Wednesday, 13 January 2021

हिमालय – उगम अध्यात्माचा

 || श्री स्वामी समर्थ ||



हिमालय


लहान मोठे सगळ्यांनाच वेड लावणारा असा हा हिमालय .आशिया खंडातील सर्वात मोठी पर्वतांची शृंखला आणि  जगातील सर्वांत उंचच उंच पर्वतरांग. संस्कृत भाषेत हिम म्हणजे बर्फ असा उल्लेख आढळतो. माउंट एव्हरेस्ट हे त्यातील सर्वोत उंच शिखर. हिमालयाच्या प्रभावामुळे भारतातील उप खंडावर वरून राजाची कृपा आहे तसेच उत्तुंग शिखारांमुळे भारतातील उपखंड उबदार राहण्यासही मदत होते. गंगा ,ब्रम्हपुत्रा ,सिंधू ,झेलम , बियास ,सतलज अश्या अनेक पवित्र नद्यांचे उगमस्थान हिमालायाच्याच कुशीतून झाले आहे.हिमालयाची विशालता ,भव्यता पाहताना आपण खूप लहान  असल्याची जाणीव होते. हिमालय एका  तपस्व्या  सारखा भासतो आणि तुम्हाला शांत ,संयमी बनवतो. हिमालयाची ओळख म्हंटली कि डोळ्यासमोर येतात ती बर्फाच्यादित हिमशिखरे. परमेश्वराने निसर्गाची निर्मिती हि मनुष्य जीवनाला पूरक ठरेल अशीच केली आहे. पावलोपावली जसा निसर्ग बदलतो अगदी तसेच आपले जीवनही .त्यामुळे ज्याला निसर्ग समजला त्याला जीवनही कळले.

पण मंडळी ह्या सर्वच्या पलीकडे जावूनही हिमालयाची आज वेगळी ओळख ह्या लेखाद्वारे तुम्हाला करून देण्याचा लहानसा प्रयत्न आहे. योग्यांना त्यांच्या प्रज्ञाचक्षूच्या विकासासाठी हिमालय मदत करतो व त्यांचे आत्मचिंतन दृढ करतो. संस्कृत भाषेतील महाकाव्यं हिमालयालाच मदतीला बोलावतात. आपल्या उत्तम गुणसंभाराने विश्वाला संमोहीत करणारा हिमालय इतिहासाला आपली दखल घ्यावयास लावतो , भूगोलालाही आपल्या प्रसादमयतेची साक्ष जतन करावयास शिकवतो. हिमालय हे सुरक्षिततेचे आगर आहे. आत्मज्ञानाचे भांडार आहे , अक्षय तत्वाशी असलेल्या ह्या हिमालयातील निसर्गहि तितकाच विलोभनीय आहे. ज्यांनी हिमालयाला आपला मी चिकटवला ते हिमालयच झाले. परमशांतीचा आणि तृप्ततेचा उगम म्हणजे साक्षात  हिमालय. द्वेषातील शत्रुत्व गैर असल्याचे हिमालय सांगतो. त्याच्या जवळील औषधी वनस्पतींनी रोगनिवारणही करतो. हिमालय म्हणजे शिवतत्त्वाचे अधिष्ठान. आपल्या आश्वासकतेतून आशीर्वाद देताना मूकपणाने हिमालय जणू सांगतो, परमात्म्याला आठवत, मनात साठवत आपले जीवन ईश्वरमय करून टाकण्यातच कल्याण आहे.

पर्यटन हे विविध हेतूने केले जाते . कधी फक्त सुट्टी म्हणून ,कधी निसर्गाच्या सानिध्यात ,भटकंती आणि मग त्याचबरोबर निवांतपणा मिळावा म्हणून तर कधी देवदर्शनासाठीही . हिमालयाच्या कुशीत असलेल्या ह्या सर्व तीर्थांचे प्रत्येकाचे असे एक विशिष्ट स्थान आहे. पुराणकाळापासून ऋषीमुनी हिमालयात जावून वर्षानुवर्षे साधना ,तप करत ह्याचा उल्लेख आपण वाचतो ऐकतो..खरच चारधाम यात्रा ,अमरनाथ यात्रा ह्या तर आनंदाने करायच्याच आहेत ,मनासारखे देवदर्शनी होणार आहे पण ह्या ठिकाणाचे स्थान महत्व जर आपण समजून घेतले तर ह्या सर्व यात्रां करण्याचा आपल्या सर्वांचा आनंद नक्कीच द्विगुणीत होईल.

कुठलाही प्रवास आपल्याला नवीन काहीतरी शिकवत असतो आणि ह्या सर्व अनुभवांची शिदोरी घेवून आपण आयुष्याची वाटचाल करत असतो नाही का? प्रापंचिक जीवन जगताना त्याला जर थोडी पारमार्थिक विचारांची ,साधनेची जोड असेल तर आयुष्यात येणाऱ्या चढ उताराना आपण न घाबरता, डगमगता तोंड देवू शकतो ,मार्ग काढू शकतो . अध्यात्माच्या ह्या वाटचालीकडे प्रवास म्हणजे सुखी जीवनाची जणू नांदीच. अध्यात्मामुळे विचाराना एक चांगली बैठक मिळून विचार परिपक्व होण्यास मदत होते. ह्या सर्वाची गरज खरतर आजच्या तरुण पिढीलाही आहे कारण आजचे  कॉम्पुटर युग स्पर्धात्मक आहे आणि प्रत्येक दिनी आम्हा युद्धाचा प्रसंग .  नुसतेच देवदर्शन नाही तर स्वतःला आणि परमेश्वरालाही ओळखा आणि त्याच्या कणाकणात भरलेल्या अस्तित्वाला आपला सलाम कराल ,एक उच्च कोटीचे अध्यात्मिक अनुभव घ्याल तसेच एक वेगळा अध्यात्मिक दृष्टीकोण देणारा अनुभव मिळाला

आपल्या ह्या धकाधकीच्या आयुष्यातून जेव्हा चारधामच्या यात्रांना निघतो तेव्हा मनात खूप काही असते , तिथे गेल्यावर काय करू नी काय नको असेही होवून जाते नाही. आपल्या घरातही देव्हारा असतो त्यातीलही देवांना रोज तितक्याच श्रद्धेने आपण नमस्कार करत असतोच  पण तरीही चारधाम किंवा कुठल्याही धार्मिक ठिकाणी जावून आपण दर्शन घेण्यास तेव्हडेच उत्सुक असतो. मला तिथे गेल्यावर अनेक अनुभव आले जणू काही देवच भेटला असे आपण म्हणतो कारण त्या पवित्र भूमीतील ,तिथल्या अणुरेणूत असलेल्या त्या मांगल्याचा तेथील पवित्रतेचा आणि वातावरणातील स्फंदनांचा ,सकारात्मक उर्जेचा एकत्रित होणारा परिणाम जणू त्या परमेश्वरी शक्तीचे दर्शन घडवतो आणि मग आनंदाचे डोही आनंद तरंगअशीच मनाची अवस्था होते . तेथील संपूर्ण वातावरण ,वारा ,नद्यांच्या पाण्याचा खळखळाट एक दिव्य अध्यात्मिक अनुभूती देवून जातो. मन प्रफुल्लीत करणारा ,आपल्या त्याच जीवनाला एक वेगळा दृष्टीकोन देवून नव्याने जीवन जगण्यास प्रवृत्त होवून आपण परतत असतो .कधीतरी आयुष्यात प्रत्येकाला शांततेची ,आपल्यातील परमेश्वरी शक्तीला शोधून नतमस्तक होण्याची गरज भासतेच. इतकेच नव्हे तर अश्या अध्यात्मिक जिथे तेथील देवतेचा प्रत्यक्ष वास सर्वत्र जाणवत असतो अश्या ठिकाणी आपलीही आपल्याला नव्याने ओळख नाही झाली तरच नवल. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी आपण निसर्ग ,तेथील शांतता अनुभवतो .पण जेव्हा एखाद्या धर्मस्थळी जातो  तेव्हा तिथे नुसतेच दर्शन नाही तर कित्येक वर्षाची शोधात असलेली शांतता मिळते  आणि मग हे क्षण असेच स्तब्ध राहावेत असेच वाटते. हिमालयाच्या कुशीत असलेल्या ह्या सर्व ठिकाणांचे प्रत्येकाचे असे एक अस्तित्व ,वलय आहे ,प्रत्येक ठिकाणचे स्थानमहत्व पुन्हा अर्थात वेगळे .आत्मशांतीला आपल्यात सामावून घेऊन विश्वकल्याणासाठी तिला प्रक्षेपित करण्याचे सार्मथ्य हिमालयात आहे. हिमालयाची यात्रा ही आत्म्याला शांती, पुष्टी व तुष्टी देणारी आत्म-यात्राच. युगानुयुगे अगदी निशब्द , निश्चल राहिलेल्या हिमालायास पर्वतराज म्हणून देवताही त्याचा अनुनय करतात. सूर्यालाही आपल्या रश्मींची माला त्याच्या चरणी समर्पित करावीशी वाटते.

उत्तराखंडातील अलकनंदा नदीच्या काठी असलेल्या आणि हिमशिखरावर विराजलेले बद्रीनाथ मंदिर. श्री विष्णूंचे स्थान म्हणून गौरवलेल्या ह्या मंदिराची स्थापना श्री रामचंद्रांनी केली .बद्रीनाथांच्या दर्शना आधी केदार नाथांचे दर्शन करण्याची प्रथा आहे. केदारनाथ इथे पूर्वापार खूप बर्फ आणि पाऊस पाहायला मिळतो.

ऋषींच्या तपस्येमुळे प्रसन्न होवून प्रत्यक्ष भगवान शंकर प्रगट झाले आणि ज्योतिर्लिंगा च्या रुपात तिथे सदैव वास करीन असे वरदान दिले. यामुनोत्रीस यमुना ,गांगोत्रीस गंगा ,केदारनाथ ला मंदाकिनी आणि बद्रीनाथ ला अलकनंदा ह्या दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या ,एक निर्मल वातावरण शांतता देतात.

हिमालयाच्या सानिध्यातील चारधाम च नाही तर काश्मीर पासून पुढे अमरनाथ ला जातानाहि हिमालयाची नव्याने ओळख होत जाते. हिमालय आपले आयुष्य संपूर्णतः कसा बदलून टाकतो हा अविस्मरणीय अनुभव शब्दांकित करता येणार नाही तो प्रत्येकाने स्वतःच अनुभवायचा आहे .

 

मनाजोगते देवदर्शन, गंगास्नान आणि त्याचबरोबर अध्यात्मिक साधना ,ह्याचा सुरेख मेळ. शांत वातावरणात आणि निसर्गाच्या सानिध्यात आपल्या मनाची शुद्धता होते .आपल्या आतल्या आवाजाशी नकळत केलेला संवाद एक रोमांचकारी अनुभव देतो . खरच नुसतेच पर्यटन नाही तर किती गोष्टी अनुभवायच्या आहेत एकाच ठिकाणी. प्रापंचिक जीवनास अध्यात्माची जोड हवी हेच तर हिमालयाला सुचवायचे नसेल ना?

 

हिमालय दर्शन करून आल्यावर सर्व ठिकाणचे मनासारखे दर्शन तर झालेच पण मलाही हि मी नव्याने उमगले...पुन्हा अगदी फ्रेश झाले, तेथील वातावरणात जाणवलेल्या दैवी शक्तीच्या वास्तव्याचा परिणाम चिरकाल आनंद देणारा आहे आपणही नक्कीच ह्या सर्व रसांची अनुभूती घेवून तृप्त व्हा.

 

अस्मिता

antarnad18@gmail.com

 

 

 

 

 


Friday, 8 January 2021

मनाचे अंतरंग

 || श्री स्वामी समर्थ ||



आहे त्याचा स्वीकार केल्यास नव्याण्णव टक्के चिंता पळुन जातात. वेदनांना विचारांपासुन तोडलं की चिंता पळुन जाते.

1) भुतकाळात घुटमळणे बंद करा – 

बसल्या बसल्या ना, आपल्या डोक्यात उगाच चक्र सुरु असते, 

- “दहा वर्षांपुर्वी मी चांगला अभ्यास केला असता, तर आज मी ही खुप मोठ्ठा ऑफीसर राहीलो असतो.” 

- “सात वर्षांपुर्वी मी प्लॉट घ्यायला हवा होता, तेव्हा मी सुवर्णसंधी सोडली.” 

- “त्यावेळी मी त्यांच्याशी असे वागायला नको होते! खुप वाईट आहे मी!” 

- “मी खुप कमी पगारावर काम करायला तयार झालो, मी असे नव्हते करायला पाहीजे.”

 व्हायच्या त्या घटना घडुन गेल्या, 

टाईममशीनमध्ये जाऊन ते काही बदलता येणार नाही, तेव्हा आता त्यावर विचार करुन फक्त आणि फक्त, आपली बहुमुल्य उर्जा, फालतुमध्ये खर्च होणार, त्यापेक्षा 

भुतकाळातल्या, ह्या सर्व चांगल्या वाईट घटना, विसरुन गेलेलं, बरं

2)इथे प्रत्येक जण अद्वितीय आहे! – 

बहुतांश दुःखांच मुळ हे तुलनेत असतं,  ह्या जगात प्रत्येक गोष्ट एकमेवअद्वितीय आहे, गुलाब दिसायला सुंदर असतो, पण म्हणुन मोगर्‍याचं महत्व कमी होत नाही, त्याचा सुगंध ही त्याची ओळख! त्या दोघात डावं-उजवं अशी तुलना करता होईल का? प्रत्येक फुल अद्वितीय आहे.

आता यात डावं उजवं करुन, कशाला दुःखी व्हायचं! प्रत्येकाचा चेहरा एक दुसर्‍यापासुन वेगळा आहे, म्हणुन ह्या जगातली प्रत्येक व्यक्ती एकमेव अद्वितीय आहे, तुम्हीपण!..

3) ‘आयुष्य कशासाठी’ याचं उत्तर शोधा. –

आयुष्य भगवंताने आपल्याला दिलेली अनमोल भेट आहे, आयुष्य सतत आनंदी राहण्यासाठी आहे, आयुष्य उत्साहाने भरभरुन जगण्यासाठी आहे, आयुष्य भव्यदिव्य स्वप्नं बघण्यासाठी आणि ती स्वप्ने मनमुरादपणे जगण्यासाठी आहे, आयुष्य आपल्या आणि इतरांच्या चेहर्‍यावर हसु फुलवण्यासाठी आहे!

जीवनाचा प्रत्येक क्षण निष्पापपणे बागडण्यासाठी आहे, मनातले सर्व अपराधी भाव, भुतकाळ-भविष्यकाळ, काल्पनिक जबाबदार्‍यांचे ओझे, सगळे सगळे फेकुन द्या, मोकळे आणि रिते व्हा, प्रत्येक क्षणाला, निरापराध वृत्तीने, निरागसपणे सामोरे जा!

माणसाला तीन गोष्टी जास्त त्रास देतात, प्रत्येक दुःखाच्या मुळाशी ह्या तीन गोष्टी सापडतील, 

 अ) अपेक्षा

 ब) अपुर्ण स्वप्ने,

 क) ध्येयप्राप्ती नंतर येणारा रिक्तपणा!

बहूदा आपण भला ऊसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी ! याच विचारात असतो.  तो कसा सुखी आहे, 

ती कशी मस्त जगते,  त्याच आयुष्य आरामशीर आहे,  माझ्याकडे हे का नाही, या अपेक्षेने, तुलनेने दु:ख्खी होत तर नाही ना .

बघा! किती गंमतीशीर आहे हे, समजा, एखाद्याचे लग्न होत नाही, तेव्हा तो किती परेशान असतो, उठता-बसताना, जेवताना, झोपताना एकच ध्यास असतो, लग्न-लग्न-लग्न! नकळत हाच विचार, चिंता बनुन, त्याच्या आत्म्याला डाचु लागतो, त्याच्या दुःखाचं कारण बनतं, मग हास्य गायब होतं, चित्त थार्‍यावर राहत नाही, चिडचिड वाढते. स्वप्नप्राप्तीकडे रोज वाटचाल करायची पण मनावर जखम न होवु देता!, ह्याला म्हणतात, सुखी जीवन आणि समजा, एके दिवशी लग्न झालेच, (प्रत्येकाचे होतच असते,) मग अचानक आयुष्यातले थ्रील खतम! पुन्हा सप्पक आयुष्य सुरु, जॉब लागु दे, जॉब लागु दे म्हणुन तळमळलो, आणि जॉब लागला, आता थोड्याच वर्षात त्या जॉबचा कंटाळा यायला लागतो, एक प्रकारचा रिक्तपणा येतो, 

आयुष्य कशासाठी? जीवनाचा निर्भेळ आनंद घेण्यासाठी, मनाच्या आकाशात हे उत्तर जेव्हा गवसेल, तेव्हा नैराश्य, उदासीनता जवळपास फटकणार पण नाहीत.

4) सेवा करणार्‍याला आत्मिक समाधान मिळते. -

बघा! किती मजेशीर आहे हे,

- अगरबत्ती स्वतः हवेत विरुन जाते, पण वातावरणात एक प्रसन्न सुगंध पसरवते,

- दिव्याची वात स्वतः नष्ट होते, पण तेजाने घर उजळुन टाकते.

काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ धावत असतो, पण खरे समाधान कुठे आहे?  आपल्यात असलेल्या गुणांचा, शक्तीचा वापर आजुबाजुच्यांना, नातेवाईकांना, मित्रांना, अगदी अनोळखी लोकांना सुखी, आनंदी बनवण्यासाठी करणार्‍यांचं जीवन खरं सार्थ झालं, असं म्हणता येईल. 

ह्याच चार सुत्रांचा मिळुन बनतो,  लॉ ऑफ अट्रेक्शन!

मनाच्या तळाशी जाऊन सुखाचा शोध घेऊ पाहणारया,  सगळ्यांचे आयुष्य, सुखी, समाधानी आणि समृद्ध होवो,  ही प्रार्थना 🙏🌹

संग्रहित 

अस्मिता

antarnad18@gmail.com


Tuesday, 5 January 2021

कुलस्वामिनी

 || श्री स्वामी समर्थ ||




आपण जन्माला आलो कि आपल्याला अगदी रेडीमेड कुटुंब मिळते. आई वडील काका मामा आजी आजोबा मावशी अशी अनेक नाती क्षणार्धात जोडली जातात . आपण ज्या कुळात जन्माला येतो त्या कुळाची देवताही असते जीचे आपण आपली कुलस्वामिनी म्हणून पूजन करतो. प्रत्येक घराण्यातील कुलस्वामिनी वेगळी असते आणि तिचे पूजन करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात. अनेक ठिकाणी शुभ कार्याच्या वेळी किंवा देवीच्या उत्सवात देवीचा गोंधळ घालण्याची प्रथाही पूर्वापार चालत आली आहे.

आपल्या घराचे जसे “ फमिली डॉक्टर ” असतात अगदी तशीच आपली कुलस्वामीनी आपली आई असते जिला आपली नस अन नस माहित असते . त्यामुळे तिचे पूजन सर्वार्थाने शुभच असते.

आपल्या रोजच्या उपासनेचा प्रारंभच कुलस्वामिनीच्या उपासनेने , नामस्मरणाने झाला पाहिजे कारण तिचा मान सगळ्यात मोठा आहे. त्यांनतर इतर उपासना ,जपजाप्य आहे.

विवाहानंतर स्त्रीचे कुळ बदलते त्यामुळे तिने सासरच्या कुलस्वामिनीचे पूजन करावे. पण आपण ज्या कुळात जन्माला आलो त्याही देवीचा विसर पडू नये आणि तिचेही पूजन करावे असे माझे स्वतःचे वैयक्तिक मत आहे. नवरात्रात दोन्ही देवीच्या ओटी भरावी तसेच आपल्या ग्राम देव्तेचीही ओटी भरावी .

आपल्या देव्हार्यात आपल्या कुलस्वामिनी आणि कुलदैवत ह्यांचे फोटो , मूर्ती किंवा टाक ह्यापैकी काहीतरी एक असलेच पाहिजे त्याशिवाय देवघर अपूर्ण आहे. देवीला रोज हळद कुंकू लावून आपल्याहि लावावे आणि घरातील वडील मंडळीना रोज नमस्कार करावा. आपण केला तर आपले अनुकरण आपली पुढील पिढीही करेल आणि त्यांच्यावर नकळत चांगले संस्कार होतील . हे संस्कारच पुढे त्यांना चांगला माणूस घडण्यास उपयुक्त ठरतील.

आपल्या देवीच्या दर्शनाला निदान वर्षातून एकदातरी सहकुटुंब जावून यावे, कारण शेवटी स्थान महत्व हे आहेच . अनेक कुटुंबात श्रावण किंवा नवरात्रात सवाष्ण भोजन घालण्याची प्रथा आहे. सवाष्ण बोलवून खीर पुरणाचा स्वयपाक करून देवीला नेवैद्य दाखवायचा , सवाष्णीची ओटी भरून तिला भोजन द्यायचे हा कुलाचार आहे. आजच्या बदलत्या जीवन पद्धती नुसार ह्यातील अनेक गोष्टी काळाच्या पडद्याआड जात आहेत. कुटुंबे विभक्त होत आहेत मग सुनांना वेळ नाही आणि सासूबाईना वयोमानपरत्वे होत नाही ह्या सर्व सबबी पुढे येवून सवाष्ण भोजन किंवा साधे हळदीकुंकू सुद्धा केले जात नाही .

पण शांतपणे विचार केला तर असे दिसून येयील कि आपल्याला वेळ असतोच . हवी असते ती हे सर्व करण्याची इच्छा आणि तळमळ . आपल्या ह्या रूढी आणि परंपरा ह्यामागे खूप मोठे शास्त्र आणि अर्थ आहे जो आपण समजून घेतला तर ह्या गोष्टी आपण मनापासून नक्कीच करू ह्याची मला खात्री वाटते .

आपल्या घरातील नवीन आलेल्या सुनांना सासरच्या वडील मंडळींनी आपल्या घरातील परंपरा , रिती सुरवातीलाच समजावून सांगितल्या पाहिजेत आणि त्याचे महत्वसुद्धा . असे झाले तर त्या हौशीनी सर्व करतील .पण आपण तसे न करता सुनबाई शिकलेली आधुनिक विचारसरणीची आहे ती काही करणार नाही हे गृहीत धरतो. कधीकधी माहेरी फारश्या प्रथा नसतात त्यामुळे मुलीना अनेक गोष्टी माहित नसतात पण त्याचा अर्थ त्यांना काहीच करायचे नसते असा लावणे किंवा तसा अर्थ काढून मोकळे होणे हे चूकच आहे.

आपल्या कुलस्वामिनीची सेवा करणे हे प्रत्येक स्त्रीचे कर्तव्यच आहे. त्यासाठी वर्षातून एकदातरी घरात हळदीकुंकू करावे . आलेल्या प्रत्येक स्त्रीला देवी स्वरूप मानून तिचा मान ठेवावा. देवीचा आपल्या वस्तुत जागर आहे ह्याचे भान ठेवून कुठल्याही स्त्रीचा अपमान किंवा धुसफूस , कुणाचीही निंदा करू नये नाहीतर त्या हळदीकुंकू समारंभाला “ गॉसिप कट्ट्या ” चे स्वरूप येयील. हे सर्व टाळावे. श्रावण , मार्गशीर्ष , नवरात्र अश्या पवित्र दिवसात “श्री सूक्ताचे ” पठण अवश्य करावे .कुंकुमार्चन करावे त्यामुळे घरात सकारात्मकता येते .

अनेक वेळा मनात असूनही अनेक गोष्टी मनुष्यबळ कमी म्हणून घरात होत नाहीत मग अश्यावेळ आपल्या घरात काम करणाऱ्या स्त्रीला काहीतरी दान करावे ,निदान शिधा तरी द्यावा तसेच नवरात्रात जवळच्या देवीच्या मंदिरात सव्वा किलो हळद कुंकू देवीला अर्पण करावे. दर्शनाला आलेल्या स्त्रिया ते लावतील आणि देवीला तुमची हि सेवा पोहोचेल.

देवीची पूजा ,अभिषेक , नामस्मरण , सवाष्ण भोजन , तीर्थाटन ,हळदकुंकू , कुंकुमार्चन अश्या विविध प्रकाराने आपण देवीची आराधना , सेवा करू शकतो .

मैत्रिणिनो, आपल्याला भिशी साठी ,मॉल मध्ये शॉपिंग ला खूप वेळ असतो, नसला तर ह्या सर्व गोष्टींसाठी आपण आवर्जून वेळ काढत असतो ,जगभर फिरायला आपल्याला वेळ असतो पण आपल्या कुलस्वामिनीच्या सेवेसाठी आपल्याला अनेक कारणे, सबबी सुचतात. मनुष्य हा ऐहिक सुखाचा भोक्ता आहे पण हे सर्व करताना आपली पारमार्थिक शिदोरीही पुण्याने भरलेली हवी ह्याचे भान असले पाहिजे. पुढील जन्मात आपल्याला पुण्यसंचय घेवूनच जायचे आहे .

ह्या सर्वाउपर प्रत्येक स्त्रीने दुसर्या स्त्रीचा आदर करायलाही शिकले पाहिजे. आपल्या समाजात आज स्त्रीच स्त्रीची शत्रू झाल्यासारखे चित्र बरेचदा दिसते. आपण स्त्रीचा सन्मान केला तर ते आपल्या देवीलाही आवडेल ,विचार करा .

कुलस्वामीनीचा आपल्या घरावर ,कुटुंबावर ,मुलाबाळांवर वरदहस्त असतो आणि तो अखंड राहावा म्हणून त्या आईचे नित्य स्मरण केले पाहिजे तसेच हा वारसा आपल्या पुढील पिढीलाही सुपूर्द केला पाहिजे .

देवाची पूजा , नामस्मरण हे सर्व “ Old Fashion ” नाही तर तो कित्येक पिढ्यांचा पूर्वापार चालत आलेला वसा आहे. ह्या सर्वांमुळे कुलस्वामिनी आई आपल्यावर ,आपल्या लेकरांवर कृपाछत्रच धरते ह्यात दुमत नसावे. आपल्याला जसे जमेल तसे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्या देवीचे नित्य स्मरण करत राहावे जे फलदायी आहेच आहे.

आपण कितीही “ Modern ” झालो तरी आपली पाळेमुळे आपल्या संस्कृतीत भक्कम रुजलेली आहेत आणि त्याची जपणूक आपल्यालाच करायची आहे.

उद्या मार्गशीर्ष मासातील अखेरच गुरुवार आहे. आपल्या कुलस्वामिनीच्या आशीर्वादाचे अभिलाषी असणारे आपण सर्वच उद्यापासून आपल्या कुलस्वामिनीच्या सेवेत रुजू होऊया आणि तिच्या कृपाप्रसादाचा निरंतर लाभ घेवूया.जे आधीपासूनच सेवेत असतील त्यांनी आपली उपासना वाढवावी आणि नसतील त्यांनी सुरवात करावी.

तुम्हाआम्हा सर्वांवर देवीची अखंड कृपा राहूदे हीच तिच्या चरणी प्रार्थना.

आई अंबाबाईचा उदो उदो .


अस्मिता


लेख आवडल्यास जरूर अभिप्राय द्या.

#महालक्ष्मी#अंबाबाई#कृपा#प्रसाद#नामस्मरण#सौभाग्य#देवी#दर्शन#हळदीकुंकू

#देवीचागोंधळ

 

 

 

 

 

 

Thursday, 31 December 2020

आनंद पोटात माझ्या माईना

 ||श्री स्वामी समर्थ ||

 

गुरुपुष्याला पारायण करायचे म्हणून कधीपासून तयारी केली होती . वर्षाचा अखेरचा दिवस. हे वर्ष खरच लक्ष्यात राहण्याजोगे गेले पण शेवटच्या दिवशी गुरुपुष्य आले म्हणून शेवटचा दिवस खरच गोड झाला आणि नवीन वर्षाची सकाळ सुद्धा. काल दुपारी पारायण सुरु केले आणि गुरुपुष्य संध्याकाळी सुरु झाल्यावर २१ वा अध्याय वाचला .आरती केली नेवैद्य झाला. महाराजांनी माझ्याकडून पारायण करून घेतले म्हणून त्यांचे मनापासून आभार मानले.

माझ्या अनेक ओळखीचे लोक गेल्या काही दिवसात ई-पास घेवून शेगावला दर्शन करून आले म्हणून माझ्याही मानत सारखे येत होते कि आपण इथेच राहिलो आपल्याला दर्शन कधी होईल. महाराजांच्या एका कृपा कटाक्षाची अभिलाषी मी नेहमीच असते. पण म्हणतात ना भक्तांचे त्यांच्यावरील प्रेम, तळमळ त्यांना नक्कीच समजते आणि आपल्यावर त्यांचा वरदहस्त कायम असतोच ह्याचा पुन्हा एकदा अनुभव आला.

आज वर्षाचा पहिला दिवस. आज सकाळीच 5 वाजता walk ला गेले असताना माझ्या ओळखीचे एकजण माझ्या समोर आले आणि त्यांनी माझ्या हातावर शेगावच्या गजानन महाराजांचा प्रसाद ठेवला. सद्गदित झाले .पुढे माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल ते तुम्हाला समजलेच असेल. खरोखरच निशब्द झाले. आनंद पोटात माझ्या माईना ग माईना अश्या अवस्थेत घरी आल्यावर त्यांच्या फोटो कडे पाहून नमस्कार केला ,मनाने मी कधीच शेगावला पोहोचले होते. ..अग मुली शेगावला पण बोलवीन तुला पण आज प्रसाद पाठवलाय बघ नवीन वर्षाची सुरवात आनंदात कर असेच जणू ते मला सांगत होते. प्रसाद सर्वाना वाटला आणि आनंद द्विगुणीत झाला.

खरच २०२१ आपल्या सगळ्यांसमोर अनेक आव्हाने, व्यवसायातील अनेक संधी घेवून उभे ठाकले आहे. सगळ्यात सांभाळायची आहे ती आपली प्रकृती आणि मानसिकता. हे सर्व करताना प्रत्यक्ष सद्गुरूकृपा लाभली तर अजून काय हवे ? आणि त्यासाठी सतत आपल्या गुरूंचे स्मरण , नित्य उपासना ह्याची सातत्याने गरज आहे. आयुष्य कसेही असो कितीही चढउतार असुदेत आपण त्यांचे चरण सोडायचे नाही आणि नित्य सेवेत राहायचे इतकेच मला समजते . अनेक संकल्प आपण करत असतो अनेक आराखडे बांधत असतो ,आपल्या अध्यात्मिक सेवेचाही असाच आराखडा मी प्रत्येक वर्षी करते. कमीतकमी इतकी तरी सेवा झालीच पाहिजे कारण हि उपासनाच आपल्याला सुखाचे , समाधानाचे क्षण आणि शांत झोप मिळवून देयील.

आपल्या नित्य प्रापंचिक ,धकाधकीच्या जीवनातून सहज जमेल अशीच हि उपासना आहे ,करून बघा.

वर्षातून एकदातरी महाराजांचे दर्शन घ्यावे. वर्षातून निदान एका व्यक्तीला श्री गजानन विजय पोथी भेट द्यावी जेणेकरून वर्षातून आपल्याकडून एक भक्त महाराजांच्या सेवेत रुजू होईल.

वर्षातून २१ पारायणांचा नेवैद्य महाराजांना अर्पण करावा. प्रत्येक महिन्याच्या १ ते २१ तारखेपर्यंत रोज एक अध्याय असे प्रत्येक महिन्यात एक पारायण होईल.अशी वर्षातून १२ पारायणे होतील. प्रगट दिन , ऋषी पंचमी , गुरु पौर्णिमा , दत्त जयंती , माघी गणेश जयंती , श्रावण आणि मार्गशीर्ष गुरुवार ४ अशी २१ पारायणे वर्षातून करावीत . ह्या उपर जमेल तशी पारायणे करत राहावी ,मनात दृढ निश्चय हवा पुढे महाराज आपल्याकडून करून घेण्यास समर्थ आहेत . नित्य जमेल तसा महाराजांचा जप आणि मानसपूजा करावी. ह्या सर्वांमुळे साधनेत सातत्य राहते. संकट आले कि मग महाराज असे होत नाही.

शेवटी त्यांच्याकडे एकाच मागायचे आहे ..आमरण वारी घडो आणि सदैव तुमचे चिंतन राहो.

अस्मिता