Tuesday, 3 October 2023

ज्योतिष शास्त्रा बद्दल कुतूहल , आदर कि भीती ?

 || श्री स्वामी समर्थ ||



ज्योतिष हे प्राचीन आणि दैवी शास्त्र आहे . अवकाशातील हे ग्रह तारे मानवी कल्याणासाठी तत्पर आहेत . आपण योग्य वेळी त्यांचे मार्गदर्शन घेवून आपले आयुष्य मार्गस्थ करू शकतो . दिवसागणिक जगभरात ह्या विषयावरील संशोधन चालू आहे आणि असंख्य शोध आणि सूत्रे त्यांची परिभाषा आपल्याला नव्याने उलगडत आहे. आजही अवकाशात ह्या असंख्य लुकलुकणाऱ्या तारकात असेही काही ग्रह असतील ज्यांचा शोध आपल्याला लागलेला नाही जो भविष्यात काळानुसार लागेलही पण त्यांचा परिणाम मात्र मानवी जीवनावर होत आहे . पण हा परिणाम करणारे ग्रह अजून आपल्याला ज्ञात नाहीत . सागरासारखे खोल आणि विशाल असे हे शास्त्र त्याचे असंख्य पदर त्यामुळे संशोधनास वाव आहेच .

माणूस रोजच्या आयुष्यात संकटांनी त्रस्त झाला कि दिशाहीन होतो आणि मग ह्या शास्त्राचा आधार घेण्यासाठी ज्योतिष मंडळींकडे मोर्चा वळतो . ज्योतिष ह्या विषयाबद्दल मानवाच्या मनात पूर्वापार कुतूहल आहेच. पण अनेकदा आपल्याला ह्या शास्त्राबद्दल खरच आदर आहे कि नुसतेच कुतूहल कि कुठेतरी मनात भीती सुद्धा ह्याचा शोध आपण स्वतःच घेतला पाहिजे. खरतर उठसुठ ज्योतिषाकडे जात राहतात . 


समस्या निर्माण झाल्याशिवाय प्रश्न बघू नये हा नियम ज्योतिषांनी सुद्धा तंतोतंत पाळला पाहिजे . उगीच कुणी पैसे देत आहे म्हणून उत्तर द्यायचे हा शास्त्राचा अवमान ठरेल. हे दैवी शास्त्र आहे ,  विक्रीला ठेवलेली वस्तू नाही . असो.

ज्योतिष हे परिपूर्ण नाही , देवाने काही पत्ते त्याच्याच हाती ठेवले आहेत . सगळेच दिले तर किंमत राहणार नाही . अनेकांना शास्त्राबद्दल काडीचाही आदर नसतो पण बघू बघूया म्हणून पत्रिका दाखवायला येतात . प्रश्न विचारताना सुद्धा ते जाणवते . काही जणांना पत्रिका दाखवायची भीती वाटते . आपली गुपिते ज्योतिषाला कळतील हि भीती त्यांच्या मनात असते. काही जणांना ज्योतिषाने काही सांगितले तर ते मानसिक दृष्टीने पेलायची ताकद नसते म्हणून ते जाणे टाळतात . तर काही खरोखर अभ्यासू असतात आणि शास्त्राबद्दल आदर त्यामुळे मार्गदर्शन घेऊन आपले आयुष्य समृद्ध करावे ह्या उदात्त विचाराने ते ह्या शास्त्राचा आधार घेतात .

मनुष्य हा स्तुतीप्रिय आहे त्यामुळे त्यांना जे हवे ते उत्तर ज्योतिषाने दिले कि त्याचे समाधान होते आणि ज्योतिषी लग्गेच त्यांच्या so called Good Book मध्ये जाऊन बसतो . पण ज्योतिषी हा तुमचा मित्र हि नाही आणि शत्रू तर अजिबात नाही , त्याला हे शास्त्र अवगत आहे आणि त्याने केलेल्या तुमच्या कुंडलीच्या अभ्यासातून निघालेला निष्कर्ष उत्तरा च्या रुपात तो तुमच्या समोर ठेवतो इतकच. मग एखाद्याला नोकरी मिळणार कि नाही किंवा असलेली नोकरी राहणार कि जाणार , विसा मिळणार कि नाही , आजार बरा होणार कि नाही , संतती होणार कि नाही , संतती सुख कसे मिळेल ? तसेच परदेशगमन , कर्ज , व्यसनाधीनता ह्या असंख्य रोजच्या जीवनातील प्रश्नांची उत्तरे तुमच्या पत्रिकेतील ग्रह देणार आहेत , ज्योतिषी नाही देत हे आधी मनात खोलवर बिंबवून ठेवले पाहिजेत. 

त्यामुळे तुम्हाला विसा मिळणार नाही वेळ लागेल हे सांगितले तर ज्योतिषी वाईट होत नाही लगेच , तो तुमच्या ग्रहांचा संदेश तुमच्या पर्यंत पोहोचवत आहे इतकच. आपल्या कानाला सगळ्या प्रश्नांची आपल्याला हवी तशी उत्तरे मिळत नाहीत . आपल्या संचित कार्माचीही फळे असतात आणि ती सर्वस्वी तुमच्या कर्मावर अवलंबून असतात हे त्रिवार सत्य आहे.

एखादा अतिशय वेदना देणारा आजार एखाद्या जातकाला झाला तर सर्वांनाच वाईट वाटते पण हे माणुसकीच्या नात्यातून , त्याच्या पत्रिकेचा अभ्यास केला तर त्याने इतकी वाईट कृत्ये केलेली दिसतील कि असे लक्ष्यात येयील कि आता भोगत असलेली शिक्षा कमीच आहे कि काय .

ज्योतिषी स्वतःच्या डोक्याने काहीच सांगत नाही तर तो फक्त ग्रहांचा संदेश तुम्हाला सांगत असतो .एक मिडिएटर म्हणून काम करत असतो इतकच ,त्यामुळे त्याच्यावर रागावून काहीही उपयोग नाही असे करून आपण आपल्या कोत्या मनोवृत्तीचे आणि अर्धवट शिक्षणाचे मात्र प्रदर्शन करतो. आपल्याला परिस्थिती स्वीकारण्याचे धैर्य नसेल तर ह्या शास्त्राचा आधार घेवूच नये . अनेकदा सर्व संपले असे वाटून गलीतमात्र झालेला जातक ज्योतिषाच्या , 3 महिन्यात सर्व व्यवस्थित मार्गी लागेल ह्या शब्दांनी सुखावतो आणि संजीवनी मिळाल्यासारखा ताजातावानाही होतो. आयुष्यात एकच वेळ सारखी राहत नसते , आयुष्य सतत बदलत असते , आपली परीक्षा पाहत असते फक्त एखादी वाईट वेळ कधी जाणार हे समजले तर आपण खूप निराश न होता वेळ बदलण्याची वाट बघू . 

एखाद्या व्यक्तीची पहिल्या दुसर्याही विवाहात फसवणूक होऊ शकते पण हे त्याला आधीच समजले तर बरे नाही का. फसवणूक होणे हे त्याचे प्राक्तन आहे त्यामुळे त्याला असेच फसवणारे स्थळ येयील आणि तो फसेल. तुमचे गतजन्मीचे हे कर्म बोलत आहे असे समजा आणि त्यातून शिका. 

अनेकदा ज्योतिषाने जातकाला पुढील घटनांसाठी सावध केले तरी जातकाला वाटते ज्योतिषी आपल्याला इतके स्पष्ट सांगत आहे ,आपल्याला घाबरवत आहे. पण असे वाटत आहे म्हणजेच तुमचा कुठेतरी खोलवर त्याच्यावर विश्वास आहे किंवा तो सांगत असलेली घटना घडण्याचे संकेत तुम्हालाही मिळत आहेत . मग ते स्वीकारा निदान पुढील नको त्या गोष्टी टळतील .

ज्योतिषी हा जादुगार नाही कि  बुद्धिबळ खेळणारा हि नाही. पटावरील सोंगट्या हलवता येतात पण पत्रिकेतील ग्रह नाही . ते तुमच्या कर्माचे फळ देण्यास बांधील आहेत आणि म्हणून ते तुमच्या जन्माच्याच वेळेला त्या त्या भावात ठाण मांडून बसले आहेत ते कायमचेच . ते फळ देणार मग ते चांगले कि वाईट हे सर्वस्वी तुमच्या संचीताशी निगडीत आहेत . मी मकर राशीतला शुक्र वृषभेत नाही आणू शकत ,किबहुना मी तो आहे तसाच स्वीकारण्यात माझे भलेच आहे .

आपली मानसिकता , शारीरिक आर्थिक कुवत , आयुष्याचा नेमका प्रवास आणि संध्याकाळ कशी असेल ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर नक्कीच हे शास्त्र तुमच्या मदतीला आहे पण तुमच्या कानाला सुखावणारी उत्तरे मिळतीलच असे नाही हे मनात पक्के लक्ष्यात ठेवावे .

आपल्याला स्वतःला जाणून घेण्यासाठी ज्योतिष हे एक उत्तम माध्यम आहे आणि त्याचा योग्य वापर आपले आयुष्य नक्कीच सुखी करेल. श्री स्वामी समर्थ.

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

No comments:

Post a Comment