Saturday, 21 October 2023

सनई चौघडे

 || श्री स्वामी समर्थ ||


आप्तेष्ट किंवा नात्यात कुणाचा विवाह असेल तरी आपली त्यासाठी किती तयारी असते . आपलेही शॉपिंग आपल्याही नकळत सुरु होते . मग स्वतःचा विवाह असेल तर आपला उत्साह आसमंताला भिडला तर नवल वाटायला नको.

तुळशीचे लग्न झाले कि लग्न सराई सुरु होईल. दोन कुटुंबाना जोडणारा विवाह हा “ सेतू “ च आहे. आपल्या मुलाच्या डोक्यावर अक्षता पडताना पाहणे हे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते आणि ते डोळेभरून पाहता यावे ह्याची तिला आस असते. आजकालच्या काळात विवाहाच्या संज्ञा बदलल्या असल्या तरी शेवटी सप्तपदी करून सनईच्या मंगल सुरात  ते दोघे विवाहाच्या पवित्र बंधनात अडकले जातात , एकमेकांचे होतात आणि आयुष्यातील एका नाजूक हव्याहव्याश्या आणि मधुर सुरेल अश्या वाटेवर एकत्र वाटचाल करायला लागतात . 

हा सहजीवनाचा प्रवास सुखकारक आणि आनंददायी व्हावा हीच प्रत्येकाची इच्छा , मनीषा असते . योग्य जोडीदार मिळणे हे खरच भाग्याचेच लक्षण म्हंटले पाहिजे . असो . पत्रिकेत वैवाहिक सुख पाहताना प्रामुख्याने प्रणयाचा ,शृंगाराचा ग्रह  शुक्र ह्या ग्रहाचा कसून अभ्यास करावा लागतो . विवाह हा सप्तम्स्थानाशी निगडीत असल्यामुळे सप्तम स्थान आणि सप्तमेश तसेच त्यासंबंधी असणारी इतर ग्रहांची स्थिती अभ्यासावी लागते . विवाहासाठी पूरक महादशा सुद्धा लागते . विवाह ज्या जातकाचा आहे त्याची विवाह करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती महत्वाची . तसेच 2 4 5 8 11 12 हि स्थाने आणि त्याचे भावेश पाहावे लागतात . राशी कुंडली मध्ये चंद्राचा सप्तमेश कोण आहे ,चंद्राच्या सप्तमात कुठला ग्रह आहे. तसेच शुक्राच्या सप्तमात कुठला ग्रह आहे हेही पाहावे. दोघांपैकी एकाची दशा षष्ठ स्थानाशी निगडीत असेल तर दुसर्याची नाही ना हे सर्वात आधी पाहावे .


दोन्ही पत्रिकेतील चंद्र अभ्यासावा कारण विवाहानंतर गुलाबी दिवस संपले कि खरा संसार सुरु होतो आणि त्यात अनेक चढ उतार येतात तेव्हा एकमेकांना पडत्या काळात साथ सोबत करण्याची तयारी असली पाहिजे. मी हे लग्न स्वतःच्या मर्जीने केले आहे आणि मी ते टिकवणार आहे हि खुणगाठ मनात पक्की असली पाहिजे कारण लग्न होणे महत्वाचे नाही ते होतेच पण टिकते किती जणांचे ते महत्वाचे आहे . इथे पोकळ अहंकार कामाचा नाही . नुसते 25 गुण आणि 34 गुण जुळतात त्याच्या मागे न लागता ग्रह मिलन पुढील 25-30 वर्षाच्या महादशा , दोघांचे आरोग्य , मानसिकता , संतती योग , अर्थार्जन हे सर्व काही काळजीपूर्वक तपासावे कारण 36 गुण जुळून विवाह केलेली जोडपी घटस्फोटासाठी आज कोर्टाच्या पायर्या झिजवताना दिसत आहेत हे विदारक सत्य आहे. 


आज पूर्वीचा काळ आणि विचार लयास गेले आहेत . आज मुलामुलींचे  विचार आणि अपेक्षा बदलत चालल्या आहेत . विवाहाचे वय सुद्धा पुष्कळ पुढे गेले आहे. त्यामुळे वरील सर्व बाबींचा विचार करूनच निर्णय घ्यावा.

प्रत्येक गोष्टीचा योग असतो आणि नसतोही . अनेक वेळा पत्रिकेतील शापित योग , विष्टी करण जीवनात अडथळे निर्माण करते . गुण मिलन आणि ग्रह मिलन ह्या दोघानाही सारखेच महत्व आहे. नुसते घरच्या मंडळींसाठी विवाह नको कारण हे नाते तुमच्या हृदयाशी  निगडीत आहे आणि ते अनेक अपेक्षा घेवून येणार आहे . ते सर्वार्थाने पेलवणारे आहे कि नाही ह्याचा विवाहपूर्व नाही तर स्थळे पाहण्याआधीच विचार झाला पाहिजे .


सप्तमेश राक्षसगणी नक्षत्रात किंवा पापग्रहांच्या कुयोगात , निचीचा , दुर्बल असेल तर विवाह हे आयुष्यातील मोठे प्रश्नचिन्ह होते.  जातक हा वैचारिक आर्थिक शारीरिक मानसिक आणि लैंगिक दृष्टीने सक्षम असेल तर आणि तरच विवाहाच्या बाबत विचार करावा अन्यथा नाही. आपल्यातील शारीरिक किंवा मानसिक दुर्बलता वैवाहिक सुखात न्यूनता आणते त्यामुळे एखाद्याची फसवणूक करून पापाचे धनी होऊ नये. हे जन्मोजन्मीचे बंधन आहे .एकमेकांच्या मनाचा विचार इथे व्हायलाच हवा. पालकांनी सुद्धा एखादे स्थळ आपल्या अपत्यावर लादू नये. असे केल्यास हे बंधन पुढे जावून फार काळ टिकत नाही हे वेगळे सांगायला नको. 

विचारातील पारदर्शकता आणि खरेपणा हे नाते दीर्घकाळ टिकवेल. आज चंद्र शुक्राच्याच नक्षत्रात आहे. शुक्र हा वैवाहिक सुखाचा  , प्रणयाचा मुख्य कारक म्हणून आज विवाह ह्या विषयाबद्दल लेखन प्रपंच .


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 


No comments:

Post a Comment