Friday, 30 December 2022

सकारात्मकतेचे प्रभावी अस्त्र – सततचा बदल – Kaizen

 || श्री स्वामी समर्थ ||



रोजचे आयुष्य तेचतेच असते ,जसे रोज तेच चेहरे, रस्ते , जेवण , त्याच वर्तमानपत्रातील बातम्या , तीच ट्रेन बस अगदी सगळे रुटीन सारखे . कधी तरी त्याचा कंटाळा येतो आणि मग आपण बोर होतो . प्रत्येक वेळी आपण हवापालट म्हणून किंवा सुट्टीसाठी बाहेर जाऊ शकत नाही . पण मग हा तोचतोच पणा घालवायला करायचे तरी काय ? अश्यावेळी प्रत्येक्ष निसर्गच आपल्याला मदत करतो . जापनीज concept “ kaizen “ ह्या दृष्टीने अभ्यासण्या सारखा आहे. Kaizen हा जापनीज शब्द असून त्याचा अर्थ “ Continuous Improvement “ असा आहे. ह्याला “ Change for the Betterment “ असेही म्हंटले जाते .Kai म्हणजे “ Change ” आणि Zen म्हणजे “  Good “. 

जीवनातील रोजच्या गोष्टीत लहानसहान बदल करून आपण जीवन अधिक चांगले कसे करू शकतो हे . घरातील फर्निचर च्या रचनेत बदल करून बघा तेच घर वेगळे वाटेल. घराचे पडदे , स्वयपाक घरातील नेहमीच्या वस्तू उपकरणे ह्यांचा जागा किंवा त्यात बदल केलात तर काहीतरी वेगळेपण जाणवते . 

आजकाल मोठमोठ्या कंपन्या मध्ये  जापनीज “ Kaizen “ पद्धतीचा वापर केलेला दिसतो. एखादा रिपोर्ट किंवा अनालिसिस मध्ये बदल करून तो जास्ती सुस्पष्ट किंवा विस्तृत कसा करता येयील किंवा “ All in one frame “  कसा होयील  ह्याचा विचार सतत करून त्यात बदल करणे म्हणजे “ kaizen “ . आजकालच्या प्रगट युगात kaizen सारख्या टेक्निक आपल्याला एक स्टेप पुढेच नेतात . आहे त्यात मी असा काय करू शकते ज्यामुळे ती गोष्ट लहानश्या बदलाने सुद्धा अधिक चांगले होईल हि प्रेरणा kaizen देत राहते . रोजच्या रुटीन प्रोसेस kaizen मुळे upgrade होताना दिसत आहेत .

आपल्या मुलानाही खाण्यापिण्यात सतत बदल हवा असतो . रोज त्याच नेहमीच्या भाज्या , पराठे .मग आई हे कर आई ते कर चालू होते अनेकदा ह्यातूनच मग बाहेरचे खाणे बदल म्हणून सुद्धा खाल्ले जाते तर कधी गरज म्हणून. शेवटी जिभेचे चोचले कुणाला नाहीत .  खाण्यातील बदल अपेक्षित असतो तसाच पेहराव . ह्यातील बदल सुद्धा आपल्याला ताजातवाना करत असतो . सतत एकच पद्धतीचे कपडे वापरणे त्यापेक्षा त्यात बदल कधी साधे सुती तर कधी साडी , वेस्टर्न असे बदल आपल्याला फ्रेश करतात . वेगवेगळे अलंकार तर सगळ्यांकडेच असतात पण मग घालू आत्ता नको असे करत त्यांना कपाटातून बाहेर यायला पंचांग बघायची जणू वेळ येते . हे सर्व बदल आपल्यात सौंदर्यात दोन गुण जास्ती देतातच पण आनंद सुद्धा देतात .


आहार हा खूप महत्वाचा असतो आणि त्यात प्रत्येकाच्या आवडीही असतात . प्रत्येक कुटुंबाचे स्वास्थ बघून त्या ठरवाव्या लागतात . प्रत्येकाच्या घरात व्यक्तीसापेक्ष असणारे आजार किंवा आवडी लक्ष्यात घेवून त्या घरातील गृहिणीला मेनू ठरवायचा असतो पण त्यातही अनेक बदल करून नाविन्य आणू शकते. घरात नुसती फुले आणून वाज मध्ये ठेवली तरी घरात चैतन्य होते , नेहमीचीच सुगंधी अगरबत्ती त्यामध्ये बदल , परफ्युम , सौंदर्य प्रसाधने , अश्या रोजच्या गोष्टीत आलटून पालटून बदल केला तर तोचतोच पणाचा फील जातो. 

एखाद्या चालू प्रोसेस मध्ये बदल घडवून तीच प्रोसेस कमी वेळात अधिक चांगला परिणाम कसा देयील हे “ kaizen “ मुळे शक्य होते आणि हाच त्याचा उद्देश सुद्धा आहे. अनेक मोठ्या कंपनींची HR ह्याचा उपयोग करताना दिसतात . अनेक प्रगतशील देश ह्याचा उपयोग करून सातत्याने नवीन संकल्पना राबवत आहे . 

सतत बदलणे हा निसर्गाचा गुण आहे आणि तो आपल्या सर्वानाही लागू आहेच कि . आपला एकच मूड संपूर्ण दिवस सुद्धा नसतो . त्याचप्रमाणे एकाच सुरातील आयुष्य जगण्यातील मजा घालवते आणि लय सूर सुद्धा . “ kaizen “ ह्या सर्वांसाठी उपयुक्त असा उपाय आहेच. तसेच सतत बदल करणे म्हणजे मेंदूला खाद्य म्हणून अनेक आजार सुद्धा दूर राहतात . आता काय बदल करायच्या ह्या चिंतन प्रक्रियेत आपणही गुंतून राहतो. 


तेच आयुष्य नवीन भासते , मरगळ निघून जाते आणि आपण पुन्हा एकदा नव्याने जगू लागतो .

“ Kaizen ”  सारख्या संकल्पना आपल्या आयुष्याला निश्चित वेगळेपणा देणाऱ्या आहेत , आयुष्य सुखकर करणाऱ्या आहेत  .  kaizen सारख्या concept आपले आयुष्य बेटर करतील नाही का? करून बघा . 

2023 तुम्हा सर्वांचे आयुष्य एका वेगळ्याच उंचीवर नेणारे असणारच आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समृद्धी येऊदे. प्रयत्नांचा वेग वाढवून यशश्री खेचून आणायची आहे . आपल्या सोबत इतरानाही आनंद द्यायचा आहे .


संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क    : 8104639230





 





Tuesday, 27 December 2022

स्वतःला आनंदी ठेवणे हे आज मोठे आव्हान आहे - Move On

|| श्री स्वामी समर्थ ||

 

आपण आपल्या मनाला सतत कश्यात तरी अडकून पडायची जणू सवयच लावलेली आहे . सहज काहीच सुटत नाही आणि आपली सोडायची मानसिकता सुद्धा नसते. आपण सगळे जमा करून ठेवतो मग त्या घरातील अनेक वस्तू , कपडे असोत कि मनातील आठवणी आणि नको नको ती माणसे सुद्धा . वास्तू शास्त्र सांगते कि 6 महिने एखादी गोष्ट वापरली नाही तर टाकून द्या, घरात clutter करून ठेवू नका जसे जुनी न चालणारी घड्याळे , कपडे, दोर्या , पेपरची , दुधाच्या पिशव्यांची रद्दी ,द्या सगळे टाकून ....अश्याच अवस्थेत एखादी वस्तू दुसर्याला द्या कि समोरचा अजून ६ महिने ती वस्तू वापरू शकला पाहिजे. पण नाही सगळे उराशी कवटाळून बसायचे. घरात चार घड्याळे असतात आणि प्रत्येक घड्याळात वेगवेगळे वाजलेले असतात मग घरातील चार लोकांची मते सुद्धा चार वेगवेगळीच असणार कि नाही .

असो तर सांगायचे असे कि मनाला आता ह्यात सगळ्यात अडकवून ठेवू नका, मागचे मागे सोडून जा आणि पुढे चालत राहा , पुढे मोकळे आकाश आपल्याला गवसणी घालू पाहते आहे, खूप नवीन अनुभव अजून घ्यायचे आहेत , खूप खूप लोक भेटायची आहेत ,नवीन बंध जुळायचे आहेत , पुढचे आयुष्य तुमची पुढील वळणावर आतुरतेने वाट पाहत आहे . पण आपण हा नाही बोलत तो नाही बोलत ह्याने असे केले आणि त्याने असे केले ह्यातून बाहेरच नाही पडत ...सोडून द्या. जो आपला असेल तो आपल्यासोबत असणारच आहे इतरांची पर्वा आपण का करायची. कारण आज माणसे कामापुरती वापरण्याची फ्याशन आहे.  जुने जायील तेव्हाच नवीन येईल . पाणी जेव्हा वाहते असते तेव्हाच ते पिण्याजोगे असते नाहीतर त्याचे डबके होते . जुना ड्रेस द्या आणि नवीन आणा . सगळे जुने टाकून द्या आणि नवीन गोष्टीनी घर सजवा. जुन्या आठवणी क्लेशदायक असतात किती दिवस तिथेच अडकून पडणार आपण , शेवटी ज्याचे त्याचे कर्म आपल्यासोबत . किती आणि कायकाय मनाला लावून घ्यायचे आणि कश्यासाठी , लोक मजेत आनंदात जगत आहेत मग आपणच हा मनाला दुक्ख देत देत जगायचे.  वरचा बसला आहे आणि तो सगळ्याचा हिशोब वेळ आली कि करतोच आणि तो त्याचाच अधिकार आहे ह्यावर माझा विश्वास आहे .

आज समुपदेशन करताना लक्ष्यात येते कि लोक त्याची मनाची शांतता घालवून बसली आहेत ,त्याच त्याच पाशात अडकली आहेत त्यामुळे आयुष्य जगायचेच विसरून गेली आहेत . तुम्ही कितीही चांगले वागा हा समाज तुम्हाला जगू देत नाही हे सत्य आहे . कुणालाही कुणाचे चांगले झालेले पाहवत नाही मग अशी लोक कश्याला हवी तुमच्या मित्र यादीत ? काय संबंध ? अचानक बोलणे बंद करणे अचानक आपल्या आयुष्यातून निघून जाणारी माणसे आपल्या मनाचा क्षणभर सुद्धा विचार करत नाहीत मग आपण सुद्धा त्यांचा का विचार करायचा
? ती आपली कधीच नव्हती . आपण आपले मुक्त नक्कीच जगू शकतो का नाही ? प्रयत्न करून बघा नक्कीच यशस्वी व्हाल. आज रोजच्या जीवनात प्रत्येक क्षणी मोठमोठाली आव्हाने आहेत.

आजची तरुण पिढी प्रचंड स्ट्रेस मध्ये जगत आहे , मुला मुलींची लग्नाची वये खूप पुढे गेली आहेत . काही मुले तर इतरांचे अनुभव ऐकून लग्न नकोच म्हणतात . आज लग्न संस्था मोडकळीला आलेली आहे कारण जबाबदारी कुणाला नको आणि आपण एकटे जगू शकतो हा पराकोटीचा अहंकार .पण हा विचार अजून १० वर्षांनी टिकणारा नाही तेव्हा वय निघून गेलेलें असेल. असो .

आपल्याला देवाने दिलेले २४ तास खूप काही करायला पुरेसे आहेत . स्वतःला आनंदी ठेवणे हा आजचा मोठा चालेंज आहे ,पटतंय का
? कारण अर्ध आयुष्य दुसर्याला काय वाटेल ह्यातच व्यतीत झालय आपले. आयुष्यभर साडी नेसणार्या काकू नी खरच एकदातरी  ड्रेस घालून बघावा , मग बघा त्या बदलेल्या वस्त्राबरोबर त्यांना किती मोकळे ढाकळे वाटेल. अशीच मनावर असंख्य वर्ष चढलेली नको नको त्या आठवणींची  पुटे,  जळमटे सुद्धा दूर करा , मनाची साफसफाई करतच पुढील आयुष्याचा प्रवास करुया. नाहीतर जगातील सगळे आजार होतील. माणसाचे मन आजारी पडते आणि मग शरीर म्हणूनच मनाला आनंदी ठेवण्याचा ध्यास घ्या .

नवीन वर्षात कुठलेही संकल्प करू नका कारण ते 24 सुद्धा टिकत नाहीत. चालायला जायचे आहे ना
? शुभस्य शीघ्रम .उठा आणि चालायला जा ठरवू बिरवू काही नका just do it. आपल स्वतंत्र व्यक्तिमत्व जपा , आपल्या मताला सर्वप्रथम आपणच किंमत द्यायची असते तरच इतर देतील. केलेल्या चुका मोठ्या मनाने स्वीकारा तरच मन शांत होयील आणि काहीतरी मार्ग मिळेल. दुसर्याला दोष देत बसू नका ,खूप झाले ते आता . कायम दुसर्यावर अवलंबून रहायची सवय सोडून दिली पाहिजे. स्पष्ट बोलणे आणि फटकळ बोलणे ह्यात फरक आहे जो कित्येकांना समजत नाही कारण तितकी कुवत नसते . पण आपण आपली मते ठामपणे मांडायला शिकले पाहिजे .  आपण एकटे येतो आणि एकटेच जाणार आहोत आणि हेच अंतिम सत्य आहे जे बदलणार नाही त्यामुळे स्वतःचे छंद जोपासा. कश्याला कायम सतत कुणीतरी हवे बरोबर . आज जितकी कमी माणसे आपल्यासोबत आणि जितक्या कमीतकमी बातम्या तितके आपण सुखी . आज घरात कुणी विचारत नाहीत म्हणून फेसबुकवर गर्दी करणारे अनेक आहेत ,सतत कुणालातरी शोधात राहणारे ,सगळेच नाहीत पण आहेत .

अहो प्रत्येकाला दुक्ख आहे फक्त त्याचे स्वरूप वेगळे आहे , म्हंटलेच आहे ना जगी सर्व सुखी असा कोण आहे ? जीवन जगून खूप झाले पण आपल्या स्वतःच्या मनात त्याच्या अंतरंगात डोकवायचे राहूनच गेले. मला काय हवे आहे ? मला काय वाटते हे सगळ्यात महत्वाचे आहे. स्वतःच्या अस्तित्वाची ओळख आणि आपल्या ह्या जन्माचे प्रयोजन अति महत्वाचे आहे. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे उपासना , साधना आणि ध्यानातून नक्कीच मिळतील निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे. आपल्याला जे करायचे ते आपण बरोबर करतो आणि जे करायचे नाही त्यासाठी १०० कारणे सांगतो. बघा विचार करा .

आपल्या मनाचा कल कुठे आहे ते आपल्याला माहित असते , वाचन , लेखन ह्यांनी सैरावैरा पळणारे मन  नक्कीच शांत होईल. आपली विचारधारा पक्की असणे , नियत साफ असणे आवश्यक आहे . देवाने सगळ्यांना संधी दिली आहे पण आपण त्याचा उपयोग किती करतो ते आपल्या हातात आहे . आज कुठलाही विषय किंवा क्षेत्र घ्या अत्यंत वाईट स्पर्धा , दुसर्याला खाली खेचण्याची मनोवृत्ती सर्व आहेच पण ह्यातूनही आपल्याला आपला प्रवास आनंदी करायचा आहे हे आव्हान आहे . यशाचे  शिवधनुष्य पेलण्याची जिद्द आपण ठेवायचीच आहे कारण आपले सद्गुरू अनंत हाताने आपल्या मागे उभे आहेत .

मी तर माझे सर्व जीवन त्यांना समर्पित केले आहे . माझा त्या शिक्तीला साष्टांग दंडवत आहे , अगदी कश्याचाही विचार मी करत नाही
, त्यांच्या इच्छेत सर्व इच्छा विलीन केल्या आहेत . समोरचा बोलला आपण बोलायचे नाही बोलला नाही बोलायचे . इतके साधे सोपे जगायला महाराजांनीच मला शिकवले आहे. वेळ भरभर निघून जातोय आणि आपले एकेक पाऊल मृत्यूकडे जात आहे म्हणूनच हा वेळ सार्थकी लावणे महत्वाचे आहे . काय वाटते ? आपण आनंदी असतो तेव्हा सर्व जग सुंदर वाटत राहते आणि निराश उदास असतो तेव्हा जगूच नये असे वाटते . उंबरठ्याच्या बाहेर जग सुरु होते आणि तिथे आपले कुणीही नसते , पण त्याच्या आत आपली माणसे असतात ज्यांच्याप्रती आपली काही कर्तव्येही असतात . ती पूर्ण करणे आपले प्रथम कर्तव्य त्यामुळे समाज कारणात आणि राजकारणात किती अडकून पडायचे हे आपण ठरवायचे शेवटी ज्याच्या खिशात पैसा त्याला मान हे आज समीकरण आहे. लष्करच्या भाकर्या भाजून आल्या कुटुंबाचे पोट भरणार नाही आणि कुणी आपल्याला दमडा हि देणार नाही हे पक्के लक्ष्यात ठेवले पाहिजे .  

ठरवायचे काहीच नाही पुढे जात राहायचे . एखादी गोष्ट कृतीत उतरवणे महत्वाचे . आज आयुष्यत खूप काही करण्यासारखे आहे. रोज एकाला तरी हसवा , कुणाच्या दुक्खावर किंवा व्यंगावर हसण्यापेक्षा हे बरे. ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांनी निदान एक तरी घटस्फोट वाचवा , एकाचे तरी
match making मस्त करून द्या. खरे ज्ञान द्या . घटस्फोट  झालेली माणसे वाईट नसतात फक्त दोन वेगळा विचार करणारी माणसे एकत्र आलेली असतात . मार्केटिंग अजिबात नको फसवणूक नको. लोक हुशार आहेत त्यांना ते समजते आणि आपली पत जाते त्यापेक्षा खरे आपला ठसा उमटवून जाते तोही कायमचा . आज मार्केटिंग चा जमाना आहे. जो दिखता है वह बिकता है . पण लोकांकडून किती पैसे उकळायचे आणि किती टोप्या घालायच्या? असो.  सतत कुढत बसणे, जीवनात घडलेल्या वाईट आठवणी , प्रसंग माणसे ह्यांच्याभोवती रुंजी घालत बसणे म्हणजे स्वतःच्याच हाताने आयुष्याची माती करणे. इथे कुणाला कुणाचीही पडलेली नाही .

12 राशींची माणसे ह्या जगात आहेत ,काही मनाला लावून घेणारी आहेत तर काही आपल्याच स्वप्नांना पंख लावणारी आहेत. चला तर मग 2023 नवनवीन स्वप्ने बघुया ती पूर्ण करण्यासाठी धडपड करुया , अविश्रांत कष्टाने यशश्री खेचून आणूया आणि स्वतःच्या असण्याला एक नवीन अर्थ प्राप्त करून देवूया .
आज सोशल मिडीया प्रगत आहे त्याने खूप सुप्त लेखकाना जन्म दिला आहे. तुम्हीही आपले विचार शब्दबद्ध करा , लिहिते व्हा आणि विचारांना दिशा द्या. इतरांना प्रेरणा द्या . एखाद्या खळखळणार्या धबधब्या सारखे आयुष्य जगा , डबके होऊन जगण्यात मजा नाही . जिवंतपणे कत्येक मरणे जगणार्या लोकांना जीवन जगायची प्रेरणा द्या.

दुसर्याचा द्वेष करून , हेवे दावे ,मत्सर करून ह्या जगात कुणीही सुखी झाले नाही आणि होणारच नाही . उलट आपणच मानसिक रुग्ण होतो अश्याने . मनात महाराजांनाच आणून बसवले तर इतर टुकार विचारांना तिथे जागाच राहणार नाही . प्रयत्नपूर्वक हा प्रयत्न करून बघा . आज आर्थिक समस्या , विवाह , वास्तू , मुलांची शिक्षणे , व्यसने ,संतती न होणे अश्या अनेक विचारांनी मनुष्य त्रस्त आहे. आपल्या जराश्या स्मित हास्याने , दोन गोड शब्दांनी एखाद्याला जगायला स्फूर्ती मिळाली तर तो आनंद खरच अनमोल असेल.पटतंय का? मग लगेच कृती करूनच टाका .
2023 तुम्हा आम्हा सर्वांसाठी “ अनमोल “ असुदे , स्वप्नपूर्तीचे , आकाशाला गवसणी घालणारे ,आरोग्यदायी , दुसर्याला आनंद देणारे , अध्यात्माची गोडी चाखत महाराजांच्या चरणाशी आयुष्य समर्पित करणारे असुदे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना . सकारात्मक जीवन जगायची गुरुकिल्ली आपल्याच कडे आहे आता फक्त ती वापरायची आहे.

माझा फोन आला नाही तर काळजीच्या स्वरात मला फोन करून माझी खुशाली विचारणाऱ्या , माझ्या लेखनाला सतत प्रेरणा देणार्या माझ्या गुरु ,सखी सौ. शिल्पाताई अग्निहोत्री ह्यांच्यापुढे मी नतमस्तक आहे आणि  माझ्या 2022 मधील हा माझा अखेरचा लेख त्यांना समर्पित करताना विशेष आनंदही होत आहे. .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230

 

 

 

 

  

 

 

 

 

 


Monday, 19 December 2022

अध्यात्माची Expiry Date

 || श्री स्वामी समर्थ ||


आता तुम्ही म्हणाल हे काय आता नवीन ?? हो खरच नवीन आहे , मीही आज पहिल्यांदा ऐकले आणि त्यावर लिहिल्याशिवाय झोप लागायची नाही म्हणून ह्या चार ओळी लिहिण्याचा लेखनप्रपंच .


आज एका व्यक्तीचे समुपदेशन केले . मुलाच्या आजारपणाचा प्रश्न होता. असो. सर्व यशाशक्ती बोलून झाल्यावर त्या म्हणाल्या ताई मला समजले आता कायकाय करायचे ते आणि कश्यासाठी करायचे .  म्हंटले मनात विश्वास ठेवा ज्या देवतेचे पूजन करता तिला शरण जा आणि मगच उपाय फलद्रूप होताना दिसतील. 


मुलाच्या आजारपणाचा प्रश्न होता . पत्रिकेतील शनी षष्ठ स्थानात त्यावर गोचर शनी व्ययातून बघतोय आणि मूळ पत्रिकेतील मंगळ तृतीयात . पोटाचा आजार होणारच , वायुतत्व बिघडले कि पचन बिघडणार . लग्नेश षष्ठ स्थानात .असो गेले दोन वर्ष शनी मुळे त्या मुलाला अधिक त्रास झाला. 


पुढे त्या जे म्हणाल्या ते ऐकून मी अक्षरश हतबुद्ध झाले. गेले दोन वर्षापूर्वी त्यांनी कुणाकडून तरी घरात होम हवन , पूजा शांती दोन दिवस अखंड जप असे बरेच काय काय करून घेतले तरीही काहीही फरक नाही . गेल्या वर्षी त्यांनी विचारले कि अजून काहीच फरक नाही तेव्हा उत्तर मिळाले कि “ हे सर्व उपाय फक्त वर्षभरासाठी असतात , वर्ष झाले आता त्याचा परिणाम गेला आता पुन्हा करायला लागतील.” सर्वसामान्य माणसाच्या खूप पलीकडे असणारे हे उत्तर मलाही पचनी पडले नाही . व्रत वैकल्ये , अध्यात्म साधना ह्याला  Expiry Date असते हे मला आज नव्यानेच समजले आणि ज्ञानात भर पडली . 

एखाद्या देवतेचे पूजन हे मनापासून केले तर देवता प्रसन्न होणार कि म्हणणार “ संपले आता Expiry Date झाली “ .


मुळातच आपल्याला कुणीही काहीही करायला सांगितले तर ते नेमके कश्यासाठी आहे ? हे जाणून घेतले पाहिजे आणि जर स्वतःच्या बुद्धीला पटले तर आणि तरच केले पाहिजे. उठसुठ कुणी काहीही सांगेल आपण ते करणार का? हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारला पाहिजे ,दुसर्याला दोष देवून काहीही उपयोग नाही . डोळे मिटून एखाद्या गोष्टीचे मर्म जाणून न घेता केलेली कुठलीही गोष्ट व्यर्थ आहे. विचार करा तुम्हालाही पटेल. 


निर्बुद्ध पणाने केलेली गोष्ट सर्वार्थाने व्यर्थ जायील.  वरील उदाहरणात शनी मुले ज्या गोष्टी होत आहेत त्याला शनीचीच उपासना हवी , षष्ठ स्थान पोट दर्शवते आणि शनी वायुतत्व असंतुलित करत असल्यामुळे हनुमान चालीसा , जप ,शनीचे मंदिरात जाऊन दर्शन घेणे ह्या गोष्टीमुळे फरक पडणार आणि ह्या आपण का करत आहोत ह्याचे कारण समजले तर आपण अजून कळकळीने करू , हो ना? 


आज आयुष्यात जे काही करायचे ते अत्यंत जागरूक पणे,  डोळसपणे करायचे , आम्हाला ह्यातले काही समजत नाही असे न म्हणता समजून घ्यायचे आणि मग करायचे . सांगकामेगिरी अजिबात करायची नाही . श्रद्धा , भक्ती ,उपासना ह्या नक्कीच फलद्रूप होतात त्यांना Expiry Date नसते हे लक्ष्यात ठेवा . उलट जितकी अधिक उपासना तितके मोक्षाचा मार्ग सुकर . महाराजांचे चरणाशी अश्या भक्तांना नक्कीच जागा प्राप्त होते . 


आयुष्य हे रोलर कोस्टर राईड सारखे आहे ,सगळे दिवस आपण बघतो चांगले वाईट . काही आपले भोगही असतात आणि ते भोगल्याशिवाय आपली सुटका नसते त्यामुळे ते भोगून उलट एकेक हिशेब चुकते करावे . कधीकधी काळ आणि वेळ जावा लागतो आणि पुन्हा जीवन पहिल्या सारखे लयबद्ध होते , सूर जुळतात आणि जीवन आनंदी होते . जरा डोके दुखले कि लगेच गोळी घ्यायची सवय घटक आहे कारण आपल्याला सहन करण्यासाठी लागणारा संयम संपला आहे.

समुपदेशन करताना समोरचा जातक फोनवर समस्या सांगायच्या आधीच तुम्ही उपाय पण सांगणार ना? हा प्रश्न विचारतो म्हणजे समस्या आहे हे गृहीतच धरले का तुम्ही ? म्हणून मी नेहमी सांगते अत्यंत आवश्यकता असल्याशिवाय सगळे उपाय ठाकले तर फक्त मार्गदर्शन म्हणून पत्रिका बघा , उठसुठ अजिबात नाही. पत्रिका पवित्र आहे ती खिरापत नाही सगळीकडे वाटायला. रोज तुम्हाला कुणीना कुणी काहीतरी करायला सांगेल तुम्ही करणार का? विचार करा .जागृत व्हा .


गोचर ग्रह अनेकदा परिणाम करतात चांगले आणि वाईट पण ते तात्पुरते असतात ,जीवन उध्वस्त होत नाही त्यांनी पण आपली लगेच पळापळ सुरु . असो .तहान लागली म्हणून विहीर खणू नये . गुरुसेवेचा ध्यास घ्यावा . गुरुतत्वाचे अखंड  पालन करावे , शुद्ध आचरण आणि भक्ती महाराजांच्या समीप नेते. काहीतरी मिळावे म्हणून सेवेत राहू नये . उपासना नित्याची असावी , संकटे येतीलच ती हवीतही , जीवनाचा तोही एक भाग आहे जो अपरिहार्य आहे पण त्याचे निरसन सुद्धा होते महाराज मार्ग दाखवतात ,आपल्याकडे हवे ते गुरूंच्या प्रती निष्ठा , संयम आणि सातत्य . 

आपल्या जीवनाला नक्कीच Expiry Date आहे पण आपल्या सेवेला , श्रद्धेला , समर्पणाला , भक्तीला नाही ...


संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


Thursday, 8 December 2022

वरदहस्त ठेवा शिरी मी अनंत अपराधी

 || श्री स्वामी समर्थ ||


आज श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण महाराजांनी पूर्ण करून घेतले. हा ग्रंथ म्हणजे श्री दासगणू महाराजांचा अनमोल ठेवा समस्त मानव जातीला संदेशप्रत आहे. आपले ग्रंथवैभव म्हणजे पारमार्थिक खजिना आहे. कुठलाही ग्रंथ जीवन कसे जगावे आणि जीवनाची मुल्ये शिकवून जाणारा आहे. प्रत्येक शब्द रसाळ आणि भक्तीचा कस लावणारा आहे. हे ग्रंथ वाचून एखाद्याला परमार्थाची गोडी नाही लागली तरच नवल इतके सामर्थ्य ह्यात सामावलेले आहे.  देव आपल्या भोळ्या भक्तीसाठी आसुसलेला आहे. हा ग्रंथ वाचून प्रापंचिक अडचणींवर  कशी मात करता येते हे ह्यातील 21 व्या अध्यायात  विषद केले आहे. 

भक्त होणे कठीण आणि परमभक्त होणे म्हणजे एक दिव्यच म्हंटले पाहिजे. ह्या ग्रंथातील महाराजांचे सर्वच भक्त त्यांच्या अनेक परीक्षा पार करत कसे परमभक्त झाले ह्याचे सुरेख विश्लेषण वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो आणि आपले मन सहजरीत्या त्या काळात विहार करून येते . मला तर हा ग्रंथ वाचताना आणि इतर वेळी सुद्धा शरीर इथे आणि मन महाराजांच्या चरणी असल्यासारखेच वाटत राहते . 

प्रचीतीविना भक्ती नाही पण ती येण्यासाठी तितकीच समरसता हवी अन्यथा ग्रंथ नसून एक पुस्तक वाचल्या सारखेच आहे नाही का? ग्रंथातील प्रत्येक शब्दात त्यांचे अस्तित्व जाणवले तर आपण ह्या ग्रंथात समरसून गेलो आहोत असे समजायला हरकत नाही ,अन्यथा सर्व फोल आहे. भावनारहित वाचन उपयुक्त नाहीच . 

जीवन मृत्युच्या उंबरठ्यावर उभे आहोत आणि आता मला तारणारे फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहात ह्या उत्कट भावनेने जर हा ग्रंथ वाचला तर सर्व मनोकामना पूर्ण होतील ह्यात शंका नसावी . पण तो भाव आणि ती एकरूपता आपण आणत नाही. अत्यंत निष्काम भक्तीने केलेले वाचन निश्चित फलद्रूप ठरेल. 


आपल्याला त्यांच्याकडे काहीही मागायची खरच गरज नाही पण आपण सामान्य माणसे आहोत. संकट समयी जे मनात येयील ते बोलतो पण त्यामागे तूच सुखकर्ता तूच दुखकर्ता हा भाव असतो . परमेश्वर हा माणसाच्या जीवनाचा आधार आहे आणि म्हणूनच त्याचे प्रत्यक्ष अस्तित्व असणारे सर्वच ग्रंथ अनमोल , अद्भुत आणि असामान्य आहेत .तरीही फक्त कठीण प्रसंगात परमेश्वराची आठवण होते हे सत्य आहे.  नित्य पठण करणारेही अनेक भक्त आहेत आणि त्यांना त्याची अनुभूतीही येत असते .

जसजशी पारायणे होत जातात तसतसे आपल्या स्वतःच्याही विचारांमध्ये परिवर्तन होत जाते . आपले अशांत असलेले मन हळूहळू स्थिरावत जाते . अनेक वेळा “ सद्गुरू कृपे साठी काय करावे “ असा प्रश्न विचारला जातो . कश्याला असा विचार करायचा ? सद्गुरू कृपा दिसत नाही पण जाणवते . 

मला शेगाव ला जावेसे वाटत आहे, तिकीट नाही मिळाले जीव तळमळत आहे, पोथी वाचताना अश्रू अनावर होत आहेत . मनोमन त्यांच्याच चरणी असल्याचा भास होत आहे , हे सर्व काय आहे? हि गुरुकृपा नाही तर अजून काय आहे? आपल्या आयुष्यात अध्यात्मिक मार्गावर पडणारे पहिले पाऊल हि सुद्धा त्यांचीच कृपा आहे. आपला वाल्याचा वाल्मिकी त्यांच्याच कृपेने होतो . माझे गुरु आहेत आणि ते मला सांभाळत आहेत हा विश्वास असणे हीच तर गुरुकृपा आहे. सतत त्यांचे होणारे भास , त्यांच्या भेटीची आस , त्यांच्याबद्दलचे वाचन, लिखाण, अनुभव कथन हे सर्व गुरु कृपा नाहीतर अजून काय आहे? गुरु आपल्या अत्यंत समीप , अवती भवतीच आहेत आणि त्यामुळे आपण सुरक्षित आहोत .

आपल्यासोबत जन्मोजन्मी आपले गुरु आहेत , ह्याच नाही तर आधीच्या अनेक जन्मात त्यांनी आपली साथ दिली आहे, आईप्रमाणे आपला सांभाळही केला आहे पण ते ओळखण्याची ताकद आणि कुवत आपल्यात नसल्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही . खरतर आपण जन्मापासून त्यांच्याच कृपेच्या छायेखाली वावरत आहोत आणि म्हणूनच एका क्षणी आपल्या हाती हे अद्भुत ग्रंथही येतात . सद्गुरू आपल्या सोबत अखंड असतात पण ते आहेत ह्याची जाणीव आपल्याला होणे तो क्षण म्हणजे आपला अध्यात्मातील प्रवेश . 


सद्गुरूकृपेसाठी वेगळे काहीच करायला नको , ती आपल्यावर आहेच आहे. आपल्याला समाजात अनेक लोक त्रास देतात , कित्येक वेळा मान अपमानाचे प्रसंग येतात पण अश्यावेळी शांत राहून आपण सद्गुरुवर ह्या गोष्टी सोडून देतो . आपण काय तर आपण चार थोबाडीत मारू पण त्यांनी केलेली शिक्षा आयुष्यभर धडा शिकवणारी असते . 

आज अनेकांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत जसे नोकरी , अर्थार्जन . महाराज आपल्याला पोस्टाने चेक नाही पाठवणार पण काम नक्कीच आणून देतील , आता ते केले नाही आणि पोथी पुराणे वाचत बसले तर कसे होणार ? स्वामिनी स्पष्ट सांगितले आहे आळशी माणसाचे तोंड सुद्धा पाहू नये . 

परमेश्वर आपल्याकडे काहीच मागत नाही , त्यांनीच आपल्याला घडवले आहे . आपल्याकडे त्याला देण्यासारखे आहे तरी काय ? देवाचिये द्वारी उभा क्षणभरी . पण तो एक क्षण सुद्धा पुरता नाही देत आपण त्याला.

आपल्या मनात अनेक विचारांचे काहूर उठलेले असते पण ग्रंथ वाचनाने आणि नामस्मरण केल्यामुळे ते हळूहळू कमी होत जाते . अध्यात्माचा रंग आयुष्याला वेगळीच दिशा देतो आणि जीवन कृतार्थ होते . एखाद्या गोष्टीचा हव्यास धरतो आपण, अमुक एक हवे,  हे झाले पाहिजे असे सतत वाटत राहते आणि ते मिळवण्यासाठी माणूस आयुष्यभर धडपडत राहतो पण कालांतराने त्या गोष्टी किती निष्फळ आहेत ह्याची जाणीव होते . म्हणूनच दासगणू म्हणतात “ एका संतावाचून विचारांचे परिवर्तन कोणी न करू शके आण , सत्य एक त्यांनाच कळे . “ म्हणूनच अध्यात्म कळणे  अवघड पण एकदा समजले कि त्याची गोडी चाखत आयुष्य सहज पुढे जात राहते .


मनुष्य जन्म मिळणे कठीण आणि तो सार्थकी लागणे त्याहून कठीण .  सद्गुरूंचा जीवनाला खूप मोठा आधार वाटत राहतो , ज्याचे कुणी नाही त्याचा देव आहे  , नाही का? गुरूंच्या शिवाय जीवनाला अर्थ हि नाही . त्यांच्या सेवेत दुक्खाची झळ लागत नाही आणि संकटांचा माराही जाणवत नाही. एकदा का त्यांच्या शाळेत नाव घातले आणि त्यांचे बोट धरले कि मग ते नेतील तिथे आणि करतील ते आपल्या भल्यासाठी हा विश्वास भक्तांनी अभेद्य ठेवलाच पाहिजे. 

सरतेशेवटी म्हणावेसे वाटते  “ वरदहस्त ठेवा शिरी मी अनंत अपराधी “

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230




 

 

   


 


Monday, 5 December 2022

अहंकार हा आत्मा असणारे कृत्तिका नक्षत्र

 || श्री स्वामी समर्थ ||



टीप : माझा प्रत्येक लेख मी अनेक पत्रिका आणि व्यक्तीमत्वांचा अभ्यास करून लिहिते तेव्हा कृपया माझे नाव काढून किंवा ह्यातील संदर्भ काढून बदलून स्वतःच्या नावावर पोस्ट करू नये हि विनंती . माझेच लेख नाव काढून मलाच whatsapp वर येत आहेत म्हणून आज स्पष्ट लिहिले.

गेल्या आठवड्यात पाहिलेल्या 3 पत्रिकेतील ग्रहांचा विलक्षण योग हा  “ कृत्तिका “ ह्या रवीच्या नक्षत्राशी होता . म्हणून आज हा लेखन प्रपंच .

एकाच राशीत 4 चरण येणाऱ्या नक्षत्राचे वैशिष्ठ वेगळे असते. एकाच राशीत त्यांना आपले सर्व गुण व्यक्त करता येतात . कृत्तिका ह्या रवीच्या नक्षत्राचे एक चरण मेष राशीत आणि ३ चरण जेव्हा वृषभ राशीत जातात तेव्हा ह्या नक्षत्राला कात्री लागते आणि त्याला त्रिपाद नक्षत्र म्हणून संबोधले जाते . 

मेष ह्या सेनापती मंगळाच्या राशीत आलेले हे रविचे तेजस्वी नक्षत्र आहे. कृत्तीकेवर प्रभाव आहे अग्नीचा अंगिरस ऋषींचे गोत्र असलेले हे नक्षत्र 7 तारकांनी बनलेले असून देवता अग्नी आहे. म्हणूनच कृत्तीकेवर अग्नीचा प्रभाव आहे. हे कफ प्रवृत्ती आणि पृथ्वी तत्वाचे आहे. 

कृत्तिका म्हणजे कापणे ,धारधार बोचणे ह्याची जाणीव असते. कृत्तिका नावाची मुलगी फटाकडी असते उद्धट उर्मट असते पण कर्तुत्ववान सुद्धा असते ,ध्येय असते काहीतरी मिळवायचे असते कारण अग्नी हि प्रेरणा असते . वृषभेत 3 चरण येत असल्यामुळे दिसायला सुंदर असतात पण हे नक्षत्र सुरु होते ते मंगळाच्या मेष राशीपासून सुरु होते. कृत्तिका हे प्रथम नक्षत्र मानून त्याला पूर्वजांनी देव नक्षत्राचा मान दिला आहे .

ह्या नक्षत्राची देवता आहे प्रत्यक्ष रवी जो रोज आपल्याला दर्शन देतो.  सर्वाना समानतेने वागवणारा , जीवन चैतन्यमय करणारा , वैभव सौख्य ह्या सर्वाचे एकत्रित संघटन करणारा रवी आणि त्याची प्रखर पण तेजोपुंज अशी सूर्य किरणे सर्वत्र विखुरली कि आयुष्य नव्याने जगावेसे वाटते . नक्षत्र देवता जी असते त्याचे गुण त्या नक्षत्रात येतात .

हि माणसे कडक शिस्तीची असतात . कुणाला घाबरत नाही. आयुष्यातील सगळ्या लढाया लढताना शूरता दाखवतात . इच्छाशक्ती , आत्मविश्वास प्रचंड असतो. अग्नी हि देवता आहे. ह्याला अनेक प्रतिक आहेत . कुणी ह्याला वस्तरा म्हंटले आहे तर कुणी ह्याला द्राक्षाचा घोष म्हंटले आहे. चाकू सुरी परशु अश्या धारधार शस्त्रांचे आवरण आहे. 

मेष राशीतील हे नक्षत्र आणि मेषेचे प्रतिक मेंढा आहे जो कुठेही चढू शकतो. कृत्तीकेवर प्रभाव आहे अग्नीचा . अग्नी हीच देवता आहे.  अग्नी म्हणजे काहीतरी सुरु करून देणारा . वेदकाळापासून अग्नीला अनन्य साधारण महत्व दिले आहे. अग्नीत आहुती देतो तेव्हा भूलोकातून इतर लोकात अग्नीत दिलेल्या आहुतीच्या मार्फत आपण आपले मेसेज पाठवत असतो. 

अग्नीतत्व दाहक असले तरी उर्जा देते , अंधार दूर करते आणि सत्य समोर आणते. रूप समोर आणते. ह्या नक्षत्राला प्राण्यांचे प्रतिक म्हंटले तर शेळी आहे. शेळीचे दूष अनेक रोगांवर चालते. शेळी हवी तिथे अगदी काटेरी बाभळीची पाने सुद्धा बिनदिक्कत खाते. म्हणजेच अत्यंत कठीण अश्या कामातून वाट काढण्याचे काम हे नक्षत्र करते .हवे तिथे जावू शकते . डोंगर्याच्या माथ्यावर . निसर्गावर जास्ती अवलंबून आहे. झाडपाला खाणार . शेळीच्या दुधात आयुर्वेदिक सत्व गुण आहेत. इतर पदार्थांना हा प्राणी तोंड लावत नाही. स्वछ्य आणि निसर्गतः शुद्ध असलेले तिचे दुध आहे. हे नक्षत्रही तसेच आहे. महत्वाच्या कामासाठी उपयुक्त ठरणारे हे नक्षत्र आहे. 


सर्व चांगल्या वाईट गुणांचे इथे मिश्रण आहे . एखादी तिखट बोलणारी स्त्री ,तिच्या नादी लागणे योग्य नाही . प्रखर आणि स्पष्ट बोलणे , अंतर्बाह्य एकच असलेले व्यक्तिमत्व ह्या कृत्तिका नक्षत्राचे आहे . अत्यंत सचोटी प्रामाणिकपणा आणि त्याग . प्राण जाये पण वचन न जाये अश्या मनोवृत्तीची माणसे ह्या नक्षत्रात आहेत . 

धारधार वस्तूंचे प्रतिक असल्यामुळे ह्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व धारधार आहे. नाही पटले तर कात्रीने कापून टाकावे . माणसे जोडणे आणि टिकवण्याचे काम भरणी नक्षत्र करते. 

निष्ठुरपणे माणसे तोडून टाकणारे हे नक्षत्र आहे. हे एखाद्या  महान व्यक्तीचे ऋषी मुनींचे असू शकते कारण त्याला कोण किती माझ्या मागे येते आहे , त्याची फिकीर नाही किती अनुयायी आहेत ह्याची काही पडलेली नाही . ज्याला पटेल तो येयील. माझ्यावर कितीजणांनी प्रेम करावे ह्याची फिकीर नाही. ह्या नक्षत्राला भावनिकता आत्मीयतेचा ओलावा नाही. समर्पणाची वृत्ती आहे . घालून पाडून बोलणे तोडून टाकणारे हे नक्षत्र आहे. ह्या नक्षत्राच्या व्यक्तींच्या जवळ जायलाही लोक भितात . ह्यांना भावना नाहीत कठोर आहे. तिका म्हणजे आव्हान देणे आणि घेणे . 


ह्या नक्षत्राचा अभ्यास करताना काही गोष्टी लक्ष्यात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे  लग्न बिंदू रवी ,चंद्र लग्नेश किंवा महत्वाचे ग्रह ह्या नक्षत्रात असतील तर त्यांची उर्जा वाढते. परिस्थिती काहीही असो , विनाशाकडे जावू शकतात , आक्रमक होतात . शुक्र किंवा रवी बिघडला असेल तर परिणाम वाईट असतात . स्पष्टवक्ते असतात . बोलणे धारधार असत. भूक फार असते. ह्यांचा राग व्यक्त करणे हा रवीचा राग आहे. राजाला सतत रागावून चालत नाही . ह्या व्यक्ती ध्येयवादी असतात पण त्यामुळे भावनाविरहित होतात , कित्येकदा कोरड्या असतात त्यामुळे फार गोड बोलू शकत नाहीत. म्हणून ह्यांना लवंगी मिरची नाव दिले आहे. रवि हा राजा आहे त्याला बंधनात ठेवलेले आवडणार नाही म्हणून ह्यांचा स्वभावही तसाच मुक्त असतो, कुणीही त्यांच्यावर अधिकार गाजवलेला आवडणार नाही. ह्यांना सतत कौतुक करून घेणे आवडते. थोडक्यात काय तर आत्मस्तुती आणि आत्मप्रौढी मिरवणे सतत मी हे केले आणि मी ते केले . स्वतःच्या भोवती आरत्या ओवाळून घेणे आवडते . एखादी गोष्ट मोठी करून सांगणे जे छान जमते . राजा हा स्तुतीप्रीय असतोच पण हलक्या कानांचाही असतो त्यात अश्या लोकांचा बुध सुद्धा बिघडला असेल तर वैचारिक बैठक , सारासार विचारशक्ती आणि एखाद्या गोष्टीची शहानिशा करून न घेता वक्तव्य करणे ह्या चुका वारंवार होतात .

हि लोक इतरांना  स्वार्थी वाटतात. नक्षत्र बिघडले असेल तर कुणाचेच ऐकत नाहीत , खादाडी खूप आहे त्यामुळे पचनाचे प्रोब्लेम होतात . सतत खाण्याने विचार सुद्धा दुषित होतात. भिन्नलिंगी आकर्षण असू शकते. जे खात आहे ते नाही पचले तर आरोग्य बिघडते , बुद्धीचा उपयोग नीट नाही केला तर इतरांना चुकीचे ज्ञान देतात . मेषेसारख्या तडफदार राशीतील हे नक्षत्र आहे . मेंढ्या सारखे ह्या व्यक्ती कुठेही अवघड स्थितीत टिकून राहू शकतात . मेंढ्यांना लहान सहान वाटातून बाहेर कसे पडायचे ते चांगले समजते तसेच हि माणसेही धूर्त असतात .कुठून कोणाकडून कशी कामे करून घ्यायची लोकांना कसे manage करायचे ते छान जमते. आपले काम झाले कि माणसे कशी वापरून फेकून द्यायची हे ह्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. पण त्याची वाईट फळ सुद्धा त्यांना भोगावीच लागतात .

हे रविचे नक्षत्र असूनही शुभ कार्याला वर्ज आहे. क्रूर राक्षस गण प्राप्त झाला आहे.  कठोर आहे, स्वकेंद्रित असतात . तोडणे हा स्वभाव आहे. अधोमुखी आहे. अग्नीतत्व आहे म्हणून भूगर्भात उसळणार्या उर्जा ज्वालामुखी ह्यांचे संशोधन करतात . कुणी जवळ केले नाही तर दुक्ख करीत बसायला ह्या नक्षत्रा जवळ वेळ नाही. वृषभ राशीत ह्या नक्षत्राचे ३ चरण आहेत . शुक्र स्वामी आहे. शुक्र म्हणजे वैभव शांतता  प्रेम आणि सुख . शुक्र वैवाहिक सुखाचा कारक आहे. आणि जेव्हा हे नक्षत्र इथे येते म्हणजे पती पत्नीत येते तेव्हा ह्या नक्षत्राला शुक्राचा कोमलपणा सांभाळता येत नाही. 

अग्नीने पेटलेले हे नक्षत्र आहे. नुसती ठिणगी पडायचा अवकाश .ह्यात कोण जळतय भस्म होतंय . बेपर्वा असलेले हे नक्षत्र आहे. रवी ह्या नक्षत्रावर आपले स्वामित्व सिद्ध करतो आहे. रवीच्या अधिकाराचा स्वीकार इथे शुक्र करत आहे. कुणाला आपण काय बोलतोय आणि त्यात कुणाला किती दुक्ख होतंय ह्याचा विचार नसल्यामुळे लोक फार जवळ करत नाहीत . पण दुर्दैव असे कि त्यांना हे समजत नाही .

शुक्र हा वैवाहिक सुखाचा रसिक ग्रह आहे.जल तत्वाचा आहे. शुक्र हा कृत्तिकेत गेला तर हा अग्नीच संसाराची विल्हेवाट लावतो. लग्नाच्या वेळी साथ देण्याचे वाचन अग्नीभोवती फेरे घालून केलेले असते. पण हा शुक्र कृत्तिकेत असल्यामुळे ह्याची वाट लागते.

अहंकार , मोठेपणा आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचीच त्यांची अव्याहत धडपड चालू असते  . अहंकार हा ह्या नक्षत्राचा आत्मा आहे.  हे नक्षत्र अग्नीचे असल्यामुळे आणि अग्नी वरवर जातो. अग्नीचे वैशिष्ठ काय आहे . जुन्याला चिटकून बसणारे हे नाही . वेगळ्या संकटांचे आव्हान स्वीकारणारे आहे.  जितके मोठे आणि खडतर आव्हान तितके ते पेलवते . जिद्द आणि जिद्दीतून निर्माण होणारा अहंकार जो नको आहे. रावणात अहंकार होता . शिवभक्त होता पण अहंकाराने वाट लागली. त्याच्या अनन्यसाधारण  भक्तीला प्रसन्न होवून शंकर त्याच्यासोबत जायला निघाले. तरी कैलास पतीला मी माझ्यासोबत घेवून चाललो हा पराकोटीचा अहंकार त्यामुळे विनाश झाला आणि तो धुळीला मिळाला.

मी मोठा आहे माझ्याशिवाय काही होणार नाही हा अहंकार खूप आहे . इतरांना नजरेतून कमी लेखणे. अग्नी हे प्रतिक काय सांगते. म्हणून ह्या नक्षत्रात शुक्र असलेल्या स्त्रिया बरेचदा आत्मघात करून घेतात . ६ तारकांचे हे नक्षत्र पण ह्याला सप्ततारका म्हणून संबोधले जाते. पण ६ च तारका दिसतात . 

जरी हे नक्षत्र क्रूर असले एक घाव दोन तुकडे करणारे , तरी त्याची सहनशीलता ,त्याग,आत्मसमर्पण ह्याचा विचार करून चंद्र वृषभेत उच्च झाला . अग्नी आहे संतापला पेटला तर कुणाच्या हाती येणार नाही .

अग्नी हा माणसाच्या जीवनाला माणूसपण देणारा आहे. पहिली पाठशाला ह्या अग्नीने शिकवली. आधी तो माकड होता संस्कृतीचा गंध नव्हता , काहीही खावे कसेही जगावे . पण हा अग्नी जेव्हा त्यांना सापडला चकमकीच्या रुपात त्यांना सुखाचे वरदान मिळाले. त्यामुळे त्यांना माणुस होता आले. माणूस कच्चे मांस खात होता . जसा आहार तसा विकार . 

अग्नीचा शोध लागला आणि अन्न शिजवून खायची कल्पना समजली रुजली आवडली आणि प्रत्यक्षात आली तेव्हा ह्या माणसाच्या खाण्यात आलेल्या ह्या अन्नाचे पचन लवकर होऊ लागले आणि हा अग्नी त्यांना सहाय्यभूत झाला. धर्म म्हंटले कि अग्नीच येतो. अग्नी धर्माचे प्रतिक आहे . अग्निहोत्र करणारे लोक आहेत . अग्नी सकाळी पेटला कि जीवन सुरु होते. अग्नी नसेल तर शरीर प्रेतवत थंड होईल. अंगात अग्नी आहे म्हणून शरीरातील रक्त विशिष्ठ पद्धतीने वाहत आहे. शरीरात चैतन्य आहे. ह्या नक्षत्रामध्ये कामाची तडफ आहे चैतन्य आहे. काम पूर्ण करण्याची जिद्द आहे. बोलतील ते करून दाखवतील. प्रखरता आहे. म्हणून ह्या अग्नीतत्वामुळे सुसंकृत मानवजात निर्माण झाली.

अग्नीने बुद्धीला अग्नी दिला. कुठल्या माणसाला कधी जवळ करायचे आणि कुणाला कधी तोडायचे ह्याचे उत्तम उत्कृष्ठ संतुलन करणरे हे नक्षत्र आहे. भावनिकता नाही . कुणाला काही बोलल्याची खंत नाही. अश्या विचारांचे नक्षत्र आहे.अग्नीतत्वाचा  मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे . अग्नीचे स्वरूप वेगवेगळ्या रीतीने व्यक्त केले आहे. होमहवन यज्ञ ह्यासाठी अग्नी लागतो. आहुती अर्पण करतो तेव्हा स्वाहा म्हंटल नाही तर कुठलीही देवता त्या स्वीकारणार नाही. स्वाहा नावाची तारका होती आणि तिचे प्रेम अग्नीवर असल्यामुळे ती अग्निकडे आकर्षिले जात होती. अग्नीला स्वाहा बद्दल आकर्षण नव्हते. म्हणून तिने अग्नी सोबत आपले अस्तित्व ह्या यज्ञात संपवले.  स्वाहाचा हात पकडून अग्नीने तिला वरदान दिले कि इथून पुढे जो कुणी यज्ञ करील आणि कुठल्याही देवतेला आहुती देयील पण तुझा उल्लेख केला नाही तर कुठलीच देवता ती आहुती स्वीकारणार नाही. 

पुन्हा त्याग आणि त्यातून आलेला मोठेपण . स्वाहा चा जयजयकार करा . स्वाहा हि देवी आहे तिचे अस्तित्व तिथे आहे तिला जागृत करून मान देवून तिच्या अस्तित्वाची जाण ठेवून आपण आहुती देतो. सुसंकृत मन इथे दिसते , ज्याने आपल्यासाठी त्याग केला तर त्याची जाण ठेवणे हे ह्या नक्षत्राकडे आहे. 

हा अग्नी जसा ब्रम्हांडात आहे तसा पिंडात आहे. पोटात सुद्धा अग्नी आहे . जेव्हा अग्नी प्रज्वलित होईल म्हणजे भूक लागेल तेव्हाच अन्न ग्रहण करावे म्हणजे ते पचेल अन्यथा पचणार नाही .म्हणून कृत्तिका हे आकाशातच नाही तरी ते प्रत्येकाच्या शरीरात आहे. अन्न  पचवण्यासाठी आवश्यक आहे. 

ह्या व्यक्तीच्या लोकांना टाकावू वस्तू ,अडगळ चालत नाही . घरात स्वछ्यता लागते. सूर्यप्रकाश जिथे जातो तिथे समाधान शांती निरोगी उत्चाही वातावरण असते.  “feel good factor” असतो. प्रकाश आहे तिथे सुख समाधान वैभव आहे . हा प्रकाश ह्या कृत्तीकेच्या कडून हा प्रकाश मिळतो. एखाद्या फटीतून सुद्धा प्रकाश आत येतो. नित्य नियमाने सूर्य येतो आणि चैतन्याचा पाऊस बरसून जातो. 

अपयश ह्या नक्षत्राला सोसवत नाही , तेज प्रखरता आहे. रवी आणि अग्नी मंगळ सर्वांचे तेज आहे. ह्या नक्षत्राचे जे अग्नीतत्व आहे ते प्राणवर्धक आहे तसेच प्राणघातक सुद्धा आहे. 

मी पणा अहंकार लोभ मत्सर ,पेटून घेवून मारणे , अविचार ह्यांनी व्यापलेली माणसे . अरेरावी विचार करून घेवून जीवनाचा शेवट करतात . कुठल्याही गोष्टीला २ टोके असतात एक सृजनशीलतेचे आणि एक विनाशाचे. ह्या लोकात चैतन्य असते बुद्धी तीव्र असते कारण माणसे तेजोमय असतात . 

अग्नी हा नेहमी वर जातो ,प्रगती पथावर जातो. राजस मनोवृत्तीचे लोक असतात . मिळवण्याचा हव्यास आहे. घर झाले आता बंगला झाला पाहिजे. पुढे जात राहणार . आयुष्यात सतत काहीतरी ध्येय ठेवतील आणि ते मिळवण्यासाठी कष्टांची पराकाष्टा हि करतील.

ज्ञानाची भूक कर्तुत्वाचा हव्यास . स्वतःचा गौरव मीपण मोठेपणा . ह्यात जगत राहणारी हि अग्नी शलाका आहे. म्हंटले तर उपयोगी पडणारी आहेत पण खावूनही पोट भरले नाही तर सतत  आहुती टाक सतत सांगत राहतो. सतत खात राहतील. फळ खातील पण काहीतरी खाणे हे आहे. खादाड नक्षत्र आहे.  अविरत खाण्यामुळे शरीर आजारी पडते आणि अनेक रोगांसाठी  दवाखान्याच्या पायर्या चढायला लागणार . सगळ्याचा व्यय होणार. इथे महत्वाचा घटक हा रवी आहे. रवी हा राजा आत्मा चैतन्य आनंद सुख प्रकाश सकाळचे कोवळे ऊन सुखावह वाटते. रवी जवळ नव निर्मितेचे सामर्थ्य आहे. 

रवी हा राजा आहे . प्रजेच्या सुखासाठी राजा नियम करतो पण प्रजेसाठी चांगल्या योजनाही करतो. सर्वांच्या सुखाची चिंता वाहणारा राजाच असतो . तसे हे नक्षत्र आहे. हे लोक मदत करणारेही असतात .भरणी भरण पोषण करत असेल तर कृत्तिका हे व्यक्तिमत्वाला अटकेपार झेंडे लावण्याचे सामर्थ्य तेज बुद्धी कर्तुत्व असामान्य कर्तुत्व देते. 

एकदा एक ठरवले कि ते करणारच. ह्या नक्षत्राला रवीच्या तेजाचेही वरदान आहे. 

रवी हा जीव जीवात्म्यांचा आत्मा , नवग्रहांना प्रकाश देणारा , ग्रहांचा राजा स्वयंभू प्रकाशाचा ग्रह ह्याचे स्वामित्व कृत्तीकेला लाभले आहे. हा रवी धन्वंतरी आहे 

ह्या लोकात अहंगंड रुबाबदार पणे राहणे त्याचबरोबर आत्मकेंद्रित असणे हेही आहेच . 

कृत्तिका नक्षत्र क्रूर असेल तर इथे चंद्राचे भावनाशीलता कसे चालणार .जर चंद्र इथे पापग्रहांच्या दृष्टीत आला तर बिघडतो. 

कुठलाही ग्रह हा पूर्ण शुभ किंवा अशुभ नाही. तो कुठल्या नक्षत्रात स्थानात आहे आणि त्यावर कुठल्या ग्रहाची दृष्टी आहे ह्यावरून फलीताला वेगवेगळे कंगोरे देतो.

अग्नी हा संरक्षक आणि संवर्धक असतो. अग्नी आहे म्हणून भूक आहे म्हणून हि लोक खादाड असतात त्यांना भूक असते आणि आजार होतात . हि लोक फार विद्वान असतात . ज्ञान खातात . हे शास्त्र शिकावे ते शिकावे . अधाशी असणे ह्याला मर्यादा असायला हवी. 

श्रीकृष्णाचा चंद्र हा वृषभ राशीत कृत्तिका नक्षत्रात आहे म्हणून विश्वरूप दर्शन दिले. सर्व प्रकारच्या मनोवृत्ती सामावून घेण्याची वृत्ती होती. शिशुपालाला योग्य वेळेला शासन करणे, दुर्योधनाला योग्य वेळी यम सदनाला पाठवणे . जरासंधाला त्याच्याच पद्धतीने मारणे . द्रौपदीला योग्य वेळी अभय दान देणे. हे कौशल्य होते. 

6 8 १२ मध्ये ह्या नक्षत्रात आलेले ग्रह क्रूर अश्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवतात . किंवा ज्या भावात हे नक्षत्र आलेले आहे आणि ज्या ग्रहाच्या वाट्याला आलेले आहे त्यानुसार त्याची फळे पाहायला मिळतात. मंगळ आणि रवी दोघेही लाल रंग आणि हा रंग इथे अधिक आहे क्रूरतेचे प्रतिक आहे. ह्यांना १ आणि ३ अंक शुभ आहे.

हे लोक दीर्घद्वेषी आणि शीघ्रकोपी असतात .अत्यंत प्रखर व्यक्तिमत्व , त्यांचा शब्द म्हजे हृदय कापून टाकतील. त्यांचा राग म्हणजे एखाद्याला पुरून उरेल हट्टी दुराग्रही असतात . ८ -८ दिवस बोलणार नाही स्वतःला कोंडून घेतील. विचार स्फोटक असतात .  अतिविचार करून बाहेर पडतील आणि अपघात होईल. विष खातो , मारून घेतो ,नस कापून घेतील इतका संताप होतो.. 

धारधार शास्त्राने दुसर्याला मारतील.

ह्या नक्षत्रात मंगळ राहू केतु हे ग्रह आले  तर त्रास होतो . कृत्तिका नक्षत्रात शुक्र आला आणि मंगळाच्या दृष्टीत आला . मंगळ हर्शल केंद्रयोग असेल तर पापाचा प्रादुर्भाव अधिक असतो. प्लुटो पण असेल तर जागतिक दुक्ख विध्वंसक होईल. भूकंप ज्वालामुखी होतात तेव्हा ह्या नक्षत्रातून गोचरीचे भ्रमण होत असते. 

विवाहात अडथळे असतात . इथे रवी असेल तर हट्टी आणि उग्र स्वभाव असतो. सारखे रागावणे बोलणे आक्रमक तडजोड करत नाहीत .कृत्तिका नक्षत्रातील संतती सुद्धा हट्टी दुराग्रही असते कुणाचेही ऐकत नाही. आईवडिलांचा सल्ला ऐकत नाहीत त्यांच्या सुखाची काहीच जाण नसते. पंचम भाव जर ग्रह  कृत्तिका नक्षत्रात असेल तर मुले होण्यास अडचणी होतात . गर्भपात होतो.

हे नक्षत्र तृतीयात आले आणि पापाग्रहानी युक्त दुष्ट नसेल तर मोठ्या प्रकारचा मानसन्मान मिळवते. रविमुळे ताप येणे ,पंचम सप्तम दशम स्थानात हे नक्षत्र आले तर त्रासदायक . मुले जाणे, गर्भपात होणे मुले मोठी होवून मारणे, लागलेली नोकरी अचानक जाणे.गळवे होणे , अल्सर होणे. एखादी कृत्तिका नक्षत्रातील सासू कारण नसताना सुनेचा छळ करते .

स्वयंपाक घर चालवणे , बेकरीत काम करणे ,लोहारकाम , सोनारकाम ,भीषण अश्या आगीला विझवण्यासाठी लागणारी यंत्रणा वापरणे. रवी हा राजा मंगळ हा सेनापती म्हणून प्रशासकीय अधिकारी , निवडणुकीत निवडून येणारे लोक, रवी हा धन्वंतरी आहे. गुरु हा विज्ञान दर्शक आणि मेडिकल शी संबंधित आहे त्यामुळे उत्तम डॉक्टर , सर्जन ह्या नक्षत्रात होतात . 

धाडस आहे त्यामुळे मोठे पोलीस अधिकारी , सरकारी नोकरीत काम करणारे लोक . शस्त्र बनवणे चाकू सुरया बनवणे . मेडिकल संबंधी उत्पादने तयार करणे . इंजेक्शन च्या सुया किंवा औषधे बनवणे. निर्मिती क्षमता ह्या नक्षत्रात आहे. फिरते व्यवसाय ,दवाखाने , यात्रेच्या ठिकाणचे दवाखाने चालवणारे हे लोक असतात . MR , औषध देणारे नर्स कारण रवी हा पावित्र्याचे लक्षण आहे आणि गुरु हा पवित्राचे लक्षण आहे . सेवाभाव आहे. ते पांढरे कपडे घालून विचारांचे पवित्र प्रगट करतात . योग शिकवणारे करणारे .पौरोहित्य करणारे लोक पांढरे कपडे घालणारे . गुरु हा ज्ञानी धर्माशी संबंधित , रवीचा संबंध अग्नीशी आहे. म्हणून रवी म्हणजे नेता राजा . यज्ञ करणारे लोक ह्यात येतात . अग्निहोत्र करणारे लोक .

लग्न बिंदू ,सप्तमेश , धनेश , अष्टमेश , शुक्र , मंगळ , चंद्र ( विशेषतः प्रथम चरणात )कृतिकेत असेल तर त्या पत्रिका अभ्यासपूर्ण असतात .

कृत्तिका हे अग्नी तत्वाचे नक्षत्र आहे ते सुंदर रूप देते , ज्ञानाची अन्नाची किंवा लैंगिक भूक असेल ती ह्या लोकात सर्वाधिक असते.  अग्नी हा वणव्यासारखा पसरतो. त्यामुळे ह्यांची कीर्ती किंवा अपकीर्ती सुद्धा असू शकते. 

कुठलीही रास , नक्षत्र ,ग्रह हे परिपूर्ण नाहीत ,त्याला अनेक कंगोरे आहेत . जिथे फटकळपणा आहे तिथे कर्तुत्व सुद्धा आहे हे विसरून चालणार नाही . पण त्यातील अवगुण पुढे आले तर चांगल्या गुणांची सुद्धा माती होते ह्याचा विसर पडू न देणे हे महत्वाचे आहे. 

जप : ओम अग्नेय नमः


संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230



Monday, 28 November 2022

कर्म दाता

 || श्री स्वामी समर्थ ||

ग्रहमालिकेतील सर्वात महत्वाचा ग्रह शनी ,जो शिस्तबद्ध आहे पण त्याला भावना नाहीत असे अजिबात नाही . घरात कुणाचाच धाक नसेल तर आपले आयुष्य आणि कुटुंब दिशाहीन होईल. कुणी तरी हवेच ज्याला आपण उत्तर द्यायला बांधील आहोत . अगदी तसेच शनी महाराज आहेत , त्यांचा धाक आहे म्हणून आपण जरा तरी नीट वागतो असे म्हंटले तर वावगे ठरू नये. पण म्हणून समस्त जनतेने त्यांना जे व्हिलन ठरवले आहे ते मात्र कदापि योग्य नाही. शिस्त कुणालाच नको असते आणि शिस्त लावणारा तर डोळ्यासमोर नको असतो पण ती आहे म्हणून आयुष्याला वळण आहे नाहीतर सगळीकडे अंदाधुंदी अराजकता माजली असती. 

मी आणि माझा भाऊ लहानपणी अजिबात भात खात नसू म्हणजे नकोच असायचा . पण बाबा पंक्तीला असतील तेव्हा गपचूप खात असू ...सर्वांगीण आहार हवा म्हणून सगळे थोडे थोडे खाल्लेच पाहिजे हि शिस्त लावणारे बाबा तेव्हा आम्हाला शनी सारखेच भासत पण त्यांची शिस्त आज आमच्या मुलांना लावताना पटते आहे. 


शनी आहे म्हणून जीवनाला अर्थ आहे. शनी महादशा किंवा शनी साडेसाती आली कि कुणीतरी जवळचे गेल्यासारखे चेहरे करून बसणाऱ्या लोकांना सांगावेसे वाटते कि तुम्ही भाग्यवान आहात कारण आता तुम्हाला साडेसाती , शनी दशा येते आहे. अजिबात घाबरू नका , शनी घ्यायला नाही तर द्यायलाच येत आहे , आपल्याला घेता आले पाहिजे . शनीला का घाबरायचे ? कारण तो आपले वाईट करणार , मोठे आजार देणार , विलंबाने बरी होणारी दुखणी , मानसिक त्रास देणार , सगळे अडथळे आयुष्यात निर्माण करणार हे आपण अगदी गृहीत धरतो आणि तिथेच चुकतो. 


शनी कुणी परका नाही तर तो आपलाच सखा आहे. शनी आणि गुरु दोघेही अध्यात्माचे , मोक्षाचे ग्रह फक्त त्यांचा मार्ग वेगवेगळा आहे . आता मोक्ष  कुणी पाहिलाय ? हाही एक प्रश्नच आहे . पण असे वागलात तर नरकात जाल आणि तसे वागलात तर मोक्ष मिळेल ह्या धाकाने तरी आपले जीवन वागणे बदलेल नाही का? 

शनीला आपला बेस्ट फ्रेंड बनवा . बघा आपल्या घरी आपला भाऊ / दीर जेवायला येणार असतील तर आपण त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवतो जेणेकरून त्यांना आनंद देता येयील . अगदी तसेच ह्या आपल्या शनी महाराजांना खुश ठेवायचे असेल तर त्यांना जेजे आवडते ते सर्व करा म्हणजे काय ? शनी महाराजांना अहंकार , व्यसने , व्यभिचार , चुकीचे व्यवहार , चोरी  लबाडी आवडत नाही , त्यांना त्याचा तिटकारा आहे. त्यांना नीतीने वागणारी माणसे प्रिय आहेत , शिस्तप्रिय , खरे वागणे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे नम्रता . अहंकार असणार्या व्यक्तींची साडेसाती मध्ये काय अवस्था शनी महाराज करतात ते मी सांगायला नको .  वादळ झाले कि नारळी सुपारी सारखे सरळसोट वृक्ष नेस्तनाबूत होतात पण भाताची लव्हाळी तशीच राहतात हे सगळ्यांनी लक्ष्यात ठेवले पाहिजे.  जे आयुष्यात लाव्हाळ्या सारखे वागतात म्हणजे “ Low Profile “ जगतात त्याना शनिदेव कश्याला त्रास देतील उलट अश्या व्यक्ती  बक्षीसपात्र ठरतात . रावाचा रंक करण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्यांच्या चरणाशी आपल्या अहंकाराचा त्याग करणे हेच उत्तम. 


साडेसाती येणार म्हंटल्यावर कुणाची घाबरगुंडी उडते? त्यांचीच ज्यांना त्यांचे मन खात असते ...आपण केलेली चुकीची कर्म अनेक आजारांच्या रुपात आपल्या समोर एकेक करून हात जोडून उभी राहतात आणि आपल्याला त्यांना उत्तर देणे क्रमप्राप्त असतेच . ज्यांनी चुकीची कर्म केली आहेत त्यांचे मन त्यांना खात असते आणि म्हणूनच मग साडेसातीची भीती वाटू लागते . ज्यांनी काहीच वाईट केले नाही त्यांनी का आणि कश्याला कुणाला घाबरायचे ? 


साडेसाती चंद्राला लागते . चंद्र म्हणजेच मन . आपण केलेल्या चुका त्यांची फळे प्राप्त होण्याची वेळ म्हणजेच साडेसातीचा काळ.  आपल्या चुकांचे ओझे आपल्यालाच पेलेनासे होते आणि  म्हणून आपली झोप उडते . निद्रानाश हे साडेसातीचे पहिले पाऊल. शनी महाराज आपल्या चुकांची जाणीव करून देतात त्यातून तुम्ही सुधारलात त्या मान्य केल्यात आणि नीतीने वागलात तर बरे नाहीतर आहेच मग त्यांचा दंड .

आयुष्यभर आपण सतत दुसर्याला दोष देत असतो , अर्ध आयुष्य आपण दुसर्यांना अक्कल शिकवण्यात आणि कमी लेखण्यात घालवतो .पण आपल्या स्वतःच्या अवगुणांचे काय ? म्हणूनच साडेसाती म्हणजे सिंहावलोकन , आत्मपरीक्षण . आपल्या आत डोकावले तर वेगळ्याच विश्वाचे दर्शन घडेल जे आपल्याला करायला शनीच शिकवतो. शनी जीवनाला वळण लावतो , संकट समयी आपले कोण हे दाखवणारा शनी आहे. आपल्याला जगाची अगदी जवळून ओळख करून देणारा शनी . कष्टाची भाकर किती गोड आहे आणि इतर मार्गाने मिळवलेली लक्ष्मी कशी निषिद्ध आहे ह्याची जाणीव करून देणारा शनीच आहे . अहंकार ,मत्सर , सगळ्यांना पाण्यात बघणारी व्यक्ती लक्ष्मीपासून परास्त राहते त्यामुळे साडेसाती आली कि मग एकामागून एक दणके बसायला लागतात . ज्याची कधीही शक्यताही वर्तवली नव्हती त्या गोष्टी प्रत्यक्षात घडायला लागतात आणि झोप उडते . मनोमनी हे सर्व आपल्याच कुकर्माचे फळ आहे ह्याची जाणीव झाली तरी अजूनही शनीवर त्याचे खापर फोडणे मात्र आपले चालूच असते . अररे किती सांगावे , किती बोलावे पण शहाण्याला सुद्धा न कळावे हि खरीच शोकांतिका  म्हणावी .अश्यांना पळता भुई थोडी झाली नाही तरच नवल . चुका करताना आपल्याला शनीची आठवण येत नाही मग आता कश्याला भीती वाटायला हवी . इतका माज आहे ना ? मग भोगायला सुद्धा तयार रहा.

ह्या उलट जे नम्र आहेत त्यांचे आयुष्य शनी एका वेगळ्याच उंचीवर नेतो . परदेशगमन , विवाह , नोकरी , उच्च शिक्षण ,पद ,नवीन वस्तूचा लाभ . एक ना दोन अश्या सर्व गोष्टी शनी प्रदान करतो तोही मुक्त हस्ताने. हे बक्षीस असते चांगले वागल्याचे आणि पुढेही चांगले वागत राहण्याचे. म्हणून शनीला कर्मदाता म्हंटले आहे. जसे कर्म तसे फळ .

आपला आजचा जन्म हे आपले वास्तव असले तरी ह्याही आधी आपण अनेकदा जन्म घेतला आहे  आणि त्या प्रत्येक जन्मात कर्म केले आहे अर्थात चांगले आणि वाईट . त्या सर्वाची फळे भोगण्यासाठी मग पुढील जन्म घेत राहिलो आहोत . म्हणूनच आता ह्या सगळ्याची जाणीव झाल्यावर निदान उरलेला जन्म तरी चांगली कर्म करण्यात घालावूया , काय पटतय का? त्यांनी माझा अपमान केला मग मी आता त्याचा करणार हि शृंखला आपणच मोडली पाहिजे . जावूदे त्याचे कर्म त्याच्यापाशी पण मी नाही माझे कर्म वाढवणार असा विचार करून आपले जीवन चुकीच्या कर्मापासून वाचवू शकतो.

शनी महादशा आली किंवा साडेसाती तर आपण जगणे सोडून देणार का? श्वास घ्यायचा बंद करणार का? नाही ना? उलट शनी दशा साडेसाती आली तर उपासना वाढवावी ,तशीही ती वाढतेच . उत्तम उपासक शनी राहुच्याच दशेत तयार होतात .

काही गोष्टी लक्ष्यात ठेवण्यासारख्या आहेत त्या म्हणजे  गोचरीचा शनी मूळ शनीवरून किंवा समोरून जाताना त्रासदायक परिस्थिती असते अनेक आव्हाने समोर येत राहतात . शनी जर पत्रिकेत षष्ठ स्थानात असेल तर विलंबी आजार होतात आणि ते तुम्हाला अगदी स्मशानापर्यंत नेतात . पण षष्ठ स्थान हे रोजच्या कर्माचे स्थान आहे आणि शनी तुमच्या कर्माचा हिशोब ठेवणारा त्यामुळे तुम्ही रोजचे कर्म उत्तम केलेत तर शनीचा दुष्परिणाम कमी होयील असा उदात्त विचार का नाही करत आपण. घरातील समाजातील आबाल वृद्धांची सेवा , उपासना , आपण बरे आपले काम बरे , दान ह्यासारख्या गोष्टी आपले आयुष्य सुकर करतात .सर्वात मुख्य म्हणजे आपला अहंकार , त्याच्यावर अंकुश ठेवता आला पाहिजे. म्हंटले आहेच अहंकारं बलं दर्पं, कामं क्रोधं च संश्रिताः . अहंकार हा सर्वार्थाने विनाशास कारणीभूत ठरतो. 

शनी केतू , शनी चंद्र , शनी राहू , शनी मंगळ , शनी रवी ह्या युती पत्रिकेत काहीतरी परिणाम करणारच ते आपले प्रारब्ध आहे पण म्हणून आपण जगायचे सोडून देत नाही ना . शनी महाराज आपल्या निकट आहेत आणि त्यांची आपल्या प्रत्येक कृतीवर पूर्ण दृष्टी आहे ह्याचा विसर पडू दिला नाही तर अनेक अनर्थ टळतील, नाही का?

सगळे आहे पण मनाची शांतता नाही , झोप नाही हि अवस्था शनीच करू शकतो . म्हणूनच वृद्धांची सेवा ,चतुर्थ श्रेणीतील लोकांना भूतदया दाखवणे ह्यात सातत्य बाळगावे . सर्वप्रथम मी काय तो एकता शहाणा आणि इतर मूर्ख असे वागणे सोडून द्यावे . कुणाच्याही व्यंगावर किंवा आर्थिक स्थितीवर हसू नये , कुणालाही कमी लेखू नये कारण पुढील वळणावर आपल्या आयुष्यात काय आहे हे आपल्याला सुद्धा माहित नाही . 

1 अहंकार त्यागावा 

2 मंगळवारी मारुतीचे दर्शन घ्यावे .

3 मंदिरात शनी किंवा मारुतीच्या चेहऱ्याकडे न बघता चरणा कडे बघून नतमस्तक व्हावे 

4 कणकेचा दिवा ( 11 शनिवार चढते आणि 11 शनिवार उतरते ) मारुतीच्या मंदिरात लावावा.

5 ओं शं शनैश्चराय नमः जप करावा 23000

6 एका मातीच्या पणतीत तेल भरून घ्यावे आणि त्यात आपला चेहरा एक मिनिट न्याहालावा . नंतर ते तेल मारुतीच्या        मंदिरात समई असते त्यात घालावे . आपली पिडा त्यात जळेल . तिथे जाऊन चुकूनही मारुतीच्या डोक्यावर ते तेल ओतू नये. 

7 हनुमान चालीसा नित्य पठण करावे 

8 वागण्यातील ताठा सोडून द्यावा .

9 अपंग , वृद्ध मंडळी ह्यांची सेवा करावी .

10 अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. 

शनी हेच अंतिम सत्य आहे हे विसरून चालणार नाही . आपल्या सर्वांवर शनी महाराजांची असीम कृपा राहूदे हीच प्रार्थना . 

ओं शं शनैश्चराय नमः

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 








 


Saturday, 26 November 2022

वास्तू द्वार उघडते भाग्याचे द्वार

 || श्री स्वामी समर्थ ||


आयुष्यातील प्रवासात सुख दुक्ख हि माणसाचे सोबती असतात . मनासारखे झाले कि हुरळून जायचे आणि दुख झाले कि  गर्भगळीत व्हायचे हा मनुष्य स्वभाव आहे आणि त्यातून आपली सुटका नाहीच . पण अध्यात्मिक प्रगती जसजशी होत जाते तसे ह्या सर्वाचे दाह कमी होत जातात . अनेकवेळा एखादी गोष्ट आपण खूप मनाला लावून घेतो कालांतराने त्याचे दुक्ख किंवा त्यासंबंधीचे मनातील विचार कमी होत जातात . अनेक वेळा तशीच किंवा तीच मनाला त्रास देणारी घटना पुन्हा घडते पण त्यावेळी मात्र आपल्याला त्याचे काहीच वाटत नाही , ती आपण सहज स्वीकारतो आणि विसरून सुद्धा जातो . 


अश्यावेळी समजावे कि आपली अध्यात्मिक प्रगती एक पाऊल निश्चितपणे पुढे गेली आहे. आपण ह्या प्रापंचिक सुख दुक्खापासून दूर पण सद्गुरूंच्या समीप जायला लागलो आहोत हाच त्याचा अर्थ आहे. 

षडरिपू कमी होत आहेत आणि मनाचे शुद्धीकरण होत आहे . ह्या सर्व प्रक्रिया अश्याच होत नसतात . नित्य नेमाने केलेली साधना , उपासना, नामस्मरण , पवित्र ग्रंथांचे नित्य पठण ह्या सर्व गोष्टींमधील सातत्य ह्याचे हे फळ असते . जे दिसत नाही पण अनुभवायला मिळते. 


सहज मनात विचार येतो कि आज आपण ह्या गोष्टीसाठी  चिडलो नाही ज्याचा आधी आपल्याला क्षणात राग येत होता . परिस्थिती तीच आपणही तेच पण विचार बदलले. श्री गजानन विजय ह्या ग्रंथात एक सुंदर वाक्य आहे. “ एका संतावाचून विचारांचे परिवर्तन कोणी न करू शके आन , सत्य एक त्यांनाच कळे “ 

आपल्या विचारात परिवर्तन घडणे , एखाद्या गोष्टीकडे , घटनेकडे आपला बघण्याचा दृष्टीकोण बदलणे ,मन अधिकाधिक सत्शील होणे , आपल्या अस्तित्वाची आणि आपल्या कर्माबद्दल सतर्कता येणे ह्या सर्व खचितच सोप्या नसणार्या गोष्टी सद्गुरुकृपा झाली तर सहज शक्य होताना दिसतात , अनुभवायला मिळतात .

कुणावर राग धरून , कुणाचा मत्सर करून , हेवेदावे करून काहीच होत नाही पण ह्यातून आपण मात्र आपले कर्म मात्र वाढवत असतो . ह्याचे एक उदा द्यावेसे वाटते . अनेकदा अनेक लोक आपल्या तोंडावर दार लावतात . समोरचा घरातून बाहेर पडला कि लगेच धाडकन दरवाजा लावतात किंवा कुणाच्याही तोंडावर दरवाजा लावण्याची त्यांना सवय असते . आता ह्यात असे आहे कि ज्यांच्या तोंडावर दरवाजा लावला त्यांना त्याचा काडीचाही त्रास होताना दिसत नाही उलट जो दरवाजा लावतो त्याने आपले कर्म नाही कुकर्म वाढवून घेतले आणि त्याचे फळ निश्चित पणे वाईट आहे. त्यालाच नाही तर त्याच्या पुढील पिढ्यांना सुद्धा ते वाईट.  आपला राग मत्सर द्वेष समोरच्यावर काढून काय उपयोग त्यातून आपण नवीन कर्माची निर्मिती करत असतो पण दुर्दैवाने हे आपल्याला समजत नाही . मग पुढे अश्या घरात धननाश , शिक्षणासाठी पुरेसा पैसा नसणे , व्यसने , धंदा व्यवसायात बरकत नसणे , घरातील मुख्य व्यक्तीला आजार अशी अनेक शुक्ल्काष्ट मागे लागतात . असे आजार होतात ते आपल्याला स्मशानापर्यंत नेतात . अश्या घरात वरवरचे सर्व चांगले दिसले तरी नसते हे मी वेगळे सांगायला नको. 


कुणाच्याही तोंडावर दार लावणे किंवा घरात आलेल्याला आतून काय हवे ? असे विचारून त्रासिक चेहरा करणे  त्यासारखे पाप ते काय . अहो ह्याच दरवाज्यातून पै पाहुणा , प्रत्यक्ष लक्ष्मी आणि सद्गुरू सुद्धा प्रवेश करणार त्या दरवाज्याचा अपभ्रंश का करावा? अश्या वास्तूत प्रचंड वास्तू दोष तयार होतो मग घरी येणार्यांची वर्दळ कमी होते , रोजचे जीवन जेमतेम जगता यावे इतके धन सुद्धा कमावणे अशक्य होते . दीर्घकाळ टिकणारे आजार , मानसिक दौर्बल्य , निद्रानाश , मनावरील दडपण ह्यासारख्या गोष्टींची न संपणारी शृंखला तयार होते.  ह्या सगळ्याचा उगम दुर्दैवाने आपल्याच चुकीच्या कृतीने झालेला असतो त्यामुळे आपल्या दारात आलेली व्यक्ती मग ती कुणीही असो त्यात परमेश्वरी अंश आहे असे समजले तर आपण कुणाच्याही तोंडावर दार लावायला धजावणार नाही हे नक्की.      

आता ह्याची दुसरी बाजू अशी आहे कि ज्याने दरवाजा लावला त्याने त्याचे कर्म वाढवले पण ज्याच्या तोंडावर लावला त्याचे मन दुखावले गेले आणि त्याने दिलेले शिव्याशाप सुद्धा प्रखर असतात आणि अश्या लोकांची हाय लागते . आपण असे वागलो तर एकदिवस आपल्या दरवाज्यात कुणीही येणार नाही . दुसर्याच्या तोंडावर दरवाजा लावायला व्यक्ती तरी हवी ना समोर . हा खूप गहन आणि चिंतनाचा विषय आहे. वाटतो तितका वरवरचा नाही तर सखोल चिंतनाचा विषय आहे . मनुष्याने आपले कर्म करताना त्रिवार विचार करावा नाहीतर शेवटचा क्षण सुखाचा येणार तरी कसा . निदान त्यासाठी तरी चांगले वागावे . मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे , चार माणसे आपल्याकडे येऊ नयेत असे वाटणे किंवा त्यांना अपमानित करणे हा पराकोटीचा अहंकार आहे . 

ज्याच्या तोंडावर दरवाजा लावला किंवा आपटला त्याने असा विचार करावा कि ह्या दरवाज्यातून मला त्रास होणार आहे म्हणून त्या व्यक्तीला तशी बुद्धी झाली पण त्याच वेळी आपले गुरु आपल्यासाठी आपल्या फायद्याचे द्वार उघडत असतात त्यातून आपला आयुष्याचा पुढील प्रवास असतो जो अत्यंत सुखकर असतो .

कुठले कर्म आयुष्याच्या कुठल्या वळणावर उभे राहील आणि आपल्याला उत्तर द्यायला लावील सांगता येत नाही म्हणून जपून वागले पाहिजे.  पत्रिकेत चंद्र पूर्णपणे बिघडलेला असेल तर अशी माणसे अशी कृती करत असावी ज्यांना समोरच्याला काय वाटेल , समोरचा किती दुखावला जायील ह्याचीही काही पडलेली नसते . केव्हडा हा पराकोटीचा अहंकार. अरेरे....


आपल्या आर्थिक स्थितीला उतरती कळा लागते किंवा धंदा व्यवसाय नोकरी ह्यात धनलाभ होत नाही तेव्हा अंतर्मुख होऊन विचार करा आपले कुठे चुकले ? आपण कुणाचा दुस्वास मत्सर तर नाही करत ? कुणाचा अपमान नाही ना केला? . सरतेशेवटी आपण फार साधी माणसे असतो आपल्याला राग लोभ सगळ्याच भावना आहेत पण त्या व्यक्त करायची पद्धत चुकली तर मात्र आपणच अनर्थ ओढवून घेतो  हे नक्की . 


अश्या अनेक गोष्टींमुळे वास्तू दोष निर्माण होतो . आपली वास्तू वास्तुच राहते त्याला घरपण कधीच येत नाही . पुढे भाऊ बंदकी ह्या समस्या आभाळाइतक्या होतात .


प्रत्येकातील ईश्वराचा मान ठेवा ,कुणाचाही काहीही झाले तरी अपमान करू नका, कुणाचेही क्लेश घेवू नका . दुसर्याचा अपमान करून द्वेष मत्सर करून, समोरच्याला पाण्यात बघून आपले कधीही चांगले होत नाही . आपल्या श्वासात नामस्मरण असू द्या मत्सर नाही . आजकाल ज्याच्या त्याच्या घरात कुलस्वामिनी , साईबाबा , गजानन महाराज , स्वामी समर्थ सगळ्यांचे फोटो असतात , हेच शिकवतात का हे आपल्याला आपले महाराज ? विचार करा आपल्यासोबत अश्या कृतीमुळे आपण आपल्या गुरुंचीही मान खाली घालत आहोत . चालणार आहे हे आपल्याला आणि त्यानाही ? 

पूर्वीच्या काळी असणार्या काही पद्धती किती योग्य होत्या त्याची आता सत्यता पटते . पूर्वी घरी कुणी आले कि त्याला गुळ आणि पाणी देत असत . गडी माणसांचा वावर मागील दरवाज्यातून होत असे तसेच घरातील स्त्रीवर्गाला मुख्य दरवाज्यात सुद्धा येण्याची परवानगी नसे . घराच्या दरवाज्यात आत बाहेर गप्पा कधी मारू नये धननाश आणि मोठी आजारपणे निश्चित.

आज अनेकांना आपली स्वतःची हक्काची वास्तू नाही . घर होण्यासाठी घरघर लागते पण घर होत नाही. ज्यांची आहे त्यांनी ती जपा आणि वृद्धिंगत करा इतकच . 


संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

 

 


Friday, 25 November 2022

त्यांनीच दिली त्यांच्या अस्तित्वाची ग्वाही

 || श्री स्वामी समर्थ ||





कालचा दिवस स्मरणात राहील असाच होता. परवा सुरु केलेले श्री गजानन विजय पारायण महाराजांनी माझ्याकडून काल पूर्ण करून घेतले . पारायण करत असताना माझ्या डोळ्यासमोर सारख्या 2 चांदीच्या कॉईन येत होत्या . एक बाबांची आणि गजानन महाराजांची . त्या मला कुणीतरी दिल्या होत्या नक्की आठवत नाही. काही वर्षापूर्वी काही वस्तूंमध्ये त्या आमच्या प्लंबर काकांकडे नजर चुकीने गेल्या होत्या . शिर्डीची वारी करणारे आमचे काका त्यांनी प्रामाणिक पणाने मला त्या परत आणून दिल्या होत्या . घरातील वस्तू इथे तिथे ठेवायच्या आणि मग त्या हरवल्या कि ओरडत सुटायचे ह्यात माझा नेहमीच पाहिला नंबर असतो .असो. 


त्या दोन कॉईन अचानक स्मरणात आल्या आणि पारायण झाल्यावर त्याची शोध मोहीम सुरु झाली. अवसान गळाले कारण प्रत्यक्ष महाराज हरवले होते. आपली वस्तू नीट न ठेवण्याची खोड महाराज आज चांगलीच जिरवत आहेत हेही लक्ष्यात आले. पारायण पूर्तीचा आनंद कुठेच निघून गेला होता . डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले. महाराजांच्या पेक्षा अनमोल , अमुल्य काहीच नाही आणि मी त्यांनाच हरवून बसले होते. महाराजांची क्षमा मागितली  आणि सांगितले कि पुन्हा असे होणार नाही पण मला त्या वस्तू नजरेस पडूदेत. आपली इतक्या वर्षांची घट्ट मैत्री आहे आपली  फ्रेन्डशिप जगावेगळी आहे. सगळी  C 90 महाराजांसमोर ऐकवून झाली . पुन्हा शोधले आणि एकदाच्या त्या कॉईन मिळाल्या...घरभर “ मिळाल्या म्हणून “ नाचत सुटले , महाराजांचे गालगुच्चे घेतले ,आपली फ्रेन्डशिप पुढे चालू असे म्हणून महाराजांना मिठीच मारली आणि खूप रडले. 


आयुष्य असेच असते नाही. माणूस असते तेव्हा त्याची किंमत नसते पण दूर जाते तेव्हा आपला जीव कासावीस होतो. महाराज दिसेपर्यंत मला अन्न पाणी गोड लागेना पण मग उठले आणि झुणका भाकरी कांदा मिरच्या गुळ असा नेवैद्य केला . मला भाकरी अजिबात येत नाही करता हे खरेच आहे पण तरी केली ( माझे महाराज खातात माझी भाकरी हा विश्वास ) ,आरती केली आणि खूप वेळ एकटीच बसून राहिले. काय शिकलो आपण ह्या प्रसंगातून ? मनोमन लाज वाटू लागली .


महाराजांचे अस्तित्व आयुष्यातून वजा केले तर उरले शून्य ह्याची पुनश्च ग्वाही मिळाली . आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कुणी काहीही म्हणो “ ते आहेत “ ह्याचा दाखलाही मिळाला. 


संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230




 


Thursday, 10 November 2022

जातकाची मानसिकता

 || श्री स्वामी समर्थ ||



काहीतरी महत्वाची  समस्या असल्याशिवाय कुठलाही जातक ज्योतिषाकडे जात नाही. एखाद्या गोष्टीसाठी अथक परिश्रम करूनही जर यश आले नाही तर ह्या शास्त्राचा आपले उत्तर शोधण्यासाठी आधार घ्यावासा वाटतो आणि मग त्या शास्त्राच्या जाणकाराकडे पावले वळतात .


जातकाच्या प्रश्नांचे निदान करण्यापूर्वी आपण त्याची मानसिकता समजून घेणे खूप आवश्यक असते . ती समजल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. जातक आपल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर घेवूनच आलेला असतो.  अनेकदा ठरवून सुद्धा जातक आणि ज्योतिषी ह्यात संवाद होत नाही कारण प्रश्न विचारणारा कधी प्रश्न विचारणार ह्याची वेळ विधात्याने  निश्चित केलेली असते . त्याच वेळी जातक प्रश्न विचारतो. 


आज प्रत्येकाला खूप बोलायचे आहे , मन मोकळे करायचे आहे पण कुणाकडे तेच समजत नाही कारण ह्या व्यावहारिक जगात माणसा माणसातील प्रेम , नात्यातील गोडवा ,विश्वास माया ओलावा कमी होत आहे.  


आपल्याकडे आलेल्या जातकाला आपण योग्य व्यक्तीकडे आलेलो आहोत ह्याची खात्री पटते तेव्हाच तो आपल्याशी त्याच्या मनातील खर्या शंका विचारतो आणि तेच खरे हितगुज . अनेक घरगुती किंवा काही गुंतागुंतीचे प्रश्न , काही नात्यातील नाजूक प्रश्न अश्या अनेक गोष्टी जातक बोलताना मग कचरत नाही कारण जातक आणि ज्योतिषी ह्यात विश्वासाचे नाते तयार होते. जातकाने आपल्याशी मनमोकळे बोलावे हि जबाबदारी ज्योतिषा चीच असते . आयुष्यात कुठलाही प्रश्न असुदे त्यातून मार्ग निघतोच ,  नव्हे तो आपण काढायचा असतो हा विश्वास जातकाला देणे महत्वाचे असते.

प्रत्येक जातकाला आपली समस्या जगातील सगळ्यात मोठी समस्या वाटत असते आणि ज्योतिषाकडे जणू अल्लौदिन चा दिवा आहे आणि तो घासला कि आपली समस्या सुटणार असा (  भाबडा ) विश्वास किंवा अपेक्षा  त्याला असते .आपल्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यासाठी अत्यंत अधीर असणारा जातक आपला संयम कधीतरी घालवून बसतो.  इतकच नाही तर अनेकदा आपले उत्तर सुद्धा ज्योतिषाकडून त्यांना सकारात्मकच हवे असते. आपल्याला हवे तेच उत्तर समोरच्याने दिले तर आपण दिल से खुश नाहीतर आपला स्वर बदलतो हा मनुष्य स्वभाव आहे त्याला कोण काय करणार म्हणा .असो. 

आजकाल इंटरनेट च्या माध्यमातून जग जवळ आलेले आहे त्यामुळे फोन , झूम च्या माध्यमातून सुद्धा समुपदेशन करता येते . त्यामुळे जगाच्या कानाकोपर्यातून कुणाशीही कधीही संपर्क करता येणे शक्य झाले आहे .  प्रश्न विचारताना जातकाच्या मनस्थितीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. अनेकदा एखाद्या आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचा आजारपणाचा प्रश्न असतो ,अश्यावेळी भावूक झालेल्या जातकाला संयमाने उत्तरे देणे गरजेचे असते.  एखाद्याच्या पत्रिकेत विवाहाचा योगच नसेल तर तसे नकारात्मक उत्तर पचवण्याची ताकद जातकात नसल्यामुळे ते वेगळ्या शब्दात त्याला सांगावे लागते . हीच गोष्ट संततीसाठीही आहे. अश्या अत्यंत नाजूक प्रश्नांची उत्तरे जातकाला न दुखावता देणे हे ज्योतिषासमोरचे आव्हान असते. 


आज आपण अनेक आघाड्यांवर एकच वेळी लढत असल्यामुळे नोकरी , आर्थिक स्थैर्य , घर , विवाह ,संतती ह्या गोष्टी एकत्र गुंतलेल्या आहेत . एखाद्या गोष्टीसाठी उपाय सांगा हा सगळ्यांचाच प्रश्न असतो आणि तो गैर नाही. अनेक गोष्टी आपली मानसिकता बदलून आपल्याला साध्य करता येतात . अश्यावेळी योग , मेडीटेशन उपयुक्त ठरते. पण असे आहे कि देवाने सगळ्यांना सगळे दिले नाही. म्हणूनच जगी सर्व सुखी असा कोण आहे हे म्हंटले आहे . त्यामुळे आयुष्यात विवाह योग नसेल तर हि गोष्ट मिळणार नाही हा योग नाही हे जातकाला कधीतरी स्वीकारावे लागते आणि जितका लवकर तो ती स्वीकारेल तितका लवकर सुखी होईल , नाही का? 


परदेशगमन ,आजकाल प्रत्येकालाच परदेशी जायचे वेध लागले आहेत पण तो योग आपल्या पत्रिकेत नसेल तर परदेशगमन होणार नाही. पण त्यामुळे त्यासाठी निराश न होता आहे त्या नोकरीत सुद्धा मोठे यश मिळवण्याचा प्रयत्न का करू नये ? शेवटी आहे त्यात समाधान मानावेच लागते ,जगणे सोडून तर चालणार नाही ना .


जातकांच्या समस्या म्हणजे पूर्वकर्म आणि प्रारब्ध ह्याचा मेळ आहे. जे आहे ते आहे . काही गोष्टी नियतीला आणि सद्गुरुना सुद्धा बदलता येत नाहीत कारण ते तुमचे प्राक्तन असते त्यामुळे भोग आहेत ते भोगून संपवणे उत्तम. मुलगी शिकलेली  मिळेल , कि गोरी , जवळची मिळेल कि दूरची हे सांगणे कठीण ,विवाहयोग आहे कि नाही हे सांगता येयील. शेवटी ज्योतिष हे कालविधान शास्त्र आहे , एखादी घटना कधी घडेल हे ज्ञात होईल इतकेच. प्रश्न विचारणाऱ्या जातकानेही आपण योग्य प्रश्न योग्य वेळीच विचारात आहोत कि नाही ह्याचे भान ठेवले पाहिजे . शाळेत जाणार्या मुलाचा मुलाचा विवाहाचा प्रश्न उचित नाही ,येतंय का लक्ष्यात ? त्यामुळे तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी दैवी उपायही नसतात . काही गोष्टी आणि परिस्थिती आहे तशी स्वीकारावी लागते . ज्योतिषी हा सुद्धा जातक असतोच कि , त्याच्याही आयुष्यात प्रश्न असतात त्यामुळे त्याला जातकाची मानसिकता समजणे फारसे अवघड नसते.


प्रश्न इथून तिथून सारखेच असतात ,आपण जातकाची मानसिकता समजून घेवून त्याला कशी उत्तरे देतो हे त्या क्षणी आव्हान असते .कठीण प्रश्नाचे उत्तर सोपे केले तर जीवनातील आनंद सुद्धा चिरकाल राहील. प्रत्येकाला जगण्यासाठी देवाने काहीतरी चांगले दिले आहे . पत्रिकेतील वर्मावर बोट न ठेवता , त्याला देवाने बहाल केलेल्या अत्यंत उत्तम गुणांची ओळख त्याला ज्योतिषाने करून दिली तर जातक आपले दुक्ख कुरवाळत न  बसता ,उमेदीने आयुष्य जगायला लागेल आणि आपला प्रश्न विसरून जायील . त्याला जगण्याचे नवचैतन्य , दिशा प्राप्त होईल. सहमत ?

ज्योतिषी तुमचा मित्र किंवा शत्रू नाही आहे तो तुमच्या पत्रिकेतील ग्रहांची भाषा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे माध्यम म्हणून काम करतोय इतकच.


संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230





  

 







Monday, 7 November 2022

अध्यात्मिक पत्रिका

 || श्री स्वामी समर्थ ||


गेले तासभर मी तुकाराम महाराजांचे अभंग ऐकत होते . खरोखरच तो सर्व काळ आणि त्यांची निस्सीम भक्ती पांडुरंगाने केलेल्या लीला सगळ काही तसच्या तस्स डोळ्यासमोर उभे राहिले . आषाढी ची वारी आणि लाखो वारकर्यांच्या सोबत चंद्रभागेच्या वाळवंटात विठूच्या  गजरावर टाळ मृदुंगाच्या आवाजावर थिरकणारी प्रत्यक्ष पांडुरंगाची पाऊले सगळच अनुभवल मी. काही काळ मी माझे स्वतःचे अस्तित्व विसरून गेले आणि एक गोष्ट लक्ष्यात आली कि कुठल्याही गोष्टीत अंतर्मानापासून  समरसून  गेल्याशिवाय त्यातील अवीट गोडी चाखतच येत नाही .  

अध्यात्मिक पत्रिकांचा अभ्यास आपण त्यात किती खोल उतरतो , समरसून जातो ह्यावर निर्भर आहे हे निश्चित .निरंतर भक्ती हाच अभ्यासाचा  पाया आहे. अध्यात्माची जाण आणि त्यातील अंतर्स्फुर्ती देणारा परमेश्वरुपी नेपचून आपल्या आतच आहे. तोच आपल्याला आपल्या असण्या आणि नसण्याची , आपल्या परम कर्तव्यांची सतत जाणीव करून देत असतो . गुरुचे पत्रिकेवरील साम्राज्य अबाधित आहे . परमार्थाची अवीट गोडी चाखण्यास मदत करणारा गुरु फक्त अनुभवायचा आहे तर त्यातून निर्माण होणारा भाव शब्दबद्ध करायला बोलघेवडा बुध पुढे येयील. 


परमभक्तीचा आणि भक्तिरसाचा अविष्कार घडवणारा उच्चीचा शुक्र प्रपंच करताना परमार्थ कसा करायचा ते शिकवेल आणि दुर्दम्य इच्छा शक्ती देण्यासाठी मंगल पुढे सरसावेल. प्रपंच करून परमार्थ करा हे सांगणारा गुरु तर मुळातच प्रपंच हवाच कश्याला त्यापेक्षा विरक्ती बरी हे मनावर बिम्बवणारा आणि आयुष्यात प्रत्येक गोष्टीत संयम किती महत्वाचा हे सांगणारा शनी . आकाशात दुडूदुडू धावणारा चांदोमामा अध्यात्माचे प्रतिबिंब आपल्या मनातच दाखवेल तेव्हा डोळ्यातून अश्रुरूपी भक्ती ओसंडून वाहू लागेल आणि मग ज्ञानेश्वर माउलींनी अवघ्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी का व कशी घेतली , तुकाराम महाराजांच्या गाथा पुन्हा वरती कश्या आल्या , रामाचा वनवास आणि कृष्णाचे बालपण त्याने अर्जुनाला गीतेतून केलेले ज्ञान प्रबोधन ह्या सगळ्याचा उलगडा होयील. 


अध्यात्मिक पत्रिकेत चंद्र सोबत गुरु, शुक्र ,बुध नेप मंगळ शनी  ह्याच्या सोबत  राहूकेतू चा सुद्धा विचार महत्वाचा आहे तसेच ह्यांचा धर्म आणि मोक्ष त्रिकोणाशी असणारा संबंध बोलका असतो. प्रत्येक व्यक्ती आयुष्याच्या विशिष्ठ टप्प्यावर संसारातून विरक्त होते आणि मोक्ष मिळवण्यासाठी अध्यात्माच्या वाटेवर तिचा अविरत प्रवास सुरु होतो.  

राम कृष्ण हरी 

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क 8104639230 


Thursday, 3 November 2022

भास आभासांचा खेळ – राहू

 || श्री स्वामी समर्थ ||


राहू हा मायावी आहे , भास आभास निर्माण करणारा , छल कपट करणे हे सर्व त्याचे गुण आपल्याला ज्ञात आहेत. प्रत्येक ग्रहाची चांगली आणि वाईट अशी बाजू असते . कुठलाही शुभ ग्रह संपूर्ण शुभ फळे प्रदान करत नाही आणि अशुभ ग्रह प्रत्येक वेळी वाट लावेल असेही नाही. 


राहू आणि केतू ह्यांनी तर जीवनाची लढाई जिंकली आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही कारण एका अमृताच्या थेंबाने त्यांना जीवनदान दिले आहे तरीही आमरण त्यांची जीवनाशी झुंज चालूच आहे. राहू म्हंटल कि लगेच दडपण येते . शनी परवडला पण राहू नको अशी अवस्था राहू दशेत व्यक्तीची होते . असंख्य अनाकलनीय घटना , सततचे दडपण , भास आभास , निद्रानाश अश्या विविध समस्या व्यक्तीला भेडसावत राहतात . राहू व्यक्तीला प्रलोभनात अडकवतो त्यामुळे व्यक्तिगत फसवणूक , आर्थिक फसगत ह्यासारख्या गोष्टीनी व्यक्ती घेरली जाते . राहूच्या दशेत माणसाने आपले राहते घर भाड्याने देऊ नये दिलेच तर व्यवस्थित चौकशी करून द्यावे . घर घेतानाही विचारपूर्वक घ्यावे .


राहू हा फार महत्वाचा ग्रह आहे. राहू केतू ह्या ग्रहांना डावलून भाकीत करणे अशक्य असते .  राहू हा इंटरनेट चा कारक मानला आहे तर केतू टेक्नोलोजी चा. त्यामुळे कलियुगात त्यांचे प्रस्त वाढले आहे आणि अढळ स्थानसुद्धा.


आपले आयुष्य म्हणजे रोलर कोस्टर ची राईड आहे. धडाडी , आत्मविश्वास आणि घेयाकडे वाटचाल करायला लावणारी मंगळाची दशा आली कि माणसाला काहीतरी करायची उमेद निर्माण होते .त्यांनतर राहू महाराज येतात आणि सगळी सूत्र हाती घेवून होत्याचे नव्हते करतात . प्रत्येक वेळी वाईट घडतेच असे नाही. शेअर मार्केट हे राहुच्याच अमलाखाली येत असल्यामुळे ज्यांचा राहू चांगला असतो त्यांना त्या दशेत आर्थिक उन्नती व्यावसायिक यशाची गोडी चाखता येते . पण राहूच्या दशेत अनेक विस्मय चकित करणाऱ्या , अचंबित करणाऱ्या घटनांची शृंखला अनुभवायला मिळते हे नक्की . सगळच अधांतरी असल्याचा भास होत राहतो . राहुनंतर जीवन सावरायला गुरु महाराज येतात अश्या जीवनाच्या अनेक दशा आपल्याला अनुभवाव्या लागतात . कधी चांगला काळ तर कधी वाईट .


राहू म्हणजे फसवणूक म्हणून ह्या दशेत माणसाने समाजात फारसे मिसळू नये किंवा सावध राहावे . आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस हा राहूच समजावा म्हणजे सावध राहून व्यवहार करावे म्हणजे जगणे सुसह्य होयील . राहू कुणाला सर्वात अधिक बिघडवत असेल तर बुधाला त्यामुळे वक्तव्य सांभाळून करावे. कित्येकदा समजलेली बातमी पडताळून पहावी . वयात येणाऱ्या मुलांची राहूची दशा असेल तर पालकांनी सर्वार्थाने सावधगिरी बाळगावी . 

व्यसने , दिशाभूल होणे , भूल पडणे , वाईट संगत ह्यापासून आपल्या मुलांना दूर ठेवावे त्यांच्यावर नको तितका आंधळा विश्वास तर अजिबात ठेवू नये. 


राहूच्या दशेत  समाजात आपल्याबद्दल इतरांचे गैरसमज अधिक होत असतात .राहू सतत संभ्रम निर्माण करतो त्यामुळे कुठलाही निर्णय अनेकदा चुकीचा घेतला जातो . सतत अनामिक भीती वाटत राहणे , आपल्याला कुठलातरी मोठा आजार झालाय , दडपण , निद्रानाश , विचित्र स्वप्ने पडणे ह्या गोष्टी हमखास घडतात . राहू हा आकाशगंगेतील एक लहानसा ठिपका आहे. कित्येक मैल दूर असणारा जो दिसत नाही पण आहे. मायावी आहे आणि त्याचा प्रभाव आपल्या जनजीवनावर किती होतो ह्याचा विचार केला तर राहू च्या ताकदीचा पुसटसा तरी अंदाज नक्कीच येयील. 


राहू मुळे सगळेच वाईट होते का तर नाही . राहूमुळे आज जग जवळ आले आहे. आज पुण्यातील सदाशिव पेठेतील सासूबाई आपल्या लेकीसुनांना झूम च्या सहाय्याने करंज्या शंकरपाळे शिकवत असतात आणि नातवंडाना गोष्टीही सांगत असतात . राहूच्या दशेत ज्योतिष शास्त्र ह्या दैवी शास्त्राचा उत्तम अभ्यास करता येतो , अनेक संशोधने , उच्च शिक्षण ह्याच राहूमुळे घेता येते. राहू परदेश गमनासाठी तत्पर असल्यामुळे राहूच्या दशेत परदेशी जाण्याचे स्वप्न साकारले जाते त्यामुळे राहूची फक्त काळीच बाजू आहे असे नाही. पण अनेकदा तीच पुढे येते . एक सावली अनामिक भीती आपली पाठ सोडत नाही म्हणून राहूचा धाक सर्वांनाच आहे. राहू जर पत्रिकेत दुषित असेल तर राहूच्या दशेत आयुष्याची  अक्षरशः दशा होते आणि राहू चांगला असेल तर व्यक्तीचे आयुष्य प्रचंड उंचीवर जाते .शेअर मार्केट मध्ये असामान्य आर्थिक यश देणारा राहूच आहे. 


लग्नेश किंवा लग्न बिंदू राहूच्या नक्षत्रात असेल तर व्यक्ती हावरट असते . लग्नात राहू व्यक्तीला दशेत सरभरीत करतो .  धनेश , सप्तमेश राहूच्या नक्षत्रात किंवा राहुशी निगडीत असल्यास त्याची फळे मिळतात . 3 6 10 11 ह्या स्थानात  राहू चांगला फळतो . राहू दशमात सुस्थितीत असेल तर राजकारणात यश मिळते .


राहूच्या दशेत शंकराची उपासना नक्कीच फलदायी ठरते . राहुबद्दल अजूनही खूप लिहिण्यासारखे आहे . योगायोगाने आज पाहिलेल्या सगळ्या पत्रीकांमधील प्रश्नाशी राहू निगडीत होता . आज राहुचेच नक्षत्र आहे. 


संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


Wednesday, 26 October 2022

वास्तूबदल आणि ग्रहयोग

 || श्री स्वामी समर्थ ||




माझ्या मानत असलेल्या दोन मुद्द्यांचे विश्लेषण ह्या लेखाद्वारे करण्याचा लहानसा प्रयत्न करत आहे . आपल्याला आलेले अनुभव सुद्धा आपण शेअर करावे हि विनंती .


महिन्यापूर्वी मला एका स्त्रीचा फोन आला होता . त्यांनी नवीन वास्तू मध्ये गृहप्रवेश केला होता . त्यांचे अनेकविध प्रश्न होते जसे मुलाची नोकरी आणि त्याला वाईट संगतीमुळे लागलेले व्यसन . त्या म्हणाल्या आम्हाला एकाने सांगितले कि तुम्ही वास्तू बदललीत तर हे सर्व प्रश्न सुटतील पण तसे झाले नाही म्हणून त्या जरा चिंतीत होत्या . खरतर त्यांच्या ह्या वक्तव्यामुळे मला आजचा हा लेख लिहावासा वाटला. 


मी त्यांना विचारले कि वास्तू कुणाच्या नावावर घेतली आहे तर म्हणाल्या यजमानांच्या नावावर . म्हंटले ठीक आहे . गणपतीपूजन , वास्तुशांत सर्व व्यवस्थित केले असाही उल्लेख त्यांनी केला. आत्ताची वास्तू चांगली मोठी आहे हवेशीर आहे पण आयुष्यातील प्रश्न जैसे थेच आहेत . असो.


तर आपण आता मूळ मुद्द्याकडे येवूया . वास्तू बदल झाला तर पत्रिकेतील ग्रह सुद्धा बदलून अचानक चांगली फळे देतील का? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. मुळात वास्तूबद्दल होण्यासाठी तशीच ग्रहस्थिती कारणीभूत असते म्हणून वास्तू मध्ये बदल झाला. येतंय का लक्ष्यात ? ग्रहांच्या दशा आणि अंतर्दशेत ग्रहांनी फळ दिले ते म्हणजे वास्तूबद्दल .इतकच .

आता त्यांचा सलग्न प्रश्न असा आहे कि मुलाची नोकरी टिकत नाही आणि त्याची व्यसने सुटत नाहीत . आता ह्या मुलाच्या नावावर हि वास्तू खरेदी केलेली नाही तर त्याच्या वडिलांच्या नावावर खरेदीखत आहे . वडिलांच्या पत्रिकेत वास्तू विकत घेण्याचे आणि वास्तू बदल होण्याचे योग होते म्हणून तश्या घटना घडल्या पण हे योग मुलाला व्यसनमुक्त करू शकणार नाहीत . मुलाची व्यसने आणि  नोकरी ह्या गोष्टींसाठी त्याच्या वयक्तिक पत्रिकेतील ग्रहयोग काय सांगतात ते बघणे आवश्यक आहे. 


आपल्या पत्रिकेतील ग्रह आणि महादशा घटना घडवीत असतात . मुलाला व्यसन जन्मापासून आहे का? तर नाही . म्हणजेच आयुष्याच्या एका टप्प्यावर त्याला व्यसन लागले आहे . पत्रिकेतील 12 भाव आणि सगळे ग्रह सतत 24 तास फळ देतात का तर नाही . महादशा ज्या ग्रहाची असते तो ग्रह ज्या भावात ,नक्षत्रात आहे त्याच्या कार्येशत्वानुसार फळ देण्यास सक्षम असतो . त्यामुळे वास्तूमध्ये बदल झाला तर आयुष्य संपूर्ण 360 अंशाने बदलेल आणि सगळच सुफळ संपन्न होईल असे नाही . 


आयुष्यातील अनेकविध घटनांचे मूळ महादशेत आहे . वास्तूबद्दल , नोकरीत बदल , परदेशगमन , संततीचे आगमन , प्रेमसंबंध जुळणे , विवाह , घटस्फोट , अविवाहित राहणे , व्यवसाय सुरु होणे , अचानक नोकरी जाणे , व्यसन लागणे , आयुष्यभर एकत्र राहिलेल्या भावंडाच्या संबंधात कायमचा दुरावा किंवा वितुष्ट येणे , दीर्घ मुदतीची आजारपणे , दवाखान्याच्या फेर्या ह्या सर्व घटना त्या त्या ग्रह योगांतून घडत असतात . त्यामुळे आता वास्तू बदलली कि आमचे सर्व प्रश्न काहीतरी जादू झाल्यासारखे सुटतील असे म्हणणे उचित होणार नाही .


बरेच वेळा वास्तू बदल झाल्यामुळे सद्य स्थितीत असणारे प्रश्न अधिक भीषण स्वरूप धरू शकतात . ह्याचे कारण आपण घेतलेली वास्तू हि दुषित , पिडीत असते . एखाद्या वास्तूत एखाद्या स्त्रीचा हुंड्यासाठी किंवा तत्सम जाळून छळ करून मृत्यू झाला असेल किंवा तत्सम दुर्घटना घडलेली असेल किंवा कुणी त्या वास्तूत आत्महत्या केली असेल, भाऊबंदकि तील वास्तू असेल  तर त्या वास्तूची स्पंदने बिघडतात आणि त्या वास्तूत दोष निर्माण होतो . मग अश्या जागेत रात्री झोप न लागणे , दडपण जाणवणे , मनावर ताण निर्माण होणे , घरात कुठलेही धार्मिक कार्य संपन्न न होणे , घरात अन्न किंवा धान्य भाजीपाला फुकट जाणे , घरात कलह , मतभेद , घरात भास आभास होणे ह्या गोष्टींची प्रचीती येते . आपली दशा सुद्धा योग्य नसेल तरीही अश्या घटना घडू शकतात. 


अनेकदा आपण ऐकतो कि वास्तू बदलली आणि आमचे सगळे छान झाले तर अश्यावेळी उत्तम वास्तू मिळण्याचे आणि ती लाभण्याचे उत्तम ग्रह योग फलित झाले म्हणून सुखमय घटना घडत आहेत असे समजावे. पण वास्तूबदल झाला म्हणून घरातील व्यक्तीचे व्यसन सुटेलच असे नाही , नोकरी मिळेलच असे नाही . हे प्रश्न व्यक्तीसापेक्ष आहेत ते त्यांच्या व्यक्तिगत पत्रीकेवरून पाहणे उचित ठरेल.


आयुष्यातील घटना घडवण्याचा सर्वासर्वे अधिकार हा महादशा स्वामीने राखून ठेवला आहे . त्यामुळे वास्तू परिवर्तन सगळ्याच गोष्टीत परिवर्तन करेल असे नाही.  नवीन वास्तू खरेदी करताना ती आवडली तर लगेच टोकन देऊ नये . घरी यावे कुलस्वामिनीची प्रार्थना करावी आणि प्रश्नकुंडली मांडावी ( ज्यांना ज्योतिष येते आहे त्यांनी ) आणि चतुर्थ स्थान पाहावे . जर त्यात राहू असेल किंवा ते दुषित असेल तर ती वास्तू घेण्याचा  विचार सोडून द्यावा . 


अनेक जण कुठलाही मुहूर्त न बघता नवीन वास्तूत गृहप्रवेश करतात तसेच उदकशांत , वास्तुशांत सुद्धा करत नाहीत .पण हे योग्य नाही . वास्तुशांत हि दर 10 वर्षांनी आणि उदकशांत हि दर 5 वर्षांनी करावी पण आजकाल ह्या गोष्टी मागे पडत आहेत किंवा ह्या गोष्टीना प्राधान्य दिले जात नाही पण कितीही काहीही झाले तरी आपली आधुनिक so called मते बाजूला ठेवावीत आणि यथासांग वास्तू शांत करून घ्यावी . वास्तू शास्त्र हे प्राचीन शास्त्र आहे .वास्तू शास्त्र , ज्योतिष ह्या सर्वाची एकमेकात गुंफण आहे . वास्तूत दिशाना अन्य साधारण महत्व आहे मान्य आहे . प्रत्येक शास्त्र आपापल्या जागी श्रेष्ठ आहे . ह्यासर्वांचा मेरुमणी म्हणजे आपली कर्म , मनातील शुद्ध विचार आणि उपासना . आपली उपासना आपल्याला मार्ग दाखवत असते , आपले आयुष्य घडवत असते . अनेक आश्चर्य कारक घटना आयुष्यात घडतात ज्याची आपण अपेक्षा हि केलेली नसते त्यालाच आपण गुरुकृपा म्हणतो. 


प्रत्येकावर गुरुकृपा होऊन इच्छित वास्तूचा लाभ होवूदे हीच सदिछ्या .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230



  

 


Tuesday, 25 October 2022

अर्थार्जनाचे अनेकविध स्त्रोत -काळाची गरज ( Multiple Income Source Is a need of an hour ).

 || श्री स्वामी समर्थ ||





आपले संपूर्ण आयुष्य हे एकाच गोष्टी भोवती फिरत असते ते म्हणजे “ पैसा “. आपल्या दिवसाची सुरवात आणि शेवट सुद्धा ह्याच गोष्टीवर अवलंबून असतो . “ पैसा “ जगायला दुय्यम आहे अशी कितीही  वक्तव्ये आपण ऐकली तरी पैशाशिवाय आपण जगू शकणार नाही हे अंतिम सत्य आहे. भरल्या पोटीच सर्व गोष्टी सुचतात अन्यथा सर्व व्यर्थ आहे. पैसा खिशात असेल तर समाजात ,कुटुंबात मान असतो .


आयुष्य आज आहे तसे नेहमीच राहणार नाही त्यात प्रचंड उलथापालथ कधीही होऊ शकते हा मोठा धडा आपल्याला करोनाने दिला आहे . आज जगातील कित्येक देश दारिद्रय रेषेखाली आहेत . सध्या तर जागतिक मंदी आहे. रुपयाची घसरण रोज होताना आपण पाहत आहोतच . थायलंड सारख्या देशात तर कुटुंबातील सगळ्या लोकांनी काम केल्याशिवाय त्यांचे घर चालणे कठीण असते . पुढील १० वर्षातील नोकर्यांचा प्रश्न किती गंभीर असू शकतो हि विचार करण्यासारखी गोष्ट आहे . 


ह्या सर्व पार्श्वभूमीवर एक विचार पुढे येतो तो म्हणजे आज कुटुंबात अर्थार्जनाचे अनेक स्त्रोत निर्माण करणे गरजेचे झाले आहे . नुसत्या एकाच्या नोकरीवर आपल्या कौटुंबिक गरजा भागवणे दिवसागणिक कठीण होत आहे . आयुष्यात कधीही काहीही होऊ शकते . कुटुंबप्रमुख एकटाच मिळवत असेल आणि त्याच्यावर काही संकट आले तर त्या कुटुंबाची आर्थिक दृष्टीने ससेहोलपट होणार हे नक्की . 


म्हणूनच आज एक विचार मांडावासा वाटतो कि “ Multiple Income Source Is a need of an hour “. माननीय पु. ल. देशपांडे ह्यांनी म्हंटले आहे कि पोट भरण्यासाठी नोकरी करावी पण असा एखादा छंद जोपासावा जो तुम्हाला आयुष्य  खर्या अर्थाने जगायला शिकवेल ,आनंद देईल. आजची आर्थिक परिस्थिती बघता असे म्हणावेसे वाटते आहे कि आपल्यातील सुप्त गुण  ओळखा त्याचे नुसतेच छंदात रुपांतर न करता त्यातून अर्थार्जनाचा स्त्रोत कसा निर्माण करता येयील ह्याकडे लक्ष द्या. 


आज आपल्यातील अनेक स्त्रिया उत्तम सुगरणी आहेत त्यांनी त्यातून खरच अर्थार्जनाचा स्त्रोत तयार केला तर पैसे तर मिळतील पण स्वतःची एक नवी ओळख निर्माण होईल , वेळ छान जायील आणि मन शांत आणि व्यस्त राहिल्यामुळे आरोग्य उत्तम राहील. खरोखर आज मुलांच्या शाळांच्या फी ऐकल्या तरी तोंडचे पाणी पळते , भाज्यांचे भाव , अन्नधान्य सगळी महागाई आहे आणि त्यामुळे मध्यमवर्गीय माणसाचे रोजचे जगणे सुद्धा पैशाच्या गणिताशी निगडीत आहे. 


रिकामे मन म्हणजे सैतानाचे घर . मग त्यात उगीच नको ते विचार आणि त्यामागून येणारी फुकटची आजारपणे त्यामुळे आपल्याला जी कला येते आहे जसे कागदी फुले बनवणे , मेहेंदी , कलाकुसरीची कामे , भाजण्या मसाले , लोणची असे वर्षाचे टिकाऊ पदार्थ बनवणे , एखादी कला जसे हार्मोनियम , तबला शिकवणे , शाळेतील विद्यार्थ्यांच्या ट्युशन , ज्योतिष शास्त्रा सारख्या दैवी शास्त्राच्या कार्यशाळा , शेअर मार्केट , घरी अत्तरे तयार करणे, फुलवाती ,गवले  एक ना दोन असे अनेक अनेक उपक्रम आपल्याला राबवता येतील आणि त्यातून अर्थार्जन नोकरी सांभाळून करता येयील.असे वाटते.  जी गोष्ट आपण विरंगुळा ह्या दृष्टीकोनातून बघतो त्यातून स्वतःलाच नाही तर इतरानाही अर्थार्जन मिळवून देता येयील हा दृष्टीकोण तयार झाला पाहिजे . काय वाटते .


आपण आज व्यस्त राहणे अत्यावश्यक आहे.  माणसाचे मन आधी आजरी पडते मग शरीर त्यामुळे आपल्या आवडत्या छंदात , कलेत आपले मन गुंतून राहणे हे सगळ्या व्याधींवर रामबाण औषध ठरू शकेल . अनेकदा एकटेपणा , वैफल्य ह्या गोष्टी सुद्धा वाट्याला येतात त्यावर सुद्धा आपण आपल्या कला जोपासून मात करू शकतो . आज अनेक स्त्रीपुरुष अनेक प्रदर्शनातून भाग घेवून तसेच घरून सुद्धा अनेक लहान व्यवसाय करतात . आज मुंबई पुण्यासारख्या शहरात कार्यालयात  जाणार्या लोकांसाठी दोन्ही वेळेच्या घरगुती जेवणाचा प्रश्न मोठा असतो ,त्यामुळे असे डबे पोहोचवणे हाही एक उत्तम पर्याय आहे. 

आज आधुनिक काळात झूम सारखे online मध्यम उपलब्ध आहे त्यामुळे जगाच्या कानाकोपर्यात तुम्ही ह्या माध्यमाचा उपयोग करून कार्यशाळा घेवू शकता . लहान मुलांचे संस्कार वर्ग , पाककृती ई. थोडक्यात काय तर नुसता विरंगुळा , छंद ह्याच्या पलीकडे जाऊन पाहणे हि आज काळाची गरज आहे . 

आपले छंद आणि अंगच्या कलागुणांच्या व्यासंगातून जर अर्थार्जन करता आले आणि अनेकांचे पोशिंदे हि झालो तर आत्मविश्वास वाढेल आणि जगण्याला खर्या अर्थाने अर्थही प्राप्त होईल. मी काहीतरी करत आहे हि भावना आपल्याला जगवत असते.

मंडळी पैसा मिळवणे जितके आवश्यक आहे त्याहीपेक्षा त्याची आपल्या भविष्यासाठी उत्तम गुंतवणूक करणे हे त्याहीपेक्षा कित्येक पटीने अधिक महत्वाचे आहे . पैसा हवा तिथे खर्च केलाच पाहिजे पण पुढे कुणासमोर हात पसरायची वेळ येणार नाही ह्याची तरतूद सुद्धा करता आली पाहिजे . शेवटी आज ज्याच्या खिशात पैसा त्याला मान हि एकंदरीत  मनोधारणा आहे.

पैसा नसेल तर जगात काय आपल्या कुटुंबात सुद्धा आपली किंमत शून्य आहे ह्याचा अनुभव अनेकदा आपण घेतच असतो.

हि दिवाळी आपल्या सर्वाना उत्तम गुंतवणुकीच्या माध्यमातून समृद्धतेची जावूदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना .


संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230