Wednesday, 28 August 2024

छोटी सोच

 || श्री स्वामी समर्थ ||

परमेश्वराने बुद्धी आणि विचार शक्ती सगळ्यांनाच दिलेली आहे पण त्याचा उपयोग कसा करायचा हे अर्थात प्रत्येकाच्या हातात आहे. आपल्या आजूबाजूला अनेक माणसे रोजच्या जीवनात वावरताना दिसतात त्यातील काही विशाल हृदयाची , इतरांना मदत करणारी आणि दुसर्याच्या आनंदाने खुलणारी असतात . पण काही अत्यंत संकुचित मनाची , सतत एखाद्या गोष्टीची लपवा छपवी करण्याकडे कल असतो , स्वतःचे काहीही सांगायचे नाही पण दुसर्याच्या आयुष्यात खूप रस असणारी , दुसर्याचा सतत द्वेष करणारी , असूया , मत्सर , सतत दुसर्याला पाण्यात पाहणाऱ्या वृत्तीची असतात . अश्या व्यक्ती सतत राजकारण खेळत राहतात , ह्याचे त्याला त्याचे ह्याला , सतत सगळ्या बातम्या हव्या असतात त्यांना , कुणाबद्दल एक शब्द चांगल बोलणे ह्यांना जमत नाही किबहुना कुणाचे हि चांगले बघवत नाही , कुणाची प्रशंसा करणे तर खूप दूर राहिले. उलट दुसर्याचे वाईट झाले कि ह्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो . 


मुळात हि वृत्ती येते कुठून ? तर आपल्याच आयुष्यात अपेक्षित गोष्टी घडल्या नाहीत कि समोरच्याचे सुख टोचू लागते. जसे सगळ्यांना लक्ष्मीप्राप्ती होते पण आपल्याला रोजचा प्रपंच सुद्धा चालवता येत नाही . शिक्षण नाही म्हणून धड नोकरी नाही , पराकोटीचा अहम त्यामुळे शनीचे फटके पदरी पडणारच , तो कुणालाच सोडत नाही . आयुष्याची संध्याकाळ झाली तरी देवदेव करूनही स्वतःचे राहते घर होत नाही . मग भाऊ बंदकी आली त्यात अत्यंत हृणास्पद खालच्या पातळीचे राजकारण करून संपत्ती जमीन जुमला हडपणे . कारण स्वतःच्यात काहीच करण्याची धमक नाही . 

आपल्याला जे सुख आयुष्यात अपेक्षित असते ते दुरापास्त होते , अगदी रोजच्या जीवनातील लहान सहान गोष्टीत सुद्धा आनंद मिळत नाही तेव्हा माणसाची दुसर्यावर जळण्याची वृत्ती बळावते . दुसर्याचे कसे चांगले चालले आहे ते पाहवत नाही आणि त्यातूनच मग असूयेचा जन्म होतो आणि ती सर्वात प्रथम त्या व्यक्तीलाच मारते .  अहो जो तो आपापल्या कर्माचा कारक , प्रत्येकाला देवाने बुद्धी आणि दोन हात दिलेले आहेत . कष्ट करा आणि सन्मार्गाने जगा , जे आहे त्यात समाधान माना आणि परमेश्वराच्या सान्निध्यात राहा . पण नाही भौतिक सुखाची तीव्र लालसा आणि काहीच पदरी पडत नसल्यामुळे येणारे नैराश्य . ह्याचा परिणाम असा होतो कि सगळी आजारपणे  मागे लागतात . जेव्हा आपण दुसर्याचा मत्सर  करतो तेव्हा आपले स्वतःचेच हार्मोन्स बिघडतात आणि विचार दुषित होतात , विचारांचा प्रभाव आपल्या मनावर आणि शरीरावर व्ह्यायला लागला कि तो आपल्याला अगदी स्मशानापर्यंत सोडत नाही .

अत्यंत छोटी सोच असणार्या ह्या व्यक्तींनी कितीही देवाचे केले तरी त्यांचे कलुषित मन त्यांना देवाच्या द्वारापर्यंत कधीच नेत नाही , परमेश्वराला त्यांची हाक सुद्धा ऐकू येत नाही . दुसर्याचे लुबाडून घरात राजकारण करून आपण संपत्ती हडपू पण पुढे काय ? त्याचा विचार केलाय का कधी ? याच देही याच जन्मी आहे सर्व . आपण आपल्यापुरते जगायला शिकले पाहिजे . जे आहे ते आहे रोजचा दिवस नवनवीन संधी देण्यासाठीच येतो त्या घेवून कष्ट करत राहिले पाहिजे . एक दिवस आपलाही येणारच ह्यावर विश्वास ठेवला पाहिजे . दुनियादारी सोडून जरा आपल्या प्रपंचात लक्ष्य दिले तर बरे होईल. 

जे आपण पेरणार तेच उगवणार , तुम्ही जे देणार तेच तुम्हाला परत मिळणार त्यामुळे चांगले विचार मनात रुजवाल  तर तुमचे विचार , देहबोली सर्वच सकारात्मक होयील ह्यात शंकाच नाही . 

हि छोटी सोच कुठून येते ? तर पत्रिकेतील चंद्र दुषित असेल , बिघडला असेल , पापग्रहांच्या प्रभावाखाली असेल , तर मनाच्या ठिकर्या उडतात . निर्णय क्षमता नसते , आई विक्षिप्त स्वभावाची , आजारी , मानसिकता बिघडलेली असते , गृहसौख्य , वाहन सौख्य नसते . सगळ्या सुखात उणीव . 

घरात अशांतता जाणवते आणि ती व्यक्तिमत्वावर उमटते . अश्या लोकांनी योगासने , ध्यान , साधना करावी . आपले शब्द भांडार जरा जपून वापरावे , विचार आचाराचा मेळ घालावा . शांत ठिकाणी बसून अंतर्मुख व्हावे , आवडते संगीत ऐकावे त्याने विचारांचे परिवर्तन नक्कीच होईल. आपले छंद जोपासावे , सत्कर्मात आपले योगदान द्यावे जसे झाडे लावणे . सर्वात मुख्य आपल्या विचारांची दिशा आपणच ठरवावी . मनाने सुद्धा कुणाचे वाईट चिंतू नये किंवा बोलूही नये. 

आपण दुसर्याचा केलेला तिरस्कार , मत्सर , हृणा , द्वेष , असूया अनेक अनेक आजारांच्या स्वरूपात दाम दुप्पटीने आपल्याच पदरात पडणार ह्याचा कदापि विसर पडू देवू नये . 

चंद्र शुद्ध करण्यासाठी महादेवाचा जप आणि अभिषेक करावा . आकाशातील चंद्राला ओवाळावे . सोमवारी पांढर्या वस्तूंचे किंवा गोड पदार्थांचे गरजू व्यक्तीला दान करावे .

आपले आयुष्य चांगल्या प्रकारे जगता यावे ह्यासाठी कर्म शुद्ध ठेवली पाहिजेत आणि ते सर्वस्वी आपल्याच हाती आहे नाही का?

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230



Monday, 26 August 2024

कृष्णा आमचे मागणे थांबव..

 || श्री स्वामी समर्थ ||


कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वाना खूप शुभेछ्या . अष्टमी हि अपार सौंदर्याची तिथी आहे. कृष्ण तनामनावर राज्य करणारा , आपल्या हाकेला तत्पर धावून येणारा आणि आपल्या चेहऱ्यावर क्षणात स्मित आणणारा . कृष्णाचे आयुष्य आपल्याला घडवेल इतके जबरदस्त ग्रहयोग त्याच्या पत्रिकेत आहेत  . प्रभू श्रीराम , माऊलीआणि कृष्ण ह्यांच्या पत्रिकेत अखंड ज्योतिष सामावेल इतक्या त्या गहन आहेत . सामान्य माणसाच्या सीमारेखा जिथे संपतात तिथे संतांच्या पत्रिकांचे अध्ययन सुरु होते म्हंटले तर वावगे ठरू नये. 

कृष्णाने सहस्त्र स्त्रियांचे रक्षण केले पण आज तो आपल्या भेटीला येयील तेव्हा त्याला काय चित्र दिसणार आहे ? त्यानेच निर्माण केलेल्या विश्वात आज स्त्रीच असुरक्षित आहे . आजूबाजूला आज घडणाऱ्या घटना विशेष करून आपल्या भगिनींच्या वर होणारे अत्याचार मन हेलावणारे आहेत .  प्रत्येक स्त्री कधी मोकळा श्वास घेवू शकेल ??कुठे चालली आहे आपली मानसिकता आणि समाज ? ह्या आजच्या काळात त्या कृष्णाला , श्री गणेशाला सुद्धा यावेसे वाटणार नाही इतकी भीषण अवस्था  त्यांच्या भेटीला आहे . ते म्हणतील हेच शिकवले का मी तुम्हाला? असो.

आपले देवाकडील मागणे आणि संतांचे मागणे ह्यात किती फरक आहे बघा . दिसला देव कि माग त्याच्याकडे काहीतरी हि आपली नित्याची सवय  . पण मागून मागून काय मागणार तर भौतिक सुखाची न संपणारी यादी . मुलाचे लग्न होवूदे ..झाले लग्न मग आता नातवंड मागा . संपतच नाही हो आपले. का मागतो आपण ? कधी विचार केला का? खरतर त्याला सगळच माहित आहे कि आणि तो देणारच आहे , कारण तो द्यायलाच बसला आहे. पण आपण त्याच्याकडे न मागताही तो आपल्याला देणार हा विश्वासच हरवून बसलो आहोत आपण ...म्हणून सतत हे दे ते दे करत असतो . 


इतके जबरदस्त नामस्मरण वाढवा , अखंड नामात राहा कि मागायचा विसर पडेल आपल्याला आणि त्या नामस्मरणात इतकी शांतता , समाधान लाभेल जे मागूनही मिळणार नाही . तदपश्चात मागण्यासारखे काही उरणारच नाही . न मागताच सगळे वेळ आली कि आणि आपल्या भाग्याप्रमाणे मिळणारच , अनुभव घेवून पहा .

कृष्णाकडे आज जगण्याचे बळ मागुया आणि जिथे आपण सर्व सुरक्षितपणे वावरू अश्या समाजाची उभारणी करुया , स्त्रियांना सक्षम , खंबीर करुया . रांगोळ्या , स्वयपाक शिका पण आधी मार्शल आर्ट , कराटे शिका. आज स्वतःचे संरक्षण स्वतःच करायचे आहे . स्वतःचे अस्तित्व जपा आणि वृद्धिंगत करा आणि त्यासाठी एकच ढाल हवी ती म्हणजे नामस्मरणाची . रामरक्षा , हनुमान चालीसा , श्रीसूक्त , नामस्मरण ह्याचा अक्षरशः पाऊस पाडा , इतका कि तोच शोधात येयील आपल्याला. कोण बर माझ्या नामात इतका गुंगला आहे हे पाहून परमेश्वर सुद्धा हतबुद्ध होईल. पण करणार होण ? कधी सुरवात करणार आपण ? 

आकाशात एकटक बघा जरा अहो सगळे ग्रहतारे आपल्याच कल्याणासाठी बसले आहेत . गोलोकातील कृष्ण सुद्धा आपल्या बाळ लीला पाहून हसत असावा. विश्वासच नाही आपला , कश्यावरच नाही , ना आपण केलेल्या साधनेवर ना स्वतःवर . मन सैरभैर झाले आहे.  परवा एका मुलाने मला सांगितले मी एक माळ रोज करतो म्हंटले अरे वा छान आणि insta /सोशल मिडीयावर किती वेळ असतोस ? निरुत्तर . अहो सोशल मिडीया पण हवे काळाची गरज आहे ती पण म्हणून एक माळ ? त्याचा वेळ वाढवा , वेळ आहे आपल्याकडे तो कश्यात किती घालवायचे ते गणित कदाचित चुकतेय आपले. 


मग ह्या ज्योतिषाकडून त्या ज्योतिषाकडे आमची वारी सुरु ...कारण नामातील ताकद अनुभवलीच नाही आपण . तितका विश्वासच नाही आपला. नामस्मरण म्हणजे म्हतार्यांचे चाळे, वेळ घालवायचे साधन वाटते आपल्याला . मी माळ घेवू ? काहीतरीच ..अहो मित्र हसतील कि मला . चेष्टेचा विषय बनेल मी . चोरून देवळात जायचे कारण मित्र हसतील , म्हणतील तू IT मधला विद्वान देवळात कसला जातोस , बाहेर या ह्या सगळ्या भ्रमातून , स्वतःला सावरा आणि इतरानाही सावरायला मदत करा . ज्ञानेश्वरी , गीता , श्री गजानन विजय अहो जीवनाचे सार आहे ह्यात . प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सापडेल ह्यात तुमचे तुम्हालाच ,  ज्ञानाने परिपक्व व्हाल आणि एक समृद्ध जीवन सुद्धा जगाल. 

आज कृष्ण जन्म . त्याने असंख्य लढाया लढल्या , त्यातल्या अनेक आपल्याच माणसांच्या विरोधात . त्याला सगळे शक्य होते पण ..हा पण महत्वाचा आहे. संताना , ज्ञानेश्वरांना किती त्रास झाला. ज्यांनी भिंत चालवली , ज्यांनी बारा वर्ष कोरड्या असलेल्या विहिरीला पाणी आणले त्यांना काय शक्य नव्हते , पण त्यांनी आपल्याला काही शिकवण देण्यासाठी प्रपंचातील दाह सोसला.

आज कृष्णाकडे एकच मागुया.... बाबारे आमचे मागणे थांबव ....तुझ्या शक्तीवरचा आमचा विश्वास द्विगुणीत कर , तू आहेस आणि सतत आमच्यासोबत आहेस ह्याचे अनंत दाखले दिलेस तसेच देत राहा बाबा . 

श्रीकृष्ण समजणे सोपे नाही ...खचितच नाही ...

टीप : कृपया लेख नावासकट शेअर करावा हि विनंती . 


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230




Wednesday, 21 August 2024

चढता सुरज धीरे धीरे ....

 || श्री स्वामी समर्थ ||


आपल्या आजूबाजूला असंख्य चांगल्या वाईट घटना रोज घडत असतात . ह्या सर्वाचा आपल्या मनावर सुद्धा परिणाम होत असतो . कुणाचा विजा आला किंवा विवाह ठरला तर मन आनंदित होते प्रसन्न वाटते पण कुणाला गंभीर आजार किंवा तत्सम घटना घडली तर मन हळहळते . वाईट वाटत राहते आणि त्यात कुणी जवळचे असेल तर मग कित्येक दिवस त्याचा परिणाम आपल्या मनावर होत राहतो . पण असे का घडले ह्याचा विचार आपल्याला त्या व्यक्तीने केलेल्या पूर्व आयुष्यातील कर्मांपाशी नेतो त्यावेळीस असे वाटते कि इतकी वाईट कर्मे केली आहेत म्हणून हे फळ आहे , कदाचित झालेली शिक्षा कमीच आहे. 

आयुष्यात कुठलीच गोष्ट अशीच घडत नसते . प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतेच . ह्याचे मूळ कुठेतरी आपण केलेल्या कर्मातच असते . आपले राग लोभ , दुसर्या बद्दलच द्वेष , तिरस्कार , मत्सर अनेकदा पराकोटीला पोहोचतो आणि आपल्या हातून वाईट कृती किंवा बोलण्यातून समोरच्याला दुक्ख दिले जाते . पण ह्याचा परिणाम म्हणजे आपण आपले स्वतःचे “ कर्म “ वाढवून ठेवतो जे पुढे आपल्यालाच फेडावे लागते . 


आपल्याला दुखावणार्या , अपमानीत करणाऱ्या व्यक्ती खूप असतात , आजकाल तर गरजेपुरते इतरांना वापरून घेण्याचे प्रमाण खूप वाढले आहे कारण माणसाची स्वार्थी वृत्ती खूप वाढली आहे . कामाशिवाय आजकाल बात नाही असो कलियुग आहे हे , ह्याहून वेगळे अपेक्षित नाहीच . पण अनेकदा चांगल्या व्यक्तींना त्रास होतो , त्यांच्या चांगल्या स्वभावाचा फायदा करून त्यांना फेकून दिल्याची भावना त्यांच्या मनात येते आणि  त्यांचा माणुसकीवरचा विश्वास उडून जातो . आपणही उलटा वार करू शकतो , फाडफाड बोलू शकतो , पण हे सर्व करून मिळणार काय ? पुन्हा आपण आपलेच कर्म वाढवून ठेवणार आणि मग ते फेडण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेणार .

गेल्या अनेक दिवसात घडलेल्या घटनांवरून माझा देवावरचा आणि शनी महाराजांवरचा  विश्वास कित्येक पटीने वाढलाय . शनी महाराज कुणालाही सोडत नाहीत . तिथे वशिला चालत नाही किंवा पैशाने त्यांना विकतही घेता येत नाही . योग्य वेळ आली कि ते शिक्षा करतात आणि अशी शिक्षा करतात कि दुनिया पाहत राहते , त्या शिक्षेची तीव्रता आणि दाह इतका भयंकर असतो कि त्यावरून समोरचचा सुद्धा चूक करताना दहा वेळा विचार करेल .

 शेवटी १०० अपराध झाल्यावरच शिक्षा होते , पण ती होतेच होते . शनीचे नियम कडक आहेत , त्यांनी शिक्षा सुनावली कि संपले सर्व काही , मग फक्त ती निमूटपणे भोगणे हेच आपल्या हाती राहते . तिथे माफी नाही कुणालाही नाही . 

मी कसाही वागेन आणि कुणीचा बाप माझे वाईट करू शकणार नाही ह्या भ्रमात माणसाने राहू नये हे सांगण्यासाठीच हा लेखन प्रपंच . आपल्याला अत्यंत प्रिय असणार्या व्यक्तीचा विरह , होत्याचे नव्हेत होणे हीच शनी महाराजांची शिक्षा आहे.

माणसे फेकून द्यायची फार हौस आहे ना ? द्या . मग बघा शनी तुम्हाला कुठे फेकून देतो ते . कुणाला कमी लेखू नका , कुणाच्याही परिस्थितीवर , व्यंगावर , अपयशावर हसू नका , कुणाची निर्भत्सना , निंदा करू नका . आपल्याला वेळोवेळी मदत करणाऱ्या लोकांचे ऋण मना आणि त्या ऋणात राहा . गोड बोलून सहानुभूती मिळवून आपली कामे करून घेवू नका . स्वाभिमानाने जग कारण आपली कष्टाची भाकरीच शेवटी गोड लागणार आहे . 

कश्याला राग करताय कुणाचा , इथेच सर्व सोडून द्यायचे आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच . विसरा आणि मुक्त व्हा ह्या षडरिपुंच्या ओझ्यातून . बघा कसे मोकळे मोकळे वाटेल आणि शांत झोप सुद्धा लागेल. कश्याला त्यांच्या शिक्षेस पात्र ठरायचे ? विचार करा . करोनाचा धक्का , फटका जग अजून पचवू शकला नाही आहे. लाखोंची खरेदी क्षणात करणारे रस्त्यावर आले बेघर झाले. 

का नाही बघवत आपल्याला दुसर्याचे चांगले. अहो माझ्याकडे सर्व मग नक्की कसला राग ? काय बघवत नाही आहे आपल्याला ? दुसर्याचा आनंद बघवत नाही कि त्यांची मुले परदेशात शिकायला जात आहेत ते बघवत नाही ? जो तो आपापल्या कर्माचा धनी , आपले पूर्वकर्म आपले आजचे आयुष्य घडवत आहे . मग आजचे कर्म जर उद्याचा आपला दिवस घडवणार असेल तर ते नक्कीच अधिक उत्तम असायला हवे ना ? पटतंय का? 

शनी मनावर आघात करणारच  , तुमची प्रिय वस्तू व्यक्ती हिरावून नेणार , तुम्ही इतरांना रडव्लेत ना त्यांचा अनादर केलात , निंदा केलीत , लोकांना पाण्यात पाहिलेत , भोग आता आपल्या कर्माची फळे .

रवी म्हणजेच सूर्य सकाळी उगवतो आणि आपल्या आशा पल्लवित होतात इतकी त्या सूर्यप्रकाशात ताकद आहे . मध्यानीला सूर्य डोक्यावर तळपत असतो तेव्हा त्याच्याकडे पाहणेही अशक्य असते . पण ह्या दोन्ही अवस्था सोडून संध्याकाळी तो अस्ताला जातो . ह्यावरून आपण काय शिकतो ? आपल्या आयुष्याच्याही ह्याच तीन अवस्था आहेत , पटतय का?  आपलेही आयुष्य बदलत जाणार , वय पुढे जाणार , शरीर खचणार आणि मन सुद्धा , आयुष्य काय कधी वळण घेयील कुणालाच सांगता येत नाही . निसर्ग सुद्धा जिथे शाश्वत नाही तिथे आपले आयुष्य काय ? घमेंड , अहंकार माणसाच्या आयुष्याची माती करण्यासाठीच आलेला असतो . मी म्हणजे कोण ? अरे तू कुणीच नाहीस कारण क्षणात ते काय करतील समजणार सुद्धा नाही . जरा पैसा आला कि आपले वागणे बोलणे इतके बदलते कि जसे काही कुणाची गरजच नाही आपल्याला . 

अहो गरज जन्मालाच घेवून आलेले आहोत आपण . म्हणूनच माणसात आनंद शोध , सगळ्यांना धरून राहा कारण शेवटी परमेश्वर माणसातच आहे. महाराजांच्या सेवेत राहून आपला अहंकार सुद्धा नष्ट होयील , वास्तवाची जाणीव होवून जगायला प्रवृत्त करेल हे नामस्मरण .

आजूबाजूच्या घटना पाहून मन व्यथित झाले. प्रथम १० रुपयाची चोरी मग १०० असे करत पुढे हे हात काय काय करतील कारण आपल्याला वाटते कुणी पाहत नाही आपल्याला , शिक्षा करणार कोण ? पण शनी महाराज आहेत आणि त्यांचे अस्तित्व अबाधित आहे. आपल्या कर्माचे फळ दिल्याशिवाय ते राहणार नाहीत . 


आपल्या आयुष्याची इतरांशी तुलना करणे बंद करा , जे आहे ते आहे. कुणाचा हेवा , तिरस्कार करून आपले भले निश्चित होणार नाही उलट संकटे आपली पाठ सोडणार नाहीत . आपल्याला त्रास देणार्यांना देव शिक्षा कधीही करत नाही ह्या चुकीच्या कल्पना उराशी बाळगू नका , वेळ आली कि शनी महाराज एका क्षणाचाही विलंब न लावता शिक्षा करतात , जन्मभराची अद्दल घडवतात . सगळा माज क्षणात उतरतो त्यामुळे कुणीही देवांच्या वरती जावून बसायचा प्रयत्न सुद्धा करू नये . वरील सूर्याचे उदा हेच आपले आयुष्य आहे . एकदिवस आपला अहंकार आणि माज उतरतोच उतरतो आणि तो असा उतरतो कि भल्या भल्यांची झोप उडते आणि इतरांना दशहत बसते . आयुष्य नेहमी तेच राहत नाही हेच आपल्याला सुर्यानेही शिकवले आहे .आपण सगळेच मातीतून आलो आणि मातीतच मिसळणार आहोत त्यामुळे मी मी करणे सर्व फोल आहे कारण ..

चढता सुरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा .... 

आज शनीचेच उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे ...त्यांचीच आठवण करून देण्यासाठी हा लेखन प्रपंच .

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230 







 


Wednesday, 14 August 2024

व्यय भाव – व्यय कि लाभ ???

 || श्री स्वामी समर्थ ||


जीवनाच्या अंतापर्यंत अभ्यास करत राहिले तरी परिपूर्ण होता येणार नाही इतके ज्योतिष शास्त्र सखोल आणि समृद्ध आहे. आपल्या पत्रिकेतील 12 भाव सर्प्रथम आपल्यापुढे येतात मग त्यात असणार्या राशी आणि सर्वात शेवटी त्यात वसलेले ग्रह .

प्रथम भाव आपले स्वतःचे अस्तित्व दर्शवतो . जन्माला येतो तेव्हाच हा भाव जागृत होतो . आपले आयुष्य वेगाने पुढे जाते , आयुष्याच्या सर्व अवस्था बालपण , तारुण्य , वृद्धावस्था सर्व काही पार करत शेवटच्या पायरीवर म्हणजेच मोक्षाच्या आणि व्यय भावाच्या पायरीवर आल्यावर येतो तेव्हा शरीर आणि मन दोन्ही थकलेले असते . इथे सर्व काही सोडून पुढे जायचे असते . जो भाव आपल्याला आपल्या सद्गुरूंच्या चरणाशी समर्पित करणारा अनुभव देतो तो वाईट कसा असेल , हा विचार केला पाहिजे  . इथे शरीराची पाऊले आहेत आणि पावूलांवर जो नतमस्तक होतो तोच मोक्षपदास जातो अन्यथा पुन्हा प्रथम भावात येवून पुन्हा नवा जन्म आणि मग पुनरपि जननं पुनरपि मरणं हेच होत राहणार .


हा व्यय भाव पत्रिकेतील शेवटचा भाव इथे नतमस्तक व्हायचे असते ते जन्म दिलेल्या आपल्या पालकांसमोर , आयुष्यभर साथ देणाऱ्या आणि आपल्याला जीवनाच्या प्रवासात आनंद देणाऱ्या सगळ्यांसमोर आणि सरतेशेवटी आपल्या सद्गुरुंसमोर . आयुष्यात जे जे काही मिळवले ते इथेच सोडून द्यायचे . जोडीला येते ते फक्त आपले कर्म म्हणूनच जन्मापासून पुण्यसंचय , चांगली वृत्ती , नितळ मन आणि चांगली नियत असेल तर शेवटच्या पायरीवर सुद्धा मोक्षाचा आनंद अनुभवायला मिळतो .

हा मोक्ष भाव म्हणजेच व्यय भाव त्रिक भावात येत असल्यामुळे त्याचा समावेश “ वाईट स्थानातील एक भाव “ असाच होत जातो . पण तो चुकीचा आहे. कसा ते आज पाहूया ?

व्यय भाव आपल्याला  मोक्ष , तुरुंगवास , दवाखाना , परदेशगमन अनाठायी खर्च  अनेक विध गोष्टी ज्ञात होतात . प्रत्येक भाव , राशी आणि ग्रह आपल्यावर अनेक चांगल्या वाईट गोष्टींची उधळण करत असतात . आपले संपूर्ण आयुष्य ऋषी मुनींनी ह्या १२ खिडक्यात अगदी चपलख बसवले आहे . माणसाच्या मनात असा एकही प्रश्न नाही जो ह्या १२ भावांच्या पलीकडे आहे . जे काही आहे ते ह्यातच दडलेले आहे. आपल्याला फक्त ते शोधायचे असते इतकच .

व्यय भावातील ग्रहांच्या बद्दल आपल्या मनात नेहमीच कुतूहल असते . तिथले शुभ ग्रह आणि अशुभ ग्रह काय फल देतील असे प्रश्न आपल्याला पडत असतात . आज व्यय भावातील “ गुरु “ चा अभ्यास  करुया .

व्यय भावात जरी असला तरी गुरु हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे. गुरु च्या दोन राशी धनु आणि मीन इथे असतील तर आपण गुरु स्व गृही आहे असे म्हणूया . कर्क राशीत गुरु उच्चीची वस्त्रे परिधान करतो तर मकर राशीत निचत्वाला जातो. गुरु हा मुळातच आकाश तत्वाचा ग्रह आहे. अर्थात हि सर्व फळे प्रामुख्याने मिळतात ती गुरूच्या दशा अंतर्दशेत .

व्ययातील गुरु राहू केतू ह्यांनी दृष्ट असेल किंवा त्यांच्या युतीत असेल , शनी च्या दृष्टीत असेल , शुक्राच्या राशीत असेल , वक्री असेल तर त्याच्या फळात कमतरता येणार. व्ययातील गुरूचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे असलेले ज्ञान मुक्त पणे इतरांना देत राहणे . धार्मिक यात्रा तसेच विदेश यात्रा हा गुरु करवेल.  गुरु शुभ स्थितीत असेल तर विवेक ज्ञान सद्विचार आणि समंजस पणा देयील. गुरु चांगला असेल तर विदेश यात्रा आणि त्यातून अर्थार्जन , संतती चे शिक्षण किंवा नोकरीसाठी परदेशगमन , 

गुरु धर्म किंवा मोक्ष त्रिकोणात येणाऱ्या राशींमध्ये व्ययात असेल तर आणि त्यांच्याच भावेशाच्या दृष्टीत असेल , कुठल्याही कुयोगात नसेल तर उत्तम व्यासंग , वक्ता होईल, एखादी मोठी धार्मिक संस्था चालवेल, मठाधीपती म्हणून काम करेल . व्ययातील गुरु शुद्ध असेल तर एखाद्या मठाचा देवळाचा कारभार बघेल पण बिघडलेला असेल तर ढोंगी असेल. मेवा खाण्यासाठी सेवा करेल , ढोंगी ,अज्ञानी पण दिखावा करणारा असेल. गुरु बिघडला असेल तर मग लोकांच्या पैशाचा दुरुपयोग , फ्रोड , धोका करून मग तुरुंगवास नशिबी येणे हे होणारच .  दुषित गुरु लिव्हर , मेदवृद्धी आजार देयील आणि दवाखान्याच्या फेर्याही करवेल . धननाश होईल , आजार पणावर अमाप खर्च होईल. शुभ गुरु उत्तम डॉक्टर , गणितज्ञ , विचारवंत , वकील , उत्तम सल्लागार , ज्ञानी व्यक्ती घडवेल .


धनु राशीचा व्ययातील गुरु चांगली नोकरी आणि चांगल्या ठिकाणी बदली करवेल . विदेशात उत्तम शिक्षण होईल . चांगले घर होईल . मीन राशीचा गुरु भाग्येश होवून व्ययात असेल तर सुद्धा परदेशगमन करवेल , परदेशात स्थाईक होईल , साधना , नामस्मरण भक्ती करेल . हाच गुरु मकर राशीत निचीचा असेल तर अमाप खर्च होईल , पैशाचा संचय होणार नाही . ह्या गुरुवर निचीच्या शनीची दृष्टी नको . पण हा नवमांशात बलवान असले तर चांगली फळे मिळतात . 

व्ययात गुरु उच्चीचा म्हणजेच कर्क राशीत असेल म्हणजेच इथे गुरु अष्टम भावाचा स्वामी असून विपरीत राज्योगात असेल तर परदेशगमन , यात्रा , संतती विदेशात अध्ययन किंवा नोकरीसाठी जाईल. गुरूच्या तीन दृष्टी आहेत पण त्या काय फळे देतील हे पहायच्या आधी गुरु शुभ आहे कि अशुभ हेही पाहावे लागेल. व्ययातील गुरूची दृष्टी चतुर्थ भाव , षष्ठ भाव आणि अष्टम भावावर असते . चतुर्थ भावावरील दृष्टी चांगले घर , जमीन जुमला गृहसौख्य देयील पण शुभ असेल तरच . तसेच षष्ठ भावावरील दृष्टी अशुभ असेल तर रोग ऋण शत्रू तयार करेल पण शुभ गुरु पासून घाबरण्याचे काम नाही . अष्टम भावावरील दृष्टी गूढ शास्त्रात प्रगती करेल ,वारसाहक्काने संपतीचा लाभ होईल, ज्योतिष शास्त्रात प्रगती , अचानक धन मिळेल . अशुभ असेल तर ह्या सर्वाच्या विपरीत घटना घडतील. 

वरील विवेचनावरून आपल्या लक्ष्यात आले असेल कि प्रत्येक वेळी गुरु हा शुभ असेलच असे नाही तो अशुभ सुद्धा असू शकतो . गुरु मित्र राशीत आहे कि शत्रू राशीत , लग्नेशाचा गुरु मित्र आहे कि शत्रू , पापग्रहांनी दुषित आहे का ? ह्या सर्वांवर गुरूचा फलादेश अवलंबून असतो . त्यामुळे सखोल अभ्यास आवश्यक असतो.

म्हणूनच गुरु लग्नात आला किंवा त्याची दृष्टी सप्तम भावावर येयील तेव्हा विवाह होईल हे भाकीत चुकीचे ठरू शकते . विवाह होण्यास इतर अनेक गोष्टींची सांगाड घालावी लागते . गुरु हे एक तत्व आहे मग त्याची रूपे आणि नावे अनेक असतील. मातृदेवो भव , पितृदेवो भव. आपले आईवडील हे आपले प्रथम गुरु आहेत . आपले शाळेतील महाविद्यालयातील शिक्षक तसेच अखंड आयुष्याच्या प्रवासात भेटत जाणार्या सर्व ज्ञानी व्यक्ती सुद्धा गुरुसमान आहेत . सरतेशेवटी आपले सद्गुरू ज्यांचे बोट धरून आपला जीवन प्रवास सुरु आहे त्यांचा वरदहस्त असल्याशिवाय काहीच शक्य नाही . 

आपापल्या पत्रिकेत गुरु कसा आहेत ते आपले आपणच तपासून पहा . दुषित असेल तर त्याला चांगला करण्यासाठी उपाय करा आणि चांगला असेल तर अजून चांगला करण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील राहा .

उपासना किती करू हा प्रश्नच येत नाही . बटाटे वडे खाताना विचारतो का किती खाऊ ?? हे अगदी तसेच आहे . आपण कलियुगात आहोत तासातासाला समस्या येत आहेत त्यातून मार्ग काढताना उपासना उपयुक्त ठरणारच , उपासना हा आपल्या जीवनाचा आधार आहे . तेव्हा जितका जमेल तितका जप करत राहा . अधिकस्य अधिकम फलं.


गुरूचा नवग्रह स्त्रोत्रातील बीजमंत्र म्हणणे ( किती वेळा ? तर जमेल तितका )

श्री स्वामी समर्थ हा जप किंवा आपल्या इष्ट गुरूंचा जप म्हणणे.

श्री गजानन विजय किंवा गुरूलीलामृत , साई चरित्र ग्रंथांचे पारायण रुपी सेवा 

धार्मिक स्थळांना भेट देवून सद्गुरूंचे प्रत्यक्ष दर्शन घेणे 

अखंड नामस्मरण सर्वात उत्तम .


आपल्या सर्वाना आयुष्यात मार्गदर्शक गुरु लाभूदेत आणि आपल्याकडून सद्गुरूंची सेवा अधिकाधिक होऊदे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना . 

माझे आईवडील , माझे सर्व शिक्षक , सर्व वाचक वर्ग ह्यांना हा लेख सदर अर्पण करताना आनंद होत आहे. 


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230