|| श्री स्वामी समर्थ ||
आजकाल अक्षरशः डोकेदुखी झालेल्या “ विवाहा “ बद्दल दोन शब्द . मुलाचा फोटो नंतर त्याचे संस्कार गेले चुलीत ,त्याचा पगार किती तो आधी बोला अशी परिस्थिती सध्या आहे. मुलाचे आईवडील आपल्या मुलासाठी स्थळ शोधणार तरी कसे कारण मुलींचे पोतेभर पगार आणि अवाजवी अपेक्षा ह्यामुळे हताश झाले आहेत . आजकाल मुलींचे पगार भरमसाट अर्थात कर्तुत्वाने मिळवलेले ( पण तेच आज लग्नाचा मोठा अडथला होवू पाहत आहेत ) आणि आणि मला १० लाख पगार मग मला २० लाख पगार असलेला मुलगा हवा किंवा त्या पेक्षा अधिक हवा . संसार ह्या शब्दाचा अर्थच कुठेतरी हरवत चालला आहे . आधीचे ते कांदेपोहे बरे म्हणायची वेळ आली आहे. अरे काय चाललाय काय ?????
भानावर या लवकर नाहीतर त्या २० लाखांच्या नोटांशी विवाह करावा लागेल. पैशावर प्रेम केलेत तर तेच मिळेल , आयुष्यभर पैसा मिळत राहील सुख सुविधा मिळतील पण नवर्याचे प्रेम मिळणार नाही . कारण हाच पैसा मिळवायला स्वतःचे so called status जपायला तो घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा कॉम्पुटर घेवून काम करत राहील आणि जगणेच पर्यायाने सहजीवनाचा आनंद गमावून बसेल.
लवकर भानावर या नाहीतर मुलांचे /मुलींचे विवाह आपल्या उभ्या हयातीत पाहायला मिळणार नाहीत . हे ऐकायला आणि वाचायला त्रासदायक आहे पण त्रिवार सत्य आहे आणि हे चित्र आपणच बदलू शकतो .
परवा एक मुलगी पगार ३ लाख तिला हवा नवरा १० लाखाचा . तिला मी म्हंटले अग तुला आणला तुझ्या मनासारखा १० लाखाचा बहुला पण तो स्वीकारेल का तुला ? तो म्हणेल मला हवी १० लाखाची बाहुली त्याचे काय करणार आपण ? आपण काय आहोत आणि काय अपेक्षा करत आहोत ह्याचा कुठेही ताळमेळ नाही . एकतर मुलगा पुण्यातील हवा नाहीतर थेट अमेरिका .अग्गोबाई ???? मध्ये काही नाही कि काय . मध्ये काय सगळी वाळवंट आहेत कि काय ? आपण स्वतः सदाशिव पेठेतून बाहेर आलो नाही आणि जायचे ते थेट अमेरिका . असो .
माणूस पैसा मिळवायच्या मागे लागला कारण ऐहिक स्खासाठी तो आवश्यक आहे अगदी मान्य पण जेव्हा पैसा हाच विवाह ठरण्याचा निकष लागतो तेव्हा गणिते बदलत जातात . माझ्या वर प्रेम करणारा , मला माणूस म्हणून समजून घेणारा , माझ्या आवडी निवडी माझे छंद ह्यांना प्रोत्चाहन देणारा असा नवरा हवा असे एखाद्या तरी मुलीने म्हणावे . सतत पैशाचा चष्मा लावून बसलात तर असंख्य आनंदाच्या क्षणांना मुकाल आणि भानावर याल तेव्हा वेळ नुघून गेलेली असेल.
मुलीला १० लाख पगार म्हणून अनेक त्याही पेक्षा कमी पगार असणारी स्थळे नाकारायची मग उरणार काय ओंजळीत सगळच वाहून जायील. मुळात पैसा हा विवाहाचा निकष हे समीकरण न पटणारे आहे . स्त्रियांना शिकवले त्यांच्या पायावर उभे राहण्यास त्यांना आचार विचारांनी स्वावलंबी केले हे कुठे चुकले कि काय पालकांचे ? नाही काहीच चुकले नाही पण चुकत आहेत ते ह्या गोष्टीना अवास्तव महत्व दिल्यामुळे . मुलींची वय सुद्धा ३५ शी ओलांडत आहेत . मला ८ लाख पगार आहे आणि मुलालाही तितकाच किंवा अगदी एखादा लाखभर कमी असला तरी चालेल . दोघांचे होतात कि १५-१६ लाख त्यात संसार सुखाचा नक्कीच होईल . आपल्या आईवडिलांनी नाही का केला त्यांना कुठे होते लाखांनी पगार . पण त्यांचा विवाह संस्था , सहजीवन ह्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता .
आज त्यांचाच तो सहजीवनाचा आनंद देणारा चष्मा पुन्हा एकदा डोळ्यांना लावायची नितांत गरज आहे. पुढे जावून आता पालकांनी सुद्धा आपली धोरणे थोडी बाजूला ठेवून मुलामुलींशी बोलले पाहिजे , आजकालची मुले हुशार आहेत त्यांना फक्त एक वेगळा संसाराचा आरसा दाखवण्याची गरज आहे. भौतिक सुखे हवी त्यासाठी लागणारा पैसाही हवा पण मिळवलेला पैसा उपभोगायला आपणही घरात हवे .
काय होतंय पैसा हाच निकष प्राथमिक किबहुना तो एकमेव निकष झाल्यामुळे मुलींची स्थळे शोधताना गुण ,पत्रिका गोत्र सर्व व्यवस्थित असेल तरी पगारावर सर्व गाड्या येवून थांबतात . पुढे कसे जायचे कारण मुलाचा पगार कमी आहे असे होतेय . माझ्या मते अनेक स्थळे पुढे बघण्याचे कार्यक्रम भेटी गाठी सुद्धा होत नाहीत कारण मुळात मुलीचा पगार अधिक त्यामुळे पुढचे सर्व थांबते . अनेकांना हे अनुभव येत असतील.
आपली विचारसरणी बदलायची वेळ आता आली आहे , आपले अहंकार ( जे आपल्याला आयुष्यभर एकटे ठेवू शकतात ) ते वेळीच आटोक्यात आणण्याची गरज आहे. दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे. एकदा वेळ निघून गेली कि गेली मग कितीही अक्कल आली तरी उपयोग नाही . मुळात विवाह हा एक आनंद सोहळा आहे. आईवडिलांसाठी आपल्या मुलांच्या डोक्यावर अक्षता पडणे ह्यासारखे सुख दुसरे असूच शकत नाही . ज्याच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले , वेळप्रसंगी पोटाला चिंता काढून मुलांच्या गरजा त्यांची शिक्षण केली त्यांचा सुखाचा संसार पाहायला मिळावा हि एकमेव इच्छा उराशी असलेले पालक आज हतबल झाले आहेत . विवाह म्हणजे सुखाची देवाण घेवाण , दोन जीवांचे मिलन तेही आयुष्यभरासाठी , दोन कुटुंबांचे एकत्र येणे ह्यात पैशाची गणिते आलीच कुठून ?
सगळेच राजकुमार परीकथेतील नाहीत सगळेच BMW मधून येणार नाहीत , जो तुमचे मन जिंकून संसार सुखाचा करेल तोच तुमचा खरा खुरा राजकुमार असेल आणि तोच तुमचा सुयोग्य सहचर सुद्धा.
आज हा लेख वाचून निदान एका मुलीने किंवा मुलाने आपल्याला आलेल्या स्थळांचा पुनर्विचार केला आणि आपला जोडीदार शोधला तर त्यासारखा आनंद माझ्यासाठी दुसरा नसेल .तो आनंद खरच आमच्या सगळ्यांच्या ओंजळीत येण्याची कास धरून आहोत. विचार बदला , आपल्या आवडी निवडी , आवश्यकता , मला विवाह का करायचा आहे ? ह्याचे सर्व आराखडे पुन्हा एकदा कागदावर मांडा , चुकलेली गणिते पुन्हा सुधारा , पुन्हा मांडा . ह्यातून हाती लागेल तो फक्त आनंद हे नक्की . पैसा हीच विवाहाची इतिपुर्तता नाही तो आयुष्यभर मिळवायचाच आहे , पण आज जाणारे वय पुन्हा मिळणार नाही ते मात्र मागे फिरवता येणार नाही .
संसार सहजीवन ह्याची खरी व्याख्या म्हणजे एकमेकांची सोबत , सहवास असणे हि आहे , पैशाच्या तराजून विवाह तोलण्याची गल्लत आपण करत आहोत . पैसा पैसा करत अनेक उत्तमातील उत्तम स्थळे हातातून निसटून जात आहेत आपल्या ह्याचे भान हरपत आहे. वास्तवात कधी जगणार आहोत आपण ? सगळे सगळे दूर ठेवून वास्तव स्वीकारण्याची गरज आहे आणि तसे झाले तर येत्या लग्न सराईत अनेक आई बाबा सासू सासरे झालेले पाहायला मिळतील. परमेश्वरा अगदी तसेच होवूदेत .स्वामी आता तुम्हीच काहीतरी करा असे म्हणायची वेळ आली आहे .
एका संतावाचून विचारांचे परिवर्तन कुणी न करून शके आण , सत्य एक त्यांनाच कळे.
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment