Friday, 28 May 2021

तीर्थाटन

 || श्री स्वामी समर्थ ||



तीर्थयात्रांना जाण्याबद्दल अनेक तर्क वितर्क असतात .आपल्या घरात देवघर आहे आणि देवही आहेत मग उठून वेगळे तीर्थक्षेत्री कश्याला जायचे ह्यासारख्या अनेक प्रश्नांचा उहापोह हा जायच्या आधीच सुरु होतो. ह्या सर्वांचे  निराकरण करण्याचा हा लहानसा प्रयत्न.

मनुष्य हा रोजच्या जीवनातील सुख दुखे , कामधंदा , व्यवसाय , प्रपंच ह्यात इतका गुंतलेला असतो कि मनात इच्छा असूनही त्याला साधनेसाठी वेळ देता येत नाही . येथून बरोबर काहीच न्यायचे नाही हे माहित असूनही मोह माया आसक्ती ह्यापासून दूर जावू शकत नाही ,त्याच चक्रात अडकतो . ह्यासाठीच प्रपंचातून काही काळ मुक्त होवून ईश्वरी सानिध्य लाभावे तसेच हातून  सेवा , देवधर्म घडावा ह्या उदात्त हेतूने तीर्थाटन करावे. कळतनकळत हातून झालेल्या पापांचे क्षालन होते .

देव दर्शनाने पुण्य पदरी पडते तसेच त्यानिम्मित्ताने आपल्या आप्तेष्टांचा  सहवास घडतो. सहकुटुंब सहपरिवाराचा आनंदहि मिळतो . 

तीर्थ क्षेत्र हि तेथील देवतेच्या वास्तव्यामुळे  जागरूक , सकारात्मक उर्जेने भरलेली असतात .शेवटी स्थान महत्व आहेच . तेथील वातावरणातील  स्फंदने  मनाच्या शुद्धीकरणासाठी अत्यंत उपयुक्त असतात . ह्या सर्वच एकत्रित परिणाम म्हणजे  अनेक कारणांनी मनाला आलेली मरगळ , निराशा झटकून एक सकारात्मक दृष्टीकोन मिळतो आणि पुनश्च नव्याने जगणे सुरु होते .

तीर्थ क्षेत्रातील वातावरण हे अध्यात्मिक असते ,आपण घरात आपला प्रपंच करत असतो त्यापेक्षा ह्या वातवरणात  आपली ध्यान धारणा ,अध्यात्मिक प्रगती निश्चित होतेच तसेच आपल्याला मानसिक शांतता मिळते .

निदान काही काळ तरी संसारिक आसक्ती कमी होवून षड्रिपुंपासून मुक्तता मिळते आणि अध्यात्मिक सेवा घडून पापक्षालन होते. 

म्हणूनच शरीराच्या आणि मनाच्याही शुद्धीकरणासाठी तीर्थाटन आवश्यक आहे. आता हे कुणी करावे ? तर आजच्या तरुण पिढीने सर्वप्रथम करावे . तीर्थयात्रा घरातील वयस्कर मंडळींनी कराव्यात हा गैरसमज आहे. त्यांच्या आयुष्याची संधाकाळ आहे, त्यांनी जीवनातील सगळे चढ उतार पचवले आहेत , प्रपंचातून मुक्त होण्याच्या आणि वार्धक्याच्या उंबरठ्यावर ते आहेत त्यामुळे त्यांना शांततेची  गरज आहेच ,पण त्यांनी जगलेल्या आयुष्यातून त्यांना खर्या अर्थाने मनोबल मिळालेले आहे. 

आजची तरुण पिढी अत्यंत हुशार , समंजस  असली तरी त्यांना प्रत्येक क्षणी स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. तारुण्याच्या टप्प्यावर जीवघेण्या स्पर्धेमुळे आपला आत्मविश्वास घालवून बसत आहेत . अपेक्षित यश न मिळाल्यामुळे व्यसनाधीनता , अपेक्षाभंग झाल्यामुळे  एकटेपणा , सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील समस्या ह्यामुळे जीवन फुलण्याआधीच ते संपवायचे विचार मनात येत आहेत . एकमेकांपासून दुरावलेली मने आणि अपुरा संवाद ह्यामुळे वाढते घटस्फोटांचे प्रमाण ह्यामुळे जीव मेटाकुटीला येतो आणि जीवनातील आनंदाला आपण पारखे होतो.

जीवन सुंदर आहे पण त्यासाठी आपल्याला स्वतःला काही वेळ द्यायला पाहिजे.  परमेश्वरी शक्ती अगाध आहे आणि त्याच्या सानिध्यात आपल्याला सगळ्या प्रश्नांची नुसती उत्तरेच नाही तर अपिरीमित आनंदाचा कधीही न संपणारा ठेवासुद्धा प्राप्त होतो. अध्यात्म आपल्याला आपल्याच आयुष्याकडे त्रयस्थाच्या नजरेतून बघायला शिकवते.

आजची एकंदरीत जीवनशैली बघता उपासना आणि ध्यान धारणा हे जीवन सुखी आणि समृद्ध करणारी गुरुकिल्ली म्हंटली तर वावगे ठरू नये. 

परमेश्वराच्या  सानिध्यात काही काळ वास्तव्य केल्याने आपलीच आपल्याला नव्याने ओळख होते, आत्मपरीक्षण करता येते . आपला आपल्याशीच संवाद सुरु होतो. तेथील परिपूर्ण वातवरणात आपण परमेश्वराला शरण जातो आणि एका समृद्ध जिवनाची नव्याने सुरवात होते . आध्यात्मिक आनंद जीवन उजळून टाकतो , प्रेरणा मिळते , सकारात्मकतेचे अंकुर मनी फुलतात आणि खर्या अर्थाने  जीवनाचा सोहळा होतो.

अस्मिता

antarnad18@gmail.com

#बद्रीनाथ#केदारनाथ#रामेश्वर#अष्टविनायक#देवस्थान#स्थानमहत्व#सानिध्य#ध्यान#उपासना

Tuesday, 18 May 2021

सर्वांगसुंदर उपासना

 || श्री स्वामी समर्थ || 


आज करोना मुळे प्रत्येक माणूस दडपणाखाली जगताना दिसत आहे. एका अनामिक भीतीने आपल्या सर्वाना ग्रासून टाकले आहे. आपले आयुष्य पूर्ववत कधी होयील हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. पैशाचा स्त्रोत कमी होत आहे . आपणच वाढवून ठेवलेल्या गरजा पूर्ण करताना आता आपलीच दमछाक होते आहे. सततची भीती , मानसिक दडपण , सैरभैर झालेले मन ह्या सर्वांमुळे चित्त ठिकाणावर नाही. आला दिवस आपला म्हणायची वेळ आली आहे. 

करोना बाजूलाच राहिला . ह्या सर्व दडपणाखाली जगताना आपण मोकळा श्वास घ्यायला विसरलो आहोत आणि त्यातून असंख्य आजार , मानसिक विकृती आपणच जन्माला घालत आहोत.

ह्या सर्वातून बाहेर पडण्याचा आणि आपले मनोधैर्य टिकवून ठेवण्याचा उत्तम उपाय म्हणजे
घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना . ह्या मुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण तर होयीलच पण जगायला बळ मिळेल ह्याची खात्री वाटते म्हणून त्यासंबंधीचे विचार आज आपल्यासमोर ह्या लेखाद्वारे मांडण्याचा लहानसा प्रयत्न करत आहे. 

ह्या सर्व करत असताना आपल्याला मासिक पाळी मध्ये आली तर तो वार दिवस सोडून द्यायचा आणि पुढचा घ्यायचा.  कुठलेही कल्प विकल्प मनात न ठेवता ह्या केल्या तर  मनाचा सात्विकपणा पुन्हा येयील आणि हरवलेला आनंद चेहऱ्यावर आणि संपूर्ण कुटुंबावर  दिसू लागेल हे आवर्जून नमूद करावेसे वाटते . अनुभव घ्या आणि आपले अनुभव कळवा.

उपासना आणि व्रत

१. संध्याकाळी देवासमोर गायीच्या तुपाचा दिवा लावावा ( निरांजन ).त्यामुळे घरात सकारात्मकता राहते 



२. आपल्या कडून अनेकदा कुलाचार होत नाहीत त्यासाठी  आपल्या कुलस्वामिनीची ओटी  ५ शुक्रवार  किंवा मंगळवार भरावी . पहिल्या 4 ओट्या ह्या घरात आणि ५ वी ओटी देवळात जाऊन भरावी . ५ वी ओटी देवळात  भरताना स्टील चे निरांजन घेवून जावे आणि तिथे तुपाचा दिवा लावावा . ते निरांजन देवळात ठेवायचे आहे .

ओटीचे साहित्य

तांदूळ नारळ  
टोवेल/लहान पंचा  (खण असेल तरी चालेल पण आजकाल त्याचे काय करावे समजत नाही –काळानुसार आपण बदलावे . ) 
हळद कुंकुवाच्या पुड्या .
साखरेची पुडी  
गुळ चणे (फुटाणे – भिजलेले चणे नाहीत )
उदबत्ती धूप  
गजरा वेणी – जे असेल ते आणि फुले 
कुठलेही एक फळ – देवीला डाळिंब खूप आवडते .
दुध साखरेचा नेवेद्य .

घरात ओटी भरताना हे सर्व एका ताटात ठेवून घरातील देव्हार्यातील देवीची ओटी भरायची . तिला आपल्या मनातील इच्छा सांगायची आणि भरायची . ३ वेळा ताट उचलून खाली ठेवायचे आणि नमस्कार करायचा . देवीला हळद कुंकू ,सर्व फुले वाहायची . धूप दीप निरांजन लावून घरात जो काही स्वयपाक केला असेल त्याचा नेवैद्य देवीला दाखवायचा . संध्याकाळी कुणी सवाष्ण घरी आली तर तिला आपल्या व्रताबद्दल अजिबात वाच्यता करायची नाही . तिला फक्त हळद कुंकू लावून फुल गजरा जे असेल ते द्यायचे आणि चणे द्यायचे .

असेच सहज आलात आज शुक्रवार आहे असे म्हणून हळद कुंकू द्यायचे बाकी काही बोलायचे नाही .

मध्ये काही कारणाने खंड पडला तर शुक्रवार(तुमच्या देवीचा जो काही वार असेल ) सोडून द्यायचा आणि पुढील शुक्रवार करायचा . ह्या ओटीतील सर्व गोष्टी दुसर्या दिवशी घरातच वापरायच्या आहेत .

आपल्याकडून देवीची सेवा , कुलाचार घडतो  आणि मनाला अतिशय समाधान लाभते.

३  घरात हळद कुंकू होत नसेल किंवा तशी प्रथा नसेल तर श्रावणात , मार्गशीर्षात , नवरात्रात किंवा वर्षातील कुठल्याही शुक्रवारी  जवळच्या ग्रामदेवतेच्या देवळात सव्वा किलो हळद कुंकू घेऊन जायचे आणि देवीला अर्पण करायचे . तिथे हजारो स्त्रीया ते लावतील . आपले हळदीकुंकू झाले असे समजायचे . त्यातील थोडे घरी आणून ठेवायचे आणि आपणही लावायचे .



३. देव्हार्यातील देवीला कुंकुमार्चन करावे , देवीला कुंकुवाचा अभिषेक करावा व जप करावा.

4 महालक्ष्मी अष्टक रोज  संध्याकाळी दिवेलागणीला म्हणावे .

५ देवीचा जप - ओं श्री महालक्ष्मै  मातायै  नमः

६ रामरक्षा नित्य पठण

७ श्री स्वामी समर्थ –नामस्मरण 

८  साडेसाती किंवा शनी महादशा असेल तर शनी महाराजांचा जप - ओम शं शनैश्चराय नमः जपसंख्या 23000 आहे. 

साडेसातीचा त्रास होत असेल तर एका मातीच्या पणती मध्ये तेल घालावे आणि त्यात आपला चेहरा  १ मिनिट पहावा  .नंतर ते तेल देवळातील समई मध्ये घालावे म्हणजे आपली पिडा जाळून जाईल. ते तेल मारुतीच्या डोक्यावर ओतायचे नाही हे लक्ष्यात ठेवावे . असे ३ शनिवार करावे.

९   विवाह झाल्यावर सत्यनारायण पुजावा आणि मग कुल देवतेचे दर्शन घेवून संसाराला सुरवात करावी  अशी रूढी परंपरा आहे.  श्रावण महिन्यात किंवा एखादा चांगला दिवस पाहून अनेक घरात वर्षातून एकदा सत्य नारायणाची पूजा केली जाते . अनेक वेळा इच्छा असूनही सत्यनारायण आपल्या घरी होत नाही . इतका मोठा घाट घालायचा ,मेहूण जेवायला घालायचे  एक ना दोन अनेक गोष्टींमुळे ते राहून जाते .

आपल्या घरात घरच्या घरी हे सत्यनारायण व्रत आपण करू शकतो . हे व्रत करणारा मनुष्य ह्या लोकी सर्व सुख उपभोगुन शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो असे मानले जाते .

प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करायचे आहे . घरातील जी व्यक्ती  हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला करायचे आहे. आज एकाने पुढील वेळेला दुसर्याने असे नाही .

विधी – घरात पूर्व किंवा उत्तर दिशेस एक चौरंग /पाट मांडावा त्यावर एक वस्त्र घालावे. त्यावर मुठभर तांदूळ पसरावे आणि त्याच्या मधोमध पाण्याने भरलेला कलश ठेवावा . त्यात पैसा फुल घालावे. त्यावर एक ताम्हन ठेवावे आणि त्यात मुठभर तांदूळ पसरावे. ह्यात तुळशी पत्राचे आसन करून त्यावर  आपल्या देवघरातील श्री कृष्णाची मूर्ती ठेवावी आणि त्याची पूजा करावी . श्रीकृष्णाला  तुळस ( एक वाहिली तरी चालेल . १०८ ,१००८ आवश्यक नाही ) आणि फुल अर्पण करायचे . नवग्रह पूजा करायची नाही . केळीचे खांब इतर काहीही नको . कुणाला बोलवायचं तर प्रश्नच नाही ,साधी वाच्यातही नाही .

श्रीकृष्णाच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करून  त्याला गंध , अक्षता फुल आणि तुळस अर्पण करावे. 

आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे म्हणून विनंती करावी .धूप दीप उदबत्ती ओवाळावी  आणि अंतर्मनाने शरण जावे.  सत्यनारायण व्रत पोथी मिळते (संपूर्ण चातुर्मास ह्यातसुद्धा आहे ) त्यातील  सत्यनारायण कथेचे वाचन करावे . आरती करून  लहान वाटीचा प्रसाद करावा त्यात केळे घालावे आणि नेवैद्य दाखवावा . त्या दिवशी घरात जो काही स्वयपाक केला असेल त्याचा महाप्रसाद दाखवावा आणि घरातील सर्वांनी तो ग्रहण करावा. 

दुसर्या दिवशी सकाळी घरातील देवांची पूजा झाली कि मूर्तीवर अक्षता वाहून “ पुनरागमनायच “ असे ३ वेळा म्हणावे आणि श्री कृष्णाची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावी आणि नमस्कार करावा. 

हे व्रत महिन्यातून फक्त पौर्णिमेला करायचे आहे  त्यामुळे ते सहज करता येयील असे आहे. 

वरील सर्व व्रत आणि उपासना करताना त्यातील मेख / गोम अशी आहे कि आपण करत असलेल्या व्रताची , उपासनेची  कुठेही वाच्यता करायची नाही .कुठेही अवाक्षर सुद्धा काढायचे नाही तरच ते फलद्रूप होयील हे ध्यानी असुदे. नाहीतर कर्णोपकर्णी झाले तर त्याचे महत्व कमी होऊन फळ पदरात पडणार नाही .

आपल्याला जश्या जमतील तश्या आपल्या इच्छे प्रमाणे कुठल्याही उपासना कराव्यात . एक ना धड 
भाराभर चिंध्या ह्या प्रमाणे मात्र होऊ देऊ नये. जे करू ते मनापासून आणि त्यात सातत्य असेल  तरच त्याचा आनंद आहे. 

येणारा पुढील काळ आणि वर्ष आपल्या सर्वासाठी  सात्विक उपासनेचे असुदे  आणि अखंड विश्वावरून हे करोना महामारीचे संकट दूर होवून आपले सर्वांचे आयुष्य पूर्ववत होवूदे.  सर्वांची सर्वार्थाने प्रगती होवूदे अशी  स्वामीचरणी प्रार्थना करूया.

उपासनेचे  महत्व अनन्यसाधारण आहे . त्याने नुसतेच मनोबल वाढत नाही तर त्यातील असामान्य ,  प्रचंड सामर्थ्य आपला जीवनप्रवास आनंददायी करते .फक्त त्यात समर्पणाची भावना हवी.  तुमचा आमचा सर्वांचा हा जीवनरूपी प्रवास सुखद ,आनंददायी व्हावा म्हणून उपासनेचे महत्व सांगणारा हा लेखन प्रपंच.   

टीप:  कुठलेही व्रत किंवा उपासना हि फार तामझाम न करता साधेपणाने करावी ,अहंकार विरहित असेल तर कृपा होयील. जशी जमेल तशी करावी . बसायला पाट घ्यावा कि आसन किंवा तत्सम काही असे बालिश प्रश्न विचारू नयेत .ह्या लेखात लहासहान गोष्टी सुद्धा स्पष्ट केल्या आहेत त्या नीट वाचल्या तर  विचारायला  प्रश्नच उरणार नाहीत .

अस्मिता

वाचकांनी आपले अनुभव जरूर कळवावे .

antarnad18.blogspot.com
antarnad18@gmail.com










Monday, 17 May 2021

पंचप्राणाचे अधिष्ठान - शनी

 || श्री स्वामी समर्थ ||



आपल्या मनासारख्या घटना घडल्या नाहीत कि त्यासाठी कुठल्या ना कुठल्या ग्रहाला जबाबदार धरणे हा आपला स्वभावच आहे. आपली पत्रिका म्हणजे गत जन्माचा आरसा आहे. जे जे चांगले ते आपल्यामुळे आणि वाईट ते साडेसाती किंवा शनीमुळे हा गोड गैरसमज आहे. आपल्या चांगल्या वाईट कर्मानुसार ग्रह आपल्या पत्रिकेत स्थानबद्ध झाले आहेत, त्यांचे स्वागतही झाले पाहिजे आणि त्यांचा सन्मानही केला पाहिजे  .आपल्या कर्मानुसार त्यांनी त्यांचे आपल्या पत्रिकेतील स्थान ग्रहण केले आहे. त्यामुळे माझा शनी इथेच का आणि माझा शुक्र तिथेच का हे प्रश्न आपण स्वतःला विचारले आणि चिंतन मनन केले तर अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्यालाच मिळतील.

आपण केलेल्या कर्माचा न्याय देणारा एकमेव न्यायाधीश म्हणजे शनी . शनी हा परखड आणि शिस्तबद्ध असणारा शिक्षक आहे. शनी अन्य कुठे नाही तर तो आपल्या आतच आहे. आपण आयुष्यात केलेल्या कर्माचा हिशोब तो ठेवतो आणि तुमच्या कर्माचा काय भोग असणार हेही तोच ठरवतो. म्हणूनच दशम स्थानात म्हणजेच कर्म स्थानात अधिराज्य गाजवणारा शनीच आहे. शनी हा वैराग्याचा कारक आहे आणि वैराग्याशिवाय मोक्ष नाही.

षष्ठ स्थान हे आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवसाय नोकरीचे आहे. तुम्ही कसे काम करता , कुठल्या मार्गाने पैसा मिळवता हे ह्या स्थानावरून समजते .काम प्रामाणिक पणे काम करता का , कुणावर अन्याय नाही ना करत , लक्ष्मी कशी आणता ? ह्याचे चित्र दशम स्थान दाखवते आणि त्याचा न्याय सुद्धा शनीच करतो .  काम चांगल असेल तर प्रशंसा , कौतुक होते , समाजाकडून प्रतिष्ठा , मान मिळतो आणि हे सर्व दशमाकडून मिळते . कर्म चांगले नसेल तर त्रास होतो रडतखडत आयुष्य पुढे जाते. 

शनी हा धार्मिक आहे, मोक्षाचे अधिष्ठान ठेवणारा आहे. शनी म्हणजे कायदा  , सुव्यवस्था आहे . शनी हा उत्तम शासक ,राजकारणी , बुद्धिमान , न्यायाने राज्य करणारा आहे . शनीला गलथानपणा आवडत नाही. चिकाटी हा त्याचा मुख्य गुण आहे तसेच निश्चयी काटेकोर स्वभाव हा त्याचा धर्म आहे. वृद्ध आहे पण नियमाला कडक आहे. ज्ञानाने समृद्ध आहे. अहंकाराने माजलेल्या प्रत्येकाला शनी त्याची जागा दाखवून देतो. 

लीनता आणि नम्रता हा शनीचा मुख्य गुणधर्म आहे . शनी आपल्या पंचप्राणाचा अधिष्ठाता आहे. योगशास्त्राचा प्रमुख ग्रह आहे. प्राणावर त्याचे एकट्याचे संपूर्ण अधिराज्य आहे. तुम्हाला किती श्वास द्यायचे  आणि तुमच्या प्राणाचे बटन कधी दाबायचे आणि तुम्हाला भोगातून कधी मुक्त करायचे हे ठरवणारा  शनीच असतो. 

आपण आपल्या कामात प्रामाणिक राहिलो , सचोटीने काम केले तर शनी महाराज आपल्याला त्रास देणारच नाहीत उलट आपल्या पाठीवर चांगल्या कामासाठी शाबासकी मिळेल ह्यात शंकाच नाही .

शनी सप्तम स्थानात दिग्बली होतो. रात्रीवर आणि पश्चिम दिशेवर त्याचे साम्राज्य आहे आणि तिथे तो समृद्धी करतो.  शनी स्वराशीत ,उच्च राशीत , मुलत्रिकोण राशीत नवमांशात उच्च आणि वर्गोत्तम होतो  तेव्हा 4 5 7 9 10 11 स्थानात आपले कर्तुत्व गाजवतो ,समृद्ध करतो. केंद्रात शश योगात येतो तेव्हा राजकारणात अचानक उच्चीचे स्थान देतो. पण तिथे कर्म जर नीच केले तर तोच शनी खालच्या पातळीवर नेतो कारण जसे कर्म तसे फळ.

शनी 1 5 9 ह्या स्थानात उत्कर्षाने बुद्धी वाढवतो . केंद्र आणि त्रिकोणात अधिक फळतो .उपचय स्थानात शनी चांगली फळे देतो . असे जातक चिकाटीचे संशोधक असतात , कठोर तपश्चर्या करून थोर तत्वचिंतक होतात .

ज्याची त्याची जागा त्याला दाखवून कसलीही माफी न देणारा शनी हा खरच वंदनीय आहे. शनी द्वितीयात आला तर त्याला त्याच्या कर्माची संपूर्ण शिक्षा भोगल्याशिवाय मरण देणार नाही. शनी हा उत्तम शिक्षक , साधू , शासक , न्यायाधीश आहे आणि त्याचे करावे तितके कौतुक कमीच आहे. 

