|| श्री स्वामी समर्थ ||
आपल्या मनासारखे काम करायला मिळणे हे एक भाग्याचेच लक्षण आहे. आपले छंद जोपासणे ह्यासारखा दुसरा आनंद नाही पण त्याहीपलीकडे आपल्याला आवडणारी गोष्ट नुसतीच एका छंदापुरती मर्यादित न ठेवता त्याला व्यवसायाचे रूप देणे ह्यासाठी जिद्द , अभ्यासू वृत्ती , अपार कष्ट मेहनत लागते .
साडी हा पेहराव सर्व स्त्रीवर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. वय कुठलेही असो साडी म्हणती कि कुठल्याही स्त्रीच्या चेहऱ्यावर लगेच स्मितरेषा उमटते . आजकालच्या आधुनिक जगात रोज आपल्याला वेगवेगळ्या फ्याशनचे कपडे बघायला मिळतात. ह्या सर्व स्पर्धेत टिकून राहणे हे एक आव्हान आहे . आज आपण अशाच एका मैत्रिणीची ओळख करून घेणार आहोत जिने हे आव्हान लीलया पेलले आहे. आपल्यातील कला आणि आधुनिकतेची जोड ह्याची सुरेख सांगड घालून वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तिने “ छबी “ ह्या ब्रांड मध्ये आपल्यासाठी आणल्या आहेत .चला तर गप्पा मारुया “ छबी “ ह्या ब्रांड च्या सर्वेसर्वा सुप्रिया ढपाले पोवार सोबत.
आजकाल सगळ्यांना काहीतरी “ हटके “ म्हणजेच काहीतरी वेगळे हवे असते . आजकाल विवाह , साखरपुडा , संगीत मेहेंदी ;अश्या अनेक सोहळ्यात वधू वेगवेगळ्या पेहरावात दिसते . आपण जग कितीही बदलले असे म्हंटले तरी जुने ते सोने हे खरे आहेच . विवाह सोहळा म्हंटला कि आपले सगळे पारंपारिक दागिने आणि साड्या डोळ्यासमोर रुंजी घालतात . अश्यावेळी “ हटके “ अश्या आणि वेगळेपणाचा ठसा असणार्या “ छबी “ ह्या सुप्रिया च्या ब्रांड च्या साड्या मन आकर्षित करतात .
सुप्रिया मुळची कोल्हापूरची आणि राजाराम महाविद्यालयातून तिने आपले पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले . पुढे MSc ( Environmental Science ) केल्यावर लगेच पुण्यात नोकरी मिळाली . सर्वसामान्य लोकात रमणारी सुप्रिया आजही आपल्या नोकरीतील सर्व सहकार्याशी उत्तम संपर्क ठेवुन आहे .
नोकरी आणि व्यवसाय ह्यात खूप फरक असतो . व्यवसायात खूप चढ उतार असतात आणि त्यामुळे सर्व कुटुंबाचा पाठींबा असला तरच व्यवसाय यशस्वी होतो. सुप्रियाला तिच्या यजमानांनी आणि घरातील सर्वानीच खूप सहकार्य केले आणि त्यामुळेच आजचे सोन्याचे दिवस ती बघत आहे . नुसताच व्यवसाय नाही तर एक व्यक्ती म्हणून सर्वार्थाने त्यांनी मला घडवले आहे हे ती अभिमानाने सांगते . लग्नानंतर बाळाची चाहूल लागली आणि नोकरी ची मोहीम घराकडे वळली . माहेरी साड्यांचा व्यवसाय होता आणि अगदी कापड कसे विणले जाते ह्या लहान सहान गोष्टींची आणि त्यातील बारकाव्यांची तिला पहिल्यापासून माहिती होती . तिची आई सुद्धा फ्याशन डिझायनर आहे. पण हा व्यवसाय आजच्या प्रगत सोशल मिडीयावर आणण्याचे तिने ठरवले . Digital Marketing चा Course करून आपला व्यवसाय आणि आपले उत्पादन FB , Insta ह्या माध्यमातून लोकांपर्यंत कसे पोहोचवता येयील ह्यासाठी अहोरात्र मेहनत केली . सुप्रियाच्या प्रत्येक गोष्टीमागे अभ्यास असतो त्यामुळे त्याला एक खास असा प्रोफेशनल लुक असतो. आजच्या स्पर्धेला तोंड देताना ग्राहकाला काहीतरी वेगळे देण्याचा सततचा प्रयत्न आणि त्यातूनच निर्माण झालेला खास असा सुप्रिया टच असलेला “ छबी “ हा ब्रांड फार कमी वेळात लोकप्रिय झाला आहे.
“ खण “ हि महाराष्ट्राची परंपरा , पारंपारिक वस्त्र आहे आणि ह्या परंपरेला आधुनिकतेची झालर लावून काहीतरी वेगळा साज चढवला तर सर्व वयोगटातील स्त्रियांना तो आवडेल हा विचार “ छबी “ तील प्रत्येक साडी करताना होता . “ खण “ ह्या पारंपारिक साडीच्या प्रकारातून काहीतरी वेगळे करण्याचे तिने ठरवले. आजकाल प्रत्येक कापड हे अगदी Authentic असतेच असे नाही त्यात इतरही धागे असतात . त्यामुळे आपण संपूर्णपणे “ Authentic खणाच्या “ साड्या त्याही वेगळ्या लुक मध्ये ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करायचा असे मनोमनी ठरवले आणि सुप्रिया कामाला लागली. तिच्या छबी मधील प्रत्येक साडी वेगळी आहे आणि त्याची रंगसंगती तर मनाला भुरळ पाडणारी आहे. तिच्या studio मध्ये रेशमाच्या रंगांची जणू उधळण आहे आणि मनाला सुखावणार्या आणि मोहित करणाऱ्या वेगवेगळ्या साड्यांची दालने आहेत .
