Wednesday, 15 June 2022

सोशल बटरफ्लाय ( मिथुनेचा शुक्र )

 || श्री स्वामी समर्थ ||


जीवनातील आनंदाचा कारक शुक्र . शुक्र हा स्त्रीग्रह आहे जलतत्व आहे आणि त्याकडे सर्व “ रस “ दिलेले आहेत हे आपल्याला माहीतच आहेत . मुल जन्माला आल्यावर आई त्याला स्तनपान करते हाही एक आनंद आहे. जीवनाच्या विविध टप्प्यांवर अनेक रुपात शुक्र आपल्याला भेटत जातो आणि हा प्रवास सुखकारक आनंददायी करतो. 

पद ,प्रतिष्ठा ,उंची राहणीमान , वैभव , मानसन्मान ह्याची पाखरण करणारा शुक्र म्हणजेच जगणे असल्यामुळे त्यावर खूप काही लिहिण्यासारखे आहे . शुक्राचा अविष्कार नसेल तर आयुष्य निरस होऊन जाईल. एखाद्या गोष्टीत आपण किती समरसून गेलो किंवा जाऊ शकतो ह्याची प्रचीती शुक्रच दाखवू शकतो . निसर्ग कुंडलीत शुक्राला वृषभ आणि तूळ ह्या दोन राशी तसेच द्वितीय व सप्तम स्थानाचे आधिपत्य दिले आहे. द्वितीय स्थान म्हणजे आपले कुटुंबस्थान .सुस्थितीत असणारा शुक्र नात्यातील गोडवा जपतो आणि अनेक रसांची अनुभूतीही देतो. सुग्रास भोजन , अनेक रसांची चव चाखताना पैशाच्या दुनियेतील सफर सुद्धा घडवतो. ऐहिक जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आस्वाद शुक्रच देत असतो . आजकाल कुटुंब व्यवस्था आणि नात्यातील ओलावा कमी होत चालला आहे. शुक्र हा वैवाहिक सुखाचा कारक आहे त्यामुळे आपल्या जोडीदाराबद्दल असणार्या प्रेमभावना , सहजीवनातील माधुर्य हे शुक्र उत्तम असेल तर दीर्घकाळापर्यंत अनुभवता येते . नाहीतर एकत्र असूनही नसल्यासारखेच समाजाला दाखवण्यासाठी पण उदास आणि निरस जीवन जगावे लागते . 

भौतिक जगताप्रमाणे शुक्र पारमार्थिक जगतातील अत्युच्च आनंद म्हणजे सगुणभक्ती चा सुद्धा कारक आहे . स्वतः स्त्रीग्रह आणि जलतत्वाचा कारक शुक्र मीन ह्या मोक्षाच्या राशीत उच्च होताना दिसतो . 

शुक्रप्रधान व्यक्तींचे व्यक्तिमत्व मोहक ,समोरच्याला आकर्षित करणारे असते . अगदी सिंह राशीतील शुक्र सुद्धा मादक असतो . शुक्र हा नवनिर्मितीचा कारक आहे, आधुनिक जगतातील Fashion World शुक्राच्या अधिपत्याखाली आहे . शुक्र प्रभावित व्यक्तींच्या बोलण्यात अत्यंत गोडवा असतो , शुक्र बिघडल्यास हा गोडवा फसवा असू शकतो त्यात काहीतरी अन्त्यस्थ हेतू असू शकतो.  उंची वस्त्रे , अत्तरे , अलंकार , वाहनसुख ,वास्तू ह्या सर्व गोष्टींची लयलूट शुक्र करताना दिसतो. 

शुक्र हा प्रणयाचा ग्रह मानला आहे. सौंदर्य , प्रेम ह्या गोष्टींचे रुपांतर शुक्र पाप ग्रहांनी बिघडला तर वासनेत होऊ शकते . बुधाच्या मिथुन राशीत शुक्र डोळसपणे तपासावा लागतो. मुळात मिथुन हि बुधाची रास आहे. हा बोलघेवडा बुध म्हणजे आपले लहान मुल, राजकुमार आहे. लहान मुलांचे मन अत्यंत चंचल असते , कुठल्याही गोष्टीत त्यांची धरसोड चालूच असते, म्हणूनच ह्या बुधाच्या राशीत अमुक एका गोष्टीसाठी कमिटेड राहणे हे मिथुन राशीच्या शुक्राला जमणे कठीण . एखाद्या गोष्टीत अचानक रस निर्माण होणे आणि तसाच अचानक रस निघून जाणे हा त्यांचा जणू स्थायीभाव आहे . कुठल्याच गोष्टीत सातत्य नाही , त्यामुळे मिथुन राशीतील शुक्र हा वस्त्राप्रमाणे आपले मैत्रीचे संबंध किंवा नातीगोती बदलताना दिसतो मग कारण काहीही असो .

