Tuesday, 13 April 2021

स्वामिमय

|| श्री स्वामी समर्थ ||

स्वामी माझा मी स्वामींचा 


चैत्र शु. २ ,अक्कलकोट निवासी समर्थ सद्गुरू श्री स्वामी समर्थ ह्यांचा प्रगट दिन . आज शब्दच सुचेना झालेत . काय आणि कसे लिहावे. महाराजांनी आपल्याला काय दिले आहे हे एखाद्या भक्ताला विचारले तर त्याच्या तोंडून  शब्दही फुटणार नाही फक्त अश्रू वाहतील इतका तो सद्गदित होयील. माझीही  अवस्था वेगळी नाही .  आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर आणि घेतलेल्या प्रत्येक श्वासावर महाराज प्रत्यक्ष विराजमान आहेत . प्रचीतीविना भक्ती नाही आणि भक्तिविना प्रचीतीही नाही . पण केवळ प्रचीती  मिळावी म्हणून केलेली भक्ती हि फोल आहे. मनुष्य प्राणी हा स्वार्थीच आहे ,काहीना काही हवेच असते म्हणून आपण आपल्या गुरूंची आपल्या आराध्याची सेवा करत असतो. पण तरीही जसजसे ह्या अध्यात्मिक मार्गातील आपला प्रवास पुढे जातो तसे मग आपल्या मागण्या कमी होऊ लागतात . एक क्षण असा येतो कि काहीच नको असे वाटते . नुसते स्वामींच्या  समोर डोळे मिटून बसावे आणि नामस्मरणाचा त्यांच्या अस्तित्वाचा आनंद लुटावा. महाराजांच्या बरोबर भक्तांचे direct connection , टेलीपथी असते . आयुष्यात मागे वळून पाहिले तर लक्ष्यात येयील कि तुम्ही न मागीतलेल्याही अनेक गोष्टी त्यांनी तुम्हाला अश्याच देवून टाकल्या आहेत ज्या तुमच्या ध्यानातही आल्या नाहीत. किती आणि काय सारखे मागत राहायचे....आयुष्यभर मागताच राहायचे ? मग त्यांना द्यायचे कधी ? हा विचार नको का करायला .गुरुदक्षिणा हि द्यायलाच हवी त्याशिवाय जन्म सार्थकी लागणारच नाही.

श्री स्वामी समर्थ , गजानन महाराज ह्यांचा प्रगट दिन आला कि आधी ८ दिवस काही सुचेनासे होते . प्रगट दिन कसा करायचा त्यांच्या आवडीचे कुठले पदार्थ करायचे , महराजांचे घरी कसे स्वागत करायचे चंदनाचा धूप लावायचा कि अजून काही , कांद्याची भजी , बेसन लाडू महाराजांना खूप आवडतात मग त्यासाठी लागणारे सर्व जिन्नस घरात आहेत ना. महाराजांना चाफा खूप आवडतो तो आधी आणायला हवा , महाराज आले कि त्यांना आवडणारे हीनाचे अत्तर लावायला हवे . एक ना दोन . घराला जणू लगीनघाई चे स्वरूप येते . महाराज येणार हा आनंदच इतका मोठा असतो कि त्यांच्या स्वागतासाठी भक्त देहभान विसरतात .

प्रगट दिनाच्या दिवशी  घराला जणू एखाद्या मंदिराचे स्वरूप प्राप्त होते . सकाळी घराला लावली जाणारी तोरणे , घराबाहेरील रांगोळ्या , पूजा , धूप दीप , महानेवैद्य , आरती , महाप्रसाद ,महाराजांना आवडणारा विडा नामस्मरण , मानसपूजा , पोथी वाचन आणि महाराजांशी मनसोक्त गप्पा  ह्यात दिवस कसा जातो ते समजत सुद्धा नाही .

महाराजांशी कायकाय बोलायचे ते सगळे मनात आखलेले असते पण ऐनवेळी गप्पा मात्र वेगळ्याच होतात . खरतर महाराजांचे आपल्या वास्तुत येणे म्हणजे आपले परमभाग्यच , हाच  तर मोठा आशीर्वाद . माझा मुलगा लहान असताना मला निरागस प्रश्न विचारत असे. आई , महाराजांचे इतके भक्त आहेत मग ते एकाच दिवशी सगळ्यांकडे कसे जातात ? आपल्याकडे आले हे आपण कसे समजायचे? खरच काहीच उत्तर नाही ह्याला . ह्या  गोष्टी भक्त अनुभवायच्या आहेत . महाराज आपल्या सगळ्या भक्तांच्या घरी येणार हे नक्की , भक्तीत अंतर नसते, तिथे उच्च नीच , गरीब श्रीमंत , आवडते नावडते काहीच नसते , जिथेजिथे भक्ती आहे , अंतर्मनापासून श्रद्धायुक्त अंतकरणाने मारलेली हाक आहे तिथे सद्गुरूंचा वास आहे ह्यात दुमत नाही.

देव आपल्या भोळ्या भक्तीचा भुकेला आहे. एका क्षणात आपल्याला समजते कि महाराज आले. त्यांना यावेच लागते , भक्तांना  ते नाराज कधीच करत नाहीत , ह्यावर माझा ठाम विश्वास आहे आणि आजवर तो त्यांनी अभेद्य ठेवलाही आहे. साधुसंत येती घर तोची दिवाळी दसरा अशीच स्थिती आपली त्या दिवशी होते.

एक लहानशी गोष्ट आठवली . एकदा महाराज वडाच्या झाडाखाली  आसनस्थ होते आणि एक भक्त त्यांच्या दर्शनाला आला. महाराजांना नमस्कार केला असता त्याला त्यांच्या एका पायावर गुलाबाची फुले आणि एका पायावर चाफ्याची फुले दिसली . तशी तो महाराजांना म्हणाला कि हि फुले आहेत पण इथे तर कुणी नाही तेव्हा महाराजांनी दूर ठिकाणी असणार्या आपल्या २ भक्तांची नावे सांगितली आणि म्हणाले ते तिथे माझी पूजा करत आहेत हि फुले त्यांनीच अर्पण केली आहेत . काय  थोर असेल त्यांची भक्ती आणि अध्यात्माची उंची.  महाराजांनी प्रत्येक क्षणी मला तारले आहे माझे भरभरून लाड केले आणि चुकले तेव्हा कानही धरला आहे. माझा श्वास फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच चालू आहे ह्याचा विसर मला प्रत्येक वेळी श्वास घेताना होतो आणि त्यामुळे त्यांच्या सेवेत मी रममाण आहे. जीवन आनंदाने भरलेले आहे कारण त्यांचे अस्तित्व जीवनात जाणवत आहे.

आपल्या घरातून स्वामींचा फोटो आणि देवघर वजा केले तर त्या घराला शून्य अर्थ प्राप्त होयील . आई घरात नसेल तर लेकरू कसे केवीलवाणे होईल तीच स्थिती महाराजांच्या शिवाय आपल्या सर्व भक्तांची आहे. महाराजांचे  अस्तित्व अबाधित आहे ,कुणी काहीही म्हणो . महाराजांचे अस्तित्व अनुभवायचे असेल तर त्यासाठी आपल्या हृदयात त्यांचा वास असायला हवा, निखळ श्रद्धा हवी . जळी स्थळी काष्टी पाषाणी फक्त त्यांचीच छबी त्यांचेच विचार मनात रुंजी घालतील तेव्हाच आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची प्रचीती येयील अन्यथा सर्व फोल आहे म्हणूनच अध्यात्म हि जगण्याची कला आहे हे म्हंटले आहे ते उगीच नाही .

महाराजांना कुणी आवडते नावडते नाही . जो त्यांची अनन्यभावे सेवा करतो तोही त्यांचा आणि जो करत नाही तोही त्यांचाच . आपण एकच ब्रम्हांड पाहत आहोत पण  आपले महाराज कोटी ब्रह्मांडाचे  स्वामी आहेत . इथे सहज सोपे काही नाही , प्रत्येक वाटेवर काटे आहेत कारण अध्यात्माची वाटच मुळी काटेरी आहे .

मी पणा सोडल्याशिवाय इथे कितीही डोके आपटले तरी काहीच मिळणार नाही. आपण एक माळ करतो आणि महाराजांच्या समोर आपल्या इच्छांची यादी ठेवतो .   ज्याने जन्माला घातले त्याच्याशी   सुद्धा व्यवहार , मी जप केला मग आता तुम्ही मला हे द्या . अगदी उघड नाही पण  आपला अंतस्थ हेतू ह्यापेक्षा वेगळा असतो . पण आपल्याला काही मागायची खरच गरज नाही. त्यांना माहित आहे आपल्याला काय पेलवणार आहे त्यामुळे आपल्याला झेपेल ते वेळ आली कि सर्व मिळणार .

साई बाबांनीही आपल्या भक्तांना सांगितले आहे “ समय से पेहले और भाग्य से जादा किसी को कुछ भी नही मिलता..”. प्रपंच करताना अडथळे , संकटे येणारच म्हणून आपण प्रत्येक वेळी महाराजांना वेठीस धरायचे का? आपण केलेल्या भक्तीचा हिशोब मांडायचा का? कि एक हात से दो और एक हात से लो असे म्हणत आपली सेवा एनकॅश करायची ?

आपण आपले कर्म करत राहायचे , आपल्या अनंत जन्माच्या पाप आणि पुण्याचा आरसा म्हणजे आपले आत्ताचे जीवन आहे . आपल्या कर्माची फळे मग ती चांगली वाईट दोन्हीही असतील ती निमूट पणे भोगायची आणि भोगूनच मुक्त व्हायचे.  आपल्या कर्माचा सगळा लेखाजोखा त्यांच्याकडे असतोच कि मग ते भोगण्यासाठी बळ आपल्याला आपल्या सेवेतूनच मिळणार आहे वेगळे काय मागायचे.

अध्यात्म म्हणजे काही जणांना टाईम पास किंवा वेळ जाण्याचे साधन वाटते . काहींच्या मते अध्यात्म हे आयुष्याच्या संध्याकाळी करायच्या गोष्टी आहेत . पण खरच तसे आहे का? नाही .

आजची तरुणाई स्ट्रेस मध्ये आहे त्यांनाच खरतर अध्यात्माची नितांत गरज आहे.

आई आपण ह्या जगात पदार्पण केले कि आपले बोट धरते अगदी तसेच त्याच क्षणापासून ते आपल्या अखेरच्या क्षणापर्यंत आपण सद्गुरूंचे त्यांचे होवून जगलो पाहिजे.एकदा त्यांच्या शाळेत नाव घातले कि मग ते नेतील तसे आणि करतील ते. ज्योतिष संपते तिथे अध्यात्म सुरु होते आणि तिथे गेलेल्या लोकांनी ज्योतिष बघूच नये कारण तुमची पत्रिका स्वतः गुरु लिहित असतात .हे सर्व आकलनाच्या बाहेर आहेत .

 अध्यात्म आणि आपण वेगळे नाही . प्रपंच करत परमार्थ करा हीच तर जिवनाची सूत्री आहे. पण ते निष्काम असले पाहिजे . हेतुपूर्वक काहीच नसावे . आई जसे मुलावर प्रेम करते अगदी तस्सेच किबहुना काकणभर अधिक आपले सद्गुरुंवर प्रेम हवे.

त्यांनी किती दिले आहे ह्याचा हिशोब म्हणजे  अवकाशातील  तारका मोजण्या सारखे होईल. महाराजांनी टाकलेल्या एका कटाक्षाचा भक्त भुकेला असतो . त्यांची सेवा कश्यासाठी तर मेवा खाण्यासाठी नाही .

“ माझा फोटो ठेवून बाजार मांडू नकोस “  हे त्यांचेच शब्द आहेत .

“हम गया नाही जिंदा है” हे अभीवचन भक्तांना देणार्या स्वामींच्या जयंती ते पुण्यतिथी पर्यंत  संकल्पित नामस्मरण करून आपले आयुष्य कृतकृत्य करुया . आपले भाग्य थोर आणि गत जन्मीचे सुकृत म्हणून आपल्याला त्यांच्या चरणांची सेवा करण्याचे अहो भाग्य प्राप्त झाले आहे. खरतर त्यांचे नाव घ्यायची सुद्धा आपली पात्रता नाही .त्यामुळे आपणही नामस्मरण करावेच पण आपल्या आप्तेष्ट , मित्र ,नातेवाईक ह्यानाही नामाची महती सांगून त्यांना नामस्मरणाच्या,  ह्या अध्यात्माच्या मार्गात आणावे . आपण अत्तर लावले तर दुसर्याला त्याचा सुवास येणारच , चांगल्या मार्गात यायला वेळ लागतो पण महाराजही मनापासून केलेल्या सेवेचे भुकेले आहेत आणि त्यानाही आपली आस आहे.

महाराज आणि भक्त हा दुग्ध शर्करा योग आहे म्हंटले तर वावगे ठरू नये . त्यांना तरी कुठे  करमत आपल्याशिवाय . बघा निघाले सुद्धा असतील ते अक्कलकोट हून . घरोघरी भक्तांची चाललेली लगबग आणि प्रगट दिनाची तयारी बघून प्रसन्न झाले असतील .

स्वामी प्रगट दिन ते स्वामी पुण्यतिथी आपापल्या घरी जसे जमेल तसे रोज संकल्पित नामस्मरण करूया. आपली कुणाशी स्पर्धा नाही . ह्याने इतका जप केला त्याने तितका हे पहायचे नाही . किती जप केला त्याहीपेक्षा तो किती आत्मीयतेने , श्रद्धेने केला हे महत्वाचे आहे . आपला भाव ते जाणतात . महाराजान सांगुया कि तुम्ही आमच्याकडून हा जप करून घ्या . म्हणजे सर्व श्रेय त्यांना दिले कि आपल्याला मीपणा आणि अहंकार येणार नाही .

मी सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांचा नामस्मरण ग्रुप केला आहे कारण ज्योतिषी सुद्धा आधी उत्तम माणूस म्हणून घडणे गरजेचे आहे. स्वामी सेवेने वाचासिद्धी येयील आणि ह्या शास्त्रात अधिक पारंगत होता येयील. सर्वजण उत्चाहाने ह्या नाम सोहळ्यात सहभागी झाले आहेत ह्याचा विशेष आनंद आहे.

कितीही म्हंटले तरी आपण प्रापंचिक माणसे आहोत त्यामुळे आपली एखादी इच्छा असेल तर अवश्य त्यांना सांगावी त्यासाठी ते नक्कीच मार्ग दाखवतील. म्हणजे असे कि आर्थिक विवंचना असेल तर ते आपल्याला कुरियरने चेक पाठवणार नाहीत  पण काम मिळवून देतील हे नक्कीच .

प्रगट दिन ते पुण्यतिथी दरम्यान केलेले संकल्पित नामस्मरण आपल्या आयुष्याचा सोहळा करेल . मानसिक आनंदाच्या उत्तुंग शिखरावर आपल्याला नेयील ह्यात शंकाच नाही . रोज नित्याची पूजा झाली कि मानसपूजा , तारकमंत्र आणि नामस्मरण  . स्वामींवर लईच उपकार केल्याची भावना नको , भक्तीचा बाजार तर नकोच नको , मनाच्या गाभ्यापासून अंतर्मनाने त्याना साद घाला.  आपल्या  घरात रोज  जे काही अन्न शिजवले असेल त्याचा नेवैद्य हा करावा .हा परिपाठ न चुकता 14 एप्रिल ते 9 मे करून बघा आणि प्रचीती घेवून बघा. ते आपल्या हाकेला धावून येणार हा विश्वास अभेद्य ठेवा .

आपली हाक मनापासून असेल आणि त्यात समर्पणाची भावना असेल तर  आपले आयुष्य कधी

“ स्वामीमय “ होवून जाईल ते आपले आपल्यालाही उमगणार नाही.

निशंक हो निर्भय हो मना रे ...प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे....

नामस्मरणासाठी जप आहे – “ श्री स्वामी समर्थ “

अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय जरूर लिहा.

antarnad18@gmail.com

#अंतर्नाद#श्री स्वामीसमर्थ#अक्कलकोटनिवासी#अध्यात्म#नामस्मरण#जप#मानसपूजा #भक्ती #साधना #जपजाप्य#तप#नेवैद्य#महाप्रसाद#आनंदसोहळा #प्रचीती

 

4 comments:

  1. अतिशय सुरेख लेख. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

    ReplyDelete
  2. छान वाटले वाचून...धन्यवाद

    ReplyDelete
  3. ।श्री स्वामी समर्थ। उपासानेस उद्युक्त करणारा छान लेख.

    ReplyDelete