Friday, 1 April 2022

गुरुतत्वाचा अविष्कार

 || श्री स्वामी समर्थ ||



जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हे सार्थ आहे. समाज सुधारण्यासाठी संतानी जन्म घेतला आणि मानव जातीला मानवतेचा संदेश देण्याचे महान कार्य केले. गुढी पाडव्याच्या दुसर्या दिवशी चैत्र शुद्ध द्वितीय , अक्कलकोट निवासी समर्थ  सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती आहे. स्वामी समर्थांचा प्रगट दिन घरोघरी स्वामीभक्त मोठ्या प्रेमाने ,भक्तिभावाने साजरा करतात . प्रत्येक जण त्यांच्या सेवेत रममाण होतो. महाराजांचे अस्तित्व चराचरात आहे. महाराजांसाठी काय करू आणि काय नको असे प्रत्येक भक्ताला वाटत असते आणि म्हणूनच म्हंटले आहे साधुसंत येती घर तोची दिवाळी दसरा . महाराजांचे आगमन घरोघरी होणार ह्यात शंकाच नाही . आपल्या लेकी सुनांनी त्यांच्यासाठी केलेली जय्यत तयारी आणि त्यांच्या आवडीचे सर्व पदार्थ चाखून  महाराज नक्कीच तृप्ततेची ढेकर देतील आणि आशीर्वादांची बरसात सुद्धा करतील. 

माणसांनी माणसाशी माणसा सारखे वागावे हा संदेश देणारी हि संतांची मांदियाळी मग स्वामी समर्थ असोत , शेगावचे श्री गजानन महाराज  किंवा शिर्डीचे साईबाबा असोत  तत्व एकच आहे आणि ते म्हणजे “ गुरुतत्व “. हे आपले सर्व अध्यात्मिक गुरुजन आपल्याला खूप काही देत असतात ,आपण किती घेतो हे आपले प्रारब्ध आहे.

गुरुविणा जीवन दिशाहीन आहे. गुरु आपल्या आयुष्याला आकार देतात , दिशा देतात , चांगल्या वाईटातील फरक दृष्टीस आणून देतात , कसे वागावे ह्याचा आदर्श घालून देतात , आपल्याला जे दिसत नाही ते पाहण्याची दिव्या दृष्टी देतात . सुख दुक्खाच्या पलीकडे जाणारा भक्त हा खर्या अर्थाने महाराजांच्या समीप जातो. सगळ्यात मुख्य म्हणजे जगण्याची उमेद प्रेरणा हि अध्यात्माची खरी देणगीच म्हणायला हवी . जिथे सगळा अंधकार असतो तिथेच स्वामींचे राज्य सुरु होते. आता सगळे संपले असे म्हणतो तिथेच सूर्योदय होताना दिसतो , चराचर सृष्टी नवचैतन्या ने पुन्हा उभारी घेते .कात टाकून  फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेण्याचे समर्थ बहाल करणारे अध्यात्मच आहे.

अध्यात्म आपल्याला जगायचे कसे ते शिकवते . जगण्याचा मूलमंत्र देते . जीवन म्हणजे आशा  निराशेचा खेळ आहे. ह्या खेळात आपल्याला जिंकायचेच आहे हे सांगणारे अध्यात्म आहे. मुळात हा मार्गच खूप खडतर आहे. क्षणाक्षणाला इथे परीक्षा असतात . महाराज भक्तांना सहज काहीच देणार नाहीत , अंत बघतील पण जेव्हा देतील तेव्हा सार जग पाहत राहील असे देतील. ह्या आनंदाच्या शिखरावर पोहोचायला अनेक नागमोडी वळणे पार करायला लागतात ,कधी कडेलोट सुद्धा होवू शकतो.  बावनकशी सोन्यासारखा भक्त त्यांच्या परीक्षेत उजळून निघतो आणि स्वमिमय होऊन जातो. 


खर्या स्वामीं भक्तांना त्यांच्याहि आधी त्यांच्या हातातील सोटा दिसला पाहिजे म्हणजे चुका , वाईट कर्म हातून घडणारच नाही. अध्यात्म समजणे तितकेसे सोपे नाही. इथे आत्मपरीक्षणाची आणि समर्पणाची गरज आहे. आजकाल वस्त्राप्रमाणे गुरूसुद्धा बदलले जातात . मुळात गुरुतत्व समजले पाहिजे आणि ते समजले तर सर्व गुरु एकाच आहेत फक्त त्यांची रूपे अनेक आहेत ह्याची सत्यता पटेल.  निस्सीम श्रद्धा असेल तर गुरूंच्या वरचा विश्वास अबाधित राहतोच. आपल्या गुरूंचे रूप हे निर्गुण नसून सगुण आहे ह्याची ग्वाही जसजशी भक्ती वाढत जाते तशी मिळत जाते . 

आजच्या युगात अमुक एखाद्या प्रापंचिक सुखाच्या लालसेने आपण देवाची आराधना करतो. एका दृष्टीने हे खरही आहे कारण संकट समयी आपल्याला परमेश्वराचाच आधार वाटतो पण मग अश्या देवाला सौख्याच्या क्षणात विसरून कसे चालेल .म्हणूनच फक्त आपल्याला हवे तेव्हा देवदेव न करता सतत त्यांच्याच नामात , चिंतनात आपण राहिलो तर आयुष्य समृद्धतेकडे वाटचाल करेल ह्यात संदेह नाही. त्यांच्याच इच्छेत आपली इच्छा विलीन करणे हे सहज सोपे नाही . पण गुरु जे करतील ते आपल्या भल्यासाठी हे एकदा मनात पक्के झाले कि मग सतत काही न काही मागणेही कमी होऊ लागते. 

सद्गुरूंची आपल्या आयुष्यात भेट हा एक अनमोल क्षण असतो. ज्यांना योग्य गुरु मिळाले ते भाग्यवान म्हंटले पाहिजेत.

एकदा सद्गुरुप्राप्ती झाली कि आपण आपले उरतच नाही . गुरुतत्व समजले कि त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर आपण आपल्याही नकळत मार्गस्त होतो. गुरूंच्या आयुष्यातील असण्याने उच्च कोटीची अध्यात्मिक अनुभूती येते . चांगल्याची कास धरून वाईट गोष्टीना आपोआपच तिलांजली मिळते, स्वतःच्या अंतर्मनात डोकवायची आणि स्वतःच्याच चुका शोधायची बुद्धी होते. वाईट कर्म नष्ट होतात . थोडक्यात आपला भाग्योदय होतो. 

महाराजांमुळे आपल्या आयुष्यात कात टाकल्याप्रमाणे बदल होतो .ज्योतिषाच्या संज्ञेत गुरु हा आकाश तत्वाचा ग्रह आहे. सर्वावर छत्र धरणारा , कृपा करणारा. गुरुसेवा करताना भक्ताचा दंभ गळून पडतो कारण त्याशिवाय महाराजांची कृपा होणे कठीण . अध्यात्मात अहंकार उपयोगाचा नाही . महाराज आणि आपण ह्यामध्ये हि अहंकाराची मोठी भिंत उभी आहे . सतत आपण मी पारायण केले मी सेवेसाठी गेलो , मी नामस्मरण गेले ,मी हे केले आणि मी ते केले. प्रत्येक वाक्याची सुरवात मी पासून आणि शेवटही मीच. हीच तर इथे मोठी मेख आहे. मी केले म्हणण्यापेक्षा महाराजांनी सेवेची संधी दिली त्यांनी माझ्याकडून सेवा करून घेतली असे जेव्हा आपण म्हणायला लागू तो दिवस खरा .सर्व श्रेय त्यांना देऊन मोकळे होणारा भक्त महाराजांच्या समीप जातो . असा भक्त सुख आणि दुखाच्याही परे जातो. मी मी म्हणणारे कोरडे पाषाण राहतात . महाराजांना  भक्ती भावाचे अभ्यंग स्नान घालणे अभिप्रेत आहे . महाराजांचे देऊळ आपल्या हृदयात असले तर त्यात वाईट विचारांना जागाच उरणार नाही. 

हे विश्वाची माझे घर ह्या उक्तीप्रमाणे चराचर व्यापून उरलेले हे गुरुतत्व आपल्याला काय देऊ पाहते आहे आणि आपण काय घ्यायचे आहे हे समजले कि आपली जीवनरूपी नय्या पार झालीच म्हणून समजा . ज्या दिवशी आपण सन्मार्गाने नीतीने जगू , कुणालाही त्रास देणार नाही, निंदा करणार नाही, सचोटीने लक्ष्मी घरी आणू आणि आपल्या कुठल्याही कृतीने महाराजांना आपल्याला त्यांचा भक्त म्हणण्याची लाज वाटेल  अशी कृती न घडू देणे ह्याची मनोमन जाणीव ठेवु त्या क्षणी दुधात साखर  विरघळावी तसे आपण ह्या गुरुतत्वात विरघळून जाऊ. 

गुरु तत्व आणि परंपरा आपल्याला जपायची आहेच पण हा वारसा आपल्या पुढील पिढीला देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. 

आपल्या प्रत्येक कृतीवर त्यांचे लक्ष आहे ह्याचे भान सुटता कामा नये. आपला विठोबा घाटोळ होऊ न देणे ह्याची डोळ्यात तेल घालून काळजी घेतली पाहिजे. कुठल्याही भौतिक सुखाच्या लालसेने केलेली गुरुसेवा फोल ठरेल. अपेक्षाविराहित सेवा आयुष्यात आनंदाला भरती आणेल. कुठल्या क्षणी काय वाढून ठेवले असते हे आपल्याला माहित नसते त्यामुळे कुठल्याही स्थितीत सामंजस्य आणि लव्हाळ्या सारखे जगणे नक्कीच लाभदायक ठरेल.

आयुष्यातील सद्गुरूंचे अस्तित्व सुद्धा खूप आनंददायी आहे, त्यामुळे नीतीने सन्मार्गाने वागणे , आपल्या मनात चांगल्या विचारांची ज्योत सदैव प्रज्वलित ठेवणे , श्रद्धायुक्त अंतकरणाने समर्पणाची भावना ठेऊन महाराजांच्या समोर नतमस्तक होणे हे आपले परम कर्तव्य आहे . 

महाराजंचे परमभक्त होणे हीच खरी “ गुरुदक्षिणा “ आहे .पण ते सहज खचितच नाही त्यासाठी अनेक अग्निदिव्यातून जावे लागते , महाराज  प्रत्येक क्षणी परीक्षा पाहतात , इथे सोळा आणे खरा भक्तीभाव लागतो , कुठलीही भेसळ चालत नाही. पण ह्या सगळ्या अग्निदिव्यातून तावून सुलाखून निघालेला भक्त महाराजांच्या कृपेने  निर्लेप होऊन मोक्षपदाला जातो ह्यात दुमत नाही . 

आपला जन्म का झाला आपण मनुष्य देहच का धारण केला, अमुक एक कुळात का जन्माला आलो , आपली कर्तव्ये काय ,ह्या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अध्यात्मिक प्रवासात मिळत जातात . 

“ आपण परोपकाराची आणि संसाराची न्याय कर्मे निस्वार्थी बुद्धीने करून ती ईश्वराला अर्पण करावी हाच खरा कर्मयोग आहे “  हे गीतेतील कर्मयोग जाणणारे आणि त्यानुसार आचरण करणारे खरे कर्मयोगी श्री रामचंद्र वेलणकर ह्यांचे विचार हृदयाला स्पर्शून जाणारे आहेत . प्रत्येकाने ह्यावर मनन चिंतन करावे.

आपली रोजची पूजाअर्चा , जपजाप्य हे दैनंदिन व्यवहारातील आपल्या कृतीतून दिसले पाहिजे. प्रत्यक्ष व्यवहारात वागताना त्याची अनुभूती स्वतःला आणि इतरानाही होत असेल तर आपण गुरुतत्व खर्या अर्थाने समजलो आणि जगलो असे म्हणायला हरकत नाही. 

अध्यात्मिक व्यक्तींना प्रापंचिक अडचणी नसतात असे नाही किबहुना अधिकच असतात पण ते आपला अध्यात्मिक मार्ग सोडत नाहीत. सर्वस्व महाराजांवर सोपवून निर्धास्त राहतात . माझी चिंता आता तो वाहणार आहे हा भाव मनात धरून आपले नित्य कर्म करत राहतात . स्वामी समर्थांनी भक्तांना “ जो अनन्य भावे माझी सेवा करेल त्याचा योगक्षेम मी चालवीन “  अशी ग्वाही दिली आहे तर शेगावचे संत शिरोमणी श्री गजानन महाराजांनी भक्तांना  “ मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर ठेवु नका “ हे वचन दिले आहे. 

सद्गुरुप्राप्ती होणे हा परमोच्च आनंद आहे जो अनुभवायचा असतो.  त्यांच्याकडे काय मागायचे ? ज्याने जन्माला घातले आहे त्याला सगळच माहित आहे त्यामुळे वेळ आली कि आपल्याला ते देणारच मग मागण्याचा प्रश्नच येत नाही .  चैत्र शुद्ध द्वितीया  स्वामी समर्थ ह्यांची जयंती . गुरुतत्त्वाचा अविष्कार मी प्रत्येक क्षणी अनुभवते आहे म्हणूनच ह्या दिवसाचे औचित्य साधून महाराजांच्या सेवेत  अधिकाधिक भक्त रुजू व्हावेत आणि ह्या भक्तिरसात देहभान विसरून रममाण व्हावेत ह्या उदात्त  उद्देशाने केलेला हा लेखनप्रपंच विनम्रतेने महाराजांच्या चरणी ठेवत आहे. 

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा 

शेवटचा दिस गोड व्हावा , याजसाठी केला होता अट्टाहास 

सौ. अस्मिता दीक्षित 

समुपदेशनासाठी संपर्क : 8104639230
ब्लॉग : antarnad18.blogspot.com
फेसबुक पेज : @yashasweejyotish



 









         










Wednesday, 23 March 2022

विचार मंथन -2-- Clutter

 || श्री स्वामी समर्थ ||



घर म्हंटले कि अडगळ आलीच. कधी न कधीतरी एखादी वस्तू लागतेच जसे मेणबत्ती ,कंदील . ह्या गोष्टी रोज लागत नाहीत पण दिवे गेले तर ह्यांना अनन्य साधारण महत्व प्राप्त होते आणि त्या वस्तू मिळाल्या नाहीत तर आपण घर डोक्यावर घेतो म्हणून त्या हव्यात . असेच हे हवे ते हवे म्हणून आपल्या घरात “ Clutter “ साठत जाते. अनेकदा खूप महागाईच्या गोष्टी आपण हौसेने खरेदी केलेल्या असतात त्या टाकून देणे जीवावर येते . अनेक गोष्टीत आपला जीव गुंतलेला असतो जसे आजीची गोधडी , खास मैत्रिणीने दिलेला बटवा ,घरातील पिढीजात अनेक वस्तू . 

पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब व्यवस्था होती आणि वास्तू हि मोठ्या असत त्यामुळे माजघर , बैठकीची खोली , अडगळीची खोली , न्हाणीघर अशी घरांची रचनाच असे. त्यावेळी नको असणार्या पण कधीतरी लागणाऱ्या वस्तूंची रवानगी अडगळीच्या खोलीत होत असे. आता शहरात माणसाला राहायला जागा नसते तिथे हि अडगळ ठेवणार कुठे हा यक्ष प्रश्न निर्माण होतो. 

वास्तू शास्त्रा प्रमाणे  6 महिने एखादी वस्तू वापरली नाही तर ती फेकून द्यावी नाहीतर वास्तू दोष निर्माण होतो.  त्याचसोबत घरात बंद पडलेल्या वस्तू जसे बंद घड्याळे , बंद पडलेली विजेची उपकरणे, टाईपरायटर अश्या वस्तू एकतर चालू करून ठेवा आणि वापरा किंवा सरळ फेकून द्या , नाहीतर ह्या  वस्तूच Clutter निर्माण करतात .

राहत्या घरात जो प्रकार नेमका तोच आपल्या मनात सुद्धा असतो. आपले मन हे असंख्य आठवणींचे आणि विचारांचे जणू आगर असते. चांगल्या वाईट अगणित आठवणी अगदी तश्याच्या तश्या तिथे असतात . सुख आणि दुक्खाचे क्षण आयुष्यात फेर धरून असतात . चांगल्या आठवणी पुन्हापुन्हा सौख्य प्रदान करतात पण वाईट क्षण भूतकाळात घेऊन जातात म्हणूनच अश्या स्मृतींना उजाळा देणे नकोच वाटते . बरेचदा ह्या आठवणींचे Clutter तयार होते आणि आपण वर्तमानातील आनंदाला आपण पारखे  होतो. म्हणूनच जशी घराची साफसफाई करणे आवश्यक असते तसेच वेळोवेळी मनातील विचारांची अडगळ दूर करणे तितकेच गरजेचे असते . डोक्यात आणि मनात काहीही ठेवायचे नाही ,विसरून जायचे सगळे , माफ करून टाकायचे सगळे , वाईट विचार आले कि लगेच कट करायचे हे सर्व सांगणे सोपे असते .पण प्रत्यक्ष्यात तितकेच अवघड . पण तरीही जाणीवपूर्वक ते केले पाहिजे म्हणजे मग तू मला 10 वर्षापूर्वी असे बोलला होतास अशी विधाने ऐकायला येणार नाहीत. 

आठवणी आपली पाठ सोडत नाहीत . कुठले विचार मनात ठेवायचे आणि कुठल्या विचारांना  तिलांजली द्यायची हा आपला Choice असायला हवा , हो ना? मनातले हे विचार जर आपल्याला त्रासदायक ठरत असतील ,आजारपण देत असतील तर हवेतच कश्याला ते आपल्या आसपास ? त्या विचारांना  दूर सारून मनात नवीन सकारात्मक विचारांसाठी जागा केली पाहिजे. 

वर्षानुवर्षे आपण एकाच पठडीत जगत असतो , तोच रस्ता तीच माणसे ,सगळ तेच असते .त्यामुळे मनातील विचार सुद्धा ह्याच विषचक्रात अडकत जातात . मन हे चंचल आहे. माणूस सतत कसला न कसला तरी विचार करतच असतो . आपले विचार आपल्याला घडवत असतात . मनाचे प्रतिबिंब चेहऱ्यावर दिसते म्हणतात ते खोटे नाहीच . जो भूतकाळात रमला तो भविष्य घडवू शकत नाही म्हणूनच मनात हि अडगळ जमा करून द्यायची नाही . 

आयुष्यात काहीही झाले तरी Show Must Go On . मनातली विचारांची वादळे कधी कधी उग्र स्वरूप धारण करतात आणि आपल्या तब्येतीवर त्याचा खोलवर परिणाम होतो. मन आजारी पडले कि मग शरीर सुद्धा आजारी पडते . ह्या सर्वामुळे आपला Aura सुद्धा बिघडत जातो , आत्मविश्वास कमी होतो , जगायची जिद्द सुद्धा ,म्हणूनच मनातली हि अडगळ दूर करा ...आत्ताचा क्षण हा Inevitable आहे तोच सर्वार्थाने उपभोगणे हेच आपल्या हातात आहे आणि तेच करणे हितावह आहे. 

चला तर मग  घरातल्या नको असलेल्या  वस्तू आणि मनातील नको असणारे विचार दूर सारून , मोकळ्या आकाशाखाली मनसोक्त , आनंदी मनाने नवीन वर्षाच्या स्वागतास सिद्ध होवुया .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230  







 


Friday, 4 March 2022

हव्यास ( Desire ) विचारमंथन - भाग 3

 || श्री स्वामी समर्थ ||



रोजच्या जीवनात जरा आजूबाजूला नजर टाकली तर दिसून येते कि प्रत्येक जण काहीना काही मिळवायच्याच मागे आहे. मनाची शांतता कुठेतरी हरवून सतत काहीना काही शोधत ,जीवाच्या आकांताने कश्याच्यातरी मागे सतत पळत आहे. नक्की काय आणि किती मिळवायचे असते माणसाला. किबहुना उभ्या आयुष्यात एका जीवाला लागते तरी काय आणि किती ?  आपण काहीच घेऊन आलो नाही आणि इथून काही नेणारही नाही हे सर्व अगदी सूर्य प्रकाशा इतके स्पष्ट असूनही मिळवायची आसक्ती काही थांबत नाही .  आज एक गाडी आली कि काही दिवसांनी दुसरी  मग तिसरी . आपण कधी विचार केला तर समजेल एका देहाला कीती कपडे , चपला , घड्याळे , सौंदर्य प्रसाधने एक ना दोन अश्या किती अनगिनत गोष्टी आहेत ज्या हव्यासापोटी आपण घरात आणून ठेवल्या आहेत आणि आता त्याची नुसती अडगळ झाली आहे. दिवसागणिक घरातील क्लटर वाढतंय पण आपला  जमवण्याचा हव्यास संपता संपत नाही .

मुंबई पुण्यासारख्या प्रगत शहरात आता सर्व काही हाकेच्या अंतरावर मिळते . सोशल मिडीया वरील आपला वावर त्यातील मोहात टाकणाऱ्या असंख्य जाहिराती आपल्या मनाला भुरळ पाडतात . मग नको असणार्या गोष्टी सुद्धा विकत घेतल्या जातात  कधी गरजेसाठी तर कधी दिखाव्यासाठी . माणूस एकदा ह्या विष चक्रात सापडला कि मग ह्या So Call Online Shopping च्या क्रेझ मधून आपण सहजासहजी बाहेर येऊ शकत नाही . माणसाने आपली गरज ओळखली पाहिजे आणि अंथरूण पाहूनच हातपाय पसरले पाहिजे हे कटू सत्य आहे.  कधी कधी कुणाला तरी दाखवायला म्हणून किंवा कुणीतरी एखादी वस्तू घेतली मग मी पण त्याही पेक्षा अधिक किमतीची घेणार ..कश्यासाठी ? कुणाला दाखवायचे आहे हे सर्व ? हा हव्यास कधीतरी अंगलट सुद्धा येऊ  शकतो. श्री स्वामी समर्थांनी सुद्धा म्हंटले आहे कि हव्यास म्हणजे अग्नीत तुपाची धार . कश्यासाठी हे सतत सगळे जमवायचे ? किती आणि कुणासाठी ? हे सर्व न संपणारे आहे . कुठे थांबायचे हे माणसाला समजले तर तो अधिक सुखी होईल. आपल्या गरजा सीमीत ठेवा हे सांगायला करोनाला सुद्धा यावे लागले आहे . आता निदान त्यावरून तरी आपण शहाणे झालो पाहिजे नाहीतर सर्वनाश कुणीही थांबऊ शकणार नाही  हे नक्कीच . 

मोठेपणा ,मानमरातब , हायफाय संस्कृती , दिखाऊपणाची हौस ,श्रीमंतीचे प्रदर्शन करताना आपण स्वतःचे खरे अस्तित्व सुद्धा विसरून जातो. ह्या शोऑफ करण्याच्या नादात आपण साधे सोपे सहज सुंदर आयुष्य जगणे सुद्धा विसरून जातो .ह्या खोल गर्तेतून मग मनाला वाटले तरी बाहेर येऊ शकत नाही . कधी कधी तर  परतीचा मार्ग सुद्धा बंद होतो . म्हणूनच आपण वेळीच सावरले पाहिजे. उठसुठ प्रत्येक गोष्टीतील हव्यास सीमित ठेवला पाहिजे.  

एकामागून एक प्रॉपर्टी ,जमीन विकत घेणे ,नको तितका पसारा वाढवणे आणि मग त्यातून नकळत आलेला अहंकार जोपासणे . आज  समाजातील अनेक दुर्लक्षित घटकांसाठी जसे कुष्ठरोगी  किंवा मतीमंद मुले , वृद्धाश्रम ,अंधशाळा अनेक स्थरांतून मदतीचे हात पुढे येत आहेत . उगीचच एकामागून एक घरे किंवा गाड्या विकत घेत भौतिक सुखाचा उद्रेक करण्यापेक्षा आपण अथक परिश्रमाने मिळवलेल्या लक्ष्मीचा अश्या संस्थांसाठी , अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी उपयोग केला तर ते पुण्याचे काम ठरेल नाही का?  आपली हौस मौज करू नये असे अजिबात नाही पण एका मर्यादेपर्यंतच. आपल्या संपत्तीचा विनियोग अश्या सेवाभावी कामातून केला तर अध्यात्मिक सेवा ,पुण्याचे काम  घडेल. हेच पुण्य शेवटच्या क्षणी आणि पुढील जन्मी सुद्धा उपयोगी येयील हे निर्विवाद सत्य आहे.

प्रत्येकाचे जीवन वेगळे आहे त्यामुळे कुणाच्या आयुष्याशी तुलना करणे अर्थहीन आहे. तुलना केली कि मग न संपणारी भौतिक सुखाची लालसा मागे लागते . म्हणूनच प्रत्येकाने आपली समाधानाची व्याख्या ठरवली पाहिजे .व्यर्थ गोष्टींच्या मागे धावणे निरर्थक वेळ घालवण्यासारखेच  आहे. हि जीवघेणी स्पर्धा कश्यासाठी हा प्रश्न कधीतरी आपण स्वतःला मनापासून विचारला तर त्याचे उत्तर आपल्याला मिळेलच . दुसर्याच्या आयुष्याशी अकारण केलेली तुलना आपल्याला फार खुजे करते , आपल्याच नजरेतून आपल्याला कमी करते . आपण स्वतःला फार लहान समजायला लागतो आणि अकारण दुक्ख ओढवून घेतो.  आपल्या  पूर्व संचीताप्रमाणे मिळालेला हा जन्म आहे तो सार्थकी लावणे हेच आपले कर्म आहे. जीवनातील प्रत्येक क्षण भरभरून जगता जगता जीवनाचा सोहळा कधी होतो ते आपले आपल्यालाच समजत नाही .

करोनाने गेली दोन वर्ष आपल्या आयुष्याची सगळी गणितच बदलून टाकली . प्रत्येक वळणावर नवीन आव्हाने आहेत आणि प्रत्येक दिवस सारखा नाही हेच तर त्याला सुचवायचे नसेल का ? जीवनात किती चढ उतार आहेत . पैशाचा ओघ सुद्धा सतत कायम नसतो त्यामुळे अनाठायी खोट्या दिखाव्यासाठी केलेले खर्च अंगलट येवू शकतात  आणि म्हणूनच कुठे थांबायचे ते समजले पाहिजे. हव्यास टाळता आला पाहिजे .कारण हव्यास आपल्या आनंदाला ओहोटी लावतो. शेवटी आहे तेच गोड वाटायला लागते .  तात्पर्य काय तर समाधानाची व्याख्या आपण ठरवली पाहिजे आणि समाधानाने आलेला प्रत्येक क्षण आनंदाने उपभोगला पाहिजे .

ज्योतिष शास्त्राचा विचार करता पत्रिकेतील शुक्र हा भौतिक, ऐहिक सुखाचा कारक आणि हव्यास वाढवणारा राहू . राहू प्रलोभनात फसवतो . मनुष्य जन्माचे महत्वाचे कारण “ Desire “ हेच आहे. कुठलीतरी इच्छा अपूर्ण राहिली म्हणून ती पूर्ण करण्यासाठीच आपण पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो . पुनरपि जननं ,पुनरपि मरणं. 

