Thursday, 1 April 2021

आयुष्याचा लेखाजोखा लेख क्र. 1.

|| श्री स्वामी समर्थ ||



आयुष्याचा लेखाजोखा


ज्योतिष शास्त्राची व्याप्ती आणि आवाका प्रचंड मोठा आहे. जितके शिकावे तितके कमी आहे . एखाद्या माणसाला हे शास्त्र शिकण्यास त्याचा जन्मही अपुरा पडेल इतके अथांग महासागरासारखे हे शास्त्र आणि त्याचे असंख्य अभ्यासक आहेत. संपूर्ण जगभरात ह्या शास्त्रात प्रत्येक क्षणी काहीना काही नवीन संशोधन होत असते . ह्या शास्त्रास माता पार्वतीचा शाप आहे म्हणून ह्या शास्त्रास शापित शास्त्रही म्हंटले जाते.

ज्योतिष शास्त्रा बद्दल कुतूहल नाही असा माणूसच विरळा. आपले आयुष्य हे सुख दुक्ख , विवंचना , आनंद ह्या सर्वांनी भरलेले आहे. अनेक चांगल्या वाईट घटना आयुष्यात घडतच असतात. अनेक गोष्टीनी आपण त्रस्त होतो मार्ग मिळत नाही मग अश्यावेळी आपण ज्योतिष महाशयांच्या घराच्या पायर्या चढतो . हेतू हाच कि मार्गदर्शन मिळावे.

मंडळी, ज्योतिष हे आपल्या आयुष्यात वाटाड्याचे काम करत असते . ह्या शास्त्रानुसार मिळालेले बहुमूल्य मार्गदर्शन आपल्याला वाट दाखवत असते. अंधारातून प्रकाशाकडे नेत असते. आपली अडखळत चालणारी आयुष्याची गाडी आपल्या ज्ञानाने ,मार्गदर्शनाने मार्गस्थ करणाऱ्या ज्योतिषाचे मानधन देण्यास मात्र आपण कुरबुर करतो . नेमका त्याच वेळी आपण संकुचित राहतो . देवाकडून घेताना आपण दुप्पट ,पाचपट घेतो . आपण कधीही देवा आता मजला पुरे, अधिक नको मी समाधानी आहे असे म्हणत नाही . घेताना हजार हातानी घेतो पण देताना संकुचित वृत्ती. देवानेही आपल्याला देताना हात आखडता घेतला तर ? असो.

आपल्यापैकी प्रत्येकालाच कुंडलीची प्राथमिक ओळख आहे. कुंडली म्हणजे काय तर तुमचा स्वतःचा जणू आरसा . माझे गुरु श्री वसंतराव गोगटे नेहमी म्हणत असत अग पत्रिका म्हणजे XRAY Machine असते . एखाद्या उत्तम जाणकाराच्या हातात तुमची पत्रिका आली कि त्याला आरपार सर्व दिसते , समजते पण प्रत्येकाच्या पत्रिकेवर किती, काय आणि कसे भाष्य करायचे ते त्या ज्योतिषावर अवलंबून असते. असो .आपण जन्माला आलो त्यावेळी आकाशात असणारी ग्रहस्थिती म्हणजे तुमची स्वतःची कुंडली. जी एकदाच लिहिली जाते, त्यात बदल होत नसतो . आपण आपले प्रारब्ध जन्माला घेवून येतो. आपले पूर्वसंचीत आपले ह्या जन्मात फळते मग ते चांगले वाईट काहीही असो. अर्थात ह्या जन्मात आपल्या हाती असते ते म्हणजे उत्तम कर्म करत राहणे आणि काही भोग असतील तर ते ह्याच जन्मी भोगूनच संपवून टाकणे .

तर सांगायचे असे, कि आपली पत्रिका काय सांगते ह्याचा खोलात नाही पण जुजबी अभ्यास प्रत्येकाने जरूर करावा. प्रत्येकाला आपली पत्रिका अंशतः तरी माहिती असलीच पाहिजे. ह्यामुळे आपले प्रश्न कमी होतील, आपल्या आयुष्यातील अनेक घटनांचे मार्गदर्शन आणि क्रम ह्याचे अवलोकन आपल्याला होईल आणि प्रश्न हि कमी होतील. काही उदाहरणे पाहू , जसे आपल्या आयुष्यात पैसा येतो पण टिकत नाही हे समजले तर तसे का होतेय ? बरेच वय उलटून गेले तरी आपला विवाह होत नाही ,असे का? मग तो होणार का ? आणि होणार तर त्याचा योग्य कालावधी काय असेल ? बरेचदा संतती सुख प्राप्त होत नाही ,अश्यावेळी भारतीय समाजात बहुतांश वेळी स्त्रीवर त्याचे खापर फोडले जाते ,पण सत्य काही वेगळेही असू शकते . एखाद्या मुलाचे अभ्यासात लक्ष्य नसते पण त्याचवेळी एखाद्या कलेत तो नैपुण्य मिळवत असेल आणि पुढे तो त्या कलेतून अर्थार्जनही करू शकेल पण पालक नेमके ह्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि मुलाचे नुकसान होते . एखाद्या मुलाला वाईट संगतीमुळे व्यसने लागतात आणि मग गोष्टी हाताबाहेर गेल्या कि मग अश्यावेळी ज्योतिषी तरी काय सांगणार ? त्यापेक्षा वेळेच्या आधी मुलाची पत्रिका माहित असेल तर पालक अपत्यावर लक्ष्य ठेवून घडणाऱ्या घटनांना काही अंशी करी लगाम घालू शकतील. तर अश्या असंख्य गोष्टी माहिती असण्यासाठी आपली पत्रिका आपल्याला माहित असावी .आपल्या पत्रिकेतील ग्रह आणि योग पाहूया पुढील लेखात ...

ज्योतिष शास्त्र आणि ज्योतिषी म्हणजे काही जादूची कांडी नाही कि क्षणात ते तुमचे आयुष्य बदलतील . मुळात हे शास्त्र मार्गदर्शक म्हणून वापरायचे आहे. काही जणांचा ह्या शास्त्रावर अजिबात विश्वास नसतो , तर काही ह्यात नको तितके भावनिक रीत्या वाहवत जातात. तर काही योग्य मार्गदर्शन घेतात त्यात आपल्या उपासनेची भर घालतात आणि आपले आयुष्य आनंदी करतात . ह्या अनुषंगाने आज इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते.

एकदा एक स्त्री साईबाबांच्या दर्शनाला गेली तेव्हा त्यांनी तिला तिच्या मुलासंबंधी विचारपूस केली. त्यावर डोळ्याला पदर लावून ती म्हणाली एका ज्योतिषाने मुलाची पत्रिका पाहून भाकीत केले आहे कि ह्यावर्षी ग्रहमान चांगले नाही आणि म्हणून तो परीक्षेला बसलाच नाही . त्यावर साईबाबा स्मित हास्य करत म्हणाले हि उदी घे त्याला लाव आणि सांग खुशाल परीक्षेला बस. आश्चर्य म्हणजे मुलगा परीक्षेला बसला आणि अपेक्षेपेक्षा जास्तीच मार्क मिळवून पास झाला. अध्यात्म , आपले गुरु आपले आयुष्य बदलवू शकतात ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे. ह्यावर अनेक तर्क वितर्क आहेत. असो .

मंडळी ,ज्योतिष संपते तिथे अध्यात्म सुरु होते आणि अध्यात्मात गेलेल्या लोकांनी दोन्ही दगडांवर पाय ठेवू नये. संपूर्ण विश्वास आपल्या गुरूंवर ठेवावा मग जे होईल ते त्यांच्या इच्छेने आणि कृपेने . ज्योतिष पाहणार्यानीही ह्या शास्त्राचे मार्गदर्शन जरूर घ्यावे पण त्याबरोबर त्यास आपल्या उत्तम कर्माची जोडही द्यावी. एखाद्या ज्योतिषाने सांगितले कि हे वर्ष तुला चांगले आहे ,ह्याचा अर्थ अभ्यासच करायचा नाही असे नाही ,तर उलट जास्ती अभ्यास करून चांगल्या ग्रहस्थितीचा उत्तम महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी उपयोग करून घ्यायचा असा अर्थ अभिप्रेत आहे.

पुढील लेखातून कुंडलीतील स्थाने , ग्रहस्थिती , महादशा ह्यांचा अभ्यास आपण करणार आहोत जेणेकरून प्रत्येकाला आपली पत्रिका काही अंशी तरी समजेल.

ह्या लेखनमालेत येथील असंख्य जाणकार आणि वाचक वर्ग आपले अनुभव कथन करून सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

श्री स्वामी समर्थ

अस्मिता

antarnad18@gmail.com

No comments:

Post a Comment