Friday, 24 June 2022

महादशा इष्ट कि अनिष्ट

 || श्री स्वामी समर्थ ||


आपल्या पत्रिकेत भाव ,राशी ,ग्रह आणि नक्षत्र कार्यरत असतात .पण सगळे एकाच वेळी कार्य करतील का ? तर नाही . प्रत्येक ग्रहाला काम करण्याची संधी मिळते ती त्याच्या महादशेत . म्हणजेच महादशा हा प्रत्येक ग्रहाला प्रदान केलेला आपल्या आयुष्यातील ठराविक कालखंड असतो आणि त्या काळात तो आपली फळे प्रकर्षाने देत असतो .ह्याविषयी आज थोडे जाणून घेवूया .

बघा पत्रिकेतील कुठलाही ग्रह हा संपूर्ण शुभ किंवा अशुभ नसतो तसाच भाव आणि नक्षत्र सुद्धा . एक व्यक्ती जशी अनेक नात्यातून जगताना दिसते जसे मी कुणाचीतरी पत्नी आहे पण त्याचवेळी आई , सून , मैत्रीण , मावशी  म्हणून सुद्धा नाती निभावत आहे. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक भाव हा फिरता आहे अनेक रंगात न्हाऊन निघणारा आहे . जसे व्यय भाव हा investment चा आहे मग ती भावनिक आणि आर्थिक दोन्ही आहे, तिथे बंधन योग सांगितलेला आहे . व्यय भावात परदेशगमन , तुरुंगवास , दवाखाना सगळच आहे मग नक्की कुठल्या ठिकाणी तो बांधला जायील हे पत्रिकेतील ग्रहस्थिती आणि जातकाचा प्रश्न सांगेल . 

मला परदेशी जायची ऑफर एका कंपनीने दिली आहे तर माझे परदेशी जाणे होईल का ?? असा प्रश्न विचारला आणि त्याला व्यय भावाशी संबंधील महादशा असेल तर तो नक्कीच प्रयाण करेल असे सांगता येयील . पण एखाद्यावर मोठा गुन्हा दाखल झाला आहे आणि त्याच्याही पत्रिकेत व्यय भाव कार्यान्वित झाला असेल तर त्याची तुरुंगात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे सांगता येयील. प्रश्न काय आहे त्यावर आपले उत्तर आहे. परदेशी जाऊ का? ह्या प्रश्नावर आपण तू नक्कीच आतमध्ये हवा खायला जाशील असे सांगितले तर तो बिचारा चक्कर येऊन खालीच पडेल त्यामुळे ज्योतिषाने तारतम्य बाळगून उत्तर दिले पाहिजे. हे झाले प्रत्येक भावाबद्दल.

तेव्हा महादशा म्हणजे प्रत्येक ग्रहाला त्याचे कार्य करायला दिलेला काळ. माणसाचे आयुष्य १२० वर्षांचे गृहीत धरले आहे. आपल्याला ज्ञात असणार्या नवग्रहांच्या दशा एकामागून एक ठरलेल्या क्रमाने येत असतात . हर्शल नेप आणि प्लुटो ह्या ग्रहांना महादशा नाहीत . 

आपली जन्मस्थ महादशा कुठली हे ठरवण्यासाठी आपला जन्म कुठल्या नक्षत्रावर झाला आहे ते बघावे . चंद्र ज्या नक्षत्रात असेल त्या नक्षत्राच्या स्वामीची दशा जन्मस्थ दशा असते. जसे एखाद्याचा जन्म जर पूर्वाफाल्गुनी ह्या शुक्राच्या नक्षत्रावर झाला असेल तर जन्मतः त्याला शुक्राची दशा असते . शुक्र महादशेला 20  वर्षाचा काळ दिलेला आहे म्हणजे 20 वर्ष ह्या जातकाच्या आयुष्याचा सुकाणू शुक्राकडे असणार आहे . पत्रिकेत ह्या शुक्राची जशी स्थिती असणार आहे त्यावर त्याची दशा फळे असणार आहेत .त्यांनतर येणारी केतूची दशा पत्रिकेतील केतूच्या स्थितीप्रमाणे फळे देयील. पुढील सर्व दशा अश्याच क्रमाने येत राहतील.

शुक्र हा ऐहिक सुखाचा भोगविलासाचा कारक असल्यामुळे ह्या जातकाला शुक्र सुस्थितीत असेल तर सर्व भौतिक सुखे , वाहन घर पैसा संपत्ती सुंदर पत्नी संसार सुख परदेशगमन अश्या आनंद देणाऱ्या सर्व सुखांची प्राप्ती होईल पण शुक्र बिघडला असेल तर ह्या सुखांपासून जातक वंचित राहील. मग संपूर्ण महादशा वाईट जायील का तर नाही . ह्या महादशेत अंतर्दशा आणि विदशा सुद्धा येतात त्या कुठल्या ग्रहांच्या त्यांचा क्रम सुद्धा महादशे प्रमाणेच असतो. त्या त्या ग्रहांच्या अंतर्दशा विदशा सुद्धा त्यांचे पत्रिकेतील बलाबल पाहून कश्या जाणार ते सांगता येते .

एखाद्या स्त्रीला संतती कुठल्या महादशेत होईल हे सांगता येईल पण संतती नेमकी कधी होईल हे पाहण्यासाठी अंतर्दशा आणि विदशा पाहाव्या लागतील. आयुष्यातील कुठलीही घटना मग ती नोकरी मिळणे , विवाह ठरणे आणि संपन्न होणे ,परदेशगमन , आजारपण , संतती ,शिक्षण उच्च शिक्षण , कुठल्या कालावधीत घडणार हे निदर्शित करणारी महादशा असते. थोडक्यात महादशा स्वामी त्या काळापुरता आपल्या आयुष्यावर अधिराज्य करत असतो .

आता हि महादशा कश्या प्रकारे कार्य करणार ह्या साठी त्या ग्रहाचे कार्येशत्व काढणे आवश्यक आहे आणि त्यासंबंधी विचार आपण मागील लेखात केलाच आहे . कुठलाही भाव ग्रह आणि नक्षत्र वाईट नसतेच ते काहीतरी देणारच असते . आपला एक पूर्ण दिवस सुद्धा पूर्ण चांगला किंवा वाईट जात नाही अगदी तसेच ग्रहांचे सुद्धा आहे. महादशा स्वामींचा क्रम ठरलेला आहे. प्रत्येक ग्रहाचे कार्य आपल्याला माहित आहेच जसे रवी हा सरकारी नोकरी , आरोग्याचा कारक आहे ,व्यवस्थापन म्हणजे MBA चा सुद्धा कारक आहे . जर रवी षष्ठ स्थानात असेल, स्वनक्षत्री असेल तर जेव्हा रवीची दशा येयील तेव्हा नोकरी लागेल आणि प्रगती सुद्धा होईल. MBA चे शिक्षण पूर्ण होईल, स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल.  पण षष्ठ स्थान हे सप्तम स्थानाचे व्यय स्थान असल्यामुळे हि दशा विवाहासाठी पूरक असणार नाही. एखादी महादशा जर तृतीय स्थानाशी निगडीत असेल तर त्या दशेत चतुर्थ स्थानाने दर्शवलेल्या गोष्टी जसे वास्तू विकत घेणे होणार नाही पण वास्तू विकण्याचा योग येयील.

अश्या प्रकारे ज्या ग्रहाची दशा आहे तो कुठल्या भावाचे कार्य करत आहे त्याप्रमाणे फळ मिळेल. एखाद्या ग्रहाच्या अंशात्मक युतीत असणारा ग्रह सुद्धा त्या दशेत फळ देतो. राहू केतूची दशा असेल तर राहू ज्या भावाचा कार्येश आहे त्याच्या स्वामीप्रमाणे  फळे देयील तसेच राहूच्या युतीत असणारे ग्रह ,राहू ज्या नक्षत्रात आहे त्याच्या नक्षत्रातील ग्रहांनी दर्शवलेली स्थाने तसेच राहूवर दृष्टी टाकणारे ग्रह ह्या सर्वांचा विचार केला पाहिजे. 

लग्नाला कुठले इष्ट अनिष्ट ग्रह आहेत त्याचाही विचार व्हावा जसे वृषभ लग्नाला गुरु ,धनु लग्नाला शुक्र , मीन लग्नाला बुध फळे देणार नाही करा हे ग्रह लग्नेशाचे मित्र नाहीत . पण ह्या ग्रहांच्या अंतर्दशा स्वामी जे 

लग्नेशाचे मित्र आहेत ते त्यांच्या अंतर दशातून शुभ फळे प्रदान करतील. 6 8 12 मधील ग्रहांच्या किंवा त्यांच्या स्वामींच्या दशा सुद्धा वाईट जातील असे नाही. षष्ठ स्थान असेल तर आजारपण येयील कर्ज मिळेल , नोकरी मिळेल . अष्टम स्थान असेल तर मृत्युसम पीडा होईल पण वारसाहक्काने संपत्ती मिळेल. व्यय भाव असेल आणि एखादा पेशंट कोमात असेल तर लाभ भाव लागता तो कोमातून बाहेर येयील .

राहूची दशा हि सर्वच लग्नांना त्रासदायक जाते . पुन्हा राहूची पत्रिकेतील स्थिती बघणे हे आलेच . बुधाच्या दशेत एकदा तरी कोर्टाची पायरी चढायला लागते हा अनुभव अनेकांना आला आहे मग कारण काहीही असो.  प्रत्येक ग्रहाचे एक विशिष्ठ कारकत्व आहे . शुक्रासारखा सर्व प्लेजर प्रदान करणार्या ग्रहाची दशा ऐन तारुण्यात आली तर उत्तम पत्नी , संसार ,प्रवास ,संतती वास्तू सर्व सुखे मिळतील पण हीच दशा वयाच्या ७० व्या वर्षी आली तर थकलेले शरीर असे कितीसे उपभोग घेयील. शिक्षणाचे वय असताना 4 9 ची दशा आली तर उत्तम शिक्षण होईल पण ह्या दशा नोकरीसाठी चांगल्या नाहीत . थोडक्यात योग्य वेळी योग्य दशा आल्या पाहिजेत . चुकीच्या दशा आल्या तर आयुष्याची दशा दशा होईल. म्हणूनच विवाहासाठी पत्रिका मिलन करताना नुसते गुण जुळवून चालत नाही तर ग्रहमिलन सुद्धा करावे लागते . विवाह पश्च्यात 20-25 वर्षात येणार्या  दोघांच्याही दशांचा व्यवस्थित सखोल अभ्यास करावा लागतो . 

जी महादशा चालू आहे त्याचा जप केला तर फायदा होतोच तसेच त्याने दर्शवलेल्या पत्रीकेतील स्थानांच्या अनुषंगाने विचार केला तर यश मिळते जसे अष्टम स्थान लागले तर विमा कंपनीत काम करावे किंवा विमा एजंट व्हावे किंवा अंतेष्टीच्या पूजा सांगाव्यात ,अंतेष्टीसाठी लागणार्या सामानाचे दुकान काढावे . 

Life is a Cardiogram आणि म्हणूनच जर महादशांचा क्रम पाहिलात तर राहूच्या दशेत अनेकदा मनुष्य देशोधडीला लागतो, अनान्न दशा होते. सततची अनामिक भीती , मनावर दडपण, गैरसमजाचे वारे वाहणे ह्या गोष्टीना सामोरे जावे लागते . त्यानंतर गुरूची दशा येते त्यात उत्कर्ष होतो ,जरा प्रगती झाली कि आपल्याला अहंकार येतो , राहू दशेतील फटके आपण विसरतो आणि त्या अहंकाराला ठेचायला पुन्हा शनी महाराजांना यावेच लागते म्हणून गुरु नंतर शनी दशा . अर्थात ह्या सर्व ग्रहांची स्थिती सुद्धा पत्रिकेत अभ्यासावी लागतेच . कधी कधी पापग्रहांची जसे मंगळ शनी ह्यांच्या दशा सुद्धा प्रगतीपथावर नेतात . 

गुरु शनी ह्यांच्या दश्या वार्धक्याच्या उंबरठ्यावर आलेल्या केव्हाही उत्तम कारण तो काळ पारमार्थिक सेवेत व्यतीत करण्याचाच असतो. दोन्ही ग्रह परमार्थाकडे नेणारे असले तर शनीला संसाराचा वीट आहे पण गुरूला नाही . गुरु धर्माचे रक्षण करत प्रापंचिक जीवन उपभोगुन झाले, प्रापंचिक जीवन यशस्वीपणे जगल्यावर  परमार्थाकडे नेण्याचा मार्ग दाखवतो ,त्याला संसाराचा वीट नाही .उलट उत्तम प्रपंच केलात तर परमार्थ सोपा होयील हेच बाळकडू तो पाजतो. ज्याचे मन शांत तृप्त आणि समाधानाने तुडुंब वाहत आहे तोच भक्तिरसाचा आस्वाद घेवू शकतो. 

महादशा स्वामींचे किती महत्व आहे हे आपल्या सर्वाना समजले असेलच आणि योग्य वयात योग्य दशा लाभणे हेच खरे भाग्य म्हंटले पाहिजे. एखादी घटना आयुष्यात कधी घडेल हे सर्वस्वी महादशा स्वामीवर अवलंबून असते. विवाहा साठी पूरक असणार्या स्थानांशी निगडीत महादशा स्वामी नसेल तर कितीहीवेळा गोचर गुरु लग्नातून , सप्तम स्थानातून किंवा सप्तम स्थानावर दृष्टी टाकून गेला तरी विवाह होणार नाही .त्यातही एखादी अंतर्दशा पूरक असेल तर त्यात विवाह संभवतो अन्यथा नाहीच .म्हणूनच पत्रिकेचा अभ्यास करताना महादशा स्वामी विचारात घेणे अत्यावश्यक आहे. 

तात्पर्य महादशा स्वामी आपल्या आयुष्यातील त्या कालखंडाचा राजा आहे त्याला डावलून चालणारच नाही .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230












 

 



No comments:

Post a Comment