Saturday, 21 October 2023

मनस्वी " छबी "

 || श्री स्वामी समर्थ ||



आपल्या मनासारखे काम करायला मिळणे हे एक भाग्याचेच लक्षण आहे. आपले छंद जोपासणे ह्यासारखा दुसरा आनंद नाही पण त्याहीपलीकडे आपल्याला आवडणारी गोष्ट नुसतीच एका छंदापुरती मर्यादित न ठेवता  त्याला व्यवसायाचे रूप देणे ह्यासाठी जिद्द , अभ्यासू वृत्ती , अपार कष्ट मेहनत लागते . 

साडी हा पेहराव सर्व स्त्रीवर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. वय कुठलेही असो साडी म्हणती कि कुठल्याही स्त्रीच्या चेहऱ्यावर लगेच स्मितरेषा उमटते . आजकालच्या आधुनिक जगात रोज आपल्याला वेगवेगळ्या फ्याशनचे कपडे बघायला मिळतात. ह्या सर्व स्पर्धेत टिकून राहणे हे एक आव्हान आहे . आज आपण अशाच एका मैत्रिणीची ओळख करून घेणार आहोत जिने हे आव्हान लीलया पेलले आहे. आपल्यातील कला आणि आधुनिकतेची जोड ह्याची सुरेख सांगड घालून वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तिने “ छबी “ ह्या ब्रांड मध्ये आपल्यासाठी आणल्या आहेत .चला तर गप्पा मारुया “ छबी “ ह्या ब्रांड च्या सर्वेसर्वा  सुप्रिया ढपाले पोवार सोबत.

आजकाल सगळ्यांना  काहीतरी “ हटके “ म्हणजेच काहीतरी वेगळे हवे असते . आजकाल विवाह , साखरपुडा , संगीत मेहेंदी ;अश्या अनेक सोहळ्यात वधू वेगवेगळ्या पेहरावात दिसते . आपण जग कितीही बदलले असे म्हंटले तरी जुने ते सोने हे खरे आहेच . विवाह सोहळा म्हंटला कि आपले सगळे पारंपारिक दागिने आणि साड्या डोळ्यासमोर रुंजी घालतात . अश्यावेळी “ हटके “ अश्या आणि वेगळेपणाचा ठसा असणार्या “ छबी “ ह्या सुप्रिया च्या ब्रांड च्या साड्या मन आकर्षित करतात . 


सुप्रिया मुळची कोल्हापूरची आणि राजाराम महाविद्यालयातून तिने आपले पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले . पुढे MSc ( Environmental Science ) केल्यावर लगेच पुण्यात नोकरी मिळाली . सर्वसामान्य लोकात रमणारी सुप्रिया आजही आपल्या नोकरीतील सर्व सहकार्याशी उत्तम संपर्क ठेवुन आहे . 

नोकरी आणि व्यवसाय ह्यात खूप फरक असतो . व्यवसायात खूप चढ उतार असतात आणि त्यामुळे सर्व कुटुंबाचा पाठींबा असला तरच व्यवसाय यशस्वी होतो. सुप्रियाला तिच्या यजमानांनी आणि घरातील सर्वानीच खूप सहकार्य केले आणि त्यामुळेच आजचे सोन्याचे दिवस ती बघत आहे . नुसताच व्यवसाय नाही तर एक व्यक्ती म्हणून सर्वार्थाने त्यांनी मला घडवले आहे हे ती अभिमानाने सांगते . लग्नानंतर बाळाची चाहूल लागली आणि नोकरी ची मोहीम घराकडे वळली . माहेरी साड्यांचा व्यवसाय होता आणि अगदी कापड कसे विणले जाते ह्या लहान सहान गोष्टींची आणि त्यातील बारकाव्यांची तिला पहिल्यापासून माहिती होती . तिची आई सुद्धा फ्याशन डिझायनर आहे. पण हा व्यवसाय आजच्या प्रगत सोशल मिडीयावर आणण्याचे तिने ठरवले . Digital Marketing चा Course करून आपला व्यवसाय आणि आपले उत्पादन FB , Insta ह्या माध्यमातून लोकांपर्यंत कसे पोहोचवता येयील ह्यासाठी अहोरात्र मेहनत केली . सुप्रियाच्या प्रत्येक गोष्टीमागे अभ्यास असतो त्यामुळे त्याला एक खास असा प्रोफेशनल लुक असतो. आजच्या स्पर्धेला तोंड देताना ग्राहकाला काहीतरी वेगळे देण्याचा सततचा प्रयत्न आणि त्यातूनच निर्माण झालेला खास असा सुप्रिया टच असलेला “ छबी “ हा ब्रांड फार कमी वेळात लोकप्रिय झाला आहे. 