मिथुन हि वायुतत्वाची राशी आहे, वायू कश्यालाही चिकटत नसल्यामुळे एखादे नाते टिकले नाही तरी त्यांना त्याचा विशेष फरक पडत नाही . मिथुन राशीही बुधाची राशी . बुध हा कपटी, सरड्याप्रमाणे रंग बदलणारा ,व्यवहारी आणि संधिसाधू स्वार्थी असल्यामुळे ह्या राशीतील शुक्र अनेक रंगांचे अविष्कार दाखवतो . कुठले नाते कुठल्या वळणावर सुरु होईल आणि संपेल हे त्यानाही माहित नसते .मनाची परिपक्वता नाही.  कुठल्याही नात्याला पूर्णतः न्याय देणार नाहीत त्यामुळे  सप्तमेश शुक्र जर मिथुन राशीत असेल तर त्यांना आपल्या जोडीदारातील रस सुद्धा कालांतराने कमी होऊ शकतो. 

शुक्र हा सगुणभक्तीचा कारक सुद्धा आहे . पण जर हाच शुक्र बिघडला तर प्रबळ कामवासना देतो. 

शुक्र हा कलासक्त आहे त्यामुळे ह्या लोकांना कला , संगीत , नाट्य ,चित्रपट हि माध्यमे आकर्षित करतात .  मिथुन रास हि बुधाची. द्विस्वभावी रास धरसोड वृत्ती . प्रत्येक मैत्रीत धरसोड . मिथुन हि वायुतत्व दर्शवते , वायू म्हणजे संपर्क आणि शुक्र म्हणजे माणसे जोडणारा ,सहवास प्रिय असणारा .ह्या लोकांना फेसबुक सारखी सोशल माध्यमे, भिशीचे ग्रुप , हॉटेलिंग ,पाहुण्यांची सरबराई करणे , सोशल सर्कल मध्ये राहणे खूप आवडते ,ह्या सर्वाचे आयोजन नियोजन सुद्धा ते खूप चांगले करतात , सर्व काही प्रेमाने करतील सर्वांच्यात मिळून मिसळून राहतील पण जसा वायू कश्यालाही चिकटत नाही तसेच कुणाशीही कमिटेड राहणे त्यांना जमत नाही . रोजच्या वस्त्राप्रमाणे नाती आणि मित्र बदलतील . मिथुनेचा शुक्र नाती टिकवू शकत नाही , द्विस्वभावी राशीतील हा शुक्र सतत नात्यातील बदल दाखवतो .शुक्र कलासक्त आहे तसेच बौद्धिक राशीत आहे त्यामुळे एखाद्याच्या प्रचंड बुद्धीच्या तेजावर हे लोक हाबी होऊ शकतात .मिथुनेचा शुक्र कुटुंब स्थानात असल्यास नाती टिकतील पण वरवरची . तृतीयात असेल तर प्रवास होतील ,लिखाणात वैविध्य आढळेल , पंचमेष शुक्र मिथुनेत अगदीच वाईट , सप्तमेश शुक्र मिथुन राशीत नाते दीर्घकाळ टिकवणार नाही , त्यामुळे पत्रीकामिलन करताना ह्या सर्व गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे . दशमेश शुक्र मिथुनेत असेल तर व्यवसायात सतत बदल ,चांचल्य अश्या प्रकारे हा शुक्र अभ्यासावा लागतो. 

मिथुन राशीतील ह्या शुक्राचा अजूनही खूप अभ्यास आहे ,त्यासोबत असणारे ग्रहसुद्धा त्याच्या फलादेशात अनेक चांगले वाईट बदल घडवू शकतात . कुठलाही ग्रह त्याच्या कारकत्वा नुसार फळ देतो त्याचसोबत तो कुठल्या राशीत आहे त्या राशीचे तत्वाचे गुण सुद्धा त्या ग्रहाच्या फळात बदल घडवतात . कुठलाही शुभग्रह पूर्णतः शुभ नाही आणि कुठलाही अशुभ ग्रह सुद्धा पूर्णतः अशुभ नाही. 

संकलन : सौ .अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230







No comments:

Post a Comment