच अति वेगाने वाहन चालवणे आणि रस्त्यात भांडणे करणे टाळा.

राहू शनी दशा असलेल्या लोकांनी मुळात समाजात कमी वावरावे .काही लोकांचा राजकारण हा श्वास आहे त्यांना २४ तास दुनियादारी करायची असते त्यांना विशेष सतर्कतेचा इशारा आहे. एखादे प्रकरण अंगावर शेकेल आणि कुणीतरी पोलिसात जायील इथवर वेळ आणू नका. व्यक्तिगत कुंडलीत वक्री मंगळाची फळे भोगावीच लागतील ह्यात शंका नाही .  ह्या शास्त्रावर विश्वास नसलेल्या लोकांना आता मंगळ शास्त्र काय चीज आहे ते दाखवेल . पत्रिकेत मंगळ कुठल्या भावांचा कारक आहे , नवमांश बळ ,  षडबल किती आहे. त्यावरील पापग्रहांच्या दृष्टी , दशा आणि लग्न किती बलवान आहे ह्यावर ह्याचे परिणाम आहेत आणि जे होतील ते दूरगामी हे नक्की.  

अनेकदा स्वतःच्या आत डोकावून पहायची वेळ येते ..ती आत्ताच आलेली आहे . शनी वक्री , मंगल वक्री , ऑक्टोबर पासून गुरुही वक्री . मंगळ शनी रिअल एस्तेट एक पावूलही पुढे जाणार नाही . अडथळ्यांची शर्यत आहे . मग काय आपण श्वास घ्यायचा नाही कि काय ? घ्यायचा पण त्यांचे बोट धरून .... साधनेला लागा जे करत आहेत त्यांनी वाढवा ....

कुठल्या शब्दाने कुठले संकट ओढवेल सांगता येणार नाही ....सूज्ञास सांगणे न लगे .

उपाय :

१.  दर मंगळवारी मारुतीला जाऊन त्याच्या पायावर चिमुटभर शेंदूर अर्पण करणे .

२. हनुमान चालीसा नित्य पठण 

३ वारेमाप कष्ट 

४ आवश्यकता नाही तिथे गप्प बस ...सगळी अक्कल तुम्हालाच नाही . जगाची काळजी घ्यायला संत बसले आहेत तुम्ही तुमची काळजी घेतली तरी खूप झाले. . 

५ मंगळ भाऊबंदकी करवेल , आगी लागतील . मनातील मत्सराची ज्योत जितकी मोठी तितकी लक्ष्मी मिळवणे दुरापास्त होयील . शेवटी पैशाची सोंगे आणता येत नाहीत . 

६. मौनं सर्वार्थ साधनं  जे ज्याला समजले तो जिंकला. आपले expert मत प्रत्येक वेळी दिलेच पाहिजे असे नाही . 

सारांश असा कि ग्रहस्थिती बदलत राहणार आहे पण ह्या काळात आपल्या कडून कुणी दुखावले गेले तर पुन्हा जवळीक साधता येयीलच असे नाही . आपल्या स्वभावाला अनेकदा आयुष्यात मुरड घालावी लागते , नाती संबंध जपावे लागतात .

हा आपल्या परीक्षेचा काळ आहे म्हणूनच जो उपासनेची कास धरेल तो ह्यातून पार होणारच .

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230