सौ अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

फेसबुक पेज : @yashasweejyotish



Friday, 25 February 2022

ज्योतिष समुपदेशनाचा श्रीगणेशा विचार मंथन – भाग 1.

|| श्री स्वामी समर्थ ||





अनेक दिवसापासून मनात खूप विषय घोळत आहेत आणि त्यावर लिहावे आपले विचार मुक्तपणे मांडावेत असे वाटत होते म्हणूनच आजपासून “ विचार मंथन – भाग 1” आपल्यासमोर मांडताना खूप आनंद होत आहे. व्यस्त दिनक्रमातून जसा वेळ मिळेल तसे लिहिण्याचा मानस आहे. एकमेकांशी संवाद झाला पाहिजे आणि विचारांचे आदान प्रदान सुद्धा झाले पाहिजे त्यामुळे आपण सर्वांनी नुसते वाचन न करता तितक्याच मोकळेपणान आपले विचार माझ्या प्रत्येक लेखावर शब्दांकित करावेत अशी विनंती करत आहे. आज सोशल मिडिया ने अनेक  उत्तम लेखक जन्माला घातले आहेत आणि त्यांच्यासाठी हे उत्तम व्यासपीठ सुद्धा आहे. ह्यापैकी एखादा विषय आपल्याही डोक्यात असेल किंवा आपण त्याच्याशी सहमत किंवा असहमत सुद्धा असाल. जे काही असेल ते .. . म्हणूनच अव्यक्त राहू नका व्यक्त व्हा. माझ्या ह्या उपक्रमाला आपल्या सर्वांच्या शुभेछ्यांची आणि पाठिंब्याची नितांत गरज आहे कारण उत्तम वाचक नसतील तर सर्व व्यर्थ आहे.

ज्योतिष समुपदेशक तयार होण्याची गरज 

आजच्या  स्पर्धात्मक युगात  पावलापावलावर आव्हाने आहेत . ह्या जीवघेण्या स्पर्धेत भलेभले गर्भगळीत होताना दिसतात. कधीकधी अगदी रोजचे जगणे सुद्धा असह्य होते.  आपण साधी प्रापंचिक माणसे आहोत .आपले असूनअसून प्रश्न ते काय  असणार तर महाविद्यालयीन प्रवेश , नोकरी , विवाह , संतती , घर , परदेशगमन ,वार्धक्य ,आजारपण ..संपली यादी .  ह्यापलीकडे फार क्वचित आपल्या प्रश्नांची धाव असते . अनेकदा हे प्रश्न खूप गंभीर होतात आणि मग  मार्गदर्शनासाठी आपली पाऊले ज्योतिषाच्या घराकडे आपल्याही नकळत वळतात .

एखाद्या जातकाची पत्रिका कधी बघावी ह्यालासुद्धा काही नियम आहेत . एखादा प्रश्न किंवा समस्या निर्माण झाल्याशिवाय उगीचच ह्या दैवी शास्त्राशी खेळू नये हे माझे स्पष्ट मत आहे. जसे अनेक स्थळ पाहूनही विवाह जमत नसेल तर विवाहासंबंधी प्रश्न विचारला तर ठीक पण मुलगा शालेय शिक्षण घेत असताना हा प्रश्न विचारणे निश्चितच अयोग्य ठरेल. एखाद्याच्या नोकरीत अजिबात स्थैर्य नसेल तर प्रश्न विचारणे योग्य पण उठसुठ मनात आले म्हणून आज हा ज्योतिषी उद्या तो असे करणे कितपत उचित होईल ह्याचा प्रत्येकाने विचार केलेला बरा. समस्या निर्माण झालेली नसताना उगीच प्रश्न विचारत राहणे म्हणजे ह्या शास्त्राचा अपमान केल्यासारखेच आहे. जातक आणि ज्योतिषी ह्या दोघांनाही ह्याचे भान असणे आवश्यक आहे.


एखाद्या वेळी समस्या खूपच गंभीर असते ज्याचे उत्तर त्वरित मिळणे आवश्यक असते जसे आवडलेली वास्तू विकत घेऊ का ? किंवा शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यायचा आहे , घरातील एखादी व्यक्ती निघून गेली आहे . अश्यावेळी प्रश्नकुंडली मांडून सुद्धा प्रश्नाचे उत्तर देता येते . पण अश्यावेळी प्रश्न विचारणारा जातक आणि प्रश्न पाहणारा ज्योतिषी ह्या दोघानाही तो प्रश्न पहायची तितकीच तळमळ किंवा त्याचे गांभीर्य असणे गरजेचे आहे . 


काही लोकांना ज्योतिष शास्त्र हा चाळा वाटतो . हे दैवी शास्त्र आहे आणि ते मनुष्याच्या आयुष्यातील अनेक घटना कधी घडतील ह्याबाबत मार्गदर्शन करते.  योग्य वेळी  मनापासून प्रश्न विचारला तर उत्तर हमखास अचूक येणारच. आजही ह्या शास्त्राबद्दल हेटाळणी करणारे ,नावे ठेवणारे किंवा त्याबद्दल नकारात्मक बोलणारे महाभाग आहेत . पण कसे आहे सूर्य अस्तित्वातच नाही असे म्हंटले तरी तो उगवायचा राहणार आहे का?  असो. आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल तर सोडून द्यावी उगीच ज्या वाटेने जायचेच नाही त्या वाटेची चवकशी कश्याला ? 

पण इतके असूनही आज समाज जागृती होत आहे आणि अनेक जण ह्या दैवी शास्त्राचा आधार आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी घेतानाही आपल्याला दिसतात . जातकाची आंतरिक तळमळ त्याला त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचवतेच हा अनुभव आहे . 

आज समाजात ह्या शास्त्राच्या माध्यमातून जनजागृती करण्याची नितांत आवश्यकता आहे. हिंदू धर्मात विवाह ,आपल्या रूढी परंपरा ह्यांना अनन्य साधारण असे महत्व आहे. आज विवाह संस्थेचे बुरुज कुठेतरी डगमगताना दिसतात  . वयात आलेली मुलेच काय अगदी मुलीसुद्धा विवाहासंबंधी उदासीन दिसतात . मुलींच्या वाढत्या अपेक्षा , मुलीकडच्या लोकांचा  मुलींच्या संसारात केलेला नको तितका हस्तक्षेप , मुलांची आर्थिक स्थिती ,एकंदरीत दोघांचीही मानसिकता ,रोजच्या आयुष्यातील जीवघेण्या स्पर्धेमुळे आलेले नैराश्य आणि त्यातून आलेली व्यसनाधीनता ह्या सर्वाचा आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम ह्यामुळे अनेक तरुण विवाहाबद्दल उत्सुक दिसत नाहीत . समाजासाठी आणि वंश वृद्धी साठीही विवाह आवश्यक आहे त्यामुळे आजकालच्या तरुण पिढीला ज्योतिष समुपदेशनाची सर्वात अधिक गरज आहे. अगदी प्रेम विवाह असेल तरीही विवाह पूर्वी आणि तद पश्चात  ज्योतिष समुपदेशन आवश्यक आहे. त्यांनाच नाही तर त्यांच्या पालकांनाहि त्याची गरज आहे. 


कुठल्याही प्रश्नासाठी आपण आधी प्रयत्न करावेत आणि मग त्यातूनही उत्तर मिळत नसेल तरच ह्या शास्त्राचा आधार घ्यावा उठसुठ नाही.  कर्म हे सर्वश्रेष्ठ आहेच .  ज्योतिष समुपदेशन किंवा ज्योतिषीय सल्ला आपल्याला नेमका का कश्यासाठी हवा आहे ह्याचा विचार मनात पक्का असेल तरच पुढे जावे. ह्या शास्त्राबद्दल तसेच ते कथन करणाऱ्या व्यक्तीबद्दल आदरभाव मनात असला पाहिजे .  नेमक्या कुठल्या प्रश्नासाठी आणि कुठल्या टप्प्यावर आपल्याला समुपदेशनाची गरज आहे हे ओळखून ह्या दैवी शास्त्राची मदत घेतली तर आपले जीवन समृद्धतेकडे वाटचाल करेल ह्यात दुमत नसावे. 


 आयुष्यात कधी न कधी तरी प्रत्येकाला समुपदेशकाची गरज लागते . ते फक्त ज्योतिष ह्या विषयासाठीच असेल असे नाही .कुणाशीतरी मनातले बोलले कि मन हलके होते हे मनुष्य स्वभावाला धरूनच आहे. After all Sharing Is caring. समुपदेशन हा माझा आत्माच आहे कारण गेली  कित्येक वर्ष  हे काम मी माझ्या जवळच्या लोकांसाठी करतेच आहे .आज ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून करण्याचाही विचार पक्का झाला म्हणून हा लेखन प्रपंच . आपल्या समुपदेशाने  , सकारात्मक गोष्टी सांगून जेव्हा एखाद्याचे आयुष्य आनंदी होताना मी पाहते तेव्हा मिळणारे समाधान हे सगळ्याच्या पलीकडचे असते .  Yes I am  Worth Something असे फिलिंग येते . श्रीकृष्ण सुद्धा जगातील पहिला समुपदेशक होता ज्याने अर्जुनाला गीतेच्या माध्यमातून योग्य मार्गावर चालण्यास मदत केली ,योग्य निर्णय घेण्यास सहकार्य केले. 


असो हा मोठा विषय आहे ह्यावर प्रत्येकाने नक्कीच विचारमंथन करणे आवश्यक आहे. ज्योतिष शास्त्राला जश्या सीमा आहेत तश्या लेखनालाही त्यामुळे तूर्तास इथेच थांबते .


सौ . अस्मिता दीक्षित 

ज्योतिष समुपदेशन / “ हसतखेळत ज्योतिष शिका कार्यशाळा “

संपर्क : 8104639230

फेसबुक पेज : @yashasweejyotish