छबी च्या साड्या वेगळेपणाचा ठसा उमटवतात . स्त्रियांना विचारले कि खरा खण ओळखायचा कसा ? तर त्याचे उत्तर कदाचित देता येयीलच असे नाही त्यामुळे सुप्रियाने खरा खण कसा ओळखायचा ह्याला प्राधान्य दिले आणि त्याबाबत आपल्या ग्राहकांची जनजागृती करण्यास सुरवात केली . खरा खण साड्यांमध्ये काठ हे अधिक पोलिश दिसत असतील तर त्यात polister mix असणार तेव्हा तो खरा खण नाही . सुप्रियाने 80% कॉटन आणि उरलेले सिल्क म्हणजेच रेशमाचा वापर करून ह्या साड्या तयार केलेल्या आहेत . खण हा जरी पारंपारिक असला तरी आधुनिक फ्याशनची त्याला जोड देऊन सर्वच वयोगटात तो कसा आवडेल हा विचार करून तयार केलेल्या छबिच्या साड्या आज सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेत आहेत . सध्याचा ट्रेंड हा मल्टीडिझायनर आहे म्हणून सुप्रियाने खण आणि इरकल ह्याचे फ्युजन करून एक वेगळाच लुक देणारी खणाची साडी तयार केली. साडी आकर्षक तर आहेच पण हलकी आहे . सहज नेसता येयील अशी आहे. ह्याव्यतिरिक्त फक्त सुती म्हणजे मल कॉटन साड्यांचे एक अप्रतिम दालन आहे. ज्यांना खण नको आहेत त्यांचे ह्या दालनात स्वागत आहे. सर्व प्रकारच्या हवामानात ह्या साड्या नेसता येतील असे सुप्रिया आवर्जून सांगते.
“ छबी “ हे अगदी वेगळे पण ह्या व्यवसायाला अगदी साजेसे नाव कसे निवडलेस ह्यावर सुप्रिया म्हणाली ब्रांड जितका वेगळा तितके नाव सुद्धा हटकेच असले पाहिजे आणि तेही मराठमोळे . म्हणून तिने अनेक लावण्या ऐकल्या पण शब्द सुचत नव्हते . पण “ छबीदार छबी “ हे गाणे सहज गुणगुणत असताना तिच्या डोक्यात “ छबी “ घट्ट रुजली . छबी म्हणजे प्रतिमा , एखाद्या स्त्रीची प्रतिमा , स्त्रीच्या सौंदर्याची , मनातील संसाराची प्रतिमा . आणि शेवटी “ छबी “ हे नाव सर्वांनाच आवडले आणि ते फायनल झाले.
कोल्हापूर इथे सुरवात करत सुप्रियाने आता पुण्यापर्यंतची मजल गाठली आहे . कोल्हापूरचा studio आता अगदी कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागात नव्याने साकारात आहे. आज प्रतिभा नगर कोल्हापूर मध्ये “ छबी “ अभिमानाने उभी आहे.
मैत्रीणीनो , कुठलाही व्यवसाय सहज सोपा नसतोच . त्यात अपार कष्ट , मेहनत , यश अपयशाच्या पायर्या , कुटुंबाचा पाठींबा , भांडवलाची सोय अश्या एक ना दोन अनेक गोष्टी समाविष्ट असतात . असंख्य हात , अनेकांचे आशीर्वाद आणि आपल्या गुरूंचा वरदहस्त असेल तर काहीच अशक्य नसते . सुप्रियाने आपल्या मनातील स्वप्नांना मेहनतीचे पंख लावले आणि आज तिची छबी तुमच्या आमच्या मनातील खास कोपर्यात विराजमान झाली आहे.
सोशल मिडीया वरचे , फेसबुक , इंस्टा वरील साड्यांचा लुक , रंगसंगती आपले लक्ष वेधून घेतल्या शिवाय रहात नाही. सुप्रिया आपल्यातीलच एक आहे. एक आई , एक गृहिणी आणि एक व्यावसयिक सुद्धा त्यामुळे प्रत्येक स्त्रीला नक्की काय हवे आहे हे तिला सहज समजते . त्यामुळे ग्राहकांना साडी खरेदी करताना तिच्या सूचनांचा नक्कीच उपयोग होतो .
आपल्यातील अनेक मैत्रीणीना सुप्रियाचा हा प्रवास नक्कीच प्रेराणादायी ठरले ह्यात शंका नाही. तुमच्या आमच्यात दडलेल्या असंख्य सुप्रिया ह्यातून प्रेरणा घेवून आपापल्या स्वप्नांना फुलवतील तसेच उंच भरारी घेण्यास प्रयत्नशील राहतील अशी आशा आहे.
सुप्रियाला तिच्या पुढील प्रवासासाठी मनापासून शुभेछ्या . “ छबी “ आम्हाला नेहमीच नवनवीन रुपात पाहायला मिळूदे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment