|| श्री स्वामी समर्थ ||
आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला घटनेला आपणच जबाबदार असतो. पण मनुष्य स्वभाव म्हणजे चांगले झाली कि आपले आणि वाईट झाले कि दुसर्यावर , साडेसातीवर खापर फोडून आपण मोकळे होतो.
खरतर सगळे आधीच ठरलेले असते त्यालाच विधिलिखित म्हणतात . आयुष्यातील प्रत्येक घटना त्या त्या क्रमाने आपल्यासमोर येत राहतात . ह्या सगळ्याचा आपल्या पूर्व संचीताशी नक्कीच संबंध आहे किबहुना आपले आजचे आयुष्य हे गत जन्मीचा आरसा म्हंटले तर वावगे ठरू नये. एखादा दिवस किंवा एखादा निसटता क्षण आपल्याला दुक्खाच्या खाईत ढकलतो तर एखादा क्षण आनंदाच्या उत्तुंग शिखरावर नेवून ठेवतो. पण खरा माणूस तोच जो कुठल्याही परिस्थितीत आपल्या मनाचा समतोल राखेल. आनंदाने हर्षवायू होऊ देणार नाही आणि दुखाने गर्भगळीत होणार नाही ,हताश निराश सुद्धा होणार नाही.
शांतपणे विचार केला तर होत असलेल्या ,झालेल्या आणि होणार्याही प्रत्येक गोष्टीला आपणच जबाबदार असतो. एखाद्या गोष्टीचे सुख नाही म्हणजे नाही मिळत आपल्याला मग कितीही डोके आपटा. अन्य सुखे समोर हात जोडून उभी असतात पण म्हणतात ना आहे त्याची किंमत नसते तसेच .जे नाही ते मिळवण्याचा अट्टाहास असतो आणि मग ते मृगजळासारखे पुढेपुढे जात असते.
अगदी प्रत्येक प्रसंग , घटना ह्यांचा मागोवा घेतला तर आपणच ह्या सर्वाचे मूळ असतो हे लक्ष्यात येयील. उदाहरण द्यायचे झाले तर धावत बस पकडताना किंवा ट्रेन पकडताना आपण पडलो आणि लागले तर आपण केलेली व्यर्थ घाई आपल्याला नडली .
एखादा शेअर बुडला तर आपण अभ्यास न करता तो विकत घेतला का हा विचार केला पाहिजे . परीक्षेचा पेपर चांगलाच असतो पण आपण अभ्यास नाही केला तर तो कायम कठीणच असणार आहे .एखादा पदार्थ घाईत केला म्हणून बिघडला का? रोजच्या जीवनातील अश्या असंख्य घटनांचा परामर्श घेतला तर आपली अनेक उत्तरे आपल्यापाशी असतात हे समजते.
आपल्या मुलांकडून आपल्या आभाळा इतक्या अपेक्षा असतात .मोठी झाल्यावर त्या पूर्ण नाही झाल्या कि आपण हताश होतो. मुले हि सुद्धा स्वतंत्र व्यक्तिमत्वे आहेत ,त्यानाही त्यांची मते आणि so call space आहे. मुलांनी आपल्यासाठी काही करावे हि अपेक्षा ठेवली म्हणून बरेचदा अपेक्षाभंग पदरी पडला. पण कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांच्याबाबत आपली सर्व कर्तव्ये केली आणि त्यांनी पुढे आपल्यासाठी खूप काही केले तर तो आपला बोनस असेल. आपल्या म्हातारपणाची काठी म्हणून त्यांना वाढवत नाही आपण किबहुना आयुष्यभर त्यांच्या साठी जे काही केले ते एनकॅश करण्याच्या उद्देशाने केले तर ते पाप होईल.
प्रत्येक गोष्ट कुठल्यातरी अपेक्षेने करणे हा मनुष्य स्वभाव आहे. त्यात आपण देवालाही सोडले नाही. माझी अमुक एक इच्छा पूर्ण कर मी ५ नारळाचे तोरण बांधीन हा चक्क व्यवहार झाला पण आपण ते अगदी बिनदिक्कत करत असतो. शेवटी आपण सामान्य माणसे आहोत त्यात्या वेळी जे जे सुचेल ते आपण करत राहणार हे नक्की .पण चांगल्याचे श्रेय नेहमी स्वतःकडे आणि पराभवाचे खापर इतरांवर हे बदलले पाहिजे.
मुलांना मोठेपणी व्यसने लागली किंवा ती निर्णयक्षम नाही झाली किंवा दिशाहीन झाली तर ती अंशतः नक्कीच आपलीच जबाबदारी आहे. विचार करा पटेल. माझा मुलगा माझ्याशी घरात बोलत नाही , आमचे ऐकत नाही हि वाक्य आजकाल अनेकदा कानावर पडतात . लहानपणापासून एकतर त्यांना नको तितकी मोकळीक देणे त्यांच्या चुकांवर “ सगळे हेच करतात “ म्हणून सतत पांघरून घालणे ,त्यांच्या चुका दिसत असून सुद्धा दुर्लक्ष करणे किबहुना त्याचा बडेजाव करणे ह्या सगळ्याचा परिणाम असंच होणार मग. त्यांना मोठे करताना आपण सुद्धा पुन्हा नव्याने त्यांच्यासोबत आपले बालपण जगत असतो .
आपली मुले अचानक आपले ऐकत नाहीत असे होत नाही . लहानपणापासूनचे घरातील संस्कार , त्यांच्याशी अगदी लहान सहान गोष्टीतील केलेले हितगुज हे सर्व आपल्या आणि मुलातील बंध घट्ट करत असतात . मुलांच्या मनात आपल्याबद्दल , आपल्या कुटुंबाबद्दल वाटणारे प्रेम आणि विश्वास हा अभेद्य असलाच पाहिजे आणि त्यांच्या मनात त्या भावना निर्माण करणारे कुटुंबातील वातावरण आपण सर्वांनी ठेवले पाहिजे .थोडक्यात काय ते त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न आपण कधी केला का? हा प्रश्न आपण आपल्यालाच विचारला पाहिजे .
एखादी गोष्ट हाताबाहेर गेल्यावर काय उपयोग . मुलांचे संगोपन शिक्षण त्यांची वेळोवेळी बदलत जाणारी मानसिकता , त्यांचा जगाकडे , स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन , त्यांचे ध्येय ती पूर्ण करण्यासाठी आखलेला मार्ग ह्या सगळ्यात हो हो अगदी सगळ्यामध्ये आपले योगदान असलेच पाहिजे. असे झाले तर आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावरील त्यांचा निर्णय हा सक्षम ठरेल . ह्यासाठी पालक अगदी सुशिक्षितच असला पाहिजे हे गरजेचे नाही . मुलांशी संवाद साधणे हि कला असली कि तेव्हडे पुरते . पण बरेचदा आपण आपल्याच कोशात असतो .मुलांशी शेवटचा संवाद कधी साधलाय अगदी सध्याचा चित्रपट किंवा राजकारण , पेपर मधला एखादा लेख किंवा तत्सम कुठल्याही विषयावर आपण कधी घरात मनमोकळ्या चर्चा केल्या आहेत का? सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केले आहे का?मुलांच्या सोबत वेळ कधी घालवलाय ? आठवा बर . मुलांच्या मनाचा ठाव घ्यायला खरतर वेगळे काहीच करावे लागत नाही . सतत त्यांच्याशी संवाद साधणे ,त्यांच्यासोबत असणे हि भावना सुद्धा त्यांना आकाशात उंच गरुडझेप घ्यायला पुरेशी आहे.
आजची तरुण पिढी अत्यंत हुशार , सक्षम , आधुनिक विचारसरणीचा पगडा असणारी तरीही आपल्या संस्कृतीची मुल्ये जपणारी आहे. घरात आलेल्या सुनेला आपण आपल्या चालीरीती , परंपरा समजावून सांगितल्या पाहिजेत ती नक्कीच करेल. पण तसे न करता “ ती शिकलेली आहे आधुनिक आहे “ असा सरसकट शेरा मारून ती काहीच करणार नाही असे निदान करणे चुकीचे ठरेल.
आपल्या जीवनाचे सुकाणू आपल्याच हाती आहे . आपली कर्मे मग जीकाय असतील चांगली वाईट त्याप्रमाणेच आपले जीवन असणार आहे. आपण आज जे करू तसा उद्याचा दिवस. साडेसातीत अनेक आजारांच्या रुपात आपलीच कुकर्मे हात जोडून समोरून आपल्याच भेटीला येत असतात . हॉस्पिटल मध्ये सुई टोचली कि कुणाला काय बोललो , कसे वागलो त्याचा सगळा आलेख आपल्या समोर उभा राहतो . अर्थात त्यातून आपण किती शिकतो बोध घेतो त्यावर सगळे आहे. “ मी पणा ” हि आपल्या आयुष्याला लागलेली कीड आहे . मी इतरांपेक्षा वेगळा म्हणजेच “ अहंकार ”. आणि जोवर हि भावना आपल्यातून जात नाही तोवर आजूबाजूची माणसेच काय तर प्रत्यक्ष परमेश्वर प्राप्ती सुद्धा होणार नाही .
म्हणूनच ध्यानधारणा ,साधना हवी . रोज थोडावेळ तरी मौन ठेवले पाहिजे . त्या काळात स्वतःशी साधलेला संवाद आपल्याला आपल्याच चुका सुधारायला वाव देयील. इतरांच्या चुकांचे जावूदे त्यांना सुधारायला संत मंडळी आहेत , आपण आपल्याला सुधारले तरी खूप झाले. अनेकांना अध्यात्म हे फ्याड वाटते पण ती जीवन जगण्याची कला आहे. अध्यात्म आपल्याला सगळ्यातून मुक्त करते आणि मोक्षाकडे नेते .
आपला जीवनप्रवास लहान सहान गोष्टीतून आनंद घेवून नक्कीच सुखकर करू शकतो . खरतर हा आनंद आपल्या अगदी अवतीभवतीच असतो . सकाळचा आले घातलेला वाफाळलेला चहा पीत वर्तमानपत्र वाचणे हा सुद्धा एक आनंदच आहे. आपल्या झाडावर उगवलेली फुले वेचणे , छान स्वयपाकाची चव ,सकाळचा मनासारखा मोर्निंग वॉक , मनाला प्रसन्न करणारे नामस्मरण कितीतरी आनंददायी गोष्टी आहेत ...आपल्या आनंदाच्या व्याख्या बदलल्या तर सगळेच सोपे होवून जायील. फार मोठी पूर्ण न होणारी स्वप्ने बघायची आणि मग त्याच्या ओझ्याखाली वावरत राहायचे . सांगितलंय कुणी ? सहज सोप्पे साधे आयुष्य उगीच नागमोडी करून ठेवायचे .कश्यासाठी ?
निसर्ग सुद्धा सतत बदलत असतो तसेच आपले जीवनही आहे त्यामुळे आजचा क्षण हा भरभरून जगणे हेच आपल्या हाती आहे. आनंद देता आणि घेताही आला पाहिजे.
एखादी गोष्ट नाही मिळत द्या कि सोडून किती काळ उराशी ते दुक्ख कवटाळून ठेवणार आणि इतर आनंदाला पारखे होत राहणार . आजकाल कमीतकमी माहिती असलेली बरे असते . आयुष्यातील अर्धा काळ इतरांची उणीदुणी काढण्यात आणि आपलीच गार्हाणी गाण्यात जातो . आपण आपले आपल्याच मस्तीत जगावे हे बरे नव्हे तर उत्तम. आपले छंद जोपासावे , आपला दिनक्रम सुटसुटीत परिपूर्ण करावा , अन्य चौकश्या नकोतच म्हणजे मग रात्रीची शांत झोप आपली हक्काची ती मिळणारच .
आपल्याला आवडेल ते काम करत राहणे आणि सतत कार्यमग्न राहणे , स्पर्धा करायचीच असेल तर स्वतःशी करावी इतरांशी नको . कालच्यापेक्षा आज माझे आयुष्य किती वेगळे आहे ,किती उंचीवर गेले आहे हेच पाहणे उत्तम.
सतत जगबुडी झाल्यासारखे किंवा आमच्यासारखे आम्हीच दुखी असे चेहरे करून वावरल्याने काय साध्य होणार ? काहीही नाही . आयुष्यभराची जमवलेली पुंजी दवाखान्यावर खर्च होणार . त्यापेक्षा सतत हसत राहून आला क्षण जो आपला करतो तो जिंकला. इतके साधे सोपे आहे हे.
प्रत्येकाचे आयुष्य वेगळे आहे आणि प्रत्येकाला देवाने दिलेली धावपट्टी सुद्धा. त्यावर कशी गोलंदाजी करायची हे ज्याचे त्याने ठरवायचे . आपण रोज सिक्सर सुद्धा मारणार नाही आणि रोज आउट सुद्धा होणार नाही . आपले येथील कार्य संपले कि आपण जाणार आणि हे कुणालाच चुकले नाही मग व्यर्थ चिंता कश्याला . कश्याला कुणाचा द्वेष , मत्सर ,त्याने आपण आपलीच कर्मे वाढवून घेणार आणि ह्या जन्म मृत्युच्या फेर्यात अडकत राहणार .
आज करोना कधी जाणार हा प्रश्न ज्याच्या त्याच्या तोंडी आहे. पण कुणी हा विचार करेल का कि करोना का आला? काय शिकवायला आला ? आपण आपण त्याच्यातून खरच किती शिकलो ? रोज पैशाची अन्नाची किती उधळपट्टी नासाडी आपण करतो , रोज माझे आयुष्य आज आहे तसेच असणार आहे हा आपला गैरसमज आहे हे करोनाने दाखवले. मला कुणाचीच गरज नाही ह्यात किती वास्तव आहे? माझ्याकडे अमाप संपत्ती आहे पण माझ्या जवळच्या माणसाला जगायला लागणारा ऑक्सिजन मी पुरवू नाही शकत , मी रक्त तयार करू नाही शकत मी अनेक गोष्टीत किती हतबल आहे कारण देवाने काही कार्ड त्याच्याही हातात ठेवली आहेत हे करोनाने आपल्याला दाखवून दिले.
कुणावाचून आमचे काहीच अडत नाही असे नसते, कारण माणूस “ गरज “ जन्मालाच घेवून आला आहे. ज्याला लाथ मारतो त्याच्याच दारात देव आणून उभा करतो निदान इतके तरी ध्यानात ठेवले पाहिजे. आपले आयुष्य किती क्षणभंगुर आहे मग कश्याला हवे हे हेवेदावे ? आयुष्याच्या अखेरी सुद्धा आपल्याला चार माणसे लागतात आणि ती मिळवायला आयुष्य खर्ची होते. त्यासाठी आपली कर्म उत्तम असायला लागतात . शनी महाराज सगळ्याचा हिशोब ठेवतात कारण ते इतर कुठे नाही तर आपल्या आतच आहेत . त्यांनी केलेल्या शिक्षांचा धाक असायला हवा .
शरीरातून प्राण निघून गेला तर शरीराला दुर्गंधी सुटते , त्याला आप्तजन “ बॉडी आली का " असे म्हणतात . प्राण गेला कि आपले नाव सुद्धा घेतले जात नाही .आपले अस्तित्व संपते . काहीच राहत नाही . शेवटी राहते ती ह्या शरीराची चिमुटभर राख . हेच अंतिम सत्य आहे.
आयुष्यभर ज्यांनी काबाडकष्ट करून वाढवले त्यांनाच वृद्धाश्रमात नेवून टाकण्याचे हीन कृत्य करणारे आपणच असतो .आपल्या सगळ्या कर्माचा लेखाजोखा मांडणाऱ्या त्या विधात्याचा विसर पडतो आपल्याला .
म्हणूनच प्रत्येक सूर्योदय हा नवचैतन्य घेवून येत असतो त्याचे स्वागत तितक्याच आनंदात करून आयुष्याचे सोने करणे हेच आपल्या हाती आहे.
सगळा आनंद डोळ्यात साठवून जगा. म्हणूनच म्हंटले आहे ...आपले डोळे इतके सुंदर असले पाहिजेत कि त्याकडे पाहून इतरानाही जगावेसे वाटले पाहिजे.
शेवटी हि कर्मगती आहे आणि ती कुणालाच चुकलेली नाही .
अस्मिता
antarnad18@gmail.com
उत्तम आणि समर्पक लेख.
ReplyDeleteBitter truth
ReplyDelete