Wednesday, 24 July 2024

कलियुगाचा राजा

|| श्री स्वामी समर्थ ||


मोबाईल शिवाय श्वास सुद्धा घेणार नाही , धरसोड , फसवणूक , शेअर मार्केट मध्ये आयुष्यभराचा फटका , होत्याचे नव्हते , सुरळीत असलेल्या नोकरीत अचानक अडचणी , अचानक नवीन नोकरी सुद्धा मिळणे , चांगल्या नातेसंबंधात कायमची दरी , एकमेकात दुरावा गैरसमजामुळे , जवळच्या व्यक्तीकडून आर्थिक नुकसान , धोका , वाईट संगती व्यसने , डूख धरून राहणे घराबाहेर राहणे ,जवळच्या व्यक्ती अचानक बोलायच्याच बंद होणे , आयुष्यभर जपलेली रक्ताची नाती कायमची गैरसमजामुळे दुभंगणे , आपल्याला एकटे वाटत राहणे , फोबिया , मनावर सततचे दडपण ह्या गोष्टी आयुष्यात घडत असतील तर राहू कुठेतरी पत्रिकेत डोके वर काढून बसलाय हे निश्चित . प्रत्येक ग्रह चांगली वाईट फळे देणारा आहे अर्थात ते आपल्या वैयक्तिक पत्रिकेवर . 

मुळातच स्वरभानू राक्षस देवांच्या पंगतीत वेश पालटून बसला होता म्हणजे फसवणूक , धोका हे राहूचे ब्रम्हास्त्र म्हंटले तर वावगे ठरू नये. चंद्र सूर्याने त्यांचे पितळ उघडे केले म्हणून त्यांच्यावर डूख धरून बसलेला हा राहू दशा , अंतर्दशा आणि विदशेत बलवान होवून ज्या राशीत ठाण मांडून बसला आहे त्या राशीचे आणि ज्या नक्षत्रात आहे त्याचे फळ देण्यास अति उत्सुक असतो. अमृताच्या एका थेंबावर आयुष्याची , जीवनमरणाची लढाई लढणारा हा राहू संघर्षमय जीवन देतो . 

राहू अदृश्य स्वरुपात असल्यामुळे आपल्याला कोण फसवत आहे , आपला खरा मित्र कोण आणि खरा शत्रू कोण हे न समजणे , एखादी गोष्ट पटकन मनावर हाबी होणे , एखाद्याच्या शब्दात आपण अगदी सहज गुरफटत जाणे , मती गुंग झाल्यासारखे आकर्षित होणे हाच राहू आहे. 

राहूच्या दशेत माणसाने अत्यंत सावध राहावे , कुठल्याही कागदावर विचार न करता मोठ्यांचा सल्ला न घेता सही करू नये , कुणालाही जामीन राहू नये , कुणावर अगदी कुणावरही विश्वास ठेवू नये  . राहू क्षणात विळखा घालतो आपल्या मनाला , आपल्याला विचार करायला वेळ मिळायच्या आधीच गोष्टी घडून गेलेल्या असतात . आपल्या जवळचीच व्यक्ती धोका देते जिच्यावर आपला संपूर्ण विश्वास असतो . अश्या व्यक्ती आपल्या जवळच्या व्यक्ती , भावंडे , शेजारी , व्यवसायातील लोक , नातेवाईक ह्यांना सुतराम कल्पना येणार नाही इतक्या षडयंत्र करण्यात तरबेज असतात . राहू क्षणिक आहे . कायमस्वरूपी असे काहीच देणार नाही. आपल्या आयुष्याची सर्वात अधिक उलथा पालट राहू दशेतच होते . आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपण हतबल होतो . म्हणूनच राहूच्या दशेत समाजात कमी वावरावे , आपल्या गोष्टी गावभर सांगत सुटू नये , स्त्रियांच्या तोंडात काही राहत नाही त्यांनीही सावध राहावे . 

प्रेमप्रकरणातील अपयश अनेकदा राहूच्या विळख्यामुळे येते . प्रेम आणि आकर्षण ह्यातील फरक वेळीच समजला तर अनर्थ टळतो. केतुला अध्यात्माचा कारक मानले आहे आणि राहू हा फक्त भौतिक सुखाची लालसा देणारा ग्रह आहे हा गैरसमज आहे. राहू म्हणजे रिसर्च , संशोधन आणि त्यामुळे राहू हा आपल्याला ज्योतिष तंत्र मंत्र ह्यामध्ये सखोल अध्ययन  करायला शिकवतो . राहू ने जग जवळ आणले आहे , अनेक औषधे शोधून काढण्यात राहूचा हात आहे . त्याचप्रमाणे एकांत म्हणजे साधना करणे हाही राहूचा स्वभाव आहे. राहूच्या दशेत अनेक लोक उत्तम ज्योतिषी झालेले आहेत . 

संभ्रमित करणारा राहू अध्यात्माची सुद्धा ओढ लावणारा आहे , धार्मिक यात्रा आणि धार्मिकतेची ओळख करून देणारा , गंगा स्नान करवणारा , तीर्थयात्रा घडवणारा सुद्धा आहे. केतूची अध्यात्मिकता अंतर्मुख करते . राहूची अध्यात्मिकता वेगवेगळ्या धार्मिक विषयावर चर्चा संवाद , धार्मिक पुरातन वास्तू मंदिरे ह्यांना भेट देणे तसेच ग्रंथांचे संशोधन करवते .

राहू हा फिरता ग्रह असल्यामुळे तो कधी चांगली फळे देयील आणि कधी विध्वंसक फळे देयील हा अभ्यास महत्वाचा आहे. राहू ज्या भावात असेल त्या भावेशाची फळे देयील. 

पंचम भाव हा पूर्व कर्म दर्शवतो म्हणूनच पंचम भावात स्थित ग्रहाची दशा आपल्या गत जन्मातील कर्मांची दालने उघडणारच आणि त्याची चांगली वाईट फळे सुद्धा मिळणार . म्हणूनच अकल्पित , आकस्मित घटनांची नांदी राहूच करत असतो कारण ह्या घटना पूर्ण जन्मातील घटनांशी निगडीत आहेत . पंचम भाव संतती त्यामुळे अपत्याकडून त्रास . पंचम भावातील राहू आपली पूर्ण कर्माची फळे देण्यास जेव्हा सिद्ध होतो तेव्हा कुठलेही उपाय चालत नाहीत ,फक्त परमेश्वरच ह्याची तीव्रता कमी करू शकतो कारण हे पूर्ण कर्माशी निगडीत आहेत . केंद्र किंवा त्रिकोणात असलेला राहू कुठल्याही पाप ग्रहानी दुषित नसेल तर त्याच्या दशा , अंतर्दशेत चांगली फळे मिळू शकतात . राहू गोष्टी आकस्मित घडवतो ,ठरवून काहीच नसते . 

राहूचे कारकत्व समजून घेणे हा एक अभ्यास झाला पण तो आपल्या कुंडलीमध्ये कश्याप्रकारे फळ देयील हे पाहण्यासाठी राहू ज्या भावात आहे तो भावेश , राहूचे नक्षत्र , राहूवर असणारे इतर ग्रहांचे योग , दशा आणि गोचर हे सर्व अभ्यासावे लागते . राहूचे कारकत्व कुठेतरी वाचून अर्धवट ज्ञानाने तसेच्या तसे पत्रिकेला लावण्याची चूक अभ्यासकांनी कधीही करू नये .

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230








  


 

Monday, 22 July 2024

रुलिंग प्लानेट

 || श्री स्वामी समर्थ ||

आज चंद्र श्रवण नक्षत्रात आहे . दोन पत्रिका आत्ताच पाहिल्या . चंद्र श्रवण नक्षत्रात . रुलिंग ला चंद्र आणि प्रश्न चंद्राशी निगडीत . कुणी कितीही म्हणा सूर्य उगवायचा तो उगवणारच . हे दैवी शास्त्र आहे , फक्त अभ्यास मनापासून , जीव तोडून हवा . तुम्ही उत्तरापर्यंत जाणारच . कॉपी कसली करताय , साधना करा . ज्ञानाचा कारक गुरु , कॉपी चा कारक कोण ? 


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


Sunday, 21 July 2024

हृदयी वसंत फुलताना ....

 || श्री स्वामी समर्थ ||


टीप : आपल्या देवावर प्रेम आहे ना ? मग लेख कॉपी करू  नका . आपली साधना वाढवा आणि स्वतः लेखन करा , आम्ही नक्कीच वाचू .

आपले संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त प्रेमावर निर्भर असते . प्रेम आयुष्याला पूरक ठरते ,आयुष्यात बहार आणते , जगावेसे काहीतरी करून दाखवावेसे वाटते जर प्रेमाची माणसे जवळ असतील. प्रेमाशिवाय आयुष्य अळणी होते . आयुष्यातून प्रेम वजा केले तर आयुष्य अर्थहीन , जगणेच निरर्थक होईल . कुटुंब व्यवस्था सुद्धा प्रेमाच्या धाग्याने बांधलेली आहे . मुलांना घरी यायला थोडासा उशीर झाला मग मुले कितीही मोठी होवूदेत आईचा जीव वरखाली होतो. तर असे हे प्रेम आणि त्याचे प्रतिक मानले गेलेला “ चंद्रमा “ आपल्या हृदयात सतत प्रेमाची ज्योत तेवत ठेवतो . पत्रिकेतील पंचम भाव  म्हणजे प्रेम प्रणय विद्या संतती , उपासना आणि पूर्व कर्म सुद्धा .

पंचम भाव हा अनुबंधाचा आहे. आपण कुणावर तरी प्रेम करावे आणि कुणीतरी आपल्यावर ह्या भावनेशी निगडीत असणारे हे पंचम स्थान आहे . ह्या भावाशी चंद्र जो मनाचा कारक , शुक्र जो कामभावना देणारा , मंगळ धाडस आणि पुष्टी देणारा आणि शनी वायू आहे त्या भावनांना हवा देणारा ह्या सर्वांचा पंचामाशी संबंध आला तर प्रेमसंबंधाची निर्मिती होणारच .ह्या सर्वात मेरुमणी म्हणजे लाग्नेशाचा सुद्धा काही युती किंवा दृष्टीने संबंध आला तर .1 2 3 4 5 7 9 11 ह्या भावात हे योग निर्माण होतात . चंद्र म्हणजे मन आणि शुक्र प्रेम , मंगल धडाडी . ह्यासोबत राहू भुलवणारा फसवणारा आणि हर्शल शुक्राला बिघडवण्यात उस्ताद . पंचमेश आणि पंचम भाव बघा उत्तर मिळेल , त्यावर असणारे पापग्रहांचे कुयोग आणि दृष्टी सर्व काही सांगून जायील . प्रेम एकदाच होते आणि तेही आपल्या नकळत , माझ्यावर प्रेम कर हा आजपासून हे सांगावे लागत नाही . आज एकावर उद्या दुसर्यावर प्रेम करणे हे प्रेम नसून विकृती आहे. असो.

प्रेम आणि आकर्षण ह्यात खूप फरक आहे. आजकाल विवाहाचा विचार करताना सुद्धा मला मुलगी आवडली हे एक फोटो बघून सांगणारा मुलगा “ आवडली म्हणजे नक्की काय “ ह्या प्रश्नावर नक्कीच गोंधळून जाईल . चेहरा मोहक आहे म्हणून आवडली कि सुंदर आहे म्हणून कि अजून काही ? पण आवडली. 


तर आकर्षण हे कुणाहीबद्दल आणि कुठल्याही वयात असू शकते अर्थात त्यात गैर नाही जर त्या आकर्षणाने लक्ष्मण रेषा ओलांडली नाही तर. कारण हे अनकेदा काय नेहमीच क्षणिक असते. अश्या संबंधात अनेकदा चंद्र शुक्र हर्शल तसेच 5 8 अनेकदा १२ सुद्धा चा ह्यांचा संबंध पाहायला मिळतो . प्रत्येक पत्रिकेचा अभ्यास वेगवेगळा आहे. आजकाल सगळे अगदी 10- 12 तास कार्यालयात काम करतात आणि सहवासाने सुद्धा प्रेम जुळून येते . त्याचेच उदा आज पाहूया .


मध्यंतरी एका मुलीने पत्रिका दाखवली , मुलगी कसली दोन मुलांची आई होती . म्हंटले प्रश्न काय ? सर्व चांगले दिसत आहे कि पत्रिकेत . तर म्हणाली माझा दिसरा विवाह कसा होईल ? त्याचा योग आहे का ? असल्यास कधी ? मी ऐकतच राहिले ? म्हंटले पहिल्या विवाहाची होळी झाली आहे असे सुतराम चिन्ह पत्रिकेत दिसत नाही , काय झालेय काय ? हळूहळू बोलू लागली. म्हणाली माझी ऑफिस मधील एकजण मला आवडतो आणि त्यालाही मी आवडते ... आम्ही दोघेही विवाहित आहोत पण आम्हाला एकमेकांशीच लग्न करायचे आहे. त्यालाही एक मुलगा आहे. मी डोक्याला हात लावला आणि काय ते समजले. आश्चर्य म्हणजे त्याचीही पत्रिका हि वेडी घेवून आली होती. 


दोन्ही पत्रिका बघितल्या , त्या बघायची गरज सुद्धा नव्हती . पंचमात चंद्र आणि त्यावरून राहूचे गोचर भ्रमण चालू होते .  मी तिला विचारले काल कसली भाजी केली होतीस ?  म्हणाली रसभाजी कारण नवर्यानं आणि मुलानाही आवडते म्हणून . बघा ह्या एका उत्तरातच तिच्या प्रश्नाचे उत्तर होते . अगदी गेल्या २४ तासात प्रेमाने कुटुंबासाठी उत्तम स्वयपाक करणारी आज द्वितीय विवाहाचा प्रश्न घेवून आली आहे मग हे खरे कि ते खरे .

मी तिला विचारले नवरा दारू पितो का? घरी येवून मारतो का? त्याचे बाहेर काही आहे का? सगळ्या प्रश्नांची उत्तरे “ नाही “ अशीच होती. तेव्हा मी तिला म्हंटले गेले १५ मिनिटे आपण बोलत आहोत पण त्यात एकदाही तू नवर्याबद्दल शब्द सुद्धा वाईट बोलली नाहीस मग दुसर्या विवाहाचा प्रश्न येतोच कुठे ? 

तुम्हाला सगळी रामकथा लक्ष्यात आली असेलच .  ऑफिसमध्ये सहवासातून निर्माण झालेल्या “ त्या भावनाना “ ती “ प्रेम “ समजू लागली होती पण ते निव्वळ आकर्षण होते . हे अळवावरचे पाणी अनेकदा आपल्या मनाला फुंकर घालते पण आपली साधना असेल तर आपण वेळीच त्यातून सावध होवून बाहेर येतो .बरे त्याचाही उत्तम संसार चालू आहे मग दोन घर मोडून तिसरा संसार थाटण्याचे प्रयोजनच नाही. 


तिला म्हंटले त्याला सांग तू आधी घटस्फोट घे मग मी घेते . करेल तो असे ? कधीही करणार नाही . मग गप्प बसली . मी म्हंटले तो तुझ्या भावनांशी खेळत आहे असेही मी म्हणणार नाही कारण तू स्वतःच तुझ्या भावनांचा बाजार मांडला आहेस . दोन मुले आहेत तुला , इतक्या वर्षांचा संसार एका क्षणात मोडायला निघालीस . अग किती अविचारी आहेस तू आणि तू तुझ्या दोन मुलांना कसे घडवणार आहेस . कठीण आहे. मी म्हंटले आज महाराजांची क्षमा माग ते नक्कीच माफ करतील. मोडायला वेळ लागणार नाही पण संसार बहरायला प्रेमाचे विश्वासाचे खत पाणी घालावे लागते जे तू इतके वर्ष घातले आहेत . महाराज आपलेच आहेत ते आपल्याला अंतर्बाह्य ओळखतात . 


काही दिवसांनी फोन आला म्हणाली ताई तुमच्याशी बोलले तो दिवस स्मरणात राहील कायम . मनात म्हंटले आता काय केले हिने ?काय बोलणार पुढे ह्याकडे कान होते माझे. पण तिची पत्रिका घटस्फोटाची नव्हती हे मला आठवत होते . ती म्हणाली आता माझ्या मनातून सर्व विचार गेले . आम्ही दोघेही पूर्वीसारखेच चांगले स्नेही आहोत पण आता त्या भावना नाहीत. लक्ष्यात आलेच असेल .. चंद्रावरून गोचरीच्या राहूचे भ्रमण चालू होते .माणसाच्या मनाचा कारण चंद्र आणि आपला भूलभूल्लया राहू त्याने मनाला फसवले त्यात तिथे शुक्र सुद्धा ज्याने आकर्षण दिले . राहूची विदशा संपली आणि प्रेमाचा बहर मौसम  पण संपला .

पण त्यातून एक चांगले झाले नव्याने आयुष्य सुरु झाले आणि त्यात ती पुन्हा रमली ...

ह्यात आता चूक कुणाचीच नाही . ग्रहांचे खेळ असेच असतात पण ते आपल्याला अनेकदा समजत उमजत नाहीत . कधी आपण शेअर मार्केट मध्ये आपली आयुष्यभराची कमाई पणाला लावतो तर कधी कधी त्याची मोठी किंमत आयुष्यभर चुकवावी लागते . हा वरचा प्रकार घडतो . अविचार , अविचार आणि अविचार फक्त . 

चंद्र हा प्रेम दर्शवतो. माणूस हा प्रेमाचा भुकेला असतो आणि जीवनात कुणीतरी आपले जवळचे लागते , कुणासाठी घरी परत जायचे ? हा प्रश्न असतो . ऑफिस सुटल्यावर घरचे प्रेमाचे बंध घरची ओढ लावतात आणि आपण घरी परतत असतो . पण अनेकांच्या नशिबात हा प्रेमाचा ओलावा नसतो , त्यांना घरी यावेसेच वाटत नाही . आयुष्यभर प्रेमासाठी आसुसलेले राहतात आणि प्रेमाच्या शोधात राहतात . आकर्षण देणारे , मोहात फसवणारे अनेक क्षण येतात पण कुठे थांबायचे ते ठरवायला आपली साधना आणि भक्ती उपयोगी येते . महाराज आपल्याला लक्ष्मण रेषेबाहेर जावूच देणार नाहीत . प्रेमाची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असते . 

प्रेम करता आले पाहिजे , देताही आले पाहिजे , प्रेमासाठी जीव तळमळला पाहिजे , प्रेम होत जाते , ते करावे लागत नाही तरच त्यात गम्मत असते . आपणही प्रेमाच्या लायक बनायला हवे , हीच पंचम भावाची खरी ओळख आहे. आपलं कुणावर किती प्रेम करू शकतो आणि जगाकडून आपल्याला किती प्रेम मिळणार हे हा भाव दर्शवतो . सगळ्यात महत्वाचे आणि जे कधीही मोजता येणार नाही ते आपल्या सद्गुरूंचे आपल्यावर असलेले प्रेम ,आणि आपले त्यांच्यावर असलेले निर्व्याज्य प्रेम . ते मात्र १०० नंबरी सोन्यासारखे असते . महाराज एखाद्या आईसारखे आपल्या सर्व भक्तांवर अपरिमित प्रेम करतात , त्या प्रेमाच्या वर्षावात आपले जीवन व्यतीत व्हावे ह्यासाठी आपणही खरे खुरे भक्त होण्याची धडपड करत राहिले पाहिजे .

प्रेमाला व्याख्या नाही त्या भावना सापेक्ष आहे , ते फक्त व्यक्तीवरच असेल असे नाही .कुणाचे एखाद्या कलेवर प्रेम असते तर कुणाचे संगीतावर , खाद्यपदार्थांवर , एखाद्या वस्तूवर , झाडांवर , आपल्या मुलांवर आणि अर्थात आपल्या भगवंतावर , इष्ट देवतेवर . 

प्रेम करताना ते खरेच प्रेम आहे कि क्षणिक आकर्षण ह्याचा विचार केलात तर पुढचा अनर्थ टळेल कारण म्हंटले आहेच  आहे प्रेमा तुझा रंग कसा ? चुकीच्या व्यक्तीवर केलेले प्रेम ( प्रेम कुठले , क्षणिक आकर्षण ते ) आयुष्य रंगहीन करेल ,सहमत ? 

