Monday, 27 June 2022

ज्योतिष म्हणजे विरंगुळा नाही

 || श्री स्वामी समर्थ ||




अंधारातून प्रकाशाकडे नेणारे हे शास्त्र दैवी आहे . ह्या शास्त्राचा योग्य तो मान आपल्याला ठेवता आला पाहिजे .नुसताच ह्या शास्त्राचा नाही तर ह्या शास्त्राच्या सर्व अभ्यासकांचा सुद्धा . कुठलीही विद्या अवगत करणे हे नशिबी असावे लागते . अनेकदा उत्तम शिक्षक मिळतोही पण आपल्याच कर्मामुळे त्याच्याकडून  विद्या ग्रहण करणे आपल्या भाग्यात नसते .  आपल्या प्रश्नाच्या अचूक उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी त्या त्या विषयातील उत्तम जाणकार लागतोच आणि त्याच्यापर्यंत आपण पोहोचलो तर ते आपले भाग्यच म्हणायचे . 

कुठलेही ज्ञान कधीही फुकट जात नाही आणि ते सहज प्राप्त सुद्धा होत नाही . जीवाचे रान करावे लागते . ज्ञान प्राप्ती साठी एकलव्याने काय नाही केले .पण आजकाल द्रोणाचार्य मिळणे कठीण आणि मिळालेच तर एकलव्य मिळणे त्याहून कठीण . म्हणूनच मनापासून जीव तोडून शिकावणारे शिक्षक मिळाले तर आपल्या सात जन्माचे पुण्य फळास आले असे समजावे आणि जीवाच्या आकांताने विद्या ग्रहण करावी .  दुसरे काहीच करायला नाही म्हणून कुठेतरी वेळ घालवण्यासाठी कुठलाही ज्योतिष शास्त्राचा क्लास करू नये . ग्रहतारे बघतील बघतील आणि मागेच लागतील. त्यांनासुद्धा गृहीत धरू नका . 

ज्योतिष क्लास म्हणजे टीव्ही वरील डेली सोप नाहीत . बघता बघता भाजी निवडणे किंवा इतर तत्सम कामे करणे . 

ज्योतिष हि एक साधना आहे आणि हि महान विद्या ग्रहण करण्यासाठी मुळात साधना करावी लागते . सद्गुरूंची कृपा झाली तर कुठेतरी आशेचा किरण दिसतो आणि शास्त्र ग्रहण करण्याची संधी मिळते . संधी अनेकांना मिळते पण त्याचे सोने करणे हीच खरी गुरुदक्षिणा . आजकाल धरसोड हि मानवी वृत्ती झाली आहे .वस्त्राप्रमाणे जवळचे लोक, त्यांचे मित्रसंबंध बदलणे हे  आता नवीन नाही पण अनेक शास्त्र एकच वेळी शिकणे ह्यासारखी चुकीची गोष्ट ती काय असू शकते . 

आपल्याला हे शास्त्र कश्यासाठी शिकायचे आहे ? ह्या प्रश्नाचे उत्तर स्वतःला मिळवणे आवश्यक आहे . एखाद्या विषयाची केवळ माहिती मिळवण्यासाठी शिकायचे आहे कि त्यामध्ये पुढे जाऊन करिअर करायची आहे त्याप्रमाणे आपले पैशाचे वेळेचे आणि मनाचे सुद्धा नियोजन असले पाहिजे . मला इतका  वेळ ह्या शास्त्राच्या अभ्यासासाठी द्यावा लागणार आहे ह्याची मनात खुणगाठ बांधली तर सोपे होऊन जायील . पण फुलपाखरासारखे इथे तिथे फिरत बसले तर एक ना धड असे व्हायचे . पैशाचा आणि वेळेचा अपव्यय तर होईलच पण आपल्यातील धरसोड वृत्तीला खतपाणी घातले जायील. सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतःमधील आत्मविश्वास निघून जायील. 

कुठलेही शास्त्र अवगत करताना संपूर्ण शरणागती लागते . ज्यांचे मन चंचल असेल त्यांनी ह्या भानगडीत पडून आपला आणि समोरच्याचाही वेळ फुकट घालवू नये . ज्योतिष हि दैवी विद्या आहे . आयुष्यात काय करावे आणि काय करू नये ह्याची दिशा दाखवून सर्वार्थाने जीवन आनंदी करण्याचा तो मोठा स्त्रोत आहे. त्याचा योग्य तो उपयोग करता आला पाहिजे .  स्वतःच्या मनाशी आणि ह्या ग्रह ताराकांशी अत्यंत प्रमाणिक राहून शिकलो तर हे ग्रह तारे आपल्याशी संवाद साधतील , हितगुज करतील ह्यात शंकाच नाही .

उत्तम बैठकीची जोड आणि आपली साधना शास्त्राच्या अभ्यासात गती देयील . ज्योतिष विद्या अवगत करणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही . ह्या शास्त्राचा उपयोग समाजासाठी करताना ,एखाद्याला मार्ग दाखवताना एखाद्याला जीवनाचा योग्य जोडीदार निवडण्यास मदत करताना जो आनंद प्राप्त होतो तो अनमोल असतो .  एखाद्याला रडवायला अक्कल लागत नाही पण त्याच्या चेहऱ्यावर हास्याची एक लकेर आणणे जिकरीचे काम आहे .आपले जीवन सार्थकी लावणारा हा आनंद प्रतिदिन आपण अनुभवू शकतो . दुसर्याच्या जीवनात तेजोमय प्रकाश निर्माण करणाऱ्या ह्या शास्त्राचा अपमान म्हणजे जीवनाला लागलेली अवकळा असे म्हंटले तर वावगे ठरू नये . सगळ्यांनाच सगळे जमते असेही नाही ,ज्याला जे जमेल ते त्याने करावे इतकच .

ह्या शास्त्राचा सन्मान करायला शिकले पाहिजे तरच आपली धडगत आहे अन्यथा .उठसुठ ज्योतिष नाही. हे शास्त्र शिकणे हा सुद्धा एक दिव्य अनुभव आहे जो आपल्याला अंतर्यामी घडवतो , जीवनातील अनेक बारकावे आणि अनुभवांचे दर्शन धडवतो .ह्या शास्त्राची प्रचीती आपल्यापैकी अनेकांनी घेतलीच असेल ,दे शास्त्र देत राहणारे आहे हे सांगण्यासाठीच जणू  जगाचा चालक मालक पालक सूर्य नित्य नेमाने आपल्या  भेटीला येत असतो.

निसर्ग , अवकाशातील हि ग्रहमाला आपल्याला काहीतरी उदात्त देऊ पाहते आहे ,आपल्याला घेता आले तर अधिकस्य अधिकम फलं 

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


 


No comments:

Post a Comment