||श्री स्वामी समर्थ ||
वैशाख शु.३ म्हणजेच अक्षय तृतीया हा वऱ्हाड प्रांतातील मोठा सण . संतानी समाज सुधारण्यासाठी मनुष्यरूपी देह धारण करून असंख्य लीला केल्या आणि जीवन कसे जगावे ह्याचा जणू धडा गिरवायला शिकवला. असेच सिध्दकोटीला पोहोचलेले महापुरुष संत शिरोमणी श्री गजानन महाराज ह्यांनी विदर्भातील शेगाव येथे वास्तव्य करून ती भूमी खर्या अर्थाने पावन केली . श्री दासगणू महाराजांनी “श्री गजानन विजय हा प्रासादिक ग्रंथ” हि मोलाची शिदोरी भक्तांच्या हाती सुपूर्द केली. ह्या ग्रंथाच्या नित्य पारायणाने महाराजांची सेवा करून आपला जन्म सार्थकी लावा हेच जणू त्यांना सुचवायचे असावे .
श्री गजानन विजय ग्रंथात महाराजांनी केलेल्या असंख्य लीलांचे यथार्थ वर्णन आहे. श्री गजानन विजय ह्या ग्रंथातील अध्याय क्र. 4 मधील जानकीराम सोनाराची गोष्ट सर्वश्रुत आहेच. महाराज हे अवलिया महापुरुष होते . त्यांना चिलीम पेटवण्यासाठी कुणाचीही गरज नव्हती पण तरीही त्यांनी आपल्या चिमुकल्या भक्तांना जानकीरामाकडे विस्तव आणण्यासाठी धाडले पण त्याने विस्तव द्यायचे नाकारले आणि ह्या श्रेष्ठ संताचा अपमान होयील असे शब्द त्याच्या मुखातून गेले.
महाराजांनी त्यांचा परमभक्त बंकटलाल ह्यास चिलीम पेटविण्यासाठी त्यावर नुसती काडी धरण्याचा आदेश दिला आणि चिलीम पेटली हीच त्यांची खरी लीला. जानकीरामाचे चिंचवणे नासले त्यात किडे पडले तेव्हा त्याचे डोळे खाडकन उघडले आणि तो महाराजांना शरण गेला. अश्या असंख्य लीला करून महाराजांनी आपल्याला जीवनाचे सार समजावून सांगितले आहे.
माणूस अहंकाराने उत्मत्त झाला कि त्याचा विनाश जवळ आलाच म्हणून समजायचा . आज २१ व्या शतकात अध्यात्माची खरी गरज तरुणपिढीला आहे. आज आपण अत्यंत तणावपूर्ण आयुष्य जगत आहोत . आपणच आपल्या गरजा वाढवल्या आहेत आणि त्या पूर्ण करताना आता आपली पुरती दमछाक होते आहे. पण हे करत असताना काही क्षण गुरुपदी विश्रांती घेत नामस्मरण केले तर जीवन सुकर ,सुसह्य होयील .
ह्या मार्गावर सहज काहीच नाही पण जे आहे ते निर्भेळ आनंद देणारे आहे. महाराज परीक्षाही घेतात पण एकदा त्यांच्या परीक्षेत पास झालो कि मग जीवन खर्या अर्थाने समृद्ध होते .
आपण आपला अहंकार सोडत नाही तोपर्यंत परमेश्वर प्राप्ती नाही हे नक्की . आपल्याला सेवा करायला नको आपल्याला महाराज व्हायचे असते .जप केला , एखादे पारायण केले तर महाराजांवर जणू उपकारच केले अश्या अविर्भावात आपण असतो .आपल्या प्रत्येक वाक्याची सुरवात “ मी ” पासून असते .पण असे झाले तर आपला विठोबा घाटोळ होतो हे ध्यानी असले पाहिजे.
म्हणूनच ह्या “ मी “ म्हणजेच अहंकाराला तिलांजली देवून श्वासागणिक महाराजांचे नामस्मरण करणे हेच सद्गुरुना अभिप्रेत आहे . ज्या क्षणी अहंकार दूर झाला तर त्याच सद्गुरुप्राप्ती नक्कीच होईल . कुठल्याही संकटाची तमा न बाळगता “ संतांच्या जे असेल मनी तेते येयील घडोनी भरवसा त्यांच्या चरणी ठेवून स्वस्थ राहावे.” ह्या उक्तीवर अखंड श्रद्धा असली पाहिजे .
आनंदाच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात . लहान मुले निर्मळ मनाची असतात ,जगाचे खरे रूप त्यांनी बघितलेले नसते त्यामुळे त्यांना हवा असेलेला खाऊ , एखादे खेळणे हा त्यांच्यासाठी स्वर्गीय आनंद असतो. रोजच्या जीवनात प्रत्येक क्षणात लहान सहान आनंद दडलेले आहेत पण आपण फार मोठ्या गोष्टींच्या उगीचच मागे लागून ह्या सहजसुंदर आनंद देणाऱ्या क्षणांना पारखे होतो. हे आनंद ज्यांना अनुभवता येतात त्यांना जीवन सर्वांगसुंदर वाटते आणि ज्यांना ह्याचा आस्वाद घेणे जमत नाही त्यांना तेच जीवन निरस वाटते .
भौतिक सुखाच्या मागे धावणारा धावतच राहतो ,ठरवून सुद्धा मग त्याला थांबता येत नाही . महाराजांनी सांगितले आहे किती जमवशील आणि कश्यासाठी ? हे म्हणजे अग्नीत तुपाची धार . कुठल्याही गोष्टीचे जितके स्तोम वाढवू तितके कमीच आहे.
जीवनातील आनंद हा शोधता आला पाहिजे आणि मिळाला तर उपभोगता आला पाहिजे. ज्यांना प्रपंच करताना परमार्थाची गोडी लागली त्यांनी ह्या आनंदाची अवीट गोडी नक्कीच चाखली आहे.
आनंद हा देता आणि घेताही आला पाहिजे. जो देतो त्यालाच मिळते म्हणून द्यायलाही शिकले पाहिजे. मुंबई मध्ये पूरग्रस्त परिथिती झाली ,कधी कुठलीही तत्सम घटना घडली तर असंख्य मदतीचे हात धावून येतात .हि मदत अपेक्षा विरहीत असते पण त्यातून कश्यातच मोजता येणार नाही अशी आनंद प्राप्ती होते. पारमार्थिक जीवनात उच्च कोटीचा असीम आनंद आहे. सद्गुरूंच्या चरणाशी आपण आहोत हि कल्पना सुद्धा आनंद देणारी आहे. त्यांचे आपल्या जीवनातील अस्तित्व , त्यांचे आपल्या सोबतचे असणे हे आनंददायी आहे .
अध्यात्माच्या वाटेवर अक्षय आनंद आहे आणि तो लुटण्याची मजा ज्याने अनुभवली आहे त्याला जीवनात आत्यंतिक समाधान लाभले आहे. संतानी समाजसुधारणे साठी मोठे योगदान दिले आपण निदान खारीचा वाटा तरी उचलुया .निदान एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद येयील ह्यासाठी प्रयत्न करुया.
महाराजांना काहीच नको आहे त्यांना हवा आहे तो आपल्या मनातील खरा भाव. ह्या अध्यात्मरूपी नौकेत एकदा बसलो कि जीवन आनंदात पार झालेच म्हणून समजा .मग आनंदाचे डोही आनंद तरंग अशी जणू आपल्या मनाची अवस्था होते .ह्या जीवनात काहीच शाश्वत नाही त्यामुळे कश्यातही गुंतून न राहता आनंदाचे क्षण वेचत जगणे हे केव्हाही चांगलेच .
म्हणूनच म्हंटले आहे कि अध्यात्म हि जगण्याची कला आहे. आज अक्षय तृतीया . अक्षय म्हणजे अखंड . चला तर मग आज ह्या शुभदिनी महाराजांच्या सेवेत रुजू होवून गुरु सेवेचा अक्षय आनंद लुटुया . सद्गुरुसेवा हाच मोक्षाचा अंतिम मार्ग आहे.
आपल्या सर्वांच्या जीवनातील आनंद “ अक्षय “ राहूदे हीच सद्गुरू चरणी प्रार्थना .
अस्मिता
antarnad18.blogspot.com
.
Sundar 👌👌👌
ReplyDeleteगण गण गणात बोते🙏🙏🙏
ReplyDeleteनेहमीप्रमाणे च सुंदर👌👌👌
खूपच छान. अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏
ReplyDeleteखरं आहे अगदी खूप सुंदर
ReplyDeleteअक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
नक्कीच... आम्ही पण तुमच्या मुळे सेवेत रूजू झालो. धन्यवाद!!
ReplyDeleteगण गण गणात बोते 🙏🙏
ReplyDeleteअक्षय तृतियेच्या सगळ्याना खूप शुभेच्छा
फारच छान लेख अस्मिताजी गण गण गणात बोते 🙏💐श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अशीच लेखनसेवा आपल्याकडून घडो हीच श्री स्वामी चरणी प्रार्थना.
ReplyDeleteश्रीस्वामी समर्थ🙏
ReplyDelete