“ खण “ हि महाराष्ट्राची परंपरा , पारंपारिक वस्त्र आहे आणि ह्या परंपरेला आधुनिकतेची झालर लावून काहीतरी वेगळा साज चढवला तर सर्व वयोगटातील स्त्रियांना तो आवडेल हा विचार “ छबी “ तील प्रत्येक साडी करताना होता . “ खण “ ह्या पारंपारिक साडीच्या प्रकारातून काहीतरी वेगळे करण्याचे तिने ठरवले. आजकाल प्रत्येक कापड हे अगदी Authentic असतेच असे नाही त्यात इतरही धागे असतात . त्यामुळे आपण संपूर्णपणे “ Authentic खणाच्या “ साड्या त्याही वेगळ्या लुक मध्ये ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करायचा असे मनोमनी ठरवले आणि सुप्रिया कामाला लागली. तिच्या छबी मधील प्रत्येक साडी वेगळी आहे आणि त्याची रंगसंगती तर मनाला भुरळ पाडणारी आहे. तिच्या studio मध्ये रेशमाच्या रंगांची जणू उधळण आहे आणि मनाला सुखावणार्या आणि मोहित करणाऱ्या वेगवेगळ्या साड्यांची दालने आहेत . 


छबी च्या साड्या वेगळेपणाचा ठसा उमटवतात . स्त्रियांना विचारले कि खरा खण ओळखायचा कसा ? तर त्याचे उत्तर कदाचित देता येयीलच असे नाही त्यामुळे सुप्रियाने खरा खण कसा ओळखायचा ह्याला प्राधान्य दिले आणि त्याबाबत आपल्या ग्राहकांची जनजागृती करण्यास सुरवात केली . खरा खण साड्यांमध्ये काठ हे अधिक पोलिश दिसत असतील तर त्यात polister mix असणार तेव्हा तो खरा खण नाही .  सुप्रियाने 80% कॉटन आणि उरलेले सिल्क म्हणजेच रेशमाचा वापर करून ह्या साड्या तयार केलेल्या आहेत . खण हा जरी पारंपारिक असला तरी आधुनिक फ्याशनची त्याला जोड देऊन सर्वच वयोगटात तो कसा आवडेल हा विचार करून तयार केलेल्या छबिच्या साड्या आज सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेत आहेत . सध्याचा ट्रेंड हा मल्टीडिझायनर आहे म्हणून सुप्रियाने खण आणि इरकल ह्याचे फ्युजन करून एक वेगळाच लुक देणारी खणाची साडी तयार केली. साडी आकर्षक तर आहेच पण हलकी आहे . सहज नेसता येयील अशी आहे. ह्याव्यतिरिक्त फक्त सुती म्हणजे मल कॉटन साड्यांचे एक अप्रतिम दालन आहे. ज्यांना खण नको आहेत त्यांचे ह्या दालनात स्वागत आहे. सर्व प्रकारच्या हवामानात ह्या साड्या नेसता येतील असे सुप्रिया आवर्जून सांगते. 


“ छबी “ हे अगदी वेगळे पण ह्या व्यवसायाला अगदी साजेसे नाव कसे निवडलेस ह्यावर सुप्रिया म्हणाली ब्रांड जितका वेगळा तितके नाव सुद्धा हटकेच असले पाहिजे आणि तेही मराठमोळे . म्हणून तिने अनेक लावण्या ऐकल्या पण शब्द सुचत नव्हते . पण  “ छबीदार छबी “ हे गाणे सहज गुणगुणत असताना तिच्या डोक्यात “ छबी “ घट्ट रुजली . छबी म्हणजे प्रतिमा , एखाद्या स्त्रीची प्रतिमा , स्त्रीच्या सौंदर्याची , मनातील संसाराची प्रतिमा . आणि शेवटी “ छबी “ हे नाव सर्वांनाच आवडले आणि ते फायनल झाले. 

कोल्हापूर इथे सुरवात करत सुप्रियाने आता पुण्यापर्यंतची मजल गाठली आहे . कोल्हापूरचा studio आता अगदी कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागात नव्याने साकारात आहे. आज प्रतिभा नगर कोल्हापूर मध्ये “ छबी “ अभिमानाने उभी आहे. 


मैत्रीणीनो , कुठलाही व्यवसाय सहज सोपा नसतोच . त्यात अपार कष्ट , मेहनत , यश अपयशाच्या पायर्या , कुटुंबाचा पाठींबा , भांडवलाची सोय अश्या एक ना दोन अनेक गोष्टी समाविष्ट असतात . असंख्य हात , अनेकांचे आशीर्वाद आणि आपल्या गुरूंचा वरदहस्त असेल तर काहीच अशक्य नसते . सुप्रियाने आपल्या मनातील स्वप्नांना मेहनतीचे पंख लावले आणि आज तिची छबी तुमच्या आमच्या मनातील खास कोपर्यात विराजमान झाली आहे. 


सोशल मिडीया वरचे , फेसबुक , इंस्टा वरील साड्यांचा लुक , रंगसंगती आपले लक्ष वेधून घेतल्या शिवाय रहात नाही. सुप्रिया आपल्यातीलच एक आहे. एक आई , एक गृहिणी आणि एक व्यावसयिक सुद्धा त्यामुळे प्रत्येक स्त्रीला नक्की काय हवे आहे हे तिला सहज समजते . त्यामुळे ग्राहकांना साडी खरेदी करताना तिच्या सूचनांचा नक्कीच उपयोग होतो . 


आपल्यातील अनेक मैत्रीणीना सुप्रियाचा हा प्रवास नक्कीच प्रेराणादायी ठरले ह्यात शंका नाही. तुमच्या आमच्यात दडलेल्या असंख्य सुप्रिया ह्यातून प्रेरणा घेवून आपापल्या स्वप्नांना फुलवतील तसेच उंच भरारी घेण्यास प्रयत्नशील राहतील अशी आशा आहे. 

सुप्रियाला तिच्या पुढील प्रवासासाठी मनापासून शुभेछ्या . “ छबी “ आम्हाला नेहमीच नवनवीन रुपात पाहायला मिळूदे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना .

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230



  

 


सनई चौघडे

 || श्री स्वामी समर्थ ||


आप्तेष्ट किंवा नात्यात कुणाचा विवाह असेल तरी आपली त्यासाठी किती तयारी असते . आपलेही शॉपिंग आपल्याही नकळत सुरु होते . मग स्वतःचा विवाह असेल तर आपला उत्साह आसमंताला भिडला तर नवल वाटायला नको.

तुळशीचे लग्न झाले कि लग्न सराई सुरु होईल. दोन कुटुंबाना जोडणारा विवाह हा “ सेतू “ च आहे. आपल्या मुलाच्या डोक्यावर अक्षता पडताना पाहणे हे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते आणि ते डोळेभरून पाहता यावे ह्याची तिला आस असते. आजकालच्या काळात विवाहाच्या संज्ञा बदलल्या असल्या तरी शेवटी सप्तपदी करून सनईच्या मंगल सुरात  ते दोघे विवाहाच्या पवित्र बंधनात अडकले जातात , एकमेकांचे होतात आणि आयुष्यातील एका नाजूक हव्याहव्याश्या आणि मधुर सुरेल अश्या वाटेवर एकत्र वाटचाल करायला लागतात . 

