Wednesday, 29 June 2022

जीवनाला सोन्याची झळाळी देणारे गुरुपुष्य

 || श्री स्वामी समर्थ ||


शनीचे पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा “ गुरुपुष्य “ म्हणजेच “ गुरुपुष्यामृत “ योगाची निर्मिती होते .ज्योतिष शास्त्रातील काही असामान्य योग आहेत त्यापैकी हा एक . शनी आणि गुरु दोन बलाढ्य ग्रहांच्या युतीने बनलेला हा योग .दोघेही साधक व उपासक . दोघेही विरक्तीचे ग्रह पण त्यातही फरक आहेच . शनीला प्रपंचाची फारशी ओढ नाही पण गुरुचे तसे नाही . प्रापंचिक जीवन जगताना धर्माचे पालन करा आणि आपली इतिकर्तव्ये पूर्ण झाली कि परमार्थाचे धडे गिरवा हे सांगणारा गुरु आहे. दोन्ही ग्रहांची शिकवण एकच पण शिकवण्याचे मार्ग वेगळे.

गुरूच्या सेवेचे अनन्यसाधारण असे फळ आहे. गुरुविना जीवन ते काय . ते परीक्षा घेतील पण अभाळा इतके पदरात टाकतील. शनी तर आपला मित्रच आहे . पण हा सखा जरा शिस्तप्रिय आणि कडक , न्यायी आहे. 

ह्या दोन्ही ग्रहांचा शुभयोग असताना केलेली साधना अत्युतम फळ प्रदान करेल ह्यात शंकाच नाही.  गुरुपुष्य योगावर सोने खरेदी करतात . ह्या सोन्यासारखेच तेजपुंज आपले आयुष्य देखील व्हावे म्हणून साधना करणेही आवश्यक आहे. गुरुपुष्य योगावर दान अवश्य करावे ,सोने जमले नाही तर चण्याची डाळ आणावी पण ती गुरुपुष्य योगातच .गरिबास गुळ गहू द्यावा .जमेल तितके नामस्मरण करत दिवस आनंदात घालवावा .

दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ह्या ग्रंथात “ गुरुपुष्यामृता” ची महती सांगताना ह्य योगावर जो अनन्यभावे श्री गजानन विजय ह्या पोथीचे पारायण करेल त्याच्या कसल्याही असोत यातना त्याचे निरसन होयील अशी ग्वाही दिली आहे . आपल्याला सगळे काही हवे असते पण त्यासाठी कष्ट परिश्रम करायची तयारी नसते. इंस्तंट चा जमाना आहे ना ,धीर म्हणून नसतो आपल्याला. पण अध्यात्मात तसे चालत नाही. शनी सगळ्याला विलंब करतो ,आपली प्रत्येक क्षणी परीक्षा बघतो ,त्याच्या परीक्षा कठोर असतात पण त्या देता देताच आपण आपल्याही नकळत घडत जात असतो.

शनी अत्यंत न्यायी आहे ,जसे कर्म तसे फळ म्हणूनच शनी कर्मप्रधान आहे .जीवन  कसे करायचे ते शिकवणारा ग्रह आहे . शनी आणि गुरु ह्या दोन्ही ग्रहांचा मिलाफ होणारा हा शुभदिन सर्व शुभ गोष्टींसाठी उत्तम दिवस आहे . शनी आणि गुरु हे दोन्ही विरक्त , साधक असल्यामुळे ह्या योगावर विवाह मात्र वर्ज आहे. ह्या दोन्ही ग्रहांना विवाहाचे वावडे आहे म्हणून ह्या योगावर नवीन आयुष्याची सुरवात करू नये .

गुरु आणि शनी ह्या दोन्ही ग्रहांचे सोन्यासारखे गुण कसे ग्रहण करता येतील हे पाहणे म्हणजेच “ गुरुपुष्य ”.

आपल्या सर्वांच्या आयुष्यात हे गुरुपुष्य एका नवीन सोनेरी किरणांची पहाट घेवून येणारे असुदे हीच गुरु आणि शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

 








Monday, 27 June 2022

ज्योतिष म्हणजे विरंगुळा नाही

 || श्री स्वामी समर्थ ||




अंधारातून प्रकाशाकडे नेणारे हे शास्त्र दैवी आहे . ह्या शास्त्राचा योग्य तो मान आपल्याला ठेवता आला पाहिजे .नुसताच ह्या शास्त्राचा नाही तर ह्या शास्त्राच्या सर्व अभ्यासकांचा सुद्धा . कुठलीही विद्या अवगत करणे हे नशिबी असावे लागते . अनेकदा उत्तम शिक्षक मिळतोही पण आपल्याच कर्मामुळे त्याच्याकडून  विद्या ग्रहण करणे आपल्या भाग्यात नसते .  आपल्या प्रश्नाच्या अचूक उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी त्या त्या विषयातील उत्तम जाणकार लागतोच आणि त्याच्यापर्यंत आपण पोहोचलो तर ते आपले भाग्यच म्हणायचे . 

कुठलेही ज्ञान कधीही फुकट जात नाही आणि ते सहज प्राप्त सुद्धा होत नाही . जीवाचे रान करावे लागते . ज्ञान प्राप्ती साठी एकलव्याने काय नाही केले .पण आजकाल द्रोणाचार्य मिळणे कठीण आणि मिळालेच तर एकलव्य मिळणे त्याहून कठीण . म्हणूनच मनापासून जीव तोडून शिकावणारे शिक्षक मिळाले तर आपल्या सात जन्माचे पुण्य फळास आले असे समजावे आणि जीवाच्या आकांताने विद्या ग्रहण करावी .  दुसरे काहीच करायला नाही म्हणून कुठेतरी वेळ घालवण्यासाठी कुठलाही ज्योतिष शास्त्राचा क्लास करू नये . ग्रहतारे बघतील बघतील आणि मागेच लागतील. त्यांनासुद्धा गृहीत धरू नका . 

ज्योतिष क्लास म्हणजे टीव्ही वरील डेली सोप नाहीत . बघता बघता भाजी निवडणे किंवा इतर तत्सम कामे करणे . 

ज्योतिष हि एक साधना आहे आणि हि महान विद्या ग्रहण करण्यासाठी मुळात साधना करावी लागते . सद्गुरूंची कृपा झाली तर कुठेतरी आशेचा किरण दिसतो आणि शास्त्र ग्रहण करण्याची संधी मिळते . संधी अनेकांना मिळते पण त्याचे सोने करणे हीच खरी गुरुदक्षिणा . आजकाल धरसोड हि मानवी वृत्ती झाली आहे .वस्त्राप्रमाणे जवळचे लोक, त्यांचे मित्रसंबंध बदलणे हे  आता नवीन नाही पण अनेक शास्त्र एकच वेळी शिकणे ह्यासारखी चुकीची गोष्ट ती काय असू शकते . 

आपल्याला हे शास्त्र कश्यासाठी शिकायचे आहे ? ह्या प्रश्नाचे उत्तर स्वतःला मिळवणे आवश्यक आहे . एखाद्या विषयाची केवळ माहिती मिळवण्यासाठी शिकायचे आहे कि त्यामध्ये पुढे जाऊन करिअर करायची आहे त्याप्रमाणे आपले पैशाचे वेळेचे आणि मनाचे सुद्धा नियोजन असले पाहिजे . मला इतका  वेळ ह्या शास्त्राच्या अभ्यासासाठी द्यावा लागणार आहे ह्याची मनात खुणगाठ बांधली तर सोपे होऊन जायील . पण फुलपाखरासारखे इथे तिथे फिरत बसले तर एक ना धड असे व्हायचे . पैशाचा आणि वेळेचा अपव्यय तर होईलच पण आपल्यातील धरसोड वृत्तीला खतपाणी घातले जायील. सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतःमधील आत्मविश्वास निघून जायील. 

कुठलेही शास्त्र अवगत करताना संपूर्ण शरणागती लागते . ज्यांचे मन चंचल असेल त्यांनी ह्या भानगडीत पडून आपला आणि समोरच्याचाही वेळ फुकट घालवू नये . ज्योतिष हि दैवी विद्या आहे . आयुष्यात काय करावे आणि काय करू नये ह्याची दिशा दाखवून सर्वार्थाने जीवन आनंदी करण्याचा तो मोठा स्त्रोत आहे. त्याचा योग्य तो उपयोग करता आला पाहिजे .  स्वतःच्या मनाशी आणि ह्या ग्रह ताराकांशी अत्यंत प्रमाणिक राहून शिकलो तर हे ग्रह तारे आपल्याशी संवाद साधतील , हितगुज करतील ह्यात शंकाच नाही .

उत्तम बैठकीची जोड आणि आपली साधना शास्त्राच्या अभ्यासात गती देयील . ज्योतिष विद्या अवगत करणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही . ह्या शास्त्राचा उपयोग समाजासाठी करताना ,एखाद्याला मार्ग दाखवताना एखाद्याला जीवनाचा योग्य जोडीदार निवडण्यास मदत करताना जो आनंद प्राप्त होतो तो अनमोल असतो .  एखाद्याला रडवायला अक्कल लागत नाही पण त्याच्या चेहऱ्यावर हास्याची एक लकेर आणणे जिकरीचे काम आहे .आपले जीवन सार्थकी लावणारा हा आनंद प्रतिदिन आपण अनुभवू शकतो . दुसर्याच्या जीवनात तेजोमय प्रकाश निर्माण करणाऱ्या ह्या शास्त्राचा अपमान म्हणजे जीवनाला लागलेली अवकळा असे म्हंटले तर वावगे ठरू नये . सगळ्यांनाच सगळे जमते असेही नाही ,ज्याला जे जमेल ते त्याने करावे इतकच .

ह्या शास्त्राचा सन्मान करायला शिकले पाहिजे तरच आपली धडगत आहे अन्यथा .उठसुठ ज्योतिष नाही. हे शास्त्र शिकणे हा सुद्धा एक दिव्य अनुभव आहे जो आपल्याला अंतर्यामी घडवतो , जीवनातील अनेक बारकावे आणि अनुभवांचे दर्शन धडवतो .ह्या शास्त्राची प्रचीती आपल्यापैकी अनेकांनी घेतलीच असेल ,दे शास्त्र देत राहणारे आहे हे सांगण्यासाठीच जणू  जगाचा चालक मालक पालक सूर्य नित्य नेमाने आपल्या  भेटीला येत असतो.

निसर्ग , अवकाशातील हि ग्रहमाला आपल्याला काहीतरी उदात्त देऊ पाहते आहे ,आपल्याला घेता आले तर अधिकस्य अधिकम फलं 

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


 


Friday, 24 June 2022

महादशा इष्ट कि अनिष्ट

 || श्री स्वामी समर्थ ||


आपल्या पत्रिकेत भाव ,राशी ,ग्रह आणि नक्षत्र कार्यरत असतात .पण सगळे एकाच वेळी कार्य करतील का ? तर नाही . प्रत्येक ग्रहाला काम करण्याची संधी मिळते ती त्याच्या महादशेत . म्हणजेच महादशा हा प्रत्येक ग्रहाला प्रदान केलेला आपल्या आयुष्यातील ठराविक कालखंड असतो आणि त्या काळात तो आपली फळे प्रकर्षाने देत असतो .ह्याविषयी आज थोडे जाणून घेवूया .

बघा पत्रिकेतील कुठलाही ग्रह हा संपूर्ण शुभ किंवा अशुभ नसतो तसाच भाव आणि नक्षत्र सुद्धा . एक व्यक्ती जशी अनेक नात्यातून जगताना दिसते जसे मी कुणाचीतरी पत्नी आहे पण त्याचवेळी आई , सून , मैत्रीण , मावशी  म्हणून सुद्धा नाती निभावत आहे. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक भाव हा फिरता आहे अनेक रंगात न्हाऊन निघणारा आहे . जसे व्यय भाव हा investment चा आहे मग ती भावनिक आणि आर्थिक दोन्ही आहे, तिथे बंधन योग सांगितलेला आहे . व्यय भावात परदेशगमन , तुरुंगवास , दवाखाना सगळच आहे मग नक्की कुठल्या ठिकाणी तो बांधला जायील हे पत्रिकेतील ग्रहस्थिती आणि जातकाचा प्रश्न सांगेल . 

मला परदेशी जायची ऑफर एका कंपनीने दिली आहे तर माझे परदेशी जाणे होईल का ?? असा प्रश्न विचारला आणि त्याला व्यय भावाशी संबंधील महादशा असेल तर तो नक्कीच प्रयाण करेल असे सांगता येयील . पण एखाद्यावर मोठा गुन्हा दाखल झाला आहे आणि त्याच्याही पत्रिकेत व्यय भाव कार्यान्वित झाला असेल तर त्याची तुरुंगात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे सांगता येयील. प्रश्न काय आहे त्यावर आपले उत्तर आहे. परदेशी जाऊ का? ह्या प्रश्नावर आपण तू नक्कीच आतमध्ये हवा खायला जाशील असे सांगितले तर तो बिचारा चक्कर येऊन खालीच पडेल त्यामुळे ज्योतिषाने तारतम्य बाळगून उत्तर दिले पाहिजे. हे झाले प्रत्येक भावाबद्दल.

तेव्हा महादशा म्हणजे प्रत्येक ग्रहाला त्याचे कार्य करायला दिलेला काळ. माणसाचे आयुष्य १२० वर्षांचे गृहीत धरले आहे. आपल्याला ज्ञात असणार्या नवग्रहांच्या दशा एकामागून एक ठरलेल्या क्रमाने येत असतात . हर्शल नेप आणि प्लुटो ह्या ग्रहांना महादशा नाहीत . 

आपली जन्मस्थ महादशा कुठली हे ठरवण्यासाठी आपला जन्म कुठल्या नक्षत्रावर झाला आहे ते बघावे . चंद्र ज्या नक्षत्रात असेल त्या नक्षत्राच्या स्वामीची दशा जन्मस्थ दशा असते. जसे एखाद्याचा जन्म जर पूर्वाफाल्गुनी ह्या शुक्राच्या नक्षत्रावर झाला असेल तर जन्मतः त्याला शुक्राची दशा असते . शुक्र महादशेला 20  वर्षाचा काळ दिलेला आहे म्हणजे 20 वर्ष ह्या जातकाच्या आयुष्याचा सुकाणू शुक्राकडे असणार आहे . पत्रिकेत ह्या शुक्राची जशी स्थिती असणार आहे त्यावर त्याची दशा फळे असणार आहेत .त्यांनतर येणारी केतूची दशा पत्रिकेतील केतूच्या स्थितीप्रमाणे फळे देयील. पुढील सर्व दशा अश्याच क्रमाने येत राहतील.

शुक्र हा ऐहिक सुखाचा भोगविलासाचा कारक असल्यामुळे ह्या जातकाला शुक्र सुस्थितीत असेल तर सर्व भौतिक सुखे , वाहन घर पैसा संपत्ती सुंदर पत्नी संसार सुख परदेशगमन अश्या आनंद देणाऱ्या सर्व सुखांची प्राप्ती होईल पण शुक्र बिघडला असेल तर ह्या सुखांपासून जातक वंचित राहील. मग संपूर्ण महादशा वाईट जायील का तर नाही . ह्या महादशेत अंतर्दशा आणि विदशा सुद्धा येतात त्या कुठल्या ग्रहांच्या त्यांचा क्रम सुद्धा महादशे प्रमाणेच असतो. त्या त्या ग्रहांच्या अंतर्दशा विदशा सुद्धा त्यांचे पत्रिकेतील बलाबल पाहून कश्या जाणार ते सांगता येते .

एखाद्या स्त्रीला संतती कुठल्या महादशेत होईल हे सांगता येईल पण संतती नेमकी कधी होईल हे पाहण्यासाठी अंतर्दशा आणि विदशा पाहाव्या लागतील. आयुष्यातील कुठलीही घटना मग ती नोकरी मिळणे , विवाह ठरणे आणि संपन्न होणे ,परदेशगमन , आजारपण , संतती ,शिक्षण उच्च शिक्षण , कुठल्या कालावधीत घडणार हे निदर्शित करणारी महादशा असते. थोडक्यात महादशा स्वामी त्या काळापुरता आपल्या आयुष्यावर अधिराज्य करत असतो .

आता हि महादशा कश्या प्रकारे कार्य करणार ह्या साठी त्या ग्रहाचे कार्येशत्व काढणे आवश्यक आहे आणि त्यासंबंधी विचार आपण मागील लेखात केलाच आहे . कुठलाही भाव ग्रह आणि नक्षत्र वाईट नसतेच ते काहीतरी देणारच असते . आपला एक पूर्ण दिवस सुद्धा पूर्ण चांगला किंवा वाईट जात नाही अगदी तसेच ग्रहांचे सुद्धा आहे. महादशा स्वामींचा क्रम ठरलेला आहे. प्रत्येक ग्रहाचे कार्य आपल्याला माहित आहेच जसे रवी हा सरकारी नोकरी , आरोग्याचा कारक आहे ,व्यवस्थापन म्हणजे MBA चा सुद्धा कारक आहे . जर रवी षष्ठ स्थानात असेल, स्वनक्षत्री असेल तर जेव्हा रवीची दशा येयील तेव्हा नोकरी लागेल आणि प्रगती सुद्धा होईल. MBA चे शिक्षण पूर्ण होईल, स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल.  पण षष्ठ स्थान हे सप्तम स्थानाचे व्यय स्थान असल्यामुळे हि दशा विवाहासाठी पूरक असणार नाही. एखादी महादशा जर तृतीय स्थानाशी निगडीत असेल तर त्या दशेत चतुर्थ स्थानाने दर्शवलेल्या गोष्टी जसे वास्तू विकत घेणे होणार नाही पण वास्तू विकण्याचा योग येयील.

अश्या प्रकारे ज्या ग्रहाची दशा आहे तो कुठल्या भावाचे कार्य करत आहे त्याप्रमाणे फळ मिळेल. एखाद्या ग्रहाच्या अंशात्मक युतीत असणारा ग्रह सुद्धा त्या दशेत फळ देतो. राहू केतूची दशा असेल तर राहू ज्या भावाचा कार्येश आहे त्याच्या स्वामीप्रमाणे  फळे देयील तसेच राहूच्या युतीत असणारे ग्रह ,राहू ज्या नक्षत्रात आहे त्याच्या नक्षत्रातील ग्रहांनी दर्शवलेली स्थाने तसेच राहूवर दृष्टी टाकणारे ग्रह ह्या सर्वांचा विचार केला पाहिजे. 

लग्नाला कुठले इष्ट अनिष्ट ग्रह आहेत त्याचाही विचार व्हावा जसे वृषभ लग्नाला गुरु ,धनु लग्नाला शुक्र , मीन लग्नाला बुध फळे देणार नाही करा हे ग्रह लग्नेशाचे मित्र नाहीत . पण ह्या ग्रहांच्या अंतर्दशा स्वामी जे 

लग्नेशाचे मित्र आहेत ते त्यांच्या अंतर दशातून शुभ फळे प्रदान करतील. 6 8 12 मधील ग्रहांच्या किंवा त्यांच्या स्वामींच्या दशा सुद्धा वाईट जातील असे नाही. षष्ठ स्थान असेल तर आजारपण येयील कर्ज मिळेल , नोकरी मिळेल . अष्टम स्थान असेल तर मृत्युसम पीडा होईल पण वारसाहक्काने संपत्ती मिळेल. व्यय भाव असेल आणि एखादा पेशंट कोमात असेल तर लाभ भाव लागता तो कोमातून बाहेर येयील .

राहूची दशा हि सर्वच लग्नांना त्रासदायक जाते . पुन्हा राहूची पत्रिकेतील स्थिती बघणे हे आलेच . बुधाच्या दशेत एकदा तरी कोर्टाची पायरी चढायला लागते हा अनुभव अनेकांना आला आहे मग कारण काहीही असो.  प्रत्येक ग्रहाचे एक विशिष्ठ कारकत्व आहे . शुक्रासारखा सर्व प्लेजर प्रदान करणार्या ग्रहाची दशा ऐन तारुण्यात आली तर उत्तम पत्नी , संसार ,प्रवास ,संतती वास्तू सर्व सुखे मिळतील पण हीच दशा वयाच्या ७० व्या वर्षी आली तर थकलेले शरीर असे कितीसे उपभोग घेयील. शिक्षणाचे वय असताना 4 9 ची दशा आली तर उत्तम शिक्षण होईल पण ह्या दशा नोकरीसाठी चांगल्या नाहीत . थोडक्यात योग्य वेळी योग्य दशा आल्या पाहिजेत . चुकीच्या दशा आल्या तर आयुष्याची दशा दशा होईल. म्हणूनच विवाहासाठी पत्रिका मिलन करताना नुसते गुण जुळवून चालत नाही तर ग्रहमिलन सुद्धा करावे लागते . विवाह पश्च्यात 20-25 वर्षात येणार्या  दोघांच्याही दशांचा व्यवस्थित सखोल अभ्यास करावा लागतो . 

जी महादशा चालू आहे त्याचा जप केला तर फायदा होतोच तसेच त्याने दर्शवलेल्या पत्रीकेतील स्थानांच्या अनुषंगाने विचार केला तर यश मिळते जसे अष्टम स्थान लागले तर विमा कंपनीत काम करावे किंवा विमा एजंट व्हावे किंवा अंतेष्टीच्या पूजा सांगाव्यात ,अंतेष्टीसाठी लागणार्या सामानाचे दुकान काढावे . 

Life is a Cardiogram आणि म्हणूनच जर महादशांचा क्रम पाहिलात तर राहूच्या दशेत अनेकदा मनुष्य देशोधडीला लागतो, अनान्न दशा होते. सततची अनामिक भीती , मनावर दडपण, गैरसमजाचे वारे वाहणे ह्या गोष्टीना सामोरे जावे लागते . त्यानंतर गुरूची दशा येते त्यात उत्कर्ष होतो ,जरा प्रगती झाली कि आपल्याला अहंकार येतो , राहू दशेतील फटके आपण विसरतो आणि त्या अहंकाराला ठेचायला पुन्हा शनी महाराजांना यावेच लागते म्हणून गुरु नंतर शनी दशा . अर्थात ह्या सर्व ग्रहांची स्थिती सुद्धा पत्रिकेत अभ्यासावी लागतेच . कधी कधी पापग्रहांची जसे मंगळ शनी ह्यांच्या दशा सुद्धा प्रगतीपथावर नेतात . 

गुरु शनी ह्यांच्या दश्या वार्धक्याच्या उंबरठ्यावर आलेल्या केव्हाही उत्तम कारण तो काळ पारमार्थिक सेवेत व्यतीत करण्याचाच असतो. दोन्ही ग्रह परमार्थाकडे नेणारे असले तर शनीला संसाराचा वीट आहे पण गुरूला नाही . गुरु धर्माचे रक्षण करत प्रापंचिक जीवन उपभोगुन झाले, प्रापंचिक जीवन यशस्वीपणे जगल्यावर  परमार्थाकडे नेण्याचा मार्ग दाखवतो ,त्याला संसाराचा वीट नाही .उलट उत्तम प्रपंच केलात तर परमार्थ सोपा होयील हेच बाळकडू तो पाजतो. ज्याचे मन शांत तृप्त आणि समाधानाने तुडुंब वाहत आहे तोच भक्तिरसाचा आस्वाद घेवू शकतो. 

महादशा स्वामींचे किती महत्व आहे हे आपल्या सर्वाना समजले असेलच आणि योग्य वयात योग्य दशा लाभणे हेच खरे भाग्य म्हंटले पाहिजे. एखादी घटना आयुष्यात कधी घडेल हे सर्वस्वी महादशा स्वामीवर अवलंबून असते. विवाहा साठी पूरक असणार्या स्थानांशी निगडीत महादशा स्वामी नसेल तर कितीहीवेळा गोचर गुरु लग्नातून , सप्तम स्थानातून किंवा सप्तम स्थानावर दृष्टी टाकून गेला तरी विवाह होणार नाही .त्यातही एखादी अंतर्दशा पूरक असेल तर त्यात विवाह संभवतो अन्यथा नाहीच .म्हणूनच पत्रिकेचा अभ्यास करताना महादशा स्वामी विचारात घेणे अत्यावश्यक आहे. 

तात्पर्य महादशा स्वामी आपल्या आयुष्यातील त्या कालखंडाचा राजा आहे त्याला डावलून चालणारच नाही .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230












 

 



Tuesday, 21 June 2022

250 ब्लॉग पूर्ण झाले

 || श्री स्वामी समर्थ ||



 

नमस्कार ,


आईवडिलांच्या आणि सद्गुरू श्री गजानन महाराज आणि समर्थ सद्गुरू
श्री स्वामी समर्थ ह्यांचे आशीर्वाद .त्यांनीच माझ्याकडून आज 250 ब्लॉग लिहून घेतले .

त्यांची कृपा माझ्यावर सदैव राहूदे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना .
तसेच आपल्या सर्व वाचक वर्गाचेही मनापासून धन्यवाद .आपण वेळोवेळी दिलेल्या प्रोत्चाहनामुळे आणि शाबासकीमुळे लिहिण्याची स्फूर्ती मिळाली .

आपले सर्वांचे सहकार्य पुढेही असेच लाभेल अशी आशा करते.

सौ.अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल

 || श्री स्वामी समर्थ ||


सर्व जगाचे लक्ष्य वेधून घेणारी “ आषाढी वारी “. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे.  लक्ष लक्ष्य  वारकर्यांच्या हृदयावर विराजमान असणारा आणि तुमचा आमचा सर्वांचाच लाडका पांडुरंग डोळ्यात प्राण आणून आपल्या सर्वांची गळाभेट कधी होईल ह्याची आतुरतेने वाट पाहतो आहे. पांडुरंग आणि भक्ताचे नातेच असे असते . कसलेही आमंत्रण नाही , आमंत्रण पत्रिका नाहीत , जाहिराती नाहीत काहीच नाही ,आहे तो आसमंतात दरवळणारा भक्तीचा सुगंध .


आकाशातून प्रत्यक्ष परमेश्वर अनंत रुपात येऊन जणू पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करतो आहे असा भास नाही झाला तरच नवल. टाळ मृदुंग ह्यांनी आसमंत दुमदुमून टाकणार्या ह्या अठरा दिवसाच्या आषाढी वारी सोबत प्रत्यक्ष किंवा मनाने  तुम्ही आम्ही सर्वच असणार आहोत . खर सांगायचे तर मन कधीच पांडुरंगाच्या चरणी गेले आहे . विठूराया अखेरच्या क्षणापर्यंत ते तुझ्यातच गुंतलेले असुदे रे बाबा . जाती धर्म वय सगळ्याच्या परे असणारी हि वारी म्हणजे पांडुरंगाचे प्रत्यक्ष अधिष्ठान . 

खेडोपाड्यातून पावसाची कामे आटोपून भगवंताच्या दर्शनाला निघालेला हा वारकरी भगवंताला त्याच्या प्राणा इतुकाच प्रिय आहे . सगळे आयोजन तोच तर करत आहे ,चराचरात तोच आहे , मृदुंगाच्या आवाज म्हणजे तोच , अभंगाचा स्वर म्हणजेही तोच .  

तहान भूक आणि स्वतःचे अस्तित्व सुद्धा विसरायला लावणारी हि वारी . काय वर्णन करावे आणि कसे करावे. आता पुढील काही दिवस मंत्रमुग्ध असतील ते विठूमाऊलींच्या नामाच्या गजरात . भक्तिरसात आकंठ बुडालेल्या ह्या वारीतील प्रत्येकासोबत क्षणोक्षणी असणार्या ह्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक .

वारीचा अनुभव असाल तिथून घ्यायचा आहे .जितके करता येयील तितके नामस्मरण ,मानसपूजा ह्या सर्वातून आपल्याला भेटत जाणार्या पांडुरंगाच्या चरणाला स्पर्श करत आपले जीवन आणि वारी पुढे पुढे जात राहणार  आहे .

प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वारीत सहभागी झालेल्या आणि आपले मन पांडुरंगाच्या चरणी समर्पित करणार्या प्रत्येकाला ह्या अद्भुत , अलौकिक सोहळ्याच्या मनापासून शुभेछ्या .

संकलन : सौ . अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


ग्रहांचे कार्येशत्व

 || श्री स्वामी समर्थ ||


पत्रिकेतील प्रत्येक भावाचा एक स्वामी असतो आणि त्याच्यावर त्या भावाची संपूर्ण जबाबदारी असते . तो त्या भावाचा कुटुंबप्रमुख असतो असे म्हंटले तरी चालेल. ह्या स्वामीला त्या भावाचा भावेश म्हणून संबोधले जाते . हा भावेश ग्रह ज्या भावात असतो त्याच्या स्वामी प्रमाणे फळ देतो त्याचबरोबर पत्रिकेत तो ज्या भावांचा कार्येश आहे त्याचीही फळे देतो. जसे बुध जर सिंह राशीत असेल तर तो रवी प्रमाणे फळे देयील पण त्याचसोबत तो मिथुन आणि कन्या राशी पत्रिकेत ज्या भावात आहेत त्याचीही फळे देयील. ग्रह ज्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्राची सुद्धा फळे देतो. म्हणजे बुध जर सिंह राशीत पूर्वाफाल्गुनी  ह्या नक्षत्रात असेल तर तो शुक्राचीही फळे देयील पर्यायाने शुक्राच्या राशी ज्या भावात आहेत त्या भावांचीही फळे देईल.


ह्या सर्वाचा एकत्रित अभ्यास करण्यासाठी आपल्याला ग्रहांचे कार्येशत्व काढणे आवश्यक असते . मुळात पत्रिका पाहताना पत्रिकेतील लाग्नबिंदू हा सर्वात महत्वाचा आहे. तदपश्चात लग्नेश ,लग्नातील ग्रह , चंद्र ,त्रिक स्थानातील ग्रह ,राहू केतू , ग्रहांचे एकमेकांशी होणारे योग , लग्नाला असणारे इष्ट आणि अनिष्ट ग्रह , महादशा ह्या सर्वांचा अभ्यास आपल्याला निष्कर्षापर्यंत म्हणजे जातकाच्या प्रश्नाला उत्तरे द्यायला सहाय्यक ठरतो .


म्हणूनच कुठलाही एक ग्रह पत्रिकेतील भविष्य सांगायला पुरेसा नसतो तर ह्या नवग्रहांची पालखी तयार होणे हे तितकेच महत्वाचे असते . एखाद्याचा राहू पंचम स्थानात अत्यंत बलवान असेल तर व्यक्ती शेअर मार्केट मध्ये उलाढाली करू शकते पण मग हे कधी शक्य होईल ? हा राहू तर जन्मापासूनच पंचमात आहे मग व्यक्ती जन्मापासून शेअर मार्केट मध्ये काम करेल का तर नाही . ज्या वेळी त्या ग्रहाची म्हणजे ह्या उदा. राहूची महादशा येयील किंवा राहूच्या नक्षत्रातील ग्रहाची दशा येयील किंवा राहूवर दृष्टी टाकणाऱ्या ग्रहाची दशा अंतर्दशा येयील  त्यावेळी हा राहू पंचमाची फळे द्यायला सक्षम होईल.


बघा सोपे आहे आपण ज्या खोलीत असतो त्याच खोलीतील पंखा लावतो . इतर खोल्यातील नाही .पण आपण उठून स्वयंपाकघरात गेलो तर बाहेरच्या खोलीतील दिवे पंखे बंद करून स्वयंपाकघरातील लावतो . अगदी तसेच पत्रिकेतील सर्व ग्रह आणि भाव एकच वेळी फळे देणार नाहीत ,त्यांच्या दशा अंतर्दशेत ते फळे देतील. म्हणजेच एखाद्या भावाची फळे कधी मिळतील जेव्हा त्या भावाचे कार्य करणार्या ग्रहांची दशा अंतर्दशा येयील तेव्हाच .हे सर्व आपल्याला समजेल कसे तर ह्यासाठी सोपी पद्धती म्हणजे ग्रहांचे कार्येशत्व काढणे . 

नवीन अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी सरळ एका कागदावर पत्रिकेतील चालू महादशा  कुठली आहे त्याप्रमाणे त्या आणि पुढील दशेचे कार्य करणाऱ्या ग्रहांचे कार्येशत्व काढून घ्यावे म्हणजे हे आपल्या समोर असले कि फलादेश करताना सोपे जायील. कार्येशत्व काढले कि आपल्याला कुठला ग्रह पत्रिकेतील कुठल्या कुठल्या भावांचा कार्येश आहे म्हणजेच तो पत्रिकेतील कुठल्या भावांचे कार्य करणार आहे ते सहज समजते . जसे जातकाचा प्रश्न परदेशगमनाचा आहे. तर सध्या चालू असलेली महादशा  3 9 12 ह्या भावांशी निगडीत आहे का हे पाहावे लागेल . जर असेल तर त्या दशेत त्या जातकाचे परदेशगमन होईल. परदेशी जाऊन शिक्षण घ्यायचे असले तर 9 12 हि स्थाने पहावीच लागतील. व्ययभावात जर चर तत्वाची रास असेल तर जातक परदेशी जायील कारण दशास्वामी त्याला परदेशी नेण्याचे कार्य करत आहे पण व्ययभावातील चर राशी असल्यामुळे तो परदेशात स्थायिक होऊ शकणार नाही . अश्या प्रकारे कार्येशत्व काढले कि आपल्याला जातकाच्या कुठल्याही प्रश्नाचे अत्यंत विस्तृत उत्तर देता येते.  

कार्येशत्व काढले कि एखाद्या घटनेचे पूरक आणि विरोधी भाव आपल्या लक्ष्यात येतात आणि त्याप्रमाणे जातकाच्या प्रश्नांची उकल करता येते . अनेक वेळा जातक एकापेक्षा अधिक प्रश्न विचारतात जे एकमेकांशी सलग्न असूही शकतात जसे परदेशात वास्तव्य होईल का ? जोडीदार परदेशातील वास्तव्य करणारा असेल का ?

आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना घडवण्याचा अधिकार महादशा स्वामीने राखून ठेवला आहे . जर विवाहाचा प्रश्न असेल आणि दशा स्वामी विवाहाला अनुकूल भाव देत नसेल तर ती दशा आपल्याला सोडून पुढील घ्यावी लागते . ह्या सर्व गोष्टी सहज समजण्यासाठी आणि अचूक उत्तरापर्यंत नेण्यासाठी ग्रहांचे कार्येशत्व काढणे अत्यंत आवश्यक असते .

महादशा स्वामी आणि त्याचे अधिकार ह्यावर पुढील लेखात विस्तृत माहिती घेऊया .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


.

 



Wednesday, 15 June 2022

सोशल बटरफ्लाय ( मिथुनेचा शुक्र )

 || श्री स्वामी समर्थ ||


जीवनातील आनंदाचा कारक शुक्र . शुक्र हा स्त्रीग्रह आहे जलतत्व आहे आणि त्याकडे सर्व “ रस “ दिलेले आहेत हे आपल्याला माहीतच आहेत . मुल जन्माला आल्यावर आई त्याला स्तनपान करते हाही एक आनंद आहे. जीवनाच्या विविध टप्प्यांवर अनेक रुपात शुक्र आपल्याला भेटत जातो आणि हा प्रवास सुखकारक आनंददायी करतो. 

पद ,प्रतिष्ठा ,उंची राहणीमान , वैभव , मानसन्मान ह्याची पाखरण करणारा शुक्र म्हणजेच जगणे असल्यामुळे त्यावर खूप काही लिहिण्यासारखे आहे . शुक्राचा अविष्कार नसेल तर आयुष्य निरस होऊन जाईल. एखाद्या गोष्टीत आपण किती समरसून गेलो किंवा जाऊ शकतो ह्याची प्रचीती शुक्रच दाखवू शकतो . निसर्ग कुंडलीत शुक्राला वृषभ आणि तूळ ह्या दोन राशी तसेच द्वितीय व सप्तम स्थानाचे आधिपत्य दिले आहे. द्वितीय स्थान म्हणजे आपले कुटुंबस्थान .सुस्थितीत असणारा शुक्र नात्यातील गोडवा जपतो आणि अनेक रसांची अनुभूतीही देतो. सुग्रास भोजन , अनेक रसांची चव चाखताना पैशाच्या दुनियेतील सफर सुद्धा घडवतो. ऐहिक जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आस्वाद शुक्रच देत असतो . आजकाल कुटुंब व्यवस्था आणि नात्यातील ओलावा कमी होत चालला आहे. शुक्र हा वैवाहिक सुखाचा कारक आहे त्यामुळे आपल्या जोडीदाराबद्दल असणार्या प्रेमभावना , सहजीवनातील माधुर्य हे शुक्र उत्तम असेल तर दीर्घकाळापर्यंत अनुभवता येते . नाहीतर एकत्र असूनही नसल्यासारखेच समाजाला दाखवण्यासाठी पण उदास आणि निरस जीवन जगावे लागते . 

भौतिक जगताप्रमाणे शुक्र पारमार्थिक जगतातील अत्युच्च आनंद म्हणजे सगुणभक्ती चा सुद्धा कारक आहे . स्वतः स्त्रीग्रह आणि जलतत्वाचा कारक शुक्र मीन ह्या मोक्षाच्या राशीत उच्च होताना दिसतो . 

शुक्रप्रधान व्यक्तींचे व्यक्तिमत्व मोहक ,समोरच्याला आकर्षित करणारे असते . अगदी सिंह राशीतील शुक्र सुद्धा मादक असतो . शुक्र हा नवनिर्मितीचा कारक आहे, आधुनिक जगतातील Fashion World शुक्राच्या अधिपत्याखाली आहे . शुक्र प्रभावित व्यक्तींच्या बोलण्यात अत्यंत गोडवा असतो , शुक्र बिघडल्यास हा गोडवा फसवा असू शकतो त्यात काहीतरी अन्त्यस्थ हेतू असू शकतो.  उंची वस्त्रे , अत्तरे , अलंकार , वाहनसुख ,वास्तू ह्या सर्व गोष्टींची लयलूट शुक्र करताना दिसतो. 

शुक्र हा प्रणयाचा ग्रह मानला आहे. सौंदर्य , प्रेम ह्या गोष्टींचे रुपांतर शुक्र पाप ग्रहांनी बिघडला तर वासनेत होऊ शकते . बुधाच्या मिथुन राशीत शुक्र डोळसपणे तपासावा लागतो. मुळात मिथुन हि बुधाची रास आहे. हा बोलघेवडा बुध म्हणजे आपले लहान मुल, राजकुमार आहे. लहान मुलांचे मन अत्यंत चंचल असते , कुठल्याही गोष्टीत त्यांची धरसोड चालूच असते, म्हणूनच ह्या बुधाच्या राशीत अमुक एका गोष्टीसाठी कमिटेड राहणे हे मिथुन राशीच्या शुक्राला जमणे कठीण . एखाद्या गोष्टीत अचानक रस निर्माण होणे आणि तसाच अचानक रस निघून जाणे हा त्यांचा जणू स्थायीभाव आहे . कुठल्याच गोष्टीत सातत्य नाही , त्यामुळे मिथुन राशीतील शुक्र हा वस्त्राप्रमाणे आपले मैत्रीचे संबंध किंवा नातीगोती बदलताना दिसतो मग कारण काहीही असो .

मिथुन हि वायुतत्वाची राशी आहे, वायू कश्यालाही चिकटत नसल्यामुळे एखादे नाते टिकले नाही तरी त्यांना त्याचा विशेष फरक पडत नाही . मिथुन राशीही बुधाची राशी . बुध हा कपटी, सरड्याप्रमाणे रंग बदलणारा ,व्यवहारी आणि संधिसाधू स्वार्थी असल्यामुळे ह्या राशीतील शुक्र अनेक रंगांचे अविष्कार दाखवतो . कुठले नाते कुठल्या वळणावर सुरु होईल आणि संपेल हे त्यानाही माहित नसते .मनाची परिपक्वता नाही.  कुठल्याही नात्याला पूर्णतः न्याय देणार नाहीत त्यामुळे  सप्तमेश शुक्र जर मिथुन राशीत असेल तर त्यांना आपल्या जोडीदारातील रस सुद्धा कालांतराने कमी होऊ शकतो. 

शुक्र हा सगुणभक्तीचा कारक सुद्धा आहे . पण जर हाच शुक्र बिघडला तर प्रबळ कामवासना देतो. 

शुक्र हा कलासक्त आहे त्यामुळे ह्या लोकांना कला , संगीत , नाट्य ,चित्रपट हि माध्यमे आकर्षित करतात .  मिथुन रास हि बुधाची. द्विस्वभावी रास धरसोड वृत्ती . प्रत्येक मैत्रीत धरसोड . मिथुन हि वायुतत्व दर्शवते , वायू म्हणजे संपर्क आणि शुक्र म्हणजे माणसे जोडणारा ,सहवास प्रिय असणारा .ह्या लोकांना फेसबुक सारखी सोशल माध्यमे, भिशीचे ग्रुप , हॉटेलिंग ,पाहुण्यांची सरबराई करणे , सोशल सर्कल मध्ये राहणे खूप आवडते ,ह्या सर्वाचे आयोजन नियोजन सुद्धा ते खूप चांगले करतात , सर्व काही प्रेमाने करतील सर्वांच्यात मिळून मिसळून राहतील पण जसा वायू कश्यालाही चिकटत नाही तसेच कुणाशीही कमिटेड राहणे त्यांना जमत नाही . रोजच्या वस्त्राप्रमाणे नाती आणि मित्र बदलतील . मिथुनेचा शुक्र नाती टिकवू शकत नाही , द्विस्वभावी राशीतील हा शुक्र सतत नात्यातील बदल दाखवतो .शुक्र कलासक्त आहे तसेच बौद्धिक राशीत आहे त्यामुळे एखाद्याच्या प्रचंड बुद्धीच्या तेजावर हे लोक हाबी होऊ शकतात .मिथुनेचा शुक्र कुटुंब स्थानात असल्यास नाती टिकतील पण वरवरची . तृतीयात असेल तर प्रवास होतील ,लिखाणात वैविध्य आढळेल , पंचमेष शुक्र मिथुनेत अगदीच वाईट , सप्तमेश शुक्र मिथुन राशीत नाते दीर्घकाळ टिकवणार नाही , त्यामुळे पत्रीकामिलन करताना ह्या सर्व गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे . दशमेश शुक्र मिथुनेत असेल तर व्यवसायात सतत बदल ,चांचल्य अश्या प्रकारे हा शुक्र अभ्यासावा लागतो. 

मिथुन राशीतील ह्या शुक्राचा अजूनही खूप अभ्यास आहे ,त्यासोबत असणारे ग्रहसुद्धा त्याच्या फलादेशात अनेक चांगले वाईट बदल घडवू शकतात . कुठलाही ग्रह त्याच्या कारकत्वा नुसार फळ देतो त्याचसोबत तो कुठल्या राशीत आहे त्या राशीचे तत्वाचे गुण सुद्धा त्या ग्रहाच्या फळात बदल घडवतात . कुठलाही शुभग्रह पूर्णतः शुभ नाही आणि कुठलाही अशुभ ग्रह सुद्धा पूर्णतः अशुभ नाही. 

संकलन : सौ .अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230







त्यांना हवं तेव्हा आणि त्यांना हवं तस

 || श्री स्वामी समर्थ ||



काहीतरी वेगळे लिहावे वाटले . तुम्ही म्हणाल हे असे काय शीर्षक तर त्याचे असे आहे आयुष्यभर आपण अनेक नाती आणि मैत्रीचे पदर धरून नाचत असतो. अनेकांची मने आपल्या परीने जपण्याचा प्रयत्न करत आपले स्वतःचे जगणेच विसरून गेलेलो असतो हे आपल्या लक्ष्यात सुद्धा येत नाही . 

लहानपणापासून ते अगदी आत्ता ह्या क्षणापर्यंत आपण दुसर्याला काय हवं आणि त्यांना कसं हवं ह्याच विचारात अडकलेले असतो. थोडक्यात दुसर्याच्या तंत्राने नाचत असतो . आपली स्वतःची अशीही मते असायला हवी खरतर . लहानपणी आपल्याला कुठल्या शाळेत घालायचे ते पालक ठरवणार अर्थात तेव्हा त्यांचा निर्णय आपल्या भल्यासाठीच असतो आणि हा निर्णय घेण्याचे आपले परिपक्व वय सुद्धा नसते. पण पुढेही आयुष्यभर जीवनाच्या संपूर्ण प्रवासात सगळे निर्णय दुसराच ठरवत असतो , बघा विचार करा नक्कीच पटेल. आपले मत विचारात घेतले जातेही नाही असे नाही पण होते वेगळेच . जसे सणाला काय गोड पदार्थ करायचा ? मुलांना आणि ह्यांना काय आवडते ते करा , घराला रंग कुठला लावायचा ? रोजच्या जेवणातील मेनू च्या फर्माईश सुद्धा सकाळपासून येत असतात , आई आज हि भाजी नको आज हेच कर आणि तेच कर . फिरायला जायचे कुठे ?बहुतांश मुलेच ठरवतात .

बहुतांश वेळेस समोरचा आपल्याला गृहीत धरतो. अनेक नात्यांमध्ये जगताना हि गोष्ट आपल्याला सहज लक्ष्यात येते . आपण नाती टिकवण्यासाठी आकंठ प्रयत्न करतो , समोरचा दुखावला जाऊ नये म्हणून जीवाचा आटापिटा करतो. आपल्याकडून प्रत्येक जण कसा सुखी होईल हे पाहताना आपण आपले जगणे सुद्धा विसरून जातो. 

पण समोरचा आपल्यासाठी  क्षणभर सुद्धा असा विचार करतो का? घरातील प्रत्येक व्यक्ती आपापले कार्यक्रम स्वतःच ठरवत असते पण आपल्याला कुठे एक दिवस जायचे तरी सगळ्यांची सोय बघून आणि करून जायला लागते.  सगळ आयुष्य आपण दुसर्यांच्या मताने आणि त्यांच्याच मताने घालवत असतो. 

आजकाल WhatsApp चा जमाना आहे . आपल्याला हवे तेव्हा मेसेज करायचे आपल्याला हवे तेव्हा नाही . आपल्याला हवे तेव्हा समोरच्या व्यक्तीला जवळ करायचे आणि मग आपल्याला नको तेव्हा दूर करायचे. समोरच्याच्या भावनांचा काडीचाही विचार नाही . मैत्री सुद्धा आपल्याला हवी तेव्हा आणि हवी तशी . सगळाच एकसुरी कारभार . 

बरेच वेळा आपल्याला स्वतःलाही निर्णय घ्यायचे नसतात म्हणून मग दुसर्याच्या तंत्राने आपण स्वतःच गोष्टी करत असतो.  पण हे फार कमी वेळा. घरात , कार्यालयात सतत कुणीतरी आपल्यावर हुकुम सोडत असतो . एक संपूर्ण दिवस सुद्धा आपण आपल्या मर्जीने जगतो का? तर नाही . 

आपला रिमोट कंट्रोल आपल्याच हाती असायला हवा . मी अभ्यास करीन आणि मला हवा तो शेअर विकत घेयीन , आज माझ्याच आवडीची भाजी होणार , माझा चहा पिऊन झाल्याशिवाय मी कुठल्याच कामाला हात लावणार नाही , तुमचा चहा थंड झाला घ्या तुम्हीच गरम करून , आज माझ्या मैत्रिणी भेटणार आहेत . इतर वेळी खाताना ५० वेळा बाहेर मग आजही खा. आजचा पूर्ण दिवस माझाच आहे. हे आपण खरच करायला पाहिजे. हे सर्व वाचून अनेक पुरुष मंडळी म्हणतील कि आमच्या घरात आमच्या हिची सत्ता चालते ,आम्हाला कोण विचारतय.हाहाहा. गमतीचा भाग सोडला तर सतत कुणाचे तरी वर्चस्व आणि समोरच्याची आपल्याला त्यांच्या तालावर नाचवण्याची वृत्ती . 

कधीतरी ओरडून सांगावेसे वाटते कि मला गृहीत धरणे बंद करा . माझे मला मुक्तपणे जगुद्या , मी निर्णयक्षम आहे आणि माझे निर्णय मला व्यवस्थित घेता येतात तेव्हा हे कर ते कर बंद करा .

मला माझी स्पेस द्या .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


 







 


Saturday, 11 June 2022

ज्योतिषी आणि जातक ह्यांचे सूर जुळणे आवश्यक

|| श्री स्वामी समर्थ ||


हजारो वर्षापासून प्रचलित असणारे हे दैवी शास्त्र समस्त मानवजातीच्या कल्याणासाठीच आहे. हे दैवी शास्त्र आपल्याला भविष्यातील असंख्य चांगल्या वाईट घटनांसाठी “High Alert “ करणारे आहे .त्याचा योग्य तो उपयोग आपल्याला करता आला तर आयुष्य सुख समाधानाची असंख्य शिखरे पादाक्रांत करेल ह्यात शंकाच नाही . आधुनिक जगतात ह्या शास्त्राचा जोमाने प्रसार आणि प्रचार होत आहे तसेच लोकांमध्ये ह्या शास्त्राबद्दल आदर आणि अधिक कुतूहल जागृत होत आहे हि नक्कीच आनंदाची गोष्ट आहे . जगभर ह्या विषयावर संशोधन होत आहे. असो.

आजचा विषय वेगळा आहे. आपण साधे सोपे जीवन जगत असताना मधेच काही संकटे ,अडचणी येतात आणि मनुष्य त्रस्त होतो . त्याला मार्ग मिळत नाही अश्या वेळी एखाद्या उत्तम ज्योतिषाचा सल्ला घ्यावा ह्या विचाराने तो ह्या शास्त्राच्या अभ्यासकाकडे वळतो. एखाद्याची पत्रिका बघून त्यावर भाष्य करणे हि खचितच सोपी गोष्ट नाही आणि ते उत्तम रीतीने करता यावे ह्यासाठी ज्योतिषाला सुद्धा साधना करावी लागते त्यावर सुद्धा गुरुकृपा असणे आवश्यक असते. अनेकदा त्याने केलेली ज्योतिषीय भाकिते त्याच्या साधनेचे फळ असते आणि ती खरी होताना आपण बघतो . 

ज्योतिषाकडे कधी आणि कश्यासाठी जायचे हे समजले पाहिजे . उठसुठ ज्योतिष बघायला येणार्या जातकांना ज्योतिषाने बाहेरचा रस्ता दाखवावा . समस्या निर्माण झाल्याशिवाय जातकाचा प्रश्न बघूच नये हा प्राथमिक नियम सर्वांनी तंतोतंत पाळलाच पाहिजे . २ वर्ष स्थळे पाहूनही विवाह जमत नसेल आणि अश्यावेळी ज्योतिषीय सल्ला घेतला तर ते योग्य आहे पण 10 वी मधल्या मुलाचे शिक्षण चालू असताना त्याचा विवाहाचा प्रश्न पाहणे हा फाजीलपणा आहे आणि अश्या प्रकारचे प्रश्न ज्योतिषाला विचारणे म्हणजे ह्या बहुमुल्य शास्त्राचा अपमान आहे . 

 

आजकाल प्रत्येकालाच अमेरिका युरोप खुणावत आहे म्हणून कुठल्याही वेळी आपली मुले परदेशी जातील का हा प्रश्न  विचारणे हेही चूक म्हणूनच वरती लिहिल्या प्रमाणे समस्या निर्माण झाल्याशिवाय प्रश्न विचारू नये . त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आधी स्वतःही प्रयत्न करायला लागतात .


आजारपणाचा प्रश्न जातकाने विचारला तर स्थळ काळाचे बंधन न ठेवता ज्योतिषाने त्याला मार्गदर्शन करावे . आधी gpay करा हा नियम तेव्हा लागू होत नाही. कित्येक लोक आजारपणाच्या समस्यांचे मानधन घेत नाहीत . असो घ्यायचेच असेल तर नंतर घ्यावे कारण प्रश्न विचारणाऱ्या जातकाची मनस्थिती तेव्हा ठीक नसते . अहो आपले पैसे कुणीही बुडवणार नाही .

दुसरे काहीच नाही म्हणून ज्योतिष अशीही काहींची धारणा असते. बघुया तर काय सांगतात अशीही मनोवृत्ती असते.  दर दोन दिवसांनी नवनवीन ज्योतिषांकडे जाऊन पत्रिका दाखवण्याचा चाळा सुद्धा अनेकांना असतो. वेळ जात नाही म्हणून ज्योतिष किंवा दुसरे काहीच करण्यासारखे नाही म्हणून ज्योतिष . असो.

ज्योतिष शास्त्राला सुद्धा मर्यादा आहेत पण योग्य वेळी अत्यंत कळकळीने प्रश्न विचारला तर हे दैवी शास्त्र मदत करतेच करते हा आजवरचा अनुभव आहे. प्रश्न पाहण्यासाठी जातकाची जितकी तळमळ असणे आवश्यक आहे तितकीच प्रश्न पाहणार्याची सुद्धा असायला हवी . 

आपली पत्रिका म्हणजे आपले उभे आयुष्य . पत्रिकेतील 12 भाव , राशी ,नक्षत्रे आपल्या आयुष्यावर ,आपला स्वभाव , आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण , शिक्षण , नोकरी व्यवसाय , नातीगोती ,मित्र , भावभावना अश्या अनेक पेहलूनवरती प्रकाश टाकत असतात . पत्रिका हि पवित्र आहे ,तो जीवनाचा स्त्रोत आहे .पत्रिका म्हणजे खिरापत नाही इथे तिथे वाटत सुटायला. हा गंभीरतेने घ्यायचाच विषय आहे हे पक्के लक्ष्यात ठेवले पाहिजे . आपल्याकडे येणारा जातक सहज बोलून जातो कि अनेकांना पत्रिका दाखवली आहे . हो ना? मग आता माझ्याकडे येण्याचे कारण ? तर त्यांच्या उत्तरांनी न झालेले समाधान किंवा त्यांना ह्या शास्त्राने न दिलेली अनुभूती हेच असू शकेल. हे शास्त्र अनुभूती देणारे आहे पण सांगणारा तितकाच माहीर पाहिजे , ह्या शास्त्राचा खरा अभ्यासक उपासक पाहिजे तरच उत्तर योग्य येणार . 


मुळातच आपण कुणाला पत्रिका दाखवायची हा जरी जातकाचा वैयक्तिक प्रश्न असला तरी ती दाखवताना ज्योतिषाबद्दल थोडीफार माहिती असावी . तसेच मुख्य म्हणजे ह्या विषयावर श्रद्धा हवी. आजकाल २ पुस्तके वाचूनही ज्योतिष होणारे लोक आहेत मग अश्यांची भाकीचे चुकतात आणि मग लोकांचाही ह्या शास्त्रावरचा विश्वास उडतो पर्यायाने ह्या दैवी शास्त्राची टिंगल सुद्धा होते . त्यामुळे आपण पूर्णपणे पत्रिका पाहण्यासाठी सक्षम झालो आहोत का हा विश्वास असेल तरच पत्रिका बघावी अन्यथा नाही तसेच आपण कुणाला पत्रिका दाखवायची आहे आणि नेमकी कश्यासाठी ह्याचाही अभ्यास जातकाने करावा.  एखाद्या ज्योतिषाने आपल्याला काही उपाय सुचवला तर तो मनापासून करावा . जर ज्योतिषी उत्तम साधक असेल तर त्याने सांगितलेल्या उपायामुळे तुमचा प्रश्न निश्चित सुटेल . 

प्रश्नकर्त्याला प्रश्नाचे गांभीर्य आणि वेळेचे भान असायला हवे . कुठल्याही गोष्टीसाठी आधी कर्म करायला लागते मगच फळ मिळते त्यामुळे आधी त्याचेहि  प्रयत्न असले पाहिजेत . जसे अनेक ठिकाणी अर्ज करूनही नोकरी मिळत नसेल तर तदपश्च्यात नोकरी कधी मिळणार हा प्रश्न विचारणे उचित ठरेल. प्रत्येक वेळी समोरून उत्तर आपल्या मनासारखेच येयील असे नाही . ज्योतिषी हा काही जादूची कांडी घेवून बसलेला नाही . तो तुमच्या प्रारब्धात आहे तेच कथन करणार आहे. अनेकदा मनासारखे उत्तर नाही आले कि ज्योतिषाला नावे ठेवली जातात हेही बरोबर नाही. 


आजकाल पारंपारिक पद्धती , कृष्णमुर्ती पद्धती ह्या दोन्ही पद्धती ज्योतिषी वापरत असल्यामुळे प्रश्न कुठल्या पद्धतीने बघणार असाही प्रश्न जातक विचारतात . समस्येपेक्षा हे इतर प्रश्न ज्याला तसाही फारसा अर्थ नाही तेच अधिक असतात . खर बघता ज्याला एखादी समस्या आहे त्याला इतर गोष्टी सुचणार सुद्धा नाहीत . असो कधी कधी कुतूहल असते म्हणूनही विचारत असावेत असे म्हणून सोडून देवूया .

ज्योतिषाला सुद्धा बोलण्याची कला अवगत असायला हवी तरच तो योग्य प्रश्न विचारून आपल्याला हवी असलेली माहिती जाताका कडून मिळवून घेवू शकतो . उदा. बरेच वेळा एखाद्या पत्रिकेत पितृदोष असेल तर आधीच्या पिढ्यांमध्ये घडलेल्या काही घटनांचा संदर्भ समजला तर आपण काढलेल्या तर्कांवर शिक्कामोर्तब होईल . हे प्रश्न जातकांना विचारले असता त्यांनी बरोबर उत्तरे देवून सहकार्य केले तर दोघांचे सूर जुळतील. 

ज्योतिषाने ज्योतिष मार्गदर्शन करताना जातकाचे आपल्या उत्तराने समाधान झाले आहे कि नाही हेही पाहावे. अनेक जण ज्योतिषाकडे आपले मन मोकळे करतात त्यांच्या समस्यांचे गांभीर्य कथन करताना त्यानाही काही वेळ लागतोच तो त्यांना अवश्य द्यायला हवा . अनेकदा २ वाक्ये बोलून फोन ठेवुन देणे किंवा समर्पक उत्तरे न देणे हे योग्य नाही . तसेच ह्याउलट अनेक वेळा जातक सुद्धा अघळपघळ बोलत राहतात हेही योग्य नाही. थोडक्यात काय तर जातकाची जातकुळी ज्योतिषाला समजणे आणि दोघांच्यात सुसंवाद निर्माण होणे गरजेचे आहे. 

मुळात उठसुठ प्रश्न विचारायला ज्योतिषाकडे जावूच नये. माणसाने प्रयत्नवादी सुद्धा असले पाहिजे . आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी आणि त्याउपर ह्या शास्त्राचा आधार घ्यावा असे माझे मत आहे.  आजकाल इंस्टट चा जमाना असल्यामुळे जातकाचा धीर  कश्याशी खातात ते माहित नसते तसेच आपण ज्योतिषाचे मानधन देतो आहोत म्हणजे त्याला जणू विकतच घेतले आहे किंवा त्यावर खूप उपकार करत आहोत अश्याच भावनेने काहीजण प्रश्न विचारात असतात . ज्योतिषी आणि हे शास्त्र ह्या दोघांचाही मान ठेवला पाहिजे . कारण आपल्याला जे दिसत नाही आहे ते ह्या शास्त्राच्या अभ्यासाच्या मदतीने ज्योतिषी आपल्याला कथन करणार असतो. 

एकदा संपूर्ण समुपदेशन झाले कि त्याउपर दर दोन दिवसांनी ज्योतिषाला उगीच काहीतरी विचारत बसू नये . त्यांनी तुम्हाला पूर्ण वेळ दिलंय त्यात काय विचारायचे ते विचारा पुन्हापुन्हा काय होणार उत्तर एका रात्रीत थोडेच बदलणार आहे . ज्याचा प्रश्न आहे त्याच जातकाने प्रश्न विचारावा हे सर्वार्थाने योग्य . अनेकदा जातक whatsapp वरती स्वतःचे नाव सुद्धा न लिहिता अमुकामुक माणसाच्या पत्रिकेचे फोटो सरळ पाठवतात . किती अयोग्य आहे हे इतके साधेही समजू नये . आधी ज्योतिषाला फोन करून चर्चा करावी , त्याचे रीतसर मानधन विचारावे आणि मग ते पाठवूनच पत्रिकेचे डिटेल पाठवावे. हा राजमार्ग उत्तम . 

ज्योतिषी आणि जातक ह्यांचे सूर जुळले पाहिजेत . ज्योतिषी आपल्याला जे सांगतोय ते आपल्याच भल्यासाठी त्याच्या पदरचे काहीच सांगत नाही आणि जे सांगत आहे ते सत्य कथन करत आहे ह्यावर विश्वास असला पाहिजे . विश्वास हि सगळ्यात मोठी गोष्ट आहे . तो अभेद्य असलाच पाहिजे . 

ज्योतिषाने किती मानधन घ्यायचे तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे . आपल्याला पटले तर द्यावे आणि मोकळे व्हावे . ज्योतिषाने सुद्धा ते आधीच घ्यावे आणि मग भविष्य कथन करावे (कलियुग – नंतर नाही दिले तर मग बोलणार कुणाला ) . ज्योतिषाचे मानधन चुकवणे किंवा न देणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचाच अपमान आहे हे लक्ष्यात ठेवा. ज्योतिषाचे मानधन हा त्याचा हक्क आहे , ज्योतिषाच्या ज्ञानाची आणि वेळेची ती किंमत आहे . त्याचा आणि ह्या शास्त्राचाही मान ठेवायला आपण शिकले पाहिजे.


अजूनही लिहिण्यासारखे खूप आहे पण किती लिहायचे आणि कायकाय त्यामुळे तूर्तास इथेच लेखणीस विराम देत आहे. सुद्न्य जातक ह्यावर नक्कीच विचार करतील अशी अपेक्षा आहे. मी तर म्हणते ह्या शास्त्राचा प्रत्येकाने अभ्यास करा .आयुष्य आनंदी होईल , पुढील खाचखळगे कळतील आणि आयुष्य मार्गस्थ होईल . आपण ह्या शास्त्राचा सन्मान करायला शिकले पाहिजे तरच हे ग्रहतारेहि आपला मान ठेवतील...कारण ते आपल्याला खूप काही द्यायला आलेले आहेत आपल्याला घेता आले पाहिजे . ग्रहांशी हितगुज साधता आले पाहिजे .

आपल्यासारखे वाचक आहेत म्हणून ह्या लेखणीस आणि ह्या शब्दांना अर्थ आहे. 

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230







 








 

Friday, 3 June 2022

मनाचे चक्षु

 || श्रीस्वामी समर्थ ||


आज कामानिमित्त प्रवास करत होते . मधेच एका स्टेशन वर ट्रेन थांबली .सहज समोर लक्ष्य गेले .

10-15 दृष्टीहीन लोक एकमेकांचा हात धरून चालले होते . एकमेकांची थट्टामस्करी करत होते ,बोलत होते बोलता बोलता हसतही होते . माझी ट्रेन पुढे निघून गेली पण हा प्रसंग मला खूप काही शिकवून गेला. माझे मन त्यांच्यापाशीच रेंगाळत राहिले .जग किती सुंदर आहे पण काही जीवांना ते बघण्याचे वरदान देवाने दिलेले नाही . अंधत्व हि आपल्यातील एक उणीव आहे जी आयुष्यभर दुक्ख देणारी आहे , त्रासदायक आहे. क्षणाक्षणाला परावलंबी करणारी आहे . 

विधात्याने निर्माण केलेली सृष्टी , आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती , वस्तू काहीच आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकत नाही ,दुसर्याच्या डोळ्याने आयुष्यभर हे सर्व पाहायचे , अनुभवायचे हि भावना सुद्धा किती वेदना देणारी आहे. त्या लोकांकडे पाहताना ह्या सर्व विचारांचे काहूर मनात उठले पण त्याच क्षणी त्यांना हसताना बागडताना पाहून मन हेलावून गेले . त्याही परिस्थितीवर मात करून ते स्वतःला जगवत होते ,आनंदाचा आस्वाद घेत होते . काही सेकंदात मी खूप काही शिकले . प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यातील कुठलातरी कोपरा अपूर्ण आहे . म्हणूनच म्हंटले आहे जगीसर्व सुखी असा कोण आहे . आपल्या शरीराचा एखादा भाग दुखावतो तेव्हा आपल्याला त्याचे महत्व समजते . आपण पाहू शकत नाही हि गोष्ट स्वीकारणे सोपे नाही आणि ते स्वीकारून पचवून आयुष्य पुढे नेत राहणे हे म्हणजे रोज परीक्षेला बसण्यासारखे आहे . आपण कधी विचार करतो का कि ह्या लोकांना किती समस्या येत असतील. 

शरीराचे सर्व अवयव धडधाकट असणे हीच खरी श्रीमंती आहे . ज्यांना दिसत नाही , ऐकू येत नाही किंवा अन्य काही आजार असतील त्यांनी मग काय करायचे ? आपण ह्यातून काहीतरी शिकायलाच हवे. लहान सहान गोष्टी मिळाल्या नाही कि आपला पापड मोडतो , आपण निराश होतो आणि कधीकधी देवावर पण रुसतो , काय माझे आयुष्य म्हणून अगदी आपल्या जगण्याचा आत्मविश्वास सुद्धा घालवून बसतो. खरतर इतकं सुंदर आयुष्य जगण्याची , अनुभवण्याची संधी दिल्याबद्दल प्रत्येक क्षणी आपण देवाचे आभार मानले पाहिजेत. आपण आपल्या कोशातून बाहेर यायला हवे .जगात किती लोकांना किती दुख आहे हे पहिले कि आपले आयुष्य किती सुखकर आहे त्याची जाणीव होते . 

अनेक अपंग लोक सुद्धा त्यांच्या व्यंगावर मात करून धीराने आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी धडपडत राहतात हे पाहून उर भरून येतो . आयुष्याची शाळा आपल्याला खूप काही शिकवत आहे .

ट्रेन पुढे गेली आणि विचारांना वेग आला . एखादा अवयव नसताना जीवनाची लढाई लढणाऱ्या ह्या लोकांकडे पहिले कि आपल्या खुज्या विचारांची कीव करावीशी वाटते . आज काही क्षण ह्या लोकांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य आणि आनंद पाहिला आणि नकळत माझ्याही चेहऱ्यावर हसू आले. जीवनाची लढाई हरून सुद्धा ते जिंकले होते हाच मोठा धडा मी आज त्यांच्यासोबत गिरवला.


मनाचे चक्षु करून ते जीवनाचे गीत गात होते ,समरसून जाण्याचा प्रयत्न करत होते . अंधारलेल्या जगतात सुखाचा किरण शोधत होते , निराशा मरगळ झटकून नवसंजीवनी जागृत करत होते . देवाने सगळ्यांना सगळ्या गोष्टी दिल्या नाहीत पण जे दिलंय त्याची जाणीव असणे ,त्याची किंमत ठेवणे आणि त्यासाठी प्रत्येक क्षणी त्यासाठी कृतद्न्य राहणे हे आपल्या हातात नक्कीच आहे. आजचा प्रसंग अगदी लहानसा पण जीवनाचे विदारक सत्य कथन करणारा होता . आज मी खर्या अर्थाने जीवनाचे गीत गाताना ,जीवनाचा सोहळा झालेला पहिला.

माझा अनुभव तुमच्याशी शेअर करण्यासाठी हा लेखन प्रपंच.

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230