Friday, 9 April 2021

व्यसनाधीनता (ज्योतिष शास्त्रीय दृष्टीकोण आणि सामाजिक ,कौटुंबिक बांधिलकी )

 ||श्री स्वामी समर्थ ||




माणसाचे मन मोठे विचित्र आहे. आपल्या मनासारख्या  घटना घडल्या कि मन आनंदी प्रफुल्लीत होते तर मनाविरुद्ध घटना घडल्या कि नैराश्य येते. सगळ्यांनाच मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक लावता येत नाही  . मनाचा समतोल ढळला आणि नैराश्येच्या गर्तेत माणूस सापडला कि तो व्यसनाकडे वळतो आणि आयुष्य बेचिराख होते, कुटुंबे उध्वस्त होतात. व्यसनांकडे वळण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत होताना दिसतात जसे घरातील कटकटी, वडील व्यसनाधीन असल्यामुळे कुटुंबात क्लेश ,भांडणे ह्याचा मुलांवर होणारा परिणाम , घरातील ताणतणाव , आर्थिक विवंचना , नोकरी नसल्यामुळे आलेले वैफल्य , प्रेमप्रकरणातील अपयश ,अपेक्षित यश न मिळणे , गृहसौख्य नसणे ई.

आज तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनांकडे वळताना दिसते काही अपवाद अर्थात आहेतच . जरा frustration आले कि दारूचा ग्लास आणि सिगरेट हातात आलीच म्हणून समजा . कोर्पोरेट क्षेत्रात आजकाल पार्टीमध्ये दारू पिणे हे गैर नसून त्याला काळाबरोबर चालणे म्हणजेच so called latest trend असे म्हंटले जाते. मित्रांसोबत दारू प्यायला गेले नाही कि तू अगदीच ओल्ड फ्याशन आहेस असे म्हंटले जाते . पण तरीही असे वाटते कि काळासोबत बदलावे पण एखाद्या प्रसंगापुरतेच ,प्रत्येक वेळी ह्या गोष्टीचा आधार घेवून व्यसनाधीन होऊ नये .

आज ह्याबाबत थोडेसे जाणून घेवूया .

सर्वात प्रथम आपले व्यक्तिमत्व आणि आपली विचारसरणी दर्शवणारे स्थान म्हणजे लग्नस्थान . लग्नेश ग्रह जर कमकुवत असेल किंवा  ६ ८ १२ ह्या त्रिक स्थानात असेल किंवा त्याच्यावर पापग्रहांचा प्रभाव असेल तर एखादे संकट आले तर त्यातून व्यक्तीला मार्ग सुचत नाही आणि पर्यायी आलेल्या नैराश्यामुळे ती व्यसनाकडे वळते .

लग्नेशा नंतर महत्वाचा ग्रह कुठला असेल तर तो आहे चंद . चंद्र्मः मनसो जातः .चंद्र हा मनाचा कारक आहे . आपल्या मनातील भावभावना चंद्रावरून समजतात . चंद्र जर पत्रिकेत बिघडला असेल तर व्यक्तीचा मनाचा समतोल राहत नाही . मनात सतत गोंधळ असतो , भावनांचा उद्रेक होतो . चंद्रासोबत जर राहू शनी मंगळ ह्यासारखे पाप ग्रह आले तर चंद्र बिघडतो .

व्यसनांचा मुख्य कारक राहू . हा भोग भोगायला लावणारा ग्रह आहे. राहू उघड्या डोळ्यांनी जग पाहत असतो . चंद्रासोबत राहूची युती हि मानसिकता बिघडवण्यासाठी प्रथम काम करताना दिसते. व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत राहूचा मोठा हात आहे असे दिसून येते .

शुक्र हा जलतत्वाचा ग्रह आहे आणि तो आपल्या आयुष्यातील रस निदर्शित करतो. शुक्र सुद्धा बिघडला . ७ किंवा १२ व्या स्थानी पापग्रहांच्या कुयोगातील शुक्र व्यसने देतो.

ह्या सर्वापासून आपल्याला परावृत्त करणारा ग्रह म्हणजे गुरु . पण तोही पत्रिकेत सुस्थितीत नसेल तर आपल्याला ह्या सर्वांपासून दूर जाणे दुरापास्त  होते.

द्वितीय भावावरून आपण सर्व रस बघतो तरी अष्टम भाव आणि त्यातील ग्रह सुद्धा तितकेच महत्वाचे योगदान करतात . द्वितीय भावाचा सखोल अभ्यास केला पाहिजे . महादशा स्वामी जर येन येन प्रकारे अष्टम भावाशी संबंधित असेल तर व्यक्ती व्यसनाच्या गर्तेत खोलवर जावू शकतो . ह्या स्थानातील ग्रह मुख्यत्वे राहू वृश्चिक राशीत असेल तर चांगला नाहीच .

पंचम स्थान हे मौजमजेचे स्थान आहे . तसेच ११ वे स्थान हे मित्रांचे ,सहकार्यांचे . संगती संग दोषेण हे म्हंटलेच आहे. कुसंगत आपल्याला व्यसनाकडे नेते.

पत्रिकेत चंद्र बिघडला असेल आणि लग्नी किंवा व्ययात नेपचून ,चंद्र   बिघडला असेल तरी व्यसने लागू शकतात . चंद्र राहूच्या नक्षत्रात किंवा राहूच्या युतीत राहूच्या नक्षत्रात असेल , धनेश नीच राशीत किंवा राहुसोबत असेल तर व्यसने लागण्याचा संभाव असतो .

पत्रिकेत लग्नेश शुक्र चंद्र राहुने बाधित असेल तर व्यसने लागण्याची शक्यता नाकारता येत नाही .

राहू वृश्चिकेत बिघडला असेल तर आणि त्यावर मंगळाची दृष्टी असेल, शुक्र राहू युती असेल आणि चंद्र बलहीन असेल  , शुक्र आपल्या नीच म्हणजे कन्या राशीत असेल आणि चंद्र बिघडला असेल तर व्यसनांकडे कल असतो.

हा झाला ज्योतिषीय दृष्टीकोन . ह्या व्यतिरिक्त रोजच्या जीवनात माणुसकीच्या नात्यातूनही डोळस पणाने आपण ह्यावर मात नक्कीच करू शकतो .

प्रत्येक वेळी तरुण पिढीला नावे ठेवून त्यांना जबाबदार धरणे चुकीचे ठरेल. आजकालची पिढी अत्यंत हुशार , समंजस, सक्षम आहे . आजचे युग हे स्पर्धात्मक असल्यामुळे महाविद्यालयातील प्रवेश , आपल्या गुणवत्तेनुसार मिळणारी चांगली नोकरी , कुटुंबात सामावून जायील अशी चांगली सहचारिणी , नोकरीतील so called ratrace , स्वतःचे घर होण्यासाठी आयुष्यभर फेडत बसायला लागणारे कर्जाचे डोंगर ह्या सर्वाना आजच्या पिढीला तोंड द्यायचे आहे आणि ह्या सर्वांसाठी घरातील मोठ्या मंडळीनी सुद्धा त्यांची मते थोडी बाजूला ठेवून ,स्वभावाला मुरड घालून घरात सगळ्या पिढ्या एकत्र कश्या नांदतील ते पहिले पाहिजे नव्हे ती आपली सगळ्यांची जबाबदारीच आहे .

आपली मानसिक जडण घडण होण्यात आपले कुटुंब आणि घर ह्याचा सिंहाचा  मोठा वाटा असतो . प्रत्येक घर हे अगदी चित्रातील सुखी कुटुंब होयीलच असे नाही ,ते तसे होणे अपेक्षितही नाही कारण कधीतरी भांड्याला भांडे हे लागणारच .पण घरातील कुठल्याही गोष्टीचा इतकाही विपर्यास होता उपयोगी नाही कि घरातील तरुण हतबल होवून नको त्या विळख्यात अडकतील आणि घरातील आनंद बाहेर शोधू लागतील. हि एकच बाजू आहे पण ह्याला अनेक कंगोरे आहेतच कि .घरातील प्रत्येकाने सामंजस्य दाखवत एकेक पाऊल पुढे टाकले पाहिजे . दुसर्याला दोष देण्यापेक्षा मी माझ्या घराला कुटुंबाला काय देवू शकतो हे पहिले पाहिजे. सर्वात पहिले घरातील आनंद , हसते  खेळते वातावरण कसे टिकवता येयील ते पहा .कौटुंबिक आधार माणसाला नेहमीच महत्वाचा असतो . आपल्या घरातील कुणी व्यसनाधीन असेल तर त्याला काही अंशी कुटुंब सुद्धा जबाबदार असू शकते ह्याचाही विचार केला पाहिजे आणि त्यात आवश्यक असणारा बदल सुद्धा झाला पाहिजे .