मोक्षत्रिकोणात शनी उत्तम फळतो .वैराग्य साधेपणा अध्यात्म ह्यांचा आनंदयात्री असलेला हा शनी अष्टमात आला तर दीर्घायुष्य देतो. व्यय स्थानातील शनी अध्यात्मिक उंची देतो . 

पत्रिकेत ग्रह आपल्या पूर्व कर्मानुसार आले आहेत त्यांचा संदेश ऐकायला शिकले पाहिजे .हे सर्व ग्रह एकमेकांच्या साथीनेच आपली पत्रिका संतुलित करत असतात , देवाने सर्वाना सगळे दिले असते तर त्याची किंमतच राहिली नसती नाही का?  त्यामुळे आळस झटका आणि कामाला लागा . कुठलेही काम कमी समजू नका आणि कुणालाही कमी लेखू नका.

असा हा शनी २३ मे ते ११ ऑक्टोबर, २०२१ ह्या काळात वक्री होत आहे. शनी जेव्हा वक्री असतो तेव्हा त्याच्या कारक गोष्टीना चालना देत नाही . अश्यावेळी मनुष्याला कुठलाही निर्णय घेण्यासाठी अडचणी निर्माण होतात आणि असुरक्षित वाटते . त्याची परिणीती म्हणजे मनुष्य चुकीच्या मार्गाने जातो आणि त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात . आपल्या पत्रिकेत शनी ज्या स्थानात वक्री होत आहे त्या स्थानाने दर्शवलेल्या गोष्टीमध्ये विलंब ,त्रास होतो . षष्ठात वक्री झाला तर आजारपण अनेक दिवस राहते. अष्टमात असेल तर मनस्ताप , डोक्याला विकतची दुखणी होतात , व्यय स्थानात बंधन योग देतो. 

शनी वक्री असताना प्रत्येक कामात अडथळे येतात . बांधकाम क्षेत्रात प्रगती खुंटते, अडचणी येतात  . अधिक कष्ट करायला लागतात . शनीची साडेसाती आणि महादशा असलेल्यांनी सतर्क राहणे आणि उपासना करणे उत्तम .

तर भल्या भल्यांची झोप उडवणारे शनी महाराज २३ मे रोजी वक्री होत आहेत. ह्या काळात आपण जास्तीतजास्त उपासना करून त्यांच्या कृपाप्रसादास पात्र होवुया .

खालील उपासना नक्कीच लाभदायक होतील.

१.प्रत्येक शनिवारी शनी महात्म वाचणे.

२.शनीचा मंत्र “ ओं शं शनैश्चराय नमः ” ह्या मंत्राचा जप –जपसंख्या 23000. हा जप संकल्प करून म्हणायचा आहे. 

३.हनुमान चालीसा नित्य पठण.

४.मारुती स्तोत्र नित्य पठण.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे लीनता आणि नम्रता . जो जो अहंकार करेल त्याला शनी दंड देतो आणि  पळता भुई थोडी करतो. त्यामुळे अहंकाराला तिलांजली देवून लव्हाळ्या सारखे जगणे नक्कीच लाभदायक ठरेल.  समर्पणाची भावना मनात ठेवून नामस्मरण केले तर शनी सारखा दाता नाही.

अस्मिता

antarnad18.blogspot.com





 



Thursday, 13 May 2021

मे महिन्यातील " KP / विवाह " कार्यशाळा

||  श्री स्वामी समर्थ || 





मे महिन्यातील " KP / विवाह " ह्या कार्यशाळा हसत खेळत झाली . पत्रिका मिलन करताना ग्रहमिलन आणि गुण मिलन म्हणजे काय  ह्याचा  सखोल अभ्यास  केला  ह्याचा मनापासून  आनंद आहे. तुम्हा सर्वाची पुढील आयुष्यात उत्तरोत्तर प्रगती होवूदे आणि ह्या शास्त्राची तुम्हा सर्वांकडून सेवा होवूदे हीच सदिच्छा .

अस्मिता
antarnad18@gmail.com




अक्षय आनंद

 ||श्री स्वामी समर्थ ||




वैशाख शु.३ म्हणजेच अक्षय तृतीया हा वऱ्हाड प्रांतातील  मोठा सण . संतानी समाज सुधारण्यासाठी मनुष्यरूपी देह धारण करून असंख्य लीला केल्या आणि जीवन कसे जगावे ह्याचा जणू धडा गिरवायला शिकवला. असेच सिध्दकोटीला पोहोचलेले महापुरुष संत शिरोमणी श्री गजानन महाराज ह्यांनी विदर्भातील शेगाव येथे वास्तव्य करून ती भूमी खर्या अर्थाने पावन केली . श्री दासगणू महाराजांनी  “श्री गजानन विजय हा प्रासादिक ग्रंथ”  हि मोलाची शिदोरी भक्तांच्या हाती सुपूर्द केली. ह्या ग्रंथाच्या नित्य पारायणाने महाराजांची सेवा करून आपला जन्म सार्थकी लावा हेच जणू  त्यांना सुचवायचे असावे . 

श्री गजानन विजय ग्रंथात महाराजांनी केलेल्या असंख्य लीलांचे यथार्थ वर्णन आहे. श्री गजानन विजय ह्या ग्रंथातील अध्याय क्र. 4 मधील जानकीराम सोनाराची गोष्ट सर्वश्रुत आहेच. महाराज हे अवलिया महापुरुष होते . त्यांना  चिलीम पेटवण्यासाठी कुणाचीही गरज नव्हती पण तरीही त्यांनी आपल्या चिमुकल्या भक्तांना जानकीरामाकडे विस्तव आणण्यासाठी धाडले पण त्याने विस्तव द्यायचे नाकारले आणि ह्या श्रेष्ठ संताचा अपमान होयील असे शब्द त्याच्या मुखातून गेले. 

महाराजांनी त्यांचा परमभक्त बंकटलाल ह्यास  चिलीम पेटविण्यासाठी त्यावर नुसती काडी धरण्याचा आदेश दिला आणि चिलीम पेटली हीच त्यांची खरी लीला. जानकीरामाचे चिंचवणे नासले त्यात किडे पडले तेव्हा त्याचे डोळे खाडकन उघडले आणि तो महाराजांना  शरण गेला. अश्या असंख्य लीला करून महाराजांनी आपल्याला जीवनाचे सार समजावून सांगितले आहे.

माणूस अहंकाराने उत्मत्त झाला कि त्याचा विनाश जवळ आलाच म्हणून समजायचा . आज २१ व्या शतकात  अध्यात्माची खरी गरज तरुणपिढीला आहे. आज आपण अत्यंत तणावपूर्ण आयुष्य जगत आहोत . आपणच आपल्या गरजा वाढवल्या  आहेत आणि त्या पूर्ण करताना आता आपली पुरती दमछाक होते आहे. पण हे करत असताना काही क्षण गुरुपदी विश्रांती घेत नामस्मरण केले तर जीवन सुकर ,सुसह्य होयील .

ह्या मार्गावर सहज काहीच नाही पण जे आहे ते निर्भेळ आनंद देणारे आहे. महाराज परीक्षाही घेतात पण एकदा त्यांच्या परीक्षेत पास झालो कि मग जीवन खर्या अर्थाने समृद्ध होते .

आपण आपला अहंकार सोडत नाही तोपर्यंत परमेश्वर प्राप्ती नाही हे नक्की . आपल्याला सेवा करायला नको आपल्याला महाराज व्हायचे असते .जप केला , एखादे पारायण केले तर महाराजांवर जणू उपकारच केले अश्या अविर्भावात आपण असतो .आपल्या प्रत्येक वाक्याची सुरवात “ मी ” पासून असते .पण असे झाले तर आपला विठोबा घाटोळ होतो हे ध्यानी असले पाहिजे.

म्हणूनच ह्या “ मी “ म्हणजेच अहंकाराला तिलांजली देवून श्वासागणिक महाराजांचे नामस्मरण करणे हेच सद्गुरुना अभिप्रेत आहे . ज्या क्षणी अहंकार दूर झाला तर त्याच सद्गुरुप्राप्ती नक्कीच होईल . कुठल्याही संकटाची तमा न बाळगता “  संतांच्या जे असेल  मनी तेते येयील घडोनी भरवसा त्यांच्या चरणी ठेवून स्वस्थ राहावे.” ह्या उक्तीवर अखंड श्रद्धा असली पाहिजे .

आनंदाच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात . लहान मुले निर्मळ मनाची असतात ,जगाचे खरे रूप त्यांनी बघितलेले नसते त्यामुळे त्यांना हवा असेलेला खाऊ , एखादे खेळणे हा त्यांच्यासाठी स्वर्गीय आनंद असतो.  रोजच्या जीवनात प्रत्येक क्षणात लहान सहान आनंद दडलेले आहेत पण आपण फार मोठ्या गोष्टींच्या उगीचच मागे लागून ह्या सहजसुंदर  आनंद देणाऱ्या क्षणांना पारखे होतो. हे आनंद ज्यांना अनुभवता येतात त्यांना जीवन सर्वांगसुंदर वाटते आणि ज्यांना ह्याचा आस्वाद घेणे जमत नाही त्यांना तेच जीवन निरस वाटते .

भौतिक सुखाच्या मागे धावणारा धावतच राहतो ,ठरवून सुद्धा मग त्याला थांबता येत नाही . महाराजांनी सांगितले आहे किती जमवशील आणि कश्यासाठी ? हे म्हणजे अग्नीत तुपाची धार . कुठल्याही गोष्टीचे जितके स्तोम वाढवू तितके कमीच आहे. 

जीवनातील आनंद हा शोधता आला पाहिजे आणि मिळाला तर उपभोगता आला पाहिजे. ज्यांना प्रपंच करताना परमार्थाची गोडी लागली त्यांनी ह्या आनंदाची अवीट गोडी नक्कीच चाखली आहे.

आनंद हा देता आणि घेताही आला पाहिजे. जो देतो त्यालाच मिळते म्हणून द्यायलाही शिकले पाहिजे. मुंबई मध्ये पूरग्रस्त परिथिती झाली ,कधी कुठलीही तत्सम घटना घडली तर असंख्य मदतीचे हात धावून येतात .हि मदत  अपेक्षा विरहीत असते पण त्यातून कश्यातच मोजता येणार नाही अशी आनंद प्राप्ती होते.  पारमार्थिक जीवनात उच्च कोटीचा असीम आनंद आहे. सद्गुरूंच्या चरणाशी आपण आहोत हि कल्पना सुद्धा आनंद देणारी आहे. त्यांचे आपल्या जीवनातील अस्तित्व , त्यांचे आपल्या सोबतचे असणे हे आनंददायी आहे .

अध्यात्माच्या वाटेवर अक्षय आनंद आहे आणि तो लुटण्याची मजा ज्याने अनुभवली आहे त्याला जीवनात आत्यंतिक समाधान लाभले आहे. संतानी समाजसुधारणे साठी मोठे योगदान दिले आपण निदान खारीचा वाटा तरी उचलुया .निदान एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद येयील ह्यासाठी प्रयत्न करुया.

महाराजांना काहीच नको आहे त्यांना हवा आहे तो आपल्या मनातील खरा भाव.  ह्या अध्यात्मरूपी नौकेत एकदा बसलो कि जीवन आनंदात पार झालेच म्हणून समजा .मग आनंदाचे डोही आनंद तरंग अशी जणू आपल्या मनाची अवस्था होते .ह्या जीवनात काहीच शाश्वत नाही त्यामुळे कश्यातही गुंतून न राहता आनंदाचे क्षण वेचत जगणे हे केव्हाही चांगलेच . 

म्हणूनच म्हंटले आहे कि अध्यात्म हि जगण्याची कला आहे. आज अक्षय तृतीया . अक्षय म्हणजे अखंड . चला तर मग आज ह्या शुभदिनी महाराजांच्या सेवेत रुजू होवून गुरु सेवेचा अक्षय आनंद लुटुया . सद्गुरुसेवा हाच मोक्षाचा अंतिम मार्ग आहे. 

आपल्या सर्वांच्या जीवनातील आनंद “ अक्षय “ राहूदे हीच सद्गुरू चरणी प्रार्थना .

अस्मिता

antarnad18.blogspot.com




.


Sunday, 9 May 2021

सुखी जीवनासाठी स्वामी समर्थांची वचने

 || श्री स्वामी समर्थ ||




१. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
२. जो माझी अनान्यभावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो.
३. आळशी माणसाचे तोंडपाहू नये.
४. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा.
५. जा तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग.
६. भिऊनकोस! पुढें जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी, तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू.
७. आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा,राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालावा, मोक्ष मिळेल.
८. मी सर्वत्र आहे, परंतू तुझ्यासाठी येथे आलो आता निर्धास्त राहा.
९. हम गया नही जिंदा है.

श्री स्वामी समर्थ

सामुहिक नामस्मरण

 ||श्री स्वामी समर्थ ||







करोना महामारीने संपूर्ण विश्वाला ग्रासले आहे. नोकरी धंदा व्यवसाय आणि रोजच्या जगण्याला  सुद्धा खीळ बसली आहे. त्यात २३ मे रोजी शनी महाराज वक्री होत आहेत म्हणून “ हसत खेळत ज्योतिष शिकूया “ ह्या  कार्यशाळेच्या   विद्यार्थ्यांनी नामस्मरणाचा अनोखा उपक्रम सुरु केला आहे.  करोना महामारी अखंड विश्वातून समाप्त व्हावी आणि प्रत्येकाचे आयुष्य पूर्ववत व्हावे म्हणून नामस्मरण करत राहणे हा उत्तम पर्याय वाटतो. सामुहिक नामस्मरणाला अनन्य साधारण महत्व आहे .  श्री स्वामी समर्थ तसेच शनी महाराजांचे नामस्मरण करताना सर्वजण  ग्रुप ची शिस्त काटेकोरपणे पाळत आहेत ह्याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन तसेच ग्रुप मधील तरुण वर्गाचे ह्या संकल्पनेत सहभागी झाल्याबद्दल विशेष कौतुक.

अस्मिता

antarnad18@gmail.com

Friday, 7 May 2021

समर्पण

 || श्री स्वामी समर्थ ||



आयुष्यात कुठलीही गोष्ट जीव ओतून केली तरच ती दृष्ट लागण्यासारखी होते मग ती उंबरठ्यावरील रांगोळी असो कि स्वयपाक . सद्गुरू सेवेचेही तसेच आहे . कुठलीही सेवा किंवा अध्यात्म हे काहीतरी मिळवण्यासाठी कधीच नसावे . आपण करत असणार्या सेवेत आपला प्राण ओतला तर ती महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचते आणि त्यांच्याकडे मागण्यासारखे काहीच उरत नाही . आपल्या मनातील भाव आपल्या सेवेत प्रतिबिंबित होतोच कि  वेगळे काहीच सांगायची गरज नाही . 

आज अनेक स्वामीभक्त पूजा , नामस्मरण , पोथी वाचन करतील ,करत राहतील . आपल्याकडून महाराज सेवा करून घेत आहेत तिथेच आपल्या आयुष्याचे सोने झाले आहे . महाराजांचा तारक मंत्र हि सुद्धा एक प्रचीतीच आहे. 

देव हा भक्तांच्या भोळ्या प्रेमाचा, भावाचा भुकेला असतो . महाराजांना सुद्धा हेच अभिप्रेत आहे .म्हणूनच त्यांनी आपल्या भक्तांच्या हातात  तारक मंत्र सुपूर्द केला आहे.  अंतर्मानापासून अगदी मनाच्या गाभ्यातून त्यांना हाक मारली तर असतील इथून ते आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी मदतीसाठी धावून येतात , मार्ग दाखवतात ह्याची क्षणोक्षणी प्रचीती भक्तांना  मिळते नाही त्यांना ती द्यावीच लागते . 

तारक मंत्र हि एक उपासना आहे. त्यातील प्रत्येक शब्द हा भक्तीरसाने ,वचनाने ओथंबलेला आहे. कुठलीही शंका कुशंका न घेता निर्भय राहून माझ्या सेवेत राहा हेच स्वामिना भक्तांना सुचवायचे आहे. महाराजांची सेवा करताना  आपल्या मनातील निर्व्याज्ज भाव , अंतरीचे प्रेम हेच आपल्याला त्यांच्या समीप घेवून जाते. जसजशी सेवा पुढे जाते तसतसे मनातील अनेक कल्प विकल्प दूर होऊ लागतात आणि महाराजांनी दिलेल्या प्रचीतीमुळे त्यांच्या वरील श्रद्धा आणि विश्वास वृद्धिंगत होऊ लागतो. सर्वत्र त्यांचे भास होऊ लागतात , त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागते , एकटेपणा दूर होतो , एक शक्ती आपल्या अवती भवती सतत वावरत असल्याने सुरक्षित वाटते .महाराज आहेत हि भावना जीवनाचा आधार बनते . नुसत्या महाराजांच्या विचाराने सुद्धा डोळ्यातून अखंड अश्रू येऊ लागतात . महाराज आपल्यासोबत क्षणोक्षणी आहेत ह्याची खुण पटते. अध्यात्माची ताकद अफाट आहे आणि ते आपल्याला जगवत असते .

जीवनाच्या वाटेवर येणाऱ्या अनेक प्रसंगांना निडरपणे सामोरे जाण्याची ताकद मिळते  आणि मग प्रपंच करतानासुद्धा परमार्थाची अवीट गोडी भक्ताला चाखायला मिळते. 

“ हम गया नही जिंदा है  ” हे अभिवचन प्रत्यक्ष स्वामिनी आपल्या लाडक्या भक्त समुदायाला दिले आहे. डोळे मिटले तरी किंवा उघडे असतील तरी कुठल्याही क्षणी महाराजांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोरून न हलणे हि त्यांच्याशी झालेल्या एकरूपतेची पोच पावतीच म्हणायला हवी .

स्वामिभक्ती निरंतर असली पाहिजे ,मनात फक्त सेवा भाव असला पाहिजे. आजच्या कलियुगात अध्यात्माचे बाळकडू अगदी लहानपणा पासून मुलांना पाजण्याची नितांत गरज आहे. आपण विज्ञानाचे कितीही पंख लावले तरी आजही आपण रक्त तयार करू शकत नाही कि पाऊस पाडू शकत नाही . रोज काही वेळ पण नियमित पणे केलेले ध्यान धारणा नामस्मरण आपल्याला अनेक विवंचना ,स्ट्रेस आणि आजारपण ह्यापासून कोसो दूर ठेवेल हे नक्की . जन्म मृत्य काहीच आपण थांबवू शकत नाही . इतकच काय तर घेतलेल्या आणि सोडलेल्या  श्वासावर सुद्धा आपला अधिकार नाही . हे सहज सोप्पे नाही , नक्कीच कुठलीतरी शक्ती आहे जी हि सगळी सूत्र हलवत आहे मग त्याला नाव काहीही द्या पण ती आहे आणि त्यासमोर जितक्या लवकर आपण नतमस्तक होऊ तितकी जीवनरूपी नौका लवकर पैलतीराला लागेल. स्वामिसेवेची संधी किबहुना गुरु सेवेची संधी मिळणे  हे आपले अहोभाग्य आहे आणि त्या संधीचे सोने करणे प्रत्येक भक्ताची जबाबदारी आहे . आपण  बोललेल्या , लिहिलेल्या  प्रत्येक शब्दावर आणि केलेल्या प्रत्येक कृतीवर ,मनात येणाऱ्या प्रत्येक विचारावर , व्यक्त आणि अव्यक्त केलेल्या आपल्या विचारांवर , भावनांवर सगळ्यावर महाराजांचे ध्यान आहे हि भावना मनात असेल तर आपली अनेक चुकीची  कर्म करण्यापासून मुक्तता होयील . आपण आपल्याकडून चुकायचे नाही हि अध्यात्मातील शिकवण आहे. एकदा त्यांच्या शाळेत नाव घातले कि मग ते नेतील तसे आपले आयुष्य म्हणूनच त्यांच्या निर्णयावर कुठलीही  शंका  घेणे हा त्यांचा अपमान असेल. 

संतानी समाज सुधारणेसाठी मनुष्य देह धारण केला आणि अनेक लीला करून आपल्याला आपल्या जीवनाचे रहस्य सांगितले. माणसाने माणसाशी माणसासारखा व्यवहार करावा निदान इतके तरी त्यांना अपेक्षित आहे . महाराजांची सेवा आपल्याला  षडरीपुंपासून दूर जाण्यास प्रवृत्त करते , राग लोभ वासना द्वेष हळूहळू कमी होऊ लागतो . एक क्षण असा येतो कि काहीच नकोसे वाटते , सुख आणि दुक्खाच्या खूप पलीकडे आपण कधी जातो आपल्याला सुद्धा समजत नाही  आणि हे सर्व करण्याची ताकद फक्त अध्यात्मातच आहे. ध्यान धारणा आपल्याला समाधी अवस्थे पर्यंत नेते जिथे  आपली आपल्याशीच जणू नव्याने ओळख होते. 

एकदा मला महाराजांचा खूप राग आला होता . मी ठरवले कि उद्या सकाळी सगळ्या पोथ्या फोटोंचे विसर्जन करायचे . सकाळी उठल्यावर मनात आले असे केले तर आपल्या आयुष्यात उरले काय? नुसत्या विचारानेही मी अस्वस्थ झाले आणि महाराजांची क्षमा मागितली . त्यांच्याशिवाय आपले अस्तित्व  शून्य आहे आणि आपला चेहरासुद्धा आपल्याला दिसणार नाही इतकी एकरूपता आपल्या भक्तीत असली पाहिजे नाही का.

माझे मन तुझे झाले , तुझे मन माझे झाले 

तुझे प्राण माझे प्राण , उरलेना वेगळाले ... 

अगदी हीच भावना आपल्या सद्गुरुंबद्दल आपली असायला हवी आणि त्यासाठी मनातील 16 आणे खरा  भक्ती भाव तर हवाच पण त्याही पेक्षा हवी ती " समर्पणाची "  भावना .

ज्या क्षणी आपण आपले संपूर्ण जीवन त्यांच्या चरणी समर्पित करतो त्याच क्षणी आपल्याला त्यांचा वरदहस्त लाभतो ह्यात शंकाच नाही , अनुभव घेवून बघा.

अस्मिता

antarnad18@gmail.com

 



Wednesday, 5 May 2021

मे महिन्यातील कार्यशाळा

 || श्री स्वामी समर्थ ||



मे २०२१ मधील कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद लाभला. अनेक वयोगट नेहमीप्रमाणे एकत्र येवूनही हसत खेळत कार्यशाळा पार पडली .ग्रुप मधल्या सर्वांचेच मनापासून अभिनंदन . ज्योतिष विषय शिकायची  नुसतीच उत्कंठा नाही तर त्याचा सखोल अभ्यास करण्याची तुम्हा सर्वांची वृत्ती प्रशंसनीय आहे ह्यात दुमत नाही .

तुम्हा सर्वाना तुमच्या पुढील ज्योतिष वाटचालीसाठी शुभेछ्या .

अस्मिता

antarnad18@gmail.com