Wednesday, 18 October 2023

प्रेम प्रणय विद्या संतती

 || श्री स्वामी समर्थ ||


पत्रिकेतील पंचम स्थान हे अति महत्वपूर्ण स्थान आहे . आपल्या संपूर्ण आयुष्यात आपण घेतलेले निर्णय ,मग तो निर्णय शिक्षणाचा असो नोकरीचा किंवा विवाहाचा , आपण आपल्या बुद्धीने घेत असतो . हि बुद्धी कशी काम करणार आहे हे सांगणारे हे पंचम स्थान ज्याबद्दल आज जाणून घेवूया . एखादा निर्णय चुकला तर आयुष्यभर पस्तावायला लागते आणि बरोबर आला तर आयुष्य प्रगतीपथावर जाते . आपले विचार , कृती आणि दृष्टीकोण आपल्या बुद्धीवर अवलंबून असतो आणि हि बुद्धी भ्रष्ट किंवा तिरकस असेल तर मग कुसंगत , पापी विचार , चुकीचे निर्णय , नको तिथे पैशाची गुंतवणूक करून व्यक्ती स्वतःची  आणि पर्यायाने आपल्या कुटुंबाची वाताहत करतो. हीच बुद्धी चांगली असेल तर संशोधक वृत्ती , जिज्ञासू पणा , चातुर्य , प्रामाणिकपणा , मनाचा मोठेपणा , बुद्धीचे तेज दिसून येते . बुद्धी चांगली असेल तर विद्या प्राप्त होते आणि त्यामुळेच मनुष्याची सर्वांगीण प्रगती सुद्धा होते. सर्वार्थाने प्रगती करणारे “ शिक्षण  “ हे प्रभावी शस्त्र आणि माध्यम आहे .

अनेक प्रतिभावान , विद्वान लोकांच्या पत्रिकेत ज्यांना मानसन्मान लाभला आहे , कीर्ती ,  मिळाली आहे त्यांचे पंचमस्थान उत्तम रीतीने फलित देताना दिसते . आपली मनोवृत्ती हे संपूर्णपणे आपल्या विचारधारेवर आहे आणि विचारांचा दिशा देण्याचे काम  बुद्धीतून होत असते म्हणूनच पंचम भाव आणि पंचमेश महत्वाचा आहे. पंचम सुस्थितीत असेल तर व्यक्तीकडे अलौकिक बुद्धिमत्ता तर असतेच पण दूरदृष्टी असते , योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असते आणि ह्यासर्वाचा उत्तम मेळ घालून आयुष्य प्रगतीपथावर नेण्यास मदत होते . बुद्धी आणि मन ह्यांचाही जवळचा संबंध आहेच . बुद्धी ठिकाणावर नसेल तर मन निराशेच्या गर्तेत जाते कारण योग्य मार्गच सापडत नाही . संकटांनी त्रस्त आणि दिशाहीन सैरभैर होते . कमकुवत मन विकृतीकडे व्यसनांकडे वळते आणि मग पुढे सर्वच चुकत जाते . 


पंचम भाव हा विद्येचा आहे त्यामुळे शैक्षणिक प्रगती आणि शिक्षणाचा आलेख ह्या भावावरून समजतो . लेखक, कवी , प्रतिभावान नाटककार , कलाक्षेत्र अभिनय क्षेत्रातील समीक्षक , बुद्धिप्रधान सर्वच व्यक्तींचे पंचमस्थान अभ्यासावे . संतती सौख्य पंचमावरून पहिले जाते . प्राणापलीकडे जपलेली आपली संतती आपल्याला सुखकारक आहे कि त्यांच्यापासून आपल्याला काडीचेही सुख नाही ह्याचा उहापोह पंचम भाव आणि पंचमेश ह्यावरून होतो . मुलांचे आरोग्य , शिक्षण , एकंदरीत सफलता , त्यांच्याबद्दल असणार्या चिंता , व्यंग , यश पंचमाची देण आहे. 


पंचम भावावरून इतरही अनेक गोष्टी ज्ञात होतात जसे खेळ , क्रीडा , तंत्र मंत्र साधना , तपश्चर्या , पूर्व संचित , दैवी उपासना , ईश्वरी अनुसंधान भक्ती आणि एकूणच अध्यात्मिक प्रगती , शेअर मार्केट , रेस , सट्टा , लॉटरी , कला . ह्यासोबत प्रेमाला   दिला जाणारा आणि मिळणारा प्रतिसाद , इंद्रिय सुख आणि सुख उपभोगण्याची क्षमता , तसेच नैतिक अनैतिक आचरण , ऐहिक सुखाची लालसा ,प्रणयाचे रंग खर्या अर्थाने खुलवणारे हे स्थान आहे . पंचम हे धर्म त्रिकोणातील महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक भावाचा सखोल अभ्यास असेल तर त्या भावाची महादशा काय काय फळ देयील ह्याचे ठोकताळे मांडता येतील. 


आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ह्या बारा भावातच म्हणजेच आपल्या कुंडलीतील ग्रहस्थितीत दडलेले आहे ...आपला अभ्यास सखोल असेल तर आपल्या कुठल्याही प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपण नक्कीच पोहोचू शकतो . 


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230









Thursday, 5 October 2023

पुन्हा सारीपाट मांडताना - ज्योतिषीय दृष्टीकोण

 || श्री स्वामी समर्थ ||



आधुनिक जगतात जिथे सर्वच काळानुरूप बदलत आहे तिथे विवाह संस्था कशी अपवाद ठरेल ? विवाह संस्थेचे रूप झपाट्याने बदलत आहे आणि त्याला कारण बदलणारी सामाजिक व्यवस्था आणि मानसिकता . अनेकदा आपला वैवाहिक जोडीदार आपला संसार अर्धवट सोडून जातो अश्यावेळी आयुष्यात भयाण पोकळी निर्माण होते . मग एकटेपणा आणि इतर गोष्टींमुळे पुनर्विवाह  करावा असे विचार मनात रुंजी घालू लागतात . पूर्वीच्या काळी पुनर्विवाह हा शब्द फक्त पुरुषांच्या साठीच अस्तित्वात  होता . स्त्रियांना पुनर्विवाह दूर राहिला प्रथम वर शोधण्यासाठी सुद्धा मत विचारात घेतले जात नव्हते . घरात 10 12 लेकरे त्यात 5 मुली म्हंटल्यावर त्या कधी एकदा उजवल्या जातील ह्याचीच भ्रांत माता पित्यांना असे. त्यामुळे एखादे स्थळ आले कि पुढचा मागचा विचार न करता मुलीचे लग्न उरकून,  हो हो उरकून टाकले जात असे.  मुलीचे मत नगण्य असे किबहुना तिला मत आणि मन सुद्धा आहे ह्याची जाणीव सुद्धा नसे . 


दुर्दैवाने एखाद्या पुरुषाची पत्नी दिवंगत झाली कि तिचे दिवसवार व्हायची खोटी त्याला लगेच पुन्हा लग्न वेदीवर उभे केले  जात असे. मुली पाहून विवाह लगेच होणे आवश्यक कारण घरातील मंडळी, मुले ह्यांच्याकडे पाहण्यासाठी बाई माणूस घरात असणे अत्यावश्यक होते . पुन्हा त्या पत्नीपासून ढीगभर मुले होणे हेही क्रमप्राप्त होतेच.  असो. 

पण हेच एखाद्या मुलीच्या बाबत झाले तर तिला लाल लुगडे नेसवून जगण्याचे सर्व हक्क जणू काढून घेवून कायमचे अंधारात ढकलले जात असे . त्यामुळे त्या काळात स्त्रीच्या द्वितीय विवाहाचा प्रश्नच नव्हता  कारण जिथे तिला माणूस म्हणून सुद्धा वागवले जात नसते तिथे तिच्या मनाचा विचार करणार कोण ? माहेरची दारेही त्यांच्यासाठी बंद असत त्यामुळे सासरीच विधवेचे भयानक जिणे त्यांच्या पदरी येत असे.

आता काळानुरूप सर्वच बदलले आहे. आता स्त्री पुरुष दोघांचेही आयुष्य शिक्षण ,अपेक्षा आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण झपाट्याने बदलत असल्यामुळे विचारात आधुनिकतेचा प्रभाव दिसतोच . जुन्या चालीरीतीना आता बगल देवून द्वितीय विवाह हा दोघांचाही होताना आपण आता बघतो. आज त्याविषयी ज्योतिषीय विश्लेषण करुया .

प्रत्येक वेळेस पटले नाही म्हणूनच नाही तर एखाद्या गंभीर आजाराने सुद्धा व्यक्ती जोडीदारास गमावून बसते आणि त्यातून द्वितीय विवाहाची गरज निर्माण होते . स्त्रीला दुसरा विवाह करण्याची गरज का भासते ? त्यालाही अनेक करणे असू शकतात . जग कितीही पुढे गेले असले तरी शेवटी स्त्रीलाही आधाराची गरज भासते हा आधार मानसिक , आर्थिक, सुरक्षितता अश्या  सर्वार्थाने असतो. कधीकधी आयुष्याच्या मध्यावर अचानक जोडीदाराची साथ सुटते मुलांची शिक्षणे चालू असतात , राहत्या घराचा प्रश्न , घेतलेले कर्ज सुद्धा तसेच मानसिकता कोलमडते आणि एकटेपणा . अश्या वेळी हि घडी पूर्ववत करण्यासाठी पुनर्विवाह करावा असे मनात येते .


आज 21 व्या शतकात विलंबाने विवाह हि जशी समस्या आहे तशीच घटस्फोट हि सुद्धा एक ज्वलंत समस्या आहे. घटस्फोट झाल्यानंतर पुढील जीवन एकट्याने व्यतीत करायचे का ? हा प्रश्न पडतो आणि त्यावेळी पुनर्विवाहाचा विचार पुढे येतो. स्त्री आता घराबाहेर पडत आहे आणि स्वतःचे करिअर करत आहे. स्वतःच्या पायावर उभी आहे. आजच्या काळात पुनर्विवाहाची कारणे म्हणजे वैचारिक मतभेद , विवाहबाह्य संबंध हीसुद्धा आहेत . पुनर्विवाहासाठी जातक आल्यास त्याला ह्यापुढे उत्तम वैवाहिक सुख मिळणार कि नाही हे पाहावे लागते .


पुरुषांच्या बाबत तर अधिकच घालमेल होते कारण स्वयपाकघर कोण सांभाळणार , मुलांचे भावविश्व कमकुवत झालेले असते कारण त्यांची आई हेच त्यांचे विश्व असते त्यातून आलेले एकटेपण ह्यासाठी पुनर्विवाह करावासा वाटतो. ह्याला कित्येक अपवाद सुद्धा आहेत , बाईचा हात घरात फिरल्या शिवाय घराला घरपण येत नाही असे म्हंटले तरी अनेक उदा आहेत जिथे पुरुषाने दुसरा विवाह न करता आपले आणि मुलांचे आयुष्य यशस्वीपणे पुढे नेले आहे . पण आज आपण ह्याच्या दुसर्या बाजूचा म्हणजेच पुनर्विवाहा बद्दल चर्चा करत आहोत.

स्त्री असो अथवा पुरुष आयुष्याच्या संध्याकाळी जोडीदाराची साथ आणि उणीव खर्या अर्थाने वाटते आणि त्यातून निर्माण होणारा भयाण एकटेपणा अनेक आजारांना सुद्धा निमंत्रित करतो आणि म्हणून द्वितीय विवाहा करण्याची मानसिकता निर्माण होते. अनेकदा मुले हा महत्वाचा प्रश्न दोघांपुढे सारखाच असतो. माणूस एकटा नाही राहू शकत त्याला आपली काळजी घ्यायला आणि करायला , मनातील भावना व्यक्त करायला आपले माणूस लागतेच लागते आणि ह्या सर्वाचा विचार करता पुनर्विवाह करणे हि गरज निर्माण होते. 


पण नुसताच पुनर्विवाह केला म्हणजे संपले का अनेकदा दुसर्या विवाहाने आगीतून फुफाट्यात अशी अवस्था होते . त्यामुळे अनेक गोष्टींचा विचार आधीच करावा हे उत्तम . आता पत्नी आली आहे तिच्या गळ्यात मुले घालीन , ती मला वाफाळलेला चहा हातात आणून देयील आणि माझी ग्रहस्थी सांभाळेल ,हुश्श सुटलो एकदाचा ..अशी भावना पुन्हा विवाह करताना असेल तर ह्याही विवाहाचे कडबोळे होईल तेही अधिक तीव्रतेने .अनेकदा तिलाही आधीच्या नवर्यापासून मुल असेल ते आपण स्वीकारणार का ? तितक्याच प्रेमाने त्याचेही करणार का हा विचार आधी करायला पाहिजे नाहीतर तुमच्या आणि तिच्याही मुलांची  फरफट होईल.

द्वितीय विवाह करण्याची नक्की गरज काय आहे ? ह्याचा विचार खरतर ज्याचा त्याने केला पाहिजे आणि त्या गोष्टींशी मुळात व्यक्ती स्वतः सहमत असली पाहिजे. आपली पत्नी निवर्तली आणि घरातील मंडळी मागे लागत आहेत म्हणून मी पुन्हा लग्न करावे कि ते करणे सर्वार्थाने मला स्वतःला पटले आहे हे आधी निदान स्वतःपुरते स्पष्ट झाले पाहिजे. द्वितीय विवाह करताना आपले वयही पुढे गेलेले असते तसेच प्रथम वर किंवा कन्या मिळेल असे नाही , समोरच्या व्यक्तीचा सुद्धा हा पुनर्विवाह असू शकतो त्यामुळे आता ह्या वयात पुन्हा हा सारीपाट मांडताना समोरच्याला समजून घेण्याची  मानसिकता आपली खरच आहे का? त्या व्यक्तीला सुद्धा अपत्य असू शकते आणि ते नाते अधिक नाजूक असते तिच्या आणि आपल्या मुलांना आपण समान वागणूक देऊ शकू का? दोघांचीही आर्थिक बाजू ह्यात असलेला फरक ह्याचा समतोल राखता येणार आहे का? 

पहिल्या विवाहात केलेल्या तडजोडी पेक्षा कित्येक पटीने अधिक तडजोडी करण्याची आणि तेही ह्या पुढे गेलेल्या वयात क्षमता आहे का? कि फक्त स्वतःची जबाबदारी आपण घेवू शकत नाही ती कुणीतरी घ्यावी म्हणून पुन्हा लग्न करायचे आहे ?

समाज आता प्रगत विचारांचा आहे त्यामुळे उलट पुनर्विवाहाला सगळेच आज खुल्या दिलाने सपोर्ट करताना दिसतात . पण इतरांना काय वाटते त्यापेक्षा स्वतःला काय वाटते ? मला पुनर्विवाह करायचा आहे आणि नक्की ह्या कारणासाठी ती कारणे  स्वतः स्वीकारली मनाला स्पष्ट झाली तर जरूर करावा. पण फक्त कुणीतरी सांगत आहे म्हणून करू नये. शेवटी संसार तुम्हालाच करायचा आहे सल्ला देणार्यांना नाही .


ज्योतिषीय दृष्टीकोनांतून प्रथम विवाह सप्तम स्थानावरून आपण पाहतो त्याच सोबत 2 5 8 11 हि स्थाने सुद्धा विचारात घेतो. द्वितीय विवाह हा 2 भावावरून पाहावा लागतो म्हणजेच धनेश कारण ते प्रथम विवाहाचे अष्टम स्थान आहे. धनेश कुठल्या भावात आहे आणि त्याची स्थिती काय आहे. सध्या चालू असणारी दशा तसेच शुक्राची स्थिती  आणि अर्थात पुढील येणार्या दशा सुद्धा . सर्वात महत्वाचा अर्थात लग्नेश आणि चंद्र . स्त्रीच्या पत्रिकेत रवी हा पतीचा कारक तसेच पुरुषांच्या पत्रिकेत चंद्र हा स्त्रीचा कारक आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या उत्तरापर्यंत पोहोचवतात . 

अनेकदा प्रथम विवाह हा सुखकारक होत नाही पण द्वितीय विवाह आयुष्याची गाडी रुळावर आणणारा ठरतो . प्रथम विवाहापेक्षा द्वितीय विवाहात आपल्या अपेक्षा बर्याच अंशी कमी होऊन तडजोड करण्याची मानसिकता आपोआप  तयार होत असते कारण हा विवाह आता काहीही करून टिकवायचा असतो . आपली मनमानी प्रत्येक वेळी करून नातीच टिकत नसतील तर मग कितीही विवाह केले तरी त्याची परिणीती आनंदात सौख्यात होणार नाही.


मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे अनेकदा एकटेपणामुळे घर खायला उठते . आयुष्याच्या संध्याकाळी तर जोडीदाराची आवश्यकता खर्या अर्थाने भासते . आजकाल जेष्ठ नागरिकांमध्ये सुद्धा द्वितीय विवाह होताना दिसतात आणि ती आनंददायी बाब आहे . अनेकदा जोडीदार नसतो आणि मुले परदेशी असतात किंवा दूर असतात . अश्यावेळी एकटे राहणे व्यावहारिक मानसिक सर्वच दृष्टीने कठीण जाते . विवाह केला तर सर्वप्रथम एकटेपणा जातो आणि सोबत मिळते . मानसिकता सुधारते त्यामुळे तो जरूर करावा. आज बदलत्या समाज व्यवस्थेत ती सर्वांची गरज आहे पण तो करताना सर्वार्थाने तडजोड करण्याची तयारी ठेवली तर तो आयुष्याचे नवीन आणि सुखद वळण सुरु करेल ह्यात दुमत नाही. आयुष्य पुन्हा नव्याने जगावेसे वाटेल कारण आयुष्याने दिलेली हि एक संधी आहे त्याचे सोने करणे आपल्याच हाती आहे. पुनर्विवाह हा फक्त आपल्याला आधार मिळावा म्हणून नाही तर दुसर्यालाही आधाराची तितकीच गरज आहे आणि ती आपल्याला पूर्ण करायची आहे ह्या भावनेतून केला तर सौख्य प्राप्त होईल.


प्रत्येक व्यक्ती हि स्वतंत्र आहे , प्रत्येकाचे विचार आणि दृष्टीकोण आणि आयुष्य जगण्याची समीकरणे आणि पुनर्विवाह करण्याची कारणे वेगवेगळी आहेत . आपले निर्णय मग ते कुटुंबातील मंडळीना किंवा समाजाला पटो अथवा न पटो ,तो घेण्याचे  संपूर्ण व्यक्तिस्वातंत्र सुद्धा प्रत्येकाला आहे. ऐकावे जनाचे करावे मनाचे त्याप्रमाणे आपल्या आतला आवाज प्रत्येकाने ऐकून निर्णय घ्यावा तो सहसा चुकणार नाही . आपला एकटेपणा घालवायला कुणीही येणार नाही त्यावर उपाय आपल्यालाच करायचा आहे . आजची  जीवनशैली बघता  संसाराचा सारीपाट पुन्हा मांडणे हि बाब सर्वार्थाने विशेष राहिलेली नाही , उलट आजकालची विवाह मंडळे सुद्धा आपला जोडीदार पुन्हा शोधण्यासाठी मदतीचा हात देताना दिसतात . फक्त पुनर्विवाहाचा सारीपाट मांडताना तो प्रथमच मांडत आहोत अश्या तळमळीने तसेच त्यातील संभाव्य धोके , कराव्या लागणाऱ्या तडजोडी आणि पूर्वी केलेल्या चुका लक्ष्यात घेवून मांडला तर यशदायी नक्कीच होईल .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230  










Tuesday, 3 October 2023

ज्योतिष शास्त्रा बद्दल कुतूहल , आदर कि भीती ?

 || श्री स्वामी समर्थ ||



ज्योतिष हे प्राचीन आणि दैवी शास्त्र आहे . अवकाशातील हे ग्रह तारे मानवी कल्याणासाठी तत्पर आहेत . आपण योग्य वेळी त्यांचे मार्गदर्शन घेवून आपले आयुष्य मार्गस्थ करू शकतो . दिवसागणिक जगभरात ह्या विषयावरील संशोधन चालू आहे आणि असंख्य शोध आणि सूत्रे त्यांची परिभाषा आपल्याला नव्याने उलगडत आहे. आजही अवकाशात ह्या असंख्य लुकलुकणाऱ्या तारकात असेही काही ग्रह असतील ज्यांचा शोध आपल्याला लागलेला नाही जो भविष्यात काळानुसार लागेलही पण त्यांचा परिणाम मात्र मानवी जीवनावर होत आहे . पण हा परिणाम करणारे ग्रह अजून आपल्याला ज्ञात नाहीत . सागरासारखे खोल आणि विशाल असे हे शास्त्र त्याचे असंख्य पदर त्यामुळे संशोधनास वाव आहेच .

माणूस रोजच्या आयुष्यात संकटांनी त्रस्त झाला कि दिशाहीन होतो आणि मग ह्या शास्त्राचा आधार घेण्यासाठी ज्योतिष मंडळींकडे मोर्चा वळतो . ज्योतिष ह्या विषयाबद्दल मानवाच्या मनात पूर्वापार कुतूहल आहेच. पण अनेकदा आपल्याला ह्या शास्त्राबद्दल खरच आदर आहे कि नुसतेच कुतूहल कि कुठेतरी मनात भीती सुद्धा ह्याचा शोध आपण स्वतःच घेतला पाहिजे. खरतर उठसुठ ज्योतिषाकडे जात राहतात . 


समस्या निर्माण झाल्याशिवाय प्रश्न बघू नये हा नियम ज्योतिषांनी सुद्धा तंतोतंत पाळला पाहिजे . उगीच कुणी पैसे देत आहे म्हणून उत्तर द्यायचे हा शास्त्राचा अवमान ठरेल. हे दैवी शास्त्र आहे ,  विक्रीला ठेवलेली वस्तू नाही . असो.

ज्योतिष हे परिपूर्ण नाही , देवाने काही पत्ते त्याच्याच हाती ठेवले आहेत . सगळेच दिले तर किंमत राहणार नाही . अनेकांना शास्त्राबद्दल काडीचाही आदर नसतो पण बघू बघूया म्हणून पत्रिका दाखवायला येतात . प्रश्न विचारताना सुद्धा ते जाणवते . काही जणांना पत्रिका दाखवायची भीती वाटते . आपली गुपिते ज्योतिषाला कळतील हि भीती त्यांच्या मनात असते. काही जणांना ज्योतिषाने काही सांगितले तर ते मानसिक दृष्टीने पेलायची ताकद नसते म्हणून ते जाणे टाळतात . तर काही खरोखर अभ्यासू असतात आणि शास्त्राबद्दल आदर त्यामुळे मार्गदर्शन घेऊन आपले आयुष्य समृद्ध करावे ह्या उदात्त विचाराने ते ह्या शास्त्राचा आधार घेतात .

मनुष्य हा स्तुतीप्रिय आहे त्यामुळे त्यांना जे हवे ते उत्तर ज्योतिषाने दिले कि त्याचे समाधान होते आणि ज्योतिषी लग्गेच त्यांच्या so called Good Book मध्ये जाऊन बसतो . पण ज्योतिषी हा तुमचा मित्र हि नाही आणि शत्रू तर अजिबात नाही , त्याला हे शास्त्र अवगत आहे आणि त्याने केलेल्या तुमच्या कुंडलीच्या अभ्यासातून निघालेला निष्कर्ष उत्तरा च्या रुपात तो तुमच्या समोर ठेवतो इतकच. मग एखाद्याला नोकरी मिळणार कि नाही किंवा असलेली नोकरी राहणार कि जाणार , विसा मिळणार कि नाही , आजार बरा होणार कि नाही , संतती होणार कि नाही , संतती सुख कसे मिळेल ? तसेच परदेशगमन , कर्ज , व्यसनाधीनता ह्या असंख्य रोजच्या जीवनातील प्रश्नांची उत्तरे तुमच्या पत्रिकेतील ग्रह देणार आहेत , ज्योतिषी नाही देत हे आधी मनात खोलवर बिंबवून ठेवले पाहिजेत. 

त्यामुळे तुम्हाला विसा मिळणार नाही वेळ लागेल हे सांगितले तर ज्योतिषी वाईट होत नाही लगेच , तो तुमच्या ग्रहांचा संदेश तुमच्या पर्यंत पोहोचवत आहे इतकच. आपल्या कानाला सगळ्या प्रश्नांची आपल्याला हवी तशी उत्तरे मिळत नाहीत . आपल्या संचित कार्माचीही फळे असतात आणि ती सर्वस्वी तुमच्या कर्मावर अवलंबून असतात हे त्रिवार सत्य आहे.

एखादा अतिशय वेदना देणारा आजार एखाद्या जातकाला झाला तर सर्वांनाच वाईट वाटते पण हे माणुसकीच्या नात्यातून , त्याच्या पत्रिकेचा अभ्यास केला तर त्याने इतकी वाईट कृत्ये केलेली दिसतील कि असे लक्ष्यात येयील कि आता भोगत असलेली शिक्षा कमीच आहे कि काय .

ज्योतिषी स्वतःच्या डोक्याने काहीच सांगत नाही तर तो फक्त ग्रहांचा संदेश तुम्हाला सांगत असतो .एक मिडिएटर म्हणून काम करत असतो इतकच ,त्यामुळे त्याच्यावर रागावून काहीही उपयोग नाही असे करून आपण आपल्या कोत्या मनोवृत्तीचे आणि अर्धवट शिक्षणाचे मात्र प्रदर्शन करतो. आपल्याला परिस्थिती स्वीकारण्याचे धैर्य नसेल तर ह्या शास्त्राचा आधार घेवूच नये . अनेकदा सर्व संपले असे वाटून गलीतमात्र झालेला जातक ज्योतिषाच्या , 3 महिन्यात सर्व व्यवस्थित मार्गी लागेल ह्या शब्दांनी सुखावतो आणि संजीवनी मिळाल्यासारखा ताजातावानाही होतो. आयुष्यात एकच वेळ सारखी राहत नसते , आयुष्य सतत बदलत असते , आपली परीक्षा पाहत असते फक्त एखादी वाईट वेळ कधी जाणार हे समजले तर आपण खूप निराश न होता वेळ बदलण्याची वाट बघू . 

एखाद्या व्यक्तीची पहिल्या दुसर्याही विवाहात फसवणूक होऊ शकते पण हे त्याला आधीच समजले तर बरे नाही का. फसवणूक होणे हे त्याचे प्राक्तन आहे त्यामुळे त्याला असेच फसवणारे स्थळ येयील आणि तो फसेल. तुमचे गतजन्मीचे हे कर्म बोलत आहे असे समजा आणि त्यातून शिका. 

अनेकदा ज्योतिषाने जातकाला पुढील घटनांसाठी सावध केले तरी जातकाला वाटते ज्योतिषी आपल्याला इतके स्पष्ट सांगत आहे ,आपल्याला घाबरवत आहे. पण असे वाटत आहे म्हणजेच तुमचा कुठेतरी खोलवर त्याच्यावर विश्वास आहे किंवा तो सांगत असलेली घटना घडण्याचे संकेत तुम्हालाही मिळत आहेत . मग ते स्वीकारा निदान पुढील नको त्या गोष्टी टळतील .

ज्योतिषी हा जादुगार नाही कि  बुद्धिबळ खेळणारा हि नाही. पटावरील सोंगट्या हलवता येतात पण पत्रिकेतील ग्रह नाही . ते तुमच्या कर्माचे फळ देण्यास बांधील आहेत आणि म्हणून ते तुमच्या जन्माच्याच वेळेला त्या त्या भावात ठाण मांडून बसले आहेत ते कायमचेच . ते फळ देणार मग ते चांगले कि वाईट हे सर्वस्वी तुमच्या संचीताशी निगडीत आहेत . मी मकर राशीतला शुक्र वृषभेत नाही आणू शकत ,किबहुना मी तो आहे तसाच स्वीकारण्यात माझे भलेच आहे .

आपली मानसिकता , शारीरिक आर्थिक कुवत , आयुष्याचा नेमका प्रवास आणि संध्याकाळ कशी असेल ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर नक्कीच हे शास्त्र तुमच्या मदतीला आहे पण तुमच्या कानाला सुखावणारी उत्तरे मिळतीलच असे नाही हे मनात पक्के लक्ष्यात ठेवावे .

आपल्याला स्वतःला जाणून घेण्यासाठी ज्योतिष हे एक उत्तम माध्यम आहे आणि त्याचा योग्य वापर आपले आयुष्य नक्कीच सुखी करेल. श्री स्वामी समर्थ.

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

Saturday, 30 September 2023

विवाहासाठी योग्य स्थळे का सांगून येत नाहीत ????

 || श्री स्वामी समर्थ ||




हिंदू संस्कृती मध्ये विवाह हा 16 संस्कारातील एक संस्कार आहे. विवाहाच्या गाठी स्वर्गात जरी बांधल्या गेल्या असल्या तरी ते संपन्न ह्या भूतलावर होतात . विवाह हा आयुष्यातील सर्वात मोठा बदल . एक नवीन नाते जे अनेक अपेक्षा आणि स्वप्न उराशी घेवून येते . हे नुसतेच दोन जीवांचे मिलन नसून दोन कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मिलन म्हंटले तर वावगे होणार नाही.

आज ज्योतिषीय दृष्टीकोणा तून ह्याकडे थोडे पाहूया . विवाह म्हंटला कि डोळ्यासमोर येते ते पत्रिकेतील सप्तम स्थान कारण तेच आपल्या जोडीदाराचे स्थान आहे. सप्तमस्थानात त्या दोघांचे मनोमिलन आहे म्हणूनच तिथे गोडवा जपणारी शुक्राची तूळ राशी आहे. आजवर जपलेली नाती आणि आता गुंफले जाणारे नवीन नाते ह्यात समतोल राखा असेच जणूकाही ह्यातून सूचित होते .  द्वितीय भाव विचारात घ्यावा लागतो कारण तिथे आपले कुटुंब आहे. एक नवीन नाते घडत असताना कुटुंबात सुद्धा एका सदस्याची भर होते म्हणजेच कुटुंब वृद्धी होते  आणि द्वितीय भाव कुटुंब दर्शवतो म्हणून तोही विचारात घ्यावा लागतो. विवाह मुळे व्यक्तीला होतो तो लाभ आणि इच्छापूर्ती म्हणून लाभ भाव आणि अनेकदा प्रणयाच्या रंगाची परिणीती विवाहात होते म्हणून 5 भाव सुद्धा पाहावा लागतोच .


जन्म हा मुळातच कामवासनेतून झालेला असतो आणि त्याचा प्रमुख ग्रह शुक्र , त्याला उर्जा देणारा मंगळ तसेच सप्तमेश आणि अर्थात गुरु ह्या ग्रहांचे पत्रिकेतील स्थान आणि विवाहाच्या समयी चालू असणारी महादशा अभ्यासावी लागते . 

अनेकदा विवाहात फसवणूक होते मग आपण समोरच्या व्यक्तीला दोष देऊ लागतो . त्यांनी आमची फसवणूक केली . पण त्याने तुमचीच का फसवणूक केली ? कारण फसवणूक करून घेण्याचे किंवा फसण्याचे ग्रहयोग तुमच्याच पत्रिकेत  आहेत म्हणून तुम्ही फसलात. पूर्वजन्मीचे हे संचित कर्म आहे . तुम्ही कुणाला तरी फसवलेत म्हणून आता कुणीतरी तुम्हाला फसवले . म्हणून इतरांना दोष देण्यापूर्वी स्वतःच्या पत्रिकेतील योग नीट समजून घ्या . 


विवाहासाठी स्थळे पाहताना पालक अनेक प्रश्न विचारात असतात त्यातील सातत्याने विचारला जाणारा प्रश्न म्हणजे “ आम्हाला साजेसे , हवे तसे स्थळ का नाही मिळत ? कुठे चेहरा पसंत नाही तर कुठे पत्रिका जुळत नाही . मग मनासारखे स्थळ मिळणार तरी कधी आणि कसे ? हे प्रश्न वर आणि वधूच्या पालकांना भेडसावत असतात .


विवाह हा सुद्धा योग आहे आणि जेव्हा त्याला पोषक अशी ग्रहस्थिती असते तेव्हाच असे योग जुळून येतात . हि ग्रहस्थिती नैसर्गिक रीतीने येते तेव्हाच विवाह जुळून येतो . आपण ओढून ताणून तर ग्रहयोग तयार करू शकत नाही . महादशा स्वामी त्याचा हक्क आणि अधिकार बजावणारच त्याला आपण डावलून काहीच करू शकत नाही. एखादा महादशा स्वामी विवाह ह्या घटनेचे समर्थन करतच नाही म्हणून मग अश्या ग्रहाची दशा वयाच्या 27 28 ला सुरु झाली आणि वयाच्या 43 45 पर्यंत असेल तर तेव्हड्या कालावधीत विवाह जमत नाही आणि ओढून ताणून केला तर यशस्वी होत नाही. योग्य वेळेची वाट पाहणे हेच आपल्या हाती असते . अनेकदा महादशा स्वामी पूरक असेल तरी योग्य अंतर्दशेची वाट पहावी लागते . दोन्ही योग जुळले तर विवाहा साठी मार्ग मोकळा होतो. स्थळ पसंत पडते . अनेकदा विवाह होतो पण पतिसुख कमी असते कारण कुठेतरी षष्ठेश ठाण मांडून पतीसुखात विघ्न आणत असतो मग अश्यावेळी नवरा परदेशी गेलाय पण पत्नीला त्याच्याकडे जाण्यासाठी विसा मिळत नाही . नवर्याची रात्रपाळीची नोकरी आणि पत्नीची दिवसाची , नवर्याची दुसर्या शहरात बदली होते पण पत्नी मुलांच्या शाळा आणि इतर गोष्टींमुळे त्याच्यासोबत जाऊ शकत नाही . ह्या गोष्टी सुद्धा आपण स्वीकारल्या पाहिजेत , पत्रिकेतील हे सर्व योग आपल्या पूर्व संचीताप्रमाणे आहेत आणि ते जाणून घेवून आहेत तसेच स्वीकारले तर त्यात शहाणपण आहे. प्रत्येक गोष्टीला उपाय नसतो त्यामुळे आहे ते स्वीकारले तर आयुष्य अधिक सुकर होयील. उगीचच लग्नात गुरु आला आणि सप्तमात गुरु आला मग विवाह होईल असे म्हणणे उचित होणार नाही कारण दशा स्वामी जोवर अनुकूल होत नाही तोवर योग येणारच नाही .

सप्तमेशासोबत असणारे पापग्रह , विशेषतः हर्शल नेप तसेच सप्तमातील आणि त्यावर दृष्टी टाकणारे पापग्रह सुद्धा विवाहात अनेक अडथळे निर्माण करतात . एखाद्या पत्रिकेत उत्तम विवाह सुख असेल तर उशिरा झाला तरी , विवाह उत्तम पार पडतो कारण मुळातच वैवाहिक सुख आहे म्हणून उत्तम वैवाहिक सुख असणार्या पत्रिका गुण मिलनासाठी येतात आणि विवाह संपन्न होतो.

 एखाद्या पत्रिकेत वैवाहिक सुख दुरदुरपर्यंत दृष्टीक्षेपात नसेल तर तश्याच म्हणजे वैवाहिक सुख नसणाऱ्या पत्रिकाच सांगून येतात किंवा उत्तम पत्रिका आल्या तर त्यांचे गुण आपल्या पत्रिकेत जुळणार नाहीत . आपल्या पत्रिकेत जसे योग असणार तश्याच पत्रिका आपल्याला सांगून येणार .त्यामुळे मुळात आपले ग्रहमान खुल्या दिलाने स्वीकारता आले पाहिजे . उगीचच डोंगरा इतक्या अवाजवी अपेक्षा समोरच्या व्यक्तीकडून ठेवण्यात तसाही काही अर्थ नाही.

प्रत्येकालाच परीकथेतील राजकुमार हवा असतो .पण आपल्या नशिबाप्रमाणे मिळालेला जो कुणी आहे तोही राजकुमारा पेक्षा कमी नाही हा भाव ठेवला तर वैवाहिक सुख उत्तम लाभेल . विवाहच नाही तर आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा एक योग असतो आणि शहाणा माणूस योग्य वेळेची वाट पाहतो .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230