Friday, 3 June 2022

मनाचे चक्षु

 || श्रीस्वामी समर्थ ||


आज कामानिमित्त प्रवास करत होते . मधेच एका स्टेशन वर ट्रेन थांबली .सहज समोर लक्ष्य गेले .

10-15 दृष्टीहीन लोक एकमेकांचा हात धरून चालले होते . एकमेकांची थट्टामस्करी करत होते ,बोलत होते बोलता बोलता हसतही होते . माझी ट्रेन पुढे निघून गेली पण हा प्रसंग मला खूप काही शिकवून गेला. माझे मन त्यांच्यापाशीच रेंगाळत राहिले .जग किती सुंदर आहे पण काही जीवांना ते बघण्याचे वरदान देवाने दिलेले नाही . अंधत्व हि आपल्यातील एक उणीव आहे जी आयुष्यभर दुक्ख देणारी आहे , त्रासदायक आहे. क्षणाक्षणाला परावलंबी करणारी आहे . 

विधात्याने निर्माण केलेली सृष्टी , आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती , वस्तू काहीच आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकत नाही ,दुसर्याच्या डोळ्याने आयुष्यभर हे सर्व पाहायचे , अनुभवायचे हि भावना सुद्धा किती वेदना देणारी आहे. त्या लोकांकडे पाहताना ह्या सर्व विचारांचे काहूर मनात उठले पण त्याच क्षणी त्यांना हसताना बागडताना पाहून मन हेलावून गेले . त्याही परिस्थितीवर मात करून ते स्वतःला जगवत होते ,आनंदाचा आस्वाद घेत होते . काही सेकंदात मी खूप काही शिकले . प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यातील कुठलातरी कोपरा अपूर्ण आहे . म्हणूनच म्हंटले आहे जगीसर्व सुखी असा कोण आहे . आपल्या शरीराचा एखादा भाग दुखावतो तेव्हा आपल्याला त्याचे महत्व समजते . आपण पाहू शकत नाही हि गोष्ट स्वीकारणे सोपे नाही आणि ते स्वीकारून पचवून आयुष्य पुढे नेत राहणे हे म्हणजे रोज परीक्षेला बसण्यासारखे आहे . आपण कधी विचार करतो का कि ह्या लोकांना किती समस्या येत असतील. 

शरीराचे सर्व अवयव धडधाकट असणे हीच खरी श्रीमंती आहे . ज्यांना दिसत नाही , ऐकू येत नाही किंवा अन्य काही आजार असतील त्यांनी मग काय करायचे ? आपण ह्यातून काहीतरी शिकायलाच हवे. लहान सहान गोष्टी मिळाल्या नाही कि आपला पापड मोडतो , आपण निराश होतो आणि कधीकधी देवावर पण रुसतो , काय माझे आयुष्य म्हणून अगदी आपल्या जगण्याचा आत्मविश्वास सुद्धा घालवून बसतो. खरतर इतकं सुंदर आयुष्य जगण्याची , अनुभवण्याची संधी दिल्याबद्दल प्रत्येक क्षणी आपण देवाचे आभार मानले पाहिजेत. आपण आपल्या कोशातून बाहेर यायला हवे .जगात किती लोकांना किती दुख आहे हे पहिले कि आपले आयुष्य किती सुखकर आहे त्याची जाणीव होते . 

अनेक अपंग लोक सुद्धा त्यांच्या व्यंगावर मात करून धीराने आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी धडपडत राहतात हे पाहून उर भरून येतो . आयुष्याची शाळा आपल्याला खूप काही शिकवत आहे .

ट्रेन पुढे गेली आणि विचारांना वेग आला . एखादा अवयव नसताना जीवनाची लढाई लढणाऱ्या ह्या लोकांकडे पहिले कि आपल्या खुज्या विचारांची कीव करावीशी वाटते . आज काही क्षण ह्या लोकांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य आणि आनंद पाहिला आणि नकळत माझ्याही चेहऱ्यावर हसू आले. जीवनाची लढाई हरून सुद्धा ते जिंकले होते हाच मोठा धडा मी आज त्यांच्यासोबत गिरवला.


मनाचे चक्षु करून ते जीवनाचे गीत गात होते ,समरसून जाण्याचा प्रयत्न करत होते . अंधारलेल्या जगतात सुखाचा किरण शोधत होते , निराशा मरगळ झटकून नवसंजीवनी जागृत करत होते . देवाने सगळ्यांना सगळ्या गोष्टी दिल्या नाहीत पण जे दिलंय त्याची जाणीव असणे ,त्याची किंमत ठेवणे आणि त्यासाठी प्रत्येक क्षणी त्यासाठी कृतद्न्य राहणे हे आपल्या हातात नक्कीच आहे. आजचा प्रसंग अगदी लहानसा पण जीवनाचे विदारक सत्य कथन करणारा होता . आज मी खर्या अर्थाने जीवनाचे गीत गाताना ,जीवनाचा सोहळा झालेला पहिला.

माझा अनुभव तुमच्याशी शेअर करण्यासाठी हा लेखन प्रपंच.

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230











No comments:

Post a Comment