Friday, 22 September 2023

केतू

 || श्री स्वामी समर्थ ||


कुंडली अभ्यासताना आपले लक्ष्य लग्न , लग्नेश आणि चंद्र ह्याकडे प्रथम जाते आणि त्यानंतर आपण सर्वच ग्रहांचा अभ्यास करतो. पण विशेष लक्ष्य जाते ते राहू आणि केतू ह्यांच्याकडे . सर्वसाधारण लोकात राहू आणि केतू म्हंटले कि लगेच घाबरणे, नकारात्मक विचार हि पहिली प्रतिक्रिया असते . माझी राहूची , केतूची दशा आहे आता माझे काही खरे नाही किंवा आता काय ? हे प्रश्न पडतात ह्याचे मुळात कारण आपला चुकीचा दृष्टीकोण आणि अर्धवट ज्ञान जे अधिक घातक असते. कुठेतरी काहीतरी वाचायचे आणि ते आपल्याच असे बाबतीत होणार हा चुकीचा निष्कर्ष काढायचा .असो .


राहू आणि केतूची पौराणिक गोष्ट सर्वाना माहित आहे. एका अमृताच्या थेंब प्राशन करून  ते आयुष्याची लढाई लढताना दिसतात . आपल्याला ज्या गोष्टींचा ध्यास आहे किंवा ज्या मिळवण्यासाठी आपली धडपड चालू असते त्या सर्व इच्छा राहू प्रेरित करतो आणि ज्या गोष्टींपासून आपल्याला विरक्त व्हायचे असते त्या केतू निर्देशित करतो. राहुकडे दृष्टी आहे त्यामुळे त्याला ह्या जगातील भौतिक सुखांची लालसा आहे आणि केतुकडे फक्त मन आहे तो मनाने ह्या जगाकडे पाहतो त्यामुळे केतू आपल्याला अंतर्मुख करतो.


आपल्या गतजन्मातील कर्माशी आपल्या ज्या जन्माची नाळ जोडलेली आहे आणि पूर्व जन्मीची कर्मे केतूच दर्शवत असतो .आपले प्रथम नक्षत्र सुद्धा “ अश्विनी “ आहे जे केतुचेच आहे . केतुकडे दृष्टी नाही त्यामुळे तो ह्या सुंदर जगाचा आस्वाद इच्छा असूनही घेवू शकत नाही पण त्याच्याकडे मनाचे नेत्र आहेत तो मनाने पाहू शकतो . मन म्हणजेच अंतर्मन म्हणूनच केतूच्या दशेत जातक विरक्त होऊन आपल्या आतमध्ये पाहणे म्हणजेच अंतर्मुख होत अध्यात्माकडे वळवतो. मुळातच पत्रिकेत गुरु चांगला असेल आणि केतुही तर नक्कीच उपासना ध्यान धारणा ह्याकडे व्यक्तीचा कल असतोच असतो. 

उपासना मारून मुटकून करून घेता येत नाही तर ती वृत्ती मुळातच व्यक्तीमध्ये असावी लागते आणि ती केतूच देतो .पूर्वजन्मीचा आरसा म्हणजे आपली पत्रिका आणि त्यानुसार असते ती आपल्या सर्वच ग्रहांची बैठक पण पूर्व जन्मीच्या कर्माचा हिशोब केतुकडे असतो ज्याला आपण संचित कर्म म्हणतो.

ज्या गोष्टीचा पूर्ण आस्वाद किंवा भोग आपण पूर्वीच्या जन्मात घेतले असतील त्या गोष्टी आणि आता ह्या जन्मात आपल्याला नको आहेत आणि त्याच गोष्टींपासून केतू आपल्याला विरक्त करतो . उदा केल्या जन्मात वडिलोपार्जित संपतीचा उत्तम उपभोग व्यक्तीने घेतला असेल तर ह्या जन्मात त्या व्यक्तीला त्याची हाव नसणार . वडिलोपार्जित संपतीसाठी त्याचा हव्यास किंवा हाव नसेल . आईवडिलांच्या इच्छे नुसार आपल्याला जे मिळाले आहे तो त्यांचा आशीर्वाद समजून तो आपले आयुष्य व्यतीत करेल .पण राहुला  गेल्या जन्मात हि संपत्ती उपभोगायला मिळाली नसेल तर तो मात्र ह्यासाठी हव्यास नक्कीच करेल. पण त्याला ती मिळेलच असेही नाही. ती मिळवण्यासाठी तो धडपड मात्र करत राहील.

राहुकडे हव्यास आहे desire आहे तर केतुकडे विरक्ती आहे. व्यक्तीकडे एखाद्या कलेसाठी रुची असेल पण त्यात तो पुढे जायील असे नाही हाच केतू आहे. अश्या लोकांमध्ये नैसर्गिक काही गोष्टी असतात पण ते त्या व्यक्त करणार नाहीत कारण केतू त्यांना त्या त्यापासून विरक्त करेल.

दशमात केतू असेल तर त्याने स्वताहून आपल्या कामात रुची घेतली तर ती व्यक्ती खूप यशस्वी होऊ शकेल. केतू ज्या स्थानात आहे तो भाव बघा . त्या भावाने दर्शवलेल्या गोष्टी तुम्हाला नैसर्गिक रित्या येत आहेत पण करायच्या नाहीत . पण त्या केल्या तर त्यात तुम्हाला यश नक्कीच आणि सहज मिळेल. 


मिथुन राशीत केतू असेल तर?  मिथुन रास हि बुधाची आहे आणि सोशल आहे . ह्या लोकांना इतरांच्या संपर्कात राहणे निसर्गतः आवडते पण त्या गोष्टी ते करत नाहीत म्हणजे इतरांच्या संपर्कात राहत नाहीत कारण त्यात केतू आहे . पण स्वताहून जर ह्या व्यक्ती सोशल झाल्या तर त्या इतरांच्या संपर्कात सहजतेने येतील आणि काहीच दिवसात अनेक फॉलोअर्स पण मिळवतील कारण संपर्क करणे किंवा संपर्कात राहणे हा त्यांच्यात नैसर्गिक असलेला गुण आहे ज्याचा वापर ते करतच नाहीत .

केतूला कळसावर असलेल्या पताकेचा मान आहे म्हणूनच वारकरी आपल्या लाडक्या माउलीचे दर्शन त्या पताकेत पाहतात आणि तृप्त होतात . पत्रिकेत गुरु चांगला असेल तर अध्यात्मिक प्रगती होईल पण केतुही जोडीला असेल तर तुमच्या मनाच्या तारा सद्गुरूंच्या हृदयाशी नक्कीच जोडल्या जातील.  

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


 


Tuesday, 19 September 2023

माझा भाव तुझे चरणी

 || श्री स्वामी समर्थ ||





“ मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर करू नका .. “ हे अभिवचन आपल्या समस्त भक्तगणांना देणारे महायोगी संत शिरोमणी “ श्री गजानन महाराज “ ह्यांनी वास्तव्य केलेल्या शेगाव मध्ये ऋषीपंचमीच्या दिवशी समाधी घेतली . गणपती बोळवायला या हे सुतवाक्य त्यांनी आधीच केले होते. मानव जातीला जगण्याचा संदेश देण्यासाठी संतानी ह्या भूमीवर मनुष्य रुपात अवतार घेतले . आज त्यांचे पुण्य स्मरण प्रत्येक भक्त करत आहेच . 


“ बोलण्यात पाहिजे मेळ , चित्त असावे निर्मळ “ हा साधा सोपा जीवनाचा मूलमंत्र देणारया आपल्या महाराजांची दिव्य ज्योत आजही भक्तांना प्रचीती देत आहे . आपल्या हृदयात विराजमान असणार्या आपल्या ह्या गुरूंची सेवा करण्याचे अहोभाग्य आपल्या सर्वाना ह्या जन्मी प्राप्त झाले आहे हि गुरुकृपाच आणि आपले पूर्व संचितच म्हंटले पाहिजे . हृदयापासून त्यांची सेवा करणे हेच आपले काम कारण आपला जन्मच मुळी त्यासाठी आहे. सेवा करा सेवेकरी व्हा , भक्तीत समरसून जा आणि जीवन मृत्युच्या फेर्यातून मुक्त व्हा. 


महाराजांचे नुसते नाव घेतले तरी आपल्या डोळ्यातून अश्रू व्हावयास लागतात आणि हाच तर सगुण भक्तीचा अविष्कार आहे. श्री गजानन विजय पारायण , प्रदक्षिणा , नामस्मरण , मानसपूजा हे सर्व आपल्या व त्यांच्या हृदयापर्यंत नेणारे सेतू आहेत .

त्यांच्या लीला ह्या अवकाशातील चांदण्यापरीच आहेत ज्याची मोजदात होणे केवळ अशक्य आहे. 

त्यांनी समाधी घेतली , शरीर वस्त्रापरी  बदलले असले तरी ते आपल्यातच आहेत आणि आपल्यावर त्यांची कृपादृष्टी आहेत .अधिक काय लिहावे . शब्द संपल्यागत झाले आहे ....


आजवर सांभाळलेत अखेरच्या श्वासापर्यंत तुम्हीच सांभाळा ...इतकेच मागणे आहे. 


माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी ..

गजानन गजानन सांभाळ आपल्या भक्तजना 


सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230  


Monday, 11 September 2023

बोलघेवडा बुध

|| श्री स्वामी समर्थ ||




ग्रहमालिकेतील सर्वात लहान ग्रह “ बुध “ हा राजकुमार आहे . राजकुमार म्हणजे लहान मूल जे एकटे राहू शकत नाही त्यामुळे बुध प्रधान व्यक्ती सुद्धा एकट्या राहणे पसंत करत नाहीत किबहुना राहूच शकत नाहीत . आपणही लहान मुलाला घरात एकटे ठेवुन जात नाही . बुध सुद्धा राजासोबत म्हणजेच रवी सोबत राहणे पसंत करतो म्हणून पत्रिकेत रवी आणि बुध एकच भावात किंवा पुढे मागेच असतात . लहान मुल नेहमीच सोबत असणार्या व्यक्तीचे अनुकरण करते त्यामुळे बुध ज्या ग्रहासोबत असेल त्याचेही फळ प्रदान करतो. सोशल मिडीयावर सतत संपर्कात राहणारे हे लोक असतात .

बुध हा शब्द आणि संवादाचा कारक त्यामुळे त्याला वाणी म्हंटलेले आहे. आपले उत्पादन ग्राहकाला उत्तम रीतीने विकणाऱ्या लोकांचा बुध निश्चित चांगलाच असणार . हा बुध उत्तम असेल तर कमीतकमी शब्दात जास्तीतजास्त आशय आणि उत्तम संवाद कौशल्य असते पण बिघडला असेल तर वायफळ गप्पा आणि अघळपघळ बोलणे असते . एखादी गोष्ट उगीच मोठी करून सांगणे आणि बातम्या पसरवणे हे बिघडलेल्या बुधाचे काम आहे. बुधाची मिथुन रास तृतीय स्थानात येते जिथून आपण जाहिरात क्षेत्र आणि मिडीया बघतो. बातम्या वेगाने वार्यासारख्या ( वायुतत्व ) पसरवणे ह्याच स्थानातील मिथूनेच्या बुधाचे काम . पूर्वीच्या काळी एका गडावरून दुसर्या गडावर शिवाजी महाराजांचा दूत खलिता घेवून जात असे तो हा बुधच.

उत्तर दिशा बुधाकडे आहे , बुध हा पृथ्वी तत्वाचा असून नपुंसक ग्रह आहे. बुध प्रभावित व्यक्ती खूप विद्वान आणि उत्तम आकलनशक्ती असणार्या आपल्या बहारदार प्रभावी वक्तृत्वाने समोरच्याला प्रभावित करणाऱ्या असतात . Multi-Talented असतात. बुध म्हणजे संवाद त्यामुळे हजरजबाबी , शब्दांच्या कोट्या करणारे हे लोक असतात . म्हणूनच बुधाला बिरबलाची सुद्धा उपमा दिली आहे. थोडक्यात काय वाकचातुर्य म्हणजे बुध . निसर्ग कुंडलीत बुधाच्या दोन राशी अनुक्रमे मिथुन तिसर्या आणि कन्या षष्ठ स्थानात येतात . बुधाकडे पृथ्वीतत्व आहे आणि पृथ्वी आपल्या पोटात अनंत गोष्टी साठवत असते . आपल्या निसर्ग कुंडलीत सुद्धा षष्ठ स्थानात पोट येते जिथे कन्या हि बुधाची रास आहे . आपणही पोटात अन्न साठवतो आणि गर्भ सुद्धा नऊ महिने इथेच स्थिरावतो .

मिथुन राशीकडे लेखणी , मिडिया , अग्रीमेंट , कागदपत्रे , छपाई , हिरवी शाई दिलेली आहे . उत्तम व्यावसायिक ,लेखक , संपादक , जाहिरात क्षेत्रात काम करणारे लोक ,  शाब्दिक कोट्या करणारे वकील , शिक्षक , अध्यापक , वस्तू विकणारे मार्केटिंग करणारे आणि गणिती हे सर्व उत्तम बुध असणार्यांमध्ये येतील. बुधाला सर्वात अधिक बिघडवणारा ग्रह म्हणजे राहू . राहू म्हणजे फसवणूक , खोटे बोलणे , खोट्या सह्या , खोटी बनावट कागद पत्रे तयार करणे हे राहू बुधाचे षडयंत्र . बुधाची मिथुन राशी तृतीय स्थानात येते जिथे आपले हात येतात . हातचलाखी करणाराही हा बुधच आहे. बुधाकडे मज्जासंस्था आणि बुद्धी दिलेली आहे . बुद्धी फिरली तर नको ती संकटे मनुष्य ओढवून घेतो आणि नको त्या गोष्टीत अडकतो किंवा फसतो .बुध पत्रिकेत चांगला असेल तर प्रत्येक काम पूर्णत्वाला जायील नाहीतर नाही. बुध चांगला असेल तर बुद्धी चांगली आणि चांगल्या बुद्धी असेल तर हातून चांगलीच कामे होणार अन्यथा नाही. शब्दांची जादू हि व्यक्तीला चांगल्या किंवा वाईट मार्गात सुद्धा नेणारी असते , प्रलोभनात फसवणारी असते .

बुधाकडे त्वचा आहे आणि त्वचेला एक प्रकारचा वास आहे आणि हा ओळखण्याचे चातुर्य श्वानाकडे असल्यामुळे गुन्हेगाराला शोधण्यासाठी पोलीस दलाकडे श्वानपथक तैनात असते. बुधाकडे त्वचा आहे आणि पत्रिकेत बुधासमोर चंद्र असेल तर स्वभावात चांचल्य , धरसोड वृत्ती आणि त्वचा विकार संभवतात . चंद्राच्या किंवा बुधाच्या महादेशेत हि फळे प्रकर्षाने मिळतात .

बुध हा मेंदू , स्मरणशक्ती , मज्जासंस्था ,चयापचय क्रिया, थायरोईड ग्रंथी , वाचा , स्पर्श , फुफुस्से , अभिव्यक्ती आहे. बुध म्हणजे संवाद आणि संवाद आला कि शब्द आलेच. वृश्चिक राशीत खोल पाताळ आहे आणि गुड्डूप्प अंधार . बुध हा लहान मुल आहे तो तिथे घाबरणारच ना त्यामुळे ज्यांचा बुध हा वृश्चिक राशीत असतो ते कमी बोलणारे , सहसा व्यक्त न होणारे असतात . पण हाच बुध बिघडतो तेव्हा बोलण्यात तोतरेपणा ,अडखळत बोलणे , निद्रानाश , बुध त्वचेचा कारक असल्यामुळे कोड , मानसिक दौर्बल्य , झोपेचे प्रोब्लेम ऐकू कमी येणे , स्मरणशक्ती कमकुवत करतो. बुध चांगला असेल तर उच्चार स्पष्ट आणि अनेक भाषांवर प्रभुत्व असते .

बुधाला लहान मुलाची उपमा दिलेली असल्यामुळे मिथुन लग्न किंवा मिथुन राशीच्या व्यक्ती त्यांच्या असणार्या वयापेक्षा  लहान दिसतात कारण बुध वय लपवतो . बुध पत्रिकेत सुस्थितीत असेल तर लहान मुलासारखे मस्तीखोर , क्रिएटीव्ह , कल्पनेत रमणारा पण आनंदी , खोडकर स्वभाव असतो .

शब्द , संवाद आणि बातम्या ह्यावर बुधाचाच अंमल असल्यामुळे ग्रंथलेखन , ज्योतिषी , संपादक , पुस्तक विक्रेते , लहान मुलांची बाल गीते , एजंट , वकील , सेल्स मन, भाषा शिकवणारे , कुरिअर मध्ये काम करणारे , निरोपे, गणिती , राजदूत , पोस्टखाते ,छपाई करणारे ,संगणकाचे व्यवसाय करणारे ह्यात येतात.

बुध जेव्हा वक्री होतो तेव्हा जिव्हा म्हणजेच वाणी सांभाळणे आवश्यक असते . अनेकदा ग्रह वक्री असताना कायम स्वरूपी परिणाम देतात . ह्या काळात कुणालाही बोलून शब्दानेही दुखवले तर आयुष्यभराचे संबंध बिघडतील. बुधाकडे करारमदार आहेत त्यामुळे बुध वक्री असताना अग्रीमेंट मध्ये फसवणूक , वाटाघाटी फिसकटणे हे प्रकार हमखास घडतात .ज्यांची बुध राहू युती आहे त्यांनी आणि राहू महादशा चालू आहे बुध वक्री असताना विशेष काळजी घ्यावी. फसवणूक होऊ नये म्हणून कागदपत्र तपासावे तसेच बोलून आपली पत आणि शब्द वाया घालवण्यापेक्षा श्रवण भक्ती करावी .

ज्योतिषी , गणितज्ञ , समुपदेशक ह्यांच्या पत्रिकेत बुध उत्तम असावा लागतो . दुसर्यावर आपला प्रभाव टाकणे हे बुधाचे कौशल्य आहे . उत्तम वक्तृत्व हेही बुधाकडेच आहे. तसेच रोखठोक वाणी आणि परखड शब्द सुद्धा बुधाचीच देण आहे .

बुध हा बोलघेवडा आहे त्याच्याकडे हिरवी शाई आहे. बुध बिघडला असेल किंवा अधिक सक्षम करायचा असेल तर बुधवारी (निदान 11 बुधवार ) गाईला हिरवा पाला किंवा पालक खायला घालावा . हिरवे मुग दान करावेत आणि जेवणात सुद्धा हिरव्या पालेभाज्या समाविष्ट कराव्यात . बुधवारी विष्णूचा जप करावा. दर पौर्णिमेला सत्यनारायणाचे पूजन करावे .

माणसाची बुद्धी सरळ चालेल कि तिरकस ह्यावर आपले संपूर्ण आयुष्य आणि मिळणारे यश ,मानमरातब  आणि पर्यायाने आपल्या कुटुंबाचाही आनंद असतो. काहीही झाले तरी चुकीचे निर्णय घेवून आपले सुंदर आयुष्य मातीमोल करू नये.

सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230 

Tuesday, 5 September 2023

हृषिकेश

 || श्री स्वामी समर्थ ||



गोपालकृष्ण म्हंटले कि आपल्या चेहऱ्यावर एक स्मित आल्याशिवाय राहत नाही . गोड आणि तितकीच नटखट अश्या कृष्णाची अत्यंत लोभसवाणी छबी आपल्या डोळ्यासमोर येते आणि डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागतात . हिंदू धर्मातील जनमानसात लोकप्रिय आणि आत्यंतिक आवडते दैवत म्हणजे श्री कृष्ण . कृष्णाच्या लीला , त्याच्या खोड्या आणि एकूण चरित्र ऐकत आपण सर्व लहानाचे मोठे झालो आहोत . आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर तो आपल्याला विविध रुपात भेटत जातो . कृष्णलीला आणि कृष्णनीती समजणे अवघड आहे. कृष्णाचे चरित्र समजायला खचितच सोपे नाही इतके विविध पेहलू त्याला आहेत . 

श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला मध्यरात्री ह्या गोजिरवाण्या किसनाचा जन्म झाला . अष्टमी हि अपार सौंदर्याची तिथी आहे. अत्यंत तेजस्वी असे हे बालक जन्माला आले पण ते तुरुंगात .पुढे देवकी आणि यशोदेने त्याचे पोटच्या मुलाच्याही पेक्षा अधिक ममतेने संगोपन केले. देवकी आणि यशोदा ह्या दोन मातांचे प्रेम त्याला लाभले . 

श्रीकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार आहे. रामाने पुढील जन्मात डोक्यावर मोरपीस तुझी आठवण म्हणून मिरवीन हा शब्द माता सीतेचा शोध घेण्यास मदत करणाऱ्या एका मयूरला दिल्यामुळे पुढील जन्मात श्रीकृष्णाच्या मुकुटात ते मोरपीस थाटात डोलताना दिसते. कृष्णाचे बालपण आणि एकूणच जीवन साधे सोपे नव्हते तर पदोपदी त्याला संघर्ष करायला लागला. बलरामासारखा भाऊ पाठीशी होता तरीही जन्मापासून अगदी स्वतःचे टिकवण्याची लढाई त्याला लढावी लागली.

श्रीकृष्णाचा जन्म हा वृषभ लग्नावर आणि रोहिणी नक्षत्रावर आहे जिथे चंद्र स्वतः उच्च आहे. लग्नातील चंद्राने त्याला मोहकता आणि सौंदर्य बहाल केले. कृष्णाचा अवतार संपला आणि कलियुगाची सुरवात झाली असे संदर्भ वाचनात येतात . कृष्ण हा जनमानसाचा खरा देव आहे आणि तो सामान्य जनतेचे रक्षण करतच जगला म्हणूनच जन संरक्षणासाठी त्याने कालीयाला धडा शिकवला. 

आज घरोघरी श्री कृष्णाचा जन्मोत्सव आनंदाने साजरा होत आहे. रात्री 12 वाजता कृष्णाला पाळण्यात घालून आरती नेवेद्य आणि दिवसभर उपवास करून भक्त आपले कृष्णाबद्दलचे प्रेम आणि निस्सीम भक्ती त्याच्या चरणी अर्पण करत आहेत .

पण खरच आपल्याला हा श्रीकृष्ण म्हणजेच हृषिकेश समजला आहे का? कोण आहे हा ? कुठे आहे? आपल्याला संपूर्ण आयुष्यात कधी भेटला आहे का ? हृषिकेश म्हणजे सर्व इंद्रियांचा स्वामी , सर्व इंद्रियांवर ताबा मिळवणारा असा तो हृषीकेश. कुठे आहे तो? तर तो आपल्या आतमध्ये म्हणजेच आपला अंतरात्मा आहे. आपण संपूर्ण आयुष्यात एक क्षणभर तरी आपल्या आत असणार्या ह्या हृशिकेशाला भेटायचा प्रयत्न सुद्धा करत नाही . आज आपण भगवत गीता वाचतो , आजकाल तर शुद्ध उच्चारांसह त्याचा प्रसार अत्यंत जोमाने चालला आहे. पण हे सर्व असले तरी प्रत्यक्ष आयुष्यात कृष्णाने सांगितलेली किती तत्वे आपण खरच आचरणात आणतो हा प्रश्न स्वतःला विचारून पहा .अनेक देवतांचे उत्स्चव आपण साजरे करतो पण त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालत आयुष्य व्यतीत करणे हीच खरी त्या देवतेची सेवा आहे त्यापासून मात्र आपण वंचित राहतो . 


आपल्याला भौतिक सुखांची आजही तितकीच लालसा हाव आहे. मी पणाचा पासून जराही मुक्त झालो नाही आपण .हे शरीर सुद्धा जिथे शाश्वत नाही आपला श्वास सुद्धा आपल्या हातात नाही तरीही सर्व साठवून ठेवण्याची हाव जात नाही. काहीही झाले तरी लगेच राग क्रोध येतो आपल्याला , मानसिक अशांतता आणि पर्यायाने शारीरिक असंख्य व्याधी ह्यातच आपले जीवन व्यतीत होते आणि शेवटच्या क्षणी मात्र आपल्या हा हृषीकेश आठवतो . पण आयुष्य व्यतीत करताना त्याची आठवण का नाही येत आपल्याला? 


हृषीकेश आहे कुठे ? तर तो तुमच्या आमच्यात प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तुत सुद्धा आहे . जिथे जिथे आपले मन जाते तिथे तिथे तो आहे. पण मग असे असूनही आपण अगदी सहज उच्च नीच भेद करतो , प्रत्येकाला कमी आणि स्वतःला अति शहाणे समजतो , आपल्यावाचून सगळ्यांचे अडणार आहे ह्या मूर्ख विचारात स्वतःला गुरफटवून घेतो आणि त्यातच धन्यता मानून जीवन जगत राहतो . माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे , कुणालाही कधीच कमी लेखू नये आणि ईश्वरी अनुसंधान जपत आयुष्य मार्गस्त करावे हि कृष्णाची शिकवण आहे , ती वाचणे आणि प्रत्यक्ष आयुष्यात जगणे ह्या दोन भिन्न  गोष्टी आहेत . मला कृष्ण आवडतो म्हणजे नेमके काय ? त्याने घालून दिलेल्या मर्यादा , शिकवण ह्याचे खरच आयुष्यात पालन करतो आपण ? तर त्याचे निश्चित उत्तर नाही असेच आहे . मोह , एकमेकांचा सतत तिरस्कार करत राहतो , पैशाच्या गुर्मीत वावरतो , दुसर्याचा पाणउतारा करण्याची एकही संधी आपण सोडत नाही. लोभ सुटत नाही आपल्याला . त्याच्यातील ह्या हृशिकेशाला आजन्म दुखावले आहे आपण,  मग हवी कश्याला त्याची संपत्ती ? आणि ती मिळून सुद्धा शांत झोप कधीच लागणार नाही कधीच नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे.  जिवंत असताना कितीही कटू असले तरी हे सत्य आहे. 


कृष्ण कोण आहे ? कृष्ण हि माया , प्रेमाची देवता आहे , प्रेमाचा अखंड झरा आहे कृष्ण .  निस्वार्थ भक्ती आणि करुणा म्हणजेच कृष्ण , अपेक्षाविरहित प्रेम म्हणजे कृष्ण , माणसातील माणुसकी जपत माणसाशी माणसासारखे वागणे , कुणालाही कमी न लेखणे आणि कुणालाही न हिणवणे हि भावना म्हणजे कृष्ण , अहंकाराने जीवनाचा ह्रास होतो म्हणून त्यापासून दूर राहावे  हि शिकवण म्हणजे कृष्ण. सरतेशेवटी समर्पण म्हणजे कृष्ण .  मग त्याच्या पावलावर पाऊल टाकताना आपणही सर्वांच्या प्रेमाच्या लायक होऊ असे वागले पाहिजे. जगावर प्रेम करायला शिकले पाहिजे पण आपण तर प्रत्येकाच्या आत असणार्या ह्या हृषीकेशाला सतत दुखावतो .

श्रीकृष्णाची पूजा केली त्याच्यासमोर दिवसभर बसून जप केला म्हणजे सगळे झाले नाही तर त्याची शिकवण आचरणात आणणे हे सगळ्यात महत्वाचे आहे. आज जन्माष्टमीला आपण पण करुया कि आजपासून आपण कुणालाही दुखावणार नाही कारण आपण एखाद्याला दुखावतो तेव्हा त्याच्यातील “ हृषीकेश “ आपल्याही नकळत दुखावलो जातो त्याचे जराही भान नसते आपल्याला हे दुर्दैव आहे . ह्या नंदसुताला काहीच नको आहे. त्याला फुले , नैवेद्य काहीही नको त्याला तुमच्या अंतरात्म्यातील प्रेम हवे आहे. आणि हेच प्रेम जगातील प्रत्येक व्यक्तीत आहे त्याची देवाण घेवाण करा हेच तर तो आपल्याला सांगत आहे . आपल्या आतमध्ये साठलेला भवनाचा कल्लोळ त्यात हा हृषीकेश गुदमरत आहे. आपले अंतर्मन स्वच्छ असुदे , त्यात ओतप्रोत प्रेम भरलेले असुदे , सर्वांच्या प्रती माया , जिव्हाळा असुदे तरच हा “ हृषीकेश “ आपल्या अंतरात्म्यात सुखावेल . एका दिवसाची जन्माष्टमी साजरी केली म्हणजे काही होत नसते तर त्याची शिकवण आणि आपल्या हृदयातील माणुसकीचा झरा पुढे आजन्म क्षणोक्षणी जतन केला वाहता राहिला तर खर्या अर्थाने “ जन्माष्टमी “ साजरी होईल तीही प्रत्येक क्षणी ....

श्री कृष्णार्पणमस्तु...

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230