Thursday, 5 September 2024

तुज मागतो मी आता

 || श्री स्वामी समर्थ ||

भाद्रपद मनावर दस्तक देतो आणि वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाचे , कधी एकदा डोळेभरून त्याला पाहतो असे प्रत्येकाला झालेले असते .  ह्या विघ्नहर्त्याच्या आगमनाची ओढ चराचर सृष्टीला लागलेली असते .  आपले गणपती बाप्पा माझ्या बालपणीच्या स्मृती नेहमीच जागृत करतात . आम्ही लहान असताना तर अगदी घराघरात गणपतीची प्रतिष्ठापना होत असे. आम्ही बाळगोपाळ मंडळीही खूप होतो पण जिथे आवडीचे प्रसाद तिथे आमचा मोर्च्या आवडीने जायचा . आरत्या पाठ नसायच्या मग त्यावरून ओरडा आणि धपाटे सुद्धा मिळायचे.

आज रस्त्यावरून फेरफटका मारताना मूर्तिकार गणपतीच्या सुंदर मूर्तीं साकारताना दिसत आहेत . ज्यांना हि कला अवगत आहे त्यांच्यावर ह्या सिद्धिविनायकाची केव्हडी कृपा असेल हा विचार मनाला नकळत स्पर्शून जातो.

दर वर्षी आपल्याला बाप्पा भेटायला येतात . कोकणात आपल्या घरी जाण्यासाठी ट्रेन , बस जे मिळेल त्यांनी जाण्यासाठी भाविक उत्सुक असतात . कोकणातील आणि शहरातील गणेश उत्सवाचे  चित्र अर्थात थोडे वेगळे असतेच . गणेश चतुर्थीच्या निम्मित्ताने शाळांना सुट्टी असते त्यामुळे मुलेही बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत हातभार लावतात . प्रत्येक जण देहभान विसरून गणेशमय झाल्याने हा उत्सव नसून त्याला सोहळ्याचे स्वरूप येते .

गणपतीची प्रतिष्ठापना , त्याची षोडशोपचारे केलेली पूजा आणि नेवैद्य घरातील वातावरणाला चारचांद लावतात. तनमन अर्पण करून त्याची मनोभावे पूजा केली तर तो आपल्याला चांगली बुद्धी देतो असे आजी लहानपणी गोष्टी सांगताना म्हणायची . बाप्पाला हात जोडले कि मगच अभ्यास येतो आणि मार्क चांगले मिळतात हे सांगताना कुठेतरी श्री गणेश हे आपले दैवत आहे आणि त्याचे पूजन आयुष्य बदलून टाकते हेच बाळकडू पाजले जात असे.

आधुनिक काळात ह्या उत्सवाचे स्वरूप बदलत चालले आहे . टिळकांनी समाजातील सर्व घटकांनी एकत्र यावे आणि एकजूट वाढावी म्हणून गणेशोत्सव सुरु केला पण त्याचा मूळ उद्देश आज लोप पावलाय हि वस्तुस्थिती आहे. आजचा गणेशोत्सव म्हणजे मोठमोठे मांडव , कर्कश्य वाजणारे संगीत , हिडीस नाचगाणी , पैशाचा अपव्यय , मानहानी , मोठेपणा आणि बरच काही आहे.

सिद्धीविनायकाचा महिमा खरच आपल्याला समजलाय का? प्रत्येक शुभ कार्याची सुरवात आपण श्री गणेशा पासून करतो अगदी प्रत्येक वेळी “ श्री गणेश “ लिहून आरंभ करतो . गणेशाची आराधना आपले आयुष्य समृद्ध करते , आपल्याला चांगली बुद्धी देवून कुशाग्र बनवते आणि म्हणूनच लहान मुलांवर आपण गणपती स्तोत्र , गणेश वंदना , अथर्व शीर्ष म्हणण्याचे धडे गिरवायला सांगून हिंदू संस्कृतीचे जतन करतो . पण हे सर्व करत असताना त्याचा अर्थ समजून घेतो का? मुले घरात अथर्व शीर्ष म्हणतील आणि बाहेर जावून मिरवणुकीत नाचतील , मग काय समजले आपल्याला ह्या उत्सवाचे मोल आणि मर्म ? काळ बदलला आहे हो ह्या गोंडस संज्ञेखाली आपण काहीही चालवून घेत आहोत . इतके मोठे कर्कश लाउड स्पीकर , वेळप्रसंगी सरकारने घातलेले नियम मोडून सुद्धा चालू असतात . कुणी आजारी आहे , लहान मुले आहेत त्यानाही त्रास होतो आहे ह्याचे भान कुठे आहे ? ११ दिवस आपल्या मंडपात गुपचूप हे सर्व सहन करणाऱ्या मोरेश्वराला कधीतरी आपण विचारले का? बाबारे तुला हे सर्व आवडतंय का? तुला त्रास होतोय का? तुझ्या कानठळ्या बसतात का? अहो तो हे सर्व बघून मनात म्हणत असेल सर्व भक्तांना भेटायला आलोय खरा त्यांच्यासोबत जरा दोन शब्द निवांत बसून शिळोप्याच्या गप्पा मारीन पण कसले काय आता जाताना बहिरा नाही झालो  म्हणजे मिळवले.

टिळकांचा उद्देश सोडा आता तर ह्या उत्सवाचे हिडीस स्वरूप पाहून हा निव्वळ धंदा झालाय असेच वाटू लागले आहे. श्री गणेशावर प्रेम सर्वांचे सारखेच आहे मग सगळ्यांनी एकाच रांगेत दर्शन घ्या कि , गणेशाला काय आवडते , प्रार्थना , सुकून , भक्ती पण आजच्या उत्सवात खरच दिसते का ती आपल्याला? खरतर गणपती स्तोत्र शाळेच्या प्रार्थने बरोबर म्हंटले गेले पाहिजे निदान महाराष्ट्रात तरी . इतिहास भूगोल ह्यासोबत आपल्या संस्कृती ,आपल्या हिंदू देवदेवतांची माहिती आणि त्यांचा इतिहास , त्यांचे आपल्या हिंदू संस्कृतीत असणारे असामान्य महत्व ह्याची माहिती देणारे विशेष सत्र अगदी पहिली पासून सुरु केले पाहिजे .

मोरेश्वराचा हा उत्सव म्हणजे फक्त नाचगाणी , प्रसाद , मोठेपणा , पैशाचा अपव्यय नाही तर त्याहीपलीकडे खूप आहे हे लक्ष्यात ठेवले पाहिजे . त्याचे आपल्या आयुष्यातील आणि हृदयातील स्थान समजून घेतले पाहिजे . प्रत्येक मुलाला गणपती स्तोत्र , अथर्वशीर्ष यायला हवे , गणपती बुद्धीची  देवता आहे . आपली बुद्धी आज कुठे खर्च होत  आहे ? फाटक्या तोडक्या कपड्यात देहप्रदर्शन करण्यात ? . चोवीस तास मोबाईल मध्ये डोके खुपसून बसायचे, घरातील सकस अन्न सोडून बाहेर पिझ्झा बर्गर खात पाश्चिमात्य संस्कृतीचा पुरस्कार केल्यासारखे वावरायचे हे आवडेल आपल्या गणरायाला . गेल्या वर्षी आलो होतो त्याही पेक्षा ह्या वर्षी अजूनच भयंकर स्थिती आहे आणि हे सर्व मी उघड्या डोळ्याने पाहत आहे असाच तर विचार बाप्पा आपल्या मनात करत नसेल ना? तो तुम्हाला खूप काही सांगण्याचा प्रयत्न करतोय पण ह्या कानठळ्या बसणाऱ्या आवाजात त्याचे शब्द आकाशातच विरून जात आहेत , ते आपल्यापर्यंत पोहोचताच नाहीत हे आपले दुर्दैव आहे.

बाप्पाचा उत्सव आहे मग त्याला काय आवडते ? त्याला काय हवे आहे ? आपल्याला काय सांगण्यासाठी तो ११ दिवसा आपल्यात आलाय ? त्याला कधी विचारायचे कष्ट घेतले का आपण  ? ह्या ११ दिवसात कधी त्याच्यासोबत त्याचा हात धरून मनातले बोललो ? संवाद साधला ? त्याच्या कडे निदान क्षणभर तरी मनापसून पाहिले ?नाही .  

सगळ्याचा बाजार मांडलाय आपण त्यात देवानाही सोडले नाही . सगळीकडे असे असतेच असे नाही . काही संस्कृतीत मंडळे आपली संस्कृती , परंपरा जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतात , कुठे मोदक करण्याच्या स्पर्धा तर कुठे अथर्वशीर्षाचे एकत्रित कार्यक्रम सुद्धा होतात , कुठे शाळेतील मुलांना वह्यांचे वाटप होते . फक्त त्याचे प्रमाण हवे तितके नाही , जे वाढले पाहिजे . पाश्चिमात्य संस्कृती अजिबात वाईट नाही त्यांच्याकडून घेण्यासारखी असंख्य गोष्टी आहेत जसे त्यांची शिस्त , स्वछ्यता , कष्ट पण आपण ते घेत नाही . घेतो तर काय पिझ्झा , बर्गर . मोदक म्हणायला लाज वाटते पण मोमोज म्हणायला अगदी proud feel होते .

इतक्यावर थांबत नाही , ज्याची आराधना गेले ११ दिवस केली त्याची पाठवणी करताना शुद्धीत नसतो आपण . गणेशाचे विसर्जन हा सुद्धा मानाचा असतो , शास्त्रसुद्ध प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन होणे आवश्यक असते नव्हे तो गजाननाचा हक्क आहे पण आपण त्याच्या मूर्तीवर विसर्जनासाठी चक्क पाय देवून नाचतो त्याला पायाखाली तुडवतो .हृदय चिरून टाकणारी हि दृश पाहता गेल्या अकरा दिवस केलेली भक्ती अश्रूंच्या रुपात डोळ्यातून वाहून जाते . पुढील वर्षी न येण्याचा निर्णय त्याने घेतला तर तो आपल्याला कितीला पडेल विचार करा ?

सृष्टीच्या निर्मात्याचे लक्ष आहे आपल्यावर आणि आपल्या प्रत्येक कर्मावर . त्याचे येणे आपल्याला ज्ञान , बुद्धी , समाधान देणारे आहे . आज आपले जीवन अनेक त्रासातून जात आहे पण ह्या गणेशोत्सवाच्या निम्मित्ताने ११ दिवस आपण आपले दुक्ख विसरतो , आपल्या आप्तेष्टांना भेटतो , त्याच्या सेवेत राहतो पण ती सेवा करताना खरा शुद्ध भाव अपेक्षित आहे , ह्या हिडीस , किळसवाण्या प्रकारांची खरच गरज आहे का?

खरे सांगा किती जणांना गणेशाची सगळी नावे पाठ आहेत ?  नुसते म्हणायचे म्हणून स्तोत्र म्हंटली तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही . इतके उत्सव आले आणि गेले पुढेही होत राहतील पण ह्यात आपण किती बदललो , मला काय मिळाले ? मी विचारांनी किती प्रगल्भ झालो ? मी समाजाला काय दिले आणि माझ्या लाडक्या बाप्पाच्या चरणाशी मी काय अर्पण केले ? हे प्रश्न स्वतःलाच विचार बघा उत्तरे मिळतात का?

आम्हाला तो दर वर्षी बुद्धीच देतो पण कसली ? लहान मुले पळवून विकण्याची ? स्त्रिया आज खरच सुरक्षित आहेत ? स्त्रियांवरचे अतिप्रसंग रोज घडतात , वृद्धाश्रमांचे प्रमाण आज वाढले आहे , तिथे चक्क वेटिंग असते , व्यसनाधीनता , आजार ह्यांचेही प्रमाण वाढत आहे . विवाह संस्था आणि एकंदरीत सामाजिक स्थिती कोलमडत चालली आहे. हे सर्व बघून बाप्पा सुद्धा मनात खिन्न होत असावा . आपल्याला तो देत असणार्या सुबुद्धीचा उपयोग करून आपले आणि सर्वांचे आयुष्य मार्गस्थ करण्याची जबाबदारी आपल्यातील प्रत्येकाची आहे. चला तर मग सुरवात करूया स्वतःपासून .

भारतीय संस्कृती चा आपल्याला नक्कीच अभिमान आहे आणि सप्त खंडात  त्याचा जयघोष सुद्धा आहे .  आपल्या देवदेवतांचा जीवन जगण्यासाठी आधार आहे. हा वारसा आपल्याला पुढील पिढीकडे देताना , आपल्या संस्कृतीत असलेल्या सर्व गोष्टींचा अर्थ त्यांना समजला तर ते अधिक मनापासून करतील. हे ११ दिवस केलेली उपासना पूर्ण वर्ष आपल्याला सांभाळणार आहे .

आज धकाधकीच्या जीवनात मनुष्याला नोकर्या , घर इतके प्रश्न समोर उभे आहेत , त्यातून मार्ग काढण्यासाठी मिळणारी शक्ती आणि बुद्धी आपल्याला बाप्पाच देणार आहे.

येणारा गणेश उत्सव सर्वाना सकारात्मकतेचा , सद्बुद्धी प्रदान करणारा , एका उत्तम आयुष्याकडे वाटचाल करणारा , प्रापंचिक अडचणीतू मार्ग दाखवणारा आणि भक्तिमार्गा  कडे नेणारा ठरावा .  आधुनिकतेच्या नावाखाली बदललेले उत्सवांचे स्वरूप आपल्या विचारांचेच प्रतिबिंब आहे , जे बदलणे गरजेचे आहे तुमच्या आमच्या आणि संपूर्ण मानवजातीसाठी .

तुझ्याच प्रेरणेने हे लेखन केले आहे, काही कमी अधिक असल्यास पोटात घे आणि सर्वाना समाधान , सद्बुद्धी आणि आनंद दे.

श्री स्वामी समर्थ

सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Tuesday, 3 September 2024

सोळा आणे खरी भक्ती

|| श्री स्वामी समर्थ ||


आज सकाळी फुले आणायला गेले होते . एका मुलाकडे त्याच्या टोपलीत मस्त चाफा होता . फुले घेतल्यावर सहज त्याला विचारले कि हि सगळी फुले उद्यापर्यंत  टिकणार नाहीत मग आज सगळी विकली गेली नाही तर काय करता ? त्यावर त्याचे चमकणारे डोळे बोलू लागले. “ ताई , मी जेव्हा फुले विकत घेतो तेव्हाच मनात विचार करतो कि हि सर्व फुले कुठल्या तरी देवाच्या चरणावर वाहिली जाणार आहेत आणि त्याच विचारांनी फुले विकायला बसतो. संध्याकाळ पर्यंत विकली जातात फुले  “ आई शपथ्थ किती विश्वास आहे ह्याच्या मनात , देवावर संपूर्ण श्रद्धा . हे सांगताना त्याच्या डोळ्यात विलक्षण चमक आणि रोमारोमात , देहबोलीत सकारात्मकता होती . काय जबरदस्त विश्वास त्या मुलाकडे होता तो पाहून मी स्तंभित झाले. प्रचंड विश्वास आणि भक्तीची परिसीमा आहे हि . नाहीतर आपण ,इतक्या सुखात , ऐशो आरामात राहतो पण लहान सहान गोष्टीत चिंता करतो , डिप्रेशन सारखे मोठ मोठे शब्द वापरून आपल्या अगदी चिमुकल्या संकटाना सुद्धा मोठे रूप देतो , अगदी राईचा पर्वत करतो. आपली करावी तितकी कीव कमीच आहे. 


आज हा चिमुकला मला विठू रायाच भासला .  सगळे अध्यात्म एका शब्दात शिकवून गेला. महाराजांच्या सेवेत आणि त्यांना समजण्यात लेका सगळ्यांना मागे टाकलेस तू असे म्हंटले तर वावगे होणार नाही कारण त्याला देव समजलाय . संध्याकाळपर्यंत एकही फुल उरणार नाही ,अगदी त्याच प्रमाणे महाराजांच्या सेवेत राहिल्याने माझ्या दुक्ख संकटांची होळी होणारच हा विश्वास आपल्या का नाही मनात येत ? येणार हे वाचून आजपासून माझ्या सकट सगळ्यांच्या मनात येणार आणि त्या विश्वासानेच मी ह्या चार ओळी लिहिते आहे. 


हातावर पोट घेवून जगणारा हा चिमुकला मला “ जगायचे कसे ??? “ हेच शिकवून गेला . त्याला माझा सलाम आहे.

गणपती बाप्पा मोरया....

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


सुखी सहजीवनाची ग्रहस्थिती

 || श्री स्वामी समर्थ ||


विवाह कधी होईल ,जोडीदार कसा असेल ह्या सर्व प्रश्नांपेक्षा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे माझे वैवाहिक सौख्य कसे असेल हा आहे . विवाहाच्या वेळेची स्थिती सर्वार्थाने तीच कशी राहील ? ती बदलत राहणार . आयुष्यात अनेक वळणे येणार आणि त्यातूनच एकमेकांना सावरत पुढे जात राहणार . बर्याच लोकांना उत्तम वैवाहिक सौख्य लाभते तर काहीना ह्यातून दुक्ख आणि निराशा पदरी येते. तडजोड करत विवाह टिकवणार्या लोकांची संख्या हि अधिक आहे. वैवाहिक सौख्य बघताना खालील गोष्टींचा विचार करुया.

विवाह हा अनेक कारणांनी केला जातो . अनेकदा सगळे करतात म्हणून , घरच्यांनी आग्रह केला म्हणून , मला स्वतःलाही जोडीदार हवा , सहजीवन हवे संसाराची आवड आहे म्हणून , अनेकदा घरात आईवडील वयस्कर आहेत त्यानाही बघायला कुणी नाही . पत्नी निवर्तली मग मुलांना कोण पाहणार म्हणूनही विवाह केला जातो . वरील सर्व कारणे ह्या ना त्या प्रकारे पटणारी आहेत . 

ज्योतिषीय ग्रहस्थितीचा विचार केला तर शुभ ग्रहांचा धन भाव आणि सप्तम भाव तसेच पंचम लाभ ह्या भावांवर असलेला प्रभाव सुखी जीवनाकडे वाटचाल करण्यास मदत करेल हे नक्की. सप्तम भाव हा प्रामुख्याने आपल्या जोडीदाराचा आणि दोघात असलेल्या मानसिक अनुबंधाचा आहे तिथे शनी मंगल राहू केतू उपयोगाचे नाहीत . तिथे चंद्र शुक्रासारखे सौम्य आणि ज्ल्तात्वाचे रसिक ग्रहच हवेत तरच संसाराची वेल बहरेल. 

अभ्यासकांनी खालील ग्रहस्थितीचा पत्रिका मिलनासाठी अवश्य अभ्यास करावा .


सप्तमस्थान – पापकर्तरी योगात आहे का ,कुठल्या ग्रहांच्या दृष्ट्या आहेत .

सप्तम स्थानातील ग्रह –ते कुठल्या ग्रहांच्या युतीत आहेत आणि कुणाच्या नक्षत्रात आहेत .सप्तमेश कुठे आहे आणि कुणाच्या दृष्टीत युतीत आहे. 

विवाहाचा कारक ग्रह शुक्र सगळ्यात महत्वाचा आहे . त्याची स्थिती लग्न कुंडली आणि नवमांश कुंडलीत अत्यंत महत्वाची आहे.

लग्न भाव आणि लग्नेशाची स्थिती अभ्यासा. लग्नेश आणि सप्तमेशाचे काय योग आहेत ते तपासा. 

सप्तम स्थानातील ग्रहांचे सप्तमेशाशी ,शुक्राशी आणि इतर ग्रहांशी होणारे योग.

पत्रिकेतील रवी चंद्र मंगल आणि शुक्र त्यांचे परस्परांशी योग आणि सप्तमेशाशी योग महत्वाचे आहेत .

सप्तम स्थानासोबर लग्नस्थान कारण ते सप्तमाचे सप्तम आहे, धनस्थान जे कुटुंब स्थान आहे. षष्ठ स्थान हे सप्तमाचे व्ययस्थान आहे आणि व्यय स्थान जे सप्तम स्थानाचे षष्ठ स्थान आहे.

थोडक्यात १ २ ६ ७ ८ आणि १२ ह्या स्थानांचा विचार आवश्यक आहे. २ ६ ८ १२ ह्या स्थानांमध्ये जर पापग्रह असतील तर वैवाहिक सौख्य चांगले मिळत नाही . 

स्त्रियांच्या पत्रिकेत रवी मंगळ तसेच पुरुषाच्या पत्रिकेत चंद्र शुक्र ह्यांचा अभ्यास केला पाहिजे . नवमांश पत्रिकेत ग्रहांचे बळ बघा त्याशिवाय निष्कर्ष काढू नका .

पत्रिकेतील इतर ग्रहस्थिती जसे पितृदोष ,कालसर्पदोष , वैधृती योग, विष्टीकरण.

सप्तमस्थान हे शुभ कर्तरी योगात असेल तर उत्तम . सप्तम स्थान जितके शुभ तितके संसार सुख आणि सहजीवन उत्तम .

सप्तम स्थानात चंद्र ,शुक्र हे  स्त्रीग्रह बलवान राशीत किंवा शुभ नक्षत्रात असतील.

सप्तमेश शुभ स्थितीत असेल ,लग्नात ,चतुर्थात ,पंचमात , सप्तमात , नवमात ,दशमात किंवा लाभात , स्व किंवा उच्च नवमांशात ,शुभ नक्षत्रात , मित्र ग्रहांच्या युतीत , दृष्टीत असेल तसेच सप्तमेश मार्गी असेल  तर वैवाहिक सौख्य चांगले मिळते . अश्या स्थितीत सप्तमेश हा बलवान होतो . 


सप्तमेशावर ,सप्तम स्थानावर ,शुक्रावर गुरूची दृष्टी असेल तर वैवाहिक सौख्य चांगले मिळते. 

लग्नेश आणि सप्तमेशाचा जर नवपंचम योग , लाभ योग ,राशि परीवर्तन योग असेल आणि लग्नेश बलवान असेल तर वैवाहिक सौख्य चांगले मिळते.

सप्तमेश , लग्नेश ,शुक्र ह्यांच्यासोबत शनी राहू मंगळ ह्यांचे शुभ योग होत असतील तर वैवाहिक सौख्यात अडचणी येत नाहीत.

२ ४ ६ ८ १२ ह्या स्थानात जर शुभ ग्रह असतील किंवा पाप ग्रह फारसे नसतील तर वैवाहिक सौख्य चांगले मिळते .

विवाह वेदीवर चढताना आपला हा विवाह हे आयुष्यातील सर्वोत्तम सुख आहे आणि काहीही झाले तरी मी ते टिकवणार हा दृढ निश्चय मनाशी करून विवाह केला तर समस्या येतील आणि जातील,  मार्ग मिळेल आणि संसाराची घडी सुद्धा निट बसेल. आयुष्यात सहजीवन महत्वाचे आहे . दोघेजण नुसते भाजी कोथिंबीर घ्यायला एकत्र गेले तर त्यात आनंद आहे कारण एकच “ ती दोघे एकत्र आहेत “ . सहवास सगळ्यात महत्वाचा आहे. बोलायला भांडायला सुद्धा आपलेच माणूस लागते . फार ताणून धरू नका. चिकित्सक वृत्ती शेवटी आपल्यालाच एकटे ठेवते . सर्व गुण संपन्न इथे कुणीही  नाही. प्रत्येक आईवडिलांनी एकदा आपल्या पाल्याला त्याचा चेहरा आरशात बघायला सांगावा त्यांची उत्तरे त्यांनाच आपसूक मिळतील.

सहजीवनाचा आनंद सर्वात मोठा आहे आणि त्यासाठी थोडी तडजोड करण्याची वृत्तीही असावी , नाहीतर हे सर्व इथेच राहील वास्तवात कधीच उतरणार नाही. सर्वाना आपापल्या पसंतीचा जोडीदार मिळूदे आणि सर्वांचे सहजीवन स्वामींच्या कृपेने बहरत , फुलत राहूदे हीच सदिछ्या .

सौ. अस्मिता दिक्षित

संपर्क : 8104639230






Monday, 2 September 2024

“ Click “ झालेल्या जोडीदाराकडून नेमक्या अपेक्षा काय ?

 || श्री स्वामी समर्थ ||

आज लग्न हा यक्षप्रश्न झालेला आहे. आपल्या मुलांच्या डोक्यावर अक्षता कधी पडतील ह्याची अक्षरशः चातकासारखी वाट पालक बघताना दिसत आहेत . सुस्वरूप आहे , निर्व्यसनी आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत मग घोडे अडतंय तरी कुठे ह्यामुळे पालक सुद्धा त्रस्त झालेले आहेत . “ काय ठरले का मुलाचे / मुलीचे लग्न ? “ हा प्रश्न मनापासून असो अथवा खवचट पणे विचारला गेलेला असो , तो विचारणे आता बंद झाले पाहिजे . काय आहे तुमच्या भावना कितीही चांगल्या असतील पण घेणारा आता ह्या प्रश्नांनी सुद्धा त्रासला आहे. विवाह ठरला कि तुम्हाला नक्की बोलावणार मग कश्याला विचारायचे? ह्यावर विचार नक्की करा .

अनेकदा मुलगा / मुलगी मला click म्हणजे पसंत पडत नाही म्हणून स्थळ नाकारले जाते. आजकाल तर फोन उचलत नाहीत , नकाराची साधी कारण सांगत नाहीत अशी अनेकविध कारणे सुद्धा ऐकायला मिळतात . त्याला मुलगी आवडायला हवी असे जेव्हा पालक म्हणतात त्याच वेळी लक्ष्यात येते कि स्थळाच्या पसंतीत पालकांचा सहभाग किंवा त्यांचे मत हे किती अंशी असणार आहे. आज विवाहाची वये पाहता हि पिढी संपूर्णतः अविवाहित राहणार कि काय अशी भीती वाटू लागलेली आहे. असो. 

आपल्याला “ click” झालेली मुलगी म्हणजे नेमके काय ? तिचे दिसणे , हसणे अर्थात बाह्य रूप . ती जरा सर्वसाधरण आहे कि modern लूक ची आहे ? थोडक्यात तिची देहबोली आणि रंगरूप . जो चेहरा रोज आयुष्यभर पाहायचा तो आपल्या पसंतीचा हवा हे नक्की पण फक्त दिसणे , हसणे , कपडे आणि so called modern look हाच पसंतीचा जर निकष असेल तर मात्र आपला निर्णय चुकू शकतो कारण आपण व्यक्तीचे गुण पहिलेच नाहीत फक्त बाह्यरुपावर निर्णय घेवू पाहत आहोत . रंग रूप शाश्वत नाही. पसंत पडलेले स्थळ अगदीच प्रथम दर्शनी नाहीच आवडले कि मुलगी खूप जाडी आहे आपल्या व्यक्तिमत्वाला शोभणार नाही तर तिथेच थांबा . पण इतर वेळी मुलीला / मुलाला भेटा. एकमेकांचे विचार जाणून घ्या . समोरच्या व्यक्तीचे अनेक चांगले पेहलू जे संसार करण्यासाठी उपयुक्त ठरतील ते त्या भेटीत उलगडतील आणि एक चांगले स्थळ आपण नाकारले नाही याची खंत वाटणार नाही . 


प्रत्येक्ष भेट महत्वाची आहे. लहान सहान गोष्टीत सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी समजतात . आजकालची मुले मुली तितकी समंजस नक्कीच आहेत . पण त्यात आता थोडे पालकांनी त्यांचे मत सुद्धा मांडले पाहिजे , आपल्या मुलांचे हित त्यानाही समजते . दर दोन दिवसांनी मुले स्थळे नाकारत आहेत तर ती का? हाही अभ्यासाचा विषय बनला आहे आज पालकांसाठी .

आर्थिक म्हणजे मिळकत हा विषय सुद्धा तितकाच महत्वाचा आहे कारण तो नेहमी तसाच राहणार नाही वाढतच जाणार आहे. पण त्याच सोबत आपले वय सुद्धा वाढणार आहे हेही विसरता उपयोगी नाही . आपल्याला आयुष्यात हौसमौज करण्याची , फिरण्याची , मजा करण्याची सगळे उमेदीची वर्ष निघून जात आहेत त्याचाही विचार केला पाहिजे . आपापले so called attitude बाजूला ठेवले तर अनेक विवाह असेच जुळून येतील .विचार करा पालक आणि पाल्यांनी सुद्धा. 


ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातून गुणमिलन , ग्रहमिलन केले तर संसारिक आयुष्याची दिशा नेमकी काय ती ठरवता येयील. हे शास्त्र तुमच्या सदैव मदतीला आहे. पुढील चांगल्या वाईट गोष्टींचे सुतवाक्य करणारे हे शास्त्र तुम्हाला मार्गदर्शक ठरेल ह्यात वादच नाही .

आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी जसे बाळाचे नामकरण , मुंज , विवाह अश्या मंगल कार्यासाठी तसेच  घराचे वास्तु शांतीचे मुहूर्त ह्यासाठी आपण ज्योतिषाची मदत घेतो . पूर्वापार चालत आलेले गुणमिलन हे करतो पण आज काळाची गरज ओळखून ग्रहमिलन हे सुद्धा करायला पाहिजे . पूर्वी मुलगी नोकरी करते का ? हा प्रश्नच नव्हता कारण तेव्हा स्त्रिया चूल आणि मुल ह्यातच गुंतलेल्या होत्या , किबहुना त्यांच्याकडून तेच अपेक्षित होते . आजचे प्रगत युग आहे , वैचारिक स्वातंत्र  आहे .तरीही आजही आपल्या समाजाची पाळेमुळे हि रूढी आणि परंपरा मान्य करणारी असल्यामुळे बहुतेक विवाह हे पत्रिका बघूनच जुळवले जातात . शेवटी सर्व गोष्टी जुळून येणे म्हणजेच मनोमिलन होय .

गुण मिलनाचे निकष लावताना डोळसपणे लावले पाहिजेत कारण हे गुणमिलन आणि त्याचे नियम हे प्राचीन काळापासून आहेत जेव्हाची समाज व्यवस्था आणि काळ हा वेगळा होता . एक नाड दोष ह्यावरून स्थळे नाकारली जातात पण एक नाड असेल आणि नक्षत्राचे चरण वेगळे असेल तर तो दोष मानला जात नाही तसेच एक नाड असेल तर शास्त्रात त्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत त्या तपासून न बघता स्थळ नाकारू नये .

सर्वात मुख्य म्हणजे दोघांच्या सद्य स्थितीतील महादशा काय सांगत आहेत आणि पुढे येणाऱ्या सुद्धा बघितल्या पाहिजेत कारण शेवटी दशा महत्वाच्या आहेत त्याच प्रमाणे विवाह योग निर्माण करणारे गोचरीचे योग , त्यांना डावलून कसे चालेल. अनेक योग येतात आणि जातात पण जेव्हा अति प्रखर योग येतो तेव्हा विवाह ठरतो आणि होतो सुद्धा.

वैवाहिक सुख , एकंदरीत आयुष्यातील अर्थार्जन , संतती होणार का? आणि स्वतःचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य ह्या बाबी तपासण्यासाठी पत्रिकेचा अभ्यास उपयोगी पडतो . थोडक्यात सहजीवन कसे असेल ह्याचा वैयक्तिक अभ्यास करून मग ग्रह मिलन करावे . त्यात आपल्याला दोघाचेही विचार करण्याची वृत्ती आणि क्षमता समजते . मानसिक दुर्बलता किंवा सक्षमता हेही समजते तसेच एखाद्या समस्येशी दोन हात करण्याची वृत्ती , संसाराकडे असलेली ओढ दिसून येते म्हणून गुण मिलन अति अति महत्वाचे आहे . उद्या मुले झाली कि त्यांची आजारपणे आहेत त्यांचे संस्कार आहेत , शिक्षण आहे हे दोघांनीही पहिले पाहिजेत . स्त्रीने जन्म दिला म्हणून ती तिची एकटीची जबाबदारी नाही तर दोघानाही समान वाटा सगळ्या प्रश्नात असायला हवा तो असणार आहे का ? प्रत्येक वेळेस मला काम आहे हे उत्तर चालणार नाही कारण काम तिलाही असते किबहुना काकणभर जास्तीच असते . ह्या सर्वाची मानसिकता दोघांच्या भेटीत समजेल पण पत्रीकेतील ग्रह  बोलतील तेव्हा अनेक गोष्टी अधिक सुस्पष्ट होतील.

एखादा मुलगा जर खूप करिअर करणारा असेल व्यवसायात बुडून गेलेला असेल तर तो बायकोच्या मागे पिंगा घालणार नाही  आणि तिची नेमकी तीच अपेक्षा असेल म्हणजे नवर्याने गजरा आणावा वगैरे मानसिक दृष्टीने तिला तसे वाटते पण ते तर त्याच्याकडून पूर्ण होत नसेल तर मग दोघांच्यात एक मानसिक दरी निर्माण होते आणि काही काळाने ती मोठी होत जाते. अर्थात गजरा आणणे हेच प्रेमाचे द्योतक नाही पण मानसिक दृष्टीने पहिले तर अनेकदा स्त्रिया तेच तेच धरूनही ठेवतात . त्यामुळे दोघांच्यात प्रत्येक गोष्टीत असणारा समंजस पणा कित्येकदा संसारात पदोपदी असायला लागतो कारण संसार शेवटी त्या दोघांचाच असतो . स्वतःच्याकडून पत्नीकडून असलेल्या अपेक्षा तसेच आपल्या आयुष्यातील प्राधन्य असणार्या गोष्टी करिअर पैसा सर्व गोष्टी मोकळेपणाने उघड बोलल्या गेल्या पाहिजेत .

म्हणूनच आजकाल “ click  “ झालेले स्थळ हे सर्वार्थाने “  click “ होण्यासाठी वरती नमूद केलेले सर्व परामर्श तपासले पाहिजेत आणि त्यात बहुतांशी अपेक्षा ( सगळ्या पूर्ण होणार नाहीत कारण आपणही परिपूर्ण नाही ) पूर्ण झाल्या तर स्थळ खर्या अर्थाने “ click “ होईल. 

मुळात विवाह करण्याची मानसिकता तयार व्हावी लागते कारण हि एक मोठी जबाबदारी सुद्धा आहे . विवाह उत्सुक सर्वाना खूप शुभेछ्या आणि त्यांचे विवाह लवकर जुळून यावेत ह्यासाठी महाराजांकडे अंतर्मनापासून प्रार्थना .

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230