आज चंद्राचेच श्रवण नक्षत्र आहे. कुठे थांबायचे ते न समजणे आणि एखाद्या गोष्टीत वाहवत जाणे हे बिघडलेल्या चंद्राचे आणि कमकुवत लग्न भावाचे , लग्नेशाचे लक्षण आहे. चंद्र पराकोटीचा बिघडला असेल तर कुठलीही उपासना सुद्धा फलित होत नाही . पत्रिकेतील पंचम भाव शुद्ध असावा. 


श्री स्वामी समर्थ 

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230






 






Tuesday, 9 July 2024

विवाह कधी ?

 || श्री स्वामी समर्थ ||



टीप : लोकांचे लेख तसेच्या तसे कॉपी करून स्वामींच्या शिक्षेस पात्र ठरण्यापेक्षा स्वतःचा व्यासंग अभ्यास वाढवावा. कुणी असे लेख कॉपी केले तर आता वाचकांनीच जागृत व्हावे आणि सगळ्यांच्या निदर्शनास आणावेत म्हणजे हे प्रकार थांबतील.

पूर्वीच्या काळी विवाहाचे वय अगदी 9 वर्षे होते पण आज त्या वयाने 35 – 40 सुद्धा पार केली आहे. विवाह आणि वैवाहिक सौख्य ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत . आज विवाहाला विलंब का होत असावा ह्याचे ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून कारण समजून घेण्याचा प्रयत्न करुया .

आपल्याला एक सहचारिणी असावी , विवाह करावा असा विचार मनात ज्या वेळी येतो ,  म्हणजे व्यक्ती वैचारिक , मानसिक , आर्थिक , लैंगिक सर्वार्थाने परिपक्व असते , तो क्षण खरा विवाहाचा असतो असे म्हंटले तर वावगे ठरू नये. आपल्याला समोरचा त्याची मुलगी देयील का ? हा प्रश्न आपणच आपल्याला विचारला तर उत्तर मिळेल . विवाह सगळ्यांचे होतात पण टिकतात किती जणांचे हा विचार मंथनाचा विषय आहे. अनेकदा मुलांपेक्षा पालकांना आपल्या अपत्याच्या विवाहाची काळजी आणि नको तितकी घाई असते त्याला अनेक सामाजिक कारणे सुद्धा आहेत आणि त्यांच्या दृष्टीने ती पटण्यासारखी सुद्धा आहेत . 

विवाह हा घाईत उरकून टाकण्याचा विषय नाही कारण हे नाते आयुष्यभर निभवायचे आहे . मुळात मी सर्वार्थाने विवाहाला योग्य आहे हे सांगणारा चंद्र पत्रिकेत उत्तम हवा. शेवटी प्रपंच त्याला मनापासून करायचा आहे म्हणजेच चंद्राची साथ हवीच .चंद्र म्हणजे मन आपले आणि समोरच्याचे सुद्धा ते समजून अर्थात आपल्या पती /पत्नीचे मन समजून घेण्याची क्षमता असली पाहिजे . वैचारिक देवाण घेवाण जमली पाहिजे . हे सर्व मनाशी निगडीत आहे. वैवाहिक सुख म्हंटले कि शुक्र आलाच . दोघांच्यातील प्रणय फुलवणारा आणि नैसर्गिक ओढ निर्माण करणारा, जगवणारा आणि जगायला लावणारा  ग्रह म्हणजे शुक्र . आज आपल्या पत्नीला बरे नाही तेव्हा बाजारहाट करून लवकर घरी गेले पाहिजे हि भावना कुणी सांगून येत नाही, ती मनात आपणहून आली तर हाच खरा संसार आणि ह्याचे बीज मनात कधी रुजेल जेव्हा चंद्र शुक्र उत्तम असतील तेव्हा. नुसते शारीरिक आकर्षण उपयोगाचे नाही कारण कालांतराने ते विरून जाणार आहे, ते क्षणिक आहे पण मनाचे धागे एकमेकात गुंफून ती वीण किती घट्ट होयील हे महत्वाचे .

मनाचे बंध जुळायला भावना लागतात आणि त्या जल तत्वाशी निगडीत असतात . एकमेकांबद्दल च्या भावना आणि आदर , प्रेम अलगद उलगडत गेल्या तर संसार खुलत जातो .आकर्षण उपयोगाचे नाही कारण ते अळवावरचे पाणी आहे. म्हणूनच चंद्र शुक्रासारखे अपर सौंदर्य आणि भावना असणारे ग्रह महत्वाचे आहेत .

विवाहाचे मुख्य स्थान सप्तम भाव . म्हणून सप्तम भाव आणि सप्तमेश सुद्धा महत्वाची कामगिरी बजावतो . ह्या भावावर , किंवा सप्तमेश , चंद्रावर शनीची दृष्टी असेल तर विवाहाला विलंब होयील कारण कुठल्याही गोष्टीला विलंब करणे हा शनीचा मुळ स्वभाव आहे. सप्तम , अष्टम भावातील मंगळ ( स्वराशीचा , शुक्राच्या राशीतील नसेल तर ) तसेच शुक्राचे शानिसोबत असणारे योग तपासावे लागतात . कन्या राशीतील , कन्या नवमांश , मकर राशी मकर नवमांश शुक्र वैवाहिक सौख्यात बाधा आणतो. शुक्र हा आकर्षण दाखवतो त्यामुळे पत्रिकेत शुक्र बलवान असेल तर लवकर वयात विवाह होवून वैवाहिक सुख प्राप्त होते .

शनी हा विलंब करतोच पण अनेकदा मंगळ सुद्धा 28 नंतर विवाह देतो . पितृदोष असेल तरीही विवाहास उशीर होतो . सप्तमेश किंवा सप्तम भावावर असलेली एकापेक्षा अनेक पापग्रहांची दृष्टी , प्रथम , सप्तम भावातून होणारा शनी मंगळ प्रतियोग , शुक्र हर्शल प्रतियोग तसेच लग्न भावातील हर्शल , राहू वक्री शनी हे विवाहातील अडथळे आहेत . सप्तम भावात ठाण मांडून बसलेले पापग्रह सुद्धा विवाहास उशीर किंवा अडथळे आणतात .

अतिशय महत्वाचा मुद्दा लक्ष्यात घ्या तो असा कि जोवर विवाहाचा योग येत नाही तोपर्यंत पत्रिका न जुळणे , आपला होकार असेल पण समोरच्याकडून नकार असेल. गोत्र नाडी काहीतरी प्रश्न उपस्थित होतात , दोघांच्या उंचीत फरक , आर्थिक बाबी म्हणजे पगार मिळकत मनासारखी नाही म्हणून तोलामोलाचे स्थळ नाही , मुलाला मुलगी आवडते पण पत्रिका जुळत नाही म्हणून घरचे नको म्हणतात  अशी अनेक कारणे पुढे येतात तेव्हा समजावे कि विवाहाचा प्रबळ योग अजून आलेला नाही. पण जेव्हा हा योग येतो तेव्हा सर्वकाही क्षणात जुळून येते . म्हणूनच पत्रिकेत “ योग “महत्वाचा असतो. विवाह ठरला तर तो होणार कधी ? घटना घडणार कधी तर अर्थात तो अधिकार दशा स्वामीचा असतो . पूरक अंतर्दशेत आणि विदशेत विवाह संपन्न होतो. 

अनेकदा विवाहाचा योग ३२ वर्षात असतो आणि २५ वर्षापासून स्थळे शोधायला सुरवात केली तर ३२ पर्यंत मन निराश होते. मुलांना सुद्धा नैराश्य येवू शकते म्हणूनच पत्रिका दाखवून सर्वप्रथम हा योग कधी आहे ते जाणून घ्यावे असे वाटते. नाहीतर मुलामुलींच्या मनात नैराश्य येते त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो , आपल्यातच काहीतरी वैगुण्य आहे कि काय असे वाटू लागते आणि मानसिकता बिघडते . 

विवाह हा १६ सोळा संस्कातील मुख्य संस्कार तो योग्य होण्यासाठी शेवटी उत्तम “ योगाची “ वाट पहावीच लागते .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230