हा सहजीवनाचा प्रवास सुखकारक आणि आनंददायी व्हावा हीच प्रत्येकाची इच्छा , मनीषा असते . योग्य जोडीदार मिळणे हे खरच भाग्याचेच लक्षण म्हंटले पाहिजे . असो . पत्रिकेत वैवाहिक सुख पाहताना प्रामुख्याने प्रणयाचा ,शृंगाराचा ग्रह  शुक्र ह्या ग्रहाचा कसून अभ्यास करावा लागतो . विवाह हा सप्तम्स्थानाशी निगडीत असल्यामुळे सप्तम स्थान आणि सप्तमेश तसेच त्यासंबंधी असणारी इतर ग्रहांची स्थिती अभ्यासावी लागते . विवाहासाठी पूरक महादशा सुद्धा लागते . विवाह ज्या जातकाचा आहे त्याची विवाह करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती महत्वाची . तसेच 2 4 5 8 11 12 हि स्थाने आणि त्याचे भावेश पाहावे लागतात . राशी कुंडली मध्ये चंद्राचा सप्तमेश कोण आहे ,चंद्राच्या सप्तमात कुठला ग्रह आहे. तसेच शुक्राच्या सप्तमात कुठला ग्रह आहे हेही पाहावे. दोघांपैकी एकाची दशा षष्ठ स्थानाशी निगडीत असेल तर दुसर्याची नाही ना हे सर्वात आधी पाहावे .


दोन्ही पत्रिकेतील चंद्र अभ्यासावा कारण विवाहानंतर गुलाबी दिवस संपले कि खरा संसार सुरु होतो आणि त्यात अनेक चढ उतार येतात तेव्हा एकमेकांना पडत्या काळात साथ सोबत करण्याची तयारी असली पाहिजे. मी हे लग्न स्वतःच्या मर्जीने केले आहे आणि मी ते टिकवणार आहे हि खुणगाठ मनात पक्की असली पाहिजे कारण लग्न होणे महत्वाचे नाही ते होतेच पण टिकते किती जणांचे ते महत्वाचे आहे . इथे पोकळ अहंकार कामाचा नाही . नुसते 25 गुण आणि 34 गुण जुळतात त्याच्या मागे न लागता ग्रह मिलन पुढील 25-30 वर्षाच्या महादशा , दोघांचे आरोग्य , मानसिकता , संतती योग , अर्थार्जन हे सर्व काही काळजीपूर्वक तपासावे कारण 36 गुण जुळून विवाह केलेली जोडपी घटस्फोटासाठी आज कोर्टाच्या पायर्या झिजवताना दिसत आहेत हे विदारक सत्य आहे. 


आज पूर्वीचा काळ आणि विचार लयास गेले आहेत . आज मुलामुलींचे  विचार आणि अपेक्षा बदलत चालल्या आहेत . विवाहाचे वय सुद्धा पुष्कळ पुढे गेले आहे. त्यामुळे वरील सर्व बाबींचा विचार करूनच निर्णय घ्यावा.

प्रत्येक गोष्टीचा योग असतो आणि नसतोही . अनेक वेळा पत्रिकेतील शापित योग , विष्टी करण जीवनात अडथळे निर्माण करते . गुण मिलन आणि ग्रह मिलन ह्या दोघानाही सारखेच महत्व आहे. नुसते घरच्या मंडळींसाठी विवाह नको कारण हे नाते तुमच्या हृदयाशी  निगडीत आहे आणि ते अनेक अपेक्षा घेवून येणार आहे . ते सर्वार्थाने पेलवणारे आहे कि नाही ह्याचा विवाहपूर्व नाही तर स्थळे पाहण्याआधीच विचार झाला पाहिजे .


सप्तमेश राक्षसगणी नक्षत्रात किंवा पापग्रहांच्या कुयोगात , निचीचा , दुर्बल असेल तर विवाह हे आयुष्यातील मोठे प्रश्नचिन्ह होते.  जातक हा वैचारिक आर्थिक शारीरिक मानसिक आणि लैंगिक दृष्टीने सक्षम असेल तर आणि तरच विवाहाच्या बाबत विचार करावा अन्यथा नाही. आपल्यातील शारीरिक किंवा मानसिक दुर्बलता वैवाहिक सुखात न्यूनता आणते त्यामुळे एखाद्याची फसवणूक करून पापाचे धनी होऊ नये. हे जन्मोजन्मीचे बंधन आहे .एकमेकांच्या मनाचा विचार इथे व्हायलाच हवा. पालकांनी सुद्धा एखादे स्थळ आपल्या अपत्यावर लादू नये. असे केल्यास हे बंधन पुढे जावून फार काळ टिकत नाही हे वेगळे सांगायला नको. 

विचारातील पारदर्शकता आणि खरेपणा हे नाते दीर्घकाळ टिकवेल. आज चंद्र शुक्राच्याच नक्षत्रात आहे. शुक्र हा वैवाहिक सुखाचा  , प्रणयाचा मुख्य कारक म्हणून आज विवाह ह्या विषयाबद्दल लेखन प्रपंच .


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 


Wednesday, 18 October 2023

ग्रहांचे नवमांश बळ

 || श्री स्वामी समर्थ ||



जन्मलग्न कुंडलीचे नवमांश हे स्मुक्ष रूप आहे त्यामुळे नवमांशात ग्रहांचे बळ पाहिल्याशिवाय ग्रह कसे फळणार हे सांगता येत नाही आणि म्हणूनच नवमांश अत्यंत महत्वाचे आहे. प्रत्येक राशीत सव्वा दोन नक्षत्रे आहेत आणि प्रत्येक नक्षत्राचे 4 चरण आहेत त्यामुळे 30 अंशात 9 चरणे म्हणजेच सवा दोन नक्षत्रे समाविष्ट केलेली आहेत . प्रत्येक चरण हे 3 अंश 20 कला चे आहे जो त्या राशीचा नवमांश आहे. आपला जन्मस्थ चंद्र कुठल्या नवमांशात आहे त्यावरून आपली अभिव्यक्ती समजते .

आज धनेशाचा संबंध नवमांशात कश्याप्रकारे येतो त्याबद्दल बघुया . धनस्थान हे तुमचे कुटुंब आणि धन प्राप्ती दर्शवते. 

धनेश जर चंद्राच्या नवमांशात असेल तर अत्यंत हळुवार लाघवी बोलणे असते . चंद्र म्हणजेच जल , जीवन , लक्ष्मी आहे त्यामुळे त्यांच्याकडे सदैव पैशाचा ओघ असतोच .चंद्र हा वनस्पतींचाही कारक आहे त्यामुळे पाणी , वनस्पती ह्या संबंधित व्यवसायातून धनप्राप्ती होते.  समाजिक संस्था किंवा सामाजिक जीवनाशी संबंधित कामातून धनप्राप्ती होते . रवीच्या म्हणजेच राजाच्या नवमांशातील ग्रह राजासारखीच फळे देतील. सन्मार्गाने राजमार्गाने मिळवलेले धन इथे दिसेल. तसेच उच्च अधिकार , रवी राजा आहे आणि विशाल हृदयी , सर्वांचा विचार करणारा , अधिकार असणारा आहे. शिक्षण क्षेत्र विशेष करून व्यवस्थापन क्षेत्रातून धनप्राप्ती आणि त्याच संबंधित शिक्षण असू शकते .

नवमांश मंगळ असेल तर उग्र वाणी नको तितके धाडसी आणि क्रूरपणा , टीकात्मक संवाद आणि त्यातून विसंवाद , अफाट खर्च , टोचून बोलणे , त्यासोबत राहू असेल तर जुगारी प्रवृत्ती आणि त्यातून अर्थार्जन  . मंगळ म्हणजे धाडस म्हणूनच पोलीस किंवा तीनही सेनादलातील नोकरीतून अर्थार्जन . उजवा डोळ्यातून पाणी येऊन उष्णतेचे विकार होतील.

धनेश बुधाच्या नवमांशात असेल तर ..बुध हा बुद्धीचा कारक , बिरबला सारखे चातुर्य , उत्तम गणिती , बुध हा वाणी आहे त्यामुळे पैशाच्या हिशोबात चोख , उत्तम तर्कशक्ती आणि त्याचे आपल्या संवादातून प्रदर्शन . डोळे मिचमिचे , बारीक .

शुक्रासारख्या रसिक ग्रहाच्या नवमांशामध्ये ग्रह असेल तर आनंद सौख्य प्राप्ती कारण शुक्र मनमिळाऊ माणसे जोडणारा गोडवा जपणारा आहे.कलेचा अविष्कार , स्त्रीकडून लाभ करून देणारा , बोलणे मधाळ , शुक्राच्या संबंधित व्यवसाय केले तर अर्थार्जन उत्तम होयील. शुक्र दुषित असेल तर जुगारी वृत्ती , व्यसनाधीनता हि फळे प्रकर्षाने मिळतील.


धनेश गुरु च्या नवमांशात असेल तर व्यक्ती आपल्या उत्तम वाणीतून पैसा मिळवेल. गुरु हा ज्ञानाचा महासागर आहे . वायफळ बोलणे नाही आणि त्याला तितका वेळ सुद्धा नाही . तर्कशुद्ध , ज्ञानात भर पडणारे आणि विचारमंथन करायला लावणारे असे उत्तम विचार त्याला मिळतील आणि त्यातून अर्थार्जनाचे मार्ग व्यक्ती शोधेल. गुरु अध्ययन दर्शवतो त्यामुळे शिक्षकी पेशा , महाविद्यालयात नोकरी .लोकांना मदत करण्याची वृत्ती आणि परोपकार त्यामुळे समाजात मनाचे स्थान आणि त्यातून लोकसंग्रह हा व्यवसायाला पूरक ठरतो. अनेकदा गुरु कफ पण देतो. मूळ पत्रिकेतील गुरु बिघडला असेल तर पोकळ डामडौल असतो . 

शनी असल्यास कमी बोलणारा शांत प्रवृत्तीचा ,निरस पण बोलेल तेव्हा कदाचित मोजक्याच शब्दात बोलणारा . शनी       कष्टकरी वर्गाचा कारक असल्यामुळे अथक परिश्रमातून अर्थार्जन होयील. सहज सोपे काहीच मिळणार नाही . आर्थिक स्थिती हळूहळू उंचावेल एका रात्रीत श्रीमंती कधीच नाही .बोलण्यात संथपणा , आणि दोष असू शकेल.  शनी वक्री असेल तर अचानक धन लाभ करून देयील आणि धन टिकणार सुद्धा नाही . 

नवमांश कुंडली आणि जन्मलग्न कुंडलीचा अभ्यास परिपूर्ण असावा . 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

अध्यात्म योग

 ||श्री स्वामी समर्थ ||



ईश्वर हा आपल्या अवतीभवतीच असतो . आपल्या अध्यात्मिक प्रवासातील गुरु हे ईश्वराचेच सगुण रूप असतात . संतानी समाज सुधारण्यासाठी मनुष्य रूप धारण केले ,लोक निंदा सहन केली त्यांच्यात सुद्धा ईश्वराचा अंश असतोच . संत हे परमेश्वरी शक्तीचा अविष्कार आहे. आपली ईश्वरभक्ती खरी असेल तर त्याचे दर्शन अनेक माध्यमातून रूपातून आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही .


एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेतील अध्यात्मिक साधना मनाचा कारक चंद्र ,पंचमेश , पंचम स्थान , भाग्य स्थान , व्ययेश व्ययस्थान गुरु शनी नेप केतू ह्यांच्यावर असते. पत्रिकेतील मोक्ष आणि धर्म त्रिकोण सुद्धा ह्याबाबत संकेत देत असतो. 


उपासना , ध्यानधारणा ह्याचा कारक गुरु हा अध्यात्मिक मार्गातील एकेक वीट ठेवण्यास कारणीभूत होतो . चंद्र हा मनातील भावनांचा कारक ग्रह असून नेप गुरु ह्यांच्यासोबत होणार्या शुभ योगात उच्च कोटीची अध्यात्मिक साधना प्रदान करतो. भोग भोगून मुक्त व्हा हे सांगणारा शनी पूर्व सुकृताचे दर्शन घडवतो आणि मोक्षाकडे नेतो तर नेप अंत स्फूर्ती देतो.


अध्यात्मातील रुची देणारा गुरु तर भक्तीचा कळस गाठणारा शनी आणि केतू . अग्नितत्वाच्या राशी पारमार्थिक प्रगतीत अग्रेसर मानल्या आहेत.  प्रपंच करताना केलेला परमार्थ हाच सर्वश्रेष्ठ असतो . म्हणूनच म्हंटले आहे ..देवाचिये द्वारी उभा क्षणभरी .अध्यात्मात येण्याचेही योग असतात . एकदा ह्या वाटेवरून प्रवास सुरु झाला कि कश्याचेच भय वाटत नाही. सुख दुक्खाच्या पलीकडे नेणारा आणि मनाची शांतता संतुलित ठेवणारा हा योग आहे.  अध्यात्मिक आनंद लुटता आला पाहिजे . 

आपल्या आराध्याच्या सेवेत मन प्रसन्न करणारा हा योग प्राप्त होणे हे सौभाग्य आहे. 


साधारणतः गुरू च्या राशींचे लग्न वा कुंभ लग्न या लग्नावर जन्मलेल्या या संतांच्या कुंडलीत बहुतेक गुरू ,शनी सोबत  बुधाशी नवपंचम योग,  चंद्र गुरू  नवपंचम योग, वर्गोत्तम गुरू,लग्नेश व पंचमेश यांचे अन्योन्य योग, लग्नेश पंचमात, भाग्येश पंचमात,लग्नेश भाग्यात उच्च राशीला, पंचमेश पंचमात, रवि हर्षल युती हे योग ठळकपणे दिसतात.


पंचमस्थान व पंचमेश यांचा परमार्थातील उपासना, जपजाप्य, दैनिक व नित्य उपासना यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे


श्रद्धा भक्ति व उपासना यांचा विचार पंचम स्थानावरून केला जातो. पंचम स्थानी शुभ ग्रह, पंचमेश पंचमात, पंचम स्थानाचा शुभ ग्रहाचा योग आला असता व्यक्तीच्या जीवनात  नित्य उपासना , नामस्मरण व जप जाप्य यांना विशेष स्थान मिळते. शुक्र म्हणजे भक्ती गुरू म्हणजे ज्ञान आणि केतू व शनी म्हणजे वैराग्य यातच जर रवि हर्षल युती, चंद्र नेपचून युती वा बुधप्लुटो युती या तिन्ही युती अनुक्रमे शरीर ,मन आणि बुद्धी या तिन्ही पातळीवर अध्यात्मिक ज्ञानास प्रगतिकारक ठरतात


रवि हर्षल,रवि नेपचून, चंद्र हर्षल,गुरू नेपचून व बुध नेपचून या ग्रहांतील अंशात्मक  युती योग मंत्र शास्त्र व योगाभ्यास या साठी अत्यन्त परिणामकारक ठरतात.


लग्नी गुरू व्यक्तीला धर्म परायण,सांस्कृतिक प्रेम,समाजप्रेम हे गुण दर्शवतो. मंगळ गुरूच्या धनु व मीन राशीत धर्म अभिमान, उपासना, सांप्रदायिकता,अशी फळे देतो. शनी व गुरू यांच्यातील लाभ, नवपंचम हे शुभ योग व्यक्तीला वैराग्य, वेदांत अभ्यास व तत्त्वचिंतन या साठी सर्वोत्तम योग आहेत


संकलन : सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230