|| श्री स्वामी समर्थ ||
आयुष्यात कुठलीही गोष्ट जीव ओतून केली तरच ती दृष्ट लागण्यासारखी होते मग ती उंबरठ्यावरील रांगोळी असो कि स्वयपाक . सद्गुरू सेवेचेही तसेच आहे . कुठलीही सेवा किंवा अध्यात्म हे काहीतरी मिळवण्यासाठी कधीच नसावे . आपण करत असणार्या सेवेत आपला प्राण ओतला तर ती महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचते आणि त्यांच्याकडे मागण्यासारखे काहीच उरत नाही . आपल्या मनातील भाव आपल्या सेवेत प्रतिबिंबित होतोच कि वेगळे काहीच सांगायची गरज नाही .
आज अनेक स्वामीभक्त पूजा , नामस्मरण , पोथी वाचन करतील ,करत राहतील . आपल्याकडून महाराज सेवा करून घेत आहेत तिथेच आपल्या आयुष्याचे सोने झाले आहे . महाराजांचा तारक मंत्र हि सुद्धा एक प्रचीतीच आहे.
देव हा भक्तांच्या भोळ्या प्रेमाचा, भावाचा भुकेला असतो . महाराजांना सुद्धा हेच अभिप्रेत आहे .म्हणूनच त्यांनी आपल्या भक्तांच्या हातात तारक मंत्र सुपूर्द केला आहे. अंतर्मानापासून अगदी मनाच्या गाभ्यातून त्यांना हाक मारली तर असतील इथून ते आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी मदतीसाठी धावून येतात , मार्ग दाखवतात ह्याची क्षणोक्षणी प्रचीती भक्तांना मिळते नाही त्यांना ती द्यावीच लागते .
तारक मंत्र हि एक उपासना आहे. त्यातील प्रत्येक शब्द हा भक्तीरसाने ,वचनाने ओथंबलेला आहे. कुठलीही शंका कुशंका न घेता निर्भय राहून माझ्या सेवेत राहा हेच स्वामिना भक्तांना सुचवायचे आहे. महाराजांची सेवा करताना आपल्या मनातील निर्व्याज्ज भाव , अंतरीचे प्रेम हेच आपल्याला त्यांच्या समीप घेवून जाते. जसजशी सेवा पुढे जाते तसतसे मनातील अनेक कल्प विकल्प दूर होऊ लागतात आणि महाराजांनी दिलेल्या प्रचीतीमुळे त्यांच्या वरील श्रद्धा आणि विश्वास वृद्धिंगत होऊ लागतो. सर्वत्र त्यांचे भास होऊ लागतात , त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागते , एकटेपणा दूर होतो , एक शक्ती आपल्या अवती भवती सतत वावरत असल्याने सुरक्षित वाटते .महाराज आहेत हि भावना जीवनाचा आधार बनते . नुसत्या महाराजांच्या विचाराने सुद्धा डोळ्यातून अखंड अश्रू येऊ लागतात . महाराज आपल्यासोबत क्षणोक्षणी आहेत ह्याची खुण पटते. अध्यात्माची ताकद अफाट आहे आणि ते आपल्याला जगवत असते .
जीवनाच्या वाटेवर येणाऱ्या अनेक प्रसंगांना निडरपणे सामोरे जाण्याची ताकद मिळते आणि मग प्रपंच करतानासुद्धा परमार्थाची अवीट गोडी भक्ताला चाखायला मिळते.
“ हम गया नही जिंदा है ” हे अभिवचन प्रत्यक्ष स्वामिनी आपल्या लाडक्या भक्त समुदायाला दिले आहे. डोळे मिटले तरी किंवा उघडे असतील तरी कुठल्याही क्षणी महाराजांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोरून न हलणे हि त्यांच्याशी झालेल्या एकरूपतेची पोच पावतीच म्हणायला हवी .
स्वामिभक्ती निरंतर असली पाहिजे ,मनात फक्त सेवा भाव असला पाहिजे. आजच्या कलियुगात अध्यात्माचे बाळकडू अगदी लहानपणा पासून मुलांना पाजण्याची नितांत गरज आहे. आपण विज्ञानाचे कितीही पंख लावले तरी आजही आपण रक्त तयार करू शकत नाही कि पाऊस पाडू शकत नाही . रोज काही वेळ पण नियमित पणे केलेले ध्यान धारणा नामस्मरण आपल्याला अनेक विवंचना ,स्ट्रेस आणि आजारपण ह्यापासून कोसो दूर ठेवेल हे नक्की . जन्म मृत्य काहीच आपण थांबवू शकत नाही . इतकच काय तर घेतलेल्या आणि सोडलेल्या श्वासावर सुद्धा आपला अधिकार नाही . हे सहज सोप्पे नाही , नक्कीच कुठलीतरी शक्ती आहे जी हि सगळी सूत्र हलवत आहे मग त्याला नाव काहीही द्या पण ती आहे आणि त्यासमोर जितक्या लवकर आपण नतमस्तक होऊ तितकी जीवनरूपी नौका लवकर पैलतीराला लागेल. स्वामिसेवेची संधी किबहुना गुरु सेवेची संधी मिळणे हे आपले अहोभाग्य आहे आणि त्या संधीचे सोने करणे प्रत्येक भक्ताची जबाबदारी आहे . आपण बोललेल्या , लिहिलेल्या प्रत्येक शब्दावर आणि केलेल्या प्रत्येक कृतीवर ,मनात येणाऱ्या प्रत्येक विचारावर , व्यक्त आणि अव्यक्त केलेल्या आपल्या विचारांवर , भावनांवर सगळ्यावर महाराजांचे ध्यान आहे हि भावना मनात असेल तर आपली अनेक चुकीची कर्म करण्यापासून मुक्तता होयील . आपण आपल्याकडून चुकायचे नाही हि अध्यात्मातील शिकवण आहे. एकदा त्यांच्या शाळेत नाव घातले कि मग ते नेतील तसे आपले आयुष्य म्हणूनच त्यांच्या निर्णयावर कुठलीही शंका घेणे हा त्यांचा अपमान असेल.
संतानी समाज सुधारणेसाठी मनुष्य देह धारण केला आणि अनेक लीला करून आपल्याला आपल्या जीवनाचे रहस्य सांगितले. माणसाने माणसाशी माणसासारखा व्यवहार करावा निदान इतके तरी त्यांना अपेक्षित आहे . महाराजांची सेवा आपल्याला षडरीपुंपासून दूर जाण्यास प्रवृत्त करते , राग लोभ वासना द्वेष हळूहळू कमी होऊ लागतो . एक क्षण असा येतो कि काहीच नकोसे वाटते , सुख आणि दुक्खाच्या खूप पलीकडे आपण कधी जातो आपल्याला सुद्धा समजत नाही आणि हे सर्व करण्याची ताकद फक्त अध्यात्मातच आहे. ध्यान धारणा आपल्याला समाधी अवस्थे पर्यंत नेते जिथे आपली आपल्याशीच जणू नव्याने ओळख होते.
एकदा मला महाराजांचा खूप राग आला होता . मी ठरवले कि उद्या सकाळी सगळ्या पोथ्या फोटोंचे विसर्जन करायचे . सकाळी उठल्यावर मनात आले असे केले तर आपल्या आयुष्यात उरले काय? नुसत्या विचारानेही मी अस्वस्थ झाले आणि महाराजांची क्षमा मागितली . त्यांच्याशिवाय आपले अस्तित्व शून्य आहे आणि आपला चेहरासुद्धा आपल्याला दिसणार नाही इतकी एकरूपता आपल्या भक्तीत असली पाहिजे नाही का.
माझे मन तुझे झाले , तुझे मन माझे झाले
तुझे प्राण माझे प्राण , उरलेना वेगळाले ...
अगदी हीच भावना आपल्या सद्गुरुंबद्दल आपली असायला हवी आणि त्यासाठी मनातील 16 आणे खरा भक्ती भाव तर हवाच पण त्याही पेक्षा हवी ती " समर्पणाची " भावना .
ज्या क्षणी आपण आपले संपूर्ण जीवन त्यांच्या चरणी समर्पित करतो त्याच क्षणी आपल्याला त्यांचा वरदहस्त लाभतो ह्यात शंकाच नाही , अनुभव घेवून बघा.
अस्मिता
antarnad18@gmail.com
Sundar 👌👌🙏🙏
ReplyDeleteNahamipramanech Apratim 👌🏻👍🏻🙏🏻
ReplyDeleteअप्रतिम...केवळ अप्रतिम...श्री स्वामी समर्थ
ReplyDeleteSunder lekh ahe.
ReplyDeleteNahamipramanech Apratim 👌🏻👍🏻🙏🏻
ReplyDeleteछान समजवुन सांगितलं.....👌👌👌🙏🙏🙏
ReplyDeleteखूप सुंदर लेख आहे हा साक्षात ब्रह्मांडनायक पाठीशी असताना आपण काय छोट्या छोट्या गोष्टीत अडकून पडतो हे कळायला लागतं जसे नामस्मरण वाढत जाते.
ReplyDeleteखूप सुंदर 👌👌🙏🙏
ReplyDeleteतुम्ही लिहिलेलं वाचून तसं आचरणात आणायचा प्रयत्न चालू केलाय. धन्यवाद!
ReplyDeleteअस्मिता खुप छान ब्लॉग लेखन आहे 🙏 असाच सुंदर विचार, सुसंवाद साधून आम्हाला ज्ञान देत रहा. धन्यवाद 🙏🚩🎉
ReplyDeleteKhupach. Sunder Swami Namacha Rey Kara .Gajar Gajar
ReplyDeleteछान लेख
ReplyDeleteसुंदर विवेचन
ReplyDeleteखूपच सुंदर.अप्रतिम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
ReplyDeleteफारच छान लिहिलं आहेस.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ReplyDelete