Tuesday, 18 May 2021

सर्वांगसुंदर उपासना

 || श्री स्वामी समर्थ || 


आज करोना मुळे प्रत्येक माणूस दडपणाखाली जगताना दिसत आहे. एका अनामिक भीतीने आपल्या सर्वाना ग्रासून टाकले आहे. आपले आयुष्य पूर्ववत कधी होयील हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. पैशाचा स्त्रोत कमी होत आहे . आपणच वाढवून ठेवलेल्या गरजा पूर्ण करताना आता आपलीच दमछाक होते आहे. सततची भीती , मानसिक दडपण , सैरभैर झालेले मन ह्या सर्वांमुळे चित्त ठिकाणावर नाही. आला दिवस आपला म्हणायची वेळ आली आहे. 

करोना बाजूलाच राहिला . ह्या सर्व दडपणाखाली जगताना आपण मोकळा श्वास घ्यायला विसरलो आहोत आणि त्यातून असंख्य आजार , मानसिक विकृती आपणच जन्माला घालत आहोत.

ह्या सर्वातून बाहेर पडण्याचा आणि आपले मनोधैर्य टिकवून ठेवण्याचा उत्तम उपाय म्हणजे
घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना . ह्या मुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण तर होयीलच पण जगायला बळ मिळेल ह्याची खात्री वाटते म्हणून त्यासंबंधीचे विचार आज आपल्यासमोर ह्या लेखाद्वारे मांडण्याचा लहानसा प्रयत्न करत आहे. 

ह्या सर्व करत असताना आपल्याला मासिक पाळी मध्ये आली तर तो वार दिवस सोडून द्यायचा आणि पुढचा घ्यायचा.  कुठलेही कल्प विकल्प मनात न ठेवता ह्या केल्या तर  मनाचा सात्विकपणा पुन्हा येयील आणि हरवलेला आनंद चेहऱ्यावर आणि संपूर्ण कुटुंबावर  दिसू लागेल हे आवर्जून नमूद करावेसे वाटते . अनुभव घ्या आणि आपले अनुभव कळवा.

उपासना आणि व्रत

१. संध्याकाळी देवासमोर गायीच्या तुपाचा दिवा लावावा ( निरांजन ).त्यामुळे घरात सकारात्मकता राहते 



२. आपल्या कडून अनेकदा कुलाचार होत नाहीत त्यासाठी  आपल्या कुलस्वामिनीची ओटी  ५ शुक्रवार  किंवा मंगळवार भरावी . पहिल्या 4 ओट्या ह्या घरात आणि ५ वी ओटी देवळात जाऊन भरावी . ५ वी ओटी देवळात  भरताना स्टील चे निरांजन घेवून जावे आणि तिथे तुपाचा दिवा लावावा . ते निरांजन देवळात ठेवायचे आहे .

ओटीचे साहित्य

तांदूळ नारळ  
टोवेल/लहान पंचा  (खण असेल तरी चालेल पण आजकाल त्याचे काय करावे समजत नाही –काळानुसार आपण बदलावे . ) 
हळद कुंकुवाच्या पुड्या .
साखरेची पुडी  
गुळ चणे (फुटाणे – भिजलेले चणे नाहीत )
उदबत्ती धूप  
गजरा वेणी – जे असेल ते आणि फुले 
कुठलेही एक फळ – देवीला डाळिंब खूप आवडते .
दुध साखरेचा नेवेद्य .

घरात ओटी भरताना हे सर्व एका ताटात ठेवून घरातील देव्हार्यातील देवीची ओटी भरायची . तिला आपल्या मनातील इच्छा सांगायची आणि भरायची . ३ वेळा ताट उचलून खाली ठेवायचे आणि नमस्कार करायचा . देवीला हळद कुंकू ,सर्व फुले वाहायची . धूप दीप निरांजन लावून घरात जो काही स्वयपाक केला असेल त्याचा नेवैद्य देवीला दाखवायचा . संध्याकाळी कुणी सवाष्ण घरी आली तर तिला आपल्या व्रताबद्दल अजिबात वाच्यता करायची नाही . तिला फक्त हळद कुंकू लावून फुल गजरा जे असेल ते द्यायचे आणि चणे द्यायचे .

असेच सहज आलात आज शुक्रवार आहे असे म्हणून हळद कुंकू द्यायचे बाकी काही बोलायचे नाही .

मध्ये काही कारणाने खंड पडला तर शुक्रवार(तुमच्या देवीचा जो काही वार असेल ) सोडून द्यायचा आणि पुढील शुक्रवार करायचा . ह्या ओटीतील सर्व गोष्टी दुसर्या दिवशी घरातच वापरायच्या आहेत .

आपल्याकडून देवीची सेवा , कुलाचार घडतो  आणि मनाला अतिशय समाधान लाभते.

३  घरात हळद कुंकू होत नसेल किंवा तशी प्रथा नसेल तर श्रावणात , मार्गशीर्षात , नवरात्रात किंवा वर्षातील कुठल्याही शुक्रवारी  जवळच्या ग्रामदेवतेच्या देवळात सव्वा किलो हळद कुंकू घेऊन जायचे आणि देवीला अर्पण करायचे . तिथे हजारो स्त्रीया ते लावतील . आपले हळदीकुंकू झाले असे समजायचे . त्यातील थोडे घरी आणून ठेवायचे आणि आपणही लावायचे .



३. देव्हार्यातील देवीला कुंकुमार्चन करावे , देवीला कुंकुवाचा अभिषेक करावा व जप करावा.

4 महालक्ष्मी अष्टक रोज  संध्याकाळी दिवेलागणीला म्हणावे .

५ देवीचा जप - ओं श्री महालक्ष्मै  मातायै  नमः

६ रामरक्षा नित्य पठण

७ श्री स्वामी समर्थ –नामस्मरण 

८  साडेसाती किंवा शनी महादशा असेल तर शनी महाराजांचा जप - ओम शं शनैश्चराय नमः जपसंख्या 23000 आहे. 

साडेसातीचा त्रास होत असेल तर एका मातीच्या पणती मध्ये तेल घालावे आणि त्यात आपला चेहरा  १ मिनिट पहावा  .नंतर ते तेल देवळातील समई मध्ये घालावे म्हणजे आपली पिडा जाळून जाईल. ते तेल मारुतीच्या डोक्यावर ओतायचे नाही हे लक्ष्यात ठेवावे . असे ३ शनिवार करावे.

९   विवाह झाल्यावर सत्यनारायण पुजावा आणि मग कुल देवतेचे दर्शन घेवून संसाराला सुरवात करावी  अशी रूढी परंपरा आहे.  श्रावण महिन्यात किंवा एखादा चांगला दिवस पाहून अनेक घरात वर्षातून एकदा सत्य नारायणाची पूजा केली जाते . अनेक वेळा इच्छा असूनही सत्यनारायण आपल्या घरी होत नाही . इतका मोठा घाट घालायचा ,मेहूण जेवायला घालायचे  एक ना दोन अनेक गोष्टींमुळे ते राहून जाते .

आपल्या घरात घरच्या घरी हे सत्यनारायण व्रत आपण करू शकतो . हे व्रत करणारा मनुष्य ह्या लोकी सर्व सुख उपभोगुन शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो असे मानले जाते .

प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करायचे आहे . घरातील जी व्यक्ती  हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला करायचे आहे. आज एकाने पुढील वेळेला दुसर्याने असे नाही .

विधी – घरात पूर्व किंवा उत्तर दिशेस एक चौरंग /पाट मांडावा त्यावर एक वस्त्र घालावे. त्यावर मुठभर तांदूळ पसरावे आणि त्याच्या मधोमध पाण्याने भरलेला कलश ठेवावा . त्यात पैसा फुल घालावे. त्यावर एक ताम्हन ठेवावे आणि त्यात मुठभर तांदूळ पसरावे. ह्यात तुळशी पत्राचे आसन करून त्यावर  आपल्या देवघरातील श्री कृष्णाची मूर्ती ठेवावी आणि त्याची पूजा करावी . श्रीकृष्णाला  तुळस ( एक वाहिली तरी चालेल . १०८ ,१००८ आवश्यक नाही ) आणि फुल अर्पण करायचे . नवग्रह पूजा करायची नाही . केळीचे खांब इतर काहीही नको . कुणाला बोलवायचं तर प्रश्नच नाही ,साधी वाच्यातही नाही .

श्रीकृष्णाच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करून  त्याला गंध , अक्षता फुल आणि तुळस अर्पण करावे. 

आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे म्हणून विनंती करावी .धूप दीप उदबत्ती ओवाळावी  आणि अंतर्मनाने शरण जावे.  सत्यनारायण व्रत पोथी मिळते (संपूर्ण चातुर्मास ह्यातसुद्धा आहे ) त्यातील  सत्यनारायण कथेचे वाचन करावे . आरती करून  लहान वाटीचा प्रसाद करावा त्यात केळे घालावे आणि नेवैद्य दाखवावा . त्या दिवशी घरात जो काही स्वयपाक केला असेल त्याचा महाप्रसाद दाखवावा आणि घरातील सर्वांनी तो ग्रहण करावा. 

दुसर्या दिवशी सकाळी घरातील देवांची पूजा झाली कि मूर्तीवर अक्षता वाहून “ पुनरागमनायच “ असे ३ वेळा म्हणावे आणि श्री कृष्णाची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावी आणि नमस्कार करावा. 

हे व्रत महिन्यातून फक्त पौर्णिमेला करायचे आहे  त्यामुळे ते सहज करता येयील असे आहे. 

वरील सर्व व्रत आणि उपासना करताना त्यातील मेख / गोम अशी आहे कि आपण करत असलेल्या व्रताची , उपासनेची  कुठेही वाच्यता करायची नाही .कुठेही अवाक्षर सुद्धा काढायचे नाही तरच ते फलद्रूप होयील हे ध्यानी असुदे. नाहीतर कर्णोपकर्णी झाले तर त्याचे महत्व कमी होऊन फळ पदरात पडणार नाही .

आपल्याला जश्या जमतील तश्या आपल्या इच्छे प्रमाणे कुठल्याही उपासना कराव्यात . एक ना धड 
भाराभर चिंध्या ह्या प्रमाणे मात्र होऊ देऊ नये. जे करू ते मनापासून आणि त्यात सातत्य असेल  तरच त्याचा आनंद आहे. 

येणारा पुढील काळ आणि वर्ष आपल्या सर्वासाठी  सात्विक उपासनेचे असुदे  आणि अखंड विश्वावरून हे करोना महामारीचे संकट दूर होवून आपले सर्वांचे आयुष्य पूर्ववत होवूदे.  सर्वांची सर्वार्थाने प्रगती होवूदे अशी  स्वामीचरणी प्रार्थना करूया.

उपासनेचे  महत्व अनन्यसाधारण आहे . त्याने नुसतेच मनोबल वाढत नाही तर त्यातील असामान्य ,  प्रचंड सामर्थ्य आपला जीवनप्रवास आनंददायी करते .फक्त त्यात समर्पणाची भावना हवी.  तुमचा आमचा सर्वांचा हा जीवनरूपी प्रवास सुखद ,आनंददायी व्हावा म्हणून उपासनेचे महत्व सांगणारा हा लेखन प्रपंच.   

टीप:  कुठलेही व्रत किंवा उपासना हि फार तामझाम न करता साधेपणाने करावी ,अहंकार विरहित असेल तर कृपा होयील. जशी जमेल तशी करावी . बसायला पाट घ्यावा कि आसन किंवा तत्सम काही असे बालिश प्रश्न विचारू नयेत .ह्या लेखात लहासहान गोष्टी सुद्धा स्पष्ट केल्या आहेत त्या नीट वाचल्या तर  विचारायला  प्रश्नच उरणार नाहीत .

अस्मिता

वाचकांनी आपले अनुभव जरूर कळवावे .

antarnad18.blogspot.com
antarnad18@gmail.com










7 comments:

  1. फारच छान श्री स्वामी समर्थ

    ReplyDelete
  2. श्री स्वामी समर्थ 💐🙏
    🕉 शं शनेश्चराय नमः 💐🙏
    धन्यवाद 💐🙏

    ReplyDelete
  3. छान माहिती👌👌🙏🙏

    ReplyDelete
  4. फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    ReplyDelete
  5. खूप छान माहिती👌👌👌🙏🙏🙏

    ReplyDelete
  6. खूप छान माहिती👌👌
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    ReplyDelete