|| श्री स्वामी समर्थ ||
काहीतरी वेगळे लिहावे वाटले . तुम्ही म्हणाल हे असे काय शीर्षक तर त्याचे असे आहे आयुष्यभर आपण अनेक नाती आणि मैत्रीचे पदर धरून नाचत असतो. अनेकांची मने आपल्या परीने जपण्याचा प्रयत्न करत आपले स्वतःचे जगणेच विसरून गेलेलो असतो हे आपल्या लक्ष्यात सुद्धा येत नाही .
लहानपणापासून ते अगदी आत्ता ह्या क्षणापर्यंत आपण दुसर्याला काय हवं आणि त्यांना कसं हवं ह्याच विचारात अडकलेले असतो. थोडक्यात दुसर्याच्या तंत्राने नाचत असतो . आपली स्वतःची अशीही मते असायला हवी खरतर . लहानपणी आपल्याला कुठल्या शाळेत घालायचे ते पालक ठरवणार अर्थात तेव्हा त्यांचा निर्णय आपल्या भल्यासाठीच असतो आणि हा निर्णय घेण्याचे आपले परिपक्व वय सुद्धा नसते. पण पुढेही आयुष्यभर जीवनाच्या संपूर्ण प्रवासात सगळे निर्णय दुसराच ठरवत असतो , बघा विचार करा नक्कीच पटेल. आपले मत विचारात घेतले जातेही नाही असे नाही पण होते वेगळेच . जसे सणाला काय गोड पदार्थ करायचा ? मुलांना आणि ह्यांना काय आवडते ते करा , घराला रंग कुठला लावायचा ? रोजच्या जेवणातील मेनू च्या फर्माईश सुद्धा सकाळपासून येत असतात , आई आज हि भाजी नको आज हेच कर आणि तेच कर . फिरायला जायचे कुठे ?बहुतांश मुलेच ठरवतात .
बहुतांश वेळेस समोरचा आपल्याला गृहीत धरतो. अनेक नात्यांमध्ये जगताना हि गोष्ट आपल्याला सहज लक्ष्यात येते . आपण नाती टिकवण्यासाठी आकंठ प्रयत्न करतो , समोरचा दुखावला जाऊ नये म्हणून जीवाचा आटापिटा करतो. आपल्याकडून प्रत्येक जण कसा सुखी होईल हे पाहताना आपण आपले जगणे सुद्धा विसरून जातो.
पण समोरचा आपल्यासाठी क्षणभर सुद्धा असा विचार करतो का? घरातील प्रत्येक व्यक्ती आपापले कार्यक्रम स्वतःच ठरवत असते पण आपल्याला कुठे एक दिवस जायचे तरी सगळ्यांची सोय बघून आणि करून जायला लागते. सगळ आयुष्य आपण दुसर्यांच्या मताने आणि त्यांच्याच मताने घालवत असतो.
आजकाल WhatsApp चा जमाना आहे . आपल्याला हवे तेव्हा मेसेज करायचे आपल्याला हवे तेव्हा नाही . आपल्याला हवे तेव्हा समोरच्या व्यक्तीला जवळ करायचे आणि मग आपल्याला नको तेव्हा दूर करायचे. समोरच्याच्या भावनांचा काडीचाही विचार नाही . मैत्री सुद्धा आपल्याला हवी तेव्हा आणि हवी तशी . सगळाच एकसुरी कारभार .
बरेच वेळा आपल्याला स्वतःलाही निर्णय घ्यायचे नसतात म्हणून मग दुसर्याच्या तंत्राने आपण स्वतःच गोष्टी करत असतो. पण हे फार कमी वेळा. घरात , कार्यालयात सतत कुणीतरी आपल्यावर हुकुम सोडत असतो . एक संपूर्ण दिवस सुद्धा आपण आपल्या मर्जीने जगतो का? तर नाही .
आपला रिमोट कंट्रोल आपल्याच हाती असायला हवा . मी अभ्यास करीन आणि मला हवा तो शेअर विकत घेयीन , आज माझ्याच आवडीची भाजी होणार , माझा चहा पिऊन झाल्याशिवाय मी कुठल्याच कामाला हात लावणार नाही , तुमचा चहा थंड झाला घ्या तुम्हीच गरम करून , आज माझ्या मैत्रिणी भेटणार आहेत . इतर वेळी खाताना ५० वेळा बाहेर मग आजही खा. आजचा पूर्ण दिवस माझाच आहे. हे आपण खरच करायला पाहिजे. हे सर्व वाचून अनेक पुरुष मंडळी म्हणतील कि आमच्या घरात आमच्या हिची सत्ता चालते ,आम्हाला कोण विचारतय.हाहाहा. गमतीचा भाग सोडला तर सतत कुणाचे तरी वर्चस्व आणि समोरच्याची आपल्याला त्यांच्या तालावर नाचवण्याची वृत्ती .
कधीतरी ओरडून सांगावेसे वाटते कि मला गृहीत धरणे बंद करा . माझे मला मुक्तपणे जगुद्या , मी निर्णयक्षम आहे आणि माझे निर्णय मला व्यवस्थित घेता येतात तेव्हा हे कर ते कर बंद करा .
मला माझी स्पेस द्या .
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment