|| श्री स्वामी समर्थ ||
सर्व जगाचे लक्ष्य वेधून घेणारी “ आषाढी वारी “. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे. लक्ष लक्ष्य वारकर्यांच्या हृदयावर विराजमान असणारा आणि तुमचा आमचा सर्वांचाच लाडका पांडुरंग डोळ्यात प्राण आणून आपल्या सर्वांची गळाभेट कधी होईल ह्याची आतुरतेने वाट पाहतो आहे. पांडुरंग आणि भक्ताचे नातेच असे असते . कसलेही आमंत्रण नाही , आमंत्रण पत्रिका नाहीत , जाहिराती नाहीत काहीच नाही ,आहे तो आसमंतात दरवळणारा भक्तीचा सुगंध .
आकाशातून प्रत्यक्ष परमेश्वर अनंत रुपात येऊन जणू पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करतो आहे असा भास नाही झाला तरच नवल. टाळ मृदुंग ह्यांनी आसमंत दुमदुमून टाकणार्या ह्या अठरा दिवसाच्या आषाढी वारी सोबत प्रत्यक्ष किंवा मनाने तुम्ही आम्ही सर्वच असणार आहोत . खर सांगायचे तर मन कधीच पांडुरंगाच्या चरणी गेले आहे . विठूराया अखेरच्या क्षणापर्यंत ते तुझ्यातच गुंतलेले असुदे रे बाबा . जाती धर्म वय सगळ्याच्या परे असणारी हि वारी म्हणजे पांडुरंगाचे प्रत्यक्ष अधिष्ठान .
खेडोपाड्यातून पावसाची कामे आटोपून भगवंताच्या दर्शनाला निघालेला हा वारकरी भगवंताला त्याच्या प्राणा इतुकाच प्रिय आहे . सगळे आयोजन तोच तर करत आहे ,चराचरात तोच आहे , मृदुंगाच्या आवाज म्हणजे तोच , अभंगाचा स्वर म्हणजेही तोच .
तहान भूक आणि स्वतःचे अस्तित्व सुद्धा विसरायला लावणारी हि वारी . काय वर्णन करावे आणि कसे करावे. आता पुढील काही दिवस मंत्रमुग्ध असतील ते विठूमाऊलींच्या नामाच्या गजरात . भक्तिरसात आकंठ बुडालेल्या ह्या वारीतील प्रत्येकासोबत क्षणोक्षणी असणार्या ह्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक .
वारीचा अनुभव असाल तिथून घ्यायचा आहे .जितके करता येयील तितके नामस्मरण ,मानसपूजा ह्या सर्वातून आपल्याला भेटत जाणार्या पांडुरंगाच्या चरणाला स्पर्श करत आपले जीवन आणि वारी पुढे पुढे जात राहणार आहे .
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वारीत सहभागी झालेल्या आणि आपले मन पांडुरंगाच्या चरणी समर्पित करणार्या प्रत्येकाला ह्या अद्भुत , अलौकिक सोहळ्याच्या मनापासून शुभेछ्या .
संकलन : सौ . अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment