|| श्री स्वामी समर्थ ||
पत्रिकेतील पंचम स्थान हे अति महत्वपूर्ण स्थान आहे . आपल्या संपूर्ण आयुष्यात आपण घेतलेले निर्णय ,मग तो निर्णय शिक्षणाचा असो नोकरीचा किंवा विवाहाचा , आपण आपल्या बुद्धीने घेत असतो . हि बुद्धी कशी काम करणार आहे हे सांगणारे हे पंचम स्थान ज्याबद्दल आज जाणून घेवूया . एखादा निर्णय चुकला तर आयुष्यभर पस्तावायला लागते आणि बरोबर आला तर आयुष्य प्रगतीपथावर जाते . आपले विचार , कृती आणि दृष्टीकोण आपल्या बुद्धीवर अवलंबून असतो आणि हि बुद्धी भ्रष्ट किंवा तिरकस असेल तर मग कुसंगत , पापी विचार , चुकीचे निर्णय , नको तिथे पैशाची गुंतवणूक करून व्यक्ती स्वतःची आणि पर्यायाने आपल्या कुटुंबाची वाताहत करतो. हीच बुद्धी चांगली असेल तर संशोधक वृत्ती , जिज्ञासू पणा , चातुर्य , प्रामाणिकपणा , मनाचा मोठेपणा , बुद्धीचे तेज दिसून येते . बुद्धी चांगली असेल तर विद्या प्राप्त होते आणि त्यामुळेच मनुष्याची सर्वांगीण प्रगती सुद्धा होते. सर्वार्थाने प्रगती करणारे “ शिक्षण “ हे प्रभावी शस्त्र आणि माध्यम आहे .
अनेक प्रतिभावान , विद्वान लोकांच्या पत्रिकेत ज्यांना मानसन्मान लाभला आहे , कीर्ती , मिळाली आहे त्यांचे पंचमस्थान उत्तम रीतीने फलित देताना दिसते . आपली मनोवृत्ती हे संपूर्णपणे आपल्या विचारधारेवर आहे आणि विचारांचा दिशा देण्याचे काम बुद्धीतून होत असते म्हणूनच पंचम भाव आणि पंचमेश महत्वाचा आहे. पंचम सुस्थितीत असेल तर व्यक्तीकडे अलौकिक बुद्धिमत्ता तर असतेच पण दूरदृष्टी असते , योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असते आणि ह्यासर्वाचा उत्तम मेळ घालून आयुष्य प्रगतीपथावर नेण्यास मदत होते . बुद्धी आणि मन ह्यांचाही जवळचा संबंध आहेच . बुद्धी ठिकाणावर नसेल तर मन निराशेच्या गर्तेत जाते कारण योग्य मार्गच सापडत नाही . संकटांनी त्रस्त आणि दिशाहीन सैरभैर होते . कमकुवत मन विकृतीकडे व्यसनांकडे वळते आणि मग पुढे सर्वच चुकत जाते .
पंचम भाव हा विद्येचा आहे त्यामुळे शैक्षणिक प्रगती आणि शिक्षणाचा आलेख ह्या भावावरून समजतो . लेखक, कवी , प्रतिभावान नाटककार , कलाक्षेत्र अभिनय क्षेत्रातील समीक्षक , बुद्धिप्रधान सर्वच व्यक्तींचे पंचमस्थान अभ्यासावे . संतती सौख्य पंचमावरून पहिले जाते . प्राणापलीकडे जपलेली आपली संतती आपल्याला सुखकारक आहे कि त्यांच्यापासून आपल्याला काडीचेही सुख नाही ह्याचा उहापोह पंचम भाव आणि पंचमेश ह्यावरून होतो . मुलांचे आरोग्य , शिक्षण , एकंदरीत सफलता , त्यांच्याबद्दल असणार्या चिंता , व्यंग , यश पंचमाची देण आहे.
पंचम भावावरून इतरही अनेक गोष्टी ज्ञात होतात जसे खेळ , क्रीडा , तंत्र मंत्र साधना , तपश्चर्या , पूर्व संचित , दैवी उपासना , ईश्वरी अनुसंधान भक्ती आणि एकूणच अध्यात्मिक प्रगती , शेअर मार्केट , रेस , सट्टा , लॉटरी , कला . ह्यासोबत प्रेमाला दिला जाणारा आणि मिळणारा प्रतिसाद , इंद्रिय सुख आणि सुख उपभोगण्याची क्षमता , तसेच नैतिक अनैतिक आचरण , ऐहिक सुखाची लालसा ,प्रणयाचे रंग खर्या अर्थाने खुलवणारे हे स्थान आहे . पंचम हे धर्म त्रिकोणातील महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक भावाचा सखोल अभ्यास असेल तर त्या भावाची महादशा काय काय फळ देयील ह्याचे ठोकताळे मांडता येतील.
आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ह्या बारा भावातच म्हणजेच आपल्या कुंडलीतील ग्रहस्थितीत दडलेले आहे ...आपला अभ्यास सखोल असेल तर आपल्या कुठल्याही प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपण नक्कीच पोहोचू शकतो .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment