Friday, 9 April 2021

व्यसनाधीनता (ज्योतिष शास्त्रीय दृष्टीकोण आणि सामाजिक ,कौटुंबिक बांधिलकी )

 ||श्री स्वामी समर्थ ||




माणसाचे मन मोठे विचित्र आहे. आपल्या मनासारख्या  घटना घडल्या कि मन आनंदी प्रफुल्लीत होते तर मनाविरुद्ध घटना घडल्या कि नैराश्य येते. सगळ्यांनाच मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक लावता येत नाही  . मनाचा समतोल ढळला आणि नैराश्येच्या गर्तेत माणूस सापडला कि तो व्यसनाकडे वळतो आणि आयुष्य बेचिराख होते, कुटुंबे उध्वस्त होतात. व्यसनांकडे वळण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत होताना दिसतात जसे घरातील कटकटी, वडील व्यसनाधीन असल्यामुळे कुटुंबात क्लेश ,भांडणे ह्याचा मुलांवर होणारा परिणाम , घरातील ताणतणाव , आर्थिक विवंचना , नोकरी नसल्यामुळे आलेले वैफल्य , प्रेमप्रकरणातील अपयश ,अपेक्षित यश न मिळणे , गृहसौख्य नसणे ई.

आज तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनांकडे वळताना दिसते काही अपवाद अर्थात आहेतच . जरा frustration आले कि दारूचा ग्लास आणि सिगरेट हातात आलीच म्हणून समजा . कोर्पोरेट क्षेत्रात आजकाल पार्टीमध्ये दारू पिणे हे गैर नसून त्याला काळाबरोबर चालणे म्हणजेच so called latest trend असे म्हंटले जाते. मित्रांसोबत दारू प्यायला गेले नाही कि तू अगदीच ओल्ड फ्याशन आहेस असे म्हंटले जाते . पण तरीही असे वाटते कि काळासोबत बदलावे पण एखाद्या प्रसंगापुरतेच ,प्रत्येक वेळी ह्या गोष्टीचा आधार घेवून व्यसनाधीन होऊ नये .

आज ह्याबाबत थोडेसे जाणून घेवूया .

सर्वात प्रथम आपले व्यक्तिमत्व आणि आपली विचारसरणी दर्शवणारे स्थान म्हणजे लग्नस्थान . लग्नेश ग्रह जर कमकुवत असेल किंवा  ६ ८ १२ ह्या त्रिक स्थानात असेल किंवा त्याच्यावर पापग्रहांचा प्रभाव असेल तर एखादे संकट आले तर त्यातून व्यक्तीला मार्ग सुचत नाही आणि पर्यायी आलेल्या नैराश्यामुळे ती व्यसनाकडे वळते .

लग्नेशा नंतर महत्वाचा ग्रह कुठला असेल तर तो आहे चंद . चंद्र्मः मनसो जातः .चंद्र हा मनाचा कारक आहे . आपल्या मनातील भावभावना चंद्रावरून समजतात . चंद्र जर पत्रिकेत बिघडला असेल तर व्यक्तीचा मनाचा समतोल राहत नाही . मनात सतत गोंधळ असतो , भावनांचा उद्रेक होतो . चंद्रासोबत जर राहू शनी मंगळ ह्यासारखे पाप ग्रह आले तर चंद्र बिघडतो .

व्यसनांचा मुख्य कारक राहू . हा भोग भोगायला लावणारा ग्रह आहे. राहू उघड्या डोळ्यांनी जग पाहत असतो . चंद्रासोबत राहूची युती हि मानसिकता बिघडवण्यासाठी प्रथम काम करताना दिसते. व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत राहूचा मोठा हात आहे असे दिसून येते .

शुक्र हा जलतत्वाचा ग्रह आहे आणि तो आपल्या आयुष्यातील रस निदर्शित करतो. शुक्र सुद्धा बिघडला . ७ किंवा १२ व्या स्थानी पापग्रहांच्या कुयोगातील शुक्र व्यसने देतो.

ह्या सर्वापासून आपल्याला परावृत्त करणारा ग्रह म्हणजे गुरु . पण तोही पत्रिकेत सुस्थितीत नसेल तर आपल्याला ह्या सर्वांपासून दूर जाणे दुरापास्त  होते.

द्वितीय भावावरून आपण सर्व रस बघतो तरी अष्टम भाव आणि त्यातील ग्रह सुद्धा तितकेच महत्वाचे योगदान करतात . द्वितीय भावाचा सखोल अभ्यास केला पाहिजे . महादशा स्वामी जर येन येन प्रकारे अष्टम भावाशी संबंधित असेल तर व्यक्ती व्यसनाच्या गर्तेत खोलवर जावू शकतो . ह्या स्थानातील ग्रह मुख्यत्वे राहू वृश्चिक राशीत असेल तर चांगला नाहीच .

पंचम स्थान हे मौजमजेचे स्थान आहे . तसेच ११ वे स्थान हे मित्रांचे ,सहकार्यांचे . संगती संग दोषेण हे म्हंटलेच आहे. कुसंगत आपल्याला व्यसनाकडे नेते.

पत्रिकेत चंद्र बिघडला असेल आणि लग्नी किंवा व्ययात नेपचून ,चंद्र   बिघडला असेल तरी व्यसने लागू शकतात . चंद्र राहूच्या नक्षत्रात किंवा राहूच्या युतीत राहूच्या नक्षत्रात असेल , धनेश नीच राशीत किंवा राहुसोबत असेल तर व्यसने लागण्याचा संभाव असतो .

पत्रिकेत लग्नेश शुक्र चंद्र राहुने बाधित असेल तर व्यसने लागण्याची शक्यता नाकारता येत नाही .

राहू वृश्चिकेत बिघडला असेल तर आणि त्यावर मंगळाची दृष्टी असेल, शुक्र राहू युती असेल आणि चंद्र बलहीन असेल  , शुक्र आपल्या नीच म्हणजे कन्या राशीत असेल आणि चंद्र बिघडला असेल तर व्यसनांकडे कल असतो.

हा झाला ज्योतिषीय दृष्टीकोन . ह्या व्यतिरिक्त रोजच्या जीवनात माणुसकीच्या नात्यातूनही डोळस पणाने आपण ह्यावर मात नक्कीच करू शकतो .

प्रत्येक वेळी तरुण पिढीला नावे ठेवून त्यांना जबाबदार धरणे चुकीचे ठरेल. आजकालची पिढी अत्यंत हुशार , समंजस, सक्षम आहे . आजचे युग हे स्पर्धात्मक असल्यामुळे महाविद्यालयातील प्रवेश , आपल्या गुणवत्तेनुसार मिळणारी चांगली नोकरी , कुटुंबात सामावून जायील अशी चांगली सहचारिणी , नोकरीतील so called ratrace , स्वतःचे घर होण्यासाठी आयुष्यभर फेडत बसायला लागणारे कर्जाचे डोंगर ह्या सर्वाना आजच्या पिढीला तोंड द्यायचे आहे आणि ह्या सर्वांसाठी घरातील मोठ्या मंडळीनी सुद्धा त्यांची मते थोडी बाजूला ठेवून ,स्वभावाला मुरड घालून घरात सगळ्या पिढ्या एकत्र कश्या नांदतील ते पहिले पाहिजे नव्हे ती आपली सगळ्यांची जबाबदारीच आहे .

आपली मानसिक जडण घडण होण्यात आपले कुटुंब आणि घर ह्याचा सिंहाचा  मोठा वाटा असतो . प्रत्येक घर हे अगदी चित्रातील सुखी कुटुंब होयीलच असे नाही ,ते तसे होणे अपेक्षितही नाही कारण कधीतरी भांड्याला भांडे हे लागणारच .पण घरातील कुठल्याही गोष्टीचा इतकाही विपर्यास होता उपयोगी नाही कि घरातील तरुण हतबल होवून नको त्या विळख्यात अडकतील आणि घरातील आनंद बाहेर शोधू लागतील. हि एकच बाजू आहे पण ह्याला अनेक कंगोरे आहेतच कि .घरातील प्रत्येकाने सामंजस्य दाखवत एकेक पाऊल पुढे टाकले पाहिजे . दुसर्याला दोष देण्यापेक्षा मी माझ्या घराला कुटुंबाला काय देवू शकतो हे पहिले पाहिजे. सर्वात पहिले घरातील आनंद , हसते  खेळते वातावरण कसे टिकवता येयील ते पहा .कौटुंबिक आधार माणसाला नेहमीच महत्वाचा असतो . आपल्या घरातील कुणी व्यसनाधीन असेल तर त्याला काही अंशी कुटुंब सुद्धा जबाबदार असू शकते ह्याचाही विचार केला पाहिजे आणि त्यात आवश्यक असणारा बदल सुद्धा झाला पाहिजे .

आजकाल ध्यान योगा म्हंटले कि हि म्हाताऱ्या माणसांची  कामे आहेत असा टोला मारला जातो . किबहुना आजची तरुण पिढी हि सर्वाधिक स्ट्रेस मध्ये असल्यामुळे प्रत्येकाने निदान अर्धा तास तरी स्वतःला वेळ दिला पाहिजे . एखादी समस्या निर्माण झाल्यावर उपाय करण्यापेक्षा ती होऊ नये ह्यासाठी प्रयत्नशील राहिले तर अधिक बरे नाही का. पूर्वीच्या काळी इतकी स्पर्धा नव्हती आणि मागील पिढीतील लोकांकडे संयम होता जो आता धूसर होताना दिसत आहे.

मनाविरुद्ध घटना प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी ना कधी घडतातच म्हणून लगेच कुणी व्यसनांकडे वळत नाही . प्रत्येकाने संयम ठेवून प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढायला शिकले पाहिजे , थोडे थांबून परिस्थिती बदलायची वाट बघितली पाहिजे कारण काळ आणि वेळ हेच सर्वावर उत्तम औषध असते.

उपासना , ध्यान धारणा आपल्याला मानसिक बळ देते , जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन देते , सहनशीलता देते, चंचल मनाला एकाग्रतेकडे  वळवते,  आपणच आपल्याला नव्याने उमगतो इतके अपरिमित फायदे आहेत म्हणूनच आज भारतीयच नाही तर जगभर योगा मेडीटेशन , ध्यानाचे महत्व लोकांना समजत आहे आणि रोज ह्या मार्गात येणाऱ्या आबालवृद्धांची संख्या वाढत आहे. 

आपला एखादा मित्र ह्या गर्तेत अडकला असेल तर त्याच्या जवळच्या  मित्रांनी माणुसकीच्या आणि मैत्रीच्या नात्याने  त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे . व्यसन हे कुठल्याही गोष्टीचे उत्तर असूच शकत नाही उलट त्यातून असंख्य नवे प्रश्न मात्र नक्कीच उभे राहतात . कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यसनाधीन असेल तर संपूर्ण कुटुंबाला त्याचे मानसिक आर्थिक सामाजिक परिणाम भोगावे लागतात पर्यायी त्यातील मुलेसुद्धा नको त्या गोष्टींचे अनुकरण करायला पुढे मागे बघत नाहीत . एकदा ह्या गर्तेत खोलवर मनुष्य गेला कि त्यातून बाहेर पडणे दुरापास्त होते , परतण्याच्या वाटाही धूसर होत जातात ,त्यामुळे ह्या मार्गावर आपण जाणारच नाही ह्याकडे लक्ष्य अधिक असणे गरजेचे आहे.

प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे नक्कीच आहे फक्त ते शांत डोक्याने शोधायचे आहे इतकेच .आपल्याला शोधता नाही आले तर इतरांची मदत घेवून पण शोधायचे हे नक्की . आयुष्य हे सुंदर आहे त्याचा खर्या अर्थाने आस्वाद घ्यायचा असेल तर मन खंबीर केले पाहिजे , नामस्मरण , थोडे अध्यात्म मन शांत ठेवायला मदत करते , निर्णयक्षमता वाढते आणि योग्य मार्गाने आयुष्य व्यतीत करण्याची प्रेरणा सुद्धा मिळते .

चला तर मग येत्या नवीन वर्षापासून संकल्प करुया . मी स्वतः सकारात्मक राहीन आणि इतरानाही करीन .आपल्या ओळखीत कुणी व्यसनाच्या आहारी गेले असेल तर त्याला मदतीचा हात देवून त्याला ह्यातून बाहेर काढणे हाच आपला नवीन वर्षाचा संकल्प असला पाहिजे . आयुष्यात निदान एकाला तरी आपण ह्या वाटेवर जाण्यापासून  परावृत्त केले तर ते खरच मोठे पुण्याचे काम ठरेल ,त्याने एक कुटुंब वाचेल आणि आपल्याला लाभेल ते आत्यंतिक समाधान . असे झाले तर एका नवीन समंजस कुटुंब व्यवस्थेची पुनर्रचना दूर नाही . आपण कुणावर उपकार करत नाही तर हि आपली सामाजिक बांधिलकी सुद्धा आहे. कारण आपले आप्तेष्ट , मित्र मंडळी , सगळेच सुखी तर आपणही सुखीच . पटतय का?

अस्मिता

लेख आवडला तर अभिप्राय द्यायला विसरू नका .

antarnad18@gmail.com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सामान्यातील “ असामान्य ”

|| श्री स्वामी समर्थ ||

श्री. उज्ज्वल पावले 


साल २०२० सुरु झाले आणि करोनाचे जगभरात थैमान सुरु झाले. कुणालाही न जुमानता त्याने आपल्या सर्वाना घरात बंदिस्त केले. इतका मोठा विश्वसंहार होईल असे वाटलेच नव्हते. नोकरी व्यवसाय, संपूर्ण अर्थचक्र जणू स्तब्ध झाले. अचानक आलेल्या ह्या संकटाने भांबावून गेलेल्या तुम्हा आम्हाला हे सर्व पचवणे खचितच सोपे नव्हते.

ह्या सर्वावर काळ हे एकच औषध होते हे खरे असले तरी हा काळ जाता जात नव्हता. प्रत्येकाच्या मनात नकारात्मक विचारांच्या लहरी अधिराज्य करू लागल्या होत्या. अशा ह्या काळात जेव्हा काहीच वेगळे घडणे अपेक्षित नव्हते तेव्हा झूम ॲपवरील “वेदचक्षु व्याख्यानमालेने” सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

प्रतिदिन वेगवेगळ्या विषयांवरील व्याख्याने घेवून येणारी ही संकल्पना जनमानसात काही काळातच प्रसिद्धीच्या शिखरावर गेली. दिवसातील २ तास तरी मनाला स्पर्शून जाणारे आणि त्यावर चिंतन मनन करायला लावणारे असंख्य विषय ही ह्या व्याख्यानमालेची खासियत होती.पुन्हा रुटीन सुरु होयीपर्यंत, मरगळ झटकून, मनाला पुन्हा उभारी देण्यात यशस्वी झाली. 

हा उपक्रम यशस्वीपणे राबवणारे आणि ह्या सर्वाचे करते करवते श्री. उज्ज्वल पावले ह्यांच्याशी ह्याबाबत दिलखुलास चर्चा करायला मिळणे हे मी माझे भाग्य समजते. आज माझ्या ब्लॉगवरील "मला भावलेले व्यक्तिमत्व" ह्या सदरात सरांविषयी लिहिताना अत्यानंद होत आहे. 

वेदांग ज्योतिष शास्त्रात "एम. ए." तसेच वास्तुसंबंधी पदवी प्राप्त केलेल्या उज्ज्वल सरांचे बालपण पैठण येथे गेले. संस्कृतीचा वारसा लाभलेल्या पैठण येथील अध्यात्मिक वातावरणाचा परिणाम त्यांच्या मनावर झाला आणि ह्या विषयाची गोडी,ओढ निर्माण झाली. पुढे काही काळ नोकरीच्या निम्मित्ताने त्यांचे मॉरिशस इथे वास्तव्य झाले. भारतात परतल्यावर त्यांनी एक वेगळी वाट निवडली.

लहानपणापासून गूढ शास्त्राबद्दल कुतूहल आणि आकर्षण असल्यामुळे ह्यातच सखोल अभ्यास करण्याचा त्यांनी मानस केला आणि अनुषंगाने ज्योतिष्यादी विषयांकरिता सहाय्यक असे सॉफ्टवेअर वितरक व विक्रेता म्हणून स्वत:चा व्यवसाय सुरू केला.

एखाद्याला हे सॉफ्टवेअर विकताना किंवा त्याबद्दल माहिती देताना आपल्यालाही त्या विषयाची सखोल माहिती असणे आवश्यक असते. ह्या जाणीवेने त्यांनी ज्योतिष शास्त्राचे शास्त्रशुद्ध धडे गिरवण्याचे ठरविले.

पूर्वसुकृत चांगले म्हणून त्यांना गुरुवर्य श्री.यशवंत मग्गीरवार, डॉ. सौ. चंद्रकला जोशी, श्री. रवींद्र रांजणीकर, डॉ. श्री विजय इंगळे, श्री विवेक दीक्षित, सौ. विद्या सांगवीकर, डॉ. श्री. रमेश परोपकारी, सौ. राजश्री मुंदडा, श्री. विश्वनाथ कावळे, सौ. चित्रा पांडे, डॉ. श्री. मधुकर कोनार्डे, डॉ. श्री वैभव देशमुख यांच्यासारख्या ज्योतिष शास्त्रातील विद्यमान व्यक्ती गुरूवर्य म्हणून लाभल्या आणि पुढे व्यासंग वाढत गेला. 

आज पूर्ण वेळ उज्ज्वल सर ह्याच क्षेत्रात काम करीत आहेत. अनेक क्षेत्रात कामे केली पण ह्या क्षेत्रातील काम मला मिळणाऱ्या पैशांपेक्षाही कितीतरी पटीने अधिक आनंद आणि समाधान देत आहे ह्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.

श्री. अतुलकुमार कुलकर्णी, श्री. अभयशास्त्री सोनवणे ह्या सहकाऱ्यांसोबत त्यांनी ह्या विषयावरील अनेक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.

कुठलेही काम करायचे तर अंतःकरणापासून! आणि द्यायचे तर भरभरून! हे तत्त्व त्यांनी कायम जोपासले. स्वतःला आणि इतरानांही त्यातून ज्ञानप्राप्ती आणि समाधान मिळेल ह्याकडे त्यांचा कटाक्ष कायम असतो.

लॉक डाऊनच्या काळात झूम च्या माध्यमातून सुरुवातीला सॉफ्टवेअरच्या डेमो करिता काम करण्याचे त्यांनी ठरविले. ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक असल्यामुळे बरेच वेळा उज्ज्वल सर व्याख्यान, अधिवेशनाला जात पण तेथील वक्त्यांना आपला विषय मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसे. हे त्यांच्या लक्षात आले. त्याची खंत त्यांना सतत होती. आपण ह्यासाठी काही करू शकतो का? अशा अनेक वक्त्यांना त्यांच्या विषयावर उत्स्फुर्तपणे बोलता यावे आणि विषयाचे इतरांना सखोल ज्ञान व्हावे या कल्पनेतून "वेदचक्षु व्याख्यानमाला" ह्या व्यासपीठाची निर्मिती झाली आणि एका वेगळ्याच पण अभूतपूर्व अशा पर्वाला सुरवात झाली. 

ॲडव्होकेट सौ. सुनिता पागे मॅडम यांच्या व्याख्यानाने ३ जून पासून सुरु झालेली ही व्याख्यानमाला १५ सप्टेंबरच्या गुरूवर्या श्री. श्रीराम भट यांच्या व्याख्यानापर्यंत अविरत सुरु राहिली. ह्या १०१ व्याख्यानांच्या संकल्प पूर्तीस अनेक थोरामोठ्यांचे आशिर्वाद लाभले, ज्योतिष शास्त्रातील अनेक नामवंत, दिग्ग्ज्ज मंडळींनी इथे हजेरी लावली. तसेच यामध्ये ज्योतिष शास्त्राची आवड असणाऱ्या हौशी आणि व्यासंगी अशा सर्वांनीच मोठ्या संखेने भरभरून प्रतिसाद दिला.

येथील संवाद, परिसंवाद, विचारांचे आदानप्रदान ह्यामुळे यात एक वेगळीच रंगत आली. सर्वप्रथम एका आठवड्याचे आयोजन करावे ह्या हेतूने सुरूवात केली होती. पण एकंदरीत मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे पुढे त्यात १०१ व्याख्यानांची पुष्पे कधी गुंफली गेली हे समजलेच नाही.

अल्पावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झालेल्या ह्या व्याख्यामालेने अनेक विक्रम मोडले आहेत. उद्या कुठल्या विषयावर व्याख्यान होणार ह्याची उत्कंठा रोज वाढत गेली. ह्या क्षेत्रातील अनेक उत्तम अभ्यासकांना त्यांचे विचार, त्यांनी केलेले संशोधन इतर अभ्यासकांपुढे मांडण्यासाठी ही सुवर्ण संधी होती आणि त्यांनी त्याचे अक्षरशः चीज केले. 

फल ज्योतिष, KP, अंकशास्त्र, अष्टकवर्ग, रमल शास्त्र, वास्तुशास्त्र इ. विषय इथे समाविष्ट झाले. पुढे लोकाग्रहास्तव ह्या विषयावरील प्रशिक्षण देण्यासाठी अनेक ऑनलाईन कार्यशाळाही झाल्या. ज्याला उदंड प्रतिसाद लाभला.

त्यांच्या या अभूतपूर्व कार्याची दखल घेत मराठी ज्योतिषी मंडळाने सर्वप्रथम त्यांना "ई-ज्योतिष प्रचारक" हा पुरस्कार जाहीर केला.

बृहन महाराष्ट्र ज्योतिषी मंडळ या संस्थेने "कार्यगौरव पुरस्कार" देऊन त्यांना सन्मानित केले.

तसेच २४ नोव्हेंबर, २०२० या त्यांच्या ५५ व्या वाढदिवशी सौ. मुग्धा सारंग रानडे यांच्या आदिशक्ती वास्तु ज्योतिष, नाशिक या संस्थेने "ज्योतिष कृतज्ञता मानपत्र" देऊन त्यांचा गौरव केला. याच दिवशी अथर्व ॲस्ट्रॉलॉजी ऑफिसचे संस्थापक श्री. अतुलकुमार कुलकर्णी, व श्री. अभयशास्त्री सोनवणे यांनी संयुक्तपणे "ज्योतिर्मयी ज्योतिषी" असे स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. श्री. सौरभ नाफडे, पुणे यांनी "विशेष रोख पारितोषिक" देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली.

२६ जानेवारी, २०२१ रोजी सेलिब्रिटी स्टार ॲस्ट्रॉलॉजर सौ. जयश्री बेलसरे यांनी " मानपत्र आणि रोख ₹४०००" चे विशेष पारितोषिक समारंभ पूर्वक देऊन त्यांच्या कार्याचा बहुमान केला.

ह्या यशाचे सर्व श्रेय उज्ज्वल सर आपल्या सर्व टिम ला देतात तसेच ज्यांनी ह्या व्याख्यानमालेला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत केली आणि ही संकल्पना पूर्तीस नेण्यासाठी अविश्रांत मेहनत केली त्या सर्वांचे ते मनापासून ऋणी आहेत. मी फक्त निमित्त आहे असे विनम्रपणे सांगताना ते पुढे म्हणाले की, संघटित होऊन कोणतेही काम अधिक चांगल्या रितीने परिपूर्ण होऊ शकते. 

विविध देशातून ह्या व्याख्यानमालेची लोकप्रियता वाढली असून अमेरिकेतूनही काही ऑनलाईन व्याख्यानं यशस्वीपणे आयोजित केली आहेत. त्यामुळे वेदचक्षु व्याख्यानमाला खऱ्या अर्थाने ग्लोबल झाली असून लोकांच्याही अपेक्षा खूप वाढल्या आहेत. अनेक स्वयंसेवक उत्स्फूर्तपणे आपले योगदान त्यात देत आहेत. सौ. मुग्धा सारंग रानडे, नाशिक, श्री. सौरभ नाफडे, पुणे, सौ. माया कोटीवाले, पुणे, सौ. सुषमा नलावडे, ठाणे यांचा उल्लेख आवर्जून त्यांनी केला. विषयाची निवड करणे त्यासाठी त्यातील तज्ञ वक्त्यांची निवड करून त्यांच्याशी संपर्क करणे, व्याख्यानाची तारीख, वेळ निश्चित करणे; एक ना दोन अशा अनेक गोष्टींची जुळवाजुळवी करणे खचितच सोपे नाही.पण वेदचक्षु च्या संपूर्ण टिमने उज्ज्वल सरांच्या नेतृत्वाखाली हे शिवधनुष्य लिलया पेलले आहे. ह्यासाठी त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

मंडळी, ह्यासाठी आपले पूर्वसुकृत सुद्धा तितकेच चांगले असावे लागते, चांगल्या विचारांना मूर्त स्वरूप मिळणे आणि ती संकल्पना प्रत्यक्षात उतरवायला लागणारी सक्षम टिम लाभणे हे देखील एक भाग्यच आहे नाही का?

वेदचक्षुचा मेडिकल, आयुर्वेद आणि इतरही तत्सम क्षेत्रे ह्या विषयावरील व्याख्यानांचे आयोजन करण्याचा मानस आहे हे सांगताना उज्ज्वल सर म्हणाले अनेकांकडून ह्यासाठी असंख्य सूचनाही येत आहेत, ह्या सर्वाचा विचार आम्ही निश्चितच करत आहोत.

मंडळी २०२० सालाने आपल्या आयुष्याला अगदी अनपेक्षित कलाटणी दिली. अनेकांनी आपले आप्तेष्ट गमावले. तर अनेकांनी आपल्या नोकऱ्या. उद्योगधंदे बंद झाले आणि अर्थचक्रच जणू थांबले. ह्या काळात माणूस माणसाचा दुश्मन झाला, भविष्याच्या काळजीने अनेकांना घेरले आणि संपूर्ण समाजाचीच मानसिकता बिघडली. दिवसेंदिवस घरात करायचे तरी काय आणि वेगळे काही करायला मनाची उमेदही नव्हती, अशा वेळी 

"वेदचक्षु व्याख्यानमालेने" काही अंशी का होईना, लोकांना काही काळ एका वेगळ्या विश्वात नेले, त्याच त्याच विचारांपासून परावृत्त केले. रिकाम्या डोक्याला काहीतरी चालना मिळाली. ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. उज्ज्वल सरांनी ज्ञानदानाचा यज्ञ पेटवला आणि करोनाच्या संकटापासून काही क्षण तरी सर्वाना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

रिकाम्या वेळेचा खऱ्या अर्थाने सदुपयोग झाला. माननीय डॉ. श्री. यशवंत मग्गीरवार, श्री. व. दा. भट सर, श्री. दादा शेवाळे, श्री. उदयराज साने, सौ. सुनिता साने, श्री. सिद्धेश्वर मारटकर, श्री. नारायण सुखटणकर, डॉ. निलेश बी. कुलकर्णी, सौ. जयश्री बेलसरे, श्री. विजय जकातदार, श्री. नंदकिशोर जकातदार, सौ. शिल्पा अग्निहोत्री, श्री. प्रदीप पंडित, प्रा. सौ. स्मिता गिरी, सौ. सविता महाडिक, श्रीमती रजनी साबदे, डॉ. सौ. चंद्रकला जोशी, डॉ. श्री. विजय इंगळे, डॉ. श्री. रमेश परोपकारी, सौ. राजश्री मुंदडा, सौ. विद्या सांगवीकर, श्री. अविनाश मग्गीरवार, अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभल्यामुळे आणि त्यांचे विचार ऐकायला मिळाल्यामुळे ह्या व्याख्यानमालेला जणू चार चांद लागले. 

आज जनमानसात प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या "वेदचक्षु" व्याख्यानमालेकडून लोकांच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत आहेत. पुढेही विविध विषयावरील अत्यंत दर्जेदार अशी व्याख्याने आपल्या सर्वांनाच ऐकायला मिळतील ह्याबद्दल शंकाच नाही. ह्याबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले कि मोफत व सशुल्क मिळून आतापर्यंत एकूण सुमारे ५०० हून अधिक कार्यक्रमांची नोंद आहे. तसेच १०१ कार्यशाळांचा संकल्प आहे. त्यापैकी ३० कार्यशाळा झाल्या आहेत. सर्व संस्थांचे सहकार्य लाभल्यास १०१ अधिवेशनंही किमान महाराष्ट्रभर घ्यावेत, असाही त्यांचा मानस आहे. 

आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे त्या क्षेत्रात काम करायला मिळणे यासारखे सौभाग्य ते काय? ज्योतिष शास्त्रासारख्या क्षेत्रात काम करायला मिळाल्याचा आनंद उज्ज्वल सर संपूर्णतः उपभोगत आहेत ज्यामध्ये त्यांना आत्यंतिक समाधानही लाभत आहे. अनेकांकडून ही विद्या अवगत करूनही आज स्वतःला विद्यार्थीच समजतात. आणि प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात.

ह्या सर्वासोबत ज्योतीषांसाठी अद्ययावत Software विक्रीचे काम सुद्ध ते करत आहेत. हे Software विकताना त्यातील ज्योतिष शास्त्र स्वतःला अवगत असावे म्हणूनच त्यांनी ह्या शास्त्राचे धडे गिरवले.

आज भारतातील बहुतेक सर्वच सॉफ्टवेअर कंपन्यांची डिलर/डिस्ट्रीब्युटरशीप त्यांच्याकडे आहे परंतु २०-२१ वर्षांपूर्वी अर्थात सुरूवातीला हे एक मोठे आव्हान होते. अशा प्रकारे लीगल सॉफ्टवेआर तेव्हा कुणी विकत घेत नसत. कारण बहुतेकजन अज्ञानापोटी पायरेटेड कॉपीचा वापर करीत. आज उज्ज्वल सर ह्या क्षेत्रातील लायसंस सॉफ्टवेअर्सची विक्री करणारे कदाचित एकमेव पूर्णवेळ ज्योतिषी तसेच ट्रेंडसेटर असावेत. ज्यांचा ज्योतिष शास्त्राचा सखोल अभ्यास तसेच सॉफ्टवेअर, टेक्नॉलॉजीची संपूर्ण माहिती आहे. कोणते सॉफ्टवेअर कसे वापरायचे त्याची तंत्रशुद्ध माहिती, त्यातील बारकावे ग्राहकांना देत असतात त्यामुळे ग्राहकांना पत्रिका बनवताना त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने करता येतो.

प्रत्येक गोष्ट अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने करण्याकडे सदैव कल असणाऱ्या उज्ज्वल सरांनी "वेदचक्षु" ला एखाद्या नवजात शिशुसारखेच वाढवले आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये. 

"ईश्वरेच्छा, ईश्वरकृपा, समस्त गुरूजनांचे आशिर्वाद, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्या शुभेच्छा तसेच उत्सुकता असलेले ज्ञानपिपासू श्रोते, दर्शक यामुळे हे शक्य झालं असे मी समजतो." अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. अजूनही अनेक विषय आणि अनेक क्षेत्रं आहेत तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेतून फलादेशाची तयारी करून, मराठी ज्योतिषी सक्षम व्हावा यांकरिता व्यापक प्रयत्न सुरू आहेत हे देखील त्यांनी नमूद केले.

वेदचक्षु सारख्या सन्माननीय व्यासपीठाची निर्मिती करून अनेक अभ्यासकांना त्यांनी पुढे येण्याची संधी दिली. ह्या क्षेत्रातील अनेक जाणकार नावारूपाला आले आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचले.

कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात लोकांना चांगला विचार देऊन त्यात गुंतवून ठेवण्यात आणि सकारात्मकता रुजवण्यात "वेदचक्षु व्याख्यानमालेच्या" माध्यमातून उज्ज्वल सरांनी केलेला प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे. 

वेद्चक्षुचा प्रवास असाच अविरत चालू राहू दे हीच देवाजवळ प्रार्थना! तसेच उज्ज्वल सरांनी त्यांचा बहुमुल्य वेळ आपल्याला दिला ह्याबद्दल आपल्या सर्वांतर्फे त्यांचे मनापासून आभार!

आपण स्वतःसाठी नेहमीच जगतो. पण इतरांसाठी जगणारी, स्वार्थ परमार्थाच्या ही पलीकडे जाऊन, इतरांना काहीतरी देऊ पाहणाऱ्या व्यक्ती फारच विरळ असतात. उज्ज्वल सर त्यापैकीच एक आहेत! शांत मुद्रा आणि धीरगंभीर व्यक्तिमत्त्व, विद्वत्तेचे तेज असूनही अहंकाराचा कुठेही लवलेश नसल्यामुळे ते समोरच्याला आपलेसे करतात!

अशा गुरुतुल्य व्यक्तीच्या कार्याबद्दल माझ्या ब्लॉग वर लिहिताना मला मनापासून आनंद होतो आहे!

आपल्या सारख्या सामान्य माणसातच अशी "असामान्य व्यक्तिमत्त्व" असतात. आगामी नूतन संवत्सर उज्ज्वल सरांना आनंदाचे, सौख्याचे, भरभराटीचे आणि त्यांनी योजलेल्या सर्व संकल्पनांच्या पूर्तीचे जाऊ दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना! इतरांसाठी सतत काहीतरी करण्याचा मानस ऊराशी असलेल्या श्री. उज्ज्वल पावले सरांच्या ह्या "ज्ञानयज्ञा" ची गिनीज बुकात नोंद व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.


अस्मिता

लेख आवडला तर  अभिप्राय लिहायला विसरू नका.

antarnad18@gmail.com

 

#antarnad#vedchakshuvyakhyanmala#ujjvalpawale#astrology#jyotishktta#dnyanyadnya#limkabookofrecord#guinnessbook#licencesoftware#astrocomp#kismat#astrooffice

 #अंतर्नाद#वेदचक्षुव्याख्यानमाला#उज्ज्वलपावले#ज्योतिषशास्त्र#ज्योतिषकट्टा#ज्ञानयज्ञ#लिमकाबुकऑफरेकोर्ड#गिनीजबुक#लायसन्ससोफ्टवेअर#किस्मत

 

 

  

Thursday, 1 April 2021

आयुष्याचा लेखाजोखा लेख क्र. 3.

|| श्री स्वामी समर्थ ||


ग्रह काय सांगतात ??

मंडळी, आपण सर्वच परिचित आहोत ते नवग्रहांशी .अनेक जण रोज नवग्रह स्तोत्रही म्हणतात . गेल्या काही वर्षात हर्शल , नेपचून , प्लुटो ह्या ग्रहांचा शोध लागला. अजूनही असंख्य ग्रह अंतराळात असतील ज्याचा मानवी जीवनावर परिणाम होत असावा , पण ते अजूनही आपल्याला ज्ञात नाहीत . हे सर्व ग्रह आपल्या जीवनावर परिणाम करत असतात आणि म्हणूनच आपल्या पत्रिकेत त्यांना अनन्यसाधारण असे स्थान प्राप्त आहे. असंख्य ग्रहयोग आहेत जे सर्व पाहणे शक्य नाही पण त्यातील काहींचा अभ्यास करुया . आज आपण काही ग्रहयोग बघू.

बुध हा ग्रहमालिकेतील सर्वात लहान तर गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे . चंद्र, शुक्र , बुध , रवी , गुरु ह्या ग्रहांना शुभ तर शनी , मंगळ, राहू आणि केतू ह्या ग्रहांना पाप ग्रह मानले जाते . ह्यामध्ये राहू आणि केतू हे पातबिंदू आहेत ज्यांना कुठलीही रास नाही . ते ज्या राशीत असतात त्या ग्रहाच्या अनुषंगाने फळ देतात . काही ज्योतिषी रवी ह्या ग्रहाला सुद्धा पापग्रह समजतात .

प्रत्येक ग्रह आपल्या जीवनावर परिणाम करतो . प्रत्येक ग्रहाचे चांगले वाईट परिणाम होतात . शुभ ग्रहसुद्धा बिघडले तर वाईट फळे देवू शकतात . चंद्र हा प्रत्येक राशीत सव्वादोन दिवस असतो तर शनी हा एका राशीत अडीच वर्ष. लग्नेश कुठलाही ग्रह असो तो ६ ८ १२ ह्या स्थानात असेल तर त्याचे कारकत्व कमी करतो. कर्क लग्नाचा ग्रह चंद्र जर हर्शलाच्या युतीत किंवा कुयोगात असेल तर व्यक्ती विक्षिप्त असते. लग्नेश ग्रह कुठल्याही कुयोगात बिघडला असेल तर आयुष्य काही प्रमाणत अयशस्वी , कष्टप्रद असते. चंद्र हा मातेचा तसेच मनाचाही कारक आहे . चंद्रावरून मनाची आंदोलने पाहतात तसेच भरती आणि ओहोटीही पहिली जाते . चंद्र जर बुधाच्या कुयोगात युतीत अथवा प्रतियोगात असेल तर त्वचारोग होवू शकतो. चंद्र अष्टमात भाग्येशासोबत असेल तर आयुष्य कमी असते. अर्थात बाकीचे योगही पाहावे लागतील. चंद्र हा शुक्र मंगल बुध ह्यांच्या नवपंचम किंवा लाभ योगात शुभफळ देतो. चंद्र जर राहू केतू ह्यांच्या युतीत असेल तर त्यास ग्रहणदोष म्हंटले जाते .

रवी हा आत्मकारक ग्रह आहे आणि पित्याचाही कारक आहे. पुरुषांच्या पत्रिकेत चंद्रावरून भार्या तर स्त्रियांच्या पत्रिकेत रविवरून पती पहिला जातो.मेष राशीत रवी उच्चीचा तर तुळेत निचीचा मानला जातो. रवी शनी युती वडिलांचे सौख्य दर्शवत नाही ,वडिलांशी पटत नाही. तसेच रवीसोबत राहू किंवा केतू हा ग्रहण दोष दर्शवतात .

मेष किंवा सिंह राशीत रवी दशमात सरकारी नोकरीचा योग आणतो. पत्रिकेत रवी हा मानमरातब आणि लौकिकाचा कारक आहे. मंगळ हा ग्रह सेनापती असून स्त्रियांच्या पत्रिकेत मंगळ बिघडला असेल तर मासिक पाळीचे त्रास असतात . मंगळ धडाडी आणि नेतृत्व गुण दाखवतो . मंगळ भावंडांचाही कारण आहे त्यामुळे मंगळ राहू केतू शनी ह्यांनी दुषित असेल तर भावंड सुख मिळत नाही. स्त्रियांच्या पत्रिकेत मंगळ सौभाग्याचा कारक आहे. द्वितीय स्थानात मंगळ असेल तर वाणी दाहक असते , चिडून संतापून बोलणे मंगळामुळे होते. त्यासोबत हर्शल असेल तर बघायलाच नको.

पत्रिकेत सप्तमेश मंगळ हर्षलाच्या कुयोगात युतीत अथवा प्रतीयुतीत असेल तर वैवाहिक सुखाचे काही खरे नाही . बुधाच्या राशीत मंगळ चांगला नाही आणि मंगळ बुध युती , शनी बुध युती खोटेपणा दर्शवते. मंगळ व्ययस्थानात असता आर्थिक नुकसान , उधळपट्टी ह्यामुळे कर्जबाजारीपणा येतो. शुक्र मंगळ युती हि प्रेमविवाहास पोषक आहे. पत्रिकेतील १२ १ ४ ७ ८ ह्या स्थानात मंगळ असेल तर पत्रिका मांगलिक आहे असे म्हंटले जाते . वयाच्या साधारण 28 नंतर मंगळ कमी त्रासदायक होतो.

शुक्र हा आयुष्यातील सौंदर्याचा , विलासाचा आणि आनंदाचाही कारक आहे. स्त्रियांच्या पत्रिकेत कन्या राशीतील शुक्र वैवाहिक सुखात कमतरता दाखवतो . तसेच शुक्र राहू युती परजातीय संबंध येवून विवाह दर्शवते. शुक्र हर्शल , शुक्र राहू ,शुक्र केतू ,शुक्राचे कारकत्व कमीच करतात . सिंह राशीत म्हणजेच रवीच्या राशीत शुक्र चांगली फळे देत नाही. पती आणि पत्नी दोघांच्याही पत्रिकेत विवाहाचा कारक ग्रह शुक्र शुभ स्थितीत असेल तर विवाह लवकर योग्य वयात होतो.

पंचमातील शुक्र बुध युती कालाप्रांतातील यश देते. बुध हा वाणीचा कारक ग्रह वाचास्थानात असेल तर बोलण्याचे काम असेल ते व्यवसायात यश देतो. बुध राहूच्या नक्षत्रात असेल तर खोटे बोलणे किंवा बुद्धिचतुर असतो.बुध बिघडला असता मज्जासंस्थेचे विकार होतात . शनी आणि बुध लग्नी असता विवाह सुखाचा होत नाही .

शनी मंगळाच्या युतीत फळ चांगले देत नाही . शनी अष्टमात असेल तर आयुष्य वृद्धी करतो. व्ययस्थानात बिघडलेला शनी तुरुंगाची हवा खाण्यास लावतो पण त्यासाठी पूर्ण पत्रिकेतील सर्व ग्रहांचा अभ्यास तसेच गुरु चा अभ्यास आवश्यक आहे. शनी आणि मंगळ हे बांधकाम क्षेत्राचे कारक आहेत .

शनी बिघडला असता कंपवात , लकवा ,अर्धांगवायूचा झटका ,फुफुसात पाणी होणे ह्या गोष्टी होवू शकतात .शनी दशा आणि साडेसाती शनी बिघडला असता खडतर जाते. शनी हा न्यायी ग्रह आहे . शनीची साडेसाती म्हंटले कि भल्याभल्यांची झोप उडते. पण शनी कारण नसताना त्रास देत नाही. तुम्ही चूक अपराध केला तरच शनी महाराज दंड सुनावतात .शनी आपला मित्र आहे तो आपल्याला आयुष्याचा उपभोग घेवून विरक्तीकडे नेतो. ह्या शरीराची चिमुटभर राख होणार आहे ह्याची जाणीव आपल्याला लवकर होईल तितका त्रास कमी. तेव्हा आता शनी महाराजांना आपला मित्र करायचे कि शत्रू हे तुमचे तुम्हीच ठरवा .

आपल्या संपूर्ण शरीरात एकच अवयव असा आहे ज्याने अनेक समस्या उद्भवतात आणि तो म्हणजे आपली वाचा . आयुष्यातील बरेच प्रोब्लेम आपल्या बोलण्याने होतात. त्यामुळे साडेसातीत कमीतकमी बोलावे, लोकांत कमीतकमी मिसळावे. मनन चिंतन अधिक करावे. उपासनेचे फळ निरंतर टिकणारे आहे त्यामुळे उपासनेकडे , ध्यानाकडे अधिक लक्ष्य द्या .

गुरु हा ग्राहमालीकेतील सर्वात मोठा ग्रह. शिक्षण , मुले होणे , विवाहसौख्य, उपासना ह्या सर्वासाठी पत्रिकेत गुरूला अनन्यसाधारण महत्व आहे. गुरु केतू युती हि अध्यात्मिक उपासना दर्शवते .गुरुचे कारकत्व बुधाच्या राशीत कमी होते . गुरु जर राहूच्या नक्षत्रात असेल तार त्यास चांडाळ दोष म्हणते जाते .ह्या योगात सुद्धा गुरूची जोरदार फळे मिळत नाहीत .

हर्शल प्लुटो आणि नेपचून हे ग्रह नवग्रहात गणले जात नाहीत . १२ व्या स्थानातील हर्शल परदेशगमनाचे योग आणतो. हर्शल हा मंगलापेक्षाही १०० पटीने जास्ती दाहक आहे. धनस्थानातील हर्शल सांपत्तिक स्थिती फार उंचावत नाही. नेपचून हा शुभ असेल तर अध्यात्मिक प्रगती , भविष्यातील घटनांचे संकेत देतो. सप्तमेश ग्रह हा ६ ८ १२ मध्ये असू नये, वैवाहिक सुखात कमतरता निर्माण होते. मंडळी असे असंख्य ग्रहयोग अभ्यासता येतील. कुठल्याही एका ग्रहामुळे आयुष्यात घटना घडत नाही. त्यामागे ग्रहस्थिती , महादशा , कुयोग अनेक गोष्टी पाहायला लागतात .

त्यामुळे माझा रवी इथे आहे आणि माझा शुक्र इथे आहे तर काय होईल असे बाष्कळ प्रश्न कुणालाही विचारू नयेत कारण एक ग्रह म्हणजे आयुष्य नाही.

ज्योतिष शास्त्र शिकायला अवघड नाही पण त्याचा आवाका खूप जास्ती आहे त्त्यासाठी आवड आणि सवड दोन्ही पाहिजे . ते शिकताना संयम असणे गरजेचे आहे तसेच संशोधक वृत्ती हवी . त्याहीपलीकडे अर्धवट ज्ञान हे अतिशय वाईट असते. त्यापेक्षा अज्ञानी असणे केव्हाही उत्तम.

अपत्य  झाले नाही अश्या लोकांच्या काही पत्रिका , विवाह झाला नाही , शिक्षणात अडथळे आले अश्या अनेक पत्रिका घेवून त्याचा सखोल अभ्यास आपल्याला नियमांपर्यंत पोहोचवतो.

ग्रह आपापली कामे चोख बजावत असतात ते पक्षपाती पणा करत नाहीत ,म्हणूनच म्हंटले आहे “ Stars Plays a Major Role In Life ”.

आता आपल्या लक्ष्यात आले असेल आपण आपली पत्रिका ज्योतिषास दाखवली कि त्यालाही किती सखोल अभ्यास करावा लागत असेल ,कारण एखाद्याच्या आयुष्याबद्दल अभ्यासपूर्ण , अधिकाराने बोलणे खचितच सोपे नाही, पटतंय ना ?

 शुभं भवतु

अस्मिता

antarnad18@gmail.com

  

आयुष्याचा लेखाजोखा लेख क्र. 2.

 || श्री स्वामी समर्थ ||


विचार पत्रिकेतील १२ स्थानांचा.

मंडळी , पत्रिकेचे विभाजन १२ भावात (स्थानात) झाले आहे आणि ह्या पलीकडे आपले आयुष्य नाही. सोबत असलेल्या पत्रिकेत प्रथम स्थानात १ अंक आहे ,जे प्रथम स्थान दर्शवते . अश्या प्रकारे पत्रिकेतील १२ स्थाने आहेत . १२ अंक हा व्ययस्थान शेवटचे स्थान दर्शवतो. प्रत्येक स्थान विशिष्ठ गोष्टी सूचित करते . जसे प्रथम स्थानावरून आपले स्वतःचे व्यक्तिमत्व समजते. अश्याप्रकारे प्रत्येक स्थान आणि त्यातील ग्रह आपल्याला बर्याच गोष्टी सूचित करतात . 

जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर उगवणारी रास म्हणजे आपले लग्न किंवा लग्नराशी . प्रथम स्थानात चंद्र किंवा शुक्र असेल तर व्यक्ती देखणी , रंगाने गोरी असते . चेहरा गोल असतो . हर्शल ह्या स्थानात असता व्यक्तीचा स्वभाव विक्षिप्त असू शकतो. २रे स्थान आपले कुटुंब ,वाणी आपले बोलणे, कुटुंबाकडून मिळणारे धन आणि आपल्या खाण्यापिण्याच्या आवडी सांगते.चंद्र शुक्र गुरु असतील तर गोड बोलण्याकडे आणि खाण्याकडे कल असतो तर येथील मंगळ वाणी जहाल करतो तसेच तेलकट चमचमीत खाणे पसंत असते. येथील राहू व्यसनेही दर्शवतो. शनी असल्यास मितभाषी आणि वेळ प्रसंगी मनावर जखमा करणारे कायद्याची भाषा बोलणारे असणारे असतात . हर्शल असेल तर आर्थिक स्थिती आयुष्यभर तशीच राहते. ३ र्या स्थानात शनी मंगळ ,किंवा रवी , राहू असता व्यक्ती पराक्रमी , धीट असते. ह्या स्थानातील पाप ग्रह आपल्याला पराक्रमी बनवतात पण शेजार्यांशी ,भावंडांशी संबंध चांगले ठेवत नाहीत. ३र्या स्थानावरून जवळचे प्रवास पहिले जातात ,इथे चंद्र असेल तर आयुष्यात पुष्कळ प्रवास होतात . ३र्या स्थानातील अशुभ ग्रहांची युती जास्तीकरून मंगळाशी भावंडांच्या बाबत एखादी अशुभ घटना दर्शवते . लहान भावंडांशी पटणे कठीण होते . पराक्रम स्थानात गुरु सारखा ग्रह काही अंशी निष्फळ ठरतो परंतु गुरु सारखा शुभग्रह हस्ताक्षर सुरेख वळणदार आणि मोठे असते . पापग्रह असतील तर अक्षर वाचताही येत नाही . इथे पापग्रह असता म्हातारपणी कमी ऐकू येते. ४थ्या स्थानाचा स्वामी जर ३ र्या स्थानात असेल तर मानले तर सुख असेच म्हणायला लागेल. कारण चतुर्थेश चतुर्थेशाच्या व्ययात . चतुर्थ स्थानावरून मातेचे सुख , वाहन , घर आणि शिक्षण पाहिले जाते.. तिथे गुरु किंवा शुक्र ह्यासारखे ग्रह उत्तम वाहन आणि घराचे सौख्य देतात .तिथे बुधासारखा ग्रह एकापेक्षा अनेक वास्तू प्रदान करतो. पण चतुर्थ स्थानात जर शनी मंगळ युती राहू मंगळ युती शनी केतू युती ह्या सारख्या युती नमूद केलेल्या गोष्टीत न्यूनता आणतात . ४थ्या स्थानात मंगळ धुमसत राहतो , घरात सतत मनाविरुद्ध घटना ,वाद होतात . येथे हर्शल असता आई मुलाच्या नात्यात वैचित्र्य असते . स्वयपाकघरात काम करताना काळजी घ्यावी लागते. ३र्या स्थानावरून आपले अंतर्मन सुद्धा पहिले जाते आणि ४थ्या स्थानावरून आपले मन . ५ वे स्थान संतती ,प्रेम प्रणय विद्या दर्शवते. येथील पंचमेश ७व्या स्थानात किंवा सप्तमेशा सोबत पंचमात किंवा सप्तमात असेल तर प्रेमविवाह होण्याची शक्यता अधिक असते. ५ व्या स्थानात चंद्र ,गुरु किंवा शुक्र असेल तर संतती बुद्धिमान आणि आज्ञाधारक, देखणी असते. ५ वे स्थान हे पुर्व कर्माचेही स्थान आहे . सट्टा बाजार ह्यातील यशापयश येथून पहिले जाते . तिथे राहू ,राहू नेप युती असेल किंवा राहू असेल तर संतती सौख्य मनासारखे मिळत नाही. तिथे रवीबुध असतील तर संतती हुशार असते. ६ व्या स्थानावरून आजार , स्पर्धात्मक परीक्षात मिळणारे यश आणि सवत पहिली जाते .६ वे स्थान म्हणजे रोग ऋण आणि शत्रू स्थान . ६ व्या स्थानात राहू असेल तर सर्वाना पुरून उरतो. इथे राहू मंगळ युतीत असतील तर पोटाचे विकार ,आणि एकदातरी टायफॉईड होण्याची शक्यता असते .आयुष्यातील शत्रु ह्या स्थानावरून पाहतात तसेच घरात काम करणारे नोकरचाकर सुद्धा ह्य्च स्थानावरून पाहतात . ७ व्या स्थानात हर्शल किंवा हर्शल नेप असतील तर लग्न जमताना व्यवस्थित चौकशी करावी कारण फसवणूक होण्याची शक्यता असते , नुसता हर्शल असेल तर विवाहात वैचित्र्य आढळते तसेच पती किंवा पत्नी विजोड असतात . कधीकधी आकस्मिक विवाह होतो तर कधी होतही नाही. इथे शनी सारखा ग्रह असेल तर विवाहास विलंब सर्वसाधारण पणे वयाच्या 30 नंतर विवाह होतो . चंद्र असेल तर पत्नी चांगली मिळते . अर्थात हे सर्व ग्रह कुठल्या राशीत आहेत ह्यावरही बरेच काही अवलंबून आहे . विवाह हा खूप मोठा विषय आहे त्यावर आपण पुढे अभ्यास करणारच आहोत.

८ व्या स्थानात शनी असेल तर तो आयुष्य वृद्धी करतो . अष्टमेश उत्तम स्थितीत किंवा अष्टमात असेल वडिलोपार्जित इस्टेट मिळतेच . अष्टम स्थान हे मृत्युस्थान म्हणून ओळखले जाते. गंडांतर योग ८ व्या स्थानातून पाहतात .पण अष्टमेश कुठला ग्रह आहे हेही महत्वाचे. ९ वे स्थान म्हणजे भाग्यस्थान. ह्यातील गुरु शनी केतू हे ग्रह अध्यात्मिक प्रगती दर्शवतात . राहू भाग्यात अडथळे निर्माण करतो पण तो साधना अध्यात्मिक प्रगतीही दाखवतो. ९ व्या स्थानावरून वडिलांचा बोध होतो. १० व्या स्थानावरून नोकरी व्यवसाय पहिला जातो. इथे जर हर्शल नेप सारखे ग्रह असतील तर अनेक वेळा नोकरीमध्ये बदल होतात . १० वे स्थान हे मान सन्मानाचेहि आहे . ११ व्या स्थानाला लाभ स्थान म्हणतात . हे पत्रिकेतील महत्वाचे स्थान कारण आयुष्यात होणारे सर्व लाभ हे ११ व्या स्थानावरून समजतात . मोठा भाऊ इथून पाहतात .इथे चंद्र असेल तर स्त्री वर्गाकडून लाभ होतो . ११ वे स्थान हे मुख्यत्वे मित्रांचे स्थान आहे. ११ व्या स्थांनामध्ये शुक्र हर्शल किंवा शनी मंगळ ह्यासारखे ग्रह असतील तर कदाचित चुकीच्या संगतीने आयुष्य वेगळ्या वाटेवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जीवनात संगत फार महत्वाची आहे. आपल्या बरोबर असलेल्या लोकांवरून आपली ओळख होत असते. १२ वे स्थान म्हणजे व्यय स्थान . १२ व्या स्थानावरून परदेशगमन, तुरुंगवास, दवाखाना ज्ञात होतात. १२ व्या स्थानात गुरु राहू शनी परदेश गमनास पूरक असतात . शनी , गुरु असेल तर पश्चिमेकडील देश ,राहू असल्यास यवनांचे देश यात भाग्योदय होतो. २र्या स्थानाचा मालक जर १२ व्या स्थानात असेल तर अश्या व्यक्तीकडे पैसा टिकत नाही त्याचा व्यय होतो. 

प्रथम स्थानापासून बारावे स्थान ज्याला व्यय स्थान म्हणतो तिथपर्यंत प्रत्येक स्थान आपल्याला काय देते हे ह्या कोष्टकात लिहिलेले आहेच. आपली पत्रिका उघडून पहिलीत तर अनेक गोष्टींचा खुलासा तुमचा तुम्हालाच होईल. 

मंडळी, शनी हा प्रत्येक गोष्टीत विलंब करतो. चंद्र हा अत्यंत जलद गतीने जाणारा ग्रह आहे म्हणूनच चंद्र एका राशीत सव्वा दोन दिवस तर शनी एका राशीत अडीच वर्षे असतो . शनीचे लग्न म्हणजेच मकर किंवा कुंभ लग्न असेल तर ज्योतिषाला सुद्धा अश्या जातकाची पत्रिका करायला आणि बघायलाही काही ना काही कारणाने विलंब होतो. शनी ज्या स्थानात असेल त्या गोष्टीस विलंब करतो . जसे ५ व्या स्थानात असेल तर संतती होण्यास विलंब होतो तसेच ८ व्या स्थानात असेल तर दीर्घायुष्य देतो. अश्याप्रकारे आपण आपल्या पत्रिकेचा अभ्यास स्वतःच करू शकतो. आपल्या ओळखीत अगदी वयाची ९० वर्षे पार करणाऱ्या लोकांच्या पत्रिकेत बहुतांश वेळेला शनी ८ व्या स्थानात असेल. शनीचे लग्न म्हणजेच मकर किंवा कुंभ असणार्या व्यक्ती सडपातळ बाधा असणार्या आणि सावळ्या ,उंच असतात. पत्रिकेत ८वे स्थान वडिलोपार्जित संपत्ती दर्शवते अर्थात ती जमीनजुमला किंवा आर्थिक म्हणजे रोख रक्कम ह्या स्वरूपातही असते आणि ८ व्या स्थानाचा मालक ग्रह सुस्थितीत असेल तर ती मिळते अन्यथा नाही. कधीकधी ती मिळूनही तिचा उपभोग घेणे नशिबात नसते. वडिलोपार्जित संपत्ती वरून घरे पेटतात आणि नात्यात दरी निर्माण होते तीही कायमची हे सर्वश्रुत आहे. . 

मंडळी तर आज ह्या १२ भावांचा अभ्यास करताना तुमच्या हे नक्कीच लक्ष्यात आले असेल कि आपले प्रश्न हे ह्या भावांशी निगडीत असतात . नोकरी व्यवसायाचा प्रश्न १० भावावरून तर लग्नाचा २ ७ ११ ह्या भावांवरून , आजारपण , परदेशगमन १२ व्या भावावरून तर वाहनसौख्य ४ ११ ह्या भावांवरून पहिले जाते. नोकरी जाणे किंवा स्वेछ्येने सेवानिवृत्ती घेणे ह्यासाठी ९ आणि २ भावांचा विचार होतो. उच्च शिक्षणासाठी ९ वा भाव आणि परदेशातील उच्च शिक्षणास ९ १२ हे भाव विचारात घ्यावे लागतात .प्रत्येक भाव किंवा स्थान पुढील भावाचे अथवा स्थानाचे सुख देत नाही . जसे ६ वे स्थान कार्यान्वित झाले तर स्पर्धात्मक परीक्षेत यश येयील पण विवाह जमण्यास अडचणी कारण ६ च्या पुढील स्थान म्हणजे ७ वे स्थान त्याचे फळ मिळणार नाही. 

जेव्हा आपण नोकरीचा प्रश्न पाहतो तेव्हा अर्थात १० व्या स्थानाचा विचार करतो . १० व्या स्थानाचा संबंध ३ ९ किंवा १२ शी येत असेल तर नोकरीचे स्थान दूरवर किंवा फिरतीचे असते ,त्याउलट ४ त्या स्थानाशी संबंध येत असेल तर नोकरी घराजवळ असू शकते. सर्व करारमदार, अग्रीमेट ३ र्या स्थानावरून पहिले जातात तसेच मिडिया क्षेत्र हे ३ र्या स्थानावरून पहिले जाते. मेडिकल आणि इंजिनियरिंग ह्यातील शिक्षणासाठी ८ वे स्थान पाहतात .

काही माणसे आयुष्यात कधीच एकही पैसा न मिळवता हि उत्तम आयुष्य जगतात कारण त्यांचे पूर्वसुकृत . आणि कधी कधी अत्यंत कष्टात आयुष्य असणार्यांच्या पदरी काडीचेही सुख नसते. चंद्र मनाचा कारक त्यावरून आपल्या मनाची बैठक समजू शकते. ५ स्थान आपले पूर्वसुकृत दर्शवते . ५ स्थानावरून प्रथम संतती पाहायला मिळते . त्या स्थानात राहू किंवा नेप ,राहू , शनी राहू असतील तर त्या स्थानाच्या सुखात म्हणजेच संततीच्या सुखात वैगुण्य पहावयास मिळते. 

९ स्थानावरून उच्चशिक्षण पाहतात. आजकाल MBA , MTch, MS असे उच्च शिक्षण घेताना CET सारख्या स्पर्धात्मक परीक्षा द्याव्या लागतात . स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी ६ वे स्थान आवश्यक आहे तसेच ९वे स्थानही . आजकाल ह्या परीक्षां साठी बरीच मोठी फी आकारण्यात येते त्यामुळे ह्या परीक्षेस बसण्यापूर्वी ज्योतिष सल्ला घ्यायला हरकत नाही . माझ्या घरातच उदाहरण आहे, माझा मुलगा नोकरी सांभाळून MBA चा अभ्यास करत होते ,खूप कष्ट घेत होता पण त्या वर्षी त्याला गुरूचा पाठींबा नव्हता . हि परीक्षा पुढील वर्षी दिलीस तर नक्कीच जास्ती चांगेल यश मिळेल हे त्याला सांगितल्यावर त्याने अभ्यास स्थगित केला पण परीक्षा दिली तेव्हा त्याला CET मध्ये ८३ % मार्क मिळाले आणि यानंतर च्या वर्षात ९९.४% इतके मार्क मिळवून यश मिळाले. मुद्दा हा कि आपल्या आयुष्यातील उत्तम काळ समजला आणि त्यावेळी कष्टांची जोड दिली तर तीच गोष्ट जास्ती चांगली होवू शकते . ८ व्या स्थानाशी मंगळाचा संबंध आला तर technical शिक्षण होवू शकते तसेच . ८ व्या स्थान हे मृत्य स्थान म्हंटले आहे. ८ व्या स्थानाशी निगडीत महादशा असेल तर विमा एजंट ची नोकरी किंवा तत्सम व्यवसाय लाभेल . मृत्युपश्चात अंत्यविधीसाठी लागणाऱ्या साहित्याचे दुकान सुद्धा चालू शकेल किंवा एखादे पौरोहित्य करणारे गुरुजी असतील तर मंगळागौर , सत्यनारायण ह्या पुजेऐवजी त्यांनी अन्तेष्टी दहावे तेरावे चे विधी करावेत . ६ , ७ आणि १० ह्या स्थानाचा संबंध असेल तर व्यक्तीचा ओढ व्यवसायाकडे असू शकतो. बांधकाम क्षेत्रात किंवा बांधकाम क्षेत्रातील agent म्हणून काम करताना पत्रिकेतील मंगळ उत्तम लागतो. 

पत्रिकेत प्रत्येक स्थानाचे एक वेगळे वैशिष्ठ आहे आणि त्या भावानी दर्शवलेल्या गोष्टींसाठी त्या त्या भावाचा विचार करावा लागतो. पत्रिका बघताना आपले logic पावरावे लागते . एकदा आपल्याला प्रत्येक स्थान काय देते हे समजले कि पाया भक्कम होतो आणि मग प्रश्न सोडवताना बरोबर त्याच स्थानाचा आणि त्या स्थानाने दर्शवलेल्या गोष्टींचा विचार केला जातो. जसे ७ व्या स्थानाचे म्हणजे विवाह स्थानाचे भाग्यास्थान ३रे स्थान आहे. त्यामुळे विवाहसौख्य किंवा वैवाहिक आयुष्याबद्दल प्रश्न आला आणि ३र्या स्थानात पापग्रह ठाण मांडून बसले असतील तर ज्योतिषी काय समजायचे ते समजतो. 

असंख्य गोष्टींचा अभ्यास, अनेक नियम, ग्रहांची स्थिती ,महादशा आणि इतर अनेक गोष्टींचा विचार करून ज्योतिषी एखादा निष्कर्षा पर्यंत येवू शकतो . प्रश्नकर्त्याला नेहमीच उत्तराची घाई असते . वरील विवेचनावरून हा अभ्यास किती सखोल आहे ह्याची झलक पाहायला मिळाली असेल . ज्योतिषाकडून एखाद्या प्रश्नासंबंधी मार्गदर्शन घेताना कारण नसताना घोड्यावर बसून जावू नका , त्याला त्याचा वेळ घेवू द्या , अभ्यास करूदेत नाहीतर अपुर्या अभ्यासामुळे आणि तुम्ही केलेल्या लगीन घाईमुळे उत्तर नक्कीच चुकू शकते ..मग ज्योतिषाच्या नावाने बोंबलायला आपण मोकळे ..तसे होवू नये म्हणून आपणही काळजी घेतली पाहिजे. कारण त्याच्या उत्तरावर पुढचे बरेच काही अवलंबून असते . इथे पी हळद हो गोरी हा नियम लागू पडत नाही. विशेष करून लग्नाच्या पत्रिका पाहताना अनेक गोष्टींचा विचार करायला लागतो . अगदी प्रेमविवाह असेल तरी जोडप्याने ज्योतिष मार्गदर्शन घ्यावे असे आजकालची परिस्थिती पाहून वाटते .

लग्न ह्या विषयावरील लेखात त्या सर्व गोष्टी आपण पाहूच. 

चलातर मग आपापल्या पत्रिकेतून स्थानाचा अभ्यास करण्यास सुरवात करुया . पुढील लेखात पत्रिकेतील ग्रह आणि त्यांच्या योगां बद्दल जाणून घेवूया.

शुभं भवतु 

अस्मिता

Antarnad18@gmail.com