|| श्री स्वामी समर्थ ||
पत्रिकेतील प्रत्येक भावाचा एक स्वामी असतो आणि त्याच्यावर त्या भावाची संपूर्ण जबाबदारी असते . तो त्या भावाचा कुटुंबप्रमुख असतो असे म्हंटले तरी चालेल. ह्या स्वामीला त्या भावाचा भावेश म्हणून संबोधले जाते . हा भावेश ग्रह ज्या भावात असतो त्याच्या स्वामी प्रमाणे फळ देतो त्याचबरोबर पत्रिकेत तो ज्या भावांचा कार्येश आहे त्याचीही फळे देतो. जसे बुध जर सिंह राशीत असेल तर तो रवी प्रमाणे फळे देयील पण त्याचसोबत तो मिथुन आणि कन्या राशी पत्रिकेत ज्या भावात आहेत त्याचीही फळे देयील. ग्रह ज्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्राची सुद्धा फळे देतो. म्हणजे बुध जर सिंह राशीत पूर्वाफाल्गुनी ह्या नक्षत्रात असेल तर तो शुक्राचीही फळे देयील पर्यायाने शुक्राच्या राशी ज्या भावात आहेत त्या भावांचीही फळे देईल.
ह्या सर्वाचा एकत्रित अभ्यास करण्यासाठी आपल्याला ग्रहांचे कार्येशत्व काढणे आवश्यक असते . मुळात पत्रिका पाहताना पत्रिकेतील लाग्नबिंदू हा सर्वात महत्वाचा आहे. तदपश्चात लग्नेश ,लग्नातील ग्रह , चंद्र ,त्रिक स्थानातील ग्रह ,राहू केतू , ग्रहांचे एकमेकांशी होणारे योग , लग्नाला असणारे इष्ट आणि अनिष्ट ग्रह , महादशा ह्या सर्वांचा अभ्यास आपल्याला निष्कर्षापर्यंत म्हणजे जातकाच्या प्रश्नाला उत्तरे द्यायला सहाय्यक ठरतो .
म्हणूनच कुठलाही एक ग्रह पत्रिकेतील भविष्य सांगायला पुरेसा नसतो तर ह्या नवग्रहांची पालखी तयार होणे हे तितकेच महत्वाचे असते . एखाद्याचा राहू पंचम स्थानात अत्यंत बलवान असेल तर व्यक्ती शेअर मार्केट मध्ये उलाढाली करू शकते पण मग हे कधी शक्य होईल ? हा राहू तर जन्मापासूनच पंचमात आहे मग व्यक्ती जन्मापासून शेअर मार्केट मध्ये काम करेल का तर नाही . ज्या वेळी त्या ग्रहाची म्हणजे ह्या उदा. राहूची महादशा येयील किंवा राहूच्या नक्षत्रातील ग्रहाची दशा येयील किंवा राहूवर दृष्टी टाकणाऱ्या ग्रहाची दशा अंतर्दशा येयील त्यावेळी हा राहू पंचमाची फळे द्यायला सक्षम होईल.
बघा सोपे आहे आपण ज्या खोलीत असतो त्याच खोलीतील पंखा लावतो . इतर खोल्यातील नाही .पण आपण उठून स्वयंपाकघरात गेलो तर बाहेरच्या खोलीतील दिवे पंखे बंद करून स्वयंपाकघरातील लावतो . अगदी तसेच पत्रिकेतील सर्व ग्रह आणि भाव एकच वेळी फळे देणार नाहीत ,त्यांच्या दशा अंतर्दशेत ते फळे देतील. म्हणजेच एखाद्या भावाची फळे कधी मिळतील जेव्हा त्या भावाचे कार्य करणार्या ग्रहांची दशा अंतर्दशा येयील तेव्हाच .हे सर्व आपल्याला समजेल कसे तर ह्यासाठी सोपी पद्धती म्हणजे ग्रहांचे कार्येशत्व काढणे .
नवीन अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी सरळ एका कागदावर पत्रिकेतील चालू महादशा कुठली आहे त्याप्रमाणे त्या आणि पुढील दशेचे कार्य करणाऱ्या ग्रहांचे कार्येशत्व काढून घ्यावे म्हणजे हे आपल्या समोर असले कि फलादेश करताना सोपे जायील. कार्येशत्व काढले कि आपल्याला कुठला ग्रह पत्रिकेतील कुठल्या कुठल्या भावांचा कार्येश आहे म्हणजेच तो पत्रिकेतील कुठल्या भावांचे कार्य करणार आहे ते सहज समजते . जसे जातकाचा प्रश्न परदेशगमनाचा आहे. तर सध्या चालू असलेली महादशा 3 9 12 ह्या भावांशी निगडीत आहे का हे पाहावे लागेल . जर असेल तर त्या दशेत त्या जातकाचे परदेशगमन होईल. परदेशी जाऊन शिक्षण घ्यायचे असले तर 9 12 हि स्थाने पहावीच लागतील. व्ययभावात जर चर तत्वाची रास असेल तर जातक परदेशी जायील कारण दशास्वामी त्याला परदेशी नेण्याचे कार्य करत आहे पण व्ययभावातील चर राशी असल्यामुळे तो परदेशात स्थायिक होऊ शकणार नाही . अश्या प्रकारे कार्येशत्व काढले कि आपल्याला जातकाच्या कुठल्याही प्रश्नाचे अत्यंत विस्तृत उत्तर देता येते.
कार्येशत्व काढले कि एखाद्या घटनेचे पूरक आणि विरोधी भाव आपल्या लक्ष्यात येतात आणि त्याप्रमाणे जातकाच्या प्रश्नांची उकल करता येते . अनेक वेळा जातक एकापेक्षा अधिक प्रश्न विचारतात जे एकमेकांशी सलग्न असूही शकतात जसे परदेशात वास्तव्य होईल का ? जोडीदार परदेशातील वास्तव्य करणारा असेल का ?
आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना घडवण्याचा अधिकार महादशा स्वामीने राखून ठेवला आहे . जर विवाहाचा प्रश्न असेल आणि दशा स्वामी विवाहाला अनुकूल भाव देत नसेल तर ती दशा आपल्याला सोडून पुढील घ्यावी लागते . ह्या सर्व गोष्टी सहज समजण्यासाठी आणि अचूक उत्तरापर्यंत नेण्यासाठी ग्रहांचे कार्येशत्व काढणे अत्यंत आवश्यक असते .
महादशा स्वामी आणि त्याचे अधिकार ह्यावर पुढील लेखात विस्तृत माहिती घेऊया .
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
.
No comments:
Post a Comment