Thursday, 29 April 2021

कर्म गती

|| श्री स्वामी समर्थ ||


आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला घटनेला आपणच जबाबदार असतो. पण मनुष्य स्वभाव म्हणजे चांगले झाली कि आपले आणि वाईट झाले कि दुसर्यावर , साडेसातीवर खापर फोडून आपण मोकळे होतो.

खरतर सगळे आधीच ठरलेले असते त्यालाच विधिलिखित म्हणतात . आयुष्यातील प्रत्येक घटना त्या त्या क्रमाने आपल्यासमोर येत राहतात . ह्या सगळ्याचा आपल्या पूर्व संचीताशी नक्कीच संबंध आहे किबहुना आपले आजचे आयुष्य हे गत जन्मीचा आरसा म्हंटले तर वावगे ठरू नये. एखादा दिवस किंवा एखादा निसटता क्षण आपल्याला दुक्खाच्या खाईत ढकलतो तर एखादा क्षण आनंदाच्या उत्तुंग शिखरावर नेवून ठेवतो. पण खरा माणूस तोच जो कुठल्याही परिस्थितीत आपल्या मनाचा समतोल राखेल. आनंदाने हर्षवायू होऊ देणार नाही आणि दुखाने गर्भगळीत होणार नाही  ,हताश निराश सुद्धा होणार नाही. 

शांतपणे विचार केला तर होत असलेल्या ,झालेल्या आणि होणार्याही प्रत्येक गोष्टीला आपणच जबाबदार असतो. एखाद्या गोष्टीचे सुख नाही म्हणजे नाही मिळत आपल्याला मग कितीही डोके आपटा. अन्य सुखे समोर हात जोडून उभी असतात पण म्हणतात ना आहे त्याची किंमत नसते तसेच .जे नाही ते मिळवण्याचा  अट्टाहास असतो आणि मग ते मृगजळासारखे पुढेपुढे जात असते.

अगदी प्रत्येक प्रसंग , घटना ह्यांचा मागोवा घेतला तर आपणच ह्या सर्वाचे मूळ असतो हे लक्ष्यात येयील. उदाहरण द्यायचे झाले तर धावत बस पकडताना किंवा ट्रेन पकडताना आपण पडलो आणि लागले तर आपण केलेली व्यर्थ घाई आपल्याला नडली .

एखादा शेअर बुडला तर आपण अभ्यास न करता तो विकत घेतला का हा विचार केला पाहिजे . परीक्षेचा पेपर चांगलाच असतो पण आपण अभ्यास नाही केला तर तो कायम कठीणच असणार आहे .एखादा पदार्थ घाईत केला म्हणून बिघडला का? रोजच्या जीवनातील अश्या असंख्य  घटनांचा परामर्श घेतला तर आपली अनेक उत्तरे आपल्यापाशी असतात हे समजते. 

आपल्या मुलांकडून आपल्या आभाळा इतक्या अपेक्षा असतात .मोठी झाल्यावर त्या पूर्ण नाही झाल्या कि आपण हताश होतो. मुले हि सुद्धा स्वतंत्र व्यक्तिमत्वे आहेत ,त्यानाही त्यांची मते आणि so call space आहे. मुलांनी आपल्यासाठी  काही करावे हि अपेक्षा ठेवली म्हणून बरेचदा अपेक्षाभंग पदरी पडला. पण कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांच्याबाबत आपली सर्व कर्तव्ये केली  आणि त्यांनी पुढे आपल्यासाठी खूप काही केले तर तो आपला बोनस असेल.  आपल्या म्हातारपणाची काठी म्हणून त्यांना वाढवत नाही आपण किबहुना आयुष्यभर त्यांच्या साठी जे काही केले ते एनकॅश करण्याच्या उद्देशाने केले तर ते पाप होईल.

प्रत्येक गोष्ट कुठल्यातरी अपेक्षेने करणे हा मनुष्य स्वभाव आहे. त्यात आपण देवालाही सोडले नाही. माझी अमुक एक इच्छा पूर्ण कर मी ५ नारळाचे तोरण बांधीन हा चक्क व्यवहार झाला पण आपण ते अगदी बिनदिक्कत करत असतो. शेवटी आपण सामान्य माणसे आहोत त्यात्या वेळी जे जे सुचेल ते आपण करत राहणार हे नक्की .पण चांगल्याचे  श्रेय नेहमी स्वतःकडे आणि पराभवाचे खापर इतरांवर  हे बदलले पाहिजे.

मुलांना मोठेपणी व्यसने लागली किंवा ती निर्णयक्षम नाही झाली किंवा दिशाहीन झाली तर ती अंशतः  नक्कीच आपलीच जबाबदारी आहे. विचार करा पटेल. माझा मुलगा माझ्याशी घरात बोलत नाही , आमचे ऐकत नाही हि वाक्य आजकाल अनेकदा कानावर पडतात . लहानपणापासून एकतर त्यांना नको तितकी मोकळीक देणे त्यांच्या चुकांवर “ सगळे हेच करतात “ म्हणून सतत पांघरून घालणे ,त्यांच्या चुका दिसत असून सुद्धा दुर्लक्ष करणे किबहुना त्याचा बडेजाव करणे ह्या सगळ्याचा  परिणाम असंच होणार मग. त्यांना मोठे करताना आपण सुद्धा पुन्हा नव्याने त्यांच्यासोबत आपले बालपण जगत असतो .

आपली मुले अचानक आपले ऐकत नाहीत असे होत नाही . लहानपणापासूनचे घरातील संस्कार , त्यांच्याशी अगदी लहान सहान गोष्टीतील केलेले हितगुज हे सर्व आपल्या आणि मुलातील बंध घट्ट करत असतात . मुलांच्या मनात आपल्याबद्दल , आपल्या कुटुंबाबद्दल वाटणारे प्रेम आणि विश्वास हा अभेद्य असलाच पाहिजे  आणि त्यांच्या मनात त्या भावना निर्माण करणारे कुटुंबातील वातावरण आपण सर्वांनी ठेवले पाहिजे .थोडक्यात काय ते त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न आपण कधी केला का? हा प्रश्न आपण आपल्यालाच विचारला पाहिजे .

एखादी गोष्ट हाताबाहेर गेल्यावर काय उपयोग . मुलांचे संगोपन शिक्षण त्यांची वेळोवेळी बदलत जाणारी मानसिकता , त्यांचा जगाकडे , स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन , त्यांचे ध्येय ती पूर्ण करण्यासाठी आखलेला मार्ग ह्या सगळ्यात हो हो अगदी सगळ्यामध्ये आपले योगदान असलेच पाहिजे. असे झाले तर आयुष्यातील  प्रत्येक टप्प्यावरील त्यांचा निर्णय हा सक्षम ठरेल . ह्यासाठी पालक अगदी सुशिक्षितच असला पाहिजे हे गरजेचे नाही . मुलांशी संवाद साधणे  हि कला असली कि तेव्हडे पुरते . पण बरेचदा आपण आपल्याच कोशात असतो .मुलांशी शेवटचा संवाद कधी साधलाय अगदी सध्याचा चित्रपट  किंवा राजकारण , पेपर मधला एखादा लेख किंवा तत्सम कुठल्याही विषयावर आपण कधी घरात मनमोकळ्या चर्चा केल्या आहेत का? सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केले आहे का?मुलांच्या सोबत वेळ कधी घालवलाय ? आठवा बर . मुलांच्या मनाचा ठाव घ्यायला खरतर वेगळे काहीच करावे लागत नाही . सतत त्यांच्याशी संवाद साधणे ,त्यांच्यासोबत असणे हि भावना सुद्धा त्यांना आकाशात उंच गरुडझेप घ्यायला पुरेशी आहे.

आजची तरुण पिढी अत्यंत हुशार , सक्षम , आधुनिक विचारसरणीचा पगडा असणारी तरीही आपल्या संस्कृतीची मुल्ये जपणारी आहे. घरात आलेल्या सुनेला आपण आपल्या चालीरीती , परंपरा समजावून सांगितल्या पाहिजेत ती नक्कीच करेल. पण तसे न करता “ ती शिकलेली आहे आधुनिक आहे “ असा सरसकट शेरा मारून ती काहीच करणार नाही असे निदान करणे चुकीचे  ठरेल.

आपल्या जीवनाचे सुकाणू आपल्याच हाती आहे . आपली कर्मे मग जीकाय असतील चांगली वाईट त्याप्रमाणेच आपले जीवन असणार आहे. आपण आज जे करू तसा उद्याचा दिवस. साडेसातीत अनेक आजारांच्या रुपात आपलीच कुकर्मे हात जोडून समोरून आपल्याच भेटीला येत असतात . हॉस्पिटल मध्ये सुई टोचली कि कुणाला काय बोललो , कसे वागलो त्याचा सगळा आलेख आपल्या समोर उभा राहतो . अर्थात त्यातून आपण किती शिकतो बोध घेतो त्यावर सगळे आहे. “ मी पणा  ” हि आपल्या आयुष्याला लागलेली कीड आहे . मी इतरांपेक्षा वेगळा म्हणजेच “ अहंकार ”. आणि जोवर हि भावना आपल्यातून जात नाही तोवर आजूबाजूची माणसेच काय तर प्रत्यक्ष परमेश्वर प्राप्ती सुद्धा होणार नाही . 

म्हणूनच ध्यानधारणा ,साधना हवी . रोज थोडावेळ तरी मौन ठेवले पाहिजे . त्या काळात स्वतःशी साधलेला संवाद आपल्याला आपल्याच चुका सुधारायला वाव देयील. इतरांच्या चुकांचे जावूदे त्यांना सुधारायला संत मंडळी आहेत , आपण आपल्याला सुधारले तरी खूप झाले.  अनेकांना अध्यात्म हे फ्याड  वाटते पण ती जीवन जगण्याची कला आहे. अध्यात्म आपल्याला सगळ्यातून मुक्त करते आणि मोक्षाकडे नेते .

आपला जीवनप्रवास लहान सहान गोष्टीतून आनंद घेवून नक्कीच सुखकर करू शकतो . खरतर हा आनंद आपल्या अगदी अवतीभवतीच असतो . सकाळचा आले घातलेला वाफाळलेला चहा पीत वर्तमानपत्र वाचणे हा सुद्धा एक आनंदच आहे. आपल्या झाडावर उगवलेली फुले वेचणे  , छान स्वयपाकाची चव ,सकाळचा मनासारखा मोर्निंग वॉक , मनाला प्रसन्न करणारे नामस्मरण कितीतरी आनंददायी गोष्टी आहेत ...आपल्या आनंदाच्या व्याख्या बदलल्या तर सगळेच सोपे होवून जायील. फार मोठी पूर्ण न होणारी  स्वप्ने बघायची आणि मग त्याच्या ओझ्याखाली वावरत राहायचे . सांगितलंय कुणी ? सहज सोप्पे साधे आयुष्य उगीच नागमोडी करून ठेवायचे .कश्यासाठी ?

निसर्ग सुद्धा सतत बदलत असतो तसेच आपले जीवनही आहे त्यामुळे आजचा क्षण हा भरभरून जगणे हेच आपल्या हाती आहे. आनंद देता आणि घेताही आला पाहिजे. 

एखादी गोष्ट नाही मिळत द्या कि सोडून किती काळ उराशी ते दुक्ख कवटाळून ठेवणार आणि इतर आनंदाला पारखे होत राहणार . आजकाल कमीतकमी माहिती असलेली बरे असते . आयुष्यातील अर्धा काळ इतरांची उणीदुणी काढण्यात आणि  आपलीच गार्हाणी गाण्यात जातो . आपण आपले आपल्याच मस्तीत जगावे हे बरे नव्हे तर उत्तम. आपले छंद जोपासावे , आपला दिनक्रम सुटसुटीत परिपूर्ण करावा , अन्य चौकश्या नकोतच म्हणजे मग  रात्रीची शांत झोप आपली हक्काची ती मिळणारच .

आपल्याला आवडेल ते काम करत राहणे आणि सतत कार्यमग्न राहणे , स्पर्धा करायचीच असेल तर स्वतःशी करावी इतरांशी नको . कालच्यापेक्षा आज माझे आयुष्य किती वेगळे आहे ,किती उंचीवर गेले आहे हेच पाहणे उत्तम.

सतत जगबुडी झाल्यासारखे किंवा आमच्यासारखे आम्हीच दुखी असे चेहरे करून वावरल्याने काय साध्य होणार ? काहीही नाही . आयुष्यभराची जमवलेली पुंजी दवाखान्यावर खर्च होणार . त्यापेक्षा सतत हसत राहून आला क्षण जो आपला करतो तो जिंकला. इतके साधे सोपे आहे हे.

प्रत्येकाचे आयुष्य वेगळे आहे आणि प्रत्येकाला देवाने दिलेली धावपट्टी सुद्धा.  त्यावर कशी गोलंदाजी करायची हे ज्याचे त्याने ठरवायचे . आपण रोज सिक्सर सुद्धा मारणार नाही आणि रोज आउट सुद्धा होणार नाही . आपले येथील कार्य संपले कि आपण जाणार आणि हे कुणालाच चुकले नाही मग व्यर्थ चिंता कश्याला . कश्याला कुणाचा द्वेष , मत्सर ,त्याने आपण आपलीच कर्मे वाढवून घेणार आणि ह्या जन्म मृत्युच्या फेर्यात अडकत राहणार .

आज करोना कधी जाणार हा प्रश्न ज्याच्या त्याच्या तोंडी आहे. पण कुणी हा विचार करेल का कि करोना का आला? काय शिकवायला आला ? आपण आपण त्याच्यातून खरच  किती शिकलो ? रोज पैशाची अन्नाची किती उधळपट्टी नासाडी आपण करतो , रोज माझे आयुष्य आज आहे तसेच असणार आहे हा आपला गैरसमज आहे हे करोनाने दाखवले. मला कुणाचीच गरज नाही ह्यात किती वास्तव आहे?  माझ्याकडे अमाप  संपत्ती आहे पण माझ्या जवळच्या माणसाला जगायला लागणारा  ऑक्सिजन मी पुरवू नाही शकत , मी रक्त तयार करू नाही शकत मी अनेक गोष्टीत  किती हतबल आहे कारण देवाने काही कार्ड त्याच्याही हातात ठेवली आहेत हे करोनाने आपल्याला दाखवून दिले. 

कुणावाचून आमचे काहीच अडत नाही असे नसते,  कारण माणूस “ गरज “ जन्मालाच घेवून आला आहे. ज्याला लाथ मारतो त्याच्याच दारात देव आणून उभा करतो  निदान इतके तरी ध्यानात ठेवले पाहिजे. आपले आयुष्य किती क्षणभंगुर आहे  मग कश्याला हवे हे हेवेदावे ? आयुष्याच्या अखेरी सुद्धा आपल्याला  चार माणसे लागतात आणि ती मिळवायला आयुष्य खर्ची होते. त्यासाठी आपली कर्म उत्तम असायला लागतात . शनी महाराज सगळ्याचा हिशोब ठेवतात कारण ते इतर कुठे नाही तर आपल्या आतच आहेत . त्यांनी केलेल्या शिक्षांचा धाक असायला हवा .

शरीरातून प्राण निघून गेला तर शरीराला दुर्गंधी सुटते , त्याला आप्तजन “ बॉडी आली का " असे म्हणतात . प्राण गेला कि आपले नाव सुद्धा घेतले जात नाही .आपले अस्तित्व संपते . काहीच राहत नाही  . शेवटी राहते ती ह्या शरीराची चिमुटभर राख . हेच अंतिम सत्य आहे.

आयुष्यभर ज्यांनी काबाडकष्ट करून वाढवले त्यांनाच वृद्धाश्रमात नेवून टाकण्याचे हीन कृत्य करणारे आपणच असतो .आपल्या सगळ्या कर्माचा लेखाजोखा मांडणाऱ्या त्या विधात्याचा विसर पडतो आपल्याला .

म्हणूनच प्रत्येक सूर्योदय हा नवचैतन्य घेवून येत असतो त्याचे स्वागत तितक्याच आनंदात करून आयुष्याचे सोने करणे हेच आपल्या हाती आहे. 

सगळा आनंद डोळ्यात साठवून जगा. म्हणूनच म्हंटले आहे ...आपले डोळे इतके सुंदर असले पाहिजेत कि त्याकडे पाहून इतरानाही जगावेसे वाटले पाहिजे. 

शेवटी हि कर्मगती आहे आणि ती कुणालाच चुकलेली नाही .

अस्मिता

antarnad18@gmail.com





 







Monday, 19 April 2021

मंगळ- एक दृष्टीकोण

||श्री स्वामी समर्थ ||



आपल्यावर पाश्चात्य देशातील अनेक गोष्टींचा पगडा आहे. तरीही त्यांच्या अनेक गोष्टी आपल्या संस्कृतीला न पेलवणाऱ्या आहेत. तिथे विवाहाच्या संकल्पनाच वेगळ्या आहेत आता आपल्याकडेही विवाह कश्यासाठी ? मुळात विवाहसंस्थेचे उद्दिष्ट काय हे लक्ष्यात घ्यायची गरजच उरलेली नाही असे चित्र समोर येते आहे. आजकालची तरुण पिढी विवाहा साठी फारशी उत्सुक नाही. म्हणूनच मुलमुलींची विवाहाची वय पुढे गेली आहेत .

पूर्वी मुलीचे लग्न झाले कि मुलीची  “ दिल्या घरी तू सुखी राहा “ असे म्हणून पाठवणी होत असे. पण आता बदलत्या काळानुसार आईच मुलीला सांगते “ जमत नसेल तर सरळ निघून ये “ अर्थात ह्याला अनेक कंगोरे असतीलहि. पण पूर्वीच्याकाळी मुलीने विवाह झाल्यानंतर फक्त सणासुदीला माहेरी यायचे हीच प्रथा होती . तिने कायमचे माघारी परतणे हे कल्पनेबाहेरचे होते . असो 

विवाह झालाच तर तो टिकवण्याकडे कल असला पाहिजे पण तेही आजकाल दिसत नाही उठ सुठ पापड मोडला कि घे घटस्फोट असेच काहीसे चित्र आहे आणि हे समाजाच्या आणि पुढील पिढीच्या भविष्याच्या दृष्टीने नक्कीच हिताचे  नाही .

घटस्फोट घेणे हे फारसे विशेष न वाटणाऱ्या लोकांना त्याच्या परिणामांचा विचार सुद्धा करण्याची गरज वाटत नाही हि खेदाची गोष्ट आहे. मनात आले कि लगेच करून टाकायचे .

आपल्या संस्कृतीत विवाह संस्थेची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत आणि ती टिकवणे फुलवणे आणि त्याचे महत्व अबाधित ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.

बरेच वेळा विवाहानंतर विभक्त होण्याची कारणे अत्यंत नाजूकही असू शकतात ज्याचा उल्लेख उघडपणे मुले आपल्या पालकांसमोर करत नाहीत .

विवाह विच्छेदासाठी पत्रिका जेव्हा येते तेव्हा विवाहाच्या संदर्भातील ग्रह ,भाव आणि योग हे बरेचदा खरी परिस्थितीकडे लक्ष वेधून घेतात .

वरवर सहज सोपी वाटणारी एखादी गोष्ट हि अभ्यासानंतर गंभीर असू शकते आणि ती म्हणजे दोघातील शरीरसुख किंवा लैंगिक आकर्षण . मुळातच “ त्या दोघांनी ”  एकत्र येवून त्यांचा वंश वाढवण्यासाठी समाजाने दिलेली परवानगी म्हणजे “ विवाह “.

माणसाच्या अनेक गरजा आहेत त्यात मानसिक गरजेसोबत शारीरिक गरज सुद्धा आहे. मुळात त्या दोघात सौख्य नांदले पाहिजे . ती दोघे मनाने आणि शरीराने एकत्र आली कि त्यांच्या नात्यात गोडवा निर्माण होवून ते नाते आपोआपच बहरणार आहे .

त्यानंतर त्या दोघांचे  कुटुंब , इतर आप्तेष्ठ आणि समाज आणि ह्यासाठी दिला पाहिजे तो पुरेसा वेळ . हल्ली सगळा इंस्तंट चा जमाना आहे. त्यामुळे संयम हा लोप पावलेला आहे. विवाहा सारख्या पवित्र बंधनाला आता कायद्याची झालर लागलेली दिसून येते.

 त्या दोघांमधील वैवाहिक संबंधांचा विचार करताना आपल्याला वैवाहिक सुखाचा कारक ग्रह शुक्र ह्याचा सर्वप्रथम विचार केला पाहिजे . त्याखालोखाल गुरु चंद्र आणि रवी . स्त्रीच्या पत्रिकेत पतीकारक म्हणून रवी आणि मंगळ सुद्धा बघावा लागेल कारण  मंगळ हा कामुकता देणारा ग्रह आहे.

पूर्वीच्या काळी मंगळाच्या पत्रिकेची धास्तीच घेतली जात असे पण आता तसे नाही. आत्ताचे जीवन हे धकाधकीचे आहे आणि ते जगायला लागते ती धमक ,जिद्द आणि धडाडी . सकाळी घरचे आवरून सर्वांचे डबे भरून ८ ची लोकल गाठून ,कार्यलयातील कामाचा ठीग उपसून पुन्हा संध्याकाळी थकून घरी आल्यावरही सकाळचाच पाढा पुन्हा गिरवायचा हे सोप्पे खचितच नाही. मुंबई पुणे नोकरी करणार्याही स्त्री पुरुष आहेत.

तेव्हा ह्या सर्वासाठी उमेद द्यायला मंगळा सारखा ग्रह पाहिजे जो धाडस शौर्य , उर्जा  , शारीरिक शक्ती प्रदान करतो. मंगळाची मुलगी म्हणजे विवाहात अडचणी निर्माण करणारी हा इतकाच विचार करून चालणार नाही .मंगळाची मुलगी अरे ला कारे करणारी उद्धट म्हणून नको .पाहिजे तिथे तिने बोललेच पाहिजे हि आज काळाचीच गरज आहे.  तात्पर्य काय तर जगण्यासाठी मंगळ हवाच .इतके साधे सोपे आहे ते .

त्या दोघांमध्ये प्रीतीचा बहार फुलवणारा शुक्र हा सुद्धा पत्रिकेत सळसळत्या उर्जेशिवाय व्यर्थ ठरेल. कॉलेज मध्ये एखाद्या मुलीला गुलाब द्यावा हि भावना मनात आणून देणारा शुक्र पण तो तिला द्यायचे धाडस देणारा हा मंगळ . तो नसेल तर  एक दिवस तीच तिच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका त्याच्या हातात ठेवेल आणि त्याची सगळी स्वप्ने स्वप्नेच राहतील.

प्रत्येक चांगल्या गोष्टींसाठी गुरूंचा आशीर्वाद लागतो त्यामुळे गुरूचाही विचार व्हावा.

मंगळ हा कामुकता देणारा ग्रह आहे आणि तो लैंगिक उर्जेसाठी सुख प्रदान करण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे जर त्या दोघांमध्ये शारीरिक सुखाची उणीव राहत असेल तर नक्कीच मंगळ कमजोर असल्याचे प्रथमदर्शनी निदान आपण काढू शकतो . तसेच शुक्राचाही विचार अर्थात होणे गरजेचे आहेच .

पत्रिकेतील शुभ गुरु परस्परातील संबंध टिकवण्याकडे कल देयील. पण मंगळ खराब असेल तर दाम्पत्य जीवन हे लैंगिक संबंधांचा विचार करता अपूर्णच राहते आणि हेच सगळ्यात मुख्य कारण एकमेकांपासून विभक्त होण्याचे असू शकते.

आजही आपल्या समाजात आपल्या संस्कार, चालीरीती आणि परंपरा घरातील वडील धार्या मंडळींचा मान ठेवताना आमच्या शारीरिक संबंध आनंददायी नाहीत हे उघड बोलण्याचे धाडस मुले करत नाहीत . आमचे पटत नाही हे वरवरचे कारण सांगितले जाते आणि ते घरातील मंडळीना प्रचंड बुचकळ्यात टाकणारेही असते कारण वरकरणी सगळे छानच दिसत असते.

एखाद्याची प्रचंड कामुकता आणि दुसर्याला त्याबद्दल वाटणारी निरसता किंवा तितकी ओढ नसणे ह्या गोष्टी दोघानाही दोन टोकाला नेतात .एकाला अपरंपार सुख उपभोगायची इच्छा तर दुसर्याची शारीरिक दुर्बलता ह्याचा मेळ साधायचा तरी कसा..

थोडक्यात मंगळ चांगला नसेल तर वैवाहिक सुखाला ओहोटी लागते आणि पुढे त्याची परिणीती विभक्त राहण्यात होते .

बरेचदा घरातील मंडळींचा विचार , जबाबदार्या ह्यामुळे लग्न टिकते पण फक्त कागदावर ,मनाने ते कधीच दुरावलेले असतात किबहुना एक होताहोता राहिलेले असतात आणि मग अश्या वेळी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी घराबाहेर काहीतरी शोधण्याचा विचार मनात येतो. थोडक्यात ह्या सर्व गोष्टींची सुरवात घरापासूनच झालेली असते. मग त्यातून मानसिक ताणताणाव आणि अनेक प्रकारची व्यसने नाही लागली तरच नवल.

म्हणूनच दोघांच्याही पत्रिका मिलन करताना मंगळाचा विचारही झाला पाहीजे.

अस्मिता

antarnad18.blogspot.com


#मंगळ#कामुकता#उग्रतामसिग्रह#उष्णतेचेविकार#विवाह#लैंगिकसुख#मंगळाचीपत्रिका


 



           

Thursday, 15 April 2021

एप्रिल २०२१ कार्यशाळा

 || श्री स्वामी समर्थ ||


" हसत खेळत ज्योतिष शिकूया " ह्या एप्रिल  २०२१ मधील  कार्यशाळांना उदंड प्रतिसाद मिळाला. 



अस्मिता

antarnad18@gmail.com

Tuesday, 13 April 2021

स्वामिमय

|| श्री स्वामी समर्थ ||

स्वामी माझा मी स्वामींचा 


चैत्र शु. २ ,अक्कलकोट निवासी समर्थ सद्गुरू श्री स्वामी समर्थ ह्यांचा प्रगट दिन . आज शब्दच सुचेना झालेत . काय आणि कसे लिहावे. महाराजांनी आपल्याला काय दिले आहे हे एखाद्या भक्ताला विचारले तर त्याच्या तोंडून  शब्दही फुटणार नाही फक्त अश्रू वाहतील इतका तो सद्गदित होयील. माझीही  अवस्था वेगळी नाही .  आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर आणि घेतलेल्या प्रत्येक श्वासावर महाराज प्रत्यक्ष विराजमान आहेत . प्रचीतीविना भक्ती नाही आणि भक्तिविना प्रचीतीही नाही . पण केवळ प्रचीती  मिळावी म्हणून केलेली भक्ती हि फोल आहे. मनुष्य प्राणी हा स्वार्थीच आहे ,काहीना काही हवेच असते म्हणून आपण आपल्या गुरूंची आपल्या आराध्याची सेवा करत असतो. पण तरीही जसजसे ह्या अध्यात्मिक मार्गातील आपला प्रवास पुढे जातो तसे मग आपल्या मागण्या कमी होऊ लागतात . एक क्षण असा येतो कि काहीच नको असे वाटते . नुसते स्वामींच्या  समोर डोळे मिटून बसावे आणि नामस्मरणाचा त्यांच्या अस्तित्वाचा आनंद लुटावा. महाराजांच्या बरोबर भक्तांचे direct connection , टेलीपथी असते . आयुष्यात मागे वळून पाहिले तर लक्ष्यात येयील कि तुम्ही न मागीतलेल्याही अनेक गोष्टी त्यांनी तुम्हाला अश्याच देवून टाकल्या आहेत ज्या तुमच्या ध्यानातही आल्या नाहीत. किती आणि काय सारखे मागत राहायचे....आयुष्यभर मागताच राहायचे ? मग त्यांना द्यायचे कधी ? हा विचार नको का करायला .गुरुदक्षिणा हि द्यायलाच हवी त्याशिवाय जन्म सार्थकी लागणारच नाही.

श्री स्वामी समर्थ , गजानन महाराज ह्यांचा प्रगट दिन आला कि आधी ८ दिवस काही सुचेनासे होते . प्रगट दिन कसा करायचा त्यांच्या आवडीचे कुठले पदार्थ करायचे , महराजांचे घरी कसे स्वागत करायचे चंदनाचा धूप लावायचा कि अजून काही , कांद्याची भजी , बेसन लाडू महाराजांना खूप आवडतात मग त्यासाठी लागणारे सर्व जिन्नस घरात आहेत ना. महाराजांना चाफा खूप आवडतो तो आधी आणायला हवा , महाराज आले कि त्यांना आवडणारे हीनाचे अत्तर लावायला हवे . एक ना दोन . घराला जणू लगीनघाई चे स्वरूप येते . महाराज येणार हा आनंदच इतका मोठा असतो कि त्यांच्या स्वागतासाठी भक्त देहभान विसरतात .

प्रगट दिनाच्या दिवशी  घराला जणू एखाद्या मंदिराचे स्वरूप प्राप्त होते . सकाळी घराला लावली जाणारी तोरणे , घराबाहेरील रांगोळ्या , पूजा , धूप दीप , महानेवैद्य , आरती , महाप्रसाद ,महाराजांना आवडणारा विडा नामस्मरण , मानसपूजा , पोथी वाचन आणि महाराजांशी मनसोक्त गप्पा  ह्यात दिवस कसा जातो ते समजत सुद्धा नाही .

महाराजांशी कायकाय बोलायचे ते सगळे मनात आखलेले असते पण ऐनवेळी गप्पा मात्र वेगळ्याच होतात . खरतर महाराजांचे आपल्या वास्तुत येणे म्हणजे आपले परमभाग्यच , हाच  तर मोठा आशीर्वाद . माझा मुलगा लहान असताना मला निरागस प्रश्न विचारत असे. आई , महाराजांचे इतके भक्त आहेत मग ते एकाच दिवशी सगळ्यांकडे कसे जातात ? आपल्याकडे आले हे आपण कसे समजायचे? खरच काहीच उत्तर नाही ह्याला . ह्या  गोष्टी भक्त अनुभवायच्या आहेत . महाराज आपल्या सगळ्या भक्तांच्या घरी येणार हे नक्की , भक्तीत अंतर नसते, तिथे उच्च नीच , गरीब श्रीमंत , आवडते नावडते काहीच नसते , जिथेजिथे भक्ती आहे , अंतर्मनापासून श्रद्धायुक्त अंतकरणाने मारलेली हाक आहे तिथे सद्गुरूंचा वास आहे ह्यात दुमत नाही.

देव आपल्या भोळ्या भक्तीचा भुकेला आहे. एका क्षणात आपल्याला समजते कि महाराज आले. त्यांना यावेच लागते , भक्तांना  ते नाराज कधीच करत नाहीत , ह्यावर माझा ठाम विश्वास आहे आणि आजवर तो त्यांनी अभेद्य ठेवलाही आहे. साधुसंत येती घर तोची दिवाळी दसरा अशीच स्थिती आपली त्या दिवशी होते.

एक लहानशी गोष्ट आठवली . एकदा महाराज वडाच्या झाडाखाली  आसनस्थ होते आणि एक भक्त त्यांच्या दर्शनाला आला. महाराजांना नमस्कार केला असता त्याला त्यांच्या एका पायावर गुलाबाची फुले आणि एका पायावर चाफ्याची फुले दिसली . तशी तो महाराजांना म्हणाला कि हि फुले आहेत पण इथे तर कुणी नाही तेव्हा महाराजांनी दूर ठिकाणी असणार्या आपल्या २ भक्तांची नावे सांगितली आणि म्हणाले ते तिथे माझी पूजा करत आहेत हि फुले त्यांनीच अर्पण केली आहेत . काय  थोर असेल त्यांची भक्ती आणि अध्यात्माची उंची.  महाराजांनी प्रत्येक क्षणी मला तारले आहे माझे भरभरून लाड केले आणि चुकले तेव्हा कानही धरला आहे. माझा श्वास फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच चालू आहे ह्याचा विसर मला प्रत्येक वेळी श्वास घेताना होतो आणि त्यामुळे त्यांच्या सेवेत मी रममाण आहे. जीवन आनंदाने भरलेले आहे कारण त्यांचे अस्तित्व जीवनात जाणवत आहे.

आपल्या घरातून स्वामींचा फोटो आणि देवघर वजा केले तर त्या घराला शून्य अर्थ प्राप्त होयील . आई घरात नसेल तर लेकरू कसे केवीलवाणे होईल तीच स्थिती महाराजांच्या शिवाय आपल्या सर्व भक्तांची आहे. महाराजांचे  अस्तित्व अबाधित आहे ,कुणी काहीही म्हणो . महाराजांचे अस्तित्व अनुभवायचे असेल तर त्यासाठी आपल्या हृदयात त्यांचा वास असायला हवा, निखळ श्रद्धा हवी . जळी स्थळी काष्टी पाषाणी फक्त त्यांचीच छबी त्यांचेच विचार मनात रुंजी घालतील तेव्हाच आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची प्रचीती येयील अन्यथा सर्व फोल आहे म्हणूनच अध्यात्म हि जगण्याची कला आहे हे म्हंटले आहे ते उगीच नाही .

महाराजांना कुणी आवडते नावडते नाही . जो त्यांची अनन्यभावे सेवा करतो तोही त्यांचा आणि जो करत नाही तोही त्यांचाच . आपण एकच ब्रम्हांड पाहत आहोत पण  आपले महाराज कोटी ब्रह्मांडाचे  स्वामी आहेत . इथे सहज सोपे काही नाही , प्रत्येक वाटेवर काटे आहेत कारण अध्यात्माची वाटच मुळी काटेरी आहे .

मी पणा सोडल्याशिवाय इथे कितीही डोके आपटले तरी काहीच मिळणार नाही. आपण एक माळ करतो आणि महाराजांच्या समोर आपल्या इच्छांची यादी ठेवतो .   ज्याने जन्माला घातले त्याच्याशी   सुद्धा व्यवहार , मी जप केला मग आता तुम्ही मला हे द्या . अगदी उघड नाही पण  आपला अंतस्थ हेतू ह्यापेक्षा वेगळा असतो . पण आपल्याला काही मागायची खरच गरज नाही. त्यांना माहित आहे आपल्याला काय पेलवणार आहे त्यामुळे आपल्याला झेपेल ते वेळ आली कि सर्व मिळणार .

साई बाबांनीही आपल्या भक्तांना सांगितले आहे “ समय से पेहले और भाग्य से जादा किसी को कुछ भी नही मिलता..”. प्रपंच करताना अडथळे , संकटे येणारच म्हणून आपण प्रत्येक वेळी महाराजांना वेठीस धरायचे का? आपण केलेल्या भक्तीचा हिशोब मांडायचा का? कि एक हात से दो और एक हात से लो असे म्हणत आपली सेवा एनकॅश करायची ?

आपण आपले कर्म करत राहायचे , आपल्या अनंत जन्माच्या पाप आणि पुण्याचा आरसा म्हणजे आपले आत्ताचे जीवन आहे . आपल्या कर्माची फळे मग ती चांगली वाईट दोन्हीही असतील ती निमूट पणे भोगायची आणि भोगूनच मुक्त व्हायचे.  आपल्या कर्माचा सगळा लेखाजोखा त्यांच्याकडे असतोच कि मग ते भोगण्यासाठी बळ आपल्याला आपल्या सेवेतूनच मिळणार आहे वेगळे काय मागायचे.

अध्यात्म म्हणजे काही जणांना टाईम पास किंवा वेळ जाण्याचे साधन वाटते . काहींच्या मते अध्यात्म हे आयुष्याच्या संध्याकाळी करायच्या गोष्टी आहेत . पण खरच तसे आहे का? नाही .

आजची तरुणाई स्ट्रेस मध्ये आहे त्यांनाच खरतर अध्यात्माची नितांत गरज आहे.

आई आपण ह्या जगात पदार्पण केले कि आपले बोट धरते अगदी तसेच त्याच क्षणापासून ते आपल्या अखेरच्या क्षणापर्यंत आपण सद्गुरूंचे त्यांचे होवून जगलो पाहिजे.एकदा त्यांच्या शाळेत नाव घातले कि मग ते नेतील तसे आणि करतील ते. ज्योतिष संपते तिथे अध्यात्म सुरु होते आणि तिथे गेलेल्या लोकांनी ज्योतिष बघूच नये कारण तुमची पत्रिका स्वतः गुरु लिहित असतात .हे सर्व आकलनाच्या बाहेर आहेत .

 अध्यात्म आणि आपण वेगळे नाही . प्रपंच करत परमार्थ करा हीच तर जिवनाची सूत्री आहे. पण ते निष्काम असले पाहिजे . हेतुपूर्वक काहीच नसावे . आई जसे मुलावर प्रेम करते अगदी तस्सेच किबहुना काकणभर अधिक आपले सद्गुरुंवर प्रेम हवे.

त्यांनी किती दिले आहे ह्याचा हिशोब म्हणजे  अवकाशातील  तारका मोजण्या सारखे होईल. महाराजांनी टाकलेल्या एका कटाक्षाचा भक्त भुकेला असतो . त्यांची सेवा कश्यासाठी तर मेवा खाण्यासाठी नाही .

“ माझा फोटो ठेवून बाजार मांडू नकोस “  हे त्यांचेच शब्द आहेत .

“हम गया नाही जिंदा है” हे अभीवचन भक्तांना देणार्या स्वामींच्या जयंती ते पुण्यतिथी पर्यंत  संकल्पित नामस्मरण करून आपले आयुष्य कृतकृत्य करुया . आपले भाग्य थोर आणि गत जन्मीचे सुकृत म्हणून आपल्याला त्यांच्या चरणांची सेवा करण्याचे अहो भाग्य प्राप्त झाले आहे. खरतर त्यांचे नाव घ्यायची सुद्धा आपली पात्रता नाही .त्यामुळे आपणही नामस्मरण करावेच पण आपल्या आप्तेष्ट , मित्र ,नातेवाईक ह्यानाही नामाची महती सांगून त्यांना नामस्मरणाच्या,  ह्या अध्यात्माच्या मार्गात आणावे . आपण अत्तर लावले तर दुसर्याला त्याचा सुवास येणारच , चांगल्या मार्गात यायला वेळ लागतो पण महाराजही मनापासून केलेल्या सेवेचे भुकेले आहेत आणि त्यानाही आपली आस आहे.

महाराज आणि भक्त हा दुग्ध शर्करा योग आहे म्हंटले तर वावगे ठरू नये . त्यांना तरी कुठे  करमत आपल्याशिवाय . बघा निघाले सुद्धा असतील ते अक्कलकोट हून . घरोघरी भक्तांची चाललेली लगबग आणि प्रगट दिनाची तयारी बघून प्रसन्न झाले असतील .

स्वामी प्रगट दिन ते स्वामी पुण्यतिथी आपापल्या घरी जसे जमेल तसे रोज संकल्पित नामस्मरण करूया. आपली कुणाशी स्पर्धा नाही . ह्याने इतका जप केला त्याने तितका हे पहायचे नाही . किती जप केला त्याहीपेक्षा तो किती आत्मीयतेने , श्रद्धेने केला हे महत्वाचे आहे . आपला भाव ते जाणतात . महाराजान सांगुया कि तुम्ही आमच्याकडून हा जप करून घ्या . म्हणजे सर्व श्रेय त्यांना दिले कि आपल्याला मीपणा आणि अहंकार येणार नाही .

मी सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांचा नामस्मरण ग्रुप केला आहे कारण ज्योतिषी सुद्धा आधी उत्तम माणूस म्हणून घडणे गरजेचे आहे. स्वामी सेवेने वाचासिद्धी येयील आणि ह्या शास्त्रात अधिक पारंगत होता येयील. सर्वजण उत्चाहाने ह्या नाम सोहळ्यात सहभागी झाले आहेत ह्याचा विशेष आनंद आहे.

कितीही म्हंटले तरी आपण प्रापंचिक माणसे आहोत त्यामुळे आपली एखादी इच्छा असेल तर अवश्य त्यांना सांगावी त्यासाठी ते नक्कीच मार्ग दाखवतील. म्हणजे असे कि आर्थिक विवंचना असेल तर ते आपल्याला कुरियरने चेक पाठवणार नाहीत  पण काम मिळवून देतील हे नक्कीच .

प्रगट दिन ते पुण्यतिथी दरम्यान केलेले संकल्पित नामस्मरण आपल्या आयुष्याचा सोहळा करेल . मानसिक आनंदाच्या उत्तुंग शिखरावर आपल्याला नेयील ह्यात शंकाच नाही . रोज नित्याची पूजा झाली कि मानसपूजा , तारकमंत्र आणि नामस्मरण  . स्वामींवर लईच उपकार केल्याची भावना नको , भक्तीचा बाजार तर नकोच नको , मनाच्या गाभ्यापासून अंतर्मनाने त्याना साद घाला.  आपल्या  घरात रोज  जे काही अन्न शिजवले असेल त्याचा नेवैद्य हा करावा .हा परिपाठ न चुकता 14 एप्रिल ते 9 मे करून बघा आणि प्रचीती घेवून बघा. ते आपल्या हाकेला धावून येणार हा विश्वास अभेद्य ठेवा .

आपली हाक मनापासून असेल आणि त्यात समर्पणाची भावना असेल तर  आपले आयुष्य कधी

“ स्वामीमय “ होवून जाईल ते आपले आपल्यालाही उमगणार नाही.

निशंक हो निर्भय हो मना रे ...प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे....

नामस्मरणासाठी जप आहे – “ श्री स्वामी समर्थ “

अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय जरूर लिहा.

antarnad18@gmail.com

#अंतर्नाद#श्री स्वामीसमर्थ#अक्कलकोटनिवासी#अध्यात्म#नामस्मरण#जप#मानसपूजा #भक्ती #साधना #जपजाप्य#तप#नेवैद्य#महाप्रसाद#आनंदसोहळा #प्रचीती

 

Monday, 12 April 2021

चैत्र गुढी पाडवा

 || श्री स्वामी समर्थ ||

 नूतनवर्षाभिनंदन

अंतर्नाद च्या सर्व वाचकांना चैत्र गुढी पाडव्याच्या खूप शुभेछ्या . गत वर्ष सरत आहे आणि आता नवीन वर्ष आभाळभरून आनंद सौख्य घेवून येत आहे . त्याचे तितक्याच जल्लोषात स्वागत करुया . मागचे सगळे विसरून पुन्हा नवीन स्वप्न पाहूया आणि ती पूर्ण होण्यासाठी अविश्रांत मेहनत करुया . नात्यांतील , मैत्रीतील वीण पुन्हा एकदा घट्ट करुया .

आनंदाची ,ध्येयाची ,नेत्रदीपक  यशाची ,आरोग्यदायी  गुढी उभारून पुन्हा एकदा सकारात्मतेकडे पाऊल टाकूया .आपल्या समोर अनेक आव्हाने आहेत  त्यामुळे आता नवीन उमेदीने कामाला लागुया .

आपल्या सर्वाना हे नूतन वर्ष सौख्याचे , सर्वात मुख्य आरोग्याचे , स्वप्नपूर्तीचे आणि जीवनातील आनंद वृद्धिंगत  करणारे जावूदे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

 

अस्मिता


#गुढीपाडवा#हिंदूसण#नवीनवर्ष#गुढीपूजन#पंचांगपूजन#सकारात्मक#ध्येय#स्वप्नपूर्ती

 

 

Saturday, 10 April 2021

तुही बिगाडे , तुही सवारे

 ||श्री स्वामी समर्थ ||


आज संपूर्ण विश्वात करोना चे थैमान चालूच आहे. प्रत्येक राष्ट्र देश जिल्हा आणि प्रत्येक माणूस आपापल्या परीने त्याच्याशी दोन हात करत आहे . अश्या वेळी शेगाव संस्थानाने केलेली लक्षणीय कामगिरी नजरेआड करूच शकत नाही .

शेगाव संस्थानाचे सर्वेसर्वा श्री भाऊसाहेब पाटील ह्यांनी अध्यात्मात कितीही उंची गाठली तरी पाय कसे जमिनीवर ठेवायचे आणि त्याचे भान कधीही सुटू द्यायचे नाही ह्याची शकवण दिली . आपला जन्म हा सेवेसाठी आहे आणि आपण महाराज व्हायला जायचे नाही हे विचार मनात रुजवले.   भाऊ ना भेटल्याशिवाय मी आजवर कशीच शेगाव सोडले नाही . त्यांचे माझ्या आयुष्यात प्रचंड योगदान आहे. अध्यात्म काय आहे हे त्यांनी मला समजावून सांगितले. ह्या शक्ती आपल्या आकलनाच्याही  बाहेर आहेत हे त्यांचे नेहमीच सांगणे असते. भाऊ हि महाराजांशी प्रत्यक्ष संवाद साधणारी व्यक्ती आहे आणि त्यांचे आशीर्वाद मला लाभले आहेत हे मी माझे परमभाग्य समजते . शेगाव मधील समाधी मंदिराचे काम झाले आणि भुयाराचे रुंदीकरण झाले तेव्हा मी शेगावला गेले होते . वरून खाली येणाऱ्या पायर्यांवरून महाराजांपर्यंत येयीपर्यंत खूप वेळ महाराज दिसत आणि डोळेभरून दर्शन होई. भाऊना  भेटल्यावर हे सांगितले त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने मी खरच भारावून गेले . ते म्हणाले अग  पहिल्या पायरीवरून महाराजांच्या चरणाशी येयीपर्यंत आपली एक माळ होते बघ. माझ्या तर हे घ्यानात सुद्धा आले नव्हते . प्रत्येक क्षण महाराजांच्या सेवेत आणि त्यांच्यासाठी जगणारे भाऊ पाहिले कि समजते सेवा म्हणजे काय आणि ती कशी करायची असते.



भाऊनी आपले सर्वस्व शेगाव संस्थानाला वाहिले आहे . त्यांच्यासारख्या सर्वार्थाने योग्य असणार्या  व्यक्तीची निवड त्या पदावर करणारे दुसरे तिसरे कुणी नसून प्रत्यक्ष महाराज आहेत  हे वेगळे सांगायला नको.

एकदा गजानन विजय पोथी उचलली कि आपण महाराजांचे झालोच म्हणून समजा . मग आपण त्यांना सोडले तरी महाराज आपला हात कधीच सोडत नाहीत . हीच शिकवण ते आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यात देत असतात . एखाद्याला आपला म्हंटले कि त्याच्या गुण दोषासकट त्याला स्वीकारले पाहिजे.

महाराज म्हंटले कि मला किती लिहू आणि किती नको असे होवून जाते . मला माझ्या आयुष्यात  श्री भाऊ साहेब पाटील , सासूबाई कै.उषाताई आपटे , माझे ज्योतिष शास्त्रातील पहिले गुरु कै. वसंतराव गोगटे , डहाणूचे दादा पवार अशी गुरुतुल्य व्यक्तिमत्वे गुरु म्हणून , मार्गदर्शक म्हणून लाभली हे माझे परमभाग्य आहे.

अध्यात्म हि तर जगण्याची कला आहे , ह्याचे धडे मी ह्यांच्याबरोबर गिरवले.  आपल्या प्रत्येक शब्दावर , कृतीवर महाराजांची करडी नजर आहे ह्याचा विसर आपण कधीच पडू देवू नये.

आज करोनाच्या संकटात सुद्धा भाऊंच्या नेतृत्वाखाली शेगाव मध्ये आयसोलेशन साठी 500 बेड तयार आहेत , रोज जेवणाच्या 2000 डब्यांची सोय झाली आहे. ह्या गोष्टीची जाहिरात तर सोडाच कुठे उल्लेखही नाही. आपण फक्त कर्म करत राहायचे हि भाऊंची शिकवण दुसरे काय .

आज हे फोटो पाहिले आणि लिहिल्याशिवाय राहवले नाही .खरच आपल्याला तारणारे आपले गुरूच आहेत ह्याची पदोपदी प्रचिती येतच. करोनाच्या संकटातून सुद्धा तेच आपल्याला तारतील हा आपला विश्वास अभेद्य असुदे .

म्हणूनच भक्त म्हणतात ना तुही बिगाडे , तुही सवारे

अस्मिता

antarnad18@gmail.com


#antarnad#shegaon#buldhana#shivshankarpatil#adhyatm#spiritualpower#guru#inspiration


#antarnad #शेगाव#बुलढाणा जिल्हा#शिवशंकरपाटील#विश्वस्थशेगावसंस्थान#अध्यात्म#गुरु