आजकाल ध्यान योगा म्हंटले कि हि म्हाताऱ्या माणसांची  कामे आहेत असा टोला मारला जातो . किबहुना आजची तरुण पिढी हि सर्वाधिक स्ट्रेस मध्ये असल्यामुळे प्रत्येकाने निदान अर्धा तास तरी स्वतःला वेळ दिला पाहिजे . एखादी समस्या निर्माण झाल्यावर उपाय करण्यापेक्षा ती होऊ नये ह्यासाठी प्रयत्नशील राहिले तर अधिक बरे नाही का. पूर्वीच्या काळी इतकी स्पर्धा नव्हती आणि मागील पिढीतील लोकांकडे संयम होता जो आता धूसर होताना दिसत आहे.

मनाविरुद्ध घटना प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी ना कधी घडतातच म्हणून लगेच कुणी व्यसनांकडे वळत नाही . प्रत्येकाने संयम ठेवून प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढायला शिकले पाहिजे , थोडे थांबून परिस्थिती बदलायची वाट बघितली पाहिजे कारण काळ आणि वेळ हेच सर्वावर उत्तम औषध असते.

उपासना , ध्यान धारणा आपल्याला मानसिक बळ देते , जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन देते , सहनशीलता देते, चंचल मनाला एकाग्रतेकडे  वळवते,  आपणच आपल्याला नव्याने उमगतो इतके अपरिमित फायदे आहेत म्हणूनच आज भारतीयच नाही तर जगभर योगा मेडीटेशन , ध्यानाचे महत्व लोकांना समजत आहे आणि रोज ह्या मार्गात येणाऱ्या आबालवृद्धांची संख्या वाढत आहे. 

आपला एखादा मित्र ह्या गर्तेत अडकला असेल तर त्याच्या जवळच्या  मित्रांनी माणुसकीच्या आणि मैत्रीच्या नात्याने  त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे . व्यसन हे कुठल्याही गोष्टीचे उत्तर असूच शकत नाही उलट त्यातून असंख्य नवे प्रश्न मात्र नक्कीच उभे राहतात . कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यसनाधीन असेल तर संपूर्ण कुटुंबाला त्याचे मानसिक आर्थिक सामाजिक परिणाम भोगावे लागतात पर्यायी त्यातील मुलेसुद्धा नको त्या गोष्टींचे अनुकरण करायला पुढे मागे बघत नाहीत . एकदा ह्या गर्तेत खोलवर मनुष्य गेला कि त्यातून बाहेर पडणे दुरापास्त होते , परतण्याच्या वाटाही धूसर होत जातात ,त्यामुळे ह्या मार्गावर आपण जाणारच नाही ह्याकडे लक्ष्य अधिक असणे गरजेचे आहे.

प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे नक्कीच आहे फक्त ते शांत डोक्याने शोधायचे आहे इतकेच .आपल्याला शोधता नाही आले तर इतरांची मदत घेवून पण शोधायचे हे नक्की . आयुष्य हे सुंदर आहे त्याचा खर्या अर्थाने आस्वाद घ्यायचा असेल तर मन खंबीर केले पाहिजे , नामस्मरण , थोडे अध्यात्म मन शांत ठेवायला मदत करते , निर्णयक्षमता वाढते आणि योग्य मार्गाने आयुष्य व्यतीत करण्याची प्रेरणा सुद्धा मिळते .

चला तर मग येत्या नवीन वर्षापासून संकल्प करुया . मी स्वतः सकारात्मक राहीन आणि इतरानाही करीन .आपल्या ओळखीत कुणी व्यसनाच्या आहारी गेले असेल तर त्याला मदतीचा हात देवून त्याला ह्यातून बाहेर काढणे हाच आपला नवीन वर्षाचा संकल्प असला पाहिजे . आयुष्यात निदान एकाला तरी आपण ह्या वाटेवर जाण्यापासून  परावृत्त केले तर ते खरच मोठे पुण्याचे काम ठरेल ,त्याने एक कुटुंब वाचेल आणि आपल्याला लाभेल ते आत्यंतिक समाधान . असे झाले तर एका नवीन समंजस कुटुंब व्यवस्थेची पुनर्रचना दूर नाही . आपण कुणावर उपकार करत नाही तर हि आपली सामाजिक बांधिलकी सुद्धा आहे. कारण आपले आप्तेष्ट , मित्र मंडळी , सगळेच सुखी तर आपणही सुखीच . पटतय का?

अस्मिता

लेख आवडला तर अभिप्राय द्यायला विसरू नका .

antarnad18@gmail.com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment