Thursday, 2 January 2025

कपाट

 || श्री स्वामी समर्थ ||

परवा माझे कपाट आवरायला काढले. दिवाळीत अनेक गोष्टीं आवरल्या गेल्या होत्या पण तरीही म्हंटले पुन्हा एकदा पाहावे म्हणून उघडले आणि मी भूतकाळात गेले. पूर्वी आमचे घर लहान होते आणि एका कपाटात प्रत्येकाला एकएक खण असायचा . तेव्हा गरजा खूप कमी होत्या आणि वडील आधुनिक विचारांचे नसल्यामुळे मेकअप चे समान घरात दिसण्याचा प्रश्नच नव्हता . चारचौघींसारखे आयुष्य , त्यात शाळेत घातलेल्या वेण्यांना लावायच्या लाल रिबीन इतकाच थाटमाट असायचा. तेव्हा पावडर डब्यात मिळायची आणि त्यात एक रुपयाचे नाणे असायचे ते सर्व काही डोळ्यासमोर उभे राहिले. तेव्हा कपाटातील एक खण म्हणजे १० गुंठे जमीन मिळाल्याचा आनंद होता , त्या घरातील तो माझा खण हि अगदी माझी हक्काची जागा होती . त्या खणात कपडे कोंबून भरायची वेळ येत नसे कारण तेव्हा इतके कपडे नसायचे , शाळेचा युनिफोर्म आणि बाहेर जायचे चार फ्रॉक कि संपले. तेव्हा आम्हला वाढदिवस आणि दिवाळीला ठरलेल्या किमतीत फ्रॉक मिळायचा. आता सारखी ढीगभर प्रदर्शने आणि जाता येत खरेदी तेव्हा होत नसे . असो.
एकेक कपडा आणि वस्तू काढत असताना कित्येक आठवणी मनात रुंजी घालू लागल्या . सासर असो वा माहेर प्रत्येकाने दिलेल्या त्यातील प्रत्येक गोष्टीवर त्यांच्या प्रेमाचा सुगंध अजूनही दरवळत होता . हि साडी वाढदिवसाची दिवाळीची , हे पैंजण बारशाचे , हि साडी बाबांनी खास मला दिलेली भेट , काकुनी फक्त मला आवडली म्हणून घेतलेली बहिणीच्या लग्नातील साडी अश्या एक ना दोन आठवणीनी डोळे पाणावू लागले. घर हे स्त्रीचे विश्व असते. कपडा कितीही जुना झाला अगदी फाटायला आला तरी त्यातील मायेची ऊब कधीच कमी होत नाही आणि म्हणूनच त्यातील प्रत्येक गोष्ट हृदयाच्या समीप असते. कपाट आवरता आवरता मी माझे आयुष्यच जणू गोळा करत होते , अनेक प्रसंग आठवायला लागले. मुलगा झाला तेव्हा जुन्या साड्या , बाळाचे जुने कपडे ह्यांच्या आठवणीना अजूनही जॉन्सन बेबी पावडर चा मंद सुवास येत होता .
कपाटात वस्तू कपडे नव्हते तर आठवणींची गाठोडी होती . एकेक कपडा काढत , पुन्हा घडी घालताना कधी खुदकन हसू येत होते तर कधी डोळे पाणावत होते , कधी वय विसरून शाळेत गेले तर कधी बोहल्यावर उभी राहिले, कधी घरातील पूजेचा थाटमाट आठवला तर कधी दिवाळीचे प्रसंग . किती जगलो आपण काय काय मागे टाकून पुढे गेलो आणि काय काय हृदयाशी धरून ठेवण्याचा प्रयत्न केला. किती माणसे आली किती गेली , किती खस्ता खाल्या आणि किती अश्रू ढाळले , कधी कोडकौतुक झाले तर कधी एकटेपण आले, कधी जवळच्याच लोकांनी परके केले तर कधी अनोळखी लोकांनी मैत्रीचा हात पुढे केला . एक ना दोन प्रसंगामागून प्रसंग समोर उभे राहत होते आणि मीच माझ्या आयुष्यात फेरफटका मारत होते .
आज मागे वळून पाहताना जाणवले ते असे कि लहानपणी मोठ्या कपाटातील एक खण हेच माझे विश्व होते , त्या खणाने मला माझ्या गरजा सीमित ठेवायला शिकवले. नाती जपायला शिकवली माणसाना सुद्धा घट्ट धरून ठेवायला शिकवले. आज एक मोठाच्या मोठा अक्खा wardrobe असूनही तो कमी पडत आहे. त्यावेळच्या एका खणात जे सुख होते ते आज नाही हे खर्या अर्थाने जाणवले. माझे बाबा नेहमी म्हणत अग एका देहाला किती कपडे लागतात , किती पादत्राणे लागतात . आपणच आपल्या गरजा वाढवून ठेवल्या आहेत . आज दिवस बदलले आहेत , पैसा खिशात असतो मग आवडले कि हे आणा ते आणा चालूच राहते . चार कपडे असले कि त्यातील एक घालायचा फार चिंता नाही पण आता गणित बदलले आहे , आता खूप कपडे असल्यामुळे नेमका घालायचा कुठला हा विचार करत तासंतास कपाटासमोर उभी राहते . हा कि तो घालू हा जणू जीवन मरणाचा प्रश्न बनून जातो .
कपाट लावून झाले पुन्हा वर्तमानात आले. कपाटाचे दार लावले पण अनेक नात्यांचे द्वार ह्यामुळे खुले झाले. अनेक वेळा ज्यांना फोन करायचे राहून जाते , साधी खुशाली विचारण्यासाठी सुद्धा फोन केला जात नाही अश्या अनेकांच्या नात्यांची सैल झालेली वीण पुन्हा विणण्याचा मनापासून प्रयत्न केला , त्यातील गोडवा प्रेम जपणे आणि ते टिकवून ठेवणे किती महत्वाचे आहे हे आज शिकले.
आपल्या घरातील प्रत्येक वस्तुत नात्यांचे बंध असतात , अगदी घराच्या भितीना लावलेल्या रंगापासून ते स्वयपाक घरातील भांडी सगळ्या सगळ्यात एकच संदेश असतो , घराला घरपण आणणाऱ्या ह्या वस्तूंसोबत नातीही जपा , वृद्धिंगत करा .
नुसतीच हि साडी मला माझ्या अमुक अमुक नातेवाईकाने दिली हि नुसतीच आठवण काढण्यापेक्षा त्या व्यक्तीला फोन करा तिला ते सांगा आणि प्रेम ते प्रसंग तसेच मनात ताजे तवाने ठेवण्याचा प्रयत्न करा . मी ते करण्याचा प्रयत्न करतेय ..तुमचे काय ..जमवा करा आणि तुमचाही अनुभव कळवा..
आज ह्या कपाट लावण्याच्या मोहिमेने माझी नात्यांची वीण तर घट्ट केलीच , आठवणीना उजाळा दिला आणि नव्याने जगायलाही शिकवले. कपाटाचे द्वार बंद करताना मनाचे अनेक रिते आणि भरलेले सुद्धा कप्पे माझ्याही नकळत उघडले गेले.
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230

No comments:

Post a Comment