|| श्री स्वामी समर्थ ||
गेल्या आठवड्यात माझ्याकडे साठीची एक स्त्री पत्रिका घेवून आली होती. यजमानांना डायलिसीस वर ठेवले होते आणि त्यांच्या सर्व रिपोर्ट शी ह्यांचे सर्व रिपोर्ट जुळत होते . त्या म्हणाल्या मला त्यांना एक किडनी डोनेट करायची आहे. उर्वरित आयुष्य आमच्या दोघांच्याही तब्येती चांगल्या राहतील ना ह्याबद्दल त्यांना काळजी होती जी त्यांच्या स्वरातही जाणवत होती. त्यांची आयुष्य रेखा बळकट असल्यामुळे मी त्यांना म्हंटले पुढे जायला हरकत नाही .
त्या स्वामींच्या सेवेत गेले कित्येक वर्ष रुजू असल्यामुळे महाराजांवर त्यांची अमाप श्रद्धा आणि विश्वास होता . आता स्वामीभक्त म्हंटल्यावर पुढे सगळ बोलणेच खुंटले. आज त्यांचा मेसेज आला. मी त्यांच्याशी बोलताना त्यांना बुधाच्या दशेचे महत्व समजावून सांगितले होते आणि म्हंटले बुधवारी हिरवा पदार्थ करा जेवणात जसे पालक मेथीची भाजी कोथिंबीर चटणी असे काहीही , बघा हिरव्या रंगाचा थेट हृदयाशी संबंध असतो . त्या म्हणाल्या मला हिरव्याच बेडशीट वर झोपवले होते . मला हसू आले एव्हड्यात ज्योतिष शिकल्या पण. असो .
आज हे उदाहरण कुठलेही ज्योतिषीय विश्लेषण करण्याच्या हेतूने नाही तर माणुसकीच्या हेतूने तुमच्यासमोर मांडत आहे. त्या दोघात असलेल्या निखळ , अपेक्षा विरहित उदात्त प्रेमाचा ह्यापेक्षा मोठा दाखला काय असू शकतो.
आजकाल लग्न हा व्यवहार झालाय तुला किती पगार आणि मला किती पगार ह्याच्या पुढे गाडीच जात नाही . एकमेकांबद्दल आदर प्रेम माया नसेल तरी चालेल मोठा पगार फक्त घरी यायला हव्या ह्या ह्या असल्या आधारावर उभी राहू पाहणारी आजकालची विवाह संकल्पना ह्या निखळ प्रेमापुढे किती कवडीमोलाची आणि तकलादू आहे ह्याचा दाखलाच आहे जणू हा.
एकमेकांची सोबत इतके वर्षांची त्यातून निर्माण झालेली ओढ , आपल्या जोडीदाराच्या जीवनाची चाललेली रस्सीखेच बघवली नाही आणि म्हणून आपल्या शरीराचा एक भाग त्यांच्यासाठी समर्पित करणारी हि माऊली आज तिच्यासमोर मी अक्षरशः नतमस्तक आहे. असे प्रेम करणारी मुठभर माणसे अजूनही ह्या जगात आहेत म्हणून हे जग अजूनही आहे .
नवरा बायकोचे नाते प्रेमावरच उभे असते , त्या नात्याला बहरायला फुलायला मायेचे खत लागते , कुठल्याही हिरव्या नोटा त्या नात्याला बांधून ठेवू शकत नाहीत हे त्रिवार सत्य आहे .
मला म्हणाल्या माझ्यासाठी प्रार्थना करा , मी त्यांना म्हंटले अहो मी कोण प्रार्थना करणारी , महाराजांनी प्रत्यक्ष येवून तुमचे ऑपरेशन केले आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज तुम्हाला पुनर्जन्म सुद्धा मिळालेला आहे.
आज गुरुपुष्य आणि आजच मला हि बातमी मिळाली तेव्हा योगायोगाने मी महाराजांच्या समोरच बसले होते . हात जोडले आणि त्यांना म्हंटले तुमच्या अस्तित्वाची प्रचीती मिळाली आणि जगायला उभारी आली .
भक्तांनी कुठलीही शंका न घेता फक्त गुरु सेवेत राहावे पुढचे सर्व ते बघायला समर्थ आहेत . आज गुरुपुष्य खर्या अर्थाने अनुभवले. श्री स्वामी समर्थ
गजानना सांभाळ आपल्या भक्तजना
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment