|| श्री स्वामी समर्थ ||
तीर्थयात्रांना जाण्याबद्दल अनेक तर्क वितर्क असतात .आपल्या घरात देवघर आहे आणि देवही आहेत मग उठून वेगळे तीर्थक्षेत्री कश्याला जायचे ह्यासारख्या अनेक प्रश्नांचा उहापोह हा जायच्या आधीच सुरु होतो. ह्या सर्वांचे निराकरण करण्याचा हा लहानसा प्रयत्न.
मनुष्य हा रोजच्या जीवनातील सुख दुखे , कामधंदा , व्यवसाय , प्रपंच ह्यात इतका गुंतलेला असतो कि मनात इच्छा असूनही त्याला साधनेसाठी वेळ देता येत नाही . येथून बरोबर काहीच न्यायचे नाही हे माहित असूनही मोह माया आसक्ती ह्यापासून दूर जावू शकत नाही ,त्याच चक्रात अडकतो . ह्यासाठीच प्रपंचातून काही काळ मुक्त होवून ईश्वरी सानिध्य लाभावे तसेच हातून सेवा , देवधर्म घडावा ह्या उदात्त हेतूने तीर्थाटन करावे. कळतनकळत हातून झालेल्या पापांचे क्षालन होते .
देव दर्शनाने पुण्य पदरी पडते तसेच त्यानिम्मित्ताने आपल्या आप्तेष्टांचा सहवास घडतो. सहकुटुंब सहपरिवाराचा आनंदहि मिळतो .
तीर्थ क्षेत्र हि तेथील देवतेच्या वास्तव्यामुळे जागरूक , सकारात्मक उर्जेने भरलेली असतात .शेवटी स्थान महत्व आहेच . तेथील वातावरणातील स्फंदने मनाच्या शुद्धीकरणासाठी अत्यंत उपयुक्त असतात . ह्या सर्वच एकत्रित परिणाम म्हणजे अनेक कारणांनी मनाला आलेली मरगळ , निराशा झटकून एक सकारात्मक दृष्टीकोन मिळतो आणि पुनश्च नव्याने जगणे सुरु होते .
तीर्थ क्षेत्रातील वातावरण हे अध्यात्मिक असते ,आपण घरात आपला प्रपंच करत असतो त्यापेक्षा ह्या वातवरणात आपली ध्यान धारणा ,अध्यात्मिक प्रगती निश्चित होतेच तसेच आपल्याला मानसिक शांतता मिळते .
निदान काही काळ तरी संसारिक आसक्ती कमी होवून षड्रिपुंपासून मुक्तता मिळते आणि अध्यात्मिक सेवा घडून पापक्षालन होते.
म्हणूनच शरीराच्या आणि मनाच्याही शुद्धीकरणासाठी तीर्थाटन आवश्यक आहे. आता हे कुणी करावे ? तर आजच्या तरुण पिढीने सर्वप्रथम करावे . तीर्थयात्रा घरातील वयस्कर मंडळींनी कराव्यात हा गैरसमज आहे. त्यांच्या आयुष्याची संधाकाळ आहे, त्यांनी जीवनातील सगळे चढ उतार पचवले आहेत , प्रपंचातून मुक्त होण्याच्या आणि वार्धक्याच्या उंबरठ्यावर ते आहेत त्यामुळे त्यांना शांततेची गरज आहेच ,पण त्यांनी जगलेल्या आयुष्यातून त्यांना खर्या अर्थाने मनोबल मिळालेले आहे.
आजची तरुण पिढी अत्यंत हुशार , समंजस असली तरी त्यांना प्रत्येक क्षणी स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. तारुण्याच्या टप्प्यावर जीवघेण्या स्पर्धेमुळे आपला आत्मविश्वास घालवून बसत आहेत . अपेक्षित यश न मिळाल्यामुळे व्यसनाधीनता , अपेक्षाभंग झाल्यामुळे एकटेपणा , सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील समस्या ह्यामुळे जीवन फुलण्याआधीच ते संपवायचे विचार मनात येत आहेत . एकमेकांपासून दुरावलेली मने आणि अपुरा संवाद ह्यामुळे वाढते घटस्फोटांचे प्रमाण ह्यामुळे जीव मेटाकुटीला येतो आणि जीवनातील आनंदाला आपण पारखे होतो.
जीवन सुंदर आहे पण त्यासाठी आपल्याला स्वतःला काही वेळ द्यायला पाहिजे. परमेश्वरी शक्ती अगाध आहे आणि त्याच्या सानिध्यात आपल्याला सगळ्या प्रश्नांची नुसती उत्तरेच नाही तर अपिरीमित आनंदाचा कधीही न संपणारा ठेवासुद्धा प्राप्त होतो. अध्यात्म आपल्याला आपल्याच आयुष्याकडे त्रयस्थाच्या नजरेतून बघायला शिकवते.
आजची एकंदरीत जीवनशैली बघता उपासना आणि ध्यान धारणा हे जीवन सुखी आणि समृद्ध करणारी गुरुकिल्ली म्हंटली तर वावगे ठरू नये.
परमेश्वराच्या सानिध्यात काही काळ वास्तव्य केल्याने आपलीच आपल्याला नव्याने ओळख होते, आत्मपरीक्षण करता येते . आपला आपल्याशीच संवाद सुरु होतो. तेथील परिपूर्ण वातवरणात आपण परमेश्वराला शरण जातो आणि एका समृद्ध जिवनाची नव्याने सुरवात होते . आध्यात्मिक आनंद जीवन उजळून टाकतो , प्रेरणा मिळते , सकारात्मकतेचे अंकुर मनी फुलतात आणि खर्या अर्थाने जीवनाचा सोहळा होतो.
No comments:
Post a Comment