|| श्री स्वामी समर्थ ||
जन्मलग्न कुंडलीचे नवमांश हे स्मुक्ष रूप आहे त्यामुळे नवमांशात ग्रहांचे बळ पाहिल्याशिवाय ग्रह कसे फळणार हे सांगता येत नाही आणि म्हणूनच नवमांश अत्यंत महत्वाचे आहे. प्रत्येक राशीत सव्वा दोन नक्षत्रे आहेत आणि प्रत्येक नक्षत्राचे 4 चरण आहेत त्यामुळे 30 अंशात 9 चरणे म्हणजेच सवा दोन नक्षत्रे समाविष्ट केलेली आहेत . प्रत्येक चरण हे 3 अंश 20 कला चे आहे जो त्या राशीचा नवमांश आहे. आपला जन्मस्थ चंद्र कुठल्या नवमांशात आहे त्यावरून आपली अभिव्यक्ती समजते .
आज धनेशाचा संबंध नवमांशात कश्याप्रकारे येतो त्याबद्दल बघुया . धनस्थान हे तुमचे कुटुंब आणि धन प्राप्ती दर्शवते.
धनेश जर चंद्राच्या नवमांशात असेल तर अत्यंत हळुवार लाघवी बोलणे असते . चंद्र म्हणजेच जल , जीवन , लक्ष्मी आहे त्यामुळे त्यांच्याकडे सदैव पैशाचा ओघ असतोच .चंद्र हा वनस्पतींचाही कारक आहे त्यामुळे पाणी , वनस्पती ह्या संबंधित व्यवसायातून धनप्राप्ती होते. समाजिक संस्था किंवा सामाजिक जीवनाशी संबंधित कामातून धनप्राप्ती होते . रवीच्या म्हणजेच राजाच्या नवमांशातील ग्रह राजासारखीच फळे देतील. सन्मार्गाने राजमार्गाने मिळवलेले धन इथे दिसेल. तसेच उच्च अधिकार , रवी राजा आहे आणि विशाल हृदयी , सर्वांचा विचार करणारा , अधिकार असणारा आहे. शिक्षण क्षेत्र विशेष करून व्यवस्थापन क्षेत्रातून धनप्राप्ती आणि त्याच संबंधित शिक्षण असू शकते .
नवमांश मंगळ असेल तर उग्र वाणी नको तितके धाडसी आणि क्रूरपणा , टीकात्मक संवाद आणि त्यातून विसंवाद , अफाट खर्च , टोचून बोलणे , त्यासोबत राहू असेल तर जुगारी प्रवृत्ती आणि त्यातून अर्थार्जन . मंगळ म्हणजे धाडस म्हणूनच पोलीस किंवा तीनही सेनादलातील नोकरीतून अर्थार्जन . उजवा डोळ्यातून पाणी येऊन उष्णतेचे विकार होतील.
धनेश बुधाच्या नवमांशात असेल तर ..बुध हा बुद्धीचा कारक , बिरबला सारखे चातुर्य , उत्तम गणिती , बुध हा वाणी आहे त्यामुळे पैशाच्या हिशोबात चोख , उत्तम तर्कशक्ती आणि त्याचे आपल्या संवादातून प्रदर्शन . डोळे मिचमिचे , बारीक .
शुक्रासारख्या रसिक ग्रहाच्या नवमांशामध्ये ग्रह असेल तर आनंद सौख्य प्राप्ती कारण शुक्र मनमिळाऊ माणसे जोडणारा गोडवा जपणारा आहे.कलेचा अविष्कार , स्त्रीकडून लाभ करून देणारा , बोलणे मधाळ , शुक्राच्या संबंधित व्यवसाय केले तर अर्थार्जन उत्तम होयील. शुक्र दुषित असेल तर जुगारी वृत्ती , व्यसनाधीनता हि फळे प्रकर्षाने मिळतील.
धनेश गुरु च्या नवमांशात असेल तर व्यक्ती आपल्या उत्तम वाणीतून पैसा मिळवेल. गुरु हा ज्ञानाचा महासागर आहे . वायफळ बोलणे नाही आणि त्याला तितका वेळ सुद्धा नाही . तर्कशुद्ध , ज्ञानात भर पडणारे आणि विचारमंथन करायला लावणारे असे उत्तम विचार त्याला मिळतील आणि त्यातून अर्थार्जनाचे मार्ग व्यक्ती शोधेल. गुरु अध्ययन दर्शवतो त्यामुळे शिक्षकी पेशा , महाविद्यालयात नोकरी .लोकांना मदत करण्याची वृत्ती आणि परोपकार त्यामुळे समाजात मनाचे स्थान आणि त्यातून लोकसंग्रह हा व्यवसायाला पूरक ठरतो. अनेकदा गुरु कफ पण देतो. मूळ पत्रिकेतील गुरु बिघडला असेल तर पोकळ डामडौल असतो .
शनी असल्यास कमी बोलणारा शांत प्रवृत्तीचा ,निरस पण बोलेल तेव्हा कदाचित मोजक्याच शब्दात बोलणारा . शनी कष्टकरी वर्गाचा कारक असल्यामुळे अथक परिश्रमातून अर्थार्जन होयील. सहज सोपे काहीच मिळणार नाही . आर्थिक स्थिती हळूहळू उंचावेल एका रात्रीत श्रीमंती कधीच नाही .बोलण्यात संथपणा , आणि दोष असू शकेल. शनी वक्री असेल तर अचानक धन लाभ करून देयील आणि धन टिकणार सुद्धा नाही .
नवमांश कुंडली आणि जन्मलग्न कुंडलीचा अभ्यास परिपूर्ण असावा .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment