|| श्री स्वामी समर्थ ||
अनेकदा ज्योतिषाला काय विचारावे ह्याचा सारासार विचार सुद्धा प्रश्नकर्ता करत नाही. एकदा ज्योतिषी आपल्या तावडीत सापडला कि प्रश्नांची जणू सरबत्ती चालू होते. शास्त्र सांगते कि समस्या निर्माण झाल्याशिवाय प्रश्न विचारू नये . असो .
एका स्त्रीने तिच्या बाळाचे नामकरण करण्यासाठी आद्याक्षर काय ठेवावे हे विचारले . तेव्हड्यावर समाधान नाही पुढे अनेक प्रश्न . त्या चिमुकल्या बाळाने नीट डोळे उघडून जग सुद्धा पहिले नाही त्याबद्दल प्रश्न येतातच कसे? एखादी शांत लागली असेल तर ती करायची कि नाही हा प्रश्न अगदी योग्य . असो अनेकदा इतर कुणीतरी सांगितलेले आपल्याला विचारात राहतील. ज्याने सांगितले त्याला विचारा . काय बोलावे समजत नाही . आजकाल ज्योतिष हा खेळ झालाय . स्वस्त आणि मस्त असे दुर्दैवाने म्हणायची वेळ आलेली आहे. कमीतकमी डझन भर ज्योतिषांकडे जाण्याची सवय ( सगळेच नाही काही अपवाद निश्चित आहेत ) आणि दिलेल्या मानधनात जणू काही ज्योतिषाला विकत घेतल्याच्या अविर्भावात प्रश्नांची सरबत्ती .
शास्त्र आपल्या जागी आपण आपल्या जागी .त्याचा योग्य वेळीच उपयोग करा त्याचा खेळ किंवा बाजार प्रश्नकर्त्या ने किंवा शास्त्र जाणणाऱ्या व्यक्तीने सुद्धा कधीच करू नये .
ज्योतिष ज्योतिष सारखे केले तर जगण्यातील आनंद निघून जातो . मला अनेकदा फोन येत असतात “ ताई आता मंगळ मिथुनेत वक्री होणार माझ्या सप्तमात मग कसे होईल माझे ? , आता शनी षष्ठात मग मी आजारी पडेन का? अरे काय चाललाय . डोक्यातून मंगळ राहू काढून टाका ते शत्रू नाहीत आणि मित्रही नाहीत . काही झाले कि साडेसाती आणि काहीही वाईट झाले कि पकडा त्या शनीला हे आता पुरे झाले. ग्रह तुमच्याच कर्माची फळे देत आहेत . आपल्या कर्माची फळे मिळण्यास ग्रह हे नुसते मध्यम आहे तेव्हा काही चांगले किंवा वाईट झाले तर ग्रहांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही ती तुमचीच कर्मे आहेत मग ती खूप चांगली किंवा वाईट असोत . आपली कर्म सांभाळा ती सांभाळली तर शनी सुद्धा दाता आहे. पण आपल्याला काहीच करायचे नाही नुसते उपाय सांगा करायचे आणि मुंडी हलवायची पण जागचे उठायचे नाही . हवे तर तो मारूतीच येयील आपल्या दर्शनाला आपल्या घरी अश्याच अविर्भावात वावरलो तर पदरी काय पडणार आपल्या ? सुख तर नक्कीच नाही . बघा विचार करा .
आपण फार साधी माणसे आहोत त्यामुळे मस्त जगा. आपले स्वामी आहेत आपल्याला अखंड सांभाळत आहेत . ज्योतिष हा चाळा झालाय अनेकांसाठी . उद्या भाजी कुठली करू ? आज पिठले करू का? नाही आज गुरुवार आहे पिवळा पदार्थ करू का ? हे विचारायला सुद्धा फोन नाही आले म्हणजे मिळवले.
परमेश्वराने इतके सुंदर जीवन आपल्या पदरात टाकले आहे आणि रोजचे २४ तास . भरपूर वाचन , लेख, व्यायाम , रोजची घरातील नित्याची कामे आणि साधना आणि प्रामाणिक कष्ट करत जीवन व्यतीत केले तर काहीही कमी पडत नाही आणि शेवटी आपले भोग आहेत ते कुणालाही चुकले नाहीत . पण उगीचच सतत च्या व्यर्थ चिंता करून आजचा अनमोल क्षण जगायचा राहून जातोय त्याचे काय .
कश्याला चाचपडत बसायचे सारखे त्या भविष्यातील अंधारात , उलट आपल्या कर्तुत्वाने , चांगल्या कर्माने तो अंधार दूर कसा होईल हे पाहण्यासाठी उत्तम काम करा आणि वर्तमानात जगा. अनेकदा आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्या स्वप्नवत ठरतात म्हणजे त्या प्रत्यक्षात घडतच नाहीत त्या आपल्या कल्पनेतच घडतात फक्त . समजतंय का ? उगीच मुलगा १० वीत आहे आणि त्याचे लग्न होईल ना नीट , त्याची बायको कशी असेल असे प्रश्न सुद्धा मनात येतात कसे ह्याच आश्चर्य वाटते मला. येणारे बालक त्याचे भाग्य घेवून जन्माला आलेले आहे . अनेकांना आज मुल होत नाही पण तुम्हाला झाले आहे. आज तुम्ही आई झालेल्या आहात आणि ते परम सुख आहे त्याचा आनंद घ्या , त्या चिमुकल्याच्या बाळाच्या बाळलीला त्यात रममाण व्हा कारण हे सुखाचे दिवस परत मिळणार नाहीत अनुभवायला . मुल पटकन मोठी होतात म्हणून त्याचे लहानपण त्याच्या सोबतीने अनुभवा आणि हे क्षण जपून ठेवा .
आयुष्यातील प्रत्येक क्षण खरच अनमोल आहे आणि तो तुमचा आहे, त्याचा आनंद घ्या , इतर चिंता व्यर्थ आहेत ...इतकेच सुचवावेसे वाटते.
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment