Wednesday, 26 October 2022

वास्तूबदल आणि ग्रहयोग

 || श्री स्वामी समर्थ ||




माझ्या मानत असलेल्या दोन मुद्द्यांचे विश्लेषण ह्या लेखाद्वारे करण्याचा लहानसा प्रयत्न करत आहे . आपल्याला आलेले अनुभव सुद्धा आपण शेअर करावे हि विनंती .


महिन्यापूर्वी मला एका स्त्रीचा फोन आला होता . त्यांनी नवीन वास्तू मध्ये गृहप्रवेश केला होता . त्यांचे अनेकविध प्रश्न होते जसे मुलाची नोकरी आणि त्याला वाईट संगतीमुळे लागलेले व्यसन . त्या म्हणाल्या आम्हाला एकाने सांगितले कि तुम्ही वास्तू बदललीत तर हे सर्व प्रश्न सुटतील पण तसे झाले नाही म्हणून त्या जरा चिंतीत होत्या . खरतर त्यांच्या ह्या वक्तव्यामुळे मला आजचा हा लेख लिहावासा वाटला. 


मी त्यांना विचारले कि वास्तू कुणाच्या नावावर घेतली आहे तर म्हणाल्या यजमानांच्या नावावर . म्हंटले ठीक आहे . गणपतीपूजन , वास्तुशांत सर्व व्यवस्थित केले असाही उल्लेख त्यांनी केला. आत्ताची वास्तू चांगली मोठी आहे हवेशीर आहे पण आयुष्यातील प्रश्न जैसे थेच आहेत . असो.


तर आपण आता मूळ मुद्द्याकडे येवूया . वास्तू बदल झाला तर पत्रिकेतील ग्रह सुद्धा बदलून अचानक चांगली फळे देतील का? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. मुळात वास्तूबद्दल होण्यासाठी तशीच ग्रहस्थिती कारणीभूत असते म्हणून वास्तू मध्ये बदल झाला. येतंय का लक्ष्यात ? ग्रहांच्या दशा आणि अंतर्दशेत ग्रहांनी फळ दिले ते म्हणजे वास्तूबद्दल .इतकच .

आता त्यांचा सलग्न प्रश्न असा आहे कि मुलाची नोकरी टिकत नाही आणि त्याची व्यसने सुटत नाहीत . आता ह्या मुलाच्या नावावर हि वास्तू खरेदी केलेली नाही तर त्याच्या वडिलांच्या नावावर खरेदीखत आहे . वडिलांच्या पत्रिकेत वास्तू विकत घेण्याचे आणि वास्तू बदल होण्याचे योग होते म्हणून तश्या घटना घडल्या पण हे योग मुलाला व्यसनमुक्त करू शकणार नाहीत . मुलाची व्यसने आणि  नोकरी ह्या गोष्टींसाठी त्याच्या वयक्तिक पत्रिकेतील ग्रहयोग काय सांगतात ते बघणे आवश्यक आहे. 


आपल्या पत्रिकेतील ग्रह आणि महादशा घटना घडवीत असतात . मुलाला व्यसन जन्मापासून आहे का? तर नाही . म्हणजेच आयुष्याच्या एका टप्प्यावर त्याला व्यसन लागले आहे . पत्रिकेतील 12 भाव आणि सगळे ग्रह सतत 24 तास फळ देतात का तर नाही . महादशा ज्या ग्रहाची असते तो ग्रह ज्या भावात ,नक्षत्रात आहे त्याच्या कार्येशत्वानुसार फळ देण्यास सक्षम असतो . त्यामुळे वास्तूमध्ये बदल झाला तर आयुष्य संपूर्ण 360 अंशाने बदलेल आणि सगळच सुफळ संपन्न होईल असे नाही . 


आयुष्यातील अनेकविध घटनांचे मूळ महादशेत आहे . वास्तूबद्दल , नोकरीत बदल , परदेशगमन , संततीचे आगमन , प्रेमसंबंध जुळणे , विवाह , घटस्फोट , अविवाहित राहणे , व्यवसाय सुरु होणे , अचानक नोकरी जाणे , व्यसन लागणे , आयुष्यभर एकत्र राहिलेल्या भावंडाच्या संबंधात कायमचा दुरावा किंवा वितुष्ट येणे , दीर्घ मुदतीची आजारपणे , दवाखान्याच्या फेर्या ह्या सर्व घटना त्या त्या ग्रह योगांतून घडत असतात . त्यामुळे आता वास्तू बदलली कि आमचे सर्व प्रश्न काहीतरी जादू झाल्यासारखे सुटतील असे म्हणणे उचित होणार नाही .


बरेच वेळा वास्तू बदल झाल्यामुळे सद्य स्थितीत असणारे प्रश्न अधिक भीषण स्वरूप धरू शकतात . ह्याचे कारण आपण घेतलेली वास्तू हि दुषित , पिडीत असते . एखाद्या वास्तूत एखाद्या स्त्रीचा हुंड्यासाठी किंवा तत्सम जाळून छळ करून मृत्यू झाला असेल किंवा तत्सम दुर्घटना घडलेली असेल किंवा कुणी त्या वास्तूत आत्महत्या केली असेल, भाऊबंदकि तील वास्तू असेल  तर त्या वास्तूची स्पंदने बिघडतात आणि त्या वास्तूत दोष निर्माण होतो . मग अश्या जागेत रात्री झोप न लागणे , दडपण जाणवणे , मनावर ताण निर्माण होणे , घरात कुठलेही धार्मिक कार्य संपन्न न होणे , घरात अन्न किंवा धान्य भाजीपाला फुकट जाणे , घरात कलह , मतभेद , घरात भास आभास होणे ह्या गोष्टींची प्रचीती येते . आपली दशा सुद्धा योग्य नसेल तरीही अश्या घटना घडू शकतात. 


अनेकदा आपण ऐकतो कि वास्तू बदलली आणि आमचे सगळे छान झाले तर अश्यावेळी उत्तम वास्तू मिळण्याचे आणि ती लाभण्याचे उत्तम ग्रह योग फलित झाले म्हणून सुखमय घटना घडत आहेत असे समजावे. पण वास्तूबदल झाला म्हणून घरातील व्यक्तीचे व्यसन सुटेलच असे नाही , नोकरी मिळेलच असे नाही . हे प्रश्न व्यक्तीसापेक्ष आहेत ते त्यांच्या व्यक्तिगत पत्रीकेवरून पाहणे उचित ठरेल.


आयुष्यातील घटना घडवण्याचा सर्वासर्वे अधिकार हा महादशा स्वामीने राखून ठेवला आहे . त्यामुळे वास्तू परिवर्तन सगळ्याच गोष्टीत परिवर्तन करेल असे नाही.  नवीन वास्तू खरेदी करताना ती आवडली तर लगेच टोकन देऊ नये . घरी यावे कुलस्वामिनीची प्रार्थना करावी आणि प्रश्नकुंडली मांडावी ( ज्यांना ज्योतिष येते आहे त्यांनी ) आणि चतुर्थ स्थान पाहावे . जर त्यात राहू असेल किंवा ते दुषित असेल तर ती वास्तू घेण्याचा  विचार सोडून द्यावा . 


अनेक जण कुठलाही मुहूर्त न बघता नवीन वास्तूत गृहप्रवेश करतात तसेच उदकशांत , वास्तुशांत सुद्धा करत नाहीत .पण हे योग्य नाही . वास्तुशांत हि दर 10 वर्षांनी आणि उदकशांत हि दर 5 वर्षांनी करावी पण आजकाल ह्या गोष्टी मागे पडत आहेत किंवा ह्या गोष्टीना प्राधान्य दिले जात नाही पण कितीही काहीही झाले तरी आपली आधुनिक so called मते बाजूला ठेवावीत आणि यथासांग वास्तू शांत करून घ्यावी . वास्तू शास्त्र हे प्राचीन शास्त्र आहे .वास्तू शास्त्र , ज्योतिष ह्या सर्वाची एकमेकात गुंफण आहे . वास्तूत दिशाना अन्य साधारण महत्व आहे मान्य आहे . प्रत्येक शास्त्र आपापल्या जागी श्रेष्ठ आहे . ह्यासर्वांचा मेरुमणी म्हणजे आपली कर्म , मनातील शुद्ध विचार आणि उपासना . आपली उपासना आपल्याला मार्ग दाखवत असते , आपले आयुष्य घडवत असते . अनेक आश्चर्य कारक घटना आयुष्यात घडतात ज्याची आपण अपेक्षा हि केलेली नसते त्यालाच आपण गुरुकृपा म्हणतो. 


प्रत्येकावर गुरुकृपा होऊन इच्छित वास्तूचा लाभ होवूदे हीच सदिछ्या .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230



  

 


Tuesday, 25 October 2022

अर्थार्जनाचे अनेकविध स्त्रोत -काळाची गरज ( Multiple Income Source Is a need of an hour ).

 || श्री स्वामी समर्थ ||





आपले संपूर्ण आयुष्य हे एकाच गोष्टी भोवती फिरत असते ते म्हणजे “ पैसा “. आपल्या दिवसाची सुरवात आणि शेवट सुद्धा ह्याच गोष्टीवर अवलंबून असतो . “ पैसा “ जगायला दुय्यम आहे अशी कितीही  वक्तव्ये आपण ऐकली तरी पैशाशिवाय आपण जगू शकणार नाही हे अंतिम सत्य आहे. भरल्या पोटीच सर्व गोष्टी सुचतात अन्यथा सर्व व्यर्थ आहे. पैसा खिशात असेल तर समाजात ,कुटुंबात मान असतो .


आयुष्य आज आहे तसे नेहमीच राहणार नाही त्यात प्रचंड उलथापालथ कधीही होऊ शकते हा मोठा धडा आपल्याला करोनाने दिला आहे . आज जगातील कित्येक देश दारिद्रय रेषेखाली आहेत . सध्या तर जागतिक मंदी आहे. रुपयाची घसरण रोज होताना आपण पाहत आहोतच . थायलंड सारख्या देशात तर कुटुंबातील सगळ्या लोकांनी काम केल्याशिवाय त्यांचे घर चालणे कठीण असते . पुढील १० वर्षातील नोकर्यांचा प्रश्न किती गंभीर असू शकतो हि विचार करण्यासारखी गोष्ट आहे . 


ह्या सर्व पार्श्वभूमीवर एक विचार पुढे येतो तो म्हणजे आज कुटुंबात अर्थार्जनाचे अनेक स्त्रोत निर्माण करणे गरजेचे झाले आहे . नुसत्या एकाच्या नोकरीवर आपल्या कौटुंबिक गरजा भागवणे दिवसागणिक कठीण होत आहे . आयुष्यात कधीही काहीही होऊ शकते . कुटुंबप्रमुख एकटाच मिळवत असेल आणि त्याच्यावर काही संकट आले तर त्या कुटुंबाची आर्थिक दृष्टीने ससेहोलपट होणार हे नक्की . 


म्हणूनच आज एक विचार मांडावासा वाटतो कि “ Multiple Income Source Is a need of an hour “. माननीय पु. ल. देशपांडे ह्यांनी म्हंटले आहे कि पोट भरण्यासाठी नोकरी करावी पण असा एखादा छंद जोपासावा जो तुम्हाला आयुष्य  खर्या अर्थाने जगायला शिकवेल ,आनंद देईल. आजची आर्थिक परिस्थिती बघता असे म्हणावेसे वाटते आहे कि आपल्यातील सुप्त गुण  ओळखा त्याचे नुसतेच छंदात रुपांतर न करता त्यातून अर्थार्जनाचा स्त्रोत कसा निर्माण करता येयील ह्याकडे लक्ष द्या. 


आज आपल्यातील अनेक स्त्रिया उत्तम सुगरणी आहेत त्यांनी त्यातून खरच अर्थार्जनाचा स्त्रोत तयार केला तर पैसे तर मिळतील पण स्वतःची एक नवी ओळख निर्माण होईल , वेळ छान जायील आणि मन शांत आणि व्यस्त राहिल्यामुळे आरोग्य उत्तम राहील. खरोखर आज मुलांच्या शाळांच्या फी ऐकल्या तरी तोंडचे पाणी पळते , भाज्यांचे भाव , अन्नधान्य सगळी महागाई आहे आणि त्यामुळे मध्यमवर्गीय माणसाचे रोजचे जगणे सुद्धा पैशाच्या गणिताशी निगडीत आहे. 


रिकामे मन म्हणजे सैतानाचे घर . मग त्यात उगीच नको ते विचार आणि त्यामागून येणारी फुकटची आजारपणे त्यामुळे आपल्याला जी कला येते आहे जसे कागदी फुले बनवणे , मेहेंदी , कलाकुसरीची कामे , भाजण्या मसाले , लोणची असे वर्षाचे टिकाऊ पदार्थ बनवणे , एखादी कला जसे हार्मोनियम , तबला शिकवणे , शाळेतील विद्यार्थ्यांच्या ट्युशन , ज्योतिष शास्त्रा सारख्या दैवी शास्त्राच्या कार्यशाळा , शेअर मार्केट , घरी अत्तरे तयार करणे, फुलवाती ,गवले  एक ना दोन असे अनेक अनेक उपक्रम आपल्याला राबवता येतील आणि त्यातून अर्थार्जन नोकरी सांभाळून करता येयील.असे वाटते.  जी गोष्ट आपण विरंगुळा ह्या दृष्टीकोनातून बघतो त्यातून स्वतःलाच नाही तर इतरानाही अर्थार्जन मिळवून देता येयील हा दृष्टीकोण तयार झाला पाहिजे . काय वाटते .


आपण आज व्यस्त राहणे अत्यावश्यक आहे.  माणसाचे मन आधी आजरी पडते मग शरीर त्यामुळे आपल्या आवडत्या छंदात , कलेत आपले मन गुंतून राहणे हे सगळ्या व्याधींवर रामबाण औषध ठरू शकेल . अनेकदा एकटेपणा , वैफल्य ह्या गोष्टी सुद्धा वाट्याला येतात त्यावर सुद्धा आपण आपल्या कला जोपासून मात करू शकतो . आज अनेक स्त्रीपुरुष अनेक प्रदर्शनातून भाग घेवून तसेच घरून सुद्धा अनेक लहान व्यवसाय करतात . आज मुंबई पुण्यासारख्या शहरात कार्यालयात  जाणार्या लोकांसाठी दोन्ही वेळेच्या घरगुती जेवणाचा प्रश्न मोठा असतो ,त्यामुळे असे डबे पोहोचवणे हाही एक उत्तम पर्याय आहे. 

आज आधुनिक काळात झूम सारखे online मध्यम उपलब्ध आहे त्यामुळे जगाच्या कानाकोपर्यात तुम्ही ह्या माध्यमाचा उपयोग करून कार्यशाळा घेवू शकता . लहान मुलांचे संस्कार वर्ग , पाककृती ई. थोडक्यात काय तर नुसता विरंगुळा , छंद ह्याच्या पलीकडे जाऊन पाहणे हि आज काळाची गरज आहे . 

आपले छंद आणि अंगच्या कलागुणांच्या व्यासंगातून जर अर्थार्जन करता आले आणि अनेकांचे पोशिंदे हि झालो तर आत्मविश्वास वाढेल आणि जगण्याला खर्या अर्थाने अर्थही प्राप्त होईल. मी काहीतरी करत आहे हि भावना आपल्याला जगवत असते.

मंडळी पैसा मिळवणे जितके आवश्यक आहे त्याहीपेक्षा त्याची आपल्या भविष्यासाठी उत्तम गुंतवणूक करणे हे त्याहीपेक्षा कित्येक पटीने अधिक महत्वाचे आहे . पैसा हवा तिथे खर्च केलाच पाहिजे पण पुढे कुणासमोर हात पसरायची वेळ येणार नाही ह्याची तरतूद सुद्धा करता आली पाहिजे . शेवटी आज ज्याच्या खिशात पैसा त्याला मान हि एकंदरीत  मनोधारणा आहे.

पैसा नसेल तर जगात काय आपल्या कुटुंबात सुद्धा आपली किंमत शून्य आहे ह्याचा अनुभव अनेकदा आपण घेतच असतो.

हि दिवाळी आपल्या सर्वाना उत्तम गुंतवणुकीच्या माध्यमातून समृद्धतेची जावूदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना .


संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230  

 


Monday, 24 October 2022

ज्योतिष आणि हिमालय - ह्या जन्मातील तुमच्या अस्तित्वाच्या खुणा जपणारे हे शास्त्र

|| श्री स्वामी समर्थ ||


ज्योतिष शास्त्राला अथांग महासागराची उपमा दिलेली आहे . मला मात्र हे दैवी शास्त्र हिमालायासारखेच भासते . हिमालयाकडे पाहिले कि आपोआप आपले मस्तक त्याच्यासमोर झुकले जाते अगदी तसेच हे शास्त्र खूप काही देण्यासाठी आपले दोन्ही बाहु पसरत आहे असा जणू भास होतो. हिमायाचे वैभव पहिले कि आपला अहंकार गळून पडतो . आकाशगंगेतील हे ग्रहतारे म्हणजे हिमालयाची उत्तुंग शिखरे आहेत त्यांना जिंकण्याचा उन्मत्त पणा करू नये , त्यांना प्रेमाने अपुल्कीनेच जिंकता येयील आणि तसे झाले  तरच ग्रहांची बोलीभाषा हळूहळू समजू लागेल. जितकी हिमालयाची उंची तितकीच आपल्या अभ्यासाची खोली सखोल असली पाहिजे . आपल्याकडे येणारा जातक त्याच्या दुखाने गर्भगळीत झालेला , पिचलेला आणि असंख्य संकटांच्या फेर्यात अडकलेला असतो . हिमालयासारखा गारवा आपल्या प्रेमळ सकारात्मक वाणीने त्याला आपल्याला देता आला पाहिजे . 


बघा ज्योतिषाचा मूळ गाभा हे आपले कर्मच तर आहे. मनुष्य कर्म करायला बांधील आहे आणि त्यानुसार त्याला फळाची प्राप्ती होणार आहे . ज्योतिष हि विद्या शिकवताना शिक्षकानेही आपले मन हिमालयासारखे ठेवले पाहिजे आणि हातचे काहीही न राखून ठेवता मुक्त हस्ताने हे ज्ञान देऊन खर्या अर्थाने ह्या शास्त्राचे सेवक झाले पाहिजे. ह्या ज्ञानाचा कुठे आणि कसा उपयोग करायचा ह्याला जश्या मर्यादा आहेत ,बंधने आहेत तसेच त्यातून घेतला जाणारा मोबदला किंवा मानधन ह्याला सुद्धा आहेत  किबहुना त्या असल्याच पाहिजेत . हिमालयासारखी ज्ञानाची उंची गाठणाऱ्या ह्या शास्त्राच्या सेवकाना कुठल्याही पदवीची , हारतुरे आणि सन्मानाची , पारितोषिकांची गरज नाही कारण तो ह्या सर्वाच्या खूप पुढे आहे. 


श्री गजानन महाराजांनी भक्तांना सांगितले अही कि माझा फोटो ठेवुन बाजार मांडू नकोस .त्याचप्रमाणे ज्योतिष शास्त्राचा बाजार मांडू नये तर ह्या शास्त्रापुढे नतमस्तक व्हावे . ज्याला ह्या ज्ञानाबद्दल आणि शास्त्राबद्दल अत्यंत मनापासून कळकळ आहे त्यालाच हे शिकवावे अन्यथा सर्व फोल ठरेल. आपल्या गतजन्माशी असणारे आपले धागेदोरे सहजपणे उलगडून दाखवणारे तसेच ह्या जन्मातील तुमच्या अस्तित्वाच्या खुणा जपणारे हे शास्त्र अगाध आहे , जनमानसावर ह्या शास्त्राचा खोल पगडा आहे , ज्योतिष ह्या विषयाबद्दल कुतूहल नाही अशी व्यक्ती ह्या अखिल विश्वात नाही . आपल्या भविष्यातील अंधारात चाचपडत राहण्यापेक्षा ह्या शास्त्राचे मार्गदर्शन घेवून आयुष्य सुकर , समाधानी करण्याचा प्रयत्न मनुष्य करत असतो .

हिमालया पर्यंत जो पोहोचला तो जातकाच्या उत्तरापर्यंत पोहोचला आणि आपले उत्तम कर्मच , साधना आपल्याला तिथवर नेऊ शकते. आपली साधना , मानसपूजा आणि नामस्मरण हिमालया इतकेच उत्तुंग असले पाहिजे . त्यातील भाव १०० नंबरी खरा असला पाहिजे .पत्रिका आपल्याला आरपार दिसली पाहिजे . भविष्यातील घटनांचा मागोवा घेण्यासाठी  साधना निश्चित उपयोगी पडते . 


वरवरचे पोपटासारखे पुस्तकी ज्योतिष उपयोगी नाही , ज्योतिषाला स्वतःचे विचार तारतम्य ,  अभ्यासाची दिशा असलीच पाहिजे . आपल्या आणि समोरच्याच्या वेळेचे भान सुद्धा असले पाहिजे . मी किती हुशार आणि विद्वान आहे हे न सांगता त्याच्या पत्रिकेतील बलवान ग्रह त्याला काय देऊ शकतो हे सांगता आले पाहिजे. अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा डोळा दिसला तसे आपल्याला फक्त जातकाचा प्रश्न दिसला पाहिजे .


आपल्या बोलण्यात जातकाला विश्वास वाटला पाहिजे. एखादी घटना त्याच्या आयुष्यात का घडली किंवा घडणार नाही ह्याचे योग्य विश्लेषण करता आले पाहिजे तरच जातकाला ह्या शास्त्राबद्दल आणि ज्योतिषाबद्दल सुद्धा नितांत आदर वाटेल. 

हिमालयासारखी आपल्या ज्ञानाची उंची मिळवण्यासाठी अथक परिश्रम लागतात आणि ते करण्याची तयारी फार कमी लोकांची असते कारण हल्ली instant चा जमाना आहे.  एकच शास्त्र शिका पण त्याचे टोक गाठा हे होत नाही . असो 

प्रत्येकाच्या आयुष्यात हिमालयाच्या ताकदीचे अध्यापक यावेत आणि आपले ज्ञान तितक्याच उंचीला जावे ह्याच सदिछ्या.


संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230





 

 

Sunday, 23 October 2022

मार्गस्थ करणारे सद्गुरू आणि शनी

 || श्री स्वामी समर्थ ||


आपल्या आयुष्यात अनेक अचंबित करणाऱ्या अनाकलनीय घटना घडत असतात . अचानक माणसे आपल्या आयुष्यात येतात ,अचानक निघूनही जातात . एखाद्या व्यक्तीशिवाय आपण जगू शकणार नाही असे आपल्याला वाटत राहते त्या व्यक्तीला तितक्याच सहजपणे आपण कधी विसरून जातो ते आपल्यालाही समजत नाही. एखाद्या गोष्टीचा इतकं अट्टाहास करतो तीच गोष्ट काही दिवसांनी नकोशी वाटू लागते . एखादी मैत्री कमी काळात इतकी घट्ट होते आणि काही दिवसात ती जणू अळवावरचे पाणी ठरते .अनेकदा एखादी घटना हमखास घडणार असे वाटते पण तो आपला भ्रम ठरतो . ह्या सगळ्याचा वेध घेतला तर एक लक्ष्यात येते कि एक शक्ती आहे जी आपल्या अवकाल्नाच्या खूप पलीकडे आहे आणि तिच्या हातात सगळ्याची सूत्रे आहेत ,मग त्या शक्तीला कुणी काहीही नाव द्या पण ती आहे. दिसत नाही पण अनुभवता येते . 


अध्यात्मात प्रचंड ताकद आहे. आपले सद्गुरू आपल्या मागे सदैव प्रत्येक क्षणी उभे असतात , जेव्हा आपल्यावर एखादा प्रसंग येणार असतो तेव्हा ते आपल्यासमोर उभे ठाकतात आणि सर्व निभावून नेतात .


आपल्याला जे दिसत नाही ते त्यांना दिसते , आपल्याला जे ऐकू येत नाही ते त्यांना ऐकू येते आणि म्हणूनच ते आपल्यासाठी काहीतरी वेगळे प्लान करत असतात जे आपल्या भल्यासाठीच असतात . म्हणूनच एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून अचानक निघून गेली तर ती त्यांनीच केलेली लीला समजायला हरकत नाही . कारण ते त्रिकालज्ञानी आहेत सर्वेसर्वा आहेत . आपला त्यांच्यावरील विश्वास अभेद्य आणि अखंड असला पाहिजे .


ह्या सर्व घटनांमध्ये दडलेला विलक्षण अर्थ सर्व सामान्य व्यक्तीच्या बुद्धीच्या विचारांच्या पलीकडे असल्यामुळे त्यांना प्रचंड दुक्ख होते ,वाईट वाटते पण जसजशी आपली साधना वाढते तसे आपल्याला ह्या घटनांच्या मागील अर्थ उमगतो . दुसर्यामुळे आपले आणि आपल्यामुळे दुसर्याचे होणारे नुकसान त्यांनी थांबवलेले असते हे जाणवते आणि आपण मनात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. 


एखादी व्यक्ती अचानक आपल्या आयुष्यातून निघून का गेली ह्याचे उत्तर शोधण्यात आपल्या साधनेचा वेळ साधक घालवणार नाहीत . जे होते आहे आणि होणार आहे ते त्यांच्याच इच्छेने हि भावना म्हणजेच आपली सद्गुरूंवर असलेली निष्ठा होय .

एकदा एक माणूस आपल्या कुटुंबासमवेत बाहेरगावी जाणार होता . सर्व तयारीनिशी त्याच्या गाडी जवळ येतो आणि बघतो तर त्याची गाडीच गायब . शेवटी त्याची तक्रार पोलिसात करून तो ट्रेनने रवाना होतो. चार दिवसांनी घरी आल्यावर त्याची गाडी नेहमी असते तिथेच उभी असलेली त्याला बघायला मिळते , एक थेंब सुद्धा पेट्रोल कमी झालेले नसते कि गाडीला एकही ओरखडा नसतो. आता सुज्ञास सांगणे न लगे . 

एकदा त्यांच्या शाळेत नाव घातले कि निर्धास्त राहायचे , चुकले तर माफी मागायचीही लाज वाटायला नको . संत हे त्रिकालज्ञानी आहेत आणि त्यांच्या तेजोमय अस्तित्वाने आपल्याला ते मार्गस्थ करत असतात.


आज शनी सारखा बलाढ्य ग्रह सुद्धा मकर राशीत मार्गस्थ होत आहे. मार्गी होणे म्हणजे तुमच्या अडलेल्या कामात तुम्हाला मार्ग मिळणे . शनीने आपल्या वक्री अवस्थेत सगळ्यांचे लगाम खेचून धरले होते आता सगळ्यांच्या कामाला गती येयील अर्थात सचोटी , कष्ट , साधना , नम्रता आणि प्रयत्नांची पराकाष्टा करतील त्यांच्याच पाठीवार शनी सारख्या ग्रहाची शाबासकीची थाप पडेल. 

तुम्हा आम्हा सर्वांवर सद्गुरूंची कृपा अशीच बरसत राहुदे .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230