Monday, 5 July 2021

चांदोमामा

||श्री स्वामी समर्थ ||



रात्रीच्या वेळी आकाशात पाहिले तर लक्ष लक्ष तारका लुकलुकताना आपल्याला दिसतात .ह्या सर्वांसोबत आकाशभर दुडूदुडू धावणारा चंद्र म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका “ चांदोमामा “  पण दिसतो . त्याला बघून लहान मुले टाळ्या पिटत गाणी म्हणतात . रामाने सुद्धा  नभीचा चंद्र मला हवा असा हट्ट धरला होता . अश्या ह्या चंद्राला बघून काही कवी मनांना स्फुरण चढते तर काहीना मधुचंद्राचे वेध लागतात . प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमी युगुलांच्या प्रेमाला भारती आणणारा हा चंद्र आहे. चंद्र म्हणजे मनाला होणारी संवेदना .एखाद्याचे मन दुखावले जाते म्हणजे नेमके काय होते तर त्याच्या भावना दुखावल्या जातात मन व्यथित होते . मग हे व्यथित झालेले मन दिसते का? तर नाही . हा एक अनुभव आहे. ह्या संवेदना आहेत त्या ज्याच्या त्यालाच अनुभवायला लागतात . 

असा हा अत्यंत शीतल , शांत प्रेमळ चंद्रमा आवडत नाही असा एकही प्राणीमात्र ह्या सृष्टीत नसेल. सगळ्यांचा हा लाडका आहे तो त्याच्या खास गुणांमुळे . चंद्राच्या अनेक पौराणिक कथा आपण पुराणात वाचतोच . चंद्र हा स्त्री ग्रह असून मनाचा कारक मानला आहे चंद्रमा मनसो जातः असेही म्हंटले जाते. चंद्र म्हणजे आई . सात्विक प्रेमाची बरसात आईच करू शकते आणि आपले मन सुद्धा आईच जाणू शकते. 

चंद्र हा आकाशातील २७ नक्षत्रातून पळत असतो . एका जागी निवांत बसणे, थोडे थांबणे हे जणू त्याला माहीतच नाही . सतत भ्रमंती करत राहणारा हा चंद्र एक राशी सव्वादोन दिवसात पार करतो.  चंद्राचा  सात्विक प्रकाश मनाला शांत करतो स्थिरता देतो. ह्या चंद्राशी आपले मनाचे नाते आहे म्हणूनच स्त्रिया त्याला भाऊ मानून ओवाळतात . दक्ष प्रजापती राजांनी त्याच्या २७ मुलींचा , म्हणजेच हि २७ नक्षत्रे, विवाह चंद्राशी करून दिला. चित्रा नटूनथटून त्याची वाट पाहत असे पण तिला नेहमीच निराश व्हावे लागे कारण चंद्र रोहिणीवर लट्टू झाला होता , त्याचे तिच्यावरून ध्यान हलेचना . शेवटी राजा दक्ष ह्याने त्याला शाप दिला आणि तेव्हापासून तो रोज एकेक नक्षत्रातून भ्रमण करू लागला. उशाप  दिला म्हणून चंद्र  15 दिवस कलेकलेने लहान होतो आणि कलेकलेने मोठा होतो.  काहीही झाले तरी रोहिणीच त्याला अतिप्रिय आहे म्हणून त्या रोहिणी नक्षत्रात चंद्र  उच्चीचा आहे.

आनंदाचा बहर असेल तेव्हा आनंदाश्रू डोळ्यातून पाझरतात आणि अतीव दुखात  सुद्धा डोळ्यातील पाणी थांबत नाही. ह्या  दोन्ही स्थिती चंद्राच्या आंदोलनावर अवलंबून असतात .

ह्या पृथ्वीवर सर्वात गतिमान कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे आपले “ मन “. आता होते भुईवर , गेलं गेलं आभाळात अशी जणू ह्या मनाची अवस्था असते. एखाद्या सुखद विचाराने मन थुई थुई नाचू लागते तर एखाद्या विचाराने ते निराशेच्या गर्तेत सुद्धा अडकते .  मन आनंदी असेल तर हि सृष्टी हे जग हे विश्व रम्य वाटते ,जगावेसे वाटते पण हेच मन निराश झाले तर काहीच नकोसे वाटू लागते . अश्या ह्या मनाच्या अनेक विविध छटा प्रदर्शित करणारा हा चंद्र आपल्या सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. 

पृथ्वीवरील आणि शरीरातील पाण्यावर चंद्राचा अंमल आहे.  भरती ओहोटी हि चंद्रावरच पहिली जाते. इतक्या दूरवर आकाशात असणारे हे ग्रह पण त्याचा परिणाम पृथ्वीवरील मानवी जीवन आणि सृष्टीवर होतो आहे. जन्मलेले शिशु हे आईच्याच स्तनपानाने तृप्त होते आणि त्याच सात्विक प्रेमाला आयुष्यभर जागतेही. बाळाची नाळ आईशी जोडलेली असते ते ह्याचसाठी.

चंद्र गतिमान असल्यामुळे प्रवासाची आवड दाखवतो. चंद्र म्हणजे आई आणि आई म्हणजेच सेवाभाव वात्सल्य , स्त्रीसुलभ लज्जा आणि निखळ प्रेमाचा अविष्कार . त्यामुळे सेवाभाव असतो  ,जसे परिचारिका , तिथे चंद्र कार्य करतो. निसर्ग कुंडली मधले चतुर्थस्थान कर्क राशीकडे आहे आणि त्याचे स्वामित्व चंद्राला जाते . चतुर्थ स्थानावरून आपले घर ,सुखाची निद्रा ,वाहन सौख्य शेती देशप्रेम सर्व पहिले जाते. 

असा हा चंद्र बिघडला तर मनाचा समतोल बिघडतो, चंद्राचा अंमल हा पचनशक्ती वर असल्यामुळे तीही बिघडते .जरा वातावरण बदलले कि सर्दी पडसे ,पोट बिघडते.  अनेक प्रकारचे मानसिक आजार बिघडलेला चंद्र देतो. 

चंद्राकडे सर्व रस आहेत त्यामुळे दुधाचे पदार्थ , फळांचे रस ,वनस्पती , फ्रीज , कुलर , पाण्याची ठिकाणी तळी विहिरी नद्या गाईंचे गोठे हे सर्व चंद्राच्या अधिपत्याखाली येतात .

चंद्र हा शीतलता देणारा आणि गतिमान म्हणून पर्यटन व्यवसाय . पाण्याशी संबंध म्हणून मासेमारी नौ दल, मीठ मोती खलाशी हे सर्व व्यवसाय येतात. 

चंद्र ज्यांच्या लग्नस्थानात असतो त्यांचा चेहरा वाटोळा गोल असतो ,रंग गोरा असतो . चेहऱ्यावर आद्रता असते.

चंद्र शनी राहू केतू ह्या ग्रहांनी त्यांच्या दृष्टीने , कुयोगाने बिघडतो म्हणूनच ह्यावर उत्तम उपाय म्हणजे सोमवारी केलेले पांढर्या वस्तूंचे दान आणि शंकराची उपासना.

चंद्र कवी मनांना नेहमीच प्रेरणा देतो आणि  चंद्राच्या शांत शीतल प्रकाशात प्रेम फुलते बहरते . सात्विकतेचा उत्कट  अनुभव येतो ,मन शांत होते  आणि  ते आपल्याही नकळत गाऊ लागते ...तोच चंद्रमा नभात...


अस्मिता

#चंद्र#सात्विक#शीतल#मानसिकआजार#वेड#स्मृतीभंश#नर्स#आई@मातृत्व@भरतीओहोटी












   










 

Wednesday, 23 June 2021

वारसाहक्क

 || श्री स्वामी समर्थ ||


प्रत्येक पिढी आपल्यातील सर्व गोष्टींचा ठेवा पुढील पिढीला सुपूर्द करत असते. आपली संस्कृती परंपरा, आपल्या कुळातील रीतीरिवाज कुळाचार ह्या सार्याचे ज्ञान आपल्याला आई आजी ह्यांच्याकडून होतच असते. हे सर्व बाळकडू मिळतेच पण पूर्वजांचे प्रेम त्यांचे असणे हेही तितकेच महत्वाचे असते. त्यांच्या नसण्याने आयुष्यात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण होते . उरते ती आठवणींची शिदोरी . अनुवंशिकतेने आपल्याला अनेक गोष्टी प्राप्त होतात जसे एखादी सवय  , एखादी खास आवड , खाण्यापिण्याच्या सवयी किंवा रूप रंग ,दिसणे , व्यवसाय , छंद आणि असे बरेच काही. 

आपल्या वाडवडीलांच्या पश्चात आपल्याला त्यांच्याकडून अनेक गोष्टी जसे धन संपत्ती , शेतजमीन ,वास्तू ,दागदागिने वारसाहक्काच्या रुपात प्राप्त होतात . आज त्याच संबंधी मनातील गोष्टींचे कथन करत आहे . 

आपल्या मुलांना ,आप्त स्वकीयांना आपली संपत्ती लिखित स्वरूपात देण्याचे माध्यम म्हणजे “ मृत्यूपत्र “ आजकालच्या जगात अनन्यसाधारण महत्व असणारी हि गोष्ट आहे. पूर्वीच्या काळी ह्या गोष्टीला इतके महत्व नव्हते .तेव्हाही भाऊबंदकी होती नाही असे नाही . पण आईवडिलांचा शब्द शेवटचा असे. कुणी काही लिहून नाही ठेवले तरीही त्यांच्या इच्छेप्रमाणे सर्व होत असे. मग कुणाला शेतजमीन मिळो,कुणाला पैसा तर कुणाला दागदानीने . आजच्या कलियुगात सुद्धा अजूनही काही घरात ह्या गोष्टी बघायला मिळतात . नुसता तोंडी व्यवहार ,कसलीही कागदपत्रे नाहीत कारण प्रेम विश्वास आणि दिलेला शब्द ह्याचे अपार महत्व  ,पण अशी उदाहरणे फार विरळाच . लाखात एक कुटुंब मिळेल.

आज पैसा हेच आयुष्य आहे ,पैशापाठी दुनिया धावत आहे. गेलेल्या माणसाच्या शरीरावरचे दागिने आधीच काढून ठेवतात ते ,अयोग्य आहे असे नाही म्हणता येणार कारण त्या मायेची गरज आहे. 

गेल्या काही दशकात शहरीकरण झाल्यामुळे लोकांचे गावाकडून शहराकडे स्थलांतर झाले .नोकरी धंद्याच्या  निम्मित्ताने कुटुंबे विभक्त झाली. बहुतेक जणांचे गावाकडील वास्तव्य कमी किंवा शून्य झाल्यामुळे तेथील घरांना कुलुपे लागली. गावाकडे वर्षानुवर्ष ढुंकूनही न पाहणारे आणि त्या घराच्या डागडूजीसाठी एक पैसाही खर्च न करणारे महाभाग आई वडिलांच्या पश्चात मात्र त्या घराचा संपत्तीचा जमिनीचा वाटा मागण्यासाठी सातासमुद्रापलीकडून सुद्धा हजर होतात . शेवटी हि सर्व माया आहे. पैसा हा जोडताना फार क्वचित पाहिला असेल बहुतांश वेळेला तो माणसे तोडतानाच आपण बघतो. 

वडिलोपार्जित संपत्तीच्या विभाजनावरून भावंडात कुटुंबात युद्ध पेटते आणि त्यात प्रेम भावना ह्या सर्वाची होळी होते. आजवर अनुभवलेल्या प्रेमाच्या सर्व क्षणांची त्यात राख होते . त्यात एखाद्या भावाने  घर बांधले असेल आणि आई वडिलांच्या पश्चात इतरांनी त्या घराचा वाटा मागितला तर ते योग्य होयील का ? हा विचार करण्यासारखाच प्रश्न आहे. 

आईवडिल हयात असताना त्यांच्याजवळ किती माणसे असतात आणि त्यांच्या पश्चात मृत्युपत्राच्या वाचनाला किती असतात ह्यात प्रचंड तफावत दिसते.

खर पाहता आज आपल्या पालकांनी आपल्यावर उत्तम संस्कार केले आणि माणूस म्हणून घडवण्यात प्रचंड योगदान दिले. नोकरी करण्या इतपत  सक्षम केले. त्यामुळे त्यांच्या सांपत्तिक स्थितीशी मुलांचा संबंधच नसावा. आपल्या हिमतीवर मुलांनी आपली घरेही घ्यावीत आणि आपला चरितार्थ चालवावा .शेवटी एका वयानंतर दुसर्याच्या जीवावर जगणे हे चूकच आहे. 

आपल्या कष्टाने जशी आपल्या आईवडिलांनी वास्तू घेतली तशीच आपल्याला घेता का येऊ नये  ? दुनियादारी आणि नीच प्रकारचे राजकारण , भाऊबंदकी नाही केली तर लक्ष्मी प्रसन्न होईल आणि सर्व गोष्टी  सहज जुळून येतीलच . 

थोडे विषयांतर होते आहे पण हेच चित्र आज दिसत आहे आणि ते बोलके आहे. 

मृत्युपत्र म्हणजे जाणार्या व्यक्तीची अखेरची इच्छा नमूद केलेले इच्छापत्र. आपल्या आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे त्यात लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचे त्यांची अखेरची इच्छा म्हणून पालन करणे हेच आपले कर्तव्य आहे. मग त्या गोष्टी आपल्याला आवडो अथवा न आवडो.पटो अथवा न पटो .

जाणार्याची अखेरची इच्छा म्हणून भावनिक तत्वावर त्याचे पालन करावे पण आजकाल तशी स्थिती राहिलेली नाही. पैसा हेच सुख आणि सर्वस्व मानणाऱ्या माणसाने भावनांचे पाश कधीच फेकून दिले आहेत .माणसे माणसांना दुरावत आहेत त्यांच्यातीन मायेचे बंध गळून पडले आहेत .राहिला आहे तो फक्त व्यवहार .

कलियुगात माणूस माणुसकी विसरत चालला आहे . कुटुंबातील हेवेदावे , दुस्वास , हेवा , मत्सर ह्या गोष्टी शिगेला पोहोचल्या आहेत .त्यामुळे आता इच्छा वगैरे शब्द दूर राहिले असून मृत्युपत्र कोर्टात च्यालेंज केले जाते.

आपल्याला ज्यांनी माणूस म्हणून घडवले  .आपल्याला आपल्या पायावर उभे राहण्यासाठी कष्ट केले त्यांच्या शेवटच्या इच्छेचा मानसुद्धा राखावा असे आपल्याला न वाटणे इतके कृतघ्न झालो आहोत का आपण ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे.

इथून काहीही बरोबर नेणार नाही आपण . आपली कर्म आपल्या पुढील प्रवासाची सोबती असणार आहेत .ह्या सर्व विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत . गुंजभर सोन्यासाठी आणि २ फुट जमिनीसाठी एकमेकांच्या उरावर बसणारे आपण एकमेकातील पवित्र बंधनांना  तिलांजली देत आहोत.ह्या मोहात फसून आपण होत्याचे नव्हते करतो. 

ह्या सर्वामुळे जाणार्या माणसांच्या इच्छांची राखरांगोळी होतेच पण त्यांचा आत्माही दुखावला जातो. जाणार्या माणसाची इच्छा हि आपली असेलच असेल असे नाही . कदाचित ती आपल्या मनाला पटणारी नसेलही पण काहीही झाले तरी भावना आणि कर्तव्य ह्यांचा मेळ इथे घालणे अपेक्षित आहे. नाही तर त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळणार नाही. 

ह्या सर्वाचा  परिणाम म्हणूनच मग पत्रिकेत पूर्वजांचे शाप आणि तळतळाट. अर्थात ह्याला इतरही अनेक कारणे आहे. पण जाणार्याच्या अंतिम इच्छेचा मान न ठेवणे ह्यातून आपण आपली कर्म मात्र नक्कीच वाढवत असतो. पुढे आपल्या कुटुंबाला आणि स्वतःलाही त्याचा त्रास होतो. मनाविरुद्ध घटनांची जणू शृंखला तयार होते आणि त्यात आपले जीवन व्यथित होते .

आपल्यालाही पुढील पिढीला काहीना काही देवून जायचेच आहे . काय देणार आहोत आपण ? एकमेकांचा दुस्वास करा ,आईवडिलांच्या इच्छेचा मान ठेवू नका ,विचारा  आपल्याच मनाला .आपले अनुकरण मुले करतील हे नक्की .

म्हणूनच ज्यांनी आपल्याला अंगाखांद्यावर वाढवले त्यांच्या अंतिम इच्छेचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे ,ह्यापेक्षा उत्तम कर्म दुसरे असूच शकत नाही .

अस्मिता 

#वारसाहक्क#मृत्युपत्र#वाडवडील#इच्छापत्र#परंपरा#अंतिमइच्छा#पूर्वज 














 






Wednesday, 16 June 2021

पाऊस आला वारा आला ...

 ||श्री स्वामी समर्थ  || 




उन्हाळ्यात इतकी उष्णता वाढते कि धरती मातेचा जणू कोप झाल्यासारखाच भास होतो. पण निसर्गचक्र अफलातून आहे. उन्हाने तापलेल्या आणि त्रासलेल्या सर्व जीवांना पुन्हा एकदा जीवदान मिळते ते पावसाच्या सरींनी. पाणी हे जीवन आहे आणि त्याशिवाय सर्व व्यर्थ आहे. 

कुठलीही गोष्ट प्रमाणाबाहेर असेल तर ती वाईटच . तसेच पाऊसपाणी हवेच त्याशिवाय जनजीवन नाही , शेतीभाती , अन्न धान्य पिकणार नाही आणि आपल्या सर्व प्राणिमात्रांच्या मुखी घास सुद्धा पडणार नाही . पण कधीकधी वरुणराजाचा कोप होतो आणि प्रचंड वृष्टीमुळे जनजीवन तर विस्कळीत होतेच पण पुराच्या पाण्यात गावच्या गावे वाहून जातात , पिकांचे पर्यायाने शेतकर्यांचेही नुकसान होते. त्याच्या जोडीला वादळी पाऊस आला तर बघायलाच नको. असो .

तर सांगायचे तात्पर्य असे कि संपूर्ण सृष्टीला पुन्हा एकदा बहरून टाकणारा हा पाऊस आला कि आबाल वृद्ध सर्वच आनंदी होतात , धबधबे आणि नद्या वाहू लागतात आणि सृष्टी जलमय होते. 

लहान मुले पाण्यात होड्या सोडण्याचा आनंद मनमुराद लुटतात तर तरुण तरुणी पावसाचा आनंद घेत भ्रमंती करतात. अगदी सामान्य माणूस सुद्धा आपल्या घराच्या खिडकीतून वाफाळलेल्या चहाचा आनंद घेत पावसाचे स्वागत करतो. 

निसर्गाने सगळ्याची चोख व्यवस्था ठेवली आहे.  आकाशातील लुकलुकणारे तारे म्हणजेच हि नक्षत्रे . सूर्याचा अमुक एक नक्षत्रात प्रवेश झाला आणि त्याचे वाहन कुठले आहे हे बघून  पाऊस पडणार किंवा पडणार नाही , किती कसा पडणार हे भाकीत आपल्या घरातील मोठी माणसे आपल्याला सांगत असतात . ह्या सर्वाची इत्यंभूत माहिती पंचांगात असतेच.

सहदेव भाडळी ह्या भावंडांच्या संवाद स्वरूपात कथन केलेल्या ह्या ज्योतिष विषयक ग्रंथात निसर्गाचे चक्र , पंचांग ह्याच्या आधारे असणारी  उत्तम माहिती आहे . पाऊस ,घरबांधणी , मुहूर्त ह्यासारख्या आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत असणार्या गोष्टींविषयीचे समर्पक कथन ह्यात केलेलं आहे. 

ह्यातील काही श्लोकांतून  सूर्याचे भ्रमण कुठल्या नक्षत्रातून होताना किती आणि कसा पाऊस पडेल याचे वर्णन आहे . पूर्वीच्या पिढीत ग्रामीण भागातील शेतमजूर , शेतकरी ह्यांना हे सर्व तोंडपाठ असायचे आणि त्यानुसार शेतीची कामेही केली जात असत .

नक्षत्रा प्रमाणे पर्जन्य फळ 

रोहिणी वाजे गडगडाट, मृग पडे दिवस आठ ||
भाडळी म्हणे सहदेवजी , नद्या वाहती काठोकाठ||१|
|

अर्थ – रोहिणी नक्षत्र नुसता गडगडाट झाला आणि मृगाचा आठ दिवस पाऊस चांगला झाला तर नद्यांना पूर येतील असे भाडळी सहदेवास सांगत आहे.

मृग करी झाडाझाड आर्द्रा न पडे कोय ||
भाडळी कहे सहदेवजी , पुथ्वी प्रलय होय ||२||

अर्थ – भाडळी  सहदेवास सांगत आहे , जर मृग नक्षत्री नुसता वारा सुटला व आर्द्रा नक्षत्री पाऊसच पडला नाही तर मोठा दुष्काळ पडून सर्वत्र हाहाकार  उडेल.

पुनर्वसु न पडे काही , पुष्य जाय कोरडा |
भाडळी म्हणे सहदेवजी , वाळूच्या कण्या भरडा||३||

अर्थ – सहदेवास भाडळी सांगते , जर पुनर्वसु व पुष्य या नक्षत्री पाऊस पडला नाही तर धान्या ऐवजी मातीचे दळण करावे लागेल..

पुष्य पडे सबंध , आश्लेषा वाहे पूर |
भाडळी म्हणे सहदेवजी , घरघर बाजे तूर ||४||

सहदेवास भाडळी म्हणते – सर्व पुष्य नक्षत्री पाऊस पडला व आश्लेषा नक्षत्रात पूर आला तर , धान्याची समृद्धी होऊन लोक घरोघरी विजयोत्सव करतील.

उत्तरा पडे ४ दिन , हस्त न पडे कोय |
भाडळी कहे सहदेवजी , पृथ्वी प्रलय होय ||५||

भरपूर पडतील उत्तरा तर भात खाईना कुत्रा |
न पडतील उत्तरा तर भात मिळेना पितरा ||६||

सहदेवास भाडळी सांगते उत्तरा नक्षत्राचा पाऊस चार दिवस झाल्यावर हस्ताची पर्जन्य वृष्टी झाली नाही तर महागाई होयील आणि हाहाकार होईल.

उत्तरा भरपूर पडल्या तर सुकाळ होईल , कुत्र्याला अन्न मिळेल ,पण नाही पडल्या तर पितरांना सुद्धा अन्न मिळणार नाही .

पडल्या साई स्वाती , तर तर पिकतील माणिक मोती |
न पडे स्वाती तर राजहंस माती खाती ||७||

सहदेवास भाडळी सांगते स्वाती नक्षत्राच्या पावसाने माणिक मोती सुद्धा पिकतील परंतु जर पडला नाही तर राजहंसाला माती खायला लागेल .

हस्त जाय कोरडा ,चित्रा करी ताणाताण |
भाडळी  म्हणे सहदेवजी , दुष्काळ पडेल तुझी आण ||८||

हस्ताचे नक्षत्र जर पावसाशिवाय  सुके गेले तर मोठा दुष्काळ पडेल असे सहदेवास भाडळी शपथ घेवून सांगते. 

रोहिणीने घातले आंडे ,मृगाने भिजवली पाठ |
सहदेव कहे भाडळी पाऊस गेला दिवस आठ ||९||

रोहिणी नक्षत्राचे मेघ जागीच जिरले , आणि मृगाचा नुसता पाठ भिजवण्याइतका पाऊस पडला तर पुढे ८ दिवस पाऊस पडणारच नाही असे सहदेवास भाडळी सांगत आहे.

वरील सर्व वर्णन वाचून आता आपल्या सर्वाना पावसाची नक्षत्रे कुठली आणि कुठल्या नक्षत्रावर कमी अधिक कसा पाऊस पडेल त्याचा अंदाज नक्कीच आला असेल. 

सूर्याने आपल्याकडे 9 नक्षत्र राखून ठेवली आहेत आणि त्या नक्षत्रातून सूर्याचे भ्रमण होताना पाऊस पडतो म्हणूनच एकूण २७ नक्षत्रातून हि पावसाची ९ नक्षत्रे वजा केली तर बाकी शून्य उरते , कारण पाऊस नसेल पाणी नसेल तर जीवन अशक्य आहे . हि संपूर्ण सृष्टी पाण्यावर जगते आहे .पाण्यामुळे  आपण सर्व जीवित आहोत फुलेफळे  झाडे बहरत आहेत .

पाऊस हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे तो जेव्हा प्रमाणत असतो तेव्हा जीवन सुसह्य करतो पण जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा हाहाकार माजवतो. होत्याचे नव्हते करतो . आयुष्यात अश्या अनेक अनेक गोष्टी आपल्या गरजेच्या असतात जसा पैसा .पण  कुठलीही गोष्ट गरजेपेक्षा अधिक मिळाली कि त्याची किंमत राहत नाही . अनेक खेड्यातून आजही लोकांना मैला मैलावरून पाणी आणावे लागते तेही उन्हातान्हातून , आणि आपण आपल्या घरातील पाण्याचा नळ धबधबा सोडत असतो.

पृथ्वीवरील पिण्याच्या पाण्याचा साठा कसा आणि किती आहे एक दिवस आपल्याला प्यायला सुद्धा पाणी मिळणार नाही , पाण्याचे दुर्भिक्ष जाणवेल आणि त्याला सर्वस्वी आपणच जबाबदार असू . तेव्हा लवकर जागे होवुया आणि वरुणराजाच्या ह्या असीम कृपेचा यथाशक्ती मान ठेवूया .

संदर्भ : सहदेव भाडळी “ज्योतिषशास्त्र “ ग्रंथ .

अस्मिता

#अंतर्नाद #पाऊस#वादळ#चक्रीवादळ#पूरस्थिती#जलाशय#नक्षत्र#सूर्य#चित्रा#स्वाती#रेवती#मघा