Saturday, 11 June 2022

ज्योतिषी आणि जातक ह्यांचे सूर जुळणे आवश्यक

|| श्री स्वामी समर्थ ||


हजारो वर्षापासून प्रचलित असणारे हे दैवी शास्त्र समस्त मानवजातीच्या कल्याणासाठीच आहे. हे दैवी शास्त्र आपल्याला भविष्यातील असंख्य चांगल्या वाईट घटनांसाठी “High Alert “ करणारे आहे .त्याचा योग्य तो उपयोग आपल्याला करता आला तर आयुष्य सुख समाधानाची असंख्य शिखरे पादाक्रांत करेल ह्यात शंकाच नाही . आधुनिक जगतात ह्या शास्त्राचा जोमाने प्रसार आणि प्रचार होत आहे तसेच लोकांमध्ये ह्या शास्त्राबद्दल आदर आणि अधिक कुतूहल जागृत होत आहे हि नक्कीच आनंदाची गोष्ट आहे . जगभर ह्या विषयावर संशोधन होत आहे. असो.

आजचा विषय वेगळा आहे. आपण साधे सोपे जीवन जगत असताना मधेच काही संकटे ,अडचणी येतात आणि मनुष्य त्रस्त होतो . त्याला मार्ग मिळत नाही अश्या वेळी एखाद्या उत्तम ज्योतिषाचा सल्ला घ्यावा ह्या विचाराने तो ह्या शास्त्राच्या अभ्यासकाकडे वळतो. एखाद्याची पत्रिका बघून त्यावर भाष्य करणे हि खचितच सोपी गोष्ट नाही आणि ते उत्तम रीतीने करता यावे ह्यासाठी ज्योतिषाला सुद्धा साधना करावी लागते त्यावर सुद्धा गुरुकृपा असणे आवश्यक असते. अनेकदा त्याने केलेली ज्योतिषीय भाकिते त्याच्या साधनेचे फळ असते आणि ती खरी होताना आपण बघतो . 

ज्योतिषाकडे कधी आणि कश्यासाठी जायचे हे समजले पाहिजे . उठसुठ ज्योतिष बघायला येणार्या जातकांना ज्योतिषाने बाहेरचा रस्ता दाखवावा . समस्या निर्माण झाल्याशिवाय जातकाचा प्रश्न बघूच नये हा प्राथमिक नियम सर्वांनी तंतोतंत पाळलाच पाहिजे . २ वर्ष स्थळे पाहूनही विवाह जमत नसेल आणि अश्यावेळी ज्योतिषीय सल्ला घेतला तर ते योग्य आहे पण 10 वी मधल्या मुलाचे शिक्षण चालू असताना त्याचा विवाहाचा प्रश्न पाहणे हा फाजीलपणा आहे आणि अश्या प्रकारचे प्रश्न ज्योतिषाला विचारणे म्हणजे ह्या बहुमुल्य शास्त्राचा अपमान आहे . 

 

आजकाल प्रत्येकालाच अमेरिका युरोप खुणावत आहे म्हणून कुठल्याही वेळी आपली मुले परदेशी जातील का हा प्रश्न  विचारणे हेही चूक म्हणूनच वरती लिहिल्या प्रमाणे समस्या निर्माण झाल्याशिवाय प्रश्न विचारू नये . त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आधी स्वतःही प्रयत्न करायला लागतात .


आजारपणाचा प्रश्न जातकाने विचारला तर स्थळ काळाचे बंधन न ठेवता ज्योतिषाने त्याला मार्गदर्शन करावे . आधी gpay करा हा नियम तेव्हा लागू होत नाही. कित्येक लोक आजारपणाच्या समस्यांचे मानधन घेत नाहीत . असो घ्यायचेच असेल तर नंतर घ्यावे कारण प्रश्न विचारणाऱ्या जातकाची मनस्थिती तेव्हा ठीक नसते . अहो आपले पैसे कुणीही बुडवणार नाही .

दुसरे काहीच नाही म्हणून ज्योतिष अशीही काहींची धारणा असते. बघुया तर काय सांगतात अशीही मनोवृत्ती असते.  दर दोन दिवसांनी नवनवीन ज्योतिषांकडे जाऊन पत्रिका दाखवण्याचा चाळा सुद्धा अनेकांना असतो. वेळ जात नाही म्हणून ज्योतिष किंवा दुसरे काहीच करण्यासारखे नाही म्हणून ज्योतिष . असो.

ज्योतिष शास्त्राला सुद्धा मर्यादा आहेत पण योग्य वेळी अत्यंत कळकळीने प्रश्न विचारला तर हे दैवी शास्त्र मदत करतेच करते हा आजवरचा अनुभव आहे. प्रश्न पाहण्यासाठी जातकाची जितकी तळमळ असणे आवश्यक आहे तितकीच प्रश्न पाहणार्याची सुद्धा असायला हवी . 

आपली पत्रिका म्हणजे आपले उभे आयुष्य . पत्रिकेतील 12 भाव , राशी ,नक्षत्रे आपल्या आयुष्यावर ,आपला स्वभाव , आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण , शिक्षण , नोकरी व्यवसाय , नातीगोती ,मित्र , भावभावना अश्या अनेक पेहलूनवरती प्रकाश टाकत असतात . पत्रिका हि पवित्र आहे ,तो जीवनाचा स्त्रोत आहे .पत्रिका म्हणजे खिरापत नाही इथे तिथे वाटत सुटायला. हा गंभीरतेने घ्यायचाच विषय आहे हे पक्के लक्ष्यात ठेवले पाहिजे . आपल्याकडे येणारा जातक सहज बोलून जातो कि अनेकांना पत्रिका दाखवली आहे . हो ना? मग आता माझ्याकडे येण्याचे कारण ? तर त्यांच्या उत्तरांनी न झालेले समाधान किंवा त्यांना ह्या शास्त्राने न दिलेली अनुभूती हेच असू शकेल. हे शास्त्र अनुभूती देणारे आहे पण सांगणारा तितकाच माहीर पाहिजे , ह्या शास्त्राचा खरा अभ्यासक उपासक पाहिजे तरच उत्तर योग्य येणार . 


मुळातच आपण कुणाला पत्रिका दाखवायची हा जरी जातकाचा वैयक्तिक प्रश्न असला तरी ती दाखवताना ज्योतिषाबद्दल थोडीफार माहिती असावी . तसेच मुख्य म्हणजे ह्या विषयावर श्रद्धा हवी. आजकाल २ पुस्तके वाचूनही ज्योतिष होणारे लोक आहेत मग अश्यांची भाकीचे चुकतात आणि मग लोकांचाही ह्या शास्त्रावरचा विश्वास उडतो पर्यायाने ह्या दैवी शास्त्राची टिंगल सुद्धा होते . त्यामुळे आपण पूर्णपणे पत्रिका पाहण्यासाठी सक्षम झालो आहोत का हा विश्वास असेल तरच पत्रिका बघावी अन्यथा नाही तसेच आपण कुणाला पत्रिका दाखवायची आहे आणि नेमकी कश्यासाठी ह्याचाही अभ्यास जातकाने करावा.  एखाद्या ज्योतिषाने आपल्याला काही उपाय सुचवला तर तो मनापासून करावा . जर ज्योतिषी उत्तम साधक असेल तर त्याने सांगितलेल्या उपायामुळे तुमचा प्रश्न निश्चित सुटेल . 

प्रश्नकर्त्याला प्रश्नाचे गांभीर्य आणि वेळेचे भान असायला हवे . कुठल्याही गोष्टीसाठी आधी कर्म करायला लागते मगच फळ मिळते त्यामुळे आधी त्याचेहि  प्रयत्न असले पाहिजेत . जसे अनेक ठिकाणी अर्ज करूनही नोकरी मिळत नसेल तर तदपश्च्यात नोकरी कधी मिळणार हा प्रश्न विचारणे उचित ठरेल. प्रत्येक वेळी समोरून उत्तर आपल्या मनासारखेच येयील असे नाही . ज्योतिषी हा काही जादूची कांडी घेवून बसलेला नाही . तो तुमच्या प्रारब्धात आहे तेच कथन करणार आहे. अनेकदा मनासारखे उत्तर नाही आले कि ज्योतिषाला नावे ठेवली जातात हेही बरोबर नाही. 


आजकाल पारंपारिक पद्धती , कृष्णमुर्ती पद्धती ह्या दोन्ही पद्धती ज्योतिषी वापरत असल्यामुळे प्रश्न कुठल्या पद्धतीने बघणार असाही प्रश्न जातक विचारतात . समस्येपेक्षा हे इतर प्रश्न ज्याला तसाही फारसा अर्थ नाही तेच अधिक असतात . खर बघता ज्याला एखादी समस्या आहे त्याला इतर गोष्टी सुचणार सुद्धा नाहीत . असो कधी कधी कुतूहल असते म्हणूनही विचारत असावेत असे म्हणून सोडून देवूया .

ज्योतिषाला सुद्धा बोलण्याची कला अवगत असायला हवी तरच तो योग्य प्रश्न विचारून आपल्याला हवी असलेली माहिती जाताका कडून मिळवून घेवू शकतो . उदा. बरेच वेळा एखाद्या पत्रिकेत पितृदोष असेल तर आधीच्या पिढ्यांमध्ये घडलेल्या काही घटनांचा संदर्भ समजला तर आपण काढलेल्या तर्कांवर शिक्कामोर्तब होईल . हे प्रश्न जातकांना विचारले असता त्यांनी बरोबर उत्तरे देवून सहकार्य केले तर दोघांचे सूर जुळतील. 

ज्योतिषाने ज्योतिष मार्गदर्शन करताना जातकाचे आपल्या उत्तराने समाधान झाले आहे कि नाही हेही पाहावे. अनेक जण ज्योतिषाकडे आपले मन मोकळे करतात त्यांच्या समस्यांचे गांभीर्य कथन करताना त्यानाही काही वेळ लागतोच तो त्यांना अवश्य द्यायला हवा . अनेकदा २ वाक्ये बोलून फोन ठेवुन देणे किंवा समर्पक उत्तरे न देणे हे योग्य नाही . तसेच ह्याउलट अनेक वेळा जातक सुद्धा अघळपघळ बोलत राहतात हेही योग्य नाही. थोडक्यात काय तर जातकाची जातकुळी ज्योतिषाला समजणे आणि दोघांच्यात सुसंवाद निर्माण होणे गरजेचे आहे. 

मुळात उठसुठ प्रश्न विचारायला ज्योतिषाकडे जावूच नये. माणसाने प्रयत्नवादी सुद्धा असले पाहिजे . आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी आणि त्याउपर ह्या शास्त्राचा आधार घ्यावा असे माझे मत आहे.  आजकाल इंस्टट चा जमाना असल्यामुळे जातकाचा धीर  कश्याशी खातात ते माहित नसते तसेच आपण ज्योतिषाचे मानधन देतो आहोत म्हणजे त्याला जणू विकतच घेतले आहे किंवा त्यावर खूप उपकार करत आहोत अश्याच भावनेने काहीजण प्रश्न विचारात असतात . ज्योतिषी आणि हे शास्त्र ह्या दोघांचाही मान ठेवला पाहिजे . कारण आपल्याला जे दिसत नाही आहे ते ह्या शास्त्राच्या अभ्यासाच्या मदतीने ज्योतिषी आपल्याला कथन करणार असतो. 

एकदा संपूर्ण समुपदेशन झाले कि त्याउपर दर दोन दिवसांनी ज्योतिषाला उगीच काहीतरी विचारत बसू नये . त्यांनी तुम्हाला पूर्ण वेळ दिलंय त्यात काय विचारायचे ते विचारा पुन्हापुन्हा काय होणार उत्तर एका रात्रीत थोडेच बदलणार आहे . ज्याचा प्रश्न आहे त्याच जातकाने प्रश्न विचारावा हे सर्वार्थाने योग्य . अनेकदा जातक whatsapp वरती स्वतःचे नाव सुद्धा न लिहिता अमुकामुक माणसाच्या पत्रिकेचे फोटो सरळ पाठवतात . किती अयोग्य आहे हे इतके साधेही समजू नये . आधी ज्योतिषाला फोन करून चर्चा करावी , त्याचे रीतसर मानधन विचारावे आणि मग ते पाठवूनच पत्रिकेचे डिटेल पाठवावे. हा राजमार्ग उत्तम . 

ज्योतिषी आणि जातक ह्यांचे सूर जुळले पाहिजेत . ज्योतिषी आपल्याला जे सांगतोय ते आपल्याच भल्यासाठी त्याच्या पदरचे काहीच सांगत नाही आणि जे सांगत आहे ते सत्य कथन करत आहे ह्यावर विश्वास असला पाहिजे . विश्वास हि सगळ्यात मोठी गोष्ट आहे . तो अभेद्य असलाच पाहिजे . 

ज्योतिषाने किती मानधन घ्यायचे तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे . आपल्याला पटले तर द्यावे आणि मोकळे व्हावे . ज्योतिषाने सुद्धा ते आधीच घ्यावे आणि मग भविष्य कथन करावे (कलियुग – नंतर नाही दिले तर मग बोलणार कुणाला ) . ज्योतिषाचे मानधन चुकवणे किंवा न देणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचाच अपमान आहे हे लक्ष्यात ठेवा. ज्योतिषाचे मानधन हा त्याचा हक्क आहे , ज्योतिषाच्या ज्ञानाची आणि वेळेची ती किंमत आहे . त्याचा आणि ह्या शास्त्राचाही मान ठेवायला आपण शिकले पाहिजे.


अजूनही लिहिण्यासारखे खूप आहे पण किती लिहायचे आणि कायकाय त्यामुळे तूर्तास इथेच लेखणीस विराम देत आहे. सुद्न्य जातक ह्यावर नक्कीच विचार करतील अशी अपेक्षा आहे. मी तर म्हणते ह्या शास्त्राचा प्रत्येकाने अभ्यास करा .आयुष्य आनंदी होईल , पुढील खाचखळगे कळतील आणि आयुष्य मार्गस्थ होईल . आपण ह्या शास्त्राचा सन्मान करायला शिकले पाहिजे तरच हे ग्रहतारेहि आपला मान ठेवतील...कारण ते आपल्याला खूप काही द्यायला आलेले आहेत आपल्याला घेता आले पाहिजे . ग्रहांशी हितगुज साधता आले पाहिजे .

आपल्यासारखे वाचक आहेत म्हणून ह्या लेखणीस आणि ह्या शब्दांना अर्थ आहे. 

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230







 








 

No comments:

Post a Comment