Saturday, 30 September 2023

विवाहासाठी योग्य स्थळे का सांगून येत नाहीत ????

 || श्री स्वामी समर्थ ||




हिंदू संस्कृती मध्ये विवाह हा 16 संस्कारातील एक संस्कार आहे. विवाहाच्या गाठी स्वर्गात जरी बांधल्या गेल्या असल्या तरी ते संपन्न ह्या भूतलावर होतात . विवाह हा आयुष्यातील सर्वात मोठा बदल . एक नवीन नाते जे अनेक अपेक्षा आणि स्वप्न उराशी घेवून येते . हे नुसतेच दोन जीवांचे मिलन नसून दोन कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मिलन म्हंटले तर वावगे होणार नाही.

आज ज्योतिषीय दृष्टीकोणा तून ह्याकडे थोडे पाहूया . विवाह म्हंटला कि डोळ्यासमोर येते ते पत्रिकेतील सप्तम स्थान कारण तेच आपल्या जोडीदाराचे स्थान आहे. सप्तमस्थानात त्या दोघांचे मनोमिलन आहे म्हणूनच तिथे गोडवा जपणारी शुक्राची तूळ राशी आहे. आजवर जपलेली नाती आणि आता गुंफले जाणारे नवीन नाते ह्यात समतोल राखा असेच जणूकाही ह्यातून सूचित होते .  द्वितीय भाव विचारात घ्यावा लागतो कारण तिथे आपले कुटुंब आहे. एक नवीन नाते घडत असताना कुटुंबात सुद्धा एका सदस्याची भर होते म्हणजेच कुटुंब वृद्धी होते  आणि द्वितीय भाव कुटुंब दर्शवतो म्हणून तोही विचारात घ्यावा लागतो. विवाह मुळे व्यक्तीला होतो तो लाभ आणि इच्छापूर्ती म्हणून लाभ भाव आणि अनेकदा प्रणयाच्या रंगाची परिणीती विवाहात होते म्हणून 5 भाव सुद्धा पाहावा लागतोच .


जन्म हा मुळातच कामवासनेतून झालेला असतो आणि त्याचा प्रमुख ग्रह शुक्र , त्याला उर्जा देणारा मंगळ तसेच सप्तमेश आणि अर्थात गुरु ह्या ग्रहांचे पत्रिकेतील स्थान आणि विवाहाच्या समयी चालू असणारी महादशा अभ्यासावी लागते . 

अनेकदा विवाहात फसवणूक होते मग आपण समोरच्या व्यक्तीला दोष देऊ लागतो . त्यांनी आमची फसवणूक केली . पण त्याने तुमचीच का फसवणूक केली ? कारण फसवणूक करून घेण्याचे किंवा फसण्याचे ग्रहयोग तुमच्याच पत्रिकेत  आहेत म्हणून तुम्ही फसलात. पूर्वजन्मीचे हे संचित कर्म आहे . तुम्ही कुणाला तरी फसवलेत म्हणून आता कुणीतरी तुम्हाला फसवले . म्हणून इतरांना दोष देण्यापूर्वी स्वतःच्या पत्रिकेतील योग नीट समजून घ्या . 


विवाहासाठी स्थळे पाहताना पालक अनेक प्रश्न विचारात असतात त्यातील सातत्याने विचारला जाणारा प्रश्न म्हणजे “ आम्हाला साजेसे , हवे तसे स्थळ का नाही मिळत ? कुठे चेहरा पसंत नाही तर कुठे पत्रिका जुळत नाही . मग मनासारखे स्थळ मिळणार तरी कधी आणि कसे ? हे प्रश्न वर आणि वधूच्या पालकांना भेडसावत असतात .


विवाह हा सुद्धा योग आहे आणि जेव्हा त्याला पोषक अशी ग्रहस्थिती असते तेव्हाच असे योग जुळून येतात . हि ग्रहस्थिती नैसर्गिक रीतीने येते तेव्हाच विवाह जुळून येतो . आपण ओढून ताणून तर ग्रहयोग तयार करू शकत नाही . महादशा स्वामी त्याचा हक्क आणि अधिकार बजावणारच त्याला आपण डावलून काहीच करू शकत नाही. एखादा महादशा स्वामी विवाह ह्या घटनेचे समर्थन करतच नाही म्हणून मग अश्या ग्रहाची दशा वयाच्या 27 28 ला सुरु झाली आणि वयाच्या 43 45 पर्यंत असेल तर तेव्हड्या कालावधीत विवाह जमत नाही आणि ओढून ताणून केला तर यशस्वी होत नाही. योग्य वेळेची वाट पाहणे हेच आपल्या हाती असते . अनेकदा महादशा स्वामी पूरक असेल तरी योग्य अंतर्दशेची वाट पहावी लागते . दोन्ही योग जुळले तर विवाहा साठी मार्ग मोकळा होतो. स्थळ पसंत पडते . अनेकदा विवाह होतो पण पतिसुख कमी असते कारण कुठेतरी षष्ठेश ठाण मांडून पतीसुखात विघ्न आणत असतो मग अश्यावेळी नवरा परदेशी गेलाय पण पत्नीला त्याच्याकडे जाण्यासाठी विसा मिळत नाही . नवर्याची रात्रपाळीची नोकरी आणि पत्नीची दिवसाची , नवर्याची दुसर्या शहरात बदली होते पण पत्नी मुलांच्या शाळा आणि इतर गोष्टींमुळे त्याच्यासोबत जाऊ शकत नाही . ह्या गोष्टी सुद्धा आपण स्वीकारल्या पाहिजेत , पत्रिकेतील हे सर्व योग आपल्या पूर्व संचीताप्रमाणे आहेत आणि ते जाणून घेवून आहेत तसेच स्वीकारले तर त्यात शहाणपण आहे. प्रत्येक गोष्टीला उपाय नसतो त्यामुळे आहे ते स्वीकारले तर आयुष्य अधिक सुकर होयील. उगीचच लग्नात गुरु आला आणि सप्तमात गुरु आला मग विवाह होईल असे म्हणणे उचित होणार नाही कारण दशा स्वामी जोवर अनुकूल होत नाही तोवर योग येणारच नाही .

सप्तमेशासोबत असणारे पापग्रह , विशेषतः हर्शल नेप तसेच सप्तमातील आणि त्यावर दृष्टी टाकणारे पापग्रह सुद्धा विवाहात अनेक अडथळे निर्माण करतात . एखाद्या पत्रिकेत उत्तम विवाह सुख असेल तर उशिरा झाला तरी , विवाह उत्तम पार पडतो कारण मुळातच वैवाहिक सुख आहे म्हणून उत्तम वैवाहिक सुख असणार्या पत्रिका गुण मिलनासाठी येतात आणि विवाह संपन्न होतो.

 एखाद्या पत्रिकेत वैवाहिक सुख दुरदुरपर्यंत दृष्टीक्षेपात नसेल तर तश्याच म्हणजे वैवाहिक सुख नसणाऱ्या पत्रिकाच सांगून येतात किंवा उत्तम पत्रिका आल्या तर त्यांचे गुण आपल्या पत्रिकेत जुळणार नाहीत . आपल्या पत्रिकेत जसे योग असणार तश्याच पत्रिका आपल्याला सांगून येणार .त्यामुळे मुळात आपले ग्रहमान खुल्या दिलाने स्वीकारता आले पाहिजे . उगीचच डोंगरा इतक्या अवाजवी अपेक्षा समोरच्या व्यक्तीकडून ठेवण्यात तसाही काही अर्थ नाही.

प्रत्येकालाच परीकथेतील राजकुमार हवा असतो .पण आपल्या नशिबाप्रमाणे मिळालेला जो कुणी आहे तोही राजकुमारा पेक्षा कमी नाही हा भाव ठेवला तर वैवाहिक सुख उत्तम लाभेल . विवाहच नाही तर आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा एक योग असतो आणि शहाणा माणूस योग्य वेळेची वाट पाहतो .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230



Friday, 29 September 2023

पितृ ऋण

 || श्री स्वामी समर्थ ||


भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष म्हणजेच पितृपक्ष.  पितृपक्षात शुभ कार्य निषिद्ध आहेत .ह्या काळात आपले पितर आपल्या कुटुंबातील व्यक्तीस आशीर्वाद द्यायला येतात त्यामुळे आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या तिथीस त्यांचे श्राध्द करणे हे आजमितीला हयात असलेल्या कुटुंबातील लोकांचे परम कर्तव्य आहे. श्राद्ध करायलाच लागते का ? तर हो . आपले so called modern विचार निदान ह्या धर्माने आचरणात आणायच्या गोष्टीत तरी नको यायला. आम्ही काही हे मानत नाही , आम्ही त्यांच्या नावाने एखाद्या संस्थानाला दान करतो ह्या गोष्टी आजकाल सर्रास ऐकायला मिळतात . इतके करता तर मग वडिलोपार्जित संपत्ती सुद्धा एखाद्या धर्मादाय संस्थेला का नाही देत ? ती मात्र हवी त्याच्यासाठी डोकेफोडी करतील पण श्राद्ध करायचे म्हंटले कि नको ते शहाणपण सुचते . 

आपण ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो , ज्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य आपल्याला उभे करण्यासाठी वेचले त्यांची आठवण म्हणजेच ते ज्या दिवशी गेले त्या तिथीस श्राद्धकर्म करणे . आपण वडिलोपार्जीत संपत्तीचा उपभोग घेतो , आपल्या पूर्वजांचे म्हणजेच कुळाचे नाव लावतो , आपल्याला वारसाहक्काने मिळालेल्या मग ती भूमी , वाहन , संपत्ती , जमीन जुमला , धन , पैसा , दागदागिने काहीही असो त्याचा हक्काने उपभोग घेतो त्यासाठी एकमेकांच्या उरावर बसून कोर्टाची पायरी चढल्याची कित्येक उदा आज ऐकायला,  पाहायला मिळतात . गेलेल्या व्यक्तीचे आणि आपले कदाचित वैचारिक मतभेत सुद्धा जन्मभर असू शक्ती , नाकारत नाही पण आता ती व्यक्ती पुढील प्रवासास गेली आहे . अहो माणूसच गेला त्याच्यासोबत सर्व काही गेले आहे. त्यांचे श्राद्ध करणे हि परमेश्वराने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आपल्याला दिली आहे ज्याचे आपण सोने केले पाहिजे , पण आपण करंटे तेही करत नाही. 


आपल्या पूर्वजांनी संपत्ती धन त्यांच्या कष्टाने मिळवली,   त्याचा ठेवा पुढील पिढ्यांना सुपूर्द केला. नुसतेच धन संपत्ती नाही तर अनेक नाती जोडली , माणसे जोडली , आपली ओळख निर्माण केली , एकत्र सण साजरे केले कुटुंबातील गोडवा जपला आणि पर्यायाने आपल्याही आयुष्याला आकार दिला . मागील पिढ्यात प्रत्येक गोष्ट एकमेकांना विचारून करणे , घरातील मोठ्यांचा मान राखणे ह्या गोष्टी होत्याच , आजकाल कुटुंबे विखुरली आहेत .थोडे विषयांतर होते आहे पण अनेक वेळा आपल्यालाच आपल्या आई वडिलांची तिथी सुद्धा माहित नसते तर आपल्या मुलांना कुठून माहित असणार .वडिलोपार्जित संपत्ती सोबत आपल्या पूर्वजांनी केलेल्या दुषित कर्मांचा वाटा सुद्धा आपल्याला उचलावा लागतो , ह्या सर्वातून गेलेल्या आत्म्याच्या अनेक इच्छा राहिल्या असतील त्यांना शांती मिळावी म्हणून श्राद्ध केले जाते . श्राद्ध न केल्यामुळे घराण्यातील पितृदोष वाढतो  हे लक्ष्यात घ्या . 

पिढ्यान पिढ्या लोक धर्माचे पालन करत आहेत ते मूर्ख म्हणून नाही तर ते शास्त्राला मान देत आहेत , शास्त्र समजून घेवून एखादी गोष्ट कुणीच नाकारणार नाही पण आपण ते समजून घेण्याच्याही पलीकडे गेलो आहोत . धर्म , रिती शास्त्र एक वेळ बाजूला ठेवूया पण गेलेल्या व्यक्तीच्या प्रती आपल्याला काहीच भावना उरल्या नाहीत ? एक क्षण विचार करून बघा. नक्कीच पटेल.

आपल्या कुटुंबातील गेलेल्या व्यक्तीचे श्राद्ध केले नाही तर ते उचित नाही त्याचे परिणाम अगदी लगेच नाही पण कालांतराने निश्चित दिसतात . वडिलो पार्जीत संपत्तीसाठी घरात मतभेद , आयुष्यभर जपलेली नाती सुद्धा त्यासाठी तुटतात , असाध्य आजार , एकटेपणा , कुटुंबात एकमेकांबद्दल प्रेम नसणे ह्या गोष्टी अनुभवायला येणारच कारण आपण आपल्या कर्तव्यात चुकलो आहोत . आहे ते स्वीकारा कि त्यात लाज वाटते कि काय ? अहो कसला हा आळस ? तुम्हाला घरी कुणी यायला नकोय का? चार लोक घरी आली कि त्यांची उठबस करावी लागते ते कष्ट घ्यायची तयारी नाही. आजकाल तर श्राद्धाचा सर्व स्वयंपाक सुद्धा तयार मिळतो अजून काय हवे ? गेलेल्या माणसाने आपल्यासाठी आयुष्य खर्ची केले आपल्याला माणूस म्हणून घडवले, आपली शिक्षणे , विवाह काय केले नाही आपल्यासाठी ? आणि आजही त्याच्याच जीवावर आहोत आपण ह्याचा क्षणभर सुद्धा विसर नको . त्यांच्यासाठी एक दिवस काय चार तासाचा विधी करू शकत नाही आपण. खरच दुर्दैव आहे. 

अनेक जण प्रश्न विचारतात , काही लोक काहीच करत नाहीत श्राद्ध सोडा अगदी रोजची पूजा देवधर्म काहीच नाही तरी त्यांचे सर्व छान चालू आहे ते कसे? कारण त्यांच्या पूर्वजांनी आणि त्यांनी स्वतः अनेक जन्मात जे काही चांगले कर्म केले त्याची चांगली फळे ते भोगत आहेत उपभोगत आहेत पण आज ना उद्या तो संचय संपणार आहे मग पुढे काय ? तो संपला कि ह्या जन्मीची चांगली वाईट फळे त्यांना भोगावी लागतीलच . कदाचित ह्या जन्मात नाही पण ती भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावाच लागेल. 

श्राद्ध करायचे नाही म्हणून काहीतरी कारण सांगून पळवाट खरच काढू शकतो का आपण तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. आपल्या धर्माने सांगितलेल्या गोष्टींचे पालन न करणे आणि आपल्याला मनाला येयील तसे वागणे हे योग्य नाहीच नाही. आपल्याला पूर्वजांची तिथीच माहिती नसेल तर निदान सर्वपित्री आमावस्येला तरी पितरांसाठी श्राद्ध करून पान ठेवणे हे आपण केलेच पाहिजे. आपण नाही केले तर आपल्यासाठी आपली मुलेही करणार नाहीत किबहुना त्यांना त्याचे धार्मिक महत्व समजणारच नाही कारण आपल्यालाच ते समजले नाही. आपल्या परंपरांना काहीतरी अर्थ आहे , त्या डावलून आपण काय सिद्ध करणार आहोत ? विचार करा . नुसतेच पुण्य मिळवण्यासाठी नाही तर ते न केल्यामुळे पुढे निर्माण होणारे अनर्थ टाळण्यासाठी सुद्धा आहेच. 


हे श्राद्ध कर्म करून आपण आपल्या पितरांच्या आशीर्वादाचे धनी होणार आहोत पण त्याहीपेक्षा कित्येक पटीने  मनाला आत्यंतिक समाधान सुद्धा लाभणार आहे. आपण आपली कर्मे वाढवून न घेता ती उत्तम रीतीने पार पाडत आहोत हे समाधान सगळ्यात महत्वाचे नाही का ? अर्थात ते आदराने प्रेमभावनेने आणि कृतज्ञतेने केले तर पितरांना ते आवडेल अन्यथा नुसतेच करायचे म्हणून केले तर ते न केल्यासारखेच आहे नाही का. 

माझे माझ्या वडिलांवर आईवर आजीवर खूप प्रेम आहे हि एकमेव भावना सुद्धा श्राद्ध करण्यासाठी पुरेशी आहे , नाही का?

श्राद्ध कर्म हे पितृ ऋण फेडण्यासाठी नाहीच कारण ते तर कधीच फिटले जाणार नाही पण त्या ऋणाची आठवण स्मरण आपल्या मनाला करून देण्यासाठी आहे.


ज्यांना ह्या गोष्टी पटत नाहीत त्यांनी कृपया ह्या लेखावर आपली मते अजिबात मांडू नका हि विनंती आहे. ज्यांची श्रद्धा आहे ज्यांना पटत आहे त्यांनी वाचावे इतरांनी सोडून द्यावे. धन्यवाद .


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 



Friday, 22 September 2023

केतू

 || श्री स्वामी समर्थ ||


कुंडली अभ्यासताना आपले लक्ष्य लग्न , लग्नेश आणि चंद्र ह्याकडे प्रथम जाते आणि त्यानंतर आपण सर्वच ग्रहांचा अभ्यास करतो. पण विशेष लक्ष्य जाते ते राहू आणि केतू ह्यांच्याकडे . सर्वसाधारण लोकात राहू आणि केतू म्हंटले कि लगेच घाबरणे, नकारात्मक विचार हि पहिली प्रतिक्रिया असते . माझी राहूची , केतूची दशा आहे आता माझे काही खरे नाही किंवा आता काय ? हे प्रश्न पडतात ह्याचे मुळात कारण आपला चुकीचा दृष्टीकोण आणि अर्धवट ज्ञान जे अधिक घातक असते. कुठेतरी काहीतरी वाचायचे आणि ते आपल्याच असे बाबतीत होणार हा चुकीचा निष्कर्ष काढायचा .असो .


राहू आणि केतूची पौराणिक गोष्ट सर्वाना माहित आहे. एका अमृताच्या थेंब प्राशन करून  ते आयुष्याची लढाई लढताना दिसतात . आपल्याला ज्या गोष्टींचा ध्यास आहे किंवा ज्या मिळवण्यासाठी आपली धडपड चालू असते त्या सर्व इच्छा राहू प्रेरित करतो आणि ज्या गोष्टींपासून आपल्याला विरक्त व्हायचे असते त्या केतू निर्देशित करतो. राहुकडे दृष्टी आहे त्यामुळे त्याला ह्या जगातील भौतिक सुखांची लालसा आहे आणि केतुकडे फक्त मन आहे तो मनाने ह्या जगाकडे पाहतो त्यामुळे केतू आपल्याला अंतर्मुख करतो.


आपल्या गतजन्मातील कर्माशी आपल्या ज्या जन्माची नाळ जोडलेली आहे आणि पूर्व जन्मीची कर्मे केतूच दर्शवत असतो .आपले प्रथम नक्षत्र सुद्धा “ अश्विनी “ आहे जे केतुचेच आहे . केतुकडे दृष्टी नाही त्यामुळे तो ह्या सुंदर जगाचा आस्वाद इच्छा असूनही घेवू शकत नाही पण त्याच्याकडे मनाचे नेत्र आहेत तो मनाने पाहू शकतो . मन म्हणजेच अंतर्मन म्हणूनच केतूच्या दशेत जातक विरक्त होऊन आपल्या आतमध्ये पाहणे म्हणजेच अंतर्मुख होत अध्यात्माकडे वळवतो. मुळातच पत्रिकेत गुरु चांगला असेल आणि केतुही तर नक्कीच उपासना ध्यान धारणा ह्याकडे व्यक्तीचा कल असतोच असतो. 

उपासना मारून मुटकून करून घेता येत नाही तर ती वृत्ती मुळातच व्यक्तीमध्ये असावी लागते आणि ती केतूच देतो .पूर्वजन्मीचा आरसा म्हणजे आपली पत्रिका आणि त्यानुसार असते ती आपल्या सर्वच ग्रहांची बैठक पण पूर्व जन्मीच्या कर्माचा हिशोब केतुकडे असतो ज्याला आपण संचित कर्म म्हणतो.

ज्या गोष्टीचा पूर्ण आस्वाद किंवा भोग आपण पूर्वीच्या जन्मात घेतले असतील त्या गोष्टी आणि आता ह्या जन्मात आपल्याला नको आहेत आणि त्याच गोष्टींपासून केतू आपल्याला विरक्त करतो . उदा केल्या जन्मात वडिलोपार्जित संपतीचा उत्तम उपभोग व्यक्तीने घेतला असेल तर ह्या जन्मात त्या व्यक्तीला त्याची हाव नसणार . वडिलोपार्जित संपतीसाठी त्याचा हव्यास किंवा हाव नसेल . आईवडिलांच्या इच्छे नुसार आपल्याला जे मिळाले आहे तो त्यांचा आशीर्वाद समजून तो आपले आयुष्य व्यतीत करेल .पण राहुला  गेल्या जन्मात हि संपत्ती उपभोगायला मिळाली नसेल तर तो मात्र ह्यासाठी हव्यास नक्कीच करेल. पण त्याला ती मिळेलच असेही नाही. ती मिळवण्यासाठी तो धडपड मात्र करत राहील.

राहुकडे हव्यास आहे desire आहे तर केतुकडे विरक्ती आहे. व्यक्तीकडे एखाद्या कलेसाठी रुची असेल पण त्यात तो पुढे जायील असे नाही हाच केतू आहे. अश्या लोकांमध्ये नैसर्गिक काही गोष्टी असतात पण ते त्या व्यक्त करणार नाहीत कारण केतू त्यांना त्या त्यापासून विरक्त करेल.

दशमात केतू असेल तर त्याने स्वताहून आपल्या कामात रुची घेतली तर ती व्यक्ती खूप यशस्वी होऊ शकेल. केतू ज्या स्थानात आहे तो भाव बघा . त्या भावाने दर्शवलेल्या गोष्टी तुम्हाला नैसर्गिक रित्या येत आहेत पण करायच्या नाहीत . पण त्या केल्या तर त्यात तुम्हाला यश नक्कीच आणि सहज मिळेल. 


मिथुन राशीत केतू असेल तर?  मिथुन रास हि बुधाची आहे आणि सोशल आहे . ह्या लोकांना इतरांच्या संपर्कात राहणे निसर्गतः आवडते पण त्या गोष्टी ते करत नाहीत म्हणजे इतरांच्या संपर्कात राहत नाहीत कारण त्यात केतू आहे . पण स्वताहून जर ह्या व्यक्ती सोशल झाल्या तर त्या इतरांच्या संपर्कात सहजतेने येतील आणि काहीच दिवसात अनेक फॉलोअर्स पण मिळवतील कारण संपर्क करणे किंवा संपर्कात राहणे हा त्यांच्यात नैसर्गिक असलेला गुण आहे ज्याचा वापर ते करतच नाहीत .

केतूला कळसावर असलेल्या पताकेचा मान आहे म्हणूनच वारकरी आपल्या लाडक्या माउलीचे दर्शन त्या पताकेत पाहतात आणि तृप्त होतात . पत्रिकेत गुरु चांगला असेल तर अध्यात्मिक प्रगती होईल पण केतुही जोडीला असेल तर तुमच्या मनाच्या तारा सद्गुरूंच्या हृदयाशी नक्कीच जोडल्या जातील.  

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


 


Tuesday, 19 September 2023

माझा भाव तुझे चरणी

 || श्री स्वामी समर्थ ||





“ मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर करू नका .. “ हे अभिवचन आपल्या समस्त भक्तगणांना देणारे महायोगी संत शिरोमणी “ श्री गजानन महाराज “ ह्यांनी वास्तव्य केलेल्या शेगाव मध्ये ऋषीपंचमीच्या दिवशी समाधी घेतली . गणपती बोळवायला या हे सुतवाक्य त्यांनी आधीच केले होते. मानव जातीला जगण्याचा संदेश देण्यासाठी संतानी ह्या भूमीवर मनुष्य रुपात अवतार घेतले . आज त्यांचे पुण्य स्मरण प्रत्येक भक्त करत आहेच . 


“ बोलण्यात पाहिजे मेळ , चित्त असावे निर्मळ “ हा साधा सोपा जीवनाचा मूलमंत्र देणारया आपल्या महाराजांची दिव्य ज्योत आजही भक्तांना प्रचीती देत आहे . आपल्या हृदयात विराजमान असणार्या आपल्या ह्या गुरूंची सेवा करण्याचे अहोभाग्य आपल्या सर्वाना ह्या जन्मी प्राप्त झाले आहे हि गुरुकृपाच आणि आपले पूर्व संचितच म्हंटले पाहिजे . हृदयापासून त्यांची सेवा करणे हेच आपले काम कारण आपला जन्मच मुळी त्यासाठी आहे. सेवा करा सेवेकरी व्हा , भक्तीत समरसून जा आणि जीवन मृत्युच्या फेर्यातून मुक्त व्हा. 


महाराजांचे नुसते नाव घेतले तरी आपल्या डोळ्यातून अश्रू व्हावयास लागतात आणि हाच तर सगुण भक्तीचा अविष्कार आहे. श्री गजानन विजय पारायण , प्रदक्षिणा , नामस्मरण , मानसपूजा हे सर्व आपल्या व त्यांच्या हृदयापर्यंत नेणारे सेतू आहेत .

त्यांच्या लीला ह्या अवकाशातील चांदण्यापरीच आहेत ज्याची मोजदात होणे केवळ अशक्य आहे. 

त्यांनी समाधी घेतली , शरीर वस्त्रापरी  बदलले असले तरी ते आपल्यातच आहेत आणि आपल्यावर त्यांची कृपादृष्टी आहेत .अधिक काय लिहावे . शब्द संपल्यागत झाले आहे ....


आजवर सांभाळलेत अखेरच्या श्वासापर्यंत तुम्हीच सांभाळा ...इतकेच मागणे आहे. 


माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी ..

गजानन गजानन सांभाळ आपल्या भक्तजना 


सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230