Thursday, 2 January 2025

समाराधना – साधना 24 मिनिटांची

 || श्री स्वामी समर्थ ||

आज मार्गशीर्षातील आणि ह्या 2024 मधील सुद्धा अखेरचा गुरुवार. संपूर्ण मार्गशीर्ष मास महाराजांनी सेवा करून घेतली. कृतकृत्य वाटले , मानसिक समाधान मिळाले आणि जगायला बळ आले. पहिला गुरुवार दुधाचा , दुसरा गुरुवार चंदन , अष्टगंध , कस्तुरी , केशर , हीना , अत्तर ह्याचे लेपन आणि अभिषेक ,तिसरा गुरुवार पंचामृत आणि आज चौथा गुरुवार सुवासिक फुलांचा अभिषेक अशी सेवा त्यांनी करून घेतली . आज घराचे अक्कलकोट झाल्याचे आत्मिक समाधान आणि अनुभूती मिळाली . 


अनेक दिवस इतर कामाच्या व्यापात लेखन मागे पडले आज हा लेख त्यांच्या चरणी रुजू करत पुनश्च हरिओम करत आहे . महाराजांनी समाधान आणि सेवेची संधी देवून सगळीच कसर भरून काढली. महाराजांच्या सेवेत आत बाहेर काही उरत नाही , ते आणि आपण कधी एक होवून जातो समजत सुद्धा नाही .

नवजात बालकाचे आई हेच विश्व असते अगदी तसेच आपल्या सर्व भक्तांचे “ महाराज “ हेच भावविश्व आहे. प्रत्येक क्षण त्यांच्या विचारात सेवेत नामात घालवणे हेच प्रत्येक भक्ताचे परम कर्तव्य आहे. आज चमेली , बकुळी , चाफा, मोगरा , गुलाब , निशिगंध , जाई ह्या फुलांच्या ताटव्यात महाराज विराजमान आहेत आणि त्याचा सुगंध माझ्या मनात दरवळत आहे. आपली प्रत्येक भक्ती हाक कळकळ सर्व काही त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचत असते ह्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. 


आजकाल प्रत्येक क्षण आव्हानात्मक आहे. नोकरी व्यवसायाचा प्रचंड ताण , आर्थिक समस्या , विवाह , घरासाठी धडपड आणि आरोग्य ह्या सर्वातून आपला प्रवास खरतर अनेकदा असह्य होतो पण आपले महाराज सगळ्यातून आपल्याला अलगद बाहेर काढतात , शेवटच्या क्षणी काय चमत्कार करतील माहित नाही पण जिथे सगळ्या आशा लोप पावतात तिथेच नेमका सूर्योदय होतो आशेचा किरण दिसतो आणि महाराजांच्या असण्याची त्यांच्या दिव्यत्वाची प्रचीती येते , डोळ्यातून झरझर आनंदाश्रू वाहू लागतात , हे अशक्य वाटणारे शक्य करणारे आपले गुरूच आहेत ह्याची पोच पावती आपल्या मनाला क्षणात मिळते आणि त्यांच्यावरील श्रद्धा द्विगुणीत होते. 

समाराधना आयुष्यात मनाच्या स्थिरतेसाठी आत्यंतिक महत्वाची आहे .  पैशाची गणिते जमणे हे आव्हान आहे आणि ती जेव्हा जमत नाही तेव्हा माणूस चिडचिडा होतो आणि सगळ्यावर राग काढत राहतो . सगळ्या समस्यांचे मूळ काहीही असो पण त्यावर जालीम उपाय म्हणजे साधना , नाम . पण ते घेणार कोण ? आपणच . साई बाबांनी सुद्धा भक्तांना सांगितले आहे “ If you look at me I will look at you “. रात्रीची शांत झोप , समाधान आणि जीवनातील सर्व गोष्टींचा आनंद खर्या अर्थाने उपभोगायचा असेल तर नामस्मरण हा रामबाण आणि एकमेव उपाय आहे. करून बघा . 

जराजराश्या गोष्टीनी सुद्धा क्षणात हवा डोक्यात जाणारे आपण सर्वच , कितीही भक्ती केली तरी मोहात सहज अडकणारे आणि अहंकाराची हवा डोक्यात आपल्याही नकळत जाणारे आपण भक्त आहोत पण हे होते ते स्वीकारून त्यातून परावृत्त होण्यासाठीच तर गुरुचरणांशी आपली धाव आहे. त्यांनीच घडवले आहे आपल्याला. आपल्या बापाला बरोबर माहित आहे आपला घोडा कधी उधळणार आणि त्याला कसा लगाम घालायचा . नाम हाच ह्या सर्व उन्मत्त झालेल्या भावनांचा लगाम आहे आणि महाराज बरोबर आपला कान धरून जपा ला बसवतात . एकदा त्या नामाची गोडी लागली कि मग भक्त आणि महाराज ह्यातील अंतर कमी होत जाते . कधी आपल्याही नकळत आपण अहंकाराने वागतो कारण शेवटी आपण सामान्य माणूस आहोत पण चूक समजली कि ती सुधारणे तरी निश्चित आपल्या हातात आहे आणि म्हणूनच नाम हवे . 

आपल्या दिवसाचे २४ तास असतात . प्रत्येक तासाचा फक्त एक मिनिट अशी दिवसातून फक्त न चुकता मनापासून जर फक्त २४ मिनिटे महाराजांचे “ श्री स्वामी समर्थ “ हे नामस्मरण केले तर आयुष्य 180 अंशात फिरेल ह्यात शंकाच नाही. दिवसाचे २४ तास प्रत्येक क्षण ते आपल्याला सांभाळतील . हि साधना करण्यासाठी एक वेळ जमल्यास निश्चित करावी आणि जागा सुद्धा , काही दिवसांनी महाराज सुद्धा त्याच वेळी आपल्यासमोर बसल्याचा भास नाही तर प्रत्यय तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाहीत . महाराजांशी मनसोक्त गप्पा मारत नामस्मरण करणे हि प्रचंड मोठी अनुभूती आहे. 

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ह्या उक्तीला धरून आज मार्गशीर्ष महिन्यातील अखेरचा गुरुवार हाच सुमुहूर्त धरून साधनेला सुरवात करुया. तुम्ही तर कराच पण आपले स्नेही , आप्त , शेजारी जे कुणी ओळखीचे असतील त्यानाही ह्या कळपात सामील करा . वर्षातून निदान एक भक्त तरी तयार करा , जितके वर्ष जगू तितके भक्त तयार केले तर हि स्वामिसेवेची धुरा अखंड समाधान देत राहील . प्रत्येक क्षण सद्गुरुचरणी अर्पण . खरे सांगू का मला प्रत्येक क्षण महाराजांनी आनंदात ठेवले आहे कारण कुणाशी स्पर्धा नाही आणि काहीही मिळवायचे नाही त्यामुळे हा जीव कुठेही आणि सदैव आनंदात असतो . मनात सतत महाराजांचे विचार , डोळे मिटले तरी शेगाव आणि उघडले तरी अक्कलकोट अशी मनाची अवस्था आहे. जे काही घडत आहे ते त्यांच्या कृपेने आणि घडणार आहे तेही त्यांच्या कृपेने , आपला हा जन्म त्यांच्या सेवेत राहून सार्थकी लावायचा आहे ह्याची खुणगाठ मनाशी प्रत्येक भक्ताने बांधली पाहिजे. त्यांच्या इच्छेत आपली इच्छा विलीन करून स्वस्थ राहावे . जे होईल ते त्यांच्या कृपेने ह्यावर आपला दृढ विश्वास असला पाहिजे . 

“ हम गया नही जिंदा है “ हे सांगून आपल्या भक्त गणांना आश्वस्त करणाऱ्या माझ्या ह्या गुरु माऊली च्या चरणाशी मी सदैव नतमस्तक आहे.

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

No comments:

Post a Comment