|| श्री स्वामी समर्थ ||
आपल्या मनासारख्या घटना घडल्या नाहीत कि त्यासाठी कुठल्या ना कुठल्या ग्रहाला जबाबदार धरणे हा आपला स्वभावच आहे. आपली पत्रिका म्हणजे गत जन्माचा आरसा आहे. जे जे चांगले ते आपल्यामुळे आणि वाईट ते साडेसाती किंवा शनीमुळे हा गोड गैरसमज आहे. आपल्या चांगल्या वाईट कर्मानुसार ग्रह आपल्या पत्रिकेत स्थानबद्ध झाले आहेत, त्यांचे स्वागतही झाले पाहिजे आणि त्यांचा सन्मानही केला पाहिजे .आपल्या कर्मानुसार त्यांनी त्यांचे आपल्या पत्रिकेतील स्थान ग्रहण केले आहे. त्यामुळे माझा शनी इथेच का आणि माझा शुक्र तिथेच का हे प्रश्न आपण स्वतःला विचारले आणि चिंतन मनन केले तर अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्यालाच मिळतील.
आपण केलेल्या कर्माचा न्याय देणारा एकमेव न्यायाधीश म्हणजे शनी . शनी हा परखड आणि शिस्तबद्ध असणारा शिक्षक आहे. शनी अन्य कुठे नाही तर तो आपल्या आतच आहे. आपण आयुष्यात केलेल्या कर्माचा हिशोब तो ठेवतो आणि तुमच्या कर्माचा काय भोग असणार हेही तोच ठरवतो. म्हणूनच दशम स्थानात म्हणजेच कर्म स्थानात अधिराज्य गाजवणारा शनीच आहे. शनी हा वैराग्याचा कारक आहे आणि वैराग्याशिवाय मोक्ष नाही.
षष्ठ स्थान हे आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवसाय नोकरीचे आहे. तुम्ही कसे काम करता , कुठल्या मार्गाने पैसा मिळवता हे ह्या स्थानावरून समजते .काम प्रामाणिक पणे काम करता का , कुणावर अन्याय नाही ना करत , लक्ष्मी कशी आणता ? ह्याचे चित्र दशम स्थान दाखवते आणि त्याचा न्याय सुद्धा शनीच करतो . काम चांगल असेल तर प्रशंसा , कौतुक होते , समाजाकडून प्रतिष्ठा , मान मिळतो आणि हे सर्व दशमाकडून मिळते . कर्म चांगले नसेल तर त्रास होतो रडतखडत आयुष्य पुढे जाते.
शनी हा धार्मिक आहे, मोक्षाचे अधिष्ठान ठेवणारा आहे. शनी म्हणजे कायदा , सुव्यवस्था आहे . शनी हा उत्तम शासक ,राजकारणी , बुद्धिमान , न्यायाने राज्य करणारा आहे . शनीला गलथानपणा आवडत नाही. चिकाटी हा त्याचा मुख्य गुण आहे तसेच निश्चयी काटेकोर स्वभाव हा त्याचा धर्म आहे. वृद्ध आहे पण नियमाला कडक आहे. ज्ञानाने समृद्ध आहे. अहंकाराने माजलेल्या प्रत्येकाला शनी त्याची जागा दाखवून देतो.
लीनता आणि नम्रता हा शनीचा मुख्य गुणधर्म आहे . शनी आपल्या पंचप्राणाचा अधिष्ठाता आहे. योगशास्त्राचा प्रमुख ग्रह आहे. प्राणावर त्याचे एकट्याचे संपूर्ण अधिराज्य आहे. तुम्हाला किती श्वास द्यायचे आणि तुमच्या प्राणाचे बटन कधी दाबायचे आणि तुम्हाला भोगातून कधी मुक्त करायचे हे ठरवणारा शनीच असतो.
आपण आपल्या कामात प्रामाणिक राहिलो , सचोटीने काम केले तर शनी महाराज आपल्याला त्रास देणारच नाहीत उलट आपल्या पाठीवर चांगल्या कामासाठी शाबासकी मिळेल ह्यात शंकाच नाही .
शनी सप्तम स्थानात दिग्बली होतो. रात्रीवर आणि पश्चिम दिशेवर त्याचे साम्राज्य आहे आणि तिथे तो समृद्धी करतो. शनी स्वराशीत ,उच्च राशीत , मुलत्रिकोण राशीत नवमांशात उच्च आणि वर्गोत्तम होतो तेव्हा 4 5 7 9 10 11 स्थानात आपले कर्तुत्व गाजवतो ,समृद्ध करतो. केंद्रात शश योगात येतो तेव्हा राजकारणात अचानक उच्चीचे स्थान देतो. पण तिथे कर्म जर नीच केले तर तोच शनी खालच्या पातळीवर नेतो कारण जसे कर्म तसे फळ.
शनी 1 5 9 ह्या स्थानात उत्कर्षाने बुद्धी वाढवतो . केंद्र आणि त्रिकोणात अधिक फळतो .उपचय स्थानात शनी चांगली फळे देतो . असे जातक चिकाटीचे संशोधक असतात , कठोर तपश्चर्या करून थोर तत्वचिंतक होतात .
ज्याची त्याची जागा त्याला दाखवून कसलीही माफी न देणारा शनी हा खरच वंदनीय आहे. शनी द्वितीयात आला तर त्याला त्याच्या कर्माची संपूर्ण शिक्षा भोगल्याशिवाय मरण देणार नाही. शनी हा उत्तम शिक्षक , साधू , शासक , न्यायाधीश आहे आणि त्याचे करावे तितके कौतुक कमीच आहे.
मोक्षत्रिकोणात शनी उत्तम फळतो .वैराग्य साधेपणा अध्यात्म ह्यांचा आनंदयात्री असलेला हा शनी अष्टमात आला तर दीर्घायुष्य देतो. व्यय स्थानातील शनी अध्यात्मिक उंची देतो .
पत्रिकेत ग्रह आपल्या पूर्व कर्मानुसार आले आहेत त्यांचा संदेश ऐकायला शिकले पाहिजे .हे सर्व ग्रह एकमेकांच्या साथीनेच आपली पत्रिका संतुलित करत असतात , देवाने सर्वाना सगळे दिले असते तर त्याची किंमतच राहिली नसती नाही का? त्यामुळे आळस झटका आणि कामाला लागा . कुठलेही काम कमी समजू नका आणि कुणालाही कमी लेखू नका.
असा हा शनी २३ मे ते ११ ऑक्टोबर, २०२१ ह्या काळात वक्री होत आहे. शनी जेव्हा वक्री असतो तेव्हा त्याच्या कारक गोष्टीना चालना देत नाही . अश्यावेळी मनुष्याला कुठलाही निर्णय घेण्यासाठी अडचणी निर्माण होतात आणि असुरक्षित वाटते . त्याची परिणीती म्हणजे मनुष्य चुकीच्या मार्गाने जातो आणि त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात . आपल्या पत्रिकेत शनी ज्या स्थानात वक्री होत आहे त्या स्थानाने दर्शवलेल्या गोष्टीमध्ये विलंब ,त्रास होतो . षष्ठात वक्री झाला तर आजारपण अनेक दिवस राहते. अष्टमात असेल तर मनस्ताप , डोक्याला विकतची दुखणी होतात , व्यय स्थानात बंधन योग देतो.
शनी वक्री असताना प्रत्येक कामात अडथळे येतात . बांधकाम क्षेत्रात प्रगती खुंटते, अडचणी येतात . अधिक कष्ट करायला लागतात . शनीची साडेसाती आणि महादशा असलेल्यांनी सतर्क राहणे आणि उपासना करणे उत्तम .
तर भल्या भल्यांची झोप उडवणारे शनी महाराज २३ मे रोजी वक्री होत आहेत. ह्या काळात आपण जास्तीतजास्त उपासना करून त्यांच्या कृपाप्रसादास पात्र होवुया .
खालील उपासना नक्कीच लाभदायक होतील.
१.प्रत्येक शनिवारी शनी महात्म वाचणे.
२.शनीचा मंत्र “ ओं शं शनैश्चराय नमः ” ह्या मंत्राचा जप –जपसंख्या 23000. हा जप संकल्प करून म्हणायचा आहे.
३.हनुमान चालीसा नित्य पठण.
४.मारुती स्तोत्र नित्य पठण.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे लीनता आणि नम्रता . जो जो अहंकार करेल त्याला शनी दंड देतो आणि पळता भुई थोडी करतो. त्यामुळे अहंकाराला तिलांजली देवून लव्हाळ्या सारखे जगणे नक्कीच लाभदायक ठरेल. समर्पणाची भावना मनात ठेवून नामस्मरण केले तर शनी सारखा दाता नाही.
अस्मिता
antarnad18.blogspot.com
अतिशय उत्तम विवेचन आणि मार्गदर्शन.
ReplyDelete🕉 शंकर शनेश्चराय नमः 💐🙏
फारच अभ्यासपूर्ण लेख 🙏शं शनैश्चराय नमः बजरंग बली की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏💐
ReplyDeleteफार च छान आणि उपयुक्त माहिती...धन्यवाद...🙏
ReplyDeleteखूपच सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
ReplyDeleteKhoop chan mahiti thanku tai
ReplyDeleteनेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण आणि म्हव्वाची माहिती ....सोप्या भाषेत सांगितलंत...धन्यवाद
ReplyDeleteउत्तम अभ्यासपूर्ण विवेचन
ReplyDelete