|| श्री स्वामी समर्थ ||
एका इमारतीत अनेक लोक आपापल्या घरात राहत होते , खूप श्रीमंत नसले तरी खाऊन पिऊन सुखी होते , एकमेकांच्या दुखल्या खुपलयाला मदत करत , एकंदरीत सर्व चांगले चालले होते . त्यांच्यात एक मात्र दीड शहाणा होता . हवे तसे वागायचे , हवे तसे बोलायचे , कश्यालाच ताळतंत्र नव्हता . सगळ्यांना त्यांच्या वागणुकीचा अत्यंत त्रास होत असे. मग भांडणे , शिवीगाळ हा तर नित्याचाच कार्यक्रम झाला होता आणि सगळ्यांना रोजची डोकेदुखी झाली होती . इमारत स्वतःची खाजगी मालमत्ता असल्यासारखे वागणे होते , असो .
काही दिवसांनी ह्या व्यक्तीला शनीची दशा सुरु झाली आणि शनीचे साम्राज्य सुरु झाले. बघता बघता दिवस पालटले आणि व्यक्तीला अनेक लहान मोठ्या आजारांनी घेरले . पण म्हणतात ना जित्याची खोड . हम करेसो कायद्याने वागणे चालूच होते , अहंकार पोहोचलेला जराही कमी होईना आणि तो दिवस आला. खूप जोरात अर्धांगवायूचा झटका आला आणि माणूस जागेला लागला . कुणाच्या तरी आधाराशिवाय दोन पावले चालू शकत नव्हता .
शनी वायु तत्वाचा आणि दंडाधिकारी . ह्या जगात कुणीही कसेही वागेल आणि कुणाला असे वाटत असेल कि आपण कुणालाही उत्तर द्यायला बांधील नाही तर हा भ्रम आहे. नवग्रहातील ग्रह शनी आणि त्याची दशा किंवा साडेसाती जेव्हा येते तेव्हा चढवलेले सगळे खोटे मुखवटे गळून पडतात . रात्रीची झोप उडते ती कायमचीच . आपण केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब त्याच्याजवळ असतो आणि त्याचीच शिक्षा म्हणून कि काय अनेक मानसिक समस्या आणि शारीरिक व्याधी मागून एका मागून समोर उभ्या राहतात .
दुसर्याला त्रास देताना , एखाद्याची त्याच्यामागे निदा करताना , कुणाच्याही चारित्र्यावर शिंतोडे उडवताना , सतत दुसर्याला पाण्यात बघताना , दुसर्याचा तिरस्कार , अपमान , टोमणे मारताना आपल्याला खूप मजा येते . पण वेळ आली कि सगळी धुंदी एका क्षणात उतरते . आपल्याला कुणाच्याही आयुष्याचे मोजमाप करण्याचा अधिकार देवाने अजिबात दिलेला नाही . आपण आपल्या पायाखाली काय आहे ते आधी बघावे आणि मग इतर गोष्टी . दुसर्याच्या आयुष्यात डोकावण्याचा स्वयं सिद्ध अधिकार जन्मालाच घेवून आल्यासारखे जे वागतात त्यांचे हाल काय शनी करेल ह्याबद्दल बोलणेच नको . समाजात वावरताना लोकांना अपमानास्पद बोलणे , तसे वागवणे , चारचौघात समोरच्याचा अपमान निर्भत्सना करणे ह्या गोष्टींची शनी दखल घेत नसेल असे वाटत असेल तर डोक्यातून हा विचार जितक्या लवकर काढता येयील तितका बरा.
अश्या व्यक्तींची साडेसाती आणि शनी दशा ह्यात शनी इतका मोठा धडा शिकवतो कि त्यापासून इतरांनीही वाईट न वागण्याचा धडा घ्यावा . अपराधाला माफी नाही आणि शिक्षा होईल असे वागूच नये कारण शिक्षा झाल्यावर मात्र पश्चातापाशिवाय हाती काहीच लागत नाही .
आपले आयुष्य जगताना कर्म शुद्ध ठेवावीत , इतरानाही मदत करत राहावी . आपल्या घरातील नोकर चाकर , आपल्या इमारतीचे सुरक्षा कर्मचारी , दुधवाले , पेपरवाले , प्लंबर , सुतार ह्या सर्वांशी आदराने वागा , त्यांना गुड मोर्निंग म्हणून त्यांचाही दिवस चांगला जावूदे . गरजवंताला मदत करणे हे पुण्याचेच काम आहे पण कारण नसताना कुणाला त्रास दिला तर मग त्याचा सगळ्याचा हिशोब शनी दशेत चुकता होईल आणि तोही अश्या प्रकारे होईल कि क्षणाक्षणाला माणूस मरणाची भिक मागेल ....दुसर्याला त्रास देणे , कुणाचे पैसे लुबाडणे , एखाद्याच्या असहाय परिस्थितीचा फायदा घेवून चुकीच्या मार्गाने धाक दाखवून जमीन हडपणे , अत्यंत हृणास्पद नीच वृत्तीचे राजकारण , पैशाचे गैरव्यवहार , माणसे वापरून फेकून देणे आणि माणुसकीला काळिमा फासणारी अनेक कृत्ये करताना शनीची आठवण येवूदेत, त्याचा विचार मनात सतत असुदे .
आज सगळे जण आपली नित्याची कामे करत आहेत पण ती व्यक्ती मात्र एका जागी खिळून आहे ....उरलाय फक्त पश्चात्ताप आणि हीच मोठी शिक्षा पण आहे.
आत्ता शनी चे पुष्य नक्षत्र चालू आहे.....नोकरी धंदा व्यवसाय ह्याचा कारक सुद्धा शनीच आहे तो सुरळीत हवा असेल तर वर उल्लेख केल्याप्रमाणे कधीही वर्तन करू नका.
ओं शं शनैश्चराय